श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग २०

Submitted by बेफ़िकीर on 24 August, 2010 - 02:56

समीरदादा बारावीत, राजश्रीताई अकरावीत, गट्टू दहावीत अन नैना नववीत!

एकेका यत्तेला एकेक बालक लाभलेले होते दास्ताने वाड्यातर्फे!

दिड, दोन वर्षांमधे बरेच नावीन्यपूर्ण अनुभव गट्टूच्या पदरी पडले होते. एन.सी.सी., नैनासमोर शायनिंग मारणे, एखाद दोन रुपये ढापून रीगलमधे काहीतरी खाणे, वाड्यात खेळणे या सर्वात अभ्यास प्रचंड मागे पडल्याचे आठवीच्या वार्षिक परिक्षेच्या निकालाने व नववीच्या सहामाही परिक्षेच्याही निकालाने सिद्ध केल्यावर श्रीने त्याला अभूतपूर्व झापला. या वर्षीपासून लहानपणी घ्यायचो तसा मी पुन्हा अभ्यास घ्यायला लागेन अशी धमकी मिळाल्यावर अन लज्जास्पद मनस्थिती झाल्यावर गट्टूने अचानक अभ्यासाला सुरुवात केली. देवांगबरोबरची त्याची मैत्री आता अतिशय घट्ट झालेली असली तरीही समीरदादाप्रमाणेच देवांगही कायम 'मी सुपीरियर' असे दाखवत राहतो हा विचारही घट्टपणे रुजलेला होता.

नववीच्या दुसर्‍या सहामाहीत, म्हणजे वार्षिक परिक्षेत गट्टूच्या प्रयत्नांची झलक अख्ख्या वर्गाला बघायला मिळाली. मात्र! चारही तिमाही परिक्षांच्या निकालाची सरासरी, वर्गातील मुलांची संख्या अशा स्वरुपाच्या काही निकषांवर त्याला आयुष्यात पहिल्यांदा 'ब' तुकडी मिळाली अन तो दहावीत गेला.

देवांगला आता भेटताना अतिशय लाजिरवाणे वाटायचे गट्टूला! 'ब' तुकडीतील प्रत्येक मुलापेक्षा आपण अभ्यासात सुपीरियर असू शकू असा एक शंकावजा विश्वास वजा गर्वही मूळ धरू लागला होता.

मात्र! 'ब' तुकडी मिळण्याचा अपमान इतका होता की त्या दिवशी गट्टू श्रीच्या मांडीवर डोके ठेवून रडला होता.

श्रीला प्रचंड दु:ख झालेले होते. खरे तर नववीच्या वार्षिक परिक्षेत गट्टूला चक्क ७४ % मार्क्स होते. पण ते त्या एकाच परिक्षेत होते. इतर परिक्षांमधे नव्हते. मात्र या नुकत्याच झालेल्या सुधारणेकडे लक्षच जाणार नाही असा प्रकार झालेला होता. त्याला 'ब' तुकडी मिळालेली होती. गट्टूसुद्धा 'मला निदान या परिक्षेत कितीतरी अधिक मार्क्स पडले आहेत ते बघा' असे म्हणतही नव्हता.

'ब' तुकडी! वेगळे काहीच नाही. पण पाच वर्षे ज्यांच्याबरोबर खेळलो, ज्यांच्याशेजारी बसलो.. ते आजपासून आपल्याबरोबर नसणार! ज्यांच्याशी काहीही संबंध नाही त्या मुलांबरोबर आपण बसणार! यांच्याशी कशी काय मैत्री होईल? एकतर आधीच हे सगळे 'ब' तुकडीत म्हणजे अभ्यासात कमी अन दंग्यात अधिक कार्यक्षम असणार! त्यात त्यांच्या आपापसात बर्‍याच 'मैत्र्या' झालेल्या असणार! आपली कुणाला गरज आहे? आपल्याबरोबर 'अ' तुकडीतून कुणीही इकडे ढकलले गेलेले नाही.

गट्टूचे विचार चुकीचे होते. 'ब' तुकडीत पहिला आलेला विद्यार्थी हा 'अ' तुकडीतील मार्कांच्या दृष्टीने साधारण पंधरावा वगैरे होता. म्हणजे 'अ' तुकडीत असता तर पंधरावा नंबर मिळाला असता. तुकड्यांचा अर्थ असा नव्हता की 'अ' तुकडीत ६४ विद्यार्थी आहेत म्हणजे 'ब' तुकडीतील प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी शाळेत पासष्टावा!

पण बोच मनात राहिलेली होती. आता आपल्याला कुणीही विचारले की सांगावे लागणार 'ब' तुकडीत आहे म्हणून!

या प्रसंगाचे दोन परिणाम झाले गट्टूवर! एक म्हणजे त्याला 'निदान ब तुकडीत मी सर्वश्रेष्ठ आहे' हे दाखवण्यासाठी अभ्यास करावा लागला. त्याने नववी व दहावीच्या सुट्टीतच संस्कृत पाठांतराला सुरुवात केली. देवस्य, देवयो:, देवानाम शष्ठी, देव, देवेषु, देवेषु सप्तमी वगैरे उच्चार आता पेंढारकरांच्या घरातून पहाटे पाच वाजताच ऐकू यायला लागले. वर्गात एक अनंत पिंगळे नावाचा मुलगा होता ज्याला 'अपि' म्हणायचे. संस्कृत 'अपि' चा अर्थ 'सुद्धा' असा होता. आता त्या पिंगळेला 'अपि' म्हणताना मुले हसू लागली.

तिमाही परिक्षा यायच्या आधीच गट्टूची संस्कृत व ट्रिग्नॉमेट्री या विषयांवर संपूर्ण हुकुमत आली. अल्जीब्राचा कंटाळा येत होता. मात्र इंग्लीश अन मराठी या दोन्ही विषयात अतिशय सुंदर गती होती. इतिहासापेक्षा भुगोल आवडायचा कारण तो पेपर पटकन संपायचा.

आणि तिमाही परिक्षेत 'अ' तुकडीतील विद्यार्थिनींमधे बातमी पसरली. कारण 'अ' तुकडीत विद्यार्थिनीच अधिक हुषार होत्या. पहिले जवळपास बारा, तेरा क्रमांक त्यांचेच असायचे. बातमी पसरली...

'ब' तुकडीतला महेश पेंढारकर वर्गात पहिला आणि शाळेत आठवा आलेला आहे..

संस्कृत शंभरपैकी नव्वद, जॉमेट्री पंचाहत्तरपैकी एक्काहत्तर, इंग्लीश चक्क ८५!

बायॉलॉजी - चाळीसपैकी सदतीस, फिजिक्स - चाळीसपैकी ३६ आणि केमिस्ट्री - चाळीसपैकी २९!

आता 'अ' तुकडीतले जुने मित्र येऊन भेटायला लागले. 'पेंढ्या सुटलाय, फार शायनिंग नको करूस, सहामाहीत काय? पहिला येणार का?' असे प्रश्न विचारून भंडावून सोडायला लागले. गट्टू एकेका प्रश्नावर खुष होऊ लागला. याच दरम्यान, वर्गात पहिला आलेला मुलगा म्हणून 'ब' तुकडीच्या विद्यार्थ्यांमधे गट्टूला आदर प्राप्त झाला. विद्यार्थिनीही आदराने त्याच्याकडे पाहू लागल्या. आणि शिक्षकांना 'हाही मुलगा हुषार आहे की' अएस वाटू लागले.

श्री ने तिमाहीच्या परिक्षेचा निकाल पाहून गट्टूला जवळ घेतले होते.

सहामाही -

सहामाहीला गट्टूने चमत्कारच करून दाखवला. संस्कृत ९९, इंग्लीश ८८, जॉमेट्री ७४ / ७५ -

वर्गात पहिला, शाळेत पाचवा!

आता तर 'अ' तुकडीतल्या मुलीसुद्धा या चमत्काराकडे आदराने पाहू लागल्या.

श्रीच्या मनातील आनंद ओसंडून वाहात होता. अख्खा दास्ताने वाडा गट्टूचे कौतूक करत होता.

शाळेने आता स्पेशल कोचिंगच्या क्लासमधे गट्टूला प्रवेश दिला. ज्या विद्यार्थ्यांची बोर्डात येण्याची कुवत असू शकते अशांवर अधिक मेहनत घेण्यासाठी बाराला शाळा सुरू होण्यापुर्वी अकरा ते बारा असा हा वर्ग भरायचा. ८० % किंवा अधिक मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना यात बसता यायचे.

कित्येक दिवसांनंतर, कित्येक दिवसांनंतर गट्टू पुन्हा देवांगच्या शेजारी बसू लागला.

या दिड दोन वर्षांमधे श्रीमधे खूप बदल घडले.

गट्टू अभ्यासात मागे पडत आहे हे पाहून तो आता निराश होऊ लागला होता. पन्नाशी जवळ येऊ लागली होती. रोजची सर्व कामे करणे आता पुर्वीसारखे जमत नव्हते. कित्येकदा ऑफीसला सायकलवरून जाताना तो काही वेळ सरळ सायकल हातात धरून चालतही जायचा. मधे बसायचा. आता आर्थिक परिस्थिती आधीहून बरीच बरी होती. पण शारिरीक अवस्था बिकट होऊ लागली होती. सीझन बदलण्याचा त्रास व्हायचा, उन्हाचा त्रास व्हायचा!

मात्र श्री नेटाने सगळे करत होता. अजूनही गट्टूचा डबा, आपला डबा, रात्रीचे जेवण, घराची स्वच्छता, पूजा, भाजी व किराणा मालाची खरेदी, कित्येक इतर कामे! सगळे करत होता. श्री आता किंचित अबोल होऊ लागला होता. त्याला आता स्वतःत होऊ लागलेले बदल समजू लागले होते. आपल्याला पुर्वीसारखे काम झेपत नाही हे कळू लागले होते.

परवाचाच प्रसंग! वयाने सप्रेंहून मोठे असलेले देशमाने रिटायर्ड झाले. सेंड ऑफ ठेवू नका म्हणाले. मी कुठे जातोय, मी आहेच की, मी स्वतःला अजून कंपनीतलाच समजतोय! असे म्हणत होते.

एक प्रदीर्घ, सुरक्षेच्या कवचाप्रमाणे असलेला सहवास आज संपत होता. स्वाती जवळपास पंचेचाळिशीची असावी. कोपरकर ५३, चिटणीस ५६! सप्रे ५८! श्री ४६!

स्वाती अन श्री सर्वात ज्युनियर होते. ते नोकरीला लागल्यापासून स्टोअरलाच असल्यामुळे देशमानेंकडे नाही म्हंटले तरी त्यांचे ट्रेनिंग झालेले होते. आजवर कित्येकदा सप्रेंच्या शिव्यांपासून देशमानेंनी सगळ्यांनाच वाचवलेले होते. सप्रेंना शिव्या द्याव्याच लागणार नाहीत अशा पद्धतीने स्टोअर चालवलेले होते.

सेंड ऑफ कमला नेहरू पार्कमधे झाला. भेळ आणि चहा! देशमानेंची पत्नी व मुलगीही आल्या होत्या. खवचट स्वभावाचे सप्रे आले नव्हते. आजचा दिवस वेगळा होता. आज कामाबाबत गंभीर बोलायचे नव्हते. त्यामुळे चिटणीस समवयीन, खरे तर किंचित वरिष्ठच असलेल्या देशमानेंशी आता अत्यंत आदराने व फॅमिली फ्रेन्ड असल्याप्रमाणे बोलत होते. चिटणीस अन देशमाने बोलत आहेत त्यामुळे बाकीचे आपल्याकडे ऐकण्याची भूमिका घेत होते. चिटणिस अन देशमाने सगळ्यांचे सीनियर्स होते. स्वाती अन श्रीला तर देशमाने जवळपास सप्रेंच्याच जागी असल्यासारखे होते.

कोपरकर - अरुणा वहिनी, घरी या बर का सगळे? ऑफीस संपलं म्हणून विसरायचं नाही..

कोपरकरांची देशमानेंच्या पत्नीशी इतकी व्यवस्थित ओळख आहे हा चमत्कार बहुतेकांना त्याच दिवशी समजला. भेळ खाताना दातांना अन जिभेला काम होते. त्यामुळे लक्ष त्यात लागत होते.

पण जसजशी भेळ संपत आली... एकेक आठवणी निघाल्या..

श्री - त्या दिवशी तुम्ही मला बोलला नसतात तर.. मला कधीच कळलं नसतं..
देशमाने - काय रे?
श्री - माझ्या चुकीमुळे स्वातीला सर बोलले ते..
देशमाने - हा हा! जुनी गोष्टय ती..
कोपरकर - देशमाने.. महिंद्राचे अकाऊंट कॉम्प्लिकेटेड आहे.. मला .. जमे..

जमेल की नाही असे म्हणताना अचानक चिटणिसांसमोर आपण बोलतो आहोत याची जाणीव झाल्यामुळे कोपरकर चाचरले.

चिटणिस हासले..

चिटणिस - न जमायला काय झालं? मी आहे.. तू आहेस.. .. सगळे मिळून करू.. आणि काही लागलं तर देशमाने येतील की तेवढ्यापुरते.. काय हो?
देशमाने - येईन तर..
कोपरकर - मी दवाखान्यात होतो तेव्हा देशमानेंनी माझंही सगळं का..
देशमाने- अरे ते सहकार्य आहे नुसतं! इट्स अ हेल्प!
चिटणीस - पण तुमचं ट्रेनिंग मिळाल्यामुळे सगळं समजलं आम्हाला काम..

स्वाती - आता काय करायचं ठरवलंयत?
देशमाने - आता काय? सकाळी निवांत सात वाजता उठायचं! फिरायला जायचं.. नाश्ता करायचा.. पूजा करायची.. या चिमीचं एकदा लग्न झालं की झालो खराखुरा रिटायर्ड!

चिमीने लटक्या रागाने मान हालवली.

स्वाती - बघताय ना ? स्थळं?
अरुणा वहिनी - होय.. एक पसंत पडलंय..
स्वाती - तुला पसंत आहे ना गं?

चिमीकडे पाहून सगळे हासले. तिचं नाव अंजली होतं!

श्री - आता.. सकाळी पावणे आठची बस धरायची घाई उरली नाही.. नाही का..
देशमाने - हं..

या हुंकाराबरोबर देशमानेंची खाली गेलेली मान पाहून सगळेच मनात ओलावले. चहाही संपत आला होता.

स्वाती सगळ्यात ज्युनियर म्हणून तिच्या हस्ते देशमानेंना एक ज्ञानेश्वरी, एक शाल आणि वहिनींना एक साडी असे देण्यात आले. सगळे उठले.

स्वाती - आठवण ठेवा हं??

आठवण? आठवण ठेवा?... कोण विसरतं? कुणी असं विसरतं का? उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं!

देशमाने नुसते हासले. चिटणीस त्यांच्याकडे गेले.

चिटणीस - येत राहाल ना? कंपनीत?

देशमानेंनी मान डोलावली. अरुणा वहिनींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

चिटणीस - मी आहेच मागे मागे.. चार वर्षे अजून.. काय?
देशमाने - हं!
चिटणीस - देशमाने.. ..

चिटणीसांचा ओला स्वर ऐकून 'मी कुठे रडलो' असा अभिनय करण्यासाठी यच्चयावत माणसांनी मान तिसरीकडेच फिरवली..

चिटणीस -.. इतक्या वर्षात.. माझं काही.. चुकलं वगैरे असलं तर...

देशमानेंनी घट्ट मिठी मारली चिटणीसांना! सगळेच धावले. चिटणीस अन देशमाने हमसून हमसून रडत होते. सप्रे हेड झाले तेव्हाची गोष्ट! कोपरकर जॉईन व्हायचे होते. स्वाती अन श्रीचा तर प्रश्नच नव्हता. खात्यात हे दोघेच फक्त! देशमाने अन चिटणीस! एकाच लेव्हलला.. सतत कॉम्पीटिशन प्रमोशनसाठी! यावर्षी याला तर पुढच्या वर्षी त्याला..

हळूहळू स्पर्धात्मक वातावरण झालेले. त्यातून नाराजी, रुसवे, फुगवे सगळे झालेले.. शेवटी अशी वेळ आली की इतकी वर्षे गेली की दोघेही कित्येक वर्षे एकाच लेव्हलला राहिले. यापुढील ग्रेड क्वालिफिकेशनमुळे मिळणे शक्य नव्हते. दोघांनाही ते समजले. आता वयही होत होते. निवांतपणे नोकरी करण्याकडे कल वाढत होता. आता एकमेकांचे मित्र होण्याची इच्छा, पुन्हा मित्र होण्याची इच्छा दोन्हीकडून बळावत होती. आता डबे एकत्र खाल्ले जात होते. एकमेकांना डब्यातले दिले जात होते. आता उरले होते फक्त एक शुद्ध नाते! परिपक्व नाते! या पातळीवरही अनेक वर्षे गेल्यानंतर देशमाने आज निवृत्त होत होते. आणि अशा वेळेस.. इतक्या प्रदीर्घ सहवासातील जुन्या टप्यातील आठवणी चिटणिसांनी काढल्यामुळे देशमाने हमसून हमसून रडत होते. आणि चिटणीसही तितकेच!

स्वाती अन अरुणा वहिनी सरळ रडत होत्या. श्री अन कोपरकर रुमालाने डोळे टिपत होते. कोण म्हणतं पुरुष हळवा असू शकत नाही?

देशमाने अन चिटणिसांची मिठी काही सुटेना. वहिनींनीच थोपटले तेव्हा ते दोघे बाजूला झाले. पुन्हा गळाभेट झाली. मग पुन्हा बाजूला झाले.

चिटणीस - दर रविवारी भेटायचं! सकाळी! इथेच! काय?

देशमाने अजूनही रडत होते.

देशमाने - येईन.. नक्की येईन..

कोपरकर पुढे झाले.

कोपरकर - ते.. सेटलमेंटचं मी बघतो.. तुम्ही हेलपाटे घालू नका हं?
देशमाने - हं!
कोपरकर - आणि..
देशमाने- ...??
कोपरकर - जपा तब्येतीला..
देशमाने - .. हं!
कोपरकर - काही लागलं तर हक्काने हाक मारा..
देशमाने - ....
कोपरकर - आता रोज एकत्र नसलो तरी...
देशमाने - नको रे असलं बोलूस..

कोपरकर बाजूला झाले.. देशमानेंना अन आपल्यालाही आपल्या बोलण्यामुळे भडभडून रडावसं वाटत आहे हे त्यांच्या लक्षात आले..

श्री - देशमाने .. गट्टूने हे ग्रीटिंग काढून दिलंय स्वतः.. तुमच्यासाठी..
देशमाने - वा वा.. खूपच सुंदर आहे रे..
श्री - घरी याल ना?
देशमाने - हं..
श्री - आणि काहीही लागलं तरी सांगा..
देशमाने - श्री..
श्री - काय?
देशमाने - .. तो .. तो फोन मी घेतला तो.... अजून भोकं पाडतो हृदयाला माझ्या..

कोणत्या फोनबद्दल ते बोलतायत ते सगळ्यांना माहीत होतं! गट्टू जन्माला आल्याच्या फोननंतरचा 'रमा गेल्याचा' फोन!

आता श्रीवर रडण्याची वेळ आली.

श्री - असूदेत..
देशमाने - कसं काढतोस तू आयुष्य? कसा जगतोस एवढं सगळं करून.. आणि..
श्री - आणि काय??
देशमाने - आणि त्या दिवशी मी तुला... किती... बो.... किती बोललो श्री..

देशमानेंचे न थांबणारे हुंदके कमला नेहरू पार्क या सुंदर बागेला नवीन वातावरणात नेत होते.

स्वाती - मी पण येणार आहे दर रविवारी इथे.. तुम्हाला भेटायला..
देशमाने - जरूर...
स्वाती - हे पेन.. माझ्याकडून..
देशमाने - अरे? हे एवढं सगळं दिलंत की..
स्वाती - अंहं! हे खास माझ्याकडून आहे.. तुमच्या कारकीर्दीला सलाम देशमाने..

सगळ्यांना हात जोडून नमस्कार करत देशमाने कुटुंबीय एक एक पाऊल उचलू लागले.. .. आणि...

....

"एवढा रागवतोस होय रे साल्या माझ्यावर?... कामात होतात भांडणं.. मला नाही भेटणार का.... जरा रिक्षा मिळायला उशीर झाला.... तर चालला आपला निघून... ???"

.... सप्रे.... सप्रे घाईघाईत धावत पोचले होते...

धावत ... अक्षरशः धावत देशमाने सप्रेंकडे गेले...

सप्रे आणि देशमाने कित्तीतरी वेळ एकमेकांच्या मिठीतच होते.

सप्रे हा माणूस असा आहे हे कित्येकांना त्याचदिवशी समजले.

एक अध्याय संपला होता. एक्साईजचे काम आता उरलेल्या सगळ्यांनाच येत होते. पण ज्या सफाईने अन ज्या सुंदरपणे देशमानेंनी कामाला न्याय दिलेला होता... ते अजोड होते..

अशा प्रकारच्या अनेक अनुभवांमुळे श्रीमधे विलक्षण फरक पडत होते. आता तो अधिकच परिपक्व होऊ लागला होता. एके दिवशी आपल्यालाही निवृत्त व्हायचेच आहे. मग गट्टू मोठा होईल. मग तो नोकरीला लागेल. मग आपले स्वप्न फक्त एकच! गट्टूला खूप मोठं झालेलं बघून, त्याच्या आधाराने चार दिवस रेटून... आपल्या रमाला भेटायला जायचं..

आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा, फोलपणाचा अनुभव आता वारंवार काही ना काही प्रसंगातून येत होता. कंपनीतील एक वर्कर जवळ राहायचा. आदल्याच दिवशी संध्याकाळि आपल्या बायका मुलांना फिरायला घेऊन जाताना तो श्रीला रस्त्यात भेटला होता. 'नमस्कार पेंढारकर साहेब, ए.. हे साहेब आहेत बर का' असे बायकोला सांगून आनंदीत होऊन, हात जोडून नमस्कार करून पुढे निघून गेला होता. 'दत्त कांबळे'!

आज सकाळी टूल रूम शोकाकूल! दत्त कांबळे काल बालगंधर्ववर अपघातात गेला.

श्रीला भेटल्यानंतर बहुधा काही मिनिटांमधेच हे झालेले होते. दत्त कांबळे पॉप्युलर होता. दिलखुलास स्वभावाचा असल्यामुळे! माणूस असा जातो, जाऊ शकतो हे प्रत्यक्ष अनुभवत होता श्री!

दत्त कांबळेच्या घरी जाऊन त्याच्या बायकोचे पांढरे कपाळ अन मुलांचा आक्रोश बघण्याचा विचार करण्याचीही श्रीमधे हिम्मत नव्हती.

एकीकडे गट्टूची अभ्यासातील प्रगती तर दुसरीकडे घडणार्‍या वादळी घटना! श्रीने विमा काढला. ताराला फोन करून सांगीतले. उगीचच! ती तिकडे घाबरली. मग त्याने 'सहज मनात विचार आला' म्हणून म्हणालो असे सांगीतले. म्हणे 'काही बरं वाईट वगैरे झालं तर गट्टूला सांभाळ'! आता हे सांगायची काय आवश्यकता आहे?

लो बी.पी, हिमोग्लोबिनची कमतरता! या दोन व्याधी आता मैत्रिणीप्रमाणे शरीरात नांदू लागल्या.

पवार मावशी! साठीच्या पुढे पोचलेल्या होत्या. तोंडातील चमत्कार आता घटू लागले होते. म्हणींची संख्या आटू लागली होती. आटू कसली? जवळपास शुन्यच! रागावणे कमी होऊ लागले होते. शांतपणे टक लावून कुठेतरी बघत गॅलरीत बसून राहायच्या. या बाईने भिंतींना तडे जातील अशा आवाजात वाडा कित्येक वर्षे गाजवलेला आहे हे मोठ्या झालेल्या राजश्रीच्या भावाला, गणेशला आठवतही नव्हते. मात्र वाडा अजून वचकूनच होता.

श्रीकडे आता एक मावशी धुण्या भांड्याला यायच्या. आक्का म्हणायचे त्यांना! जवळपास पासष्टीच्या असाव्यात! मुलगा सांभाळत नाही त्यामुळे एकट्याच राहात होत्या कशातरी! ही अशी कामे मिळाली की गुजराण व्हायची. श्री घरी असला तर त्यांना चहा आणि दोन पोळ्या द्यायचा. ती बाई कधी 'द्या'ही म्हणायची नाही अन 'नको' ही म्हणायची नाही. दिलं तर गॅलरीत बसून मान खाली घालून खाणार, नाही दिलं तर मान खाली घालून निघून जाणार! श्रीच्या आजूबाजूला आता बरीच उदाहरणे होती ज्यांच्याकडे पाहून श्री अधिकच शांत, अबोलसा होऊ लागला. गट्टूच्या कॉलेजप्रवेशासाठी जमवलेले पैसे पुरतील की नाही असा विचार सतत त्याच्या मनात येत राहायचा. कारण एकेक बातम्या कळत होत्या. या कॉलेजला पाच हजार मागतात, तिकडे आठ हजार मागतात वगैरे!

मानेकाका! आता अध्यात्मिक होऊ लागले होते. आयुष्यभर दौलतीवर बसलेल्या नागाप्रमाणे सळसळून दमले होते. तरी 'हा माने हा दास्ताने वाडा पेटवून देईल' हे वाक्य तीन चारदा तरी यायचंच ऐकू दिवसातून! घाटे, निगडे अन कर्वे कुटुंबीय नेहमीप्रमाणे त्यांना वचकूनच असायचे.

राजाराम शिंदे! एक भोळा माणूस! कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. आपले सर्व लक्ष नैनावर एकवटून तिच्या सुखासाठी अन शीलाच्या आनंदासाठी जगत होता. शीला आता वाड्यात बरीच रुळली होती. प्रमिलाबरोबर, नंदाबरोबर खूपदा गप्पा मारत बसायची. नंदा आता जवळपास म्हातार्‍यांमधेच मोडायला लागली होती. असेल की पंचावन्न वगैरे!

वैशालीचे लग्न ठरले होते. ती आता स्वतःला नीतू सिंग समजायला लागलेली होती. मॅक्सीची फॅशन खरे तर केव्हाच गेली होती. पण ती अजूनही नीतू सिंग सारख्या मॅक्सीज घालत होती. आपला भावी नवरा ऋषी कपूरसारखा दिसतो हे ती मैत्रिणींना सांगत होती. शिक्षणाचे बारा वाजलेले होते खरे तर!

किरण आता बँकेत शिपाई झालेला होता. सगळा तोरा उतरलेला होता. मुकद्दर का सिकंदर समजणारा आता एक एक्स्ट्रॉ दुसरी नोकरी करावी अन उत्पन्न अधिक वाढवावे या प्रयत्नात होता. घरून वहिनीच्या शिव्या अन दादाचे प्रेम असूनही वहिनीच्या तंत्राने वागणे यामुळे वैतागलेला होता. आता पिक्चर बघता येत नव्हते.

राजश्रीमधे फरक पडला होता. कॉलेजला जायला लागल्यापासून ती अतिशय अबोल झालेली होती. समीरदादाचे आता मित्रच वेगळे होते.

मधूसूदनला आता जवळपास पूर्ण टक्कल पडलेले होते. प्रमिलाला घरचे काम करायला दिवस पुरत नव्हता. खिडकीतून बघण्यातील मजा आता जुनी झालेली होती. अधेमधे नजरानजर झालीच तर तिला अन श्रीला गेल्या काही वर्षातील पायंडा आठवायचा. शतपावली अन खिडकीचा पडद्यात येण्याचा! मुले मोठी झालेली आहेत आता, आता आपण काय एकमेकांकडे बघायचे असे दोन्हीकडून वाटू लागले होते.

वाड्यातील क्रिकेट चालू होते. पण कधी तिघचजण तर कधी अर्ध्या तासातच संपलाअ खेळ असं!

पण या सगळ्यात एक अतयंत महत्वाची गोष्ट मात्र घडत होती...

महेश श्रीनिवास पेंढारकर आणि... नैना राजाराम शिंदे..

दोघांना आता एकमेकांना पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हती. घरातून शाळेत जाताना त्यांना एकच दु:खं असायचं! आता आपण एकमेकांना दिसणार नाही. शाळेत्न परत येताना एकच आनंद असायचा! आता आपण दिसणार एकमेकांना!

आता नैना गट्टूशी चार चौघांमधे बोलायला लाजू लागली होती. मात्र हळूच त्याच्याकडे बघायची. गट्टू आता वेडापिसा झालेला होता. त्याला आता स्वप्नेही नैनाचीच पडायची.

गट्टूची पुस्तके नैनाला काही वेळा उपयोगी पडत! कारण एकाच यत्तेचे अंतर होते. मग काही ना काही कारणाने एकमेकांच्या घरी जाणे येणे व्हायचे. नैना आली तर श्रीकाकाशी एकट्याशीच बोलून परत जायची. गट्टू नुसता तिच्या वावरण्याकडे बघत बसायचा. ती मंद लाजरे हसू खेळवत जाताना एकच नजर त्याच्याकडे टाकत निघून जायची. गट्टू तिच्याकडे गेला तर ती बाहेरच यायची नाही. मग शीलाकाकूशी बोलून तो परत यायचा. कधी एकदा नैना दिसतीय असे त्याला होऊन जायचे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोक्यात एकच विषय! नैना... !!!

अमिताभ बच्चन आता कसलेही रोल्स करायला लागलेला होता. खरे तर तो संपला आहे असे काही जाणकार म्हणत होते वर्गातले. मात्र गट्टूच्या नशिबात पिक्चर नसल्यामुळे तो ते फक्त ऐकायचा! नशिबात पिक्चरच काय, हॉटेल, ट्रीप काहीच नव्हते. शाळेच्या ट्रीपला एकदा मुंबईला जाऊन आला तेवढाच!

कुर्बानीच्या झीनत अमानची जादू कधिपासूनच गल्लीगल्लीत पसरली होती. लैला मै लैला म्हणायला आता वयाचे बंधन किंवा स्थानाच्या मर्यादा राहिलेल्या नव्हत्या. गट्टू हळूच जवळपास कुणी नाही असे पाहून 'नैना मै नैना नैना' म्हणून घ्यायचा!

कुर्बानीमुळे 'टुंग' असा आवाज करू शकणारे एक नवीन वाद्य हिंदी पिक्चरमधे आले होते अन ते तुफान गाजले होते.

प्यार झुकता नही वगैरे पिक्चर आता गाजत होते. लव्ह स्टोरी मधला कुमार गौरव सपशेल आपटला तरी ज्युबिलीकुमार वडिलांप्रमाणेच सगळी गाणी मात्र हिट्ट झालेली होती.

आणि वाड्यात तीन अत्यंत महत्वाचे फरक पडले होते.

मानेकाका या तोफखान्याने फोन घेतला होता....

.... पवार मावशींनी टी.व्ही. घेतला होता....

.... आणि... मधूसूदन कर्व्यांनी... फ्रीज घेतला होता...

आता मानेकाकांच्या अन मावशींच्या तोंडाचा पट्टा पुन्हा अविरत सुरू झाला होता. कुणीही घरात घुसायचं! घाटेंना आता दिवसातून आठ फोन यायला लागले. घाटेंना येणार्या फोन्सच्या संख्येमुळे व त्यावर मानेकाका करत असलेला उद्धार पाहून त्यांच्याकडे आपला फोन येऊ नये अशी भीती प्रत्येकाला बसायला लागली. मात्र आधीच सगळ्यांनी मानेकाकांचा नंबर ' मला या नंबरवर केव्हाही फोन कर' अशा हक्कात आपल्या आपल्या वर्तुळांना दिलेला होता. त्यामुळे वाट्टेल तेव्हा वाट्टेल त्याचे फोन येऊ लागले. मानेकाकांनी आता 'फोन करायचा असल्यास चाळीस पैसे व आलेला फोन घ्यायचा असल्यास दहा पैसे - हुकुमावरून' असा रेट जाहीर करून दरवाजावर पाटी लावली. याचा परिणाम विचित्र झाला. आलेला फोन आधी घ्यायला त्यांनाच लागायचा. मग कळायचे की हा घाटेसाठी आहे. मग घाटे दहा पैसे देणार या विचाराने घाटेंना हाक मारली की ते विचारायचे 'आहे कुणाचा फोन'?! मानेकाकांनी सांगीतले 'ऑफीसमधून काळे बोलतायत' की घाटे म्हणायचे 'हा फोन मला घ्यायचाच नाहीये'! गेले दहा पैसे! गेले म्हणजे काय? नव्हतेच मिळालेले! पण मिळू शकले असते ते गेले. पण त्या पाटीचा उपयोग असा झाला की कॉल्सची संख्या अन आवकजावक कमी झाली. आता मानेंना भावच खाता येईना 'माझ्याकडे फोन आहे' याचा!

तिकडे 'ऊठ, चालता हो, बापालाच सवय फुकट हादडण्याची' असे गोड गुलाबी हळुवार संदेश देत मावशी गणेश बेरीला बखोटे धरून उचलायला गेल्या की तो त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून 'ए.. तू थांब गं जरा.. काही ऐकू येत नाहीये' असे त्यांनाच दटावून टी.व्ही.कडे पाहू लागायचा. मावशींची खात्री होती की आपल्या नव्या टी.व्ही.ची सर्व बटणे पिरगाळली गेल्यामुळे कामातून गेलेली आहेत. तो टी.व्ही. अजून लागतोय कसा हेच त्यांना समजत नव्हतं! निगडेंकडची पिलावळ अन गणेश बेरी असा एक वयोगट त्या टी.व्ही.वर रानटी प्रयोग करायचा. बंद वगैरे पडला तर सरळ वरून एक दणकाही द्यायचे. मग मावशींचा मार खाल्ला की पळापळ व्हायची. मावशींना स्वतःला टी.व्ही. डायरेक्ट रात्री नऊच्या पुढे बघायला मिळायचा अन साडे नऊच्या इंग्रजी बातम्या अन दहाचं काहीतरी रटाळ कथ्थक वगैरे झालं की टी.व्ही. बंदच व्हायचा. 'तिकडूनच'! त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या सर्वनाशाला कारणीभूत ठरलेली आहे अशा नजरेने मावशी टी.व्ही.कडे बघायच्या अन रात्री दहा वाजताच्या अथांग पुणेरी शांततेला पुन्हा जालीम तडे जायचे. त्या दिवशी जो शेवटचा टी.व्ही. बघून घरातून बाहेर पडलेला असेल त्याच्या पुर्वीच्या काही पिढ्यांचा शारिरीक संबंध अनवधानाने काही इतर योनीतील सजीवांशी आल्याचे बिनदिक्कत उल्लेख ऐकताना तिकडे शीला राजाराम शिंदे आपल्या भाविक नवर्‍याला भीतीने बिलगून बसायची अन त्या बिचार्‍याला उलट तोच आधार वाटायचा.

मानेकाका आता वाक्यामागे दास्ताने वाडा पेटवत होते.

त्यातच गट्टुचा बोर्डाचा निकाल लागला. ७०० पैकी ५७८! ८२.५ %!

नैना त्याच्याकडे पाहून अशी काही लाजली होती की जणू आता हा नोकरीला लागणार अन बापाकडे हातच मागणार आपला! आणि ते लाजणे पाहून गट्टूला स्वर्ग आपल्या पायाखाली अंथरलेला असल्याचा भास झाला.

मोठी पार्टी झाली याहीवेळेस!

समीरदादाने याहीवेळेस काहीतरी कुचकट बोलून खरे तर गट्टूचे डोके फिरवले होते पण नैनाचा सुगंधी वावर आसपास असल्यामुळे गट्टूचे तिकडे लक्षच नव्हते. नैनाला आता सगळे सांगत होते. बघ! महेशने नाव काढले वाड्याचे! आता या वर्षी तू आहेस दहावीला! शिकून घे त्याच्याकडून अभ्यासाचं सगळं!

आणि ते ऐकलं की गट्टूला 'हे स्वप्न सत्यात उतरावं अन मला तिचा कायदेशीर घरगुती शिक्षक ही भूमिका मिळावी' असे वाटू लागले. आता तो पार्टीतच 'मी आहे ना, मी सगळा अभ्यास करून घेईन तिचा' वगैरे विधाने मोठ्या दिमाखात करू लागला.

डिप्लोमाला घातलेला बरा!

सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. जी.पी.पीला जाण्यात अर्थ नव्हता. ते लांब पडले असते. भारती विद्यापीठ अन ज्ञानेश्वर विद्यापीठ अजून खरे तर एस्टॅब्लिशच झालेली नाहीत असा प्रवाद होता. त्यामुळे ....

... कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी....

या नावावर एकमत झाले!

तेथील प्रवेश उशीरा होत असल्यामुळे 'आबासाहेब गरवारे कॉलेज' येथे तात्पुरती अ‍ॅडमिशन घेतली गेली. 'नाहीच मिळाली डिप्लोमाला काही कारणाने तर हातात अ‍ॅडमिशन पाहिजेच' या विचाराने!

आणि विमलाबाई गरवारेतून महेश श्रीनिवास पेंढारकर ज्या दिवशी... आबासाहेब गरवारेमधे निघाले...

श्रीने गट्टूला जवळ घेतले.

श्री - आजपासून कॉलेज सुरू होणार हं? आता खूप खूप शिकायचं! मोठं व्हायचं! आईच्या फोटोला नमस्कार कर! आजीला नमस्कार कर! आईला अभिमान वाटेल असा शिक! नाव काढ! हं?

गट्टूने न चुकता आईचा फोटो, श्री अन आजीला नमस्कार केला. नंतर प्रमिलाकाकूला नमस्कार करून तो कॉलेजला निघाला.

नो युनिफॉर्म, नथिंग! जस्ट अ स्मॉल बॅग अ‍ॅन्ड अ टिफीन! व्हॉट अ लाइफ ! व्वाह!

शाळेतले किमान पंधरा वर्गमित्र या कॉलेजला आलेले होते. कॉलेजचे वातावरण पाहून गट्टू बुजला. पण तीन, चार दिवसांतचह रुळला. आणि त्याच दिवशी एका मोठ्या मुलामुळे त्याला दोन गोष्टी समजल्या.

अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी! ज्यांच्यामुळे त्याच्यात आणखीनच बदल झाले.

एक म्हणजे... कॉलेजला स्वतंत्र कॅन्टीन असते.. तेथे भरपूर खाद्यपदार्थ विकत मिळू शकतात...

... आणि दुसरी म्हणजे....

... कॉलेजच्या पिरियड्सना बसले नाही तरीही चालू शकते... त्याला 'बंक' करणे असे म्हणतात...

तिसरा छंद म्हणजे आबासाहेब गरवारेच्या विशाल मैदानामधे एक व्हॉलीबॉलचे नेट होते अन सायंकाळी पाच ते साडे सहा तेथे खेळता येत होते. आता क्रिकेट इतकीच व्हॉलीबॉलची आवड निर्माण झाली.

आणि... केवळ सतराव्या दिवशी ती आनंदाची बातमी आली बाबांकडून..

कुसरो वाडिया... येथे प्रवेश मिळालेला आहे..

दु:ख झाले गट्टूला... पंधरा वीस दिवसात गरवारे कॉलेजशीही एक नाते निर्माण झाले होते...

पण.. आता जावेच लागणार होते वाडियाला..

तीच, प्रमिलाकाकूने घेतलेली बी.एस्.आर. सायकल अजूनही दणकट होती.

मात्र! वाडिया कॉलेज खूपच लांब होते...

'नीट जा' असे दहा वेळा बजावून श्रीने त्याला घरातून जाताना 'अच्छा' केले...

आणि अभियंता बनण्याच्या वाटेवरचे गट्टूचे पहिले पाऊल पडले..

स्वतःला नीतू सिंग समजणार्‍या वैशालीचे लग्न उद्या होते...

आज दास्ताने वाड्यातून ... तिला ... कायमचे जायचे होते.. आता येणार तेव्हा...

सौ. वैशाली कुमार बेंद्रे... ... एक विवाहिता.. परकी...

दास्ताने वाड्याची कुणीही नाही... कुणीही... !!!

वाड्याच्या भिंती, फरश्या, घरे, पडक्या अंधार्‍या जागा.. कुठेही वाढलेले गवत अन शेवाळे..

... सगळ्या सगळ्यांनी तिला बावीस वर्षे तिथे बागडताना... हसताना, रुसताना, खेळताना, पडताना, रडताना पाहिलेले होते...

वैशालीचा पाय निघेना..

घराच्याच बाहेर तिला पडावेसे वाटेना.. वाड्याची गोष्टच और!

पण आईने हळूहळू धर्न तिला घरातून बाहेर आणले आणि... रिक्षा आणायला गेलेल्या बाबांना समोर दाराच्या बाहेर उभे पाहून मात्र वैशालीचा संयम सुटला..

ती अक्षरशः बापाच्या पायात कोसळली.. हा विलाप येणार्‍या सुखांआधीचा विलाप होता.. पण...

दास्ताने वाडा थरथरत, ओलावत, अश्रू ढाळत त्या विलापाकडे बघत होता..

बापाची मिठी काही सोडवेना तिला.. एकवेळ आईचे ठीक आहे.. पण... बाप?? एक ... एक बाप?

बाप मुलीला कसा सोडू शकेल? अन मुलगी बापाला?

गट्टू ते दृष्य पाहून थिजला होता. सगळेच थिजलेले होते. सर्व बायका पदर डोळ्यांना लावून रडत होत्या. तिला थोपटत होत्या.

वाड्यातून एकेक पाऊल चालताना..

पहिल्यांदा माने काका समोर आले..

माने काका - काय गं चिमुरडे?.. चाललीस की भुर्रकन उडून.. काकाची आठवण ठेव हां??

मानेकाकांच्या छातीवर डोके ठेवून रडताना वैशाली आपल्या बापाला पाहून रडली तशीच रडली...

नीतू सिंग असण्याचा, ऋषी कपूर सारखा नवरा मिळालेला असण्याचा.. सगळा रुबाब बिदाईने नष्ट केला होता... कसलाही रुबाब ठेवावासा वाटत नव्हता..

पवार मावशींशी वैशालीचे फारसे नव्हते. तसेच मधूसूदन, प्रमिला, श्री, नंदा, घाटे यांच्यापैकी कुणाशीच मानेकाकांसारखे नाते नव्हते. मात्र!

शीला राजाराम शिंदेच्या घरापासून पुढे जाववेना!

चितळे आजोबांनी सांगीतलेल्या गोष्टी आठवल्या.

"ही अशी मी न्युटनची मान सरळ केली अन म्हणालो.. आता सांग... बॉल वर फेकलास तो खालीच का आला"

चितळे आजोबांच्या उंबर्‍यावर डोके टेकून वैशाली मिनिटभर बसतीय तोच... नेमके नको तेच...

जे होऊ नये असा तिचा आटापिटा चाललेला होता तेच.. झाले..

किरण! सख्ख्या भावापेक्षा अधिक असलेला किरण वाड्याच्या दारातून आत आला आणि नजरानजर झाली..

तीरासारखी धावली वैशाली त्याच्याकडे...

इतकी घट्ट मिठी बापालाही मारलेली नसेल तिने.. बावीस वर्षे दोघे एकत्र होते.. लहानपण एकत्रच! खेळले एकत्र! प्रत्येक राखी पोर्णीमेला त्याच्या घरी ती जायची. प्रत्येक भाऊबीजेला तो तिच्यासाठी काहीतरी आणायचा. यावेळेस लग्नापुर्वीची शेवटची भाऊबीज म्हणून त्याने तिला स्वतःच्या नव्या नव्या पगारातून साडी आणलेली होती. सोसवलं नाही दोघांनाही ते! किरण घरी यायच्या आधी काहीही करून वैशालीला वाड्यातून बाहेर पडायचं होतं! पण नाही जमलं ते!

किरण आला आणि वैशालीचा लग्नातील .. स्वतःच्या लग्नातील सर्व इंटरेस्ट संपला..

किरणला आता सोडून जायचे या दु:खात तिने त्याचा शर्ट अश्रूंनी पार ओला करून टाकला.

असले दृष्य पाहून बाहेरचा रिक्षेवालाही डोळे पुसत होता. किरण तिच्या पाठीवरून हात फिरवताना म्हणाला..

किरण - जवळच आहे सासर.. पाच मिनिटात येऊ शकशील.. हो की नाही? रडतेस कसली?...

रडतेस कसली म्हणताना स्वतःच हमसाहमशी रडत होता..

सीमांतपूजनाला अख्ख्या दास्ताने वाड्याला आमंत्रण होतं!

तासाभराने ब्राह्मण मंगल कार्यालयात निघायचे असल्यामुळे सर्व वाडेकरी नटून थटून बसले होते...

आणि वैशाली रडत रडत रिक्षेत बसत असताना...

आजवरचे पहिलेवहिले साहस करत गट्टू नैनाला म्हणाला.. ...

"वेणीपेक्षा तुला... केस मोकळे सोडलेलेच छान दिसतात"

प्रचंड लाजल्यामुळे 'तो आपल्याशी बोलला' हे माहीतच नसल्यासारखे दाखवत नैना घरात पळाली.

मात्र!

सीमांतपूजनाच्या वेळेस वाड्यातून निघताना तिने वळून वर गट्टूच्या खिडकीकडे पाहिले तेव्हा...

.... अनिमीष लोचनांनी गट्टू नैनाकडे पाहात होता...

तिचे लांबसडक काळेभोर केस... पाठीवर मोकळे सोडलेले होते तिने...

गुलमोहर: 

आहाहा!!! दिल खुश हो गया Happy
अप्रतिम वळण घेत कथा पुढे जाते आहे...सुन्दर...>>> मी मराठीला अनुमोदन!

बेफिकिर,
खुपच मस्त, शेवट जरि माहित असला तरि.... तुमच्या चष्म्यातुन वाडा आणि गट्टु ला पहायला जि मजा आहे ना ति काहि और् च. आणि तुमचि लेखन शैलि मण्ह्जे अफलातुन.

बाकि, देशमाने चा सेड ऑफ भुतकाळात घेऊन गेला. पुरुष असल्या मुळे रडलो नाहि, पण दोन कलिग नि रडुन रडुन दगा केला होता.

तुम्हि खुप सुदर लिहिता.

अप्रतिम बेफिकीर , एवढ्या सगळ्या टीकाकारांना चोख उत्तर देत, आम्हा रसिकांच्या बाजूने येत पुंन्हा लिखाण सुरु केल्याबद्दल धन्यवाद..............
आजचा भाग अप्रतिम, हळू हळू...... वाड्यातले सगळे जण थकायला लागले आहेत.....
आयुष्य क्षणभंगुर असत हेच खरं.......................

सर्वांच्या उदार प्रोत्साहनांमुळे ताकद मिळाली व हायसे वाटले.

आभार मानणे योग्य ठरणार नाही.

-'बेफिकीर'!