१७ ऑगस्ट १६६६... आग्र्याहून सुटका... एक थरारक पलायन...

Submitted by सेनापती... on 16 August, 2010 - 21:48

१६६५च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वर येथे पोचले होते. मराठा हेरांनी पक्की बातमी आणली. मिर्झाराजा जयसिंग लाखभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजांनी घाईघाईने राजगड गाठला. औरंगाबादहून निघालेल्या शाही फौजा सासवडला पोचल्या होत्या. २९ मार्च रोजी पुरंदरला वेढा पडला. १५ दिवस घमासान लढाई झाली. १४ एप्रिल रोजी पुरंदरचा जोडकिल्ला वज्रगड मुघलांनी काबीज केला. आता अंतिम लढाई सुरु झाली होती. किल्लेदार मुरारबाजी यांनी जीवाची बाजी लावली. मराठा इतिहासामध्ये ते अमर झाले. आजही तुम्ही कधी पुरंदरला गेलात तर मुरारबाजींचा पुतळा बघून त्यांच्या शौर्याची गाथा कळते. किल्लेदाराबरोबर किल्लाही पडला.

तह व्हायच्या आधी शिवाजीराजांनी मिर्झाराजाला एक पत्र पाठवले होते. या पत्रामधून तत्कालीन परिस्थितीचे आणि शिवरायांच्या मन:स्थितीचे यथार्थ चित्रण झाले आहे. हे पूर्ण पत्र वाचावे असेच आहे. पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."

सर्वत्र सुरु असलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मुघलांशी तह करायचे ठरवले. पुरंदरचा तह घडला. १६ वर्षात जे कमावले ते सर्व या तहात राजांनी गमावले. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. तहानंतर शिवाजीराजे कुतुबशहा आणि आदिलशहाच्यासाथीने मुघलांविरुद्ध संयुक्त आघाडी उभी करतील अशी भिती मिर्झाराजाला होती म्हणून त्याने बादशहाला कळवले की 'कुठल्याही परिस्थितीत शिवाजीला आपल्याकडे वळवून घ्यायला हवे. त्यासाठी मी शिवाजीला आपल्या दरबारी पाठवत आहे.' मिर्झाराजाने राजांना आग्रा येथे जाण्यास तयार केले आणि त्याप्रमाणे ५ मार्च १६६६ रोजी राजे आग्रा येथे जाण्यास निघाले. स्वतःच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त खुद्द औरंगजेबाने त्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले होते. 'मनात कुठलीही चिंता किंवा शंका न ठेवता मला भेटायला या. आपला येथे सत्कार केला जाईल आणि तुम्हाला पुन्हा दख्खनेत जाण्याची मुभा असेल.' मजल-दरमजल करत शिवाजीराजे १२ मे रोजी तेथे पोचले.

................ आणि 'दिवाण-ए-खास' मध्ये जे घडले तो इतिहास आहे.

जोगळेकर त्यांच्या सह्याद्री ग्रंथात म्हणतात,''आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."

परिणाम ठरलेला होता. राजे नजरकैदेत टाकले गेले. अर्थ स्पष्ट होता. मृत्यू.... कधी? केंव्हा? कसा? काहीच ठावूक नव्हते. दख्खनेतून जयसिंगने 'शिवाजीस मारू नये. तसे केल्यास इकडे परिस्थिती हाताबाहेर जाईल पण इकडे सुद्धा येऊ देऊ नये' असे पत्र औरंगजेबाला पाठवले. औरंगजेबाने राजांना काबुल मोहिमेवर पाठवायचे ठरवले. अर्थात राजांनी बादशहाची कुठलीच गोष्ट मानायला साफ नकार दिला. परिस्थिती अधिक बिकट होत होती. कुठल्याही क्षणी आपला मृत्यू समोर येईल हे राजांना ठावूक होते. अखेर एक योजना आखली गेली. थरारनाट्य ठरले. राजांबद्दल आग्र्याच्या बाजारात अफवा पसरत होत्या. खुद्द जसवंतसिंग औरंगजेबाला सांगत होता. 'शिवाजीकडे दैवी शक्ती आहे. तो १४-१५ हात लांब उडी मारू शकतो. एका फटक्यात ४०-५० कोस अंतर तो चालून जातो.' दुसऱ्या दिवसापासून बादशाहने स्वतःभोवतीची सुरक्षा अधिक वाढवली. राजांबरोबर असलेले संभाजीराजे मात्र नजर कैदेत नव्हते. त्यांना फिरायला मुभा होती. त्यांच्या सोबत सर्जेराव जेधे आग्र्याबद्दल इत्यंभूत माहिती काढत. योजना हळूहळू पुढे सरकत होती. ७ जून रोजी राजांनी सोबत असलेल्या सर्व सेवक आणि सैन्याला परत दख्खनेत पाठवून दिले. सोबत होते फक्त संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, सर्जेराव, रघुनाथ बल्लाळ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर आणि मदारी मेहतर.

१७ ऑगस्ट १६६६. दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना राजे नजरकैदेतून पसार झाले. ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. औरंगजेबाने शोध मोहीम काढली. पण आता खूप उशीर झाला होता. एक थरारक पलायन यशस्वी झाले होते. राजांनी मुघलांची शेवटची चौकी २० ऑगस्ट रोजी चक्क खोटे दस्तक दाखवून पार केली. चौकीदार होता लातिफखान. औरंगजेबाला जेंव्हा हे कळले तेंव्हा त्याने 'लातिफखान बेवकूफ है' असे उद्गार काढल्याची नोंद मुघल कागदपत्रांमध्ये आहे. आता संभाजीराजांना मथुरेला विश्वासरावांकडे ठेवून शिवाजीराजे वेगाने पुढच्या मार्गाला निघाले. आपल्या ९ वर्षाच्या मुलाला मागे ठेवून जाताना त्यांना काय वाटले असेल...!!!

पण एकत्र जाणे धोक्याचे होते तेंव्हा त्यांना काळजावर दगड ठेवून तो निर्णय घ्यावा लागला असणार. तिकडे आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार फुलौतखानाला सापडले. शिवाजीराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजीराजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते. राजांनी थेट दख्खनेचा रस्ता न धरता मुघलांच्या आवाक्याबाहेरचा मार्ग घेतला होता. मथुरेवरून अलाहाबाद - बनारस - गया - गोंडवन आणि तिथून गोअळकोंडा. वाटेत ठिकठिकाणी शत्रूशी त्यांची गाठ पडली. त्यांनी संन्याश्याचा वेश धारण केला. जास्तीतजास्त प्रवास पायी केला. अथक परिश्रम करून राजे दख्खनेत पोचले. पण अजून संभाजीराजे मथुरेमध्येच होते. शिवाजीराजे राजगडी पोचल्याची बातमी आग्र्याला पोचली तेंव्हा मुघलांची शोध मोहीम थांबली. रस्ता अधिक सुरक्षित झाल्यावर विश्वासराव संभाजीराजांना घेऊन खुद्द राजगडी पोचले.

हताश झालेला औरंगजेब आता फारसे काही करू शकत नव्हता. आता काय कधीच काही करू शकत नव्हता. त्याच्या मनात एकच सल होता. 'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही.'

३१ वर्षानंतर '२१ फेब्रुवारी १७०७' रोजी म्हातारा बादशहा हाच सल घेऊन 'अल्लाला प्यारा' झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

भारतीय इतिहासातले सोनेरी पान !

(संदर्भहीनः काल न्युक्लीअर डिसेप्शन वाचताना, झिया उल हक चा मृत्यु पण १७ ऑगस्ट (१९८८) लाच झाल्याचे कळाले!) हा दिवस कदाचित मोगलांच्या शेवटाची सुरुवात ठरते असे दिसते!... झिया उल हल नंतर पाक्यांना अमेरिकेला वापरु शकणारा दुसरा एकही खमक्या नेता भेटला नाही. मुशर्र्फ ने प्रयत्न केला म्हणा...)

चांगलं लिहिलंय. 'मिठाई पेटारा' गोष्ट मात्र आवडायची. Happy

>>झिया उल हक चा मृत्यु पण १७ ऑगस्ट १९६६
१९६६?? नाही, १९८८. ती बातमी मी स्वतः ऐकल्याचे आठवते, तेव्हा ६६ नक्की नाही. Happy

छानच लिहीलय Happy
>>>>>> ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. <<<<<
अशा बर्‍याच गुपित गोष्टी अज्ञातच रहातात - रहाव्यात! Happy
ते तेथुन निसटले (पळाले नव्हे - पळणे व निसटणे यात फरक आहे - तसेच ती "सुटका" देखिल नव्हती - ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या व सहकार्‍यान्च्या अक्कलहुषारीने शत्रूच्या डावपेचान्वर मात करीत तिथुन निसटले - आम्ही मराठीतील अगणित शब्दसंपदा विसरुन सरधोपट एकच एक शब्द सगळीकडे वापरतो - [वरील लेख अभिप्रेत नाही] - कारण हे फरकच आम्हाला शिकवले जात नाहीत)

सर्वांचे आभार... प्रतिक्रियामुळे लिखाणाचा उत्साह वाढतो... Happy पुढचे लिखाण लवकरच करतो.... Happy

जय शिवाजी , जय भवानी .
महाराजांना मानाचा मुजरा ,
मा.बो. आल्यापासुन महाराजाबद्दल लेख येण्याची वाट पाह्त होतो आणी तुम्ही ती सुरवात केली आहे या बद्दल पभ तुमचे अभिनंदन .

छान लिहीलयं..

पळाले नव्हे - पळणे व निसटणे यात फरक आहे - तसेच ती "सुटका" देखिल नव्हती - ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या व सहकार्‍यान्च्या अक्कलहुषारीने शत्रूच्या डावपेचान्वर मात करीत तिथुन निसटले>>>>>> प्रचंड अनुमोदन.

लिंबूटिंबू.... आपली प्रतिक्रिया अतिशय सकारात्मकरित्या घेतली आहे.. अधिक योग्य शब्दप्रयोग वापरण्याचा प्रयत्न करीन.... आभार...

भटक्या, धन्यवाद Happy
(पण तुमच्या लेखाला उद्देशून ते नव्हते, तर लेखाच्या निमित्ताने वाचताना जे जाणवले ते विचारार्थ मान्डले , इतकेच - योग्य शब्दप्रयोगाबाबत माझ्याकडून देखिल गफलती होऊ शकतात)

<<अशी अनेक सोनेरी पाने वाचण्यास मिळोत, हि ईच्छा....अनुमोदन !
राजांचे डावपेच आणि सगळीच कारकीर्द थक्क करणारी आहे.
खरंच श्रीमानयोगी परत वाचायला हवी आता.

>>>>>> ते नेमके कसे निसटले ह्याबाबाबत कुठलाच ठोस पुरावा उपलब्ध नाही. 'मिठाईचा पेटारा'ची कथा जी काल्पनिक आहे ती मुघली कागदपत्रांमधून घेतलेली आहे. <<<<<

कविराज भूषणाने या वर एक सुन्दर छंद रचला आहे, भूषण हे शिवाजी महाराजांचे राजकवि म्हणुन मान्यता पावले होते त्यामुळे महाराज भोयाचा वेष करुन मिठाईच्या पेटार्याबरोबर निघाले असे मानण्यास जागा आहे.

छंद आणि त्याचा अनुवाद -
आग्र्याहून निसटणे … ! … कविराज भूषण

चारि चारिचौकी जहाँ चकत्ताकी चहूं और, साँज अरु भोर लगी रही जिय लेवा की ।
कँधे धरी कांवर, चल्यो जब चाँवसे, एकलिए एक जात जात चले देवा की ।
भेंस को उतारी डार्यो डम्बर निवारी डार्यो, धर्यों भेंस और जब चल्यो साथ मेवा की ।
पौन हो की पंछी हो कि गुटखान कि गौन हो, देखो कौन भाँति गयो करामात सेवा की ॥
… कविराज भूषण
भाषांतर :
चारी बाजूला या चुग़ताई वंशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या प्राणघातक चौक्या दिवसरात्र लागलेल्या आहेत. कावड खांद्यावर घेऊन एक एक जण मोठ्या डौलाने, अत्यंत आरामात देवाकडे निघालेले आहेत. अशा वेळी त्यांनी (शिवाजी महाराजांनी ) आपला वेष उतरवला, अवडंबर (जे आजारपणाचे अवडंबर माजवलं होतं ते) टाळलं, वेष बदलला आणि मेवा मिठाईच्या त्या पेटार्याबरोबर ते निघाले आणि निसटले.
शिवाजी महाराजांची ही करामत बघून ( आग्र्याचे ) लोक थक्क झाले. त्यांना कळेना की ते (शिवाजी महाराज ) वार्याच्या झुळकीसारखे गेले की पक्ष्यासारखे उडून गेले की गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले. शिवरायांच्या या करामतीला काय म्हणावे हे कोणांस कळेनासे झाले !

"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे." हे मात्र अगदी खरे

'एक क्षणाच्या निष्काळजीपणाचं पर्यावसान शिवाजीच्या पलायनात झाल्यामुळे खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. मराठ्यांबरोबरच्या युद्धाला आता कधीही अंत नाही'
मस्त आहे पंच लाईन.. आणी अगदी बरोबर पण..

मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शिवाजी राजें बद्दल लिहीलेले पुस्तक (नाव नाही आठवत) वाचले. खुपच मार्मिक. वाचुन भारावुन जायला होत. खरं तर अशी पुस्तके ग्रुप मधे वाचावित आणि त्यावर चर्चा करावी. मी अशा गोष्टी खुप मिस करते. इथे हा छोटासा लेख वाचुन इतिहासाची दालने ऊघडल्या सारखे वाटते. जरा जास्तच लिहिले, पण असो.

मागच्याच महिन्यात आगर्‍याला जाउन आलो. आगरा- आग्रा नव्हे. आगर्‍याचा किला पाहिला. उत्सुकता होती ती महाराजान्ना जिथे ठेवले होते ती जागा पाहण्याची. पण दुर्दैवाने कोणीही ती दाखवू शकले नाही. गाईडलाही काही माहीत नव्हते. मुळात बर्‍याच लोकाना महाराजच माहीत नव्हते. आगर्‍याच्या किल्ल्याचा ७५ टक्के भाग आर्मीच्या ताब्यात आहे आणि त्यानी तो बण्दिस्त करून टाकला आहे. तिकडे जाताच येत नाही. २५ टक्के भाग पर्यटकाना खुला आहे. त्यात शाह्जहान इ. संबंधी महाल वगैरे आहेत. गाइडच्या मते बहुधा आर्मीच्या ताब्यातील भागात बर्‍याच कोठड्या आहेत तिथे असावे. मात्र आगरा किल्ल्याच्या दरवाज्याच्या बाहेर रस्त्याचा मोठा चौक आहे तिथे महाराजाण्चा अश्वारूढ पुतळा आहे.

गुटखा खाऊन एकदम गुप्त झाले

हे भाषांतर चुकीचे आहे याची मला १००% खात्री आहे. मुळात गुटखा हा शब्द व पदार्थ त्याकाळी नव्हतेच, शिवाय ते वाक्यही वेगळे वाटते.
दुर्दैवाने सगळीकडे कॉपी पेस्ट असल्याने जालावर सगळीकडे हाच अर्थ सापडला.

"बहुनी मे व्यतीनानी जन्मानी तव चार्जुना" चे कुणीतरी "माझा जन्म चार जून ला झाला आहे" असे केले होते.

शिवाजी महाराज आग्र्याहून कसे पसार झाले किंवा सुटले असावेत? याबाबत एक मिलिटरी कमांडर कसा विचार करतील? आणि त्यांच्यावर अशी वेळ आली तर ते कसे ते पार पाडतील? यावर एका पुस्तकाचा परिचय करून दिला तर?
कारण त्यातील कथनानुसार हे घडवणे शक्य आहे किंवा नाही यावर आपण विचार करावा...

मिठाईच्या पेटा-यातून सुटका ही अशक्य बाब वाटते. औरंगजेब इतका मूर्ख नसावा.
पेटा-यातून मिठाई यायला लावगल्यावर जाताना यात माणूस मावू शकेल ही शक्यता औरंगजेब सोडा, सैन्यातील कोणत्याही शिपायाच्या लक्षात आधी आली असेल.
कदाचित महाराज हाती लागल्याने त्यांचा घात करावा असे औरंगजेबाच्या सरदारांपैकी, महारा़जांनी प्रसाद दिलेल्यांपैकी टुमणे लावले असावे. अशा सर्वांना खूष करत मध्यममार्ग काढत औरंगजेबाने महाराजांना विश्वासात घेऊन त्यांना कैदेत टाकले असेल आणि पलायनाचा प्लॅन हा मिळून ठरवला असेल.
अन्यथा आग्र्यापासून ते इथवर महाराजांना चालत जाणे अशक्य होते असे वाटते. अर्थात ही कल्पना आहे. नेमके ठाऊक नाही.

Pages