श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 6 August, 2010 - 05:30

देवांग आणि वर्गातील जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांकडे असलेली एक गोष्ट गट्टू आधी स्वप्नातही पाहू शकत नव्हता. पण आता त्याला ते स्वप्न क्षणोक्षणी पडायला लागले. 'सायकल'!

फार फार मोठा विषय होता हा! सायकल! लग्नाआधी श्रीने एक सायकल विकत घेतलेली होती. तीच तो आजही वापरत होता. तेही ऑफीसला जायला नाहीच! कारण रोज एवढे सायकलींग केल्यावर घरातले बघणे शक्यच नव्हते. त्यात सायकल जास्त वापरल्यामुळे व जुनी होत असल्यामुळे तिचा खर्च वाढत होता. ऑइलिंग, हवा, पेडलच तुटणे, सीट बदलावे लागणे, कॅरियर गळून पडल्यासारखे होणे! एकंदरीत, पी.एम.टी.चा मासिक पास अधिक परवडण्यासारखा होता. मात्र, सकाळी खूप लवकर गट्टूला शाळेत सोडायच्या वेळेस सुटेबल बस नव्हती. तेवढे मात्र तो सायकलवरून सोडायचा. पण ही सायकल आता १६ वर्षे वयाची होती. जुनी, अंबर कंपनीची दणकट सायकल अजूनही निष्ठेने काम करत होती खरे! पण आता ती जुनाट आहे हे शेंबडे मूलसुद्धा सांगू शकत होते. कारण रस्त्यावर स्पीडकिंग, रेसर, बी.एस.आर, फिलिप्स अशा नव्या कोर्‍या सायकली धावत होत्या. ज्यांना दिवे असायचे कारणच नव्हते. 'सायकलला दिवा नसला तरी चालेल' हा अलिखित कायदा पुण्यात प्रस्थापित झाल्यानंतर, म्हणजेच कॉर्पोरेशनचे दिवे सर्वत्र आल्यानंतर आलेल्या सायकली होत्या त्या! श्रीच्या सायकलला मात्र अजूनही दिवा होता. तो लागायचा नाही. पण आहे हे दिसायचे. जी खरे तर आजच्या जमान्यात एक थट्टेची बाब झाली असती. त्यामुळे मोठाच संवाद झाला त्या दिवशी घरात!

गट्टू - सायकल कधी घ्यायची?
श्री - दहाव्वीत पहिला आलास की..
गट्टू - का?
श्री - ....
गट्टू - तेव्हा का? आत्ता का नाही?
श्री - आत्ता जर अडचण आहे.
गट्टू - नेहमीच अडचण असते.
श्री - काय करणार! श्रीनिवास पेंढारकर - एक गरीब मॅन.... हा हा हा हा!
गट्टू - समीरदादाने तर केव्हाच घेतलीय
श्री - मधूसूदन कर्वे! एक श्रीमंत मॅन...
गट्टू - तुम्ही सारखी चेष्टाच करता...
श्री - मग आता असे विषय काढल्यावर काय करणार?
गट्टू - चारशे रुपयांना असते.. बी.एस्.आर
श्री - चारशे??? अबबबब..!!
गट्टू - तुमचा पगार किती आहे?
श्री - ओन्ली टू थाऊझंड... पर मंथ..
गट्टू - मग?
श्री - मग?
गट्टू - सायकलला काय प्रॉब्लेम आहे?
श्री - अरे पण बसने येतंय ना जाता?
गट्टू - आठवीत सगळ्यांना सायकल घेतलीय..
श्री - असुदेत.. तुला पण घेणारच आहे मी... पण कॉलेजला जायला लागल्यावर..
गट्टू - मला नकोच आहे सायकल..
श्री - का?
गट्टू - कॉलेजला गेल्यावर कोण चालवणारे सायकल?
श्री - का?
गट्टू - तेव्हा लुना चालवतात..
श्री - मग एकदम लुनाच घेऊ..
गट्टू - (वेडावत) मग यॅकदम लुनाच घ्यॅऊ..
श्री - आं! असं मोठ्या माणसांना वेडावून बोलायचं नसतं!
गट्टू - तुम्हाला पण आहे की? सायकल..
श्री - बाबांना लागणारच! कामाला जायचं असतं!
गट्टू - तुम्ही कुठे नेता ऑफीसला?
श्री - परवडत नाही.. बसचा पास परवडतो.. स्वस्त असतो..
गट्टू - बसने गेलं की मुलं हसतात..
श्री - क्का?
गट्टू - मुली जातात बसने..
श्री - असं काही नाही काही?
गट्टू - घ्यायचीय की नाही सायकल?
श्री - घेऊ.. पण आत्ता नाही..
गट्टू - मग घेऊच नका..
श्री - हा हा हा हा! रुसला आमचा गट्टू..

श्री गट्टूचा गालगुच्चा घ्यायला प्रेमाने पुढे झाला अन गट्टूने त्याचा हात झिडकारला.

येईल डोके काही वेळाने ठिकाणावर असा विचार करून श्री स्वैपाकाला लागला.

पण तो अंदाज चुकीचा होता. कारण तीनच दिवसांनी निगडे काकूंनी रस्त्यातून गट्टूला शाळेत चालत जाताना पाहिले अन श्रीला सांगीतले.

श्री - गट्टू? तू आज चालत गेलास शाळेत?
गट्टू - ....
श्री - काय रे?
गट्टू - हं!
श्री - का?
गट्टू - असंच!
श्री - असंच म्हणजे? बसचा पास आहे ना? का संपलाय?
गट्टू - पाहिलं नाही... असेल..
श्री - अरे म्हणजे काय महेश? बघू पास??
गट्टू - अहो आहे हो..
श्री - मग? चालत का गेलास?
गट्टू - आज नाही.. मी काल अन परवाही चालतच गेलो अन चालतच आलो..
श्री - का????
गट्टू - व्यायाम होतो..
श्री - व्यायाम बियाम वाड्यात करत जा. चालत कसला जातोस.. एवढा पास काढलाय बसचा??
गट्टू - काय तो भिकारडा पास.. वीस रुपायचा...
श्री - गट्टू...

आज कित्येक महिन्यांनी प्रथमच श्री जोरात ओरडला.

श्री - उद्यापासून बसने जायचं! भलती खुळं चालणार नाहीत.
गट्टू - मी.. जा..णा..र.. ना... ही..
श्री - अरे का पण??
गट्टू - अन पुढच्या महिन्यापासून पास काढू नका.
श्री - गट्टू.. काय झालं ते सांग मला..

आत्ता कुठे श्रीच्या मनात ती शंका डोकावायला लागली. की हा सायकलमुळे रुसलेला असावा.

गट्टू - काहीही झालेलं नाहीये.. मला अभ्यास करूदेत..
श्री - ए.. अरे? इकडे बघ ना.. ए.. काय झालं काय?
गट्टू - गप्प बसा हो?
श्री - गट्टू.. मोठ्या माणसांना असं म्हणत नाहीत.. गप्प बसा वगैरे..
गट्टू - मला वाचूदेत हा धडा...
श्री - नाही.. आधी मला सांग.. काय झालं??
गट्टू - कुठे काय झालंय?
श्री - तुला.. तू.. सायकल नाही म्हणून चालत जातोयस ना?
गट्टू - .....
श्री - कोण हसतं तुला? बसने गेल्यावर? मी येऊन भेटतो त्या मुलांना..
गट्टू - काही नको..
श्री - शिक्षकांना भेटतो...कोण हसतं?
गट्टू - कोण्णीही ह स त ना ही..
श्री - हे बघ गट्टू.. आपले बाबा गरीब आहेत की नाही??
गट्टू - दुसरे काय आहात तुम्ही?? कायम गरीबच आहात पहिल्यापासून....
श्री - असं नाही म्हणायचं! मी किती राब राब राबतोय..
गट्टू - नका राबू..
श्री - हा हा! नका राबू म्हणजे काय? मग तुझं कोण करणार??
गट्टू - माझं काय करायचंय? एक डबा सकाळी अन रात्रीचं जेवण..
श्री - म्हणजे काय?
गट्टू - अन उठल्यावर चहा अन पोळी.. कालच..
श्री - अरे म्हणजे काय?? सगळे हेच खातात..
गट्टू - एक मुलगाही हे खात नाही.. काय काय आणतात डब्यात..
श्री - काय काय आणतात??
गट्टू - तुम्हाला कशाला सांगू??
श्री - सांग ना?
गट्टू - कित्येक जण तर डबाच आणत नाहीत.. रीगलमधे समोसा खातात... अन थ्रिल पितात..
श्री - थ्रिल म्हणजे?
गट्टू - ते.. कोल्डड्रिन्क..
श्री - बापरे.. अरे त्याने सर्दी होते..
गट्टू - एकाही मुलाला काहीही झालेले नाहीये त्या थ्रिलमुळे आजपर्यंत..
श्री - बाहेरचे खाऊ नये..
गट्टू - हे करू नये.. ते करू नये.. मग काय नुसतं भिकारड्यासारखं बसायचं??

पुन्हा श्री ओरडला. पुन्हा संवाद काही काळासाठी थांबला खरा, पण वादळापुर्वीची शांतता असावी तसा थांबला.

जेवताना गट्टू एक अक्षरही बोलला नाही. पानातील सगळे संपवून पुन्हा अभ्यासाला बसला.

श्रीने झोपायची तयारी करून गट्टूकडे पाहिले.

श्री - झोप आता.. उद्या कर अभ्यास..
गट्टू - .....
श्री - महेश.. झोप आता..
गट्टू - ....
श्री - अरे मी काय म्हणतोय??
गट्टू - ....
श्री - रागावलास ना?
गट्टू - .....
श्री - हे बघ? आपल्या पगारातील चारशे रुपये भाड्यात जातात. हजार रुपयांचा घरखर्च होतो. तीनशे रुपये वेगवेगळ्या हप्त्यात जातात. मी कधीकधी अ‍ॅडव्हान्स वगैरे घेतो ना.. त्याच्या हप्त्यात.. उरलेले तीनशे आपण बचतीत टाकतो.. आता तुला कॉलेजची फी भरायला लागणार.. पुढे काय काय नवीन गोष्टी करायला लागणार.. मग साठवायला हवेत की नाही पैसे? आता सांग बरं! सायकल कशी घ्यायची?? चारशे रुपये मी आत्ता खर्च केले तर ते भरून कसे काढायचे??
गट्टू - मी म्हणतोय का पण? सायकल घ्या म्हणून??
श्री - गट्टू... तुला अजून सायकल नीट येते तरी का?
गट्टू - मला येतही नाही अन नकोही आहे सायकल..
श्री - सारखा काय बाबांवर रागवतोस??

आता मात्र गट्टू उसळून बोलला.

"काय रागवतोस म्हणजे काय? काय करतो आपण? महिनाअखेरीला युनिफॉर्म नसला तरी चालेल असा नियम आहे.. सगळेजण वेगवेगळे कपडे घालून येतात.. मीच आपला पांढरा शर्ट, खाकी चड्डी, तुम्हाला काय माहितीय?? सगळे माझ्याकडे बघतात, विचारतात! अरे? आजही युनिफॉर्मच घातलास? मग मी म्हणतो.. अरे? माझ्या लक्षातच नाही राहिलं! तो एक तारामावशीने आणलेला शर्ट आपला दरवेळेस घालायचा.. मुलीसुद्धा बघून हसतात.. काय परवडतं तुम्हाला?? बर्थ डे असतो सगळ्यांचा.. मला विद्याधरने त्याच्या बर्थडेला बोलावलं घरी तर तुम्ही नाही म्हणालात.. मी कुणालाच बोलवत नाही आपल्या बर्थडे ला.. माझा कधी बर्थडेच होत नाही.. परवा तर समीरदादाचासुद्धा केला मधूकाकाने.. तुम्ही कधी केलात माझा बर्थडे?? किती भेटी मिळतात.. मग आपण केक कापायचा... मग आपणही त्यांना काहीतरी द्यायचं.. सगळे टाळ्या वाजवतात.. कधी केलं आपण हे?? कध्धीच नाही.. परवा सगळे मी सॉक्स न घालता बूट घालून गेलो म्हणून हसले.. सांगीतलं तरी का मी हे तुम्हाला?? कारण सॉक्स फाटले आहेत.. ते घातले तरी हसतात.. कशाला मला असल्या मोठ्या शाळेत घालता?? म्हणून मी चपला घालून जातो.. आमच्या वर्गातली मेधा अन आरती माझ्याच बसने यायच्या... कधी कधी मी त्यांच्या समोर बसलो की त्या एकमेकींकडे बघून हसत काहीतरी बोलायच्या.. म्हणून मी देवांगला विचारलं तर तो म्हणाला आता तू सायकलने यायला पाहिजेस.. पण तुम्ही कसली सायकल घेणार मला?? तुम्ही तर स्वतःच बसने जाता..हे दप्तर चवथीतलं आहे.. चवथीतलं.. चार वर्षं झाली.. सगळीकडून फाटलंय.. तुमची जुनी ऑफीसची बॅग मी वापरू का म्हणालो तर नाही म्हणालात.. पिक्चर बघायचा नाही, हॉटेलमधे जायचं नाही, सर्कस बघायची नाही, मित्रांच्या घरी जायचं नाही, वाढदिवस नाही, बागेत नाही जायचं! मग तुम्हाला काय करावं लागतं माझ???? ...."

.....

......

"इतक्या उद्धट मुलाला जन्माला घालावं लागतं"

मागून आलेला आवाज कुणाचा आहे हे वळून पाहण्याचीही गट्टूला गरज नव्हती. श्रीला तर दारात पवार मावशी सरळ दिसतच होत्या. आधीच मन विदीर्ण झालेला श्री! त्यात मावशींनी हे वाक्य उच्चारल्यावर त्याने अत्यंत खजील होत खाली मान घातली. कारण मावशींनी सगळं ऐकलेलं आहे हाही एक अपमानच होता..

श्री - असूदेत मावशी.. मी समजावेन त्याला..
गट्टू - आता काय समजायचं राहिलंय???
मावशी - गट्ट्या.. लाज वाटत नाही का वडिलांना असं बोलताना??

आणि मग मागे वळून गट्टूने ते वाक्य उच्चारले.. जे ऐकून श्रीच्या घराच्या भिंतीच नाहीत तर भिंतीवरचा रमाचा फोटोही हेलावला...

गट्टू - तू का मधे पडतीयस?? तुझा काय संबंध??? मी अन बाबा बघून घेऊ...

फ्रोझन! कंप्लीटली फ्रोझन! श्री अन मावशी त्या उद्धटपणाच्या हद्दीकडे अक्षरशः पाहातच राहिलेले होते. गट्टूच्या एक कानाखाली आवाज काढावा हेही त्यांच्या डोक्यात आले नाही. पण एका व्यक्तीच्या आले... ती व्यक्ती खालून तीरासारखी धावत वर आली.. प्रमिला.. प्रमिला काकू..

प्रमिला - काय म्हणालास आजीला??
गट्टू - ....

काहीही झाले तरी एवढी शतृत्वे घेणे शक्यच नव्हते. पवार आजी आपल्यासाठी काय आहे याची गट्टूला पूर्ण जाण होती. आधी तिला दुखवलेले होतेच. त्याच्या आधी बाबांना दुखवले होते. आता प्रमिलाकाकूला दारात पाहून तिच्यासमोर बोलणे त्याला शक्य होणार नव्हते. आई नसली तरीही 'साधारणपणे' आई कशी असू शकेल याचे जितेजागते उदाहरण आजवर त्याला प्रमिलाकाकूत दिसायचे.. तिला पाहून मात्र तो भयानक वरमला.. प्रमिलाचा स्वभाव मावशींसारखा आततायीपणे ओरडून बोलत बसण्याचा नव्हता.. त्यामुळे ती क्षणात गप्प झाली असली तरी तिच्या डोळ्यांमधील भाव एक दोनदा पाहून गट्टूला आपले प्रचंड चुकले याची जाणिव झाली.

वयाने लहान असल्यामुळे व जवळपास पूर्णपणे त्या तीन व्यक्तींवर अवलंबून असल्यामुळे असहाय्य झालेला गट्टू आता रडू लागला.

श्रीने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आणि दास्ताने वाड्याला आणखीन एक धक्का बसला. चक्क मावशींनीही आत येऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला. या माऊलीत आमुलाग्र बदल करण्यास लहानपणापासून गट्टू जबाबदार होता हेही तितकेच मोठे सत्य होते.

श्री - गट्टू? अरे वेडायस का? रडतोस कसला? परवा वाढदिवस आहे ना तुझा? मग? केवढी पार्टी करायचीय आपल्याला! वाड्यातले सगळे, तुझ्या वर्गातले सगळे! जवळजवळ सत्तर जण होतील! काय? मग? रडतोस कसला? आत्तापासूनच तयारीला लागायला हवं! आता आजची अन उद्याची झोप झाली कॅन्सल! चला चला, यादी करायला हवी, कुणाकुणाला बोलवायचं त्याची!

मावशी - आत्तापासून? तुम्ही आत्तापासून तयारी करताय? मी काल भडंग आणले सुद्धा! बाकरवडी आज आणली. आता आणखीन एक तिखट पदार्थ, एक गोड पदार्थ आणि केक एवढं उद्या केलं की झालं! अन तुमच्या आत्ताशिक याद्या सुरू होतायत? काय हे श्री!

दोन्ही डोळ्यातील पाण्याच्या धारा तशाच ठेवत आळीपाळीने गट्टू दोघांकडे पाहात होता. तो चिडलेला असल्याने या क्षणी त्याला 'काही नको पार्टी बिर्टी' असे म्हणायचे होते. पण आजवर आजी इतक्या सरळपणे अन इतक्या शांत आवाजात चार सलग वाक्ये बोललेली नव्हती. तिच्यातील हा बदल केवळ आपल्यामुळे झालेला आहे हे पाहून गट्टूला फार फार अपराधी वाटले. आणखीनच पाणी आले त्याच्या डोळ्यांत! त्याने त्याच्या शेजारी बसलेल्या आजीच्या मांडीत डोके खुपसले. हमसून हमसून रडत गट्टू म्हणाला..

गट्टू - आज्जी.. माझी चूक झाली..

दारातूनच नेहमिच्या मिश्कील आवाजात प्रमिलाकाकू ओरडली.

प्रमिला - अहो शीलावहिनी नैना जागीय का हो? तिला म्हणाव ये वर पटकन, आमचा गट्टू रडताना कसा दिसतो ते बघायला..

निसर्गात किती वैविध्यपूर्ण रुपे असतात, किती विरोधाभास असतो त्याचे प्रत्यंतर गट्टूच्या चेहर्‍याने दिले. प्रचंड रडत प्रमिलाकाकूकडे बघत असतानाच तो हसला. अगदी तोंडभर स्माईल दिले त्याने!

प्रमिला - नका हो पाठवू तिला... आता हसायला लागलाय..

गट्टू पटकन दारात गेला अन प्रमिलाकाकूच्या डाव्या पायावर लाडाने दोन, तीन बुक्क्या मारल्या.

प्रमिलाकाकू - बर! आता मला सांग, तुला काय आणायचं वाढदिवसाला?? एक डझन रुमाल आणू?
गट्टू - रुमाल?
प्रमिला - मग? आता एवढा रडणार मुलींसारखा म्हणजे रुमाल लागणारच की?
गट्टू - काकू..

हसत हसत प्रमिला खाली निघून गेली. मात्र! जाताना 'येते' अशा अर्थाची खूण मानेनेच करत श्रीकडे बघायला मात्र ती विसरली नाही. मावशी उठल्या. उठताना म्हणाल्या...

मावशी - श्री! गोड काय आणायचं ते सांगून ठेव! अन त्या गोडबोलीण बाईला उद्या सकाळीच उपम्याची ऑर्डर देऊन ठेव! काय?

श्रीने मान डोलावली. मावशी निघून गेल्या. गट्टू अपराधी नजरेने आत आला. श्रीकडे त्याला बघण्याची लाज वाटत होती.

श्रीने त्याचा तो प्रश्न सोडवला.

श्री - तुला आत्ता फारशी झोप आली नसली तर... वर्गातल्या मित्रांची नावे लिहून यादी करतोस का? मी वाड्यातल्यांची करतो ... काय?

मग काय विचारता? अगदी कोरा करकरीत कागद घेऊन गट्टूमहाराजांनी वर अगदी 'श्री' वगैरे लिहून नावे लिहायला सुरुवात केली.

खरे तर ही पार्टी गेल्या पाच मिनिटांतच ठरलेली होती. मावशींनी काहीही भडंग वगैरे आणलेले नव्हते. पण गट्टूमहाराजांचा मूड परत यावा म्हणून त्या खोटे बोलल्या. आणि त्याचा श्रीलाही धक्काच बसला होता. उद्याच्या उद्या परवाची रजा टाकून कंपनीतल्याही सगळ्यांना या निमित्ताने एकदा बोलवून 'टाकावे' म्हणजे मग एकात एक होईल असा विचार त्याने केला.

आणि बरोब्बर दहा ते बारा मिनिटांनी गट्टूने ती यादी सादर केली. २४? २४ मुले? बापरे!

श्री - येणारेत का एवढे सगळे?
गट्टू - सगळे येतात, परवाच विद्याधरकडे पण सगळे गेलेवते..
श्री - बर! मग आता उद्याच्या उद्याच सगळ्यांना सांगून ठेव हं?

गट्टूने मान डोलावली.

आज रात्री किती शांत शांत झोप लागली गट्टूला.. पण.. श्रीला नाही लागली. त्याला बरीच मोठी जबाबदारी पार पाडायची होती उद्या..

सकाळी उठून श्री कंपनीत गेला अन सरळ दोन दिवसांचा रजेचा अर्ज टाकून परत घरी आला. सप्रे हल्ली फारसे चिडायचे नाहीत. तसेही, आता कामाचे बस्तान इतके व्यवस्थित बसलेले होते की एखादा माणूस नसला तर काम अडायचेच नाही.

बाबा परत घरी आलेले पाहून शाळेत जायची तयारी करत असलेला गट्टू हरखलाच! बाबा तयारीसाठी आले आहेत आणि त्याचा अर्थ जंगी पार्टी होणार हे निश्चीत, एवढेच त्याच्या मनात होते. गट्टू शाळेला निघून गेला. मावशींनी आधीच उल्लेख केल्यामुळे श्रीला भडंग अन बाकरवडी आणावीच लागली. वाड्यातील चाळीस अन शाळेतील चोवीस! प्लस ऑफीसमधले सात! झाले की एक्काहत्तर! एकशे साठ बाकरवड्या, काही किलो भडंग आणि गोडबोले बाईंना ऐंशी उपम्याच्या डिशेसची ऑर्डर प्लस वाढदिवसाला प्रसादला घेऊन यायचे आमंत्रण!

हे सगळे दुपारी बारापर्यंत चाललेले असतानाच...

संस्कार वर्गाच्या साने आजी गेल्याची बातमी आली. तिकडे धावला श्री! काय तो वाडा! काय तिथे मुलांनी नुसता गोंधळ माजवलेला असायचा.. येथेच गट्टूला पहिल्या दिवशी सोडताना कसेसेच झाले होते. आणि तेव्हा साने आजींनी किती आधार दिलेला होता...

साने आजी गेल्या.. खरे तर त्यांना आमंत्रण देणार होता श्री! पण त्यांना अधिक महत्वाचे आमंत्रण आले..

शनिवार पेठेतील एक प्रेमळ अध्याय संपला होता. त्याचे सावट श्रीच्या मनावर होतेच! पण त्याहून टेन्शन होते उद्याच्या पार्टीचे! मग स्वारी कॅम्पमधे गेली सायकलवरून! नाझ बेकरीतून एक मोठा केक विकत घेतला दुपारीच! पार्टी उद्या! अन केक आजच आणला म्हणून मावशी भडकल्या. पण केक टिकतो हे शीलावहिनींनी सांगीतल्यावर त्या 'केक आज आणणे' या विषयाऐवजी 'शीला राजाराम शिंदे' या विषयावर भडकल्या. त्यांचे ते मुलायम, हळुवार उद्गार ऐकताना शीला वहिनी मुळापासून हादरलेल्या होत्या तर नैना खदाखदा हसत होती. शीलावहिनींनी नैनाच्या पाठीत धपाटा घातला. नैनाची शाळा सकाळची असायची! मुलींचे भावेस्कूल! पवार मावशी हे प्रकरण एखाद दिवशी आपल्यावरही उद्भवेल याची त्या शीलावहिनींना कल्पनाच नव्हती. पण ते झाले होते आज!

संध्याकाळी गट्टू आला तर संजय दादा, किरण दादा आणि वैशालीताई हे तिघे वाड्यातील चौकात चक्क साफसफाई करून उद्याच्या पार्टीसाठी एक जागा मोकळी करत होते. त्यानंतर त्या चौघांमधे एक गहन चर्चा झाली. सतरंज्या कशा घालायच्या, ऑफीसमधेल महत्वाचे, ते कुठे बसवायचे? पोरांना काय इकडेही चालेल वगैरे! दुपारीच आणलेला केक आजीच्या घरात आहे याची गट्टूला सूतराम कल्पना नव्हती. इतरही पदार्थ आजीकडेच होते. संध्याकाळी श्री चितळ्यांचे मोतीचुराचे लाडू घेऊन आला. पटकन गट्टू मदतीला उठला. त्याने लाडूंची एक पिशवी आजीच्या घरात नेऊन ठेवली.

मावशी - ह्यांचा वाढदिवस अन आमच्याकडे ऊठबस! काय चाललंय काय? धर्मशाळाय का ही? आं? हे काय आणलंय? माझ्या घरात मुंग्या झाल्या तर एक एक मुंग उचलून तिकडे आणून ठेवीन. चितळ्यांचे लाडू? त्या भटुरड्याचे? तोंडावरची माशी हालत नाही त्याच्या! माझं घर म्हणजे भाऊचा धक्काय का? काहीही आणून ठेवायला.

गट्टू - आजी? भडंग कुठेयत?

गट्टूला आजीच्या मूडशी काहीही घेणेदेणे नव्हते.

मावशी - भडंग गेले मक्केला.. नमाझ पढायला.. म्हणे भडंग कुठेयत.. सगळं इथे ठेवल्यावर मी काय चौकात कथ्थक करू का?

आनखीन एक नको तो प्रकार झाला. नेमके तेवढ्यात तिथे मानेकाका आले.

माने - अरे व्वा? झाली वाटतं सगळी तयारी?
मावशी - ए मान्या.. बोक्यासारखा फिरू नकोस एकट्या बाईच्या घरावरून.. यांना नाही नीती अन मला वाटते भीती... भावाने पैसे काय दिले चिमूटभर! हे लागले उडायला सातव्या अस्मानात! तयारीचं तुलारे काय कौतूक? तुझ्या घरात कर ही तयारी सगळी! म्हणजे समजेल! मी काय मक्ता घेतलाय का पेंढारकरांच्या कार्यात राबायचा..

आणखीन एक नको तो प्रकार तेव्हाच घडला नेमका! घाटेकाका आले.

घाटे - कार्यात राबायचा? माझ्या मुलीच्या लग्नात आलात.. तर यांनी वरपित्याला वरपक्षातच जाऊन काय ऐकवलं माहितीय का माने? म्हणे मुलगा चढला बोहल्यावर अन हे नटले पोचल्यावर! आता मला सांगा.. या बाईला कुठे नेण्यात काहि अर्थंय का??

उद्या गट्टूचा वाढदिवस आहे हे संपूर्णपणे विसरले जाईल असा तमाशा केला मावशींनी..

मावशी - ए घाट्या.. घातली जन्माला मुलगी अन उजवली कुठेही.. असला तुझा व्यवसाय.. कसला थेरडा बघितलास त्या पोरीला.. थोबाडं काय होती एकेकाची.. मला म्हणाले.. 'या की वरपक्षात'.. कशाला? वरपक्षात काय काजूची उसळ होती? गेले तर ते थेरडं अशा नजरेने बघत होतं माझ्याकडे.. बाईबाई.. असली वेळ कुणावर येऊ नये..

माने - हे मात्र खरंय.. तुमच्याकडे बघायची वे...

मावशी - ....अरे गप्प? तुझ्या खोलीला गोठ्यासारखा वास येतो ते बघ आधी! रेडकासारखा विड्या फुंकत एकट्या बाईच्या घरावरून फिरतोस ते? लाजा वाटत नाहीत? हा घाटे.. अन ती त्याची घाटीणबाई.. मी म्हंटलं.. एवढी मी पवार मावशीय वाड्याची... एक साडी तर द्या मला? तर ती म्हणते कशी.. थोडक्यात केलंय यावेळेस सगळं! यावेळेस म्हणजे काय रे? त्याच मुलीचं पुन्हा दोन चारदा लग्न लावणार होतास का माठ्या? विहीरीत ढकलनार होते तुझ्या व्याह्याला... पण तुझी कीव आली.. म्हंटलं घुशीला माणसाचं स्थळ मिळालंय नशीबाने.. आपण कशाला घालवा.. ए माने..तुला या तयारीचं कौतूक असेल तर उचल हे डबे.. चल चल उचल.. अन ने तुझ्या तबेल्यात.. म्हणे 'अरे वॉ.. झॉली कॉ तयॉरी??' आं? तू उघडाबंब अन लुंगी गुडघ्यावर घेऊन फिरणार वाडाभर अन उंडारत चौकश्या करणार होय रे? अन मी मर मर मरायचं! तुझा बाप विषुववृत्तावर राहायचा का रे? आयुष्यभर उघडं फिरायला? आं? का गांधर्व योनीत आजा जन्माला आला? अजून उभाच तू?? चल... चल माझ्या दारावरून पुढे हो..

मावशींनी तमाशा केला नाही असे एक कार्य झालेले नव्हते दास्ताने वाड्यात.. पण पोरे आरामात खेळत होती. इतकेच काय तर घाटे अन माने सोडले तर सगळे आपापली कामे शांतपणे करत होते.

मावशी - ती हडळ कुठंय?

माने - माझ्या माहितीत वाड्यात चार हडळी आहेत.. त्यातली कुठली?

मावशी - का? तुझी आई मेली?
माने - केव्हाच.. तुला कोणती हडळ पाहिजे?
मावशी - तुला? मला 'तुला' म्हणतोस??
माने - अगदी सहज..
मावशी - चालता हो... पुन्हा हे घुबडाचं तोंड आणू नकोस माझ्यासमोर.. ए घाटे.. त्या शीलाच्या भुताला बोलव..

प्रत्येक जिवंत माणूस हा प्रत्यक्षात जिवंत नसून ते त्या माणसाचे भूत आहे असा एक सिद्धांत मावशींनी स्वतःपुरता स्वीकारला होता.

शीलाला कुणी बोलवायची गरजच नव्हती. कानठळ्या बसवणार्‍या आवाजात आपला 'भूत' असा उल्लेख ऐकल्यावर तिने आधारासाठी नवर्‍याकडे पाहिले. राजाराम शिंदे.. त्यांनी हात जोडले व 'नाही नाही' अशा अर्थी मान हलवल्यावर शीला शिंदे स्वतःच्या तुटपुंज्या मानसिक शक्तीवर पवार मावशी या रसायनाला तोंड द्यायला धावत वर आली.

शीला - काय.. झालं??
मावशी - अब्रू गेलीय अब्रू माझी..

शीलाने दचकून घाटे अन मान्यांकडे पाहिले.

घाटे - अहो.. बघता काय? माझी हिम्मत आहे का?
माने - ए शीले.. चिमुरडे.. माझ्याकडे काय बघतेस??

मावशी - तुझ्या त्या नैनटलीने हे तांदुळ ठेवलेत सांडून.. ते उचल अन त्या डब्यात भर.. नाहीतर तुझ्या घरात पुढच्या एकवीस पिढ्या भात शिजू द्यायचे नाही मी... भूत होईन भूत..

ही भाषा काय, आपण या बाईचे का ऐकायचे.. असला कसलाही विचार न करता शीलाने ते तांदूळ भरले अन मुकाट्याने निघून गेली.

माने - हे काय? फक्त भडंग अन बाकरवड्या? अन लाडू? श्री.. असला फालतू मेन्यू असला तर हा माने हा दास्ताने वाडा..

गट्टू तिथे उभा होता..

गट्टू - पेटवून देईन..
मावशी - पेटवा.. पेटवा.. यांना स्वतः विझता येत नाही अन दुसर्‍यालाही विझवता येत नाही..

या विधानावर खाली प्रमिला खदाखदा हसल्याचा आवाज आला तसे माने लाजून स्वतःच्या खोलीकडे पळाले. प्रमिला हसली म्हणून वर श्रीपण हसला.

त्यामुळे गट्टूही हसला. गट्टू हसतोय हे पाहून पुन्हा दोघे हासले.

आणि दुसर्‍या दिवशी एकदाची वाढदिवसाची संध्याकाळ उजाडली. जो तो आपल्याच घरातले कार्य असल्यासारखे काही ना काही करत होता. नैना सारखी 'हॅपी बर्थ डे, हॅपी बर्थ डे' करत गट्टूभोवती फिरत होती. त्यामुळे राजश्रीताई तिला 'केलंस की एकदा, सतरा वेळा तेच काय' असे झापत होती. श्री घरीच होता. त्याने गट्टूला काल आणलेला एक नवीन शर्ट घालायला दिला होता. सायकल नाही तर नाही, निदान बाबांनी आपला बर्थ डे तर केला या खुषीत गट्टू आनंदात वावरत होता.

पाच वाजता पहिल्यांदा सुशील अन समीर आले. मग मिहीर, मग सुदर्शन, मग गिरीश, त्यानंतर देवांग!

वर्गातील मित्र वाड्यात आल्यावर अत्यंत खुष झालेल्या गट्टूने प्रत्येकाची भेट स्वीकारली. कुणी कंपॉस बॉक्स, तर कुणी मराठीचे गाईड! कुणी स्टॅम्पबूक, तर कुणी पेनचा सेट! एकेक वस्तू हरखून बघत असतानाच राजश्रीताईने त्याला बेल्ट दिला. शीलाकाकूने नैनाच्या हातातून एक पाऊच दिले. व्वा! काय कळी खुलली साहेबांची!

आता खेळायला सुरुवात झाली. वर्गातील जवळपास वीस मुले आलेली असल्याने त्यांची संख्या खूपच वाढली आणि त्यामुळे नेहमी राजश्रीताई अन नैनाबरोबर खेळणारा गट्टू आता वर्गमित्रांबरोबर खेळू लागला. राजश्रीताईला गणेशची काळजी घ्यायची असल्याने ती जरा तरी बिझी होती.. पण नैना? नैना मात्र हिरमुसली. महेश आपल्याकडे लक्षच देत नाही यामुळे ती नाराज झाली होती. नुसती महेशकडे टकमक बघत बसली होती. तो हसला की हसत होती. धावला की त्याचा नजरेने पाठलाग करत होती.

आणि मग केक मावशींच्या घरून आणण्यात आला. ऑफीसमधून फक्त कोपरकर अन स्वातीच आलेले होते. त्यांनी सर्वांनी मिळून केलेल्या कॉन्ट्रिब्युशनमधून एक शर्ट अन एक पँटचे कापड आणलेले होते.

केक कापताना ...

'हॅपी बर्थ डे टू यू' च्या घोषणेने दास्ताने वाडा दुमदुमला! आणि गट्टूच्या मनात आनंदाचे अगणित समुद्र निर्माण झाले. त्याने अत्यंत कृतज्ञ नजरेने अन प्रेमातिरेकाने बाबांकडे बघितले.

आता उरलेल्यांनी, नवीन आलेल्यांनी आपापल्या गिफ्ट्स दिल्या. आणि मग! सरप्राईझ, सरप्राईझ, सरप्राईझ!

श्रीनिवास पेंढारकर - एक बाप

यांनी कित्तीतरी नवी कोरी दिसणारी सायकल.. काळ्या रंगाची.. आपले सुपूत्र महेश उर्फ गट्टू यांच्यासमोर सादर केली..

अन वाड्याने टाळ्यांचा कडकडाट करतानाच...

मधूकाका आणि प्रमिलाकाकूने...

ओह! इट वॉज.. अ बिगर.... येस.. अ मच बिगर सरप्राईझ...

निळी चकचकीत.. बी.एस.आर... व्वा! ...

फरक! दोन सायकलींमधला फरक सहज लक्षात येण्यासारखा होता..

एक म्हणजे.. श्रीने दिलेली सायकल लेडीज होती.. गट्टू अजून लहान आहे म्हणून मुद्दाम आणलेली..

प्रमिलाकाकूने दिलेली सायकल नवी कोरी होती हे कुणीही सांगीतले असते..

आणि मुख्य म्हणजे.. ती जेंट्स सायकल होती..

सगळ्यांसमोरच गट्टूने विचारले..

गट्टू - ही? .. ही कुठली सायकल बाबा??
श्री - ही.. अशीच एक आपली... तुला म्हणून ... आणली..
गट्टू - लेडीज??

वर्गातील काही मुले हसली. त्यात देवांगचा आवाज सगळ्यात मोठा होता. मात्र, वाड्यातील बुजुर्गांनीच फक्त श्रीने 'फटकन' खाली घातलेली मान पाहिली होती...

गट्टू - मला नको ही.. काकू.. मी तू दिलेली सायकलच वापरतो.. काय बाबा??

'काय बाबा' हा प्रश्न जरी गट्टूने विचारलेला असला तरी 'काय बाबा' वर बाबा काय म्हणतायत हे त्याने पाहिलेही नव्हते. जशी होती तशीच श्रीने दिलेली सायकल त्याने हातातून सोडली होती अन ती पडल्यावर मधूसूदन ती उचलायला धावला होता. आणि त्याचक्षणी गट्टूने मधूसूदनने आणलेली नवी कोरी सायकल हातात घेऊन त्यावर पेडल मारत तो बसलाही होता.

कसनुसं हसत श्रीने मधूकडून सायकल घेतली अन वाड्याच्या प्रवेशद्वारातील सायकल स्टॅम्डमधे लावून टाकली.

आता सगळेच डिश खात होते. नुसता गोंधळ चालला होता. सव्वा आठ वाजता सगळी मुले अन ऑफीसमधले घरी निघाले. सर्वांना निरोप दिल्यावर श्री अन गट्टू पुन्हा दिंडी दरवाजातून आत आले. प्रमिला, नंदा अन शीला आवराआवरी करत होत्या. आता फक्त वाड्यातील मोठ्या लोकांचे खाणे राहिले होते. आता समीरदादा, राजश्रीताई, नैना आणि गट्टू नवीन सायकल फिरवायला लागले. श्री खूप म्हणजे खूपच निराश होऊन कसेबसे दोन घास ढकलत होता.

मधेच येऊन गट्टूने विचारले..

गट्टू - बाबा? ही सायकल मला ना? नवी?
श्री - हं!
गट्टू - आणि.. मग तुमची सायकल आहेच की.. मग ती तुम्ही आणलेली राजश्रीताई आणि नैनाला खेळूदेत?? नाहीतरी जुनीच आहे तशी..
श्री - चालेल..
गट्टू - तुमची तुम्हाला आहेच... क्काय??
श्री - हं!

सगळे ऐकत होते. फक्त मावशींनी मान खाली घालत खात असलेल्या श्रीच्या पापण्या किंचित ओल्या झाल्याचे बघितले.

मावशी - काय रे?? .. श्री? काय झाले??

आता सगळ्यांचेच लक्ष श्रीकडे गेले.. सगळेच चपापले..

प्रमिला - भावजी.. आम्हाला.. आम्हाला तुम्हाला.. दुखवायचं नव्हतं हं? नवी सायकल घेऊन.. चुकून झालं!

श्री - छे छे! काहीतरी काय! मीही अ‍ॅक्च्युअली आणणारच होतो नवीन.. पण म्हंटलं आधी जुन्याची सवय होऊदेत.. म्हणजे पडली बिडली तरी चालते..

काही क्षण तसेच गेले.. मावशी मात्र समाधानी झालेल्या नव्हत्या.. प्रकरण नक्कीच काहीतरी वेगळं होतं!

मावशी - श्री? ही.. ही सायकल तू कुठून आणलीस??
श्री - सिंघ सायकल..
मावशी - तिथे .. जुन्या पण मिळतात..
श्री - हो... डागडूजी केलेल्या.. का?
मावशी - केवढ्याला आहे ही?
श्री - तीनशे.. का?
मावशी - मग..
श्री - ???
मावशी - मग.. तुझी सायकल कुठंय??
श्री - ..
मावशी - अं?
श्री - तीच विकली नं! ती पन्नासला गेली.. कंपनीतून अडीचशे घेतले.. माझ्याकडे होते ते सगळे पार्टीसाठी लागले.. आता अडीचशे फेडायचेत... महिना पन्नास...

टचकन पाणीच आलं प्रमिलाच्या डोळ्यांत! आपण किती सहज साडे चारशेची सायकल आणली यांच्या मुलाला! आणि यांनी हप्त्यांवर घेतलेली सायकल यांच्या मुलाला आवडत नाही कारण त्याला आपण आणलेली सायकल उपलब्ध आहे म्हणून! आणि आपल्या नवर्‍याला बारा हजारांचा प्रॉब्लेम आला होता तेव्हा हा माणूस सरळ स्वतःजवळचे साठवलेले अडीच हजार द्यायला निघाला होता.. काय वाडा आहे हा.. एखादीलाच लाखात अशा वाड्यात सासर मिळेल...

मानेकाका - पार्टीसाठी गेले म्हणजे? तू कोण एकटा पार्टी देणार रे नालायका? आमचा कुणी नाही का गट्टू? हे बघ? मी हे खिशात केव्हाचेच दिडशे रुपये ठेवलेले होते. आम्ही सगळ्यानीच ठेवलेले होते. काय गं ए भवाने? तुला खिसा नाही म्हणून काय झालं? गट्टू तुझा नातू नाही का?
मावशी - मग भवाने म्हणायचं काय कारण आहे? मी केव्हाच शंभर काढून ठेवलेत बाजूला..
श्री - छे छे! अहो काहीतरी काय बोलताय??
मधू - श्री.. अरे.. मला सांगायचं नाहीस का तू?? हे काय हे??
श्री - अरे त्यात काय पिटू?

पिटू हाक मारल्यावर घाटेकाका, घाटेकाकू, निगडेकाकू, मानेकाका अन मावशी! सगळ्यांनाच श्री अन मधू लहान असतानाचे दिवस आठवले. प्रमिलालाही गलबलून आलं! शीला वहिनी अन राजाराम शिंद्यांना कर्व्यांना पिटूही म्हणतात हे आजच कळलं होतं!

मानेकाका - हे वाढदिवसांचं फारच झालंय पण हल्ली!

सगळेच काहीबाही बोलत असताना राजश्रीताई तीव्र वेगात धावत आत आली..

श्रीकडे पाहात म्हणाली..

राजश्री - काका.. गट्टू अन नैना डबलसीट जात होते.. पडले.. गट्टू खूप किंचाळून रडतोय..

पार त्या तिकडे ओंकारेश्वरापाशी धावत गेल्यावर ते दृष्य दिसलं! नैना पुढे बसलेली होती अन पडताना ती गट्टूच्या उजव्या गुडघ्यावरच पडल्यामुळे गट्टू जीवाच्या आकांताने ओरडत होता अन विशेष काहीही झालेले नसले तरीही नैना ते दृष्य बघून भीतीने रडत होती. नशीब, कुणालाच रक्त आलेले नव्हते.

"या वयात सायकल चालवून वर डबलसीट घेतात का???"

श्रीने अत्यंत रागात उच्चारलेले वाक्य कुणी ऐकलेच नव्हते. कारण त्याचवेळेस श्री कसाबसा गट्टूला उचलून सदाशिवपेठेकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या दवाखान्यात धावत होता..

ही कशाची नांदी आहे हे धावणार्‍या एकाही माणसाला माहीत नसले तरीही....

मागे मागे पडणारा ओंकारेश्वर ते बघून मनातल्या मनात हसत होता..

'महेश पेंढारकर आणि नैना शिंदे.. यांची कहाणी आज सुरू होत आहे.. हे त्याला माहीत होते'

गुलमोहर: 

मस्तच.......... छान जमतेय हो कथा बेफिकिर राव........... मी ठरवल होत १ला नंबर लागेपर्यंत प्रतिसाद नही देणार........... Happy Happy मस्त च्च्च्च्च्च्च्च्च्च्च......

खुपच आवडली!
खरच मस्त च्च्च्च्च्च्च्च्च्च्च..च्च्च्च्च्च्च्च्च्च्च......!!!!!

झकास. मी मन लावून वाचतोय सर्व भाग. माझ्या भूतकाळाची आठवण येते काही ठिकाणी.खरंच आपण सर्वच जण या परिस्थितीतून गेलेलो असतो कधितरी. वाचताना आँख नमी होतात म्हणतात ना ते असं.का त्रास देता एवढे चांगले लिहून ?

पुढचा भाग, प्लीज.

बेफिकिर,
तुम्हि तुमच्य वाचकाना एक सवय लावलि आहे, दरोरोज नविन नविन भाग वाचण्याचि, म्हनुन सागु हा आग्रह. प्लीज.

आता पर्यन्तचे सर्व भाग अप्रतिम.
या कथेवर जर चित्रपट बनव ला तर एक च हिरो डोळ्यासमोर येतो तो म्हन जे भरत जाधव , तो एकच अभिनेता "श्री " ची भुमि़का अप्रतिम करेल.

बेफिकिर,
सुन्दर लेखना बद्दल तुम चे खुप खुप अभिनन्दन व अभार
लवकर पुढचा भाग लिहा.

धन्यवाद .

क्षमस्व! भाग टाकण्याचा खरच मनात विचार आहे पण जमले नाही.

बाय द वे!

'जुयी'

किंवा 'जुई'

या सदस्यनामाने वावरणार्‍या व्यतीला...

माझे अनेक वैयक्तीक आभार!

'आवडते लेखक' या सदरात माझे नांव लिहिल्याबद्दल!

जुई, मी आपला ऋणी आहे.

मनापासून!

-'बेफिकीर'!