दंगल-ए-खास

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 September, 2010 - 05:18

''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....''
माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता.

गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची! नाहीतरी आमच्या घरी गणपती नसतात, त्यामुळे सुट्टीतील ही मनसोक्त भटकंती आमच्या खास पसंतीची होती. माझ्या वडिलांची प्रवास करतानाची खासियत म्हणजे कोणतीही आगाऊ आरक्षणे न करता सरकारी लाल डब्यातून प्रवास करणे! त्यांच्या मते त्यामुळे जास्त सुटसुटीतपणे आणि आरामात प्रवास करता येतो! कर्नाटकात तेथील सरकारी बसेसमधून प्रवास करत करत आम्ही आता बेळगावात, माझ्या लाडक्या गावात पोचलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे लवकरात लवकर मुक्कामाला आमच्या नेहमीच्या पै लॉजला जायचे, फ्रेश होऊन, खाऊन-पिऊन मस्तपैकी तण्णावून द्यायची आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा पुण्याला परतीच्या प्रवासाला निघायचे असा साधारण बेत होता.

पहिली माशी शिंकली ते पै हॉटेलच्या आवारातच! तेथील मॅनेजरने नम्रपणे सांगितले की हॉटेलच्या सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे तिथे राहण्यास जागा उपलब्ध नव्हती. आता आली का पंचाईत! एवढ्या वर्षांच्या बेळगावाच्या सफरींमध्ये आम्ही पै एके पै करत राहायचो. इतर कोणती चांगली हॉटेल्स, लॉज वगैरेही ठाऊक नव्हती. गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे असेल कदाचित, पण इतर दोन-तीन ठिकाणीही चौकशी केल्यावर सर्व रूम्स फुल असल्याचे कळाले.

मी व बहीण एव्हाना दमून कुरकुरायला लागलो होतो. विना- आरक्षणाच्या प्रवासाचा शीण तर होताच, शिवाय कडकडून भूकही लागली होती. शेवटी आमची अवस्था बघून तेथील बस स्टॅन्डपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका गल्लीतील जुनाट लॉजमध्ये जागा उपलब्ध आहे असे कळल्यावर वडिलांनी त्या रात्रीचा मुक्काम तिथेच करायचे निश्चित केले. शेवटी एका रात्रीचा तर प्रश्न होता! मुक्कामी पोचून अंघोळी वगैरे उरकेपर्यंतच मी व बहीण जाम पेंगुळलो होतो. जुन्या पध्दतीच्या वाड्याचेच लॉजमध्ये रूपांतर केले असल्यामुळे स्वच्छता, सोयी इत्यादींबाबत सगळाच आनंदीआनंद होता. पण इथे भूक आणि झोप ह्यांपलीकडे पर्वा होती कोणाला? कसेबसे पुढ्यात आलेले अन्न खाल्ले आणि थकलेले देह बिछान्यावर लोटून दिले.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठायला जरा उशीरच झाला! प्रवासाचा शीण चांगलाच बोलत होता! शेवटी पोटात कोकलणार्‍या कावळ्यांच्या जाणीवेने जाग आली. आठ वाजत आले होते. आदल्या दिवशी केलेल्या चौकशीनुसार सकाळी साडेनवाला पुण्याला जाणारी एक एस. टी. बेळगाव स्टॅन्डवरून सुटते असे कळले होते. बस पकडायच्या उद्देशाने घाईघाईतच आवरले आणि सामान बांधून तयार झालो. खालच्या स्वागतकक्षात आमच्या बॅगा, पिशव्या इत्यादी आणून वडिलांनी तिथेच काउंटरजवळ झोपलेल्या मुलाला उठवून चेक- आऊट केले. आम्हाला तिथेच थांबण्याची सूचना करून ते रिक्षा बघण्यासाठी बाहेर गेले.

वस्तुतः एस्. टी. स्टॅन्डच्या जवळची जागा म्हणजे रिक्षांचा सुळसुळाट हवा. पण त्या सकाळी ना रस्त्याने रिक्षा फिरत होत्या, ना नेहमीची वर्दळ होती. लॉजच्या तिरसट मॅनेजरला विचारल्यावर त्याने कन्नडमध्ये काहीतरी अगम्य बडबड केली, जी आम्हाला काहीही झेपली नाही. वडिलांना बाहेर जाऊन दहा मिनिटे कधीच होऊन गेली होती. काहीशा अर्धवट झोपेत, अस्वस्थपणे आम्ही त्यांची स्वागतकक्षातील बाकड्यावर बसून वाट बघत असतानाच बाहेरून घोषणांचे आवाज येऊ लागले. माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना! चुळबुळत, ऊठ-बस करत शेवटी मी आईच्या तीक्ष्ण नजरेतून हळूच सटकले आणि बाहेर रस्त्यावर डोकावले.
लाल झेंडे घेतलेली बरीच माणसे संचलनात जातो तशी समोरच्या रस्त्यावरून ओळीने घोषणा देत चालत होती. गळ्यात कसल्यातरी पट्ट्या, मळकट कळकट वेष, हातात फलक.... त्यांच्या घोषणा कानडीत असल्यामुळे माझ्या डोक्यावरून जात होत्या. पण हा काही साधासुधा मोर्चा नव्हता, एवढे मात्र त्या लोकांच्या त्वेषावरून कळत होते. तेवढ्यात त्या लॉजच्या मॅनेजरने मला हटकले आणि माझी रवानगी आत झाली.

मी आत येऊन आईला घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच्या प्रसंगाचे वर्णन करत होते तोच माझे वडील धापा टाकत आत आले.

''रिक्षा मिळाली?'' आईने विचारले. त्यावर वडिलांनी नकारार्थी मान हालवली व धपापत्या स्वरात म्हणाले, ''रिक्षा चालू नाहीएत आज! लवकर चला, आपल्याला एस्. टी. स्टॅन्ड्ला चालत जावं लागणार आहे!'' त्यांच्या स्वरातली काळजी मला तेव्हा उमगली नाही.

आमच्याकडे दोन सूटकेसेस आणि तीन शोल्डर बॅग्ज होत्या. सामानाने ठासून भरलेल्या. वडिलांनी दोन सूटकेसेस दोन्ही हातात घेतल्या, आईने जड असणारी शोल्डर बॅग घेतली आणि आम्हा दोघी बहिणींकडे वजनाने तशा हलक्या, पण सामानाने भरलेल्या शोल्डर बॅग्ज सांभाळायला दिल्या. आता दहा मिनिटे लेफ्ट राईट करत हा अवजड डोलारा सांभाळत जायला लागणार होते!! त्याला इलाज नव्हता!

आम्ही लॉजच्या बाहेर पडतो न् पडतो तोच एकदम जोरात आरडाओरडा झाला..... बघतो तो काय, गल्लीच्या एका टोकाला अजून एक लाल झेंडेधारी लोकांचा घोळका जोरजोरात घोषणा देत, हातात दगडधोंडे आणि अजून काय काय घेऊन आमच्याच दिशेने पळत येत होता. आम्ही घाबरून लॉजच्या दिशेने पाहिले तर लॉजचा मॅनेजर दारावरची पत्र्याची शटर्स खाली ओढत होता. आजूबाजूची दुकाने धडाधड बंद होत होती. संकटाचा वास आल्यागत गल्लीतील कुत्रीदेखील माणसांबरोबरच लपायला जागा शोधत होती. काही सेकंदांचाच खेळ, पण बघता बघता दगड भिरभिरू लागले. ''पळा......'' वडील जोरात ओरडले! आमच्या हातातल्या अवजड बॅगा पेलत आम्ही बस स्टॅन्डच्या दिशेने पळू लागलो. आम्ही पुढे, मागे आक्रमक जमाव असा तो सीन होता. दगड भिरभिरत होते, माझे काळीज सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गतीने धडधडत होते, डोक्यात काहीच शिरत नव्हते, फक्त जीव वाचवून पळायचे आहे एवढेच कळत होते!! पळता पळता बॅगेच्या बंदात पाय अडकून माझी बहीण थोडी धडपडली. तिला सावरून पुन्हा पळायला लागेस्तोवर तो चिडलेला जमाव अजूनच जवळ आला होता. एक दगड तर बॅगेला चाटूनही गेला. खाकी गणवेशातील, हेल्मेट घातलेले पोलिसही आता त्या जमावाच्या पाठीमागे हातातले दंडुके परजत पळत येत होते.
माझे वडील पुन्हा एकदा गरजले, ''पळा सांगतोय ना, जोरात पळा!!''

अंगाला घामाच्या धारा लागलेल्या..... कानशिले गरम झाली होती.... छाती थाडथाड उडत होती.... पायात गोळे येत होते.....चपला घासून पायाचे तळवे जळत होते.... अंतर संपता संपत नव्हते.... डोळ्यांना समोरचे नीट दिसतही नव्हते! पण आता पळालो नाही तर आपली धडगत नाही ह्याचीही खात्री होती! आमच्या पुढ्यात आमच्यासारखीच काही सैरावैरा धावणारी माणसे होती. बस स्टॅन्डकडे जाणारा तो एकमेव रस्ता असल्यामुळे बाजूच्या गल्लीत वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता!
पळत असतानाच समोर एक टोकदार शिंगे असलेली, जमावामुळे बिथरलेली म्हैस आली! तिला चुकवता चुकवता पुन्हा एकदा दगडफेक करणारी माणसे आमच्यापासून काही पावलांच्या अंतरावर....

असे म्हणतात की संतप्त जमावाला माणुसकी नसते! त्यांना फक्त राग, सूड, हिंसा कळते. त्याचे मूर्तिमंत प्रत्यंतर ह्या जमावाकडे बघून येत होते. मागच्या पोलिसांनी लाठीमार चालू केल्यामुळे ते अजूनच बिथरले होते. त्यांच्यापासून दूर पळतानाही मला मागे वळून ते किती अंतरावर आहेत हे बघण्याचा मोह आवरत नव्हता.... तर, मला मागे वळून बघत वेळ व्यर्थ घालवताना पाहून वडील चिडून ''पुढे बघ,'' असे ओरडत होते! सगळा कोलाहल नुसता!!

एस. टी. स्टॅन्ड नजरेच्या टप्प्यात आला मात्र, आणि थकलेल्या पायांची गती आपसूक वाढली. अजून काही पावले, आणि आमची दगडफेकीतून तात्पुरती का होईना, सुटका होणार होती! हातातले सामान कसेबसे सावरत, ठेचकाळत, धडपडत आम्ही एकदाचे एस टी स्टॅन्डच्या आत घुसलो तेव्हा दगडफेक करणारा जमाव बर्‍यापैकी मागे पडला होता. आता पुढची काही मिनिटे तरी धोका नव्हता. काही क्षण त्या सुटकेच्या भावनेत सुन्न मनाने उभे असतानाच वडील पुन्हा एकदा ओरडले, ''तिसऱ्या नंबरची बस..... धावा!! ''
आगारात समोरच उभी असलेली ती बस आटोकाट भरून ड्रायव्हरच्या प्रतीक्षेत उभी होती. टपावर सामानाची आणि बसमध्ये प्रवाशांची एकच गर्दी होती! पण ती बस व्हाया पुणे जाणारी होती. अधेमधे एखादा-दुसरा थांबा, आरक्षण नसल्यामुळे उभ्याने करायला लागणारा गर्दीतला प्रवास ह्या कशाकशाचा विचार न करता आम्ही तिरासारखे गाडीत घुसलो! मिळेल त्या जागेवर बॅगा ठेवल्या आणि धापा टाकत, श्वास सावरत, घाम पुसत बस सुरू व्हायची वाट पाहू लागलो. दोनच मिनिटांत बसचालक आला आणि प्रवाशांनी दुथडी भरून वाहत असलेली ती बस डचमळत एकदाची रस्त्याला लागली.

पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते!

दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो.

-- अरुंधती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बापरे अकु,
कसले कसले अनुभव घेतलेत तुम्ही!
कशामुळे झाली होती पण दंगल??? Uhoh

माझे बाबा रेल्वेमध्ये असल्याने वर्षातून ठराविक वेळा फ्री रेल्वे आरक्षण मिळत असे. त्यामुळे मी व माझ्या धाकट्या बहिणीने लहानपणी आई-बाबांबरोबर खूप प्रवास केला. अगदी एसटी, टेंपो, सायकलरीक्षा वै. जमेल त्या वाहनाने, जमेल तिथे लॉजवर, धर्मशाळेत राहून वगैरे ट्रीप्स एंजॉय केल्या. पण असा अनुभव नाही बाबा आला कधी. Uhoh

भयंकर अनुभव ! Uhoh

संतप्त जमावाला माणुसकी नसते! त्यांना फक्त राग, सूड, हिंसा कळते. << अगदी खरं आहे.. मिरज सांगलील्या दंगलीचे काही व्हिडीओ मेलवर आले होते ते पाहिल्यावर हे प्रकर्षाने जाणवले.

बॉम्बस्फोटासारखे अतिरेकी अन अंतर्गत दंगली माजवणारे हे दंगलखोर यात फरक तरी काय..

असाच एकदा.. रिलायन्स वेब वर्ल्डमधे गेलो होतो तेव्हा एका दाक्षिणात्य वृद्धाचा अनुभव ऐकला. तो त्या वेबवर्ल्ड मधल्या रिसेप्शन काऊंटरवर हुज्जत घालत होता तेव्हा त्याला विचारले आजोबा तुम्ही काय करत आहात इतकी हुज्जत का घालताय. तेव्हा ते म्हणाले.. "मी ह्या मुलीला फक्त मोठ्याने बोलण्यासाठी विनंती केली, तर ही विनयभंग केल्यासारखा विषय वाढवते आहे". तेव्हा तिथल्या मॅनेजरने त्यांना पाणी प्यायला दिले अन विचारले तर त्यांनी सांगितले कि लोकलमधल्या बॉम्बस्फोट प्रकरणात मी एका लोकलमधे बसलो होतो अन २ डबे सोडून बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्याचा आवाजाने त्यांच्या कानाचे पडदे फाटले होते त्यामुळे त्यांना ऐकायला कमी येत होतं" त्यांनी सांगितलं कि तो अनुभव इतका भयंकर होता कि मी वर्णन सुद्धा करू शकत नाही. अजुनही ते आठवायला लागलं कि जीव पटकन सोडून द्यावसा वाटतो.

चिमुरी, निंबुडा, सूर्यकिरण.... प्रतिसादाबद्दल धन्स!

निंबुडा, आम्हालाही ती दंगल नक्की कशामुळे झाली ते कळाले नाही.... पण वडिलांनी नंतर सांगितले की बेळगाव शहरात तेव्हा वातावरण तणावपूर्ण होते.... आदल्या दिवशीही दगडफेक, जाळपोळ झालेली....म्हणूनच दुसर्‍या दिवशी रिक्षा बंद होत्या!

दिनेशदा.. बेळगाव दिवसे न दिवस संवेदनशिल बनत चाललयं. घरातल्यांचीच घुसखोरी तिथे आता त्रास देऊ लागलीये. तो प्रांत महाराष्ट्रात यायलाच हवा. नाहीतर उद्या होणार्‍या दंगलीतून अशीच निष्पाप लक्तरे पहायला मिळतील. Uhoh

अकु, भयंकरच वर्णन आहे. माझाही असाच अनुभव आहे. लालकृष्ण अडवानींना अटक झाली ( १९८९ ) तेव्हा निषेधाच्या त्या मोर्चात मी होतो. अचानक त्या मोर्च्यातले लोक लुटालुट करायला लागले. त्या नंतर मी मोर्च्याच्या आजुबाजुला सुध्दा फिरकत नाही.

बापरे!!!! दुसरा शब्दच सुचत नाहीये!!!! खरोखर भयानक....

माझे आई-बाबा एकदा कलकत्त्याला ट्रिपला गेले होते आणि ते हातरिक्षेने शहर पाहायला निघाले होते. तेंव्हा अचानक त्यांना एक थरारक दृष्य दिसले. एक माणूस जीवाच्या आकांताने पळत होता आणि त्याच्या मागे एक जमाव चाकू घेऊन....सायकलरिक्क्षेच्या मर्यादीत वेगामुळे ही सगळी पळापळ आई-बाबांच्या डोळ्यासमोर घडत होती. शेवटी त्या जमावाने त्या माणसाला गाठलेच आणि त्याच्या पोटात चाकू खुपसला...
मला हे ऐकूनच इतके शहारे आले होते...मग दंगलीसारखे, मारामारीसारखे भयानक प्रसंग ज्यांच्या डोळ्यासमोर घडत असतील त्यांची काय अवस्था होत असेल याची कल्पनासुद्धा न केलेली बरी...

बापरे ! खरोखर अविस्मरणीय ! काटा आला अंगावर !
मी एकदा भर दंगलीत एकटी नागपूर लातूर बसमध्ये एकटी प्रवास करत होते. नांदेडच्या अलिकडे बसवर दगडफेक झाली. ड्रायवर चे डोके फुटले. एक निवृत्त ड्रायवर बसमध्ये योगयोगाने होते त्यांनी बस चालवली आणि आम्ही नांदेड बस स्थानकात सुखरूप ( ? ) पोहोचलो. पुढे ५ तास पोलिसांच्या पहार्‍यात तिथेच !
मला तर या दंगलीचे स्वप्न पडायचे पुढे काही दिवस !

दिनेशदा, नितीन, सानी, मितान, मानुषी, स्वाती, ज्ञानेश, चिमण.... सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्स! Happy
मितान.... भयंकर गं! सानी.... काय अवस्था झाली असेल तुझ्या आईबाबांची! Sad
नितीन, मोर्चा/ निदर्शनं करणार्‍यांत कधी कोण घुसतं तेही सांगता येत नाही.... आणि असे लोक लुटालूट करायला लागले की संपलंच सगळं!!!

अरुं जबरदस्त आहे तुझा अनुभव..आम्ही पण १९९८ मधे जकार्ताला असाच थरार अनुभवला होता..
त्या वर्षी मे महिन्यात जकार्ता मधे चीनी वंशाच्या लोकांविरुद्ध लोकल इन्डोनेशियन्स नी खूप मोठा हल्ला केला होता.. दंगल उसळली तेंव्हा आम्ही ऑफिस मधे होतो .धडाधडा फोन येऊ लागले कि दंगली त्याच कॉम्प्लेक्स मधे शिरलेत्,लुटालूट ,जाळपोळ करताहेत्..आम्ही जीव धरून ऑफिस जसच्या तसं सोडून लगेच शटर बन्द करून पळालो घराकडे..दुपारपर्यन्त खबर आली कि आमचं ऑफिस पूर्णपणे लूटून ,शेवटी आग लावून दंगली पळून गेले. आमच्या घराच्या टेरेसवरून आम्ही दिवसभर हताशपणे त्या दिशेने येणारा जाळ,काळाकुट्टं धूर नुस्ता पाहात बसलो होतो. तिसर्‍या दिवशी शहर जरा शांत झाल्यावर ऑफिस जाऊन पाहिलं तर आमचं पाच मजली ऑफिस संपूर्णपणे जळून खाक झालं होतं.. विषण्ण आणी हादरलेल्या मनाने मी,माझ्या पोरीला आणी माझ्या आईदादांना(हो त्यांनाही हा भयानक अनुभव घ्यावा लागला म्हातारपणी Sad ) घेऊन जी फ्लाईट मिळाली ती पकडून मुंबईला पोचवून तिसर्‍या दिवशी परत आले.. कारण मला आणी नवर्‍याला पुढचं सगळं इन्शुरंस,बॅन्क्स इ. कामं निपटायची होती.. सर्व कागदपत्रं,फायली जळून गेल्यामुळे जेजे ,जसं जसं आठवेल तसे पुन्हा नव्याने सर्व फायली तयार करायच्या होत्या..
दंगल शांत झाली काही दिवसांनी पण त्या दिवसाचे व्रण अजून तसेच राहिलेत मनाच्या एका कोपर्‍यात..

बापरे अरुंधती कसला भयानक अनुभव. तुम्ही जरा लहान तरी होता. पण तुमच्या आईबाबांना काय वाटल असेल एवढी छोटि मुल बरोबर घेऊन धावताना. Sad
मितान सानी कसले वाईट अनुभव आहेत तुमचेही.
वर्षू किती वाईट आहे हे. तुमच्या पोस्ट वरून वाटतय कि तुमच स्वत:च ऑफीस होतं ते. एवढ कष्टाने उभारलेल, एवढी मेहेनत घेतेलेली असेल तिथे. ते सगळ असं बघायच म्हणजे Sad छे कल्पनाच करवत नाहीये.

बापरे... असा अनुभवच नाही. तरीही वाचताना अंगावर काटा आला. प्रत्यक्षात तुमचं काय झालं असेल...

हम्म... भयानक अनुभव आहेत सगळ्यांचेच. त्या त्या वेळी तुम्हा सगळ्यांची मनस्थिती कशी झाली असेल कल्पना करवत नाही.

बापरे अकु, वर्षू भयानक अनुभव.
माझे आयुष्य हैद्राबादेत जुन्या शहरात गेल्यामुळे सतत दंगली आणि कर्फ्यू. त्यामुळे खुप काही रोलेट करु शकते.

बापरे..सानी,मितान तुमचेही अनुभव भयंकर आहेत.. एकूण दंगलीत एकत्र आलेला जमाव म्हणजे अगदी बिथरलेला,बिन डोक्याचा असतो.. त्यांची सारासार बुद्धी पार कामातून गेलेली असते.अश्या वेळी कुणीच काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो..
निबंध.. हैद्राबाद तर खास अश्या दंगलींचं माहेरघर आहे..
लहानपणी आम्ही जबलपूर ला राहात होतो तेंव्हा ही तिथले कम्युनल दंगे जवळून अनुभवलेत.
आमची शाळा घरापासून लांब होती. एकदा रात्रीच वातावरण तंग झाले होते. आम्हाला आमच्या भागात काहीच कळलं नव्हतं. सकाळी आमच्या मुसलमान रिक्षावाल्याबरोबर शाळेला निघालो. जसजशी शाळा जवळ येऊ लागली,आमच्या 'रमजान' रिक्षावाल्याला बरोब्बर अंदाज आला परिस्थितीचा..त्याने लगेच रिक्षा वळवली व आम्हाला सुखरूपपणे घरी पोचवले..त्यानंतर जो हिंसक दंगा उसळला तेंव्हा मात्र एक आठवड्याचा कर्फ्यू लागला.

@ सावली.. हो गं आमचंच ऑफिस होतं.. अजून तो प्रसंग आठवला कि कससंच होतं.. जड ,२०० किलोची तिजोरी अर्धवट वितळलेली, आपणच बसत असलेल्या खुर्च्या,टेबलं अर्धवट जळलेली,तुटलेली, कागद,फाईलींचे ढीग च्या ढीग जळून कोळसा झालेले.. जळत असलेल्या,गरम गरम विटा,मातीचे ढिगोरे...
खूप सुन्न करणारा प्रसंग होता.. परत स्क्रॅच पासून सुरुवात केली!!!
चलो छोडो!! Happy

धन्स सर्वांचे प्रतिसादाबद्दल....

वर्षू.... फारच भयानक अनुभव गं..... तुम्ही त्या अनुभवातून बाहेर आलात ते चांगलेच आहे, पण अनेकांच्या मनावरचे घाव सहसा पुसले जायला खूप कालावधी लागतो....

निबंध....हैद्राबादला अशा दंगली कायम होतात? Sad

बाप रे! भयानकच. तुमच्या वडिलांनी अश्या स्थितीत तुम्हा तिघींना बाहेर काढायला नको होतं. देवाच्या दयेने काही वेडंवाकडं झालं नाही म्हणून बरं. काही वर्षांपूर्वी मी कुटुंबासमवेत केरळला गेले असताना एक दिवस बंद होता त्यावेळी हॉटेलमध्ये अडकलो होतो. हाकेच्या अंतरावर कोवालम बीच होता. शहरात तर जाता येत नाही पण निदान बीचवर तरी जाऊ का असं विचारल्यावर त्या हॉटेलवाल्याने बीचवरच काय पण टेरेसवर सुध्दा जाऊ नका असं सांगितल्यावर आम्ही घाबरून खोलीच्या बाहेरच पडलो नाही. Sad

स्वप्ना, अगं अशी दंगल होणार ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती गं! आणि लॉजवाल्यानं तर शटरच डाऊन केलेलं... आजूबाजूची दुकाने बंद होत होती.... जाणार तरी कुठं? आणि थांबलो असतो आतच तरीही बेळगावातच अडकून पडायचा व दगडफेक, जाळपोळ इत्यादीला सामोरे जायचा धोका होताच ना.... शेवटी, त्या परिस्थितीत वडीलांनी जे सुचले ते केले! Happy

अकु, हिम्मतवाले आहेत तुझे वडिल.. इतक्या पटकन निर्णय घेऊन पळायला सुरुवात केली..
.. अगं इतक्या वर्षात मुद्दाम बाजूला सारून टाकल्या होत्या आठवणी.. तुझ्या प्रसंगावरून परत आठवला झालं प्रसंग.. तसे आम्ही दोघं बरेच स्ट्रॉन्ग आहोत.. (फक्त असल्या आठवणींना उजाळा देणे प्रयत्नपूर्वक टाळतो.. )
आता बरीच वर्षं झालीयेत तशी त्यामुळे सहजपणे सांगू शकले Happy

Pages