'मराठी साहित्य महामंडळ'-प्रणीत व शासनमान्य मराठी लेखन-नियमावली

Submitted by चिनूक्स on 20 November, 2009 - 13:32

१. अनुस्वार :

नियम १ : स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
उदाहरणार्थ - गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा

तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.

नियम २ : य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणार्‍या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.
उदा - सिंह, संयम, मांस.

नियम ३ : नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा. - लोकांना, मुलांनी, तुम्हांस, आम्हांला, लोकांसमोर, घरांपुढे.

नियम ४ : वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

२. र्‍हस्व-दीर्घ :

नियम ५ : मराठीतील तत्सम इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा. कवी, मती, गती, गुरू. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.
उदा. पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय).
अपवाद : आणि, नि.

स्पष्टीकरण : परंतु, यथामति, तथापि, इत्यादी तत्सम अव्यये र्‍हस्वान्त लिहावीत. तसेच सामासिक शब्दांतही तत्सम (र्‍हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द पूर्वपदी असताना र्‍हस्वान्तच लिहावेत.
उदा. - बुद्धिवैभव, कविमन, गतिशील.

व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे र्‍हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
उदा. - हरी, भवभूती, मनुस्मृती इ.

मराठी शब्दकोशात मात्र तत्सम (र्‍हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द र्‍हस्वान्त लिहिणे इष्ट ठरेल. जसे - पद्धति, प्रतिकृति, अणु, वायु, हेतु, वगैरे. परंतु असे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घान्त लिहिले पाहिजेत.

नियम ६ : (दीर्घ) ईकारान्त व ऊकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार र्‍हस्व लिहावेत. उदा. - गरिबी, माहिती, हुतुतू.

अपवाद - नीती, भीती, रीती, कीर्ती, उत्यादी दीर्घान्त झालेले तत्सम शब्द.

नियम ७ : अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा. - गरीब, वकील, वीट, सून, वसूल.

अपवाद - र्‍हस्वोपान्त्य अकारान्त तत्सम शब्द.
उदा. - गुण, विष, मधुर, प्रचुर.

नियम ८ : उपान्त्य दीर्घ ई - ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य ईकार-ऊकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी र्‍हस्व लिहावा.
उदा. - गरिबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास.

अपवाद : दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
उदा. - शरीरात, गीतेत, सूत्रास, जीवास.

इतर काही विशेष :

शब्दाचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर सामान्यरूपात 'ई'च्या जागी 'य' येतो किंवा 'ऊ'च्या जागी 'व' येतो.
उदा. - फाईल - फायलीत, काईल - कायलीत, देऊळ - देवळात, पाऊस - पावसात

पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. ('श्या' होत नाही.)
उदा. - पैसा - पैशाचा, घसा - घशाचा, ससा - सशाचा.

पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो, त्याचा 'ज्या' होत नाही.
उदा. - मांजा - मांजाने, गांजा - गांजाचे, सांजा - सांजाची

मधल्या अक्षरातील 'क' किंवा 'प'चे द्वित्व सामान्यरूपाच्या वेळी निघून जाते.
उदा. - रक्कम - रकमेचा, तिप्पट - तिपटीने.

मधल्या 'म'पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर अनुस्वारविरहित होते.
उदा. - अंमल - अमलात, किंमत - किमतीचा, गंमत - गमतीने, हिंमत - हिमतीने.

ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
उदा. - गणू - गणूस, शकू - शकूस

धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच सामान्यरूपात 'वू' किंवा 'वून' होईल.
उदा. - चाव - चावू - चावून, लाव - लावू - लावून.

पण मूळ धातू एकाक्षरी असेल तर फक्त 'ऊन' प्रत्यय लागतो.
उदा. - खा - खाऊ - खाऊन, गा - गाऊ - गाऊन, पी - पिऊ - पिऊन, धू - धुऊ - धुऊन.

किरकोळ :

नियम ९ : 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.
उदा. -नागपूर, तारापूर.

नियम १० : 'कोणता', 'एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा', 'एकादा' ही रूपे लिहू नयेत.

नियम ११ : हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटू या शब्दांतील दुसरा स्वर व चौथा स्वर दीर्घ लिहावा.
वरील शब्दांप्रमाणेच तसूतसू, झुंजूमुंजू, चिरीमिरी यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील ऊकार व ईकार मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे र्‍हस्व लिहावेत. उदा. - लुटुलुटु, दुडुदुडु, रुणुझुणु.

नियम १२ : एकारान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त करावे. उदा. - करण्यासाठी, फडक्यांना, देशपांड्यांचे, पाहण्याला.
अशा रूपांऐवजी करणेसाठी, फडकेंना, देशपांडेंचे, पाहणेला यांसारखी एकारान्त सामान्यरूपे करू नयेत.यांचेकडे, कळवणेसाठी, करणेबाबत अशी रूपेही वापरू नयेत.

नियम १३ : लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चारांप्रमाणे असावे. अन्य प्रसंगी तसे लिहू नये.

नियम १४ : क्वचित्, कदाचित्, अर्थात्, अकस्मात्, विद्वान् , इत्यादी मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अकारान्त लिहावेत.

कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.

इंग्रजी शब्द, पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अकारान्त अक्षर व्यंजनान्त (म्हणजेच पायमोडके) लिहू नये.
उदा. - वॉटसन, बायरन, पीएच. डी., इत्यादी.

नियम १५ : केशवसूतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत. तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखनविषयक नियमांस अनुसरून छापावे.

नियम १६ : राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. रहाणे - राहाणे, पहाणे - पाहाणे अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना 'राहा, पाहा, वाहा' यांजबरोबरच 'रहा, पहा, वहा' ही रूपे वापरण्यास हरकत नाही.

नियम १७ : 'इत्यादी' व 'ही' (अव्यय) हे शब्द दीर्घान्त लिहावेत. 'अन्' हा शब्द व्यंजनान्त लिहावा. 'इत्यादी' हे अव्यय नसून विशेषण आहे. त्यामुळे ते दीर्घान्त लिहावे.

नियम १८ : पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना र्‍हस्वदीर्घाच्या बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यास कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चिनूक्स. मी बर्‍याचवेळेला र्‍हस्व-दीर्घाच्या चुका करते, मला फार उपयोगी आहे हे.

छान माहिती !
इतर सर्व नियमाप्रमाणे खालील नियमाचीही उदाहरणे दिली तर ?
नियम ४ : वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

उदा : गुरुं, नांव असे न लिहिता गुरु, नाव असेच लिहावेत.

शब्दकोशात आणि शब्द कोशाबाहेर म्हणजे काय?
शब्दकोशात कधी लिहीतात नि शब्द कोशाबाहेर कधी?

(नि शब्दकोशात हा एक शब्द, पण शब्द कोशाबाहेर हे दोन शब्द. असे का? की ते चुकून झाले?)

<वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.
>

हे मात्र फारच हं! म्हणजे 'ते कुत्र, नि ते मास्तर' सारखेच!! काय हे?

जाऊ द्या झाले. मी ती हेरंब ओक यांची 'सि...' गोष्ट वाचली. त्यांच्या म्हणण्याप्रमाने २५११ मधे जर तसले मराठी बोलणार असतील, तर सरळ इंग्रजीतूनच बोलावे, लिहावे झाले!!

झक्की,

<परंतु असे शब्द कोशाबाहेर वापरताना दीर्घान्त लिहिले पाहिजेत>
असे वाक्य आहे.

शब्दकोश व कोश असे शब्द वापरले आहेत.

छान माहिती.
काईल हा शब्द बरोबर कि काहिल ?
कोल्हापूर भागात काहिल हाच शब्द रुढ आहे,
(अंगाअंगाची काहिली झाली,... मला इष्काची इंगळी डसली..)

मूळ शब्द काईल असा आहे. अर्थ - उसाचा रस आटवण्यासाठी वापरले जाणारे मोठ्या तोंडाचे भांडे.

काहिली = तापामुळे, उष्णतेमुळे होणारी अंगाची तगमग / आळस, सुस्ती
य. रा. दाते यांचा शब्दकोश कृपया बघा.

हो वडील हे दीर्घ आणि ह्या शब्दाला प्रत्यय लागले उदा: वडिलांना, वडिलांनी, वडिलांसाठी तसेच आईवडिल यात डी -हस्व होतो म्हणून डि.

'वडील' शब्दाला विभक्तीप्रत्यय लावताना उपांत्य अक्षर र्‍हस्व होते, हे बरोबर. (असेच 'विहीर' या शब्दाबाबतही आहे.) परंतु, आईवडील असेच हवे. तिथे 'डी' र्‍हस्व होत नाही.

अरे वा ! कहितरी मस्त गवसले आज Happy .. मि पण लिहितना बर्‍याच चुका करतो.
चिनूक्स , धन्यवाद !

ईतिहासच्या पुस्तकाबरोबर ते १ नागरिकशास्त्राचे छोटे पुस्तक मिळायचे ना, तसे या नियमांचे पण असायला हवे Proud

धन्स Happy

Pages