श्रानिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २५

Submitted by बेफ़िकीर on 4 September, 2010 - 04:19

गंभीरपणे घेण्यासारखे काहीही नाही यावर नैना आणि महेश दोघांचेही जवळपास एकमत झालेले होते. कारण जगतापांचा गिरीश जरी व्यवसाय सांभाळत असला तरीही नैना आत्ता कुठे अकरावी झालेली होती. आणि अजून दोन वर्षे लग्न करणेच बेकायदेशीर होते. त्या दोन वर्षांमध्ये त्या गिरीशला पन्नास स्थळे आली असती अन त्याचे चार हात झालेही असते.

हा 'दोनाचे चार हात होणे' वाक्प्रचार ज्याने मराठीत आणला त्याला मरणोत्तर परमपती चक्र द्यावे असे कधीकधी मला वाटते. विवाहानंतर पहिले नवलाईचे दिवस सोडले तर बहुतांशी दोघांनी दोन हात असे एकंदर चार हात करणे हा एकमेव उद्योगच उरतो. काही दांपत्यांचे नवलाईच्या दिवसातही चार हात होत असतील तर त्यांनी वकीलाला भेटणे योग्य ठरेल!

'लय वेळा' आनंदात होते दोघेही! कारण त्या गिरीशची त्याच्या अपरोक्ष, इथे पुण्यात, टर उडवणे हा महेशचा छंद बनला होता अन त्यावर हासणे हा नैनाचा! मात्र, सर्वांसमोर महेश त्याची टर उडवायचा नाही. नाहीतर शीलाकाकूला होऊ घातलेल्या जावयाचा अपमान झाल्यामुळे राग यायचा अन रोजचा 'एकमेकांशी निदान दोन चार शब्द बोलण्याचा' शिधाही खुंटला की उपाशी मरावे लागायचे ही भीती होती.

शिधा! सध्या तो शिधा फारच अपुरा वाटत होता महेशला! हे काय हे? दिवसातून दोन वेळा एकमेकांशी 'झाला का अभ्यास', 'आज लवकर आलीस का' एवढं बोललं की बाकीचं सगळं बोलणं आपलं खिडकीतून नजरेच्या माध्यमातून? याला काय अर्थ आहे?

पण त्यामुळे खिडकीतून एकमेकांकडे पाहण्याची तीव्रता पराकोटीला पोचलेली होती. शिंद्यांच्या घराला अडीच खोल्या होत्या. स्वयंपाक घर, हॉल आणि एक लहानशी खोली. त्यातल्या हॉलमधे काका काकू आणि लहान खोलीत मागे नैना झोपायची. त्यामुळे एकदा झोपाझोप झाली की 'जरा नजरोंसे बोलो जी' सुरू व्हायचे. पण त्यात महेशची व्हायची गोची! कारण त्याच्या घराला एकच खोली! सारखे आपले बाबा मागे मागे! कित्येकवेळा तर बाबा झोपल्यानंतर महेश हळूच उठून खिडकीत उभा राहायचा आणि पाच, सात मिनिटे एकमेकांकडे भरभरून पाहून काहीतरी चावट अ‍ॅक्शन करून झोपी जायचे. म्हणजे, त्या महेशच्या अ‍ॅक्शन्सना नैनाने चावट हे विशेषण प्रदान केलेले होते. त्यामुळे त्याला आणखीनच सुरसुरी यायची. मग कधी ओठांचा चंबू करूनच तिच्याकडे बघ, कधी जणू तिचे केस उजव्या हातात घेऊन त्यांचा सुगंध आपल्या श्वासात खोलवर भिनवून घेतो आहोत अशी अ‍ॅक्शन कर असे काय काय चालायचे! त्याने तशी अ‍ॅक्शन केली की तिकडे नैना हसून केस विंचरून केसातील गुंतवळ खाली टाकल्याची अ‍ॅक्शन करायची. मग हे रागावणार! मग ती हसणार! असलं काय काय बरेचवेळा करून शेवटी 'बाय' ही अ‍ॅक्शन करायची. मग पाच, दहा मिनीटे झोपून पुन्हा हळूच उठून बघायचे की 'दुसरा' अजून थांबलाय का खरच झोपला! मग त्याच्यावरून रागवारागवी किंवा आनंद! त्या काळात मोबाईल फोन असते तर दास्ताने वाड्यातून मोबाईल कंपनीला एस.एम्.एस्.चे सर्वात जास्त कलेक्शन मिळाले असते. आणि राजाकाका आणि श्रीनिवास यांना फेफरे आले असते

सहा महिन्यात 'आग दोनो तरफसे बराबर लगी है' ही परिस्थिती आली. दास्ताने वाड्यात वर्षानुवर्षे राहून अत्यंत तीक्ष्ण बुद्धीमत्ता व भोचकपणा कमावलेल्या एकाही माणसाला या गुलाबी कथेचा सुगावाही लागू नये म्हणजे कळसच म्हणायचा!

आणि सहा महिन्याने टाकलं की शीलाकाकूने वाक्य!

"नैने.. आता बारावीचा अभ्यास एकदम मस्त कर... पुढचं शिक्षण जगताप करणार आहेत..."

हा हायड्रोजन बॉम्ब रात्री नऊ वाजता फुटल्यामुळे दुसर्‍या दिवसापर्यंत पुनर्वसन मोहीम हाती घेता येत नव्हती. रात्री नऊच्या पुढे कसं भेटणार महेशला?

त्या रात्री नैना एकदाही हासली नाही खिडकीतून बघताना! कोणत्याही अ‍ॅक्शनला प्रतिसादही दिला नाही की स्वतः कोणतीही अ‍ॅक्शन केलीही नाही. महेशला काहीही समजत नव्हते. ती फक्त एकटक त्याच्याकडे बघत होती. आणि शेवटी रागावल्यामुळे महेशने 'बाय' केले तेव्हा तिने गुडघ्यात डोके खुपसलेले त्याला लांबून दिसले अन त्यच्या पायाखालची वाळूच सरकली.

नक्कीच! नक्कीच काहीतरी झालेले आहे. काहीतरी ठरलेले आहे. त्याशिवाय ही रडणार नाही. आणि ते... ते नक्कीच आपल्या दोघांच्या बाबतीतले आहे.

उद्याच्या उद्या सोक्षमोक्ष लावायलाच हवा!

तळमळत दोन कोवळे प्रेमी जीव आपापल्या घरात रात्रभर जागे राहिले आणि सकाळी सहा वाजता श्रीनिवास बाहेर फिरायला गेला त्या क्षणी महेश खाली उतरला आणि राजाकाकाच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. त्यांचे दार उघडेच होते. शीलाकाकू लवकर उठायची, साडे पाच वाजता! सहा वाजता काका आणि सव्वा सहापर्यंत नैना! पण आज नैना उठलेली होती अन ती बाहेरच्याच खोलीत आईला काही ना काही मदत करत होती.

ही का इतक्या लवकर उठली असावी याची शीलाकाकूला कल्पनाच येत नव्हती. त्यातच तिने पाहिले तर दाराबाहेर महेश!

शीला - काय रे?
महेश - आत्ता माझ्या लक्षात आलं...
शीला - ... काय?
महेश - माझा मित्रंय ना.. विवेक.. त्याच्याकडे समर्थांच्या पादुका आल्या आहेत काल संध्याकाळी. .. ते मागे तुम्ही म्हणाला होतात ना.. दर्शन घ्यायचं होतं म्हणून...
शीला - हो हो.. .. मग.. आज जाता येईल का आम्हाला...
महेश - नाही ना.. सकाळी सात वाजता निघणार आहेत..
शीला - काय रे महेश.. काल नाही का बोलायचंस...
महेश - मी पटकन जाऊन प्रसाद आणू का?
शीला - आंघोळ तरी झाली आहे का?
महेश - आंघोळ आत्ता करतो पाच मिनिटात.. नाहीतर मग...
शीला - ..
महेश - नैना तयार असली तर तिला पत्ता सांगतो कुठे आहे ते..
शीला - छे! ती आत्ता उठतीय.. अहो.. तुम्ही जाऊन येता का पटकन आवरून..
महेश - नाहीतर एक काम करा ना.. मी अन नैना पटकन जाऊन येतो आवरून..
शीला - नैना.. जाणारेस का तू पटकन...
नैना - .. हं!
शीला - आवर रे मग महेश तुझं.. कुठंय ते?
महेश - जोगेश्वरीपाशी...
राजाकाका - हिला आत्ता कॉलेज आहे.. महेश.. मी येतो..

सगळं बोंबललच! उगीचच राजाकाकाला घेऊन विवेककडे जाऊन आला. काकाला खाली थांबायला सांगीतलं अन पाच मिनिटे वर जाऊन वैतागल्यासारखा खाली आला अन म्हणाला 'काल गेल्या म्हणे पादुका पुढे'! राजाकाका वैतागला.

पण त्याला संशय आला नाही कारण नैना अन महेश हे प्रकरण त्याच्या खिचगणतीतही नव्हते.

मात्र एक झालं! राजाकाका घरात शिरत असताना... 'काय कचरा झालाय बाई' असे म्हणत नैनाने सहेतुक महेशकडे पाहात एक छोटा कागदाचा बोळा बाहेर फेकला. काहीच घेणे देणे नसल्यासारखा महेश एक दोन मिनिटे इकडे तिकडे वावरला अन मग हळूच त्याने तो बोळा उचलला अन वर आपल्या घरी गेला.

श्री - काय रे? होतास कुठे तू?
महेश - राजाकाकाला विवेककडे घेऊन गेलो होतो...
श्री - का???
महेश - समर्थांच्या पादुका आल्या होत्या म्हणून.. पण गेल्या त्या कालच..
श्री - कालच नाही का सांगायचंस?
महेश - विसरलो...

श्री कामात असताना हातात उगीचच एक पुस्तक धरून मग बोटांमधे दडवलेली ती चिठ्ठी महेशने हळूच उघडून वाचली..

'पुढच्याच वर्षी लग्न ठरवत आहेत. बारावीनंतरचे शिक्षण सासरी करायचे म्हणत आहेत. काय करू? मी नाही तुझ्याशिवाय राहू शकणार'

सगळं संपलंच! असं कसं लग्न ठरवतात? शिक्षण नको व्हायला? आपण कसं बोलायचं? कुणाशी बोलायचं? कोण आहे की जे आपलं रहस्य शाबूत ठेवून आपल्याला मदत करेल?

समीरदादा? शक्य आहे. पण त्याचे विचार खूप वेगळे असतात. तो म्हणेल बिनधास्त भिड काकाला! आपल्याला परवडणारच नाही ते!

राजश्रीताईला तर आधीपासूनच नैनाबद्दल अढी आहे. ती तर उलट तोडायचाच प्रयत्न करेल! मोठ्या माणसांना काही सांगणे शक्यच नाही. अजून आपला डिप्लोमाही झालेला नाही. त्यानंतर डिग्री, त्यानंतर नोकरी अन त्यानंतर लग्न! नुसते नोकरीला लागायलाच आपल्याला अजून चार वर्षे आहेत. तिचा नवरा तिकडे बेळगावला मोठा व्यवसाय सांभाळत आहे, मोठे खानदान आहे, श्रीमंत आहेत. आपली ही एक भाड्याची खोली! नैनाच्या तर स्वतःच्याच तीन खोल्या आहेत. राजाकाका बाबांपेक्षा श्रीमंत आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे.. आपण अजून लग्नाचे नाहीच आहोत हा मुद्दा फार महत्वाचा आहे.

आज कॉलेजला जायचंच नाही असं ठरवलं महेशने! त्यापेक्षा नैनाच्या कॉलेजला जाऊयात! पण महेशने नैनाच्या कॉलेजला जाण्यास नैनाचा ठाम नकार होता. कारण तीन मैत्रिणी ओंकारेश्वराच्या परिसरातच राहणार्‍या होत्या. त्यांनी कधी ना कधी महेशला पाहिलेलेही असणार होते त्या भागात! आणि नैनाची इमेज खाली मान घालून नाकासमोर चालणारी गुणी मुलगी अशी होती.

रस्त्यात नैनाशी बोलणे शक्य होते. नाही असे नाही. पण तसे किती बोलणार? काय ठरवणार? आणि त्यातही रस्त्यात नैना मोकळेपणाने बोलणार नाही.

काय .... काय.... काय करायचे? कोण असा मित्र आहे जो आपल्याला या बाबतीत मदत करू शकेल??

किंवा तिची कोणती मैत्रिण आहे जिला दोघांच्या भावना सांगता येतील अन निदान एकमेकांचे संदेश तरी एकमेकांपर्यंत पोचू शकतील? खरे तर आत्ताची स्टेज अशी होती की महेश सरळ नैनाशी गप्पा मारायला तिच्या खोलीत जाऊन बसला तरी वाड्यातल्या एकाही कपाळावर अठी येणार नव्हती. पण अवघडलेपण त्यांच्या स्वतःच्याच विचारांमधे असल्याने तो चोरटेपणा वाटत होता. आणि आता अशी परिस्थिती आलेली होती की नैनाच्या लग्नाचे सर्वाधिकार तिच्या पालकांच्या हातात होते अन त्याबाबतीत ढवळाढवळ राहूदेत, नुसती एखादी भूमिका घेणे इतकाही महेशचा अर्थाअर्थी संबंध राहिलेला नव्हता.

आधीच काहीतरी करायला हवे होते! आपण बेसावध राहिलो. त्या गिरीशची थट्टा करत राहिलो. प्रकरण वेगळेच शिजत होते इकडे! आता तो आपल्या नैनाला घरी घेऊन जाईल अन तिच्या रुपावर भाळून तिच्यावर इतके प्रेम करेल, इतके प्रेम करेल, की पुढे पुढे तर नैनाही आपल्याला... पूर्णपणे विसरून जाईल..

आत्ताच्या आत्ता! आत्ताच काहीतरी करणे आवश्यक आहे.

बाबा ऑफीसला निघून गेल्यानंतर महेश पुन्हा खिडकीत उभा राहिला.

शीलाकाकू बाहेर कपडे वाळत टाकत होती. राजाकाका बहुधा ऑफीसला निघाला असावा. नैना दिसतच नव्हती. चिठ्ठी? आपणही एक चिठ्ठी लिहावी? की अशा अशा वेळेस अशा अशा ठिकाणी भेट? पण.. तिला देणार कशी? तिने दिली तशीच? अन मधेच कुणीतरी उचलली तर? किंवा नैनाच्या ते लक्षातच आले नाही तर? ती आहे कुठे पण? बेधडकपणे सांगावे का शीलाकाकूला? की आपल्याच बाबांना सांगावे!

अचानक दार वाजले. दचकलाच महेश! आधी त्याच्या डोक्यात सगळे विचार नैनाचे असल्यामुळे त्याला वाटले राजाकाका किंवा शीलाकाकूच आली. दार उघदले तर राजश्री ताई!

महेश - काय गं?
राजश्री - येऊ का?
महेश - ये की.. येऊ का म्हणजे काय?
राजश्री - गेला नाहीस? कॉलेजला?
महेश - चाललोय.. जावं का नाही विचार करतोय.. बोल.. तू कशी काय आत्ता?
राजश्री - आपलं भेटणंच होत नाही रे.. घाई नाहीये ना तुला?
महेश - नाही .. बस की..

राजश्री बसली अन महेश वैतागला. आत्ताच्या सिच्युएशनमधे त्याला ती येणे हा एक व्यत्यय उगाचच सहन करावा लागत होता.

महेश - बोल..
राजश्री - सारखं बोल बोल काय?
महेश - ...
राजश्री - मला खूप प्रॉब्लेम्स आहेत रे घरात...
महेश - ... काय?
राजश्री - तू भावासारखा आहेस म्हणून तुला सांगतीय..
महेश - काय झालं?
राजश्री - लग्न ठरवतायत.. मुंबईला.. शिकायची गरज नाही म्हणे..
महेश - ... क्काय??? तुझं?
राजश्री - हं...
महेश - अगं पण.. आत्ताशिक तू १९ वर्षांची आहेस फक्त!
राजश्री - मुलींच लवकर लग्न होतं..
महेश - इतक्या लवकर थोडीच होतं...
राजश्री - या सगळ्या बोलण्याला काही अर्थ आहे का?
महेश - म्हणजे काय? आपल्या आयुष्याचं आपण काहीच ठरवू शकत नाही?
राजश्री - काय ठरवायचं? आपल्याला एक पैसा कमवायची अक्कल नाही. वडिलांच्या पैशाने आपण शिकत असतो. त्यांना जबाबदारी वाटू लागलो की ते म्हणतील त्याच्याशी लग्न करून टाकाव लागणारच!

महेश - असं काही नाहीये आता.. कित्येक जण स्वतः लग्न ठरवतात स्वतःचं!
राजश्री - मी काय करू ते मला सांग..
महेश - तू काय करू म्हणजे काय? नाही म्हणून सांगून टाक काकांना..
राजश्री - बाबा बोलतच नाहीत.. आई माझं ऐकायलाच तयार नाही..
महेश - अगं पण हे सगळं सुरू कधी झालं? एकदम अशा पातळीवर कसं आलं?
राजश्री - महेश... शपथ दे.. कुठेही बोलणार नाहीस याची...
महेश - काय..??
राजश्री - आधी शपथ दे...
महेश - हो.... नाही बोलणार कुणाला... काय झालं?
राजश्री - एक जण आहे... विकास म्हणून... कॉलेजमधे.. तो अन मी...
महेश - ....
राजश्री - ...म्हणजे.. अजून..
महेश - तुमचं प्रेम आहे?
राजश्री - ....
महेश - तुला पण आवडतो....
राजश्री - ... हं!
महेश - मग.. तेच का सांगत नाही आहेस आईला??
राजश्री - तिला आधीच कळलंय ते.. वर्गातल्या सुजाताने एकदा घरी येऊन चहाडी केली...
महेश - ...काय??
राजश्री - म्हणूनच तर माझं लग्न ठरवायला बसलेत...
महेश - पण मग... आता काय करणार आहात??
राजश्री - काही समजत असतं तर ... इथे कशाला आले असते???
महेश - म्हणजे?? मी काय करणार? हवं तर माझ्या बाबांशी बोलतो.. ते काकांशी बोलतील...
राजश्री - तुझ्या बाबांचं माझी आई ऐकणार नाही काहीही...
महेश - तो विकास.. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे?
राजश्री - नापास होतो, नीट शिकत नाही.. पण मनाने चांगला आहे.. वडिलांच दुकान आहे..
महेश - पण.. प्रॉब्लेम काय आहे त्या मुलात?
राजश्री - स्वतःच्या पायावर उभा नाही अन गरीब आहे...
महेश - हो पण पुढे कमवेल ना भरपूर?
राजश्री - कोणते आईबाप आपल्या मुलीला अशा आशेवर एखाद्या घरी पाठवतील...
महेश - तुझं.. तुमचं... किती प्रेम आहे एकमेकांवर...
राजश्री - ......
महेश - ... बोल ना..
राजश्री - किती याला काय अर्थ आहे महेश? आम्ही नाही जगू शकणार एकमेकांशिवाय...
महेश - मग???
राजश्री - मग काय?.... ताटातूट... नाहीतर जीव देण...दुसरं काय...
महेश - त्याला सांगीतलंस का?
राजश्री - कालच..
महेश - तो काय म्हणतोय??
राजश्री - तो गांगरलाय.. पण म्हणतोय की आपण पळून जाऊन लग्न करूनच येऊ..
महेश - असं कसं?
राजश्री - मग काय करायचं?.. काही सूचत नाही म्हणून तुझ्याकडे आले तर तुच शंका काढतोयस..
महेश - अगं पण.. एकदम मी काय करणार?? मी हव तर..
राजश्री - ... काय?
महेश - मी हव तर.. त्याला भेटतो... सांगतो की..
राजश्री - ....
महेश - तुझं चांगलं होणार आहे.. आता एकमेकांना.. विसरून...
राजश्री - याच्यासाठी मी आले होते तुझ्याकडे?
महेश - मग आता.. तू त्याच्याबरोबर तो म्हणतोय तसं लग्न करायला तयार नाही आहेस... तर..
राजश्री - मी कुठे नाही आहे तयार? मी आहे की तयार...
महेश - .. मग? .. मग काय प्रॉब्लेम आहे.. त्याच्या घरचे..
राजश्री - त्यांचा प्रश्नच नाही आहे.. वडील स्वभावाने खूप चांगले अन शांत आहेत..
महेश - मग??
राजश्री - अरे पण.. ..कुणाबरोबर पळून जाऊ म्हणतोयस तू??
महेश - म्हणजे???
राजश्री - असा कुणी विकास वगैरे नाहीच आहे ना??..
महेश - म्हणजे काय? ..... तू थट्टा करतीयस??
राजश्री - छे... तूच थट्टा करतोयस आपल्या नात्याची...
महेश - म्हणजे??
राजश्री - हे घे.. नैनाची चिठ्ठी.. वाटेत पडलेली मिळाली आत्ता येताना.. ती विचारतीय पळून जाऊन लग्न करायचं का?

काळा ठिक्कर पडला चेहरा महेशचा! ही कुठली अजून एक चिठ्ठी?...

महेश - तुला.. कशी मिळाली...
राजश्री - तिने हा बोळा फेकला.. अन मी दिसल्यावर एकदम जीभ चावली.. मला काय तिची भीती वाटणार आहे? मी सरळ उचलला, वाचला अन आले तुझ्याकडे.. एवढं सगळं चाललंय तुमच्यात.. अन तुझ्या ताईला सांगत नाहीस होय रे??

राजश्रीचा मिश्कील चेहरा पाहून अत्यानंदाने आरोळी वगैरे ठोकावी की काय असे वाटू लागले महेशला! अचानक प्रश्न सुलभ झाला होता. आता राजश्रीताई नाही म्हंटले तरी काही ना काही मदत करणारच होती. पण... पळून जाऊन लग्न करणंच शक्य नव्हतं! एकतर नैनाचं वयच कमी होतं! अजून एक वर्ष होतं अठरा पुरी व्हायला! अन पळून जाऊन लग्न करणे म्हणजे बाबांच्या आयुष्यातील सर्वात मोठ धक्का त्यांना देणे! हे त्यांच्या आत्ताच्या वयाला पेलेल का?

पण आपण हे कसले विचार करतोय? नैनासारखी मुलगी स्वतःला आई अन वडील दोघेही असूनसुद्धा पळून जायला तयार होतीय, तेही वय नसताना! आणि आपण इतके बुळचट विचार कसे करतोय?

राजश्री - ती लहान आहे ना?
महेश - .... हं!
राजश्री - एक वर्षभर कशीतरी कळ काढा.. इतक्यात तिचं लग्न तेही करू शकत नाहीतच.. नंतर सरळ पळून जा! मात्र त्या आधी श्रीकाकांशी तुझी बाजू तू कधीतरी मांडून ठेव! एक लक्षात ठेव गट्टू...

राजश्री कधीकधी महेशला अजूनही गट्टूच म्हणायची..

"काहीही झालं तरी तू एक इंजीनीयर होणार आहेस, एकुलता एक आहेस, चांगल्या घरातला आहेस.. तुझ्यासारखं स्थळ मिळणं हेही खरं म्हणजे एक भाग्य वाटेल कोणाला... तेव्हा.. आत्मविश्वासाने वाग.. बुळचटपणा करू नकोस असल्या बाबतीत.. कारण... "

महेश - ... कारण???

राजश्री - .. कारण.. पहिलं प्रेम.. हेच शेवटचं प्रेम असतं.. नंतर प्रेम कधीही बसत नाही दुसर्‍यावर... आणि.. बसलंच.. तरी पहिलं प्रेम आयुष्यातील शेवटच्या क्षणीही डोक्यातून जात नाही.. आणि.. पहिलं प्रेम मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करणं, करायला धजणं, हा मवालीपणा नाही.. तो पुरुषार्थ आहे.. तेच प्रेमाचं प्रतीक आहे.. ती मुलगी असून धाडस दाखवतीय... अठरा वर्षांची झाली की खरोखरच पळून जा अन लग्न करा.. नैनाला आयुष्यभर सुखात ठेव.. ती तुला मिळाली तरच तू अन तीही सुखी व्हाल.. नाहीतर आयुष्यभर कुढत राहाल मनात... आपापल्या संसारात सुखी भासाल जरूर.. पण सुखी नसाल.. कधीच नसाल.. काहीही कर.. पण ती अठरा वर्षांची झाल्या झाल्या तिच्याशी लग्न करून टाक.. निघते मी..

राजश्रीताई गेली अन उघड्या दाराकडे अवाक होऊन पाहात असलेल्या महेशला एक नवीनच उभारी मिळाली. ताई आपल्या बाजूने आहे. आपण एक चांगले स्थळ भासण्याचे पोटेन्शिअल असलेले आहोत. खरे तर प्रॉब्लेम काहीच नाही आहे.. फक्त.. विचारून लग्न करायचं किंवा... न विचारता.. पण... आता नैन आपलीच... नैना... महेश... पेंढारकर... !!!!

======================================

राजश्रीताईने बोळा उचलल्यामुळे पाचावर धारण बसलेली नैना खिडकीतून टक लावून महेशच्या घराकडे बघत बसलेली होती. तब्बल पंधरा मिनिटांनी राजश्रीताई बाहेर पडलेली पाहून ती स्वतःच्याच घरात किंचित लपली अन पुन्हा पाहू लागली. राजश्रीताई अन तिचे आयुष्यात जमलेले नव्हते. कारण नैना राहायला आल्यापासून सतत महेशच्या मागे मागे लागायची अन त्यामुळे राजश्रीताईला महेशशी खेळायला, बोलायलाच मिळायचे नाही. त्यामुळे ती नैनावर तोंडसुख घेत असायची. पण राजश्रीताईला नैना वचकून होती. कारण तिला माहीत होतं की महेशच आपल्या ताईवर अपरंपार प्रेम आहे अन आपण तिला काही बोललो तर तो आपल्याला चांगलाच झापेल! त्यामुळे ती राजश्रीताईसमोर अगदी नम्रपणे वागायची.

आणि बोळ्याला बोळ्यानेच उत्तर मिळाल्यामुळे सायंकाळी अभ्यासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या दिशांना बाहेर पडून शेवटी दोघेही संभाजी पार्कमधील अलिखित नियमानुसार लव्हर्ससाठी असलेल्या एका विशिष्ट स्पॉटला अंधारात एकमेकांवर चुंबनांची अन अश्रूंच्या सरींची बरसात करत होते. त्यांच्या मिठीतून आता हवाही जाऊ शकत नव्हती. नैना अखंड रडत होती. पळून जरी जायचे म्हंटले तरी आपापल्या पालकांचा विश्वासघात करण्यासारखेच होते अन त्याचेच तिला टेन्शन आलेले होते. पण दोघांनी मुळी हा विचारच केलेला नव्हता की पळून जायची गरज पडणार आहे ती दोघांच्याही घरच्यांनी नकार दिल्यानंतर! घरचे काय म्हणतील हा अंदाज घेतल्याच्या आधीच पळून जायचा प्लॅन कशाला करायचा हे त्यांना सुचतच नव्हते.

फ्लुईड मेकॅनिक्सचे गाईड घ्यायचे आहे म्हणून आजीकडून उसन्या घेतलेल्या पस्तीस रुपयांमधे महेशने तुळशीबागेतून आणलेले एक खोटे मंगळसुत्र नैनाच्या गळ्यात घातले अन ती ती जी त्याला बिलगली ...

नैना - मी नाही जगणार तुझ्याशिवाय... नाही जगू शकणार मी..
महेश - वेडी आहेस... माझ्याशिवाय जगायला मी जिवंत नको का राहायला तुझ्याशिवाय??
नैना - महेश .. श्री काका ... काय म्हणतील रे??
महेश - बाबांचा एवढा काही प्रश्न नाही.. तुझ्या घरचे थांबायला तयार झाले की झाले..
नैना - माझ्या.. माझ्याही बाबांचा प्रश्न नाही.. पण आई.. तिचं काही सांगता येत नाही...
महेश - ह्या! शीलाकाकू किती शांत स्वभावाच्या आहेत..
नैना - तुला नाही माहीत.. पवार आजी अन मानेकाका असतात म्हणून ती बोलत नाही फारसं..
महेश - म्हणजे??
नैना - आई खूप रागीट आहे.. खूप झापते मला घरातल्या घरात...
महेश - पण..
नैना - महेश.. ऐक ना... त्या.. जगतापांना.. काहीतरी...
महेश - ... काय?
नैना - खोटनाटं ... सांगशील का माझ्याबद्दल..??
महेश - नैना.. काय बोलतेस? तुझी बदनामी... मी करायची??
नैना - आपल्याच दोघांसाठी रे...
महेश - छे.. हे असलं काहीतरी डोक्यात आणू नकोस...
नैना - मग मीच पत्र पाठवीन त्यांना...
महेश - काय?
नैना - की माझं दुसर्‍या एकावर प्रेम आहे... नाहीतर फोन करून सांगू का??
महेश - वेडीबिडी आहेस का? अजून तुझ एक वर्षभर लग्नच करता येत नाही...
नैना - वर्ष काय रे? केव्हाच पसार होईल... आपण तर एकमेकांना भेटूसुद्धा शकत नाही..
महेश - भेटायचं! आता एक काम करू... दर गुरुवारी साडे सहा वाजता इथेच भेटायचं...
नैना - नको.. आज आलो आहोत त्याचंच टेन्शन आलय... अंधार आहे म्हणून थांबलीय मी..
महेश - मग साडे सात वाजता भेटत जाऊ...
नैना - नको रे... काहीतरी भलतंसलतं होईल..
महेश - तुझी साथ नसेल तर मी काय करू शकणार आहे नैना...
नैना - यात साथ देण्याचा काय प्रश्न आहे.... आपण काय करायचं ते तर आधी ठरवूयात..
महेश - माझ्या मनात काय आहे ते सांगतो...
नैना - ....
महेश - एक वर्षभर काहीच बोलायचं नाही घरच्यांना.. नंतर मि आधी माझ्या बाबांना सांगणार.. मग त्यांना म्हणणार की राजाकाकांशी बोलून घ्या.. ताई आहेच आपल्या बाजूने.. आजीला मी तयार करतो.. काकूवर प्रेशर येईल. प्रमिला काकूचेहीमाझ्यावर खूप प्रेम आहे.. ती पण आपल्या बाजूने बोलेल.. एवढं झालं की शीलाकाकूला निदान सिरियसली घ्यायला तरी लागेलच! तिने विरोध केला तर आपण सगळ्यांसमोर म्हणायचं.. की आम्ही एकमेकांशी बाहेर जाऊन लग्न करायचं ठरवलं आहे.. झकत आपलं म्हणणं त्यांना मान्य करावच लागेल.. कारण तुला डांबून, जबरदस्तीने ते लग्नाला तयार करूच शकत नाहीत.. काय?

नैना - आणि...
महेश - ....???
नैना - वर्षभरात माझा... साखरपुडा झाला तर???

हबकलेला महेश तिच्याकडे पाहातच राहिलेला होता.

नुसतीच चर्चा झाली. निघताना नैनाने ते मंगळसुत्र हळूच काढून आत सरकवून ठेवलं! आता हे मंगळसुत्र जपणे म्हणजे एक कसरतच होणार होती! आईने पाहिले असते तर भयानकच झाले असते. पण जीवापाड जपणार होती ते ती! मंगळसुत्र छातीपाशी नीट ठेवण्यासाठी तिने आपला रुमाल बाहेर काढला..

महेश - मला.. तुझ्याकडून भेट नाही देणार काही?
नैना - .. काय देऊ?
महेश - .. हा रुमाल दे...

नैनाने एक क्षणही विचार न करता आपला रुमाल त्याला देऊन टाकला. तो खिशात टाकला अन दोघेही वेगवेगळ्या दिशांनी आपल्या वाड्याकडे जायला निघाले..

संभाजी बागेतील झाडांनी आज एक उमलते प्रेम पाहिले होते.. माहीत नाही.. पुढे काय होणार होते...

आणि घरी पोचल्यावर महेशला आणखीन एक धक्का बसला. प्रमिला काकूला शीला काकू सांगत होती..

"त्या जगतापांचे थोरले बंधू पुण्यातच असतात.. नैनाला पाहायला उद्या येणार आहेत.."

प्रमिलाकाकूने 'अगं हे काय तिचं वय आहे का' अशी प्रतिक्रिया हसत हसत दिलेली होती... आणि..

खिडकीतून एकमेकांकडे बघताना.. दोघांचेही चेहरे अत्यंत पांढरे फटफटीत पडलेले होते...

बाबांनी लावलेल्या रेडिओवर किशोर हृदयाचे तुकडे तुकडे करत गात होता...

आँख भर आये अगर.. अश्कोंको मै पी लुंगा..
आह निकली भी अगर.. होठोंको मै सी लुंगा..
तुझसे वादा है किया.. इसलिये मै जी लुंगा...
तेरी दुनियासे.. होके मजबूर चला.. मै बहोत दूर.. बहोत दूर... बहोत दूर चला...

==========================================

तात्यासाहेब जगताप!

नांव ऐकलं कीच हादरावं असा माणूस! जन्म पुण्यातलाच, पण बरचसं बालपण बेळगावात गेलेलं! बहुतेक सगळे भाऊ तिकडेच! एक भाऊ पुण्यात अन हे स्वतः पुण्याच्या गणेशपेठेत स्वतःच्या वाड्यात राहायचे! तात्यासाहेब जगताप थोरले! त्यांना चार भाऊ अन चार बहिणी! सर्व कुटुंबात त्यांचे प्रस्थ सर्वाधिक! आता त्यांचे वय होते पंचाहत्तर! बायको त्यांच्यापुढे शेळीसारखी वागायची. बायकोच काय, सगळे लहान भाऊ अन बहिणीही! त्यांची मुलेही! लग्न कार्ये, गुंतवणुका, नवीन घरे घेणे, शिक्षण, खरेदी! संपूर्ण कुटुंबाच्या अशा सर्व गोष्टी तात्यासाहेबांच्या अ‍ॅप्रूव्हलशिवाय व्हायच्या नाहीत. झापायचे ते! त्यांचा नॉर्मल आवाजच मळ्यात शेतकरी ओरडतात तसा होता. त्यांचा तीन नंबरचा भाऊ सदानंद याचा मुलगा गिरीश आता फळांचा होलसेल व्यापारी झाला होता बेळगावात! आणि त्याच्यासाठी चालून आलेली मुलगी या पुण्यातच राहाते म्हंटल्यावर तात्यासाहेबांनी आजच आपला एक 'मुत्सद्दी दूत' शिंद्यांच्या घरी पाठवला होता.

"उद्या सकाळी तात्यासाहेब दहा वाजता येतील.. मुलगी पाहायला.. एकटेच येतील.. ते फक्त फळे अन दूघ घेतात.. उदबत्ती लावल्याशिवाय अन्नाला हात लावत नाहीत... अत्यंत कडक आहेत.. जपून राहा.. मुलगी त्यांना पसंत पडल्याशिवाय पुढे काहीही होऊ शकत नाही... "

हा निरोप ऐकून खरे तर राजाराम शिंदे हादरलेच होते. आपल्या मुलीचे काही खरे नाही हे त्यांना समजलेले होते. पण शीलाकाकूने त्यांना धीर दिला. आपण आपल्याकडून नम्रपणे व व्यवस्थित खातरदारी करू! बाकी सगळं ईश्वरावर अवलंबून ठेवू!

आणि नैनाची आतल्या आत घुसमट होत होती. इकडे महेशचीही! दोघेही रात्रभर पुन्हा जागेच राहिले.

महेशने या प्रकरणासमोर कॉलेज तद्दन क्षुद्र ठरवून टाकले होते. बाबांना एकदाच थाप मारली होती की झालेलाच पोर्शन जरा पुन्हा घेतायत सध्या!

शीलाकाकूने 'आपल्याकडूनही कुणीतरी थोरलं दिसणारं असावं म्हणून मावशी, मानेकाका आणि निगडे काकूंना' बोलवून ठेवलं होतं. नैनाबरोबर जरा सोबतीण असावी म्हणून राजश्री ताईला बोलावलं होतं! आणि या सगळ्या प्रकारात 'माझ्यासारखा एक कुणीतरी हाताशी असावा' असा मुद्दा काढून महेशही घुसला होता घरात! मधेच एकदा तो राजश्री अन नैना बसलेल्या नैनाच्या खोलीत गेला तर नाराज व्हायच्या ऐवजी नैना हसतच होती. ही कशी काय हसतीय विचारल्यावर राजश्रीताईने 'मी तिला तोतरं बोल' असे सांगीतले आहे असे सांगीतले. तोही हासला. जरासा ताण कमी झाला. पावणे दहा वाजले होते. जास्त वेळ मुलींच्या खोलीत बसणे शक्यच नसल्यामुळे मिनिटातच महेश बाहेर आला अन मोठा जबाबदार चेहरा करून राजाकाकाला 'ह्याचं कसं करायचंय, ते हे आणलंय का' वगैरे विचारू लागला. काकूला आता फारच आवडायला लागला तो! आणि तेवढ्यात सगळेच दचकले. आबा नावाचा एक गडी माणूस दारात येऊन म्हणाला..

"तात्यासाहेब वीर मारुतीपाशी पोचलेत.. आलेच म्हणायचे..."

वीर मारुती म्हणजे वाड्याच्या दाराच्या समोर! सगळे एकदम जय्यत तयारीत स्वागताला उभे राहिले. अगदी मावशी, मानेकाका अन निगडेकाकूही!

सहा फूट उंच, ताठ, कणखर देह, सावळा रंग, कपाळावर गंध, अत्यंत रागीट, संतापलेला चेहरा, धोतर, कोट आणि फेटा!

तात्या - मी तात्यासाहेब जगताप.. मुलीचे वडील कुठले???

वाडाच हादरला. काय आवाज आहे का काय? त्या माणसाला बघून महेशचीच काय, राजाकाकाचीही बोबडी वळली. राजाकाका आपला पाठीत शक्य तितका वाकून, हात बित जोडून त्यांना आत आणून एका खुर्चीवर बसवून म्हणाला..

राजा - मीच..
तात्या - आम्ही तात्यासाहेब जगताप! सव्वाशे एकर ऊस, गणेश पेठेत स्वतःचा वाडा, बेळगावात इस्टेटी, अठ्ठेचाळीस जणांचे कुटुंब! आम्ही सर्वात थोरले! आमच्या परवानगीशिवाय आमच्या घराण्यात काहीही होत नाही. तुम्हाला आमचे स्थळ सुचण्याचे काही विशेष कारण आहे? तुमच्या घराण्यात काही ऐतिहासिक वारसे किंवा मुलगी अप्सरेहून सुंदर असे काही विशिष्ट कारण आहे?

प्रकरण गंभीर होतं! अशा माणसासमोर जायचं या विचाराने नैनाच्या पायातील बळच गेलेलं होतं! शीलाकाकूला इतकंच बरं वाटत होतं की दोन तीन वयाने प्रौढ असलेली माणसे आपल्या घरात आहेत हे पाहून तात्यासाहेब जरा तरी सांभाळून घेतील.. पण त्यांच्या या प्रश्नावर कोण उत्तर देणार...

राजा - मुलगी सद्गुणी आहे, सद्वर्तनी आहे, रुपाने उजवी आहे, सुगरण आहे, प्रेमळ आहे, सगळ्या कुटुंबात रमून जाईल अशी आहे.. आपल्या बंधूंच्या तृतीय चिरंजिवांनी पाहिलेली आहे.. त्यांना पसंतही आहे..

तात्या - आम्ही पसंत करणे हे महत्वाचे आहे... मुलीची आई कोण?
शीला - मी.. नमस्कार करते..
तात्या - लांब व्हा..
शीला - ... चुकलं का काही?
तात्या - नातेसंबंध जुळत नाहीत तोवर औपचारिकता नको.. मुलीला बघायला आलो आहोत.. नमस्कार फक्त मुलीनेच करायचा..
शीला - हो हो... आपण... फळे घेणार का??
राजा - उदबत्ती लावलेली आहे..
तात्या - ठीक आहे..

आत नैना धास्तावली होती. सगळेच धास्तावलेले होते. हा माणूस लाऊड स्पीकरशिवाय असा बोलू शकत होता. त्यात पुन्हा बोलणे रोखठोक! स्वतःची महती सांगून दुसर्‍याला, त्यातही वधूपक्षाला गारद केलेले होतेच त्यांनी!

शीलाकाकूने फळे आणून ठेवली. सगळे त्या महाकाय माणसाकडे बिचकून बघत होते. त्यांनी सलग सहा केळी खाल्ली!

तात्या - हे कोण?
मानेकाका - प्रल्हाद माने! समोर राहतो. आमचा वाडा हे एक कुटुंबच आहे.
तात्या - कुठले माने तुम्ही?
मानेकाका - कोल्हापूर..
तात्या - जिवाजी मानेंपैकी?
मानेकाका - नाही..
तात्या - या कोण?
राजाकाका - या निगडे काकू आहेत. वाड्यातल्याच! आपल्यासारख्या वरिष्ठांशी बोलताना आमची काही चूक होऊ नये म्हणून सांभाळून घ्यायला त्या आल्या आहेत. आमचा अनुभव कमी, वय कमी!
तात्या - चूक कसली त्यात? या कोण..
मावशी - मी पवार मावशी! मीही वाड्यात राहते.
तात्या - मुलीला भाऊ बहीण?
शीला - एकुलती एक आहे. वागणूक नम्र आहे.
तात्या - मोठं एकत्र कुटुंब सांभाळण्याच वय आहे तिच?
शीला - अजून एक वर्षाने अठरा वर्षांची होईल..
तात्या - बेळगावच्या एकाच घरात सत्तावीस माणसे आहेत..
शीला - आपण शिकवाल तशी वागेल.. सगळं करेल.. आपण सांभाळून घ्यावत एवढच म्हणते..
तात्या - शिक्षण?
राजाकाका - आता बारावीला आहे..
तात्या - पुढे?
राजा - आपण म्हणाल तसं? आपली मुलगी आहे...
तात्या - आमच्याकडे बायकांनी अधिक शिकायची पद्धत नाही..
राजा - योग्यच आहे.. तरी... आपली परवानगी व आशीर्वाद असले तर ग्रॅज्युएशनपर्यंत शिकेल..
तात्या - नको.. तिकडे काय म्हणाले?
राजा - चिरंजिवांचे तीर्थरूप, आपले बंधू म्हणाले की आम्ही शिकवू पुढे!
तात्या - नाही शिकवणार.. लग्न झाल्यावर संसारात मन रमवले पाहिजे..
राजा - जसं आपण म्हणाल तसं!
तात्या - मुलगी कुठे आहे?
राजा - आण गं तिला..

शीला काकू अन राजश्रीताई या दोघींच्या आधाराने नैना हातात दुधाचा ट्रे घेऊन आली. त्या ट्रे मधील एका डिशमधे सुकामेवाही होता. केशर घातलेले दूध खास तात्यासाहेबांसाठी केलेले होते.

त्यांना दूध देऊन नैनाने नमस्कार केला.

तात्या - आयुष्यवंत हो.. सुखी हो.. नाव काय तुझं बाळ?
नैना - नैना राजाराम शिंदे
तात्या - काय काय कामं येतात तुला?
नैना - ....घरातलं सगळं करते..
तात्या - बाकी काही छंद? वाचन, लेखन वगैरे?
नैना - भरतकाम येतं आणि विणकाम..
तात्या - शिक्षण सुटणार आहे हे माहीत आहे ना?

नैनाने नाराज होऊन पण तात्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वाला बिचकून होकारार्थी मान डोलावली.

तात्या - वय काय तुझं?
नैना - सतरा वर्षं अन.. चार महिने!
तात्या - तिथे तुला चार दीर आहेत, दोन थोरले, दोन धाकटे, दोन जावा आहेत, त्यांची पाच मुले आहेत, सासू आहेच, पण आमचे दोन चुलत बंधूही त्याच घरात आहेत, त्यातले एक अविवाहीत तर एकांचे आठ जणांचे कुटुंब आहे, तसेच, गिरीशच्या मातोश्रींच्या तीन विधवा बहिणी तेथे राहतात, आम्ही मोठ्या मनाने त्यांना तेथे आश्रय दिलेला आहे.. एवढं कुटुंब आहे.. घाबरणार असलीस तर आत्ताच स्पष्ट सांग...

नैना - ... नाही..

तात्या - आमचे एकूण चारशे पान होईल, रिसेप्शन वेगळे, त्यात दिडशे जण असतील.. लग्न बेळगावला होईल.. एकंदर चोवीस जणांचे प्रमुख मानपान व साठ एक जणांना टॉवेल व टोपी असे करावे लागेल. तुमचं काय म्हणणं आहे?

हे सगळं राजाकाकाच्या कुवतीबाहेरचे होते. आता खरोखरच स्पष्ट बोलणे आवश्यक होते. पैशाचे सोंग कसे आणणार? तीनशे पान अन दहा जणांचे मानपान इथपर्यंत त्याची मजल होती. लग्न बेळगावला म्हंटल्यावर तो एक जाण्या येण्याचा खर्च वाढणारच होता. त्यात चारशे पान, परत रिसेप्शन अन वर जगतापांचे कुटुंब मोठे आहे म्हणून वाढीव मानपान! हे सगळं कसं काय जमणार?

राजा - तात्यासाहेब, आपण जे म्हणाल ते योग्यच आहे.. आमची परिस्थिती जरा बेताची आहे..
तात्या - म्हणजे काय? रोखठोक बोला...गोल गोल बोलणे आम्हाला जमत नाही..
राजा - तीनशे पान आणि तुमचे सगळे मानपान.. हे आमच्या क्षमतेत बसेल..
तात्या - मग?
राजा - रिसेप्शनचच जरासं...
तात्या - व्यवसायातील लोकांसाठी रिसेप्शन करावेच लागेल.. नाहीतर लग्नाचंच पान सहाशे होईल..
राजा - अं... आम्ही थोडा विचार करून..
तात्या - मी म्हणजे कर्ज काढायला आलेला शेतकरी नव्हे.. की शासनाने वेळ मागून घ्यावा..
राजा - तसं नाही..
तात्या - काय असेल ते आत्ता, या क्षणी सांगा.. अन मोकळे व्हा..
राजा - आपल्या घराण्यासारखं स्थळ मिळणं हेच आधी एक इतकं मोठं भाग्य आहे..
तात्या - तुम्ही पुन्हा गप्पा मारत आहात.. जेवढे विचारले तेव्हढेच सांगा...
राजा - आम्हाला.. साडे तीनशे पान आणि .. सगळे मानपान.. हे जमू शकेल..
तात्या - आणि?
राजा - आमची एवढीच विनंती आहे की.. रिसेप्शनबाबत आपण थोडं मवाळ व्हावत..
तात्या - मवाळ होणं आमच्या रक्तात नाही.. ठीक आहे.. आम्ही निघालो.. प्रस्ताव मोडलेला आहे..

एकदम उभेच राहिले ते! सगळेच दचकले. शीलाकाकू धावत पुढे आली..

शीला - तात्यासाहेब.. आम्हाला.. पैशाची सोय बघायला.. एक दोन दिवस तरी...
तात्या - तुम्हाला दोन दिवस वेळ लागणार असेल तर जरूर घ्या.. मात्र अंतीम निर्णत आत्ताच होईल.. आम्ही थांबू शकत नाही.. शिंदे होळकरांची स्थळे आलेली आहेत आमच्या मुलाला..
शीला - मानेकाका.. बोला ना काहीतरी..

शीलाकाकूने अपेक्षेने मानेकाकांकडे पाहिले. पण मानेकाकांचा चेहरा हिंस्त्र झालेला होता. लग्न म्हणजे काय बाजार आहे? मुलगी करून घेताय म्हणजे काय उपकार करताय? पण आत्ता तसे बोलणे शोभून दिसनार नव्हते. मानेकाका पुढे झाले.

मानेकाका - तात्यासाहेब.. आम्ही लहान माणसं.. मुलीवर जमतील तितके चांगले संस्कार करायचे अन जमेल तसे लग्न करून सासरी पाठवायचे यातच आमच्यासारख्यांचे आयुष्य जाते. आपल्यासारखे मोठे घराणे मिळणे हे आमच्यासारख्यांसाठी आयुष्याचे सार्थक आहे. आपण जे म्हणत आहात ते अक्षरशः योग्यच आहे. आपल्या प्रतिष्ठित घराण्याला शोभेलसेच आहे. मी आपल्याला फक्त एवढीच विनंती करू शकतो की .. आम्ही रिसेप्शनचे पैसे वाड्यातून जमवू.. पण.. थोडंस काही इकडे तिकडे झालंच तर.. आपण मोठ्या मनाने सांभाळून घ्यावत..

तात्या - एक म्हणजे आपला संबंध नाही आमच्याशी.. पण आपल्याला वधूच्या मातोश्रींनी पुढे केलेले आहे.. आता आम्ही आपल्यालाच विचारतो.. रिसेप्शन होणार की नाही एवढेच सांगा..

मानेकाका - करू तात्यासाहेब.. रिसेप्शन करू आम्ही.. आम्ही सगळे मिळून तो भार उचलू रे राजा.. तू काळजी करू नकोस.. अरे? असं घर मिळतंय मुलीला.. सोनं होईल आयुष्याचं सोनं..

राजाकाका अन शीलाकाकू गहिवरले होते.. पण तात्यासाहेब काय निकाल देतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते..

तात्या - ठीक आहे.. लग्न बेळगावला, आमचं चारशे पान लग्नाला अन दिडशे रिसेप्शनला, चोवीस प्रमुख व साठी रीतीप्रमाणे मानपान आमच्याकडच्यांचे आणि मुलीच्या अंगावर काय घालणार आहात?

शीला - तीन तोळे..

तात्या - तीन? जगतापांची सून वाटेल का ती?

तात्या बदलले होते ऐनवेळेस.. शेवटी मागणी केलीच होती त्यांनी... आत्तापर्यंतच्या सगळ्या रुबाबाच्या मागे एक नालायक चेहरा आहे हे आता नैनालाही समजले होते... आपण लिलावात विकले जात आहोत अशी भावना तिच्या मनात आली होती... आणि... सगळेच चिडलेले असताना आधीपासूनच भडकलेले मानेकाका आत्ता गप्प बसणं शक्यच नव्हतं...

तरीही आवाजावर नियंत्रण ठेवत ते म्हणाले..

मानेकाका - तात्यासाहेब.. आपण मगाशी.. सोन्याबाबत काही म्हणाला नव्हतात..
तात्या - ती रीत आहे.. आमच्याकडे आलेल्या सुना वीस तोळ्याखाली सोने घेऊन आलेल्या नाहीत...
मानेकाका - .. आपण जरा.. उदार मनाने ... हे लोक बेताच्या परिस्थितीचे आहेत..
तात्या - आमच्या परिस्थितीप्रमाणे लग्न होणे आवश्यक! यांच्या नाही..
मानेकाका - अहो पण मगाशी बोललाच नाहीत ना आपण..
तात्या - राजाराम शिंदे.. हे आमच्याशी मधे मधे का बोलत आहेत? तुम्ही वधुपिता असताना?
मानेकाका - का बोलत आहे म्हणजे? यांनी आम्हाला इथे बोलवलंय.. यांनी आपल्याशी बोलायला सांगीतलंय आम्हाला..
तात्या - हे पहा माने.. आपण आहात हलक्या बाजूचे... जिवाजी मान्यांसारखे लोक आमच्या वर्तुळात आहेत.. तुम्ही माने म्हणजे ते मूळचे माने नाहीत तुम्ही... तेव्हा तुम्ही आमच्याशी असे उद्दामपणे बोलू नका..

एवढा अपमान? वास्तविक आपल्या वाड्याची मुलगी म्हणून मानेकाका आपल्या संतापी स्वभावाला पूर्ण मुरड घालून नम्रपणे बोलत होते. पण आता हद्द झाली होती. तात्यासाहेब उगाचच 'भाव मिळत आहे' म्हणून
भाव खात होते अन दुसर्‍यांना काहीही बोलत होते. राजाकाका अन शीलाकाकूलाही आता राग आला होता. नैनाने तर मनात ठरवले होतेच! हा माणूस बाहेर गेला की आईला सरळ सांगून टाकायचं! 'यांच्या घरी नांदायचा प्रश्नच येत नाही, मला अजून शिकायचं आहे आणि आपल्याला साधंच स्थळ बरं'!

खरे तर शीला आणि राजा यांनाही आता तेच वाटू लागले होते. पण वधूपिता अन वधूची आई म्हणून मनात एक भोळी आशा होती. कदाचित तात्यासाहेब विरघळतील, त्यांचा स्वभाव असा असला तरीही बेळगावला कुणीही असे नसेल, नैनाला शिकवतीलसुद्धा!

तात्यासाहेब - आम्ही निघतो..
निगडे काकू - थांबा...

निगडे काकू मधे बोलतील याची कुणाला कल्पनाच नव्हती.

तात्यासाहेब उर्मट अन संतापी चेहरा करून 'एक बाई आपल्याशी बोलते?' अशा आविर्भावात निगडे काकूंकडे बघू लागले. राजा काका अन शीला काकू यांनी तर लग्न जमण्याची आशाच सोडलेली होती.

निगडे काकू - घराणे घराणे ऐकतीय मगाचपासून! मी कोण आहे माहितीय? माहेरची? भोसले आहे भोसले! पुरात आमचं सगळं वैभव उद्ध्वस्त झालं म्हणून! नाहीतर दास्ताने वाडाच काय, तुमचा गणेश पेठेतला वाडा खिसा झटकून विकत घेतला असता. तुमच्यासारखे किरकोळ जगताप बिगताप आमच्या पुर्वजांसमोर हाजी हाजी करायचे! तबेल्याची व्यवस्था पाहायला ठेवायचो आम्ही तुमच्यासारख्यांना शंभर दिडशे वर्षांपुर्वी! कोणासमोर बोलताय मगाचपासून? मुलगी सून म्हणून नेताय का पैसा समजून? निघा... यापुढे कुटुंबातल्या मुलांचे लग्न लावताना जपून बोलत जा.. तुमच्यापेक्षा कितीतरी उच्चभ्रू घराण्याचे लोक आहेत जगात.. बघता काय??? निघा????

तात्यासाहेबांचा गडी अक्षरशः आ वासून आपल्या मालकाचा इतका भयंकर अपमान पाहात होता. तात्यासाहेब इतके संतापले की त्यांनी सरळ निगडे काकूंवर हात उगारला. आता मात्र माने काका चवताळले..

मानेकाका - कोण रे तू उपटसुंभ? आं? आमच्या वाड्यात येऊन स्वतःच्या दौलतीचं वर्णन करतोस अन हुंडा मागतोस काय? थांब तुझी तक्रारच करतो चौकीवर... वयाकडे बघून सोडतोय तुला.. नाहीतर असा पिटला असता की आपलं घराणं कुठलं तेच लक्षात राहिलं नसतं! बाईमाणसावर हात उगारतोस? असले बुळचट पुरुष आहेत काय तुझ्या घराण्यात? आं?

तात्यासाहेबांनी पुढचा मागचा विचार न करता सरळ मानेकाकांना मागे ढकलून दिले. ही फार मोठी चूक केली त्यांनी! त्याचे भीषण परिणाम भोगायला लागले त्यांना!

"गाढवांच्या बाजारात उधारीवर विकलं तुझं घराणं! गणेश पेठेत वाडा अन शनिवारात राडा? या निगडीणीवर हात उगारतोस? आण गं शीलटले बत्ता? टाळक्यात घालते याच्या! ए पमे, कोमल, या गं या! बाईवर हात उगारतोय हा नालायक टोळ कुठला! मानेलाही दिलं ढकलून याने! सत्तावीस जणं आहेत काय बेळगावला? माझ्या एवढ्याश्या मुलीला राबवायला नेतोस? वर वीस तोळे सोनं? सात्विक थोबाड अन वागण्यात लबाड! तिरडी नेली तुझी आप्पा बळवंत चौकातून गणेश पेठेत! योनी भुताची अन कॅसेट लताची! नंदे.. धर याचं धोतर.. अन ने फरफटत दास्ताने वाड्यातून.. बघतेस काय? छंद विचारतोय मुलीला छंद! बायकांनी शिकायची पद्धत नाही काय? मोलकरणी हव्यात याला सुना म्हणून..केळी खातोय उदबत्या लावून.. म्हणे चार दीर अन दोन जावा आहेत.. धोतराला नाही कासरा अन हुंडा मागतो सासरा... "

पवार मावशींच्या गगनभेदी आवाजापुढे अन तत्क्षणी निर्मीत म्हणींपुढे तात्यासाहेब हतबल झाले होते. मावशी अजूनही ओरडतच होत्या. तात्यासाहेबच काय तिथे असलेले सगळेच अवाक झालेले होते. प्रमिला, नंदा, कुमार, कोमल, स्वतः निगडे, घाटे काका, घाटे काकू अन किरण! सगळेच जमा झालेले होते. एवढा जमाव आलेला पाहून तात्यासाहेबांची बोबडीच वळली. त्यात ते हुंडा मागत होते हे ऐकल्यावर मोठा असंतोष पसरला व ते त्यांनाही जाणवले. आता पळून जायच्या तयारीत असतानाच मगाशी ढकललेले मानेकाका ओरडून पुढे आले अन त्यांनी तात्यासाहेबांना ढकलले. कसाबसा तोल सावरत तात्यासाहेब गड्याच्या आधाराने वाड्याबाहेर पळाले. महेश अन किरण पार दरवाजाच्या बाहेर जाऊन मागून ओरडून त्यांना धमकवत होते. "ते बघा ते बघा हुंडा मागणारे... धरा.. धरा त्यांना"

आणि आतमध्ये...

शीलाकाकू हमसून हमसून रडून मोठ्याने ओरडत होती.

शीलाकाकू - मोठं म्हणून तुम्हाला बोलवलं.. काय केलंत तुम्ही? लाजा कशा वाटल्या नाहीत तुम्हाला नैनाच्या सासरच्या एवढ्या मोठ्या माणसाशी असं वागताना? आता बदनामी कुणाची होणार? आमचीच ना? मुलीकडचे वाटेल तसे बोलतात अन ढकलतात म्हणून? कसं लग्न होणार हिचं आता? स्वतःच्या स्वभावाला अर्धा तास लगाम नाही घालता येत? नतद्रष्ट आहात तुम्ही सगळे! कुठून बोलावलं तुम्हाला मी? वयाप्रमाणे वागता येत नाही का? मोडता घालता कार्यात दुसर्‍याच्या? यापुढे तुमचा आमचा काही संबंध नाही. नैनाच्या लग्नाला बोलावणार नाही मी तुम्हाला.. अहो.. ताबडतोब त्या तात्यासाहेबांकडे जाऊन त्यांचे पाय धरा! असलं स्थळ हातून घालवू नका.. हुंडा काय.. हवा तेवढा देऊ.. मी पण नोकरी करेन हवी तर.. नाही तर डबे करेन लोकांचे... पण जा तुम्ही आधी तिथे..

राजाकाका - शीला.. आपल्याला ते स्थळ नाही झेपणार.. प्रश्न फक्त लग्नाचा अन हुंड्याचा नाही आहे.. पुढेही ते स्थळ आपल्याला नाही झेपायचं.. छळतील आपल्या बाळाला ते लोक.. ऐक माझं! जगतापांच स्थळ काय एकच नाही.. नैनाचं शिक्षण होऊदेत... ती दिसायला चांगली आहेच, शिकल्यावर तिला याहून मोठी मोठी स्थळे येतील.. ऐक...

शीला अजूनही रडतच होती. पण तिने जगताप हा विचार आता स्वतःही मनातून जवळजवळ काढूनच टाकलेला होता. राजाकाकाचे बोलणे तिला पटू लागले होते. सगळे शीलाच्या संतप्त बोलण्याने दु:खी होऊन व कष्टी होऊन तिथे उभे राहिलेले होते. मावशी, मानेकाका अन निगडे काकूंना आपण चूक केली असे वाटू लागले होते. खरे तर ती चूक मुळीच नव्हती. पण शीलाने त्याला तसा रंग दिलेला होता.

जे झाले ते वाईट झाले! महेश अन नैनासाठी जरी चांगले झालेले असले तरी वाड्यातील लोकांची एकमेकांशी खरीखुरी भांडणे झाली.

एकेक जण मान खाली घालून बाहेर पडू लागला. शीला काकू जमीनीवर बसून रडतच होती. पवार मावशी अन मानेकाकांनी तिच्या जवळ जाऊन तिला थोपटले. शीलाकाकूलाही आता त्यांना बोलल्याच्या पश्चात्ताप होत होता की काय कोण जाणे! तेवढ्यात रडणार्‍या आईला थोपटण्यासाठी नटलेली नैना शीलासमोर वाकून तिच्या गालांवर हात फिरवू व तिचे डोळे पुसू लागली... आणि तेवढ्यात.. ती ओणवी झाल्यामुळे...

जे नको ते झाले...

.. शीला काकू अन राजा काका नैनाकडे बघतच राहिले... सगळेच अवाक झाले.. नंदाआत्याने मात्र सगळ्यांदेखत नैनाला प्रश्न विचारला..

"नैना? हे काय गं? ....... हे मंगळसूत्र कसल????"

गुलमोहर: 

आज माझा पहिला नम्बर............
पन आत्ता मात्र भिती वाटायला लागलीय्......बिचारी नैना.....

सावरी

असिमित....तु पहिला....अरेरे....मी नाही..

मस्त !!!!

बेफीकीर लगे रहो ..........

आपलं कथानक छान फुलत चाललंय !!!

( एक शंका : या भागात एकदाही श्रीनिवास पेंढारकर आले नाहीत हे जरा खटंकत नाही काय ???)

आता पुढे काय होणार ?
आता तर मी आजिबात विचार करणार नाहि...कारण विचार करुन डोक्याला मुंग्या येतिल्...
लवकर पुढील भाग द्या..बस्स..

कारण.. पहिलं प्रेम.. हेच शेवटचं प्रेम असतं.. नंतर प्रेम कधीही बसत नाही दुसर्‍यावर... आणि.. बसलंच.. तरी पहिलं प्रेम आयुष्यातील शेवटच्या क्षणीही डोक्यातून जात नाही.. आणि.. पहिलं प्रेम मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करणं, करायला धजणं, हा मवालीपणा नाही.. तो पुरुषार्थ आहे.. तेच प्रेमाचं प्रतीक आहे..>>>>
hats off.
मानल बेफिकीर.....................................

आर्याला मोदक!
बेफिकिर आता वाट नाही बघवत! येउ द्या लवकर पुढचा भाग.

पहिलं प्रेम.. हेच शेवटचं प्रेम असतं.. नंतर प्रेम कधीही बसत नाही दुसर्‍यावर... >>>> हे बाकी खरचं आहे!

अतिशय सुंदर भाग...
नैना काय होनार तिचे ? आता दिवस भर तिचेच विचार राहणार.
बेफिकिर आता वाट नाही बघवत! येउ द्या लवकर पुढचा भाग...

मस्त होता आजचा भाग...
वाड्यातली माणसं काय, आज भांडतील आणि उद्या जवळपण येतील एकमेकांच्या. शेवटी जीवाभावाची नाती अशी क्षुल्लक कारणांनी तुटतात थोडीच, नाही का?
पण महेश आणि नैनाची ह्या लग्नामुळे होणारी ताटातूट नसती बघवली...
आता नैना त्या मंगळसुत्राचं काय स्पष्टीकरण देतेय याची उत्सुकता लागून राहिलीये.
सर्व प्रतिसादकांना अनुमोदन. येऊ द्या लवकर पुढचा भाग.

अरे हा भाग न वाचताच २६वा वाचला, Sad आत्त लिंक लागली. Happy
या जगतापांसारखी माणसं अजूनही आहेत, लग्न म्हणजे देवाणघेवाण केंद्रच जणू असं त्यंना वाटतं.

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे मनःपुर्वक आभार!

ही कथा प्रतिसादकांनीच लिहवून घेतलेली आहे.

-'बेफिकीर'!