मैत्रीदिन गटग - ठाणे सचित्र वॄत्तांतासह

Submitted by आशुतोष०७११ on 1 August, 2010 - 23:07

मुंबई-ठाण्यात पावसाला सुरुवात झाली तशी ठाणेकर मायबोलीकरांचे कांदाभजी गटगचे प्लॅन्स सुरु झाले. नेहमीप्रमाणेच गटगची सर्वांना सोयीची तारीख कोणती ठरवावी यावरुन बराच उहापोह झाला. शेवटी हो-नाही करत मैत्रीदिनाचे औचित्य साधुन १ ऑगस्ट हा गटगदिन ठरला. मैत्रीदिनाला सकुसप गटग झालेच पाहिजे ही श्री(घारुअण्णां)ची प्रबळ ईच्छा ही त्यामागे होतीच.

ठाण्यातील सुप्रसिद्ध श्रद्धा फरसाण मार्ट नामक दुकानातील 'खेकडा'स्टाईल कांदाभजींवर आडवा-तिडवा हात मारण्याची प्राथमिक योजना ठरली. या मेन्युवर विस्तृत चर्चा होऊन त्याऐवजी लंचचाच कार्यक्रम करावा अशीही प्रेमळ सुचनावजा विनंती पुढे आली. लगोलग या विनंतीला रविवारी चुल बंद आंदोलनाच्या खंद्या पुरस्कर्त्या मायबोलीकर ललनांकडून पाठिंबा मिळाला. या विनंतीला मिळालेला भरघोस पाठिंबा लक्षात घेऊन लंचचे सर्वांना सोयीस्कर ठिकाण कोणते निवडावे यावरही बराच खल झाला. या दरम्यान मंजुडी आणि मेधा२००२ यांची संयोजक म्हणून नेमणूक झाली. अस्मादिकांनी येऊर हिल्सच्या एक्झॉटिका रेसॉर्टची कल्पना पुढे रेटली. पावसाळी भटकंतीसाठी येऊर हिल्स हे आदर्श ठिकाण असल्यामुळे लंच आणि आसपास थोडीशी भटकंती यावर एकमत व्हायला वेळ लागला नाही. एका दुपारी अस्मादिक एक्झॉटिका रेसॉर्टवर धडकले आणि पुढच्याच मिनिटाला असुदे यांना फोन करुन १ ऑगस्ट रोजी रेसॉर्ट फुल्ल असल्याची गोड बातमी ऐकवली. घोडबंदर रोडवरील 'हॉटेल कोर्टयार्ड' तसेच घारुअण्णांनी सुचवलेले 'न्यु गारवा' ह्या दोन्ही रेस्टॉरंटसना धावती भेटही देऊन झाली. दर माणशी होणारा खर्च या मुख्य मुद्दयावर आणि ठाण्याबाहेरील मायबोलीकरांसाठी स्टेशनपासुन खुपच लांब ह्या गौण मुद्दयावर ह्या दोन्ही रेस्टॉरंटसच्या नावावर फुल्ली लागली.

असुदे यांनी ठाणे स्टेशनजवळील 'हॉटेल एक्सपिरीअन्स' ह्या हॉटेलचा आपल्याला चांगला एक्सपिरीअन्स असल्याचे सांगत याचाही विचार व्हावा ही विनंती केली. लगोलग असुदे, आनंद केळकर आणि आशुतोष०७११ हे तीन खंदे माबोकर वीर ह्या मोहिमेवर निघाले. रेस्टॉरंट मॅनेजरशी जुजबी बोलणी करुन आणि १ ऑगस्ट या दिवशी बुकिंग मिळेल या मॅनेजरच्या आश्वासनावर परतले. तोपर्यंत असुदे, मेधा२००२ आणि मंजुडी यांनी ई-टपालाद्वारे किती मायबोलीकर येऊ शकतील याची चाचपणी करण्यास प्रारंभ केला.
२९ जुलै रोजी अश्विनी_के यांनी सोबत एका टांगारु माबोकरणीसह मेन्यु ठरवण्याचे मनावर घेऊन हॉटेल एक्सपिरीअन्सवर चाल केली. मेन्यु कार्ड ३-४ वेळा चाळुनही काय ठरवावा मेन्यु हे न कळुन असुदे यांना फोन करायचा २-३ वेळा अयशस्वी प्रयत्न केला. मग तिने कंटाळुन मलाही फोन केल्यावर मी मेन्यु ठरवण्याचे सर्वाधिकार तिच्याच गळ्यात घातल्यावर माझ्या कै.नानांच्या एका टांगेचा उद्धार करुन मनःशाती साधली. अश्विनी_के यांच्या धावत्या भेटीतुन काहीच साध्य न झाल्याने ३१ जुलैच्या कोसळणार्‍या आषाढसरींची पर्वा न करता असुदे, चि. असुदे आणि अस्मादिक यांनी पुन्हा हॉटेल एक्सपिरीअन्स गाठले. ह्या खेपेस मात्र मॅनेजरशी यशस्वी वाटाघाटी होऊन चार्जेस आणि मेन्यु(एकदाचा!) ठरला.

असुदे यांनी उपस्थित राहणार्‍या मायबोलीकरांना ई-टपालातुन ठिकाण आणि वेळ कळवण्याचे कष्ट घेतले होतेच. त्याप्रमाणे १ ऑगस्ट रोजी हॉटेल एक्सपिरीअन्स सेवेला होतेच. भारतीय प्रमाणवेळेला जागुन सकाळी ११:३० नंतरच एकेका आय डीचे आगमन होऊ लागले. ज्या आय डींना ईच्छीत स्थळ सापडेना त्यांनी परिचित ठाणेकर आय डींना फोन करुन स्थळ गाठले.

IMG_0534_skw.JPG
आम्ही वेळेवर हजर...

हॉटेलात प्रवेशल्यावर 'वेलकम ड्रींक' ( कोक्/स्प्राईट सारख्या निरुपद्रवी पेयांनी) ने स्वागत झाले. त्यानंतर व्हेज हराभरा कबाब सॉस आणि पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह झाले. ह्या वेळेपर्यंत बहुतेक सगळे मायबोलीकर हजर झाले होतेच. ललिता-प्रिती ( चि. आदित्य क्लास आटोपून आले),कवितानवरे आणि घारुअण्णा सकुसप हजर होते. उशीरा येण्यामध्ये संयोजक मेधा२००२ या होत्या. त्यामागचं कारण त्यांनी पाठवलेल्या ई-टपालात वेळ दु. १२-३ अशी दिलेली होती. जमलेल्या बच्चे कंपनीसाठी हॉटेलात ३ कासवे, ४ ससे, १ बदक आणि २ मोठे फिश टॅन्क असा जामनिमा होता.

IMG_0537_skw.JPGIMG_0535_skw.JPGIMG_0541_skw.JPG
हे भावी मायबोलीकर

जेवणात व्हेज. कोल्हापुरी, पनीर मश्रुम हैद्राबादी आणि चिकन कढाई असा खासा बेत होता. जेवणाआधी आणि जेवताना ही अखंड गप्पा मारुन थकलेल्या जीवांना बाहेर पावसाचा आणि हॉटेलात चॉकलेट/मॅन्गो आईसक्रीमचा अशा दुहेरी थंडाव्याचा पर्याय होता.

IMG_0543_skw.JPGIMG_0546_skw.JPGIMG_0547_skw.JPGIMG_0552_skw.JPGIMG_0553_skw.JPGIMG_0554_skw.JPGIMG_0555_skw.JPGIMG_0556_skw.JPG

जेवणानंतर पुन्हा नव्या जोमाने गप्पांची महफिल जमली. काही माबोकरांनी बाहेर जाऊन चैतन्यकांडी शिलगावली. चि.नुपुर हिने काही कोडी घालुन आपल्या बुद्धीचातुर्याची झलक पेश केली. कोडी मराठीत असल्यामुळे आणि मराठी हा विषय फक्त १५वी लाच शिकल्यामुळे आनंद केळकर यांनी या खेळात बिनशर्त शरणागती स्वीकारली. केवळ १ दिवसापूर्वी मायबोली परिवारात दाखल झालेल्या पारिजातक नामक आय डी ने ही जुन्या आणि जाणत्या माबोकरांसमवेत गप्पा हाणत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. अश्विनी_के यांनी आधी गजानन आणि नंतर मोदक या आय डींचे 'अध्यात्म' या अतिगहन विषयावर बौद्धिक घेतले. याच्या परिणाम एवढाच झाला की या दोन्ही आय डींनी भर गटगमधुन जडावल्या डोक्याने पोबारा केला.

एव्हाना दुपारचे ४ वाजत आले होते. हॉटेलने बाहेर हाकलण्यापेक्षा आपणच आता टाटा करावे असा सुज्ञ विचार करुन बिलासाठी थाळी फिरवण्यात आली. समस्त माबोकर बाहेर पडणार ईतक्यात पावसाची एक जोरदार सर आली. ही संधी साधुन तमाम मंडळी रुफ टॉप सेक्शनमध्ये घुसली. तिथे दुसर्‍या एका ग्रुपचे फोटो सेशन चाललेले बघुन गटगकरांचे ग्रुप फोटो सेशन झाले.

IMG_0559_skw.JPG

हॉटेलबाहेर असलेल्या पानवाल्याकडच्या मसाला पानाने मैत्रीदिन गटगची सांगता झाली पण कांदाभजी गटग ह्या पावसात व्हायलाच हवं ह्या मुद्द्यावर एकमत होऊनच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्यामारी, पावसाळी ट्रिप ठरवावी आणि पावसाने थेंब-थेंब गळं कराव असं झाल होतं माझं सुरुवातीला. पण थेंबथेंबवरुन मुसळधार कोसळ कधी होतो हे जसं कळत नाही तसच एक दोन करत तीस बत्तीसजण कसे जमले हे कळलच नाही. भान आलं तेव्हा बेभान गप्पा चालू झाल्या होत्या....

बंधो! मस्त वृ आणि प्रचि Happy
डिसेंबरात मी येतेच आहे तेव्हा गटग चे प्लॅन्स अत्तापासुनच सुरु करा Happy

सर्वांना 'अहो-जाहो' संबोधण्यामागचे कारण कळू शकेल काय? Wink

बाकी, ते जेवतानाचे फोटो काढून टाक. काय एकेकाची तोंडं आलीयेत - रवंथ करणारी ... Lol

ग्रूप फोटो किंवा वैयक्तीक ओळख स्पष्ट नसणारे फोटो इथे टाकायला हरकत नाही. बाकी सगळे फोटो इथून काढून टाकावे ही नम्र विनंती.

मी शेवट्च्या फोटुम्धे नाहिये...............
केव्हा काढ्ला हा फोटु ??
>>>>

शेवटच्या फोटूत 'लवकर सटकू' लोकं नाहीयेत Proud

वैभे तुम्ही लिफ्ट मधून खाली आणि आम्ही लिफ्ट मधून वर गेलो तेव्हा काढला तो फोटो. बायदवे तुम्ही का लवकर गेलात? गेलात ते गेलात मग पुन्हा खाली कुणाची वाट बघत थांबलेलात? Wink Proud

वविच्या अनुभाववरुन ह्या गटग ला ढोलकी आणु का म्हणुन विचारणा झाली होती. Proud
ईथे ढोलकी वाजली असती तर हॉटेलात संयोजकांचे फोटो लागले असते आणि त्याखाली " ईन्हे अंदर आना मना है" Wink

तोषा, खरय रे बाबा. विचारल्यावर त्याने सांगितल अस्त. पाळीव प्राणी अलाउड आहेत, जंगली नाही. Light 1

मि एकाहि फोतोत नाहि...........काय हे....... गायब केलआआआआआआ मला Sad

अश्विनी_के यांनी आधी गजानन आणि नंतर मोदक या आय डींचे 'अध्यात्म' या अतिगहन विषयावर बौद्धिक घेतले. >>> तरीच मोदकचा घरी आल्यानंतर भारत कुमार झाला होता. (चेहर्‍यावर हाताचा पंजा ठेवण्याची आणि एकाच ठिकाणी बराच वेळ टक लावून पाहण्याची इश्टाईल आठवा. Wink )

याच्या परिणाम एवढाच झाला की या दोन्ही आय डींनी भर गटगमधुन जडावल्या डोक्याने पोबारा केला. >>> हे मला बोल्ला नाही मोदक. Angry तरीच म्हटलं की शेवटच्या फोटोत आमचे हे दिसले कसे नाहीत. यावर उतारा म्हणून की काय "Once Upon A Time In Mumbai" शिनिमा बघून आला बहुतेक Uhoh

गजाननशी या विषयावर काहीच बोलणे झाले नाही. मी बहुतेक मंजुडीला सांगत होते १५ ऑगस्टला ४५० फॅमिलीजना कपडे, मेणबत्त्या, वह्या, गोधड्या वाटायला जायचंय तर नीरजाचे कपडे असतील तर शनिवारी आण. त्यावर मोदकने विचारले हे काय असतं. त्याने नंतर विचारलं मलाही अशा कामात भाग घेता येईल का? त्यावर मी त्याला काही सांगत बसले होते. नंतर मोदकने मस्तपैकी गजानन महाराजांचा विषय काढला, मग परत थोड्या गप्पा झाल्या. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्याशीच मी या विषयांवर बोलते अन्यथा नाही. अपरिहार्यपणे विषय आलाच तर फक्त कामापुरताच तो विषय बोलून, विषय बदलते. असो.... माझ्याबद्दल उगाच गैरसमज पसरु नयेत म्हणून हे सगळे एक्स्प्लेन केलं आहे.

अश्वे हे गाणं ऐक "take it easy policy" अश्वे अगं सगळे गंमत करतायत बयो Happy (बाकी सगळे फक्त काउंट करत होते किती वेळा मोदकची मान "हो" "हो" अशी हलतेय आणि किती वेळा तू हातवारे करत्येस हवेत :P)

Pages