श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १६

Submitted by बेफ़िकीर on 5 August, 2010 - 08:09

इयत्ता आठवीमधे लागलेला हा शोध फार विचित्र होता. आजवर लागलेल्या शोधांपैकी सर्वात विचित्र! तिसरीत 'आपण पहिले आलो की पार्टी' करतात हा शोध लागला होता. त्याचवेळेस माणूस मरतो आणि चितळे आजोबा मेले तेव्हा आपला सर्व वाडा रडत होता हेही समजले. चवथीत हॉटेल सुजाता नावाची या जगात एक अशी जागा आहे की आयुष्यातील 'पिक्चर बघणे' याच्या खालोखालचा आनंद तिथे मिळतो आणि तेथे जाणे हा बाबांच्या दृष्टीने सर्वात मोठा अपराध असतो कारण 'आपल्याकडे पैसे नाहीत व आपण इतरांपेक्षा गरीब आहोत'.

चवथीत लागलेला आणखीन एक शोध म्हणजे आजवर आपण ज्या शाळेत होतो ती सोडली जाऊ शकते व आपण पुढच्या वर्षी वेगळ्याच शाळेत असू शकतो हा! चवथीच्या वार्षिक परीक्षेनंतर सुट्टी लागली म्हणून अभिनव विद्यालयाच्या गेट मधून हुंदडत बाहेर पडण्याची इच्छा असलेला प्रत्येक विद्यार्थी अजिबात.. म्हणजे अजिबातच हुंदडला नाही. सगळे गंभीर होऊन वर्गाच्या बाहेर आले. सगळ्यांचे पालक गेटबाहेर उभे होते आणि हाका मारत होते. पण मुले जरा वेळ तिथेच थांबली आणि बोलू लागली.

श्रीकृष्ण - जया, तू... पाचवीला इथेच आहेस ना?
जया - बदली होणारे बाबांची..
रागिणी - माझ्यापण्..रिझल्टला येशील ना?
नितीन - मधे नाही भेटायचं?
सचिन - आता सगळे वेगवेगळे होणार..
नीता - मी इथेच आहे..
निलेश - मी पण... काय फालतू शाळाय ती गरवारे..
गट्टू - का?
निलेश - खाकी चड्डीय.. पोलिसांसारखी..
गट्टू - शाळा मोठीय पण..
मकरंद - डोनेशने?
अर्चना - हा हुषार आहे.. याला नाही लागणार..
पुष्कर - पण.. म्हणजे.. आता लंगडी अन रुमालपाणी..???
सचिन - संपलं सगळं आता..
गिरीश - आता आई अभ्यास नाही घेणार माझा..
गट्टू - मग? बाबा?
गिरीश - अंहं! आपापला करायचा..
गट्टू - इंग्लीशपण?
गिरीश - हं!
गट्टू - जया? तू जाणार पुण्यातून?
जया - माहीत नाही.. मला अन आईला इथेच ठेवणार म्हणतायत बाबा..
अर्चना - अभी.. आता तू, मी अन शुभांगी एकत्र नाही यायचं शाळेला..
अभी - का?
अर्चना - मोठ्या शाळेत मुलं मुली वेगवेगळी बसतात..
स्वरूपा - पण म्हणजे.. आपण आता.. कुणी भेटणारच... नाही का???

'आपण आता कुणी भेटणारच नाही का?'

'भेटणारच नाही का???'

एकच प्रश्न! आयुष्यभराचा विरह.. विरह काय फक्त प्रेमी जीवांचाच असतो? कोणतेही शुद्ध, प्रेमाचे नाते सुटले.. तुटले.. की तो विरहच!

स्वरूपा फडणीस! एक छोटीशी, चुणचुणीत दिसणारी अन लाघवी वागणारी मुलगी! तिने अत्यंत निष्पापपणे विचारलेला तो प्रश्न.. अभिनव विद्यालयाच्या भिंतींनाही हेलावून गेला.. भिंती रडत रडत म्हणाल्या..

"काय रे पाखरांनो.. हुंदडलात.. धावलात.. पडलात.. रडलात.. चिडलात.. कट्टीची गट्टी केलीत... डबे खाल्लेत.. हसलात.. .....

... आणि..... आणि.... चाललात?? "

अभिनव विद्यालय! शाळा आजही दिमाखात उभी आहे. पण १९७९ चा दिमाख? तो कुठून येणार? तो गेला..

एकेक छोटेखानी आणि 'कदाचित कायमचेच' बाहेर पडणारे पाऊल बघून नेहमी त्या पावलांना झेलणार्‍या वाटेतल्या फरश्या! आज त्याही बोलल्या..

"चाललात? याल ना परत? .. तुमच्यासारखे खूप येतील... पण... पण तुम्हीही .. याल ना? निदान मधून मधून भेटायला??"

चारच पावले पुढे गेली... आणि पालकांच्या हाका सुरू असतानाच...

सगळ्यांनाच शेजारची हिरवळ दिसली... याच हिरवळीवर बसून आजवर किती वेळा.. किती वेळा डबा खाल्ला असेल आपण...

हिरवळ आपली नाजूक पाती उंच उंच करून करून हाका मारत होती...

"हेमंत.. अर्चना.. .. ए... "

ललिताबाई! शाळेतील एक जुनी स्त्री शिपाई! हसत हसत सगळ्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत होती. हे प्रेम म्हणजे हॉस्पीटलमधून डिसचार्ज मिळालेल्या पेशंटकडे सगळ्या नर्सेस टीप मिळेल म्हणून धावतात तसले प्रेम नव्हते. ललिताबाई हसताना दिसत होती खरी... पण.. ते हसणे हसणे नव्हते. तिच्या मनात वादळे होती.. आणि त्यातच अनुराधा जवळ येताच मात्र तिचा धीर सुटला. अनुराधाला कित्येकदा तब्येतीमुळे धावाधाव करून तिने मदत केली होती. ती राहायचीही मनोजचंद्रापाशीच! अनुराधाच्या घराच्या जवळच! अनुराधाला पोटाशी धरून पोटभर रडली ललिताबाई! त्या रडण्याचा मात्र परिणाम व्हायचा तोच झाला. एकेक मुलगा अन मुलगी गंभीर झाले. आता कुठे बाहेरच्या पालकांना जरासा अंदाज आला. लांबूनच त्यांना अनुराधाला जवळ घेऊन रडणारी ललिताबाई दिसलेली होती.

आणि मुले गेटपाशी आली अन...

निर्मला जोशी!

या बाईच्या चेहर्‍यात काय होते कुणास ठाऊक! तिच्याकडे पाहिले की आईलाच पाहिल्यासारखे वाटायचे. इतकेच, की गट्टूला आईकडे पाहिल्यावर कसे वाटते तेच माहीत नव्हते हे वेगळे!

निर्मला जोशी! आता या बाई नाहीयेत! केव्हाच गेल्या. नळस्टॉपवरच भर रस्त्यात ट्रकने उडवले. अर्धा तास तडफडत होत्या. अपघाती रुग्णाला घाबरून मदत करायचे नाहीत लोक तो काळ! १९८४ ची गोष्ट असावी ती! अर्ध्या तासाने कुणीतरी रुग्णालयात पोचवले तेव्हा.. त्या गेलेल्या होत्या.

पण! गट्टू चवथीची परिक्षा देऊन बाहेर पडला तेव्हा... म्हणजे आत्ता मात्र त्या गेटमधेच उभ्या होत्या. शेजारी शांतारामकडे एका पिशवीत बिस्किटाचे पुडे होते. एकेका मुलाला बाई एकेक पुडा देत होत्या. आणि..

जयंतची वेळ आली आणि.. तो अक्षरश: त्यांच्या पायावर रडत रडत कोसळला.. ते पाहून अर्चना, मग रागिणी आणि शेवटी सगळेच... अगदी अक्षरशः सगळे रडायला लागले. शांतारामने घाईघाईत गेट उघडले. पालक आत धावले. आपापल्या पाल्याला जवळ घेतले सगळ्यांनी! निर्मला जोशी बाईंना सगळ्यांनी नमस्कार केला.

पालकांमधे अन बाईंमधे चर्चा झाली. तेव्हा मुले आपापल्या पालकाबरोबर नुसती उभी राहून एकमेकांकडे पाहात होती. कोण कोण पुढच्या वर्षी याच शाळेत आहे याचा निर्मला जोशी बाईंना साधारण अंदाज आला. मुले रडत आहेत पाहून त्यानी 'पाचवीत येथे येणार नसणार्‍या मुलांना' उगाचच त्या गोष्टीचा उल्लेख करून आणखीन रडवले नाही.

श्रीच्या सायकलवर गट्टू बसलाच नाही आज!

शेवटचे! एकदाच शेवटचे शाळेपासून नळस्टॉपपर्यंत अभिजीत, जयंत, अर्चना आणि शुभांगीबरोबर चालत जावे.. इतकीच इच्छा होती त्याची!

आणि.. पुर्वी जिथे त्याने पेरू घेतला होता तो नळस्टॉपचा पेरूवाला आला आणि..

एकमेकांकडे सगळ्यांनी फक्त बघितले.. एक शब्दही बोलायची त्यांची बौद्धिक पात्रता नव्हती.. पण ते काम नजर करत होती... केविलवाणे हसले सगळे.. मग अर्चनाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आले.. आणि मग...

आणि मग... एकदाही मागे न बघता बाबांच्या सायकलवर बसून गट्टू... अभिनव शाळेला कायमचा रामराम ठोकून कर्वे रोडला लागला...

आता... सगळे फक्त रिझल्टच्या दिवशी दिसतील तेवढेच... नंतर.. कोण कुठे तर कोण कुठे...

चवथीच्या त्या प्रदीर्घ सुट्टीत आणखीन एक शोध लागला. तारा मावशी आपल्या मुलाबरोबर पुण्याला आली होती आणि तिने.. गट्टूला पहिल्यांदाच.. खरीखुरी सर्कस दाखवली..

त्या दिवशी त्याच्या मनावर पहिल्यांदा तो संस्कार झाला... आपोआप!

आपले बाबा पैसे नसल्यामुळे आपल्याला काहीही मजा करून देऊ शकत नाहीत आणि त्या मजेचे आपल्याला आकर्षणच वाटू नये यासाठी स्वतः नाटके करतात.. हा तो शोध!

'काय? सर्कस आवडली का' या बाबांच्या प्रश्नावर त्याने फक्त कडवट तोंड करून मान उडवून होकारार्थी आविर्भाव केला तेवढाच!

त्याच सुट्टीत लागोपाठच्या आठवड्यात तारामावशीच्या कृपेने मिस्टर नटवरलाल, खून पसीना आणि परवरीश पाहायला मिळाले आणि मग मात्र अमिताभ बच्चन हे त्याचे दैवत झाले. तारा मावशी पैसे खर्च करत असूनही बाबा असे का म्हणतात की ' सारखे यांना पिक्चर दाखवू नकोस तारा' हे गट्टूला समजत नव्हते. खून पसीना आणि नटवरलाल मधील वाघ एकच आहे ही अमूल्य माहिती त्याला किरणदादाने दिली होती.

जिकडे तिकडे 'परदेसिया, ये सच है पिया, सब कहते है मैने तुझको दिल दे दिया' गाजत होते. तोडक्या मोडक्या पद्धतीने गट्टूही ते म्हणायचा.

वाड्यात आता क्रिकेट ही सायंकाळची एक अत्यंत नियमीत गोष्ट झालेली होती. हल्ली गट्टूलाही बर्‍यापैकी खेळता येत होते. संजय दादा, किरण दादा आणि वैशाली ताई हे अनुक्रमे कॉलेजमधील एकेका वर्षांना होते. ते मोठे असल्यामुळे ते हिरो झालेले होते. अर्थात, ते यांच्यात खेळायचे नाहीतच! पण त्यांच्या गप्पा ऐकायला, त्याही हिदी पिक्चरबाबतच्या, सगळी पोरे संध्याकाळी अंधार पडला की बसायची. मग त्यानंतर 'इस्टॉप पार्टी' सुरू व्हायची. साध्या लपाछपीला हे नाव कधी पडले कुणास ठाऊक?

पण इस्टॉप पार्टी सुरू झाली की पवार मावशी सरळ बाहेरच बसायच्या. कारण कोण त्यांच्या घरात लपायला येईल अन काय पाडून बिडून ठेवेल ते त्यांना बघवायचेच नाही. पलंगावरच्या चादरीला एक सुरकुती पडलेली चालत नसणारी ही बाई! इस्टॉप पार्टी आणि तिच्या शिव्या या दोन्ही गोष्टी एकाचवेळेस चालू व्हायच्या अन संपायच्या! तिच्या बडबडीकडे कुणी लक्षच द्यायचे नाही. सगळा खेळ झाल्यावर ती एका कुणालातरी धरून त्याच्या आईबापांचा उद्धार करत मदतीला घ्यायची अन स्वतःचे घर आवरायची.

राजश्रीताईचा धाकटा भाऊ गणेश आता दुडदुडू लागला होता. तो एक महाभयंकर प्रॉब्लेम होऊ लागला होता मावशींना! कारण एकतर राजश्री अन गट्टूची दोस्ती अधिक! त्यात ती त्या गणेशशिवाय कुठेही वावरायची नाही. आणि गणेशला मावशींच्या घरातील देव्हारा फार आवडायचा. सुरुवातीला त्यांनीच कौतुकाने त्याला 'हा बघ हनुमान, ही बघ गाय' वगैरे सांगीतले होते. त्यांच्याकडची गाय हनुमानाच्या पाचपट आकाराची होती हा विरोधाभास गणेशलाच काय त्यांना स्वतःलाही समजत नव्हता. बहुधा हनुमानालाही काही विशेष इगो इश्यू नसावा. पण ते दाखवल्यामुळे आता गणेश स्वतःच दुडदुडत मावशींच्या घरात येऊ लागला होता. त्यांना दार वाजल्यावर ते उघडल्यावर आधी कुणी दिसायचेच नाही. नंतर खाली पाहिल्यावर तो दिसला की सुरुवातीला 'अल्ले?? आल्ला का गणू बाळ??' वगैरे करायच्या. मात्र नंतर नंतर तो एक उपद्व्याप व्हायला लागला. बरीच वर्षे गट्टू या तुलनेने हसर्‍या व शांत बाळाचे सर्व काही केलेल्या मावशींचे एक तर वयही आता जास्त होते आणि गणेश हा धुडगूस घालणारा मुलगा होता.

त्यामुळे बेरी कुटुंबियांच्या मागील सात, मावशींची भीती न बाळगता आल्याच तर पुढे येऊ शकणार्‍या सात व एक हयात अशा एकंदर पंधरा पिढ्यांचा उद्धार दास्ताने वाड्याच्या भिंती रोज झेलायच्या.

आणि त्याच्याशी चिरंजीव गणेश बेरी या इसमाला काहीही देणेघेणे नसायचे. त्याची हनुमानाशी 'शेपटी' या विषयावर चर्चा चालायची. ही चर्चा करताना तो हनुमानाला उजव्या हातात धरून पार उलटा वगैरे करून त्याच्याशी बोलायचा. त्याचा बहुधा मूर्तीपूजेला विरोध असावा किंवा हनुमान हा एक आपल्यातीलच आहे असा समज असावा.

गणेश हे गट्टूच्या पिढीतील मुलांचे एक खेळणे झालेले होते. त्याला खेळवताना दिवसच्या दिवस जायचे.

आणि गट्टूच्या पिढीतील मुलांमधे नव्याने भरती झालेली नैना राजाराम शिंदे ही मुलगी राजश्रीताईला अजिबात आवडायची नाही. याचे एक अत्यंत महत्वाचे कारण होते. नैनाला गट्टूबद्दल फारच आत्मीयता होती. आणि त्यामुळे गट्टूही सतत तिच्याचबरोबर खेळायचा वगैरे! त्यामुळे रुसवे, फुगवे, कट्ट्या, गट्ट्या यांना सुट्टीत नुसता ऊत आलेला होता.

आणि पाचवीत लागलेल्या अनेक शोधांमधे सर्वात चक्रावून टाकणारा शोध म्हणजे एका यत्तेला 'आय' या पातळीपर्यंत तुकड्या असू शकतात. गट्टू 'जी' तुकडीत होता. कारण बाहेरच्या शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला, म्हणजे पाचवीला 'जी' तुकडी मिळायची अन सहावीपासून त्यांना गुणवत्तेप्रमाणे तुकड्या मिळायच्या. 'जी' या तुकडीत असलेला 'विद्यार्थी मिक्स' हा त्याहून चक्रावून टाकणारा होता. 'ढेबे' नावाचा एक किमान दिडपट उंचीचा मुलगा त्याच यत्तेत सातत्याने तीन वर्षे निष्ठावानपणे वावरल्यामुळे सुरुवातीला 'आय', नंतर 'एच' अन सध्या' जी' या तुकडीत होता. तो यत्ता बदलण्यात इंटरेस्टेड नव्हता. त्याचा इंटरेस्ट होता तुकड्या बदलण्यात! पाचवी या यत्तेला एकदा 'अ' ही तुकडी मिळाली की मग सहावीचा विचार करू असा काहीतरी त्याचा अ‍ॅप्रोच असावा. लॅटरल थिंकिंग!

इंग्लीश ही भाषा गट्टूला फारच आवडली. कारण त्याला ती जमत होती. माणसाला जे नीट जमते ते त्याला करायला आवडते. पण श्री या तत्वाला अपवाद होता. त्याला स्वयंपाक नीट जमत नसूनही गट्टुसाठी रोज डबा करायला आवडत होते. डबा! डबा हा प्रकार आता जितका सोपा झाला होता तितकाच सकाळी आठ ते सकाळी साडे अकरा हा कालावधी अवघड झाला होता. श्रीसाठी! कारण सरावाने आता डबा आरामात करता येत होता. पण आपण ऑफीसला गेल्यानंतरचे तीन, साडे तीन तास गट्टू काय करेल या चिंतेत तो असायचा. कारण आता शाळा सकाळची नव्हती, दुपारची होती. पुर्वी दुपारी गट्टू मावशींकडे असायचा. पण सकाळच्या वेळेस मावशींना घरातील अनेक कामे असल्याने त्यांना गट्टूकडे बघायला वेळ होईल की नाही अन गट्टूही व्यवस्थित राहील की नाही ही श्रीची चिंता होती. अर्थात, दास्ताने वाड्यात तो जोपर्यंत आहे तो पर्यंत कुणी ना कुणी त्याच्याकडे बघणारच हे श्रीला माहीत होते. पण बापाचे मन!

आणि खाकी चड्डी! ही चड्डी अत्यंत बोअर दिसायची असे विधान 'बोअर' हा शब्द संजयदादाकडून नवीनच समजल्यापासून गट्टूने वाड्यातील किमान वीस जणांना ऐकवले होते. मात्र अभिनव शाळेतील अभी व नितीन हे दोन एक्स-क्लासमेट्स गरवारेत आलेले होते. सुरुवातीला त्यांच्याबरोबर बरोबर राहात राहात हळूहळू नवीन मित्रही झाले होते. आणि केवळ दोन एक महिन्यातच गट्टू सगळ्या वर्गातीलच एक होऊन गेला होता.

चित्रकला व पी.टी. हे विषय त्याला आवडू लागले होते. कारण त्यात डोक्याला त्रास नव्हता. नवीन पुस्तके, नव्या वह्या, नवीन दप्तर आणि नवा गणवेष! सगळी धमाल होती.

इयत्ता पाचवीत गट्टू उर्फ महेश श्रीनिवास पेंढारकर वर्गात पहिले तर शाळेत तिसरे आले व त्यांची सहावी 'अ' या तुकडीत सन्मानाने ट्रान्स्फर झाली. मात्र! या एका वर्षात त्यांच्या स्वभावात आणि विचारांमधे काही फरक पडलेले होते.

बाबा आपल्याला फक्त अभ्यासच करायला सांगतात. गरवारेत बालशिक्षण या मूळ ज्युनियर शाळेतून आलेली व बहुतांशी प्रभात रोडवर राहणारी मुले ही गर्भश्रीमंत आहेत व आपण त्यांच्यापेक्षा फार म्हणजे फारच वेगळे आहोत. त्यांना त्यांच्या आईवडिलांनी बरीच सूट दिलेली आहे. त्यांच्याकडे पैसे असतात. ते समोरच्या रीगल बेकरीतील सामोसा, क्रीम रोल या गोष्टी विकत घेऊन मधल्या सुट्टीत खाऊ शकतात. आपण त्या या बाबीचा उल्लेखही घरात करू शकत नाही. एवढेच काय, त्यांच्यातील काही जण तर डबाच आणत नाहीत. ते फक्त रीगल बेकरीतील पदार्थ विकत घेऊन खातात. दोघे तिघे तर चक्क थ्रिल नावाचे काळ्या रंगाचे कोल्ड ड्रिंकही पितात तहान लागली म्हणून! आणि..

... आणि आपल्याला ते सगळेच हवेसे वाटत असूनही 'छे, मला नको बुवा काही' असे मानभावीपणे म्हणायला लागते आणि 'मला या गोष्टी तुमच्या हातात बघून मोहच झाला नाही' असे आविर्भाव तोंडावर आणावे लागतात ...

याचे कारण! आपण पेरू विकत घेतला त्या दिवशी बसलेला मार आपल्याला अजूनही आठवतो आणि.. त्यामुळेच... काल विद्याधरने आपल्याला मैत्री म्हणून अर्धा समोसा खायला दिला हे.. काय वाट्टेल ते झाले तरी आपण बाबांना कळू द्यायचे नाही.

गट्टूने हे विद्याधरला मात्र सांगीतले नाही की काही कारणाने माझे बाबा भेटले तर त्यांना सांगू नकोस मी तुझ्यातील समोसा खाल्ला म्हणून! कारण त्याला वाटले हे ऐकून विद्याधर खूप हसेल अन आपल्याला फालतू समजेल. मात्र! गट्टूला जवळ जवळ चार, पाच दिवस भीती वाटत होती की चुकून बाबांना कळले वगैरे तर? त्यादिवशी त्याने समोसा खातानाही अगदी रीगल बेकरीच्या एका अरुंद गल्लीत हळूच उभे राहून खाल्ला होता. विद्याधरला त्यातील गोमच माहीत नसल्यामुळे तो नुसताच गट्टूबरोबर उभा राहून समोसा खात बोलत बसला होता.

थ्रिल! थ्रिल म्हणजे काय हे गट्टूला माहीतच नव्हते. पण ते खूप गार असते अन गोड लागते असा त्याचा अंदाज होता.

गरवारे शाळेतील मुलीही अतिश्रीमंत घरांमधील होत्या. गुलाबी स्कर्ट अन पांढरा टॉप अशा गणवेषात त्या वर्गात बसून शिक्षक शिकवत असलेला विषय तल्लीन होऊन ऐकायच्या. सगळ्याच्या सगळ्या वागायला व्यवस्थित, चांगल्या संस्कारांच्या! पण अतीश्रीमंत!

सहावीला मात्र ८१ %च मिळाले. श्रीने खूप झापले. धपाटा वगैरे नाही मारला. पण खूप झापले. काहीतरी बदल होत होता. गट्टूचे अभ्यासातले लक्ष कमी झाल्यासारखे त्याला वाटत होते. वर्गातील ६४ विद्यार्थ्यांपैकी पहिले तेरा नंबर मुलींचेच आले. मुलांमधे गट्टू अठरावा आला. अभिनवची पहिल्या तीनांत यायची प्रथा पाचवीपासूनच खुंटलेली होती. पण अठरावा? याला काय अर्थ आहे? श्रीने खूप झापल्यामुळे गट्टू उदास झालेला होता. त्याला वर्षभर आपण इतरच गोष्टींकडे आकर्षित झालो याची जाणीव होऊन पश्चात्ताप होत होता खरा, पण त्याचवेळेस त्याला त्या झापण्यामुळे अभ्यासाबाबत एक तिटकाराच निर्माण झाला होता.

ही महत्वाची डेव्हलपमेंट होती.

कारण त्या वेळेस श्री समजत होता की आता रागवल्यामुळे या वर्षी तो व्यवस्थित अभ्यास करेल.

पण ते स्वप्न भंगले.

इयत्ता सातवीत दोन नवीन शोध लागले. एक म्हणजे हिंदी व संस्कृत या भाषा पन्नास पन्नास मार्कांना आल्या आणि दुसरा अत्यंत महत्वाचा शोध! विविध देशातील पोस्टाचे स्टँप्स जमवले जातात व ते एकमेकांशी 'स्टॅम्पला स्टॅम्प व दर्जाप्रमाणे' या तत्वावर एक्श्चेंज केले जातात व ज्याच्याकडे अत्यंत दुर्मीळ स्टॅम्प्स असतील तो वर्गात महत्वाचा मुलगा ठरतो.

झाले! अभ्यासातील सर्व लक्ष आता तिकिटांवर केंद्रीत झाले. बाबांना समजणार नाही अशा पद्धतीने त्याने सुरुवातीला दप्तराच्या कप्प्यात मैत्रीखातर मिळालेले चार, पाच किरकोळ अन भारतीयच असलेले स्टॅम्प्स ठेवायला सुरुवात केली. मग ते एक्श्चेंज होईनात! कारण ते सगळ्यांकडेच असायचे. मग उदास होऊन त्याने बाबांशी विषय काढला. 'तुम्ही ऑफीसमधील पत्रांचे स्टॅम्प्स आणू शकाल का' हा भीत भीत विचारलेला प्रश्न तीन चार वेळा उच्चारला गेल्यानंतर बाबांच्या कानातून आत प्रवेशला.

श्री - स्टॅम्प्स? का?
गट्टू - सांगा ना... आणाल का?
श्री - का पण?
गट्टू - ...
श्री - कशाला हवेत??
गट्टू - सगळेजण जमवतात..
श्री - स्टॅम्प जमवतात? का?
गट्टू - जमवतात..
श्री - फ्याडंच आहेत एकेक.. अभ्यास राहिला बाजूला..
गट्टू - आता केला ना आजचा अभ्यास??
श्री - काय केला..?? दोन धडे वाचलेस.. हा काय अभ्यास आहे? सहा सहा तास अभ्यास करायला लागतो.
गट्टू - हं! सहा तास! परीक्षा आल्यावर करतोच की मी..
श्री - फक्त परीक्षेच्या वेळेला अभ्यास करून काही होत नाही.. आत्तापासून करावा लागतो..
गट्टू - अहो बाबा सांगा ना.. आणाल का स्टॅम्प?
श्री - अरे आमच्या ऑफीसात नाही येत रे बाबा स्टॅम्प वगैरे काही...
गट्टू - येतात.. सगळ्यांच्या बाबांच्या येतात..
श्री - आमच्या नाही येत..
गट्टू - का?
श्री - अंहं! बँकेत वगैरे येतात.. प्रायव्हेट कंपनीत नाही येत..
गट्टू - का?
श्री - अरे परदेशात माल निर्यात वगैरे केला तर येतात..
गट्टू - मग करा की..???
श्री - करा की म्हणजे? मी कोण ठरवणारा?
गट्टू - मग कोण ठरवतं??
श्री - मोठे साहेब..
गट्टू - सप्रे काका?
श्री - अंहं! मालक ठरवतात..
गट्टू - मग.. त्यांना विचारा की..

श्री हसू लागला.

श्री - अरे बावळट! तुला स्टॅम्प हवेत म्हणून आमची कंपनी निर्यात सुरू करणारे का? झोप आता..
गट्टू - सांगा ना..
श्री - बरं! उद्या बघतो काही स्टॅम्प वगैरे आमच्याकडे येत असतात का ते..

त्या दिवशी गट्टूला स्वप्न पडले. जगातील अत्यंत दुर्मीळ स्टॅम्प्स त्याच्याकडे आहेत. अगदी बहामस, चिली, पेरू वगैरे देशांचे! आणि समीर, मिहीर, जगदीश, सुशील हे सगळे हात जोडून त्यांचे अख्खे कलेक्शन त्याला देऊ करून ते स्टॅम्प्स त्याच्याकडे मागत आहेत अन तो निरीच्छपणे नाही म्हणत आहे.

दुसर्‍या दिवशी धावतच शाळेतून घरी आला गट्टू!

गट्टू - मिळाले?
श्री - काय?

श्रीच्या डोक्यातही नव्हते.

गट्टू उदास झाला. आपल्या बाबांना आपल्या छंदाबाबत काहीही घेणेदेणे नाही. त्यांचे एकच! अभ्यास कर, अभ्यास कर! गट्टू एक अक्षरही न बोलता रुसून खाली खेळायला गेला. पण श्रीला आता आठवले.

च्यायला! हे स्टॅम्प प्रकरण विसरलोच की आपण! त्याने एक युक्ती शोधली. स्वातीची मावशी परदेशात राहायची. श्री संध्याकाळीच स्वातीकडे निघाला. जुने प्रकरण विरून आता बराच मोकळेपणा असला तरीही अजूनही स्वाती डबा खायला स्टोअरमधे सगळ्यांबरोबर न बसता कंपनीतील इतर काही बायकांबरोबर बसत होती. खरे तर आधीचा मोकळेपणा नव्हताच! हा एक कृत्रिम मोकळेपणा होता. स्वातीने दारात श्रीला पाहून आश्चर्यच व्यक्त केले. आत्ता तर तासापुर्वी आपण आणि हा माणूस बसमधे होतो. आता पुन्हा याच्या डोक्यात काहीतरी खूळबिळ तर नसेल ना आले या विचाराने तिने त्याला 'बसा' म्हणून सांगीतले. तिची आईही बाहेर येऊन बसली. स्वातीने आईला कधीच मागे झालेला प्रकार सांगीतलेला नव्हता.

श्री - काय म्हणतीयस?
स्वाती - ठीक! काय विशेष...??
श्री - अं! ते.. तुझी मावशी परदेशात असते ना?

नॉर्मली लोक परदेशातील लोकांकडून काहीतरी आणा / पाठवा म्हणतात हा स्वातीला अनुभव असल्यामुळे ती पटकन म्हणाली...

स्वाती - हो.. पण आता तिचं वय आहे सत्याहत्तर! तिला काहीच सोसत नाही..

खरे तर इतक्या माहितीचा काही संबंधच नाहीये हेच तिला माहीत नव्हतं!

श्री - हां हां!
स्वाती - का हो?
श्री - नाही.. म्हणजे त्यांची पत्रेबित्रे येतात का?
स्वाती - येतं अधूनमधून.. का?
श्री - ते.. गट्टूला .. ते परदेशातले पोस्टाचे स्टॅम्प्स हवे होते.. म्हंटलं.. तुझ्याकडे असतील..
स्वाती - ई! आम्ही फेकून द्यायचो.. कितीतरी येतात.. आता ठेवत जाईन..
श्री - आत्ता.. आत्ता आहेत का काही?
स्वाती - आहे का गं आई मावशीच्या पत्राचं पाकीट एखादं..
आई - आहे की?

आईने दोन पाकिटे आणली. त्यावर जर्मनीचे एकूण आठ स्टॅम्प्स होते. त्यातील पाच सारखेच होते अन तीन वेगवेगळे होते.

श्री - हे.. घेऊ का?
स्वाती - हो ? घ्या की? मी आता ठेवत जाईन स्टॅम्प आले की..
श्री - ओके.. थॅन्क्स हं! काय एकेक मुलांच चाललेलं असतं.. उगाच तुला त्रास दिला..
स्वाती - छे छे! मीच आणून देत जाईन तुम्हाला ऑफीसमधे..
श्री - ...
स्वाती - म्हणजे??? घरी केव्हाही या तुम्ही.. एक आपलं सोय म्हणून म्हणाले..
श्री - बर! येतो.. आई? येतो..
स्वाती - आणि फडक्यांकडे रोज चिक्कार स्टॅम्प्स येतात की? ते घेत जा की?
श्री - येतात???????

हवेत तरंगल्यासारखा श्री घरी आला. गट्टू त्याच्याशी बोलतच नव्हता.

श्री - अरे.. गट्टू?
गट्टू - ...
श्री - ए गट्टू...
गट्टू - करतोय हो अभ्यास.. सारखे तेच तेच सांगतात..
श्री - नाही नाही.. हे.. असले चालतील का?? स्टॅम्प्स??

हुप्पा हुंया जय बजरंग!

एकदम जर्मनीच? जर्मनी या देशाचा एक स्टॅम्प वर्गात नव्हता कुणाकडेही. अर्थात, जर्मनीचे स्टॅम्प्स दुर्मीळ वगैरे नव्हते. पण कुणाकडे नव्हते हेही तितकेच खरे!

अत्यानंदाने गट्टूने श्रीला मिठी मारली.

आपल्या बारा वर्षाच्या आईविना वाढणार्‍या मुलाने आपल्याला आपल्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी मिठी मारली तर कसे वाटते याचा अनुभव श्रीसाठी...

गलबलून टाकणारा होता..

आपल्याच कंपनीतील फडक्यांच्या डिपार्टमेंटला कित्येक स्टॅम्प्स येतात हे श्रीने दुसर्‍या दिवशी बघितले. त्याने ते सरळ घरी आणले.

आणि तो ढिगारा गट्टूपुढे टाकल्यावर किमान अर्धा तास गट्टू ते सगळे स्टॅम्प्स निरखून बघत असतानाच...

समीर आत आला..

समीर मधूसूदन कर्वे! वय वर्षे चवदा! इयत्ता नववी! मधूसूदन आणि प्रमिला या छानश्या जोडप्याचा जरासा आगाऊ मुलगा! आजवर त्याने प्रत्येक पावलाला श्रीला आणि गट्टूला दुखवलेच होते. पण आज..

आंधळा मागतो एक डोळा.. आणि देवाने डोळ्यांचा पाऊस पाडावा???

समीर - आई मला म्हणाली की तू आता स्टॅम्प्स जमवत नाहीस तर हे सगळे गट्टूला देऊन टाक. मलाही आता काही इंटरेस्ट नाहीये स्टॅम्प्समधे! पाहिजे हे स्टॅम्पबूक...

समीरकडे गट्टूने ज्या नजरेने बघितले...

लहानपणी एखादा लहान भाऊ मोठ्या भावाकडे ज्या प्रेमाने बघेल.. त्याच प्रेमाने..

की ती नजर पाहून आज आयुष्यात पहिल्यांदाच... समीरलाही गट्टूबद्दल नितांत आत्मीयता असावी असे त्याच्या चेहर्‍यावर भाव आले. वही गट्टूला देऊन प्रेमाने गट्टुच्या दंडावर थोपटून अभिमानाने श्रीकाकाकडे बघत तो निघून गेला.

केवळ दोन दिवसांमधे 'संख्या' या निकषावर गट्टू हा वर्गात एक मोठा स्टॅम्पधारक म्हणून घोषित झाला. आणि येथेच.. त्याला त्याच्या आयुष्यातील एक असा मित्र मिळाला... जो अत्यंत आपमतलबी व आत्मस्तुतीसाठी हपापलेला होता.. देवांग!

देवांगने स्टॅम्प्ससाठी गट्टूशी केलेली मैत्री गट्टूला कुठे घेऊन जाणार आहे हे माहीत असते तर श्रीच काय, गट्टूनेही त्या मैत्रीला नकार दिला असता. मात्र, मैत्री करण्याची देवांगची पद्धत मात्र लोभसवाणी होती. त्याच्या आईने दिलेल्या डब्यातील पदार्थ आग्रहाने गट्टूला देणे, त्याच्या शेजारीच बसणे वगैरे वगैरे!

आणि मग एके दिवशी... गट्टूमधे कधीच नसलेला एक दुर्गुण.. निर्माण झाला..

देवांगने अतिशय आग्रहाने एका रविवारी सकाळपासून गट्टूला आपल्या घरी बोलावले. पार दुपारी तीनपर्यंत तेथेच थांबायचे असल्याने गट्टूने आधीच बाबांची परवानगी काढलेली होती. देवांगची आई भलतीच प्रेमळ होती. तिने सकाळी सकाळीच डोसे केले. देवांगने व गट्टूने ते डोसे खात असतानाच देवांगच्या आईने एक स्फोटक विधान केले.. जे ऐकून गट्टू खरे तर मुळापासून हादरला होता.. पण वरवर विनोद मानून हसत होता..

"देवांगने मला सांगून टाकलेले आहे.. स्टॅम्प हा प्रकार दुसर्‍याचे ढापल्याशिवाय संख्येने वाढतच नाही... त्यामुळे मी त्याला काही म्हणत नाही त्याबाबत!"

ढापणे! हा जरी सौम्य शब्द असला तरी त्याचा अर्थ चोरणे असाच होता... आणि.. देवांगच्या तर आईनेही ही फॅक्ट स्वीकारलेली आहे यामुळे ती फॅक्ट गट्टूच्या मनात ऑथेंटिकेट झाली..

आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी साडे सात वाजता गट्टूने त्याच्याकडील एक नवीन स्टॅम्प श्रीला दाखवला. बहामस या देशाचा! गट्टूच्या डोळ्यातील आनंद पाहून श्रीलाही बरे वाटले होते. तसेच, हा स्टॅम्प गट्टूच्या दृष्टीने का कुणास ठाऊक पण अतीदुर्मीळ व महत्वाचा आहे व तो त्याने आपण कंपनीतून आणलेल्या काही स्टॅम्प्सशी एक्श्चेंज करून मिळवलेला आहे हे पाहून त्याला फारच बरे वाटले.

मात्र त्या रात्री कित्येक वर्षांनी पहिल्यांदाच... अबोल झालेल्या गट्टूने श्रीच्या कुशीत झोपून रात्र काढली. श्रीलाही खूप बरे वाटले. फक्त! गट्टूला बरे वाटत नव्हते. कारण अजित नावाच्या एका मित्राचा तो स्टॅम्प आज त्याने देवांगच्या सांगण्यावरून 'ढापला' होता.

गट्टू उर्फ महेश श्रीनिवास पेंढारकर... यांची ही आयुष्यातील पहिली चोरी होती..

आणि ती लपली गेल्यामुळे पुढील काही महिने अशा चोर्‍या वारंवार होऊ लागल्या ज्यापासून श्रीनिवास अनभिज्ञ राहिला.

आणि एके दिवशी सरळ मसलेकर म्हणून एक गृहस्थ श्रीला भेटायला घरी आले.

ते गट्टुच्या वर्गातील एका मुलाचे वडील होते व गट्टूला लागलेल्या सवयीबाबत आगाऊ काळजी घेणे योग्य होईल अशी सुचवण करायला श्रीकडे आले होते. श्री अत्यंत अपमानीत चेहर्‍याने अन खजील मानेने बसला होता.

त्या दिवशी गट्टूला मिळालेला मार पाहून जरी सगळेच हळहळत असले... अगदी समीरदादासुद्धा.. तरी आज मधे कुणीच पडत नव्हते.... प्रमिलाकाकूच काय... अगदी... आजीसुद्धा!

हे देवांगमुळे घडत आहे याची मात्र श्रीला कल्पना आलेली नव्हती. त्यामुळे ती मैत्री तशीच राहिली. फक्त आता स्टॅम्प हे प्रकरण संपलेले होते. रोज रात्री दहापर्यंत मोठ्याने किमान तीन विषयांचे आत्तापर्यंत कव्हर झालेले सगळे धडे वाचावे लागत होते.

आपोआपच ते धडे त्यामुळे पाठ होत होते. मात्र! इतके होऊनही.. गट्टू अभ्यासात मागे राहिलेलाच होता. कारण सगळे धडे वाचण्याची सवय वार्षिक परिक्षेच्या ऐन वीस एक दिवस आधी लावण्यात आली होती आणि..

त्याचा परिणाम म्हणून गट्टू वर्गात एक्केचाळिसाव्वा आलेला होता.

हा खरे तर गट्टुसाठीही एक धक्काच होता. किमान आठवडाभर श्री त्याच्याशी नीट बोलत नव्हता. एवढेच काय, आता पवार मावशीही गट्टूला अधून मधून झापत होत्या.

परिणामतः अभ्यासाचा कालावधी व तीव्रता वाढवण्यात आली. गट्टू आता अधिक अबोल, अंतर्मुख आणि किंचित बाबांपासून दूर गेला.

आणि आठवीच्या तिमाही परिक्षेत त्याचा क्रमांक पुन्हा एकोणचाळिसाव्वा आला.

यावेळेस गट्टूला स्वतःलाच काही विशेष वाटले नाही. श्रीने प्रगतीपुस्तकावर सही करताना एक शब्दही उच्चारला नाही. मात्र बाबांच्या चेहर्‍यावरून त्याला प्रकरण गंभीर आहे याची जाणीव झाली. तो बाबा खुष कशाने होतील याचा विचार करत त्यांच्या भोवती भोवती वावरू लागला.

आणि रात्री दहा वाजता... गट्टूला..

आजवरच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा.. सर्वात विचित्र असा... एक धक्का बसला..

'झोपा ना आता बाबा' असे म्हणत खिडकीत बाहेर बघत उभ्या असलेल्या बाबांचा हात धरून ओढताना त्याचे लक्ष खाली गेले तेव्हा..

'गट्टू आलाय' अशा अर्थाचे एकदम दचकल्याचे आविर्भाव करत तोपर्यंत रहस्यमय पद्धतीने हसत असलेल्या प्रमिलाकाकूने खाडकन तिच्या खिडकीचा पडदा लावला... आणि..

'आपल्या मुलाला काही कळले की काय' या भयानक भीतीने श्रीने गट्टूकडे निमिषार्धात मान वळवली तेव्हा..

चितळे आजोबांच्या खोलीची खिडकी उघडी होती आणि...

केवळ सातवीत असलेली नैना त्या खिडकीतून गट्टूकडे अशी काही पाहात होती..

की गट्टू पाहिल्यावर तिने लाजून मान फिरवली हे पाहून..

त्या रात्री झोपताना पहिल्यांदाच गट्टूच्या मनात विचार आला..

'नैना.. ... ... कशी पाहात होती नाही?? ... आपल्याकडे....!!!!...'

गुलमोहर: 

वा!!! फार आवडला आजचा भाग Happy नेहमीप्रमाणे आसू आणि हसूचे मिश्रण... पूर्वार्धातल्या शाळेच्या सेण्ड-ऑफने खरंच डोळ्यातून पाणी आणले... शाळा कुठलीही असो, सर्वांचे अनुभव थोडे-बहुत सारखेच असावेत....माझे तर डिट्टो मॅच होतायत...फक्त माझ्या सुदैवाने मी १ ली ते १० वी एकाच शाळेत होते...अजूनही शाळेची स्वप्नं पडतात...अजूनही शाळेच्या सगळया लाडक्या मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शिपाई काका, सफाई कामगार असलेल्या मावशींच्या आठवणीने डोळे पाणावतात....त्यांनीही असाच आम्हाला साश्रूनयनाने निरोप दिला होता....

गणू बाळच्या करामतींनी हसू आणले.. हनुमानाची शेपटी.... Lol
त्याचा बहुधा मूर्तीपूजेला विरोध असावा किंवा हनुमान हा एक आपल्यातीलच आहे असा समज असावा. >>>> Rofl
बेरी कुटंबियांच्या सात पिढ्यांचा उद्धार व्हायचा................आणि त्याच्याशी चिरंजीव गणेश बेरी या इसमाला काहीही देणेघेणे नसायचे. >>>>>>> Rofl
किती हो मजेशीर लिहिता बेफिकीर...पोट दुखतंय...आई गं s s s s

बाकी, श्री-प्रमिला प्रकरण अजून चालूच का??? Uhoh

.

नमस्कार, बेफिकीर

आज मी बर्‍याच वर्षांनी मायबोलीवर आलो. पहिले लिखाण याच कादंबरीबद्दल.

गट्टू आणि मी एकाच सुमाराला अभिनव व नंतर गरवारे शाळेत होतो असे वाटते. अभिनव शाळेची अगदी जशीच्या तशी आठवण करून दिलीत. जोशी बाईंचे वर्णन सही आहे. त्यांचा अपघात ८४ च्या आधी झाला, बहुतेक. स्त्री शिपाईचे नाव आठव्त नाही, पण आडनाव पांढरे होते. बरोबर ? आमच्या वर्गात एक पोलिओ झालेला पांगळा मुलगा होता. त्याला त्या शाळेच्या गाडीतून उचलून वर्गात आणायच्या आणि गाडीत बसवायच्या. शांतारामपण आठवला. (आता आठवलेच म्हणायला पाहिजे.). ते पण मदत करायचे.

एक सूचना - नळस्टॉपजवळील बंगल्याचे नाव "मनोचंद्र" होते.

तसेच गरवारे शाळेचे वर्णनपण सही आले आहे. पाचवी जी, आय, एच् ई, रीगल बेकरी, पेरू, तिमाही परीक्षा अगदी बरोबर. "ढेबे" म्हणजे "डाबी". बरोबर ?

पण हिंदी आणि संस्कृत भाषा आठवीपासून आल्या.

बाकी कादंबरी सहीच चालली आहे.

बेफिकिर,

वा मज्जा अलि. पन वाईट वाट्ले, गटू कुठुन कुठे चाललाय.

सानि याना मोद्क, श्री-प्रमिला प्रकरण .

धन्यवाद बेफिकीर,
नवीन भाग पाहून कस प्रसन्न वाटल.... हापिसात हाय नंतर वाचते... म्हणजे लंच टाईम मस्त गट्टु बरोबर....

मस्त...

सर्वांचे मनापासून आभार!

खरोखरच हुरूप आला.

श्री. समीर,

आपण दहावी केव्हा पास आऊट झालात ते कृपया कळवावेत. 'मनोचंद्र' हे बरोबर!

आणखीन एक - स्थळकाळाबाबत मोठ्या गफलती होऊ नयेत म्हणून मी माझे शिक्षण जिथे झाले , जसे झाले तिथे व तसेच गट्टूचे शिक्षण लिहीत आहे. मीही १९७९मधेच गरवारे शाळेत अ‍ॅडमिशन घेतलेली होती.

धन्यवाद!