सांगला-कल्पा

Submitted by टवणे सर on 26 August, 2010 - 05:39

बराच गाजावाजा/दंगा, मनात मांडे खात योजलेली लेह सफर रद्द झाली. एव्हडी मोठी आपत्ती कोसळली असता पर्यटक म्हणुन तिथे जाणे मनाला पटले नाही. मग शिमल्याहून इशान्येला असलेल्या सांगला-कल्पा ह्या दर्‍यांतून (किन्नौर जिल्हा - मुख्य ठिकाणः रिकँग पिओ) जात पुढे सुम्डो नावाच्या भारत-चीन सीमेपासून पश्चिमेला वळत लाहौल-स्पिती दर्‍यातून (काझा-कुमझुम पास मार्गे) मनालीला यायचे असा बेत केला. प्रचंड पावसाने सांगलाच्या पुढचा एक पूल (नाको जवळचा) वाहून गेलेला. मी सांगला सोडले तेव्हा तो रस्ता सुरु व्हायची शक्यता होती पण मी घेउन गेलेली गाडी (मारुती स्विफ्ट) तिथे झालेल्या चिखलातून जाणार नाही असे तिथल्या स्थानिक वाहनचालकांनी सांगितले. तरी पाओरी नामक गावातून पुढे १०-१५ किमी गाडी ताणलीच. अर्थात लवकरच लक्षात आले की बर्‍यापैकी जमिनीपासून उंच (ग्राउन्ड क्लीअरन्स) आणि थोडी दणकट गाडीच जाउ शकेल. त्यातच चाकरीच्या ठिकाणाहून दोन-चार फोन येउन गेले होते. एक काम उपटले होते ज्यासाठी मी परत येउ शकेन का असं दोन-चारदा विचारुन झालं. अश्या अनेक कारणांनी परतलो. परतल्या परतल्या कामं सुरु झाल्याने फारसं प्रवासवर्णन लिहिण्याचा उत्साह नाहिये.

अनेक वर्षांनी मी पहिल्यांदाच आणखी एका सहप्रवाशाबरोबर प्रवासास गेलो होतो. मागल्या पाच-सात वर्षात एकट्यानेच भटकत होतो. हा माझा सहप्रवाशी माझा खूप चांगला मित्र पण आहे. पण तरीही, सवयीमुळे असेल किंवा माझ्या प्रकृतीमुळे असेल, एकट्याचा प्रवास मी 'मिस' केला. माझे एकटे भटकणे हे 'माझे' असते. तिथे मी स्वत:शीच बडबडत असतो. भांडतो, चिडतो, हसतो वगैरे वगैरे. तो प्रवास 'माझा' होतो. एक प्रकारे ही भावना मी ह्यावेळी गमावली. थोडक्यात प्रवासात सहप्रवासी म्हणुन मी बिनकामाचा आहे.

एक प्रकारे 'टुरिस्टी' प्रवास झाला. सगळं सुशेगात. बडवलेल्या रस्त्यांवरुन. पण तरिही आवडला मला. हिमालयात नेहेमीच एक शांतता लाभते. ह्यावेळीदेखील ह्याला अपवाद नव्हता.
साधारण माझा प्रवास असा होता:
मिरज-पुणे-नाशिक-अहमदाबाद (व्हाया सापुतारा-सुरत-बरोदा)-जयपूर (व्हाया उदयपूर्-चित्तौड)-कल्का
कल्का पासून पुढे हिमालयात शिरलो. कसौलीत थोडा वेळ घालवून कुफ्री (सिमल्याहून २० किमी पुढे) मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी नारकंड्याजवळ हातु पीक चडून, थानेधार गावातून व्हाया रामपूर सराहनला मुक्काम केला. सराहनला सकाळ तिथल्या स्थानिक सरकारी प्राथमिक शाळेत घालवून (एक भाषण पण ठोकलं Happy ) सांगल्याला गेलो. सांगल्यात एक दिवस राहिलो. तिथून छितकूल नावाच्या चीन सीमेलगतच्या (म्हणजे सीमा चांगली ५०-६० किमी आत आहे. पण छितकूल शेवटचे गाव) गावात एक दिवस राहिलो. मग खाली उतरुन कल्पा नावाच्या गावात दोन दिवस राहिलो. इथून किन्नौर कैलासचे थेट दर्शन होते. मग परत पुण्याला तीन दिवस मॅराथॉन ड्रायव्हिंग करत (रामपूर-पानीपत-उदयपूर-पुणे) पोचलो. http://himachaltourism.gov.in/HimachalIT/image.axd?picture=2008%2F9%2FHi... ह्या दुव्यावर तुम्हाला हिमाचलचा नकाशा मिळेल. शिमल्याहून इशान्येला नारकंडाच्या दिशेने बघितलेत तर मी केलेला प्रवास (व काझा-कुमझुम मधून योजलेला प्रवाससुद्धा) दिसेल. पुढच्या वर्षी बोलेरो सारखी एखादी गाडी घेउन पुन्हा हा मार्ग नक्की करेन.

ह्या प्रवासात मी व्हिडिओ शूटिंग बरेच केले. फोटो फारसे काढले नाहीत. जे काही थोडेफार काढले त्यातले बरे दिसणारे इथे पोस्टतोय.

हिमालयाचे पहिले दर्शन - कसौली:
sk_kasauli.jpg

धुक्यातले हातु शिखर:
sk_dhuke.jpg

सतलज नदी. शिमल्याहून पुढचा बराचसा प्रवास सतलजच्या (वा बास्पा ह्या सतलजच्या उपनदीच्या काठानेच होतो):
sk_sutlaj.jpg

तानीजुब्बर लेक. हिमालयाच्या डोंगरा-दर्‍यातून असलेल्या अनेक तळ्यांपैकी एक बारकुसा तलावः
sk_tanijubbar lake.jpg

देवभुमी सांगला. सांगल्यातली लोकं पुर्वी स्वतःला देव व मानव ह्यांच्यामधली साखळी समजत. पर्वमध्ये (एस एल भैरप्पा) देवभुमी म्हणुन ज्या प्रदेशाचा बरेचदा उल्लेख येतो तो हाच:
sk_sangla.jpg

सांगल्याला जाताना असलेला डोंगरातला बोगदा:
sk_bogada.jpg

सांगल्याच्याही पुढे ३० किमीवर असलेले (आणि जेमतेम एक गाडी जाईल अश्या छोट्या आणि प्रचंड चढाच्या रस्त्याने वर जावे लागणारे) छितकूल गाव. अतिशय सुंदर. इथे राहणे एक नितांतसुंदर अनुभव होता.
sk_chitkul.jpg

उंचावरच्या छितकूलमध्ये छोट्या छोट्या तुकड्यात असलेली 'सरसों'ची शेती.
sk_sheti.jpg

डोंगरातले रस्ते:
sk_dongaratala rasta.jpg

कल्पातले देवदारः
sk_kalpa1.jpg

किन्नौर कैलासचे शिवलिंग (७०-८० फुटाचा एक उभा दगड आहे ज्याला मानस सरोवरासारखीच परिक्रमा केली जाते. १० दिवसाचा थोडा अवघड ट्रेक आहे. शिवलिंगापर्यंत जायचे असेल तर ४५०० मीटरच्या आसपास चढावे लागते. कल्पातून निघून ४ दिवसात परत येता येते जर स्टॅमिना उत्तम असेल तर). बाजूला किन्नौर कैलाशचे शिखर (६०५० मी उंच). खालच्या प्रकाशचित्राच्या मधोमध एक इंग्रजी व्ही आकाराची जी छोटीशी दरी झाल्यासारखी दिसते आहे तिच्या डाव्या टोकाला एक छोटासा टेंगू दिसून येईल. तेच शिवलिंग. अगदी खालच्या प्रचिमध्ये मी शिवलिंगाच्या भोवती एक लाल गोल काढलाय. फोटो फार सुंदर नाहिये पण प्रत्यक्षात फार सुंदर दिसते ही पर्वतरांग.
sk_kinnaur.jpgshivaling.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या, अगदी लेहला नाही जायला मिळालं म्हणून आनंदावर विरजण पडणं साहजिकच आहे रे. पण सुट्टी रद्द करून हापिसात जावं न लागता हे बघायला मिळालं ह्यातच समाधान मान.

बाकी फोटू झक्कासच.

अजून विस्तृत लिही. तू म्हणाला होतास की पावसाने घोळ घातला होता. तेव्हाची परिस्थितीही लिही. हे बरे वाईट चांगले अशा अनुभवांची शिदोरी तर घेऊन आलाच असशील बरोबर Happy

वृत्तांतात दम नाय.
एवढं ड्रायविंग करुन गेल्याबद्दल कौतुक आणि हेवा वाटला. Happy
फोटु आवडले.

वृत्तांत जाऊ देत पण फोटो मस्तच.
कसौली म्हणजे दिल चाहता है मध्ये अक्षय खन्ना जिथे कामाला जातो तेच ना?

कसौली म्हणजे दिल चाहता है मध्ये अक्षय खन्ना जिथे कामाला जातो तेच ना?
>>>
हो तेच (:) काय ती ओळख कसौलीची).. कसौलीला महात्मा गांधी पण रुसून जाउन बसले होते.. सुभाषबाबुंचे काँग्रेस अध्यक्षपदी जीवन नकोसे होउन त्यांनी राजीनामा दिल्यावर खाली उतरले. म.गांधीच्या राजकीय कारकिर्दीतला (आणि एकुणच भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा व नंतरच्या राजकारणाचा) एक फारच महत्त्वाचा व महात्म्याला न शोभणारा प्रसंग इथेच घडला..

महात्मा गांधींचं जाऊ देत. माझ्याकरता अक्षय खन्नाची ओळखच बरी. Happy
पण एवढं ड्रायविंग करुन जायचं म्हणजे जबरीच.

फोटो सुंदर! अजून विस्तृत वर्णन चालले असते. सहप्रवाशाबरोबरचा प्रवासाचा अनुभव वेगळा असतो आणि आपले आपण हिंडतानाचा, मग भले ते पब्लिक ट्रान्स्पोर्टमधून का होईना, हे मात्र बाकी खरंय!

सुंदर प्रचि. ते "एकट्या"चे भटकणे मला पण मानवते.
ते बोगदे रारंग ढांग ची आठवण करुन देताहेत !
पण सविस्तर वर्णन हवे होते !!

टण्या तुझे minutes of meeting प्रकारातले प्रवासवर्णन वाचले. छितकूल गावं खूप आवडले.

प्रवास मनासारखा झाला नसला तरी फोटो छान .. तिकडे जाऊन स्वतः अनुभव घ्यावेसे वाटणारे ..

छितकूल सारख्या गावांत रहायची, जेवायची सोय होते का? (हा प्रश्न hotels, restaurants आहेत का असा नसून अशा छोट्या गावांमधून प्लॅन न करता गेलं तरी सोय होऊ शकते का, असा आहे)

कसौली >> अजून एक कसौनी (1942 Love Story मध्ये उल्लेख आहे ते) म्हणजे पण कसौली च का? की ते वगळं?

टण्या फोटो छानच !
अगं सायो, 'पर्फेक्शनको इंप्रूव्ह करना मुश्किल है ' हे पाठ करण्यात तिचा खूप वेळ गेला असेल गं.

सशल, दिल चाहता है ची पारायणं केलीस म्हणतेस पण कसौली आठवण्यात मीच पहिला नं. लावला हो
अगं सायो, 'पर्फेक्शनको इंप्रूव्ह करना मुश्किल है ' हे पाठ करण्यात तिचा खूप वेळ गेला असेल गं.
>>> सायो, नंद्या टण्या ओरडेल हां त्याच्या बीबी वर TP केला तर .. :p

(पण मी म्हंटलं 'मै कभी और बोल लुंगी, आज सायो की बारी')

सशल, आता सांगला-कल्पा-छितकूल हा बर्‍यापैकी पर्यटक-वर्दळीचा भाग झालेला आहे. सांगल्यात तर भरपूर हॉटेल्स आहेत. छितकूलमध्ये २-३ बर्‍यापैकी व ३-४ साधी हॉटेले आहेत. indiatravels.com टाइपच्या साइट्स चांगल्या गाड्या/राहण्याची व्यवस्था असलेल्या ट्रिप्स उत्तमपणे आयोजित करतात. विशेष करुन इस्रायली पर्यटक खूप दिसले.
सांगला-कल्पा किन्नौर ह्या जिल्ह्यात येते ज्याचे मुख्य गाव आहे रिकँग पिओ. सतलज जल विद्युत निगमची अनेक कामे इथे चालू आहेत. जेपी हायड्रो, हिमाचल विद्युत निर्माण निगम इत्यादी कंपन्या अशक्य उंचीवर आणि दुर्गम ठिकाणी धरणे/बोगद्यांची कामे करत आहेत. त्यामुळे पिओ पर्यंतचा प्रवास तसा सुखकर आहे. पिओ ओलांडले की मात्र थोडा निर्जन भाग सुरु होतो. इथे भौगोलिक परिस्थिती (विशेषतः सुम्डोच्या पुढे जिथे लाहौल-स्पिती जिल्हा सुरु होतो) लेहशी मिळती-जुळती व्हायला लागते. नाको पासून मनाली पर्यंतचा रस्ता अतिशय वेगळ्याच प्रकारच्या वातावरणातून (कोरडी हवा, उंच रस्ते, वाळवंट सदृश माती इत्यादी) भुभातातून जातो. मला पिओच्या पुढे जाता आले नाही. पण पुढे कधीतरी नक्की जाईन. ह्या पुढच्या रस्त्यावर तुलनेने कमी हॉटेल्स आहेत. काझा वगैरेला तर तुरळकच. पण पर्यटकही फार कमी जात असल्याने सोय होउन जाते. स्वतःबरोबर एखादा टेंट-स्लीपींग बॅग असेल तर कुठेही पडी टाकता येतेच.

Pages