पान्थस्थ

Submitted by जया एम on 12 August, 2010 - 02:53

दिवसाचे घटिकापात्र
सांजताच स्तब्ध बुडाले
डोहात डहुळले पाणी
धुंदीतच थवे उडाले

कैफात बरळला वारा
बहरून गजबजे राई
अन सुगंधभरली अफवा
गावातून पसरत जाई

दूरच्या प्रवासी वाटा
पांथस्थ चालुनी आला
ती घागर भरून वळता
रानात गवगवा झाला

शतकांची जुनी तहान
अर्ध्यावर राहून गेली
काकणे तिची वाढवली
अन घागर वाहून गेली

जे पापणीत विस्कटले
ते स्वप्न तिच्या गावाचे
जे ओंजळीतुनी सुटले
ते अर्घ्य तिच्या नावाचे

गुलमोहर: 

शतकांची जुनी तहान
अर्ध्यावर राहून गेली
काकणे तिची वाढवली
अन घागर वाहून गेली

काय सांगायचय नेमकं????
मुस्काटात मारताय की....!!
सलाम!!!!!!!!!!!!!!!!!!

जे पापणीत विस्कटले
ते स्वप्न तिच्या गावाचे
जे ओंजळीतुनी सुटले
ते अर्घ्य तिच्या नावाचे

जया जी खुप सुंदर

जया तुमच्या कविता चकवा असतात असे मी आधी लिहिले ते ती कळण्या न कळण्यात घुटमळते म्हणून.
पण ही कविता चकवा अशासाठी की पुन्हा पुन्हा वाचावीच लागतेय. आज जितक्या वेळा मायबोलीवर आलो त्या प्रत्येक वेळी वाचली.

शब्दांची गुढ नक्षी...दुखवणारी.. निसटणारी... तरीही हवीहवीशी वाटणारी..मास्टर क्राफ्ट..ग्रेट.!!

निव्वळ अप्रतिम! पहिल्यांदा वाचली तेंव्हा कवितेच्या बांधणीची, शब्दांची अशा बाह्य सौंदर्याची भुरळ पडली.
मग परत वाचली, परत परत वाचली. दरवेळी नव्यानेच कळतेय. आता आशयाची भूल पडलीये.
तुमच्या येथील सर्व कविता वाचल्या. सगळ्यांनाच वरचे लागु होईल.

>>दिवसाचे घटिकापात्र
>>सांजताच स्तब्ध बुडाले
>>डोहात डहुळले पाणी
>>धुंदीतच थवे उडाले

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

वंदना यांच्याशी सहमत!

कविता खूप खूप सौंदर्यवान व आशयगर्भ! आपण कवयित्री आहात! प्युअर कवयित्री!

मनापासून वाट पाहात आहे आपल्या पुढील रचनेची!

-'बेफिकीर'!

(सुगंधभरली अफवा - अप्रतिम ओळ)

Pages