नियमावली

Submitted by संपादक on 22 August, 2010 - 06:36

१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य ५ ऑक्टोबर २०१० (पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत)संपादकमंडळाकडे पोहोचले पाहिजे.

२. दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे.साहित्य सॉफ्ट कॉपीमध्ये आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही.

३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पहावे.

४. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादकमंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादकमंडळ बांधील नाही. याबाबत संपादकमंडळाचा निर्णय अंतिम राहील.

५. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतीलच. रेखाटन समिती आणि संपादकमंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल.

६. अंकासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. कृपया पूर्ण लेख /ललित / कथा / कादंबरी / कविता एकाच पोस्टमध्ये पाठवावे. या वर्षी संकल्पनांवर आधारित साहित्याला प्राधान्य दिले जाईल.

७. आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरून पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादकमंडळाशी संपर्क साधा.

८. दिवाळी अंकात आपली मायबोलीवरची ओळख प्रसिद्ध व्हावी की आपले नाव हे तुम्हीच ठरवायचे आहे. साहित्य पाठवताना ते कृपया नमूद करावे. तसेच आपले नाव प्रसिद्ध करायचे असेल तर ते आपल्याला जसे प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तसे कळवावे. उदाहरणार्थ पूर्ण नाव / फक्त नाव / नाव आणि आडनाव.

९. साहित्य मिळाल्याची पोच पाठवली जाईल.

१०. प्रकाशचित्रांवर वॉटरमार्क घालणे अनिवार्य आहे.

११. प्रताधिकारांसंबंधी नियमावली

* पाठवलेल्या साहित्यात गरजेनुसार अंतर्भूत केलेले अवांतर साहित्य (छायाचित्रे, मजकूर, रेखाटने / आकृत्या, इत्यादी सर्व) हे शक्यतो प्रताधिकारमुक्त असावे व तसे लेखाच्या शेवटी नमूद करावे.

* प्रताधिकार असलेले साहित्य वापरले गेले असल्यास संबंधित व्यक्ती/संस्थेची लेखी/इमेलाद्वारे परवानगी घेतलेली असावी व लेखाच्या शेवटी तसा स्पष्ट निर्देश असावा.

* 'कॉपीलेफ्ट' असाही एक प्रकार आजकाल प्रचलित आहे. जेव्हा 'कॉपीलेफ्ट' प्रकारातले साहित्य तुम्ही वापरता, तेव्हा ते वापरून तयार केलेले तुमचे साहित्यही तुम्ही 'कॉपीलेफ्ट' प्रकारान्वये प्रताधिकारमुक्त करत असता.

*आपण वापरत असलेले साहित्य प्रताधिकारमुक्त आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी खालील दुवे संदर्भ म्हणून वापरता येतील.
- भारतीय प्रताधिकार कायदा
- प्रताधिकार: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१२. दृकश्राव्य विभागासंबंधी नियमावली

या वर्षीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकातही दृक-श्राव्य कार्यक्रम अंतर्भूत आहेत. दिवाळी अंकाच्या घोषणेत नमूद केलेल्या संकल्पनांवर आधारित सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. या विभागात आपण विविध कलाकौशल्यांचं दृक-श्राव्य सादरीकरण करू शकता किंवा गाणी, कविता यांसारखे श्राव्य कार्यक्रमही सादर करू शकता.

ह्यासंबंधी अधिक माहिती पुढील प्रमाणे:
* दृक-श्राव्य सादरीकरण १० मिनिटांपेक्षा जास्त नसावे. श्राव्य कार्यक्रमांना अशी कालमर्यादा नाही.

* चित्रफितीचा आकार 2GBपेक्षा जास्त नसावा.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं याआधी इतरत्र प्रकाशित झालेली नसावीत. तसंच, सादरीकरणात अथवा चित्रीकरणात मायबोलीकरांचा सहभाग असावा.

* चित्रीकरण, संकलन, ध्वनिमुद्रण इ. सादरकर्त्यानेच करायचे आहे. चित्रफिती व ध्वनिमुद्रणं संपादकांकडे पाठवताना प्रकाशनास योग्य असावीत. संपादक या चित्रफितींत दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ व मायबोलीचा लोगो घालणे, असे किरकोळ संस्कार करतील.

* चित्रफितींत अथवा ध्वनिमुद्रणांमध्ये वापरलेलं संगीत हे प्रताधिकारमुक्त असावं, अथवा ते वापरण्यास अधिकृत परवानगी घेतलेली असावी. चित्रफितींत तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.

* आपली फीत .avi, .mpeg, .wmv, .wma, .camrec, .mpg, .wav यांपैकी एका formatमध्ये असावी.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं आपण http://www.yousendit.com या संकेतस्थळावर upload करू शकता. (ह्या साईटवर गेल्यानंतर डाव्या बाजूला Send a File Try it now असे लिहिलेले आढळेल. तिथे वर पाठवणार्‍याचा पत्ता आणि त्याच्या खाली संपादकांचा पत्ता (sampadak@maayboli.com) लिहावा. मग योग्य ती फाईल upload करावी. आणि SEND IT ची कळ दाबावी.)

* चित्रफीत http://www.yousendit.comवर upload करताना आपण फितीचा आकार कमी करण्यासाठी winzip अथवा winrar या सॉफ्टवेअरांचा उपयोग करू शकता. तसंच कमी आकाराच्या formatचा वापरही करू शकता. चित्रीकरण केल्यानंतर Camtasia Studio, Adobe Premier यांसारख्या सॉफ्टवेअरांचा वापर करून आपण अगोदर संकलन करू शकता व नंतर फितींमध्ये आवाज घालू शकता. यामुळे चित्रफिती अधिक देखण्या होतील. ही सॉफ्टवेअरं आंतरजालावर उपलब्ध आहेत.

* ध्वनिमुद्रणांवर संस्कार करण्यासाठी आपण आंतरजालावर उपलब्ध असलेले Audacity हे सॉफ्टवेअर वापरू शकता.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं संपादकमंडळाकडे पाठवण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर, २०१० ही आहे.

* या चित्रफिती आपण www.youtube.comवर upload करणार आहोत, याची नोंद घ्यावी. याविषयीची अधिक माहिती http://www.google.com/support/youtube/bin/topic.py?hl=en&topic=16560 इथे मिळू शकेल.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं यांचा दिवाळी अंकात समावेश करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संपादकमंडळाचा असेल.

आपले साहित्याभिलाषी
संपादकमंडळ

विषय: 

माझ्या एका लेखासाठी मला चित्रांचा संदर्भ देण्यासाठी नेटवरची चित्रे वापरावी लागणार आहेत. ती प्रताधिकारमुक्त आहेत की नाहीत माहीत नाही आणि नसण्याचीच शक्यता जास्त आहे पण ती आणि तीच चित्रे लागणार आहेत. यावर माझ्याकडे उपाय हा की चित्राच्या जागी चित्राऐवजी त्या त्या लेखाची लिंक द्यायची.
याने रसभंग होणार नक्कीच पण कायदे/ नियम इत्यादीत बसणारे आहे.

संपादक मंडळ अजून काही उपाय सुचवू शकेल का?

मला उत्तर शर्मिलाकरवी फोनवर कळवा कारण उद्यापासून माझा नेट अ‍ॅक्सेस बंद असणारे अनिश्चित काळासाठी.

(भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत) >>> ही वेळ EST नाही का करता येणार ? आम्हाला जवळ जवळ १० तास कमी मिळतात.

नीधप,
१. आपण अगोदर सूचित केल्याप्रमाणे लेखात आपण चित्रांची लिंक देऊ शकता.
२. तसेच, प्रताधिकारमुक्त चित्रे (images) http://www.sxc.hu/ इथेही शोधता येतील.
३. विकिमीडिया कॉमन्स येथली चित्रे (विकिपीडियावर वापरली जाणारी) ही प्रताधिकारमुक्त अथवा 'कॉपीलेफ्ट' प्रकारातली असतात. तशी असल्यास आपण आपल्या लेखात वापरू शकता.

सिंडरेला,
वेळेबाबतचा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. अंतिम मुदतीच्या वेळेत योग्य तो बदल आम्ही करत आहोत.

प्रातःस्मरणाच्या अर्थावर आधारित माझ्या एका लेखाच्या अभिवाचनाचे, एकूण ३० मिनिटांचे ध्वनिमुद्रण (सुमारे ३० मेगॅबाईट) तयार आहे. मूळ लेख याआधीच प्रसिद्ध झालेला असला तरीही ते ध्वनिमुद्रण आजवर कुठेही प्रसिद्ध झालेले नाही.

दिवाळी अंकाकरता ते चालेल का?

चालत असल्यास, ते mp3 फॉर्मॅटमधे आहे चालेल का? की इतर उपरोल्लेखित फॉर्मॅटमधे बदलावे लागेल?

नरेंद्र गोळे,
आपल्या प्रस्तावाबद्दल धन्यवाद.घोषणेत नमूद केल्याप्रमाणे यंदाच्या दिवाळी अंकात संकल्पनांवर आधारित साहित्याला प्राधान्य दिले जाणार असल्याने, तसेच आपले प्रस्तावित साहित्य 'साहित्य अन्यत्र प्रकाशित नसावे' या धोरणात बसत नसल्यामुळे आपला प्रस्ताव स्वीकारता येत नाही.
आपण चारपैकी कुठल्याही संकल्पनेवर आधारित नवीन सादरीकरणाचा जरुर विचार करु शकता.

नीधप,
कृपया हा दुवा पहा.

बव्हंशी चित्रे प्रताधिकारमुक्त/कॉपीलेफ्ट प्रकारातली असली तरी, काही चित्रे ही प्रताधिकारित असू शकतात.

आपण खालीलप्रमाणे करू शकता:

१. विकिपीडिया पानावरच्या चित्रावर क्लिक केले असता तिथे त्या चित्राच्या प्रताधिकाराची माहिती देणारा टॅग असतो.
२. त्या माहितीनुसार काय करावे, हे वर दिलेल्या दुव्यावर बघावे.
३. त्यानुसार चित्राचा वापर करताना आवश्यक त्या गोष्टी नोंदवाव्यात.

नीधप,
देनवागरी लिखाण हे युनिकोडच असावे जेणेकरून ते परत टंकलिखीत करावे लागणार नाही.
आपल्याला ह्यासंबंधी काही शंका असल्यास / मदत हवी असल्यास नक्की विचारा.

१) भाषांतरित साहित्य चालेल का? म्हणजे जे साहित्य आता प्रताधिकाराने बद्ध नाही असं .. शेक्सपीअर, रवींद्रनाथ टागोर अश्या लेखकांचं काही आपल्या अंकाच्या संकल्पनेत बसणारं साहित्य असेल तर ते चालेल का?

२) जर साहित्य निवडून मायबोलीच्या दिवाळी अंकात छापलं गेलं तर त्याच्या प्रताधिकाराविषयी काय ?

१) भाषांतरित साहित्य चालेल का? म्हणजे जे साहित्य आता प्रताधिकाराने बद्ध नाही असं .. शेक्सपीअर, रवींद्रनाथ टागोर अश्या लेखकांचं काही आपल्या अंकाच्या संकल्पनेत बसणारं साहित्य असेल तर ते चालेल का?

२) जर साहित्य निवडून मायबोलीच्या दिवाळी अंकात छापलं गेलं तर त्याच्या प्रताधिकाराविषयी काय ?

vaiddya,
इतर भाषांमधील प्रताधिकाराने बद्ध नसलेल्या साहित्याचे अनुवाद चालतील. निवडीचा अंतिम निर्णय संपादक मंडळ घेईल. असे साहित्य अंकात प्रकाशित झाल्यास, त्याला मायबोलीच्या प्रताधिकाराचे नियम लागू होतील. त्याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया इथे पहा.