मैत्रीदिन गटग - ठाणे सचित्र वॄत्तांतासह

Submitted by आशुतोष०७११ on 1 August, 2010 - 23:07

मुंबई-ठाण्यात पावसाला सुरुवात झाली तशी ठाणेकर मायबोलीकरांचे कांदाभजी गटगचे प्लॅन्स सुरु झाले. नेहमीप्रमाणेच गटगची सर्वांना सोयीची तारीख कोणती ठरवावी यावरुन बराच उहापोह झाला. शेवटी हो-नाही करत मैत्रीदिनाचे औचित्य साधुन १ ऑगस्ट हा गटगदिन ठरला. मैत्रीदिनाला सकुसप गटग झालेच पाहिजे ही श्री(घारुअण्णां)ची प्रबळ ईच्छा ही त्यामागे होतीच.

ठाण्यातील सुप्रसिद्ध श्रद्धा फरसाण मार्ट नामक दुकानातील 'खेकडा'स्टाईल कांदाभजींवर आडवा-तिडवा हात मारण्याची प्राथमिक योजना ठरली. या मेन्युवर विस्तृत चर्चा होऊन त्याऐवजी लंचचाच कार्यक्रम करावा अशीही प्रेमळ सुचनावजा विनंती पुढे आली. लगोलग या विनंतीला रविवारी चुल बंद आंदोलनाच्या खंद्या पुरस्कर्त्या मायबोलीकर ललनांकडून पाठिंबा मिळाला. या विनंतीला मिळालेला भरघोस पाठिंबा लक्षात घेऊन लंचचे सर्वांना सोयीस्कर ठिकाण कोणते निवडावे यावरही बराच खल झाला. या दरम्यान मंजुडी आणि मेधा२००२ यांची संयोजक म्हणून नेमणूक झाली. अस्मादिकांनी येऊर हिल्सच्या एक्झॉटिका रेसॉर्टची कल्पना पुढे रेटली. पावसाळी भटकंतीसाठी येऊर हिल्स हे आदर्श ठिकाण असल्यामुळे लंच आणि आसपास थोडीशी भटकंती यावर एकमत व्हायला वेळ लागला नाही. एका दुपारी अस्मादिक एक्झॉटिका रेसॉर्टवर धडकले आणि पुढच्याच मिनिटाला असुदे यांना फोन करुन १ ऑगस्ट रोजी रेसॉर्ट फुल्ल असल्याची गोड बातमी ऐकवली. घोडबंदर रोडवरील 'हॉटेल कोर्टयार्ड' तसेच घारुअण्णांनी सुचवलेले 'न्यु गारवा' ह्या दोन्ही रेस्टॉरंटसना धावती भेटही देऊन झाली. दर माणशी होणारा खर्च या मुख्य मुद्दयावर आणि ठाण्याबाहेरील मायबोलीकरांसाठी स्टेशनपासुन खुपच लांब ह्या गौण मुद्दयावर ह्या दोन्ही रेस्टॉरंटसच्या नावावर फुल्ली लागली.

असुदे यांनी ठाणे स्टेशनजवळील 'हॉटेल एक्सपिरीअन्स' ह्या हॉटेलचा आपल्याला चांगला एक्सपिरीअन्स असल्याचे सांगत याचाही विचार व्हावा ही विनंती केली. लगोलग असुदे, आनंद केळकर आणि आशुतोष०७११ हे तीन खंदे माबोकर वीर ह्या मोहिमेवर निघाले. रेस्टॉरंट मॅनेजरशी जुजबी बोलणी करुन आणि १ ऑगस्ट या दिवशी बुकिंग मिळेल या मॅनेजरच्या आश्वासनावर परतले. तोपर्यंत असुदे, मेधा२००२ आणि मंजुडी यांनी ई-टपालाद्वारे किती मायबोलीकर येऊ शकतील याची चाचपणी करण्यास प्रारंभ केला.
२९ जुलै रोजी अश्विनी_के यांनी सोबत एका टांगारु माबोकरणीसह मेन्यु ठरवण्याचे मनावर घेऊन हॉटेल एक्सपिरीअन्सवर चाल केली. मेन्यु कार्ड ३-४ वेळा चाळुनही काय ठरवावा मेन्यु हे न कळुन असुदे यांना फोन करायचा २-३ वेळा अयशस्वी प्रयत्न केला. मग तिने कंटाळुन मलाही फोन केल्यावर मी मेन्यु ठरवण्याचे सर्वाधिकार तिच्याच गळ्यात घातल्यावर माझ्या कै.नानांच्या एका टांगेचा उद्धार करुन मनःशाती साधली. अश्विनी_के यांच्या धावत्या भेटीतुन काहीच साध्य न झाल्याने ३१ जुलैच्या कोसळणार्‍या आषाढसरींची पर्वा न करता असुदे, चि. असुदे आणि अस्मादिक यांनी पुन्हा हॉटेल एक्सपिरीअन्स गाठले. ह्या खेपेस मात्र मॅनेजरशी यशस्वी वाटाघाटी होऊन चार्जेस आणि मेन्यु(एकदाचा!) ठरला.

असुदे यांनी उपस्थित राहणार्‍या मायबोलीकरांना ई-टपालातुन ठिकाण आणि वेळ कळवण्याचे कष्ट घेतले होतेच. त्याप्रमाणे १ ऑगस्ट रोजी हॉटेल एक्सपिरीअन्स सेवेला होतेच. भारतीय प्रमाणवेळेला जागुन सकाळी ११:३० नंतरच एकेका आय डीचे आगमन होऊ लागले. ज्या आय डींना ईच्छीत स्थळ सापडेना त्यांनी परिचित ठाणेकर आय डींना फोन करुन स्थळ गाठले.

IMG_0534_skw.JPG
आम्ही वेळेवर हजर...

हॉटेलात प्रवेशल्यावर 'वेलकम ड्रींक' ( कोक्/स्प्राईट सारख्या निरुपद्रवी पेयांनी) ने स्वागत झाले. त्यानंतर व्हेज हराभरा कबाब सॉस आणि पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह झाले. ह्या वेळेपर्यंत बहुतेक सगळे मायबोलीकर हजर झाले होतेच. ललिता-प्रिती ( चि. आदित्य क्लास आटोपून आले),कवितानवरे आणि घारुअण्णा सकुसप हजर होते. उशीरा येण्यामध्ये संयोजक मेधा२००२ या होत्या. त्यामागचं कारण त्यांनी पाठवलेल्या ई-टपालात वेळ दु. १२-३ अशी दिलेली होती. जमलेल्या बच्चे कंपनीसाठी हॉटेलात ३ कासवे, ४ ससे, १ बदक आणि २ मोठे फिश टॅन्क असा जामनिमा होता.

IMG_0537_skw.JPGIMG_0535_skw.JPGIMG_0541_skw.JPG
हे भावी मायबोलीकर

जेवणात व्हेज. कोल्हापुरी, पनीर मश्रुम हैद्राबादी आणि चिकन कढाई असा खासा बेत होता. जेवणाआधी आणि जेवताना ही अखंड गप्पा मारुन थकलेल्या जीवांना बाहेर पावसाचा आणि हॉटेलात चॉकलेट/मॅन्गो आईसक्रीमचा अशा दुहेरी थंडाव्याचा पर्याय होता.

IMG_0543_skw.JPGIMG_0546_skw.JPGIMG_0547_skw.JPGIMG_0552_skw.JPGIMG_0553_skw.JPGIMG_0554_skw.JPGIMG_0555_skw.JPGIMG_0556_skw.JPG

जेवणानंतर पुन्हा नव्या जोमाने गप्पांची महफिल जमली. काही माबोकरांनी बाहेर जाऊन चैतन्यकांडी शिलगावली. चि.नुपुर हिने काही कोडी घालुन आपल्या बुद्धीचातुर्याची झलक पेश केली. कोडी मराठीत असल्यामुळे आणि मराठी हा विषय फक्त १५वी लाच शिकल्यामुळे आनंद केळकर यांनी या खेळात बिनशर्त शरणागती स्वीकारली. केवळ १ दिवसापूर्वी मायबोली परिवारात दाखल झालेल्या पारिजातक नामक आय डी ने ही जुन्या आणि जाणत्या माबोकरांसमवेत गप्पा हाणत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. अश्विनी_के यांनी आधी गजानन आणि नंतर मोदक या आय डींचे 'अध्यात्म' या अतिगहन विषयावर बौद्धिक घेतले. याच्या परिणाम एवढाच झाला की या दोन्ही आय डींनी भर गटगमधुन जडावल्या डोक्याने पोबारा केला.

एव्हाना दुपारचे ४ वाजत आले होते. हॉटेलने बाहेर हाकलण्यापेक्षा आपणच आता टाटा करावे असा सुज्ञ विचार करुन बिलासाठी थाळी फिरवण्यात आली. समस्त माबोकर बाहेर पडणार ईतक्यात पावसाची एक जोरदार सर आली. ही संधी साधुन तमाम मंडळी रुफ टॉप सेक्शनमध्ये घुसली. तिथे दुसर्‍या एका ग्रुपचे फोटो सेशन चाललेले बघुन गटगकरांचे ग्रुप फोटो सेशन झाले.

IMG_0559_skw.JPG

हॉटेलबाहेर असलेल्या पानवाल्याकडच्या मसाला पानाने मैत्रीदिन गटगची सांगता झाली पण कांदाभजी गटग ह्या पावसात व्हायलाच हवं ह्या मुद्द्यावर एकमत होऊनच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहाव्या फोटोत घारू यो-रॉक्ससारखा काहीतरी 'आयटम' करून दाखवतोय असं वाटतंय Lol

मी मिसल , Sad
तोषा बाकी सचित्र वृ मस्तच
बाकी लले तुझ्या पेहेरावावरून सध्या तुला बराच जाच होतोय अस वाटतय Proud
कांभ गटग आता पुण्यातच करुया - हुकुमावरून Proud

बाकी लले तुझ्या पेहेरावावरून सध्या तुला बराच जाच होतोय अस वाटतय >>>

अगदी अगदी, मी तर सुरुवातीला ओळखलंच नाही ललीला फोटो पाहताना. Biggrin

काहीतरी 'आयटम' करून दाखवतोय असं वाटतंय<< मग नव्हता का आयटम?? Uhoh मलातर तसच वाटल Lol

आणि नवव्या फोटोत तोंडात बोट घालुन घसा साफ करणारा कोण तो डर्टी माणुस Proud
Light 1 घे रे माणसा Light 1

तुझ्या पेहेरावावरून सध्या तुला बराच जाच होतोय अस वाटतय <<<<<<<रस्त्यात अजयला बघुन मी तर विचारणारच होतो की एकटाच का? लली आदित्यबरोबर मागाहून येतेय का म्हणुन? Proud

लाजो, Uhoh काय गं असं बोलतेस त्याला Happy बिचारा कंपल्सरीली दिवा घेऊन बसला असेल आता.

लोकहो, फोटोंवरुन इथं वळख सांगू नका, विचारु नका. आशुतोष सगळ्यांना फोटो मेल करतोय. तिथेच काय ते विचारा.

अश्वे, हल्के घे गं. रच्याकने, माझी पण खूप इच्छा आहे की माझे व बायकोचे जुने कपडे द्यावे म्हणून पण आमच्या आकाराचे गरजू नसतात ना Sad

Happy

बाकी लले तुझ्या पेहेरावावरून सध्या तुला बराच जाच होतोय अस वाटतय <<< मी ललीला ओळखलं पण वविमधली लली अन कालची लली कुछ अलगही थी Proud लले जरा लखलख चंदेरी ना Proud

अमा, तू हल्ली ठाण्यात आलीसच नाही का? किंवा आम्हाला कळवलं नसशील. आपण आलोकमधे गेलो होतो ना, त्याच्या बाजूच्या बिल्डिंग मधेच आहे हे ६व्या मजल्यावर.

<< आपण आलोकमधे गेलो होतो ना, त्याच्या बाजूच्या बिल्डिंग मधेच आहे हे ६व्या मजल्यावर >>
अश्वे, हि माहिती आहे की आमंत्रण ? Proud

अरे वा... मस्तच धमाल... मी सुद्धा ठाण्याला राहतो. मात्र मायबोलीवर नवीन आहे. अश्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सुद्धा माहिती कळू द्या... भेट होईल...

बाकी लले तुझ्या पेहेरावावरून सध्या तुला बराच जाच होतोय अस वाटतय >>> Rofl

माझ्या गळ्यात कायम तिरक्या लटकत असलेल्या (कंडक्टर) पर्सच्या अनुपस्थितीमुळे रस्त्यात आशुतोष आणि अम्याने मला ओळखलंच नाही (म्हणे). पण मला घरातून निघतानाच वाटलं होतं की आज त्या (नसलेल्या) पर्सवरून
काहीतरी कमेंट्स होणार Lol

सर्व बाजू समान असलेल्या त्रिकोणाला त्रिभुज त्रिकोण म्हणतात असा घारूनं काल शोध लावलाय.
घारूच्या भूमितीच्या मास्तरांनी आता 'त्रिभुज प्रदेश'ची नवीन व्याख्या लिहायला घेतलीय - ३०-६०-९० च्या भाषेत Lol

Pages