न्यूक्लिअर डिसेप्शन : प्रकरण २ - प्रकल्प "लोणी कारखाना

Submitted by sudhirkale42 on 23 July, 2010 - 22:28

न्यूक्लिअर डिसेप्शन : प्रकरण दुसरे

Nuclear Deception front cover.JPG© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

पूर्वप्रकाशनः ई-सकाळ
प्रकल्प "लोणी कारखाना"

ऍमस्टेल स्ट्रीटवरील त्यांच्या घरात खान कुटुंब आपले जीवन व्यतीत करू लागले. अब्दुल कादीर आपल्या गुलाबाच्या व ट्यूलिप फुलांच्या बागेची मशागत करण्यात गुंग झाले तर हेनी हरवलेली कुत्री, मांजरं व जखमी पक्षी वगैरेंच्या 'शिकारखान्या'ची काळजी घेण्यात गुंतून गेली. खानसाहेबांच्या स्वभावाचा खास उठून दिसणारा पैलू होता त्यांची "गल्ली व्हॉलीबॉल" खेळण्यातील खास लकब. "ते व्हॉलीबॉल कोर्टच्या कुठल्याही कोपर्‍यातून चेंडू जोरात मारू शकत (smash)" अशी आठवण त्यांच्या शेजार्‍याने सांगितली. "त्यांच्यात एक विजिगीषु वृत्ती होती!"

आणखी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट होती त्यांच्याकडे फान्स व बेल्जियम येथील पाकिस्तानी मुत्सद्द्यांच्या (diplomats) खास नंबरप्लेट्स असलेल्या गाड्यांची वाढलेली वर्दळ! संध्याकाळी आलेली ही मंडळी उशीरापर्यंत त्यांच्या घरी असत. बंद दारांमागे हे मुत्सद्दी व ISI चे गुप्तहेर खानसाहेबांना काय चोरायचे व कुणाकडून याबद्दल मार्गदर्शन करत. या सर्वांना सेंट्रीफ्यूज या यंत्रात सर्वात जास्त रस होता. खानसाहेबांच्याच ऑफीसमध्ये बसणार्‍या मशीनिस्ट/छायाचित्रकार असलेल्या एका एकलकोंड्या पण आल्मेलो येथील शोधांच्या प्रत्येक नव्या माहितीत खूप रस घेणार्‍या फीरमन या सहकार्‍याशी खास गट्टी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याला ते वारंवार घरी बोलवत, भाजलेली कोंबडी खाऊ घालत व पाकिस्तानबद्दल बोलत. फारसा प्रवास न केलेल्या फीरमनला पाकिस्तान म्हणजे एक मोहवून टाकणारा प्रदेशच वाटे व हेनी त्याला त्याने काय पहावे याबद्दल सूचक माहिती देई तर "अब्दुल" त्याला त्यांच्या मित्रांचे व नातेवाइकांचे नंबर देत असे.

मग एके दिवशी खानसाहेबांनी त्याला प्रयोगशाळेतील सेंट्रीफ्यूजेसचे फोटो काढायला सांगितले. शिवाय महत्वाची कागदपत्रे घरी आणून त्यांचेही फोटो काढायला सांगितले. ते ऐकल्यावर फीरमनला संशय आला व तो कांहींसा घाबरलाही. कारण कुठलीही कागदपत्रे घरी न्यायला बंदी होती. नंतर खानसाहेबांनी जेंव्हा त्याला त्याच्या पाकिस्तानवारीसाठी तिकीट द्यायचा प्रस्ताव मांडला तेंव्हा त्याची "ट्यूब" पेटली. त्याने एका सार्वजनिक फोनवरून त्याच्या मॅनेजरला फोन करून भीत-भीत आपल्या प्रयोगशाळेतील या परमाणू-हेराबद्दलची माहिती दिली. त्याने खानसाहेबांच्या घरची जेवणे व तिथे वारंवार येणारी पाकिस्तानी मुत्सद्दी, त्यांच्या दिवाणखान्यात पडलेली FDO ची गुप्त कागदपत्रे वगैरे पूर्ण माहिती दिली. यावर कुठलीही कारवाई न करता त्याच्या मॅनेजरने उलट फीरमनलाच "उगीच कटकटी उकरून काढू नकोस" असे बजावले. (***)

पण पुढे ऑगस्ट १९७५ साली सुल्फ़िकार अहमद बट्ट् याने जेंव्हा एका डच कंपनीकडून हाय-फ्रीक्वेन्सी-इन्व्हर्टर्स घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांचा तपशील (specifiations) हुबेहूब G-2 सेंट्रीफ्यूजमध्ये लागणार्‍या इन्व्हर्टर्ससारखाच होते. तेंव्हा कुठे तरी गुप्ततेत गळती असल्याचे BVD च्या लक्षात आले! पण खानसाहेबांना समोरा-समोर खडसावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागायच्याऐवजी FDO ने त्यांची १९७५ सालच्या ऑक्टोबरमध्ये दुसर्‍या विभागात बदली केली.

आपली हॉलंडमधील सद्दी संपली हे लक्षात येताच १९७५ सालच्या डिसेंबरमध्ये खानसाहेब, हेनी व त्यांच्या दोन्ही मुलींच्याबरोबर तीन भल्या मोठ्या सूटकेसेस घेऊन कराचीला पसार झाले. कौसर नियाज़ी यांच्या म्हणण्यानुसार त्या सूटकेसेसमध्ये "खानसाहेबांची टांचणे" होती!

खानसाहेबांनी पाकिस्तानला येताना CNOR (जुनी संरचना) व G-2 (नवी व जास्त चांगली संरचना) सेंट्रीफ्यूजची डिझाईन्स, सेंट्रीफ्यूज वापरायच्या व दुरुस्ती करण्याबद्दलची माहिती (Operating and Maint Manuals), त्याचे वेगवेगळे सुटे भाग/घटक पुरविणार्‍या कंपन्या अशी खूप सविस्तर माहिती आणली होती. हेनीला व मुलींना आपल्या कुटुंबियांकडे सोडून ते तडक इस्लामाबादला गेले. पण तिथं गेल्यावर त्यांना आढळून आले कीं पंतप्रधान भुत्तो बाहेरगांवी होते व मुनीर अहमद खान हेच युरेनियम शुद्धीकरणाच्या प्रकल्पाचे मुख्य होते. व त्यांनी तो प्रकल्प शीघ्र गतीने पुढे जाण्यासाठी कांहींच प्रयत्न केले नव्हते. प्रकल्पाला जागा दिली होती इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या धावपट्टीजवळ वटवाघुळे, विंचू व सापांनी भरलेल्या एका RAFच्या जुन्या वर्कशॉपमध्ये! जमविलेली माणसंही युरेनियमबद्दल माहिती नसलेली, त्यांना सोयीही दिलेल्या नव्हत्या.
मुनीर यांनी दाखवलेला सापत्नभाव सहाजिक होता कारण युरेनियम शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या प्लुटोनियमच्या प्रकल्पाचा स्पर्धक होता!

भुत्तो परत येताच खानसाहेबांनी त्यांना फोन करून सांगितले की या ’लाल-फीत-राज्या'त ते कांहींही करू शकत नाहींत. परिणामत: भुत्तोंनी नियाझींच्या सल्ल्याने दडपण व अंकुशविरहित अशी एक वेगळी संघटना उभी करण्याची परवानगी खानसाहेबांना दिली. त्यांना हवी ती माणसे निवडायचेही स्वातंत्र्य दिले. खानसाहेबांनी शांतपणे विचार करणार्‍या हेनीच्या सल्ल्याने होकार दिला. त्यावर भुत्तो टेबलवर हात आपटून म्हणाले, "आता घेतो बघून या अनौरस हिंदूंना!"

खानसाहेबांनी हेनीला त्यांच्या FDO च्या वरिष्ठाना पत्र लिहून "खानसाहेबांना पीतज्वर झाला आहे" अशी सबब देऊन "परत यायला उशीर होईल" असे कळवायला सांगितले. त्यांनी स्वत:ही त्यांचा सहकारी फीरमनला "आम्हाला हॉलंड सोडून महिना झाला. बरा झालो कीं परत येईन" असे लिहिले. फीरमनने त्यांच्या हेरगिरीच्या प्रयत्नांबद्दल वरिष्ठांना सांगितले होते याची खानना एक तर कल्पनाच नव्हती किंवा त्यांना त्याची पर्वा नव्हती!

हेनी हॉलंडला परतली. तिने मित्रांना व शेजार्‍यांना "आम्ही आता पाकिस्तानात कायमचे जात आहोत" असे सांगितले. पण त्याचे कुणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. पाकिस्तानातच त्यांचे भविष्य जास्त उज्ज्वल असेल असेच त्यांच्या सहकार्‍यांना वाटे. फीरमनने केलेले आरोप कुणालच आठवले नाहीत. पण तीन वर्षांच्या कालावधीनंतर डच सरकारने कबूल केले कीं त्यांना खानसाहेबांच्या ठासून भरलेल्या सूटकेसेसमध्ये काय होते ते माहीत होते!(***)

इस्लामाबादमध्ये खानसाहेब आणि मुनीर एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायच्याच पवित्र्यात होते. जेंव्हा खानसाहेबांना कळले की अजूनही त्यांना वेगवेगळे छोटे भाग विकत घ्यायला व नव्या लोकांच्या नियुक्ती करायला मुनीरसाहेबांची अनुमती घ्यायला लागणार होती व पाठविलेले अर्ज मुनीरसाहेबांच्या टेबलावर पडून असत! भावनाप्रधान झालेले व रागावलेले खानसाहेब पुन्हा "कूल (cool)" व विचारी असलेल्या आपल्या पत्नीकडे सल्ल्यासाठी वळले. तिच्या सांगण्यावरून खानसाहेबांनी भुत्तोंची पुन्हा भेट घेतली. त्यावेळी भुत्तोंनी परराष्ट्रमंत्री आगा शाही व संरक्षणमंत्री गुलाम इशाक खान यांच्यासह खानसाहेब व मुनीर यांची एक बैठक घेतली. ३१ जुलै १९७६ साली त्यांनी खानसाहेबांना युरेनियम शुद्धीकरणाचा वेगळा व स्वतंत्र प्रकल्प उभा करायला अनुमती दिली व तिचे नाव ठेवले "इंजिनियरिंग रीसर्च लॅबोरॅटरी". त्यांच्या प्रकल्पाला एक सांकेतिक नांवही देण्यात आले "प्रकल्प ७०६"!

खानसाहेबांनी स्वत:पुढे ७ वर्षात बॉम्ब बनविण्याचे ध्येय ठेवले. त्यांनी चांगली माणसे शोधून काढताना पाकिस्तानची संपूर्ण विज्ञानयंत्रणा उलट-सुलट केली. त्यांच्या उपनिर्देशकाच्या जागी साउदॅम्प्टन विश्वविद्यालयात शिक्षण झालेले धातुशास्त्रज्ञ डॉ. फरूक हाशमी, इंग्लंडमध्ये शिकलेले संगणकाचे सॉफ्टवेअरतज्ञ व गणितज्ञ डॉ. आलम यांना नेमले व प्रकल्प-७०६ साठी साधनसामुग्री विकत घेण्यासाठी ब्रि. अनीस अली सयेद या लष्करी अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली Special Works Organization या नावाची संघटना उभी केली.

शुद्धीकरणाच्या प्रकल्पासाठी जागा शोधताना खानसाहेबांना इस्लामाबादहून ४० मैलावर वसलेले "कहूता" या नावाचे एक छोटे गांव पसंत पडले. त्या गावातून एक नदीही वहात होती. खरं तर ती एक परदेशी मुत्सद्द्यांना आवडणारी सहलीची जागा होती. अनेक दृष्टीने अयोग्य असलेली ही जागा खानसाहेबांनी इस्लामाबादहून जवळ म्हणून निवडली. १९७६च्या शरदऋतूत एक निष्णात स्थापत्यशास्त्र अभियंता ब्रि. सजवाल यांच्या नेतृत्वाखाली एका लष्करी विभागाला कहुता येथे खानसाहेबांना परमाणू प्रकल्प मदत करण्यासाठी भुत्तोंनी नियुक्त केले. ब्रि. सजवाल हे २००१ साली खान सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांचे मदतनीस म्हणून काम पहात होते. तीन वर्षांनंतर ISI संघटनेने खानसाहेबांच्याबरोबरच अण्वस्त्रांच्या प्रसाराबद्दलच्या चौकशीसाठी त्यांनाही अटक केली. या पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंत (२००७) ते अज्ञात ठिकाणी अटकेतच आहेत, पण वयाच्या आठव्या वर्षापासून कहूताला राहिलेला व खानसाहेबांच्या एका जावयाबरोबर धंद्यात असलेला त्यांचा मुलगा डॉ. मुहम्मद शफ़ीक खान हा लेखकांशी बोलायला तयार झाला.

"कहूता ही एक एकाकी जागा होती. तिथे एक छोटी खोली असलेली झोपडी होती व बाहेर एक झाड होते. तिथे आम्ही आमची गाडी पार्क केली." शफ़ीक आठवणी सांगत होते. ब्रि. सजवाल हे एका अतीशय गुप्त प्रकल्पाचा भाग होते व त्यात निवड झाल्यामुळे त्यांची समाजात 'वट' वाढली होती व आपल्या कुटुंबियांसह ते खानसाहेबांच्या निवडक सहाय्यकांसाठी रावळपिंडीत बांधलेल्या 'पॉश' बंगल्यात रहायला गेले. पण त्यांना अटक झाल्यापासून डॉ. शफ़ीक पोलिसांच्या नजरेखाली आपले जीवन कंठत होते. घराबाहेर कायम सिगरेटी फुंकणार्‍या व कायम मोबाईल फोनमध्ये बोलत असणार्‍या माणसांनी भरलेली एक गाडी उभी असते. ISI गुप्तहेर सगळीकडे पसरलेले होते.

डॉ. शफ़ीक म्हणतात कीं माझे वडील अतीशय गुप्त व राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पात गुंतले होते. आम्ही खूप रोमहर्षक जीवन जगत होतो. हळू-हळू आम्हाला कळले कीं खानसाहेब पाकिस्तानचा अणूबॉम्ब बनविण्याच्या प्रकल्पात गुंतलेले आहेत. खानसाहेबांचे सहकारी डॉ. शफीक यांचे बालपणीचे मित्र बनले. "खानसाहेबांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक सर्किट्री बनविणारे जावेद मिर्ज़ा आमच्या घरच्या लग्नसमारंभात व्हीडियो कॅमेरा आम्हाला तयार करून देत." लवकरच डॉ. शफ़ीक आपल्या वडिलांबरोबर नित्यनेमाने जात असत. "आम्ही तर खानसाहेबांच्याकडे पाकिस्तानचा तारक याच भूमिकेतून पहात होतो."

प्रकल्प-७०६ चे सर्व उपविभाग एकसमयावच्छेदेकरून सुरू करण्यात आले: कहूता येथील मुख्य कारखान्याची इमारत, जरूर असलेल्या साधनांची व उपकरणांची युरोपमधून खरेदी, पहिल्या प्रतिकृतीचे उत्पादन/घडणावळ, त्यांची चांचणी घेण्यासाठीची प्रयोगशाळा (pilot plant) एवढेच काय तर खानसाहेबांनी "अण्वस्त्र संरचना केंद्र"सुद्धा (Weapons Design Centre) उभे करण्याची योजनाही एकाच वेळी सुरू केली होती. खानसाहेबांच्या हिशेबाप्रमाणे बॉम्ब बनविण्याचा प्रकल्प सातत्याने चालू ठेवण्यासाठी त्यांना कमीतकमी १०,००० सेंट्रीफ्यूजेसची गरज लागणार होती. त्यांनी G-2 ऐवजी CNOR प्रकारची सेंट्रीफ्यूजेस निवडली कारण युरोपियन राष्ट्रांनी G-2 प्रकारची सेंट्रीफ्यूजेस निवडल्यामुळे CNOR चे घटकभाग पुरविणार्‍या कंपन्यांकडे ते भाग पडून होते व त्या ते कुणालाही विकायला एका पायावर तयार होते. पण CNOR प्रकारच्या सेंट्रीफ्यूजेसमध्ये एक डोकेदुखी होती जी URENCO च्या इंजिनियर्सनी सोडविली नव्हती. तिचे खालचे बेअरिंग म्हणजे एक छोटासा बॉल एका सुईत घुसविलेला होता आणि तो फिरणार्‍या मशीनच्या बेसप्लेटला जोडला होता. हा छोटा सुईच्या आकाराचा आस दर मिनिटाला ७०,००० वेळा स्वतःभोवती फिरणार्‍या भागाला धरून ठेवी व त्याला वंगण पुरविण्यासाठी मानवी डोळ्याना जेमतेम दिसणारी एक चक्राकार खाच किंवा खोबण दिलेली होती. ही खाच बेअरिंगच्या आतल्या बाजूला कोरून काढली जायची आणि हे बेअरिंग वंगणाच्या कपात बसविलेले होते.

संगणकांच्या सहाय्याने चालणार्‍या अतीशय अचूक अशा लेथ मशीनवर ही खाच बेअरिंगच्या आतल्या बाजूला कोरली जायची व थोडीशी जरी चूक झाली तर हा उच्च वेगाने स्वत:भोवती फिरणारा भाग एका बाजूला झुकायचा आणि परिणामत: ती संपूर्ण सेंट्रीफ्यूज कोसळायची. पण खानसाहेब प्रयत्न करत राहिले.

त्यांनी ब्रि. सजवाल यांना सांगितले होते कीं हे सेंट्रीफ्यूजेसचे दालन हवाबंद हवे व त्याची जमीन किंवा फरशी तिथे वारंवार घडणार्‍या भूकंपांना तोंड देऊ शकेल अशी १० फूट जाड हवी होती. म्हणून हे संपूर्ण दालन पक्क्या पायावर उभे केले होते व त्याला वातानुकूलित करू शकणारी अद्ययावत् अशी यंत्रणाही बसविलेली होती कारण सेंट्रीफ्यूजेस वापरण्याची प्रक्रिया प्रचंड उष्णता निर्माण करायची. युरेनियम हेक्जाफ्लुराईड वायू या सेंट्रीफ्यूजेसमध्ये घातला जायचा व तो सातत्याने एका सेंट्रीफ्यूजमधून पुढच्या सेंट्रीफ्यूजमध्ये घातला जायचा व प्रत्येक सेंट्रीफ्यूजमध्ये तो जास्त-जास्त शुद्ध झालेला असायचा.

पाकिस्तानातील वीजपुरवठा फारच अस्थिर व पात्रतेपेक्षा जास्त ग्राहक असलेला असल्यामुळे उन्हाळ्यात रावळपिंडी व इस्लामाबाद या शहरांचे कित्येक भाग तासंतास अंधारात असत. त्यामुळे कहूतासाठी एक वेगळे छोटे वीजनिर्मितीकेंद्र बांधले होते.

खानसाहेबांनी असाही आग्रह धरला होता कीं प्रकल्प-७०६ घटकभाग बनविण्यातही आत्मनिर्भर झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने ब्रि. सेजवाल यांना सेंट्रीफ्यूजेसचे घटकभाग स्वदेशीच बनविण्यासाठी युरोपमधून येऊ घातलेल्या सर्व अद्ययावत् यंत्रांना बसविण्यासाठी कांहीं यंत्रशाला (machine tool workshops) बांधायला सांगितले. तांत्रिक गोष्टी तर होतच होत्या पण त्याखेरीज पहारेकर्‍यांना देखरेख करण्यासाठी लागणारे मनोरे, धोक्याचा संकेत देणार्‍या यंत्रणा, मोठमोठे ट्रक येऊ-जाऊ शकतील असे रुंद व पक्के रस्ते, अधिकार्‍यांना लागणार्‍या सोयी, दूरध्वनी, फ़ॅक्ससारखी दळणवळणाची साधने, कामासाठी येणार्‍या-जाणार्‍या शास्त्रज्ञांसाठी अतिथीगृहें अशा अनेक गोष्टी लागणार होत्या. ही सारी कामे एकाच वेळी सुरू झाल्यावर इस्लामाबद येथील वेगवेगळ्या देशांच्या दूतावासांतील अधिकार्‍यांपर्यंत याची वाच्यता होणे सहाजीकच होते. प्रथम त्यांना काळजी होती कीं त्यांना सहलींना जाण्यासाठी आवडीच्या असलेल्या या जागा त्यांना न मिळण्याची. पाकिस्तानात साधारणपणे ज्या वेगाने असली कामे होत त्यापेक्षा खूपच जास्त वेगाने या गोष्टी घडत असल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटायचे. खानसाहेब गमतीने म्हणत कीं, "दिवसेंदिवस काय? आता तुम्हाला तासा-तासाला झालेली प्रगती पहायला मिळेल." लष्कराच्या इंजिनियरिंग विभागाच्या तुकड्या सुरेख काम करत होत्या!

हे असले मूलभूत सुविधांचे काम (infrastrucure) ब्रि. सजवाल यांच्यावर सोडायला जरी खानसाहेब राजीखुषी तयार झाले असले तरी सेंट्रीफ्यूजेसची संरचना व त्यांची जुळवणी (assembly) हे काम ते जातीने स्वत:च्या देखरेखीखाली करणार होते. त्यांनी या सेंट्रीफ्यूजला 'पी-१' असे नाव दिले.

१९७६ सालापासून खानसाहेब आपल्या प्रकल्पासाठी युरोपला छोट्या फेर्‍या मारू लागले. अशाच एका भेटीत त्यांची व ग्रिफिन या इंग्लिश माणसाची ओळख व पुढे गट्टी जमली. बराच वेळ ते एकत्र असत.

ग्रिफिन यांना अद्यापही आठवण आहे कीं १९७६ च्या उन्हाळ्यात ते एक स्वानसी गावी 'सिमितार' या मशीनटूल्स पुरविणार्‍या कंपनीच्या विक्रीविभागाचे व्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांना सलाम नावाच्या एका पाकिस्तानी माणसाचा चुकून (wrong number) फोन आला आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले. सलाम यांना १० लाख पौंडाची रॉकवेल कंपनीची पॉवरटूल्स हवी होती.

लंडन येथील बैठकीत सलाम म्हणाले कीं ही सारी साधनसामुग्री पाकिस्तानच्या औद्योगीकरणात व पाकिस्तानच्या आधुनिक युगातील प्रवेशाबाबतसुद्धा मदत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अब्दुल कादीर खान या हुशार तरुण पाकिस्तानी शास्त्रज्ञासाठी हवी आहे.

सलाम यांचा खानसाहेबांच्याबरोबर संबंध कॉलिंडेल (उत्तर लंडन) येथील एका स्थानीय मशीदीद्वारा आला होता. तिथे डॉ सलाम हे एका परदेशस्थ भारतीय मुस्लिम माणसाबरोबर प्रार्थना करत असत. या भारतीय मुस्लिम माणसाने एके दिवशी असे उघड केले कीं त्याच्या शाळूसोबती मित्राने त्यांच्याशी संपर्क साधला होता व तो पाकिस्तानात अभियांत्रिकी साधनसामुग्रीच्या आयातीबाबत मदत शोधत होता.

सलाम ग्रिफिनला जेंव्हा म्हणाले कीं फायदेशीर अशा रॉकवेलच्याही पलीकडचा धंदाही मिळेल, तेंव्हा ग्रिफिन साशंक होता कारण पाकिस्तानी हे सारे कशासाठी करत होते याबद्दल त्याला खात्री नव्हती.

ही कंपनी परदेशस्थ पाकिस्तान्यांनी चालविलेल्या डझनभर कंपन्यातली एक होती. त्यांची नावे अगदी लक्षही जाणार नाहीं अशी किरकोळ असायची व ती सर्व खानसाहेबांना घटकभाग पुरवायची. कुणाच्या डोळ्यात येऊ नये म्हणुन त्याला मिळालेल्या ऑर्डर्स "पसरवून देण्या"साठी सलामने आणखी अशा ’डमी’ कंपन्या काढल्या. शेवटी १९७७च्या ऑगस्टमध्ये त्याने ग्रिफिनची व खानसाहेबांची परस्परांशी ओळख करून दिली.

त्यांची मीटिंग जिथे झाली तिथल्या गोलमेजाभोवती खानसाहेब, ब्रि. सजवाल, त्यांचे उपनिर्देशक डॉ. फरूख हाश्मी, संगणकतज्ञ डॉ. आलम, ब्रि. अनीस अवाब असे लोक होते असे ग्रिफिन यांना आठवते!.

त्या जुन्या काळी खानसाहेब हे फारच उमदे गृहस्थ होते; लाघवी, स्नेहल, हुषार आणि उदार! जसजशी त्यांची जास्त ओळख झाली तसे खानसाहेब त्यांना दर आठवड्याला इंग्लंडला केवळ गप्पा मारायला फोन करीत.

यानंतर थोड्याच दिवसात पाकिस्तानी शास्त्रज्ञ विमानाने घटक भागांच्या शोधात लंडनच्या वार्‍या करू लागले. ग्रिफिन यांच्याशी प्रामुख्याने संपर्क ठेवणारे व खानसाहेबांच्या उत्पादन यंत्रशाळेचे प्रमुख कर्नल रशीद अली काजीही बरोबर असायचे. मोठ्या खरेदीसाठी खानसाहेब स्वत:ही पर्यवेक्षणासाठी येत असत. कधी-कधी ग्रिफिन यांना त्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडील "निष्ठा" अशा धंद्यात दिसायच्या. उदा. एकदा ग्रिफिन यांनी खानसाहेबांना लेझर रेंजफाइंडर्स चीनकडून न घेता इस्रायलकडून घेण्याबाबत पटवून देण्याचा प्रयत्न केला कारण हे रेंजफाइंडर्स इस्रायलमध्येच बनत असत व त्यामुळे थेट विकत घेतल्यास कमी किमतीत मिळाले असते. पण खानसाहेबांनी "चिनी लोक आमचे मित्र आहेत" असे सांगून ग्रिफिन यांचा हा सल्ला ठामपणे नाकारला.

अशा लंडनच्या वार्‍या करून कर्नल काझी घरी परत आल्यावर कुठल्या-कुठल्या घटकभागांची ऑर्डर द्यायची हा निर्णय खानसाहेबांनी घेतल्यावर त्यांच्याकडून एक टेलेक्स ग्रिफिन यांना पाठवला जाई. "मी तर फक्त यंत्रशाळेतली मशीने विकायचो. कधी ती बांधकाम खात्याला (Civil Works Organisation) पाठवायचो तर कधी अभियांत्रिकी संशोधन प्रयोगशाळेला पाठवायचो तर कधी कहूता संशोधन प्रयोगशाळेला!" इति ग्रिफिन.

जशी धंद्याची व्याप्ती वाढली तेंव्हा ग्रिफिन यांना पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रण आले. ग्रिफिन सांगतात, "मला इस्लामाबाद फार आवडायचे, त्यातूनही पाकिस्तान्यांची gossiping ची हौस."

पहिल्या कांही भेटीत ते खानसाहेबांच्या इस्लामाबाद येथील घरीच उतरत. त्यांची मुलगी ते आले कीं त्यांच्याकडे पळत जाऊन त्यांना "चाचा-चाचा" करत मिठी मारायची. जेवणानंतर खानसाहेब डायरी लिहीत तर ग्रिफिन सोफ्यावर बसून रहात. खानसाहेबांना बिनचूक व निर्दोष इंग्रजीत लिहायचा ध्यासच होता व त्याबाबतीत ते कधी-कधी ग्रिफिन यांचा सल्ला घेत.

खानसाहेबांचे खरेदीचे जाळे छानपणे फुलत होते. पण कांहीं माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल ते फीरमन यांना लिहीत. "अगदी खाजगीत व गुप्ततेत विचारतोय्" अशी सुरुवात करून ते फीरमनला मदतीचे आवाहन करीत व अत्यंत महत्वाची व गोपनीय तांत्रिक माहिती विचारत. फीरमन तर घाबरून घामाघूम होत असे. जेंव्हा फीरमन उत्तर देईनासा झाला तेंव्हा त्यांनी आशा न सोडता निश्चयी वृत्तीने पुन्हा लिहिले. तरीही जेंव्हा उत्तर येई ना, तेंव्हा खानसाहेब युरेंको कंपनीला माल पुरविणार्‍या कंपन्यांना थेट लिहू लागले. त्यात पश्चिम जर्मनीतील ’हानाउ’ या गावात असलेल्या लेबोल्ड हेरॉयस कंपनीच्या विक्रीखात्याचा मॅनेजर गोठार्ड लर्च हाही होता. याच कंपनीने CNOR व G-2 या प्रकारच्या सेंट्रीफ्यूजेससाठी व्हॅक्यूम पंप, वायू शुद्धीकरण यंत्रणा आणि त्यात लागणार्‍या खास झडपा (valves) पुरविल्या होत्या. लेबोल्ड हेरॉयस कंपनी तडक सरकारकडे तक्रार करेल अशी भीती खानसाहेबांना वाटत होती. पण लर्च यांना खासगीत धंदा करून पैसे कमवायचे होते.

खानसाहेबांच्या यादीत पुढची महत्वाची गोष्ट होती सेंट्रीफ्यूजेस जो वायू शुद्धीकरणासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो त्या UF6 या वायूच्या उत्पादनासाठी लागणारी साधनसामुग्री. या वायू उत्पादनासाठी लागणारे व सुलेमान पर्वतातील खाणींमध्ये मिळणारे "Yellow cake" हे युरोनियमचे खनिज व फ्लुओराईटचे स्फटिक हा कच्चा माल पाकिस्तानमध्येच मिळायचा. UF6 या वायूच्या उत्पादनासाठी लागणारी साधनसामुग्री मिळविण्यासाठी त्यांनी West Berlin Technische Universitat मध्ये ओळख झालेल्या हाइंझ मेबुस या गृहस्थांशी संपर्क साधला. (हेनीला मिळविण्यासाठी खानसाहेबांनी याच कॉलेजला रामराम ठोकला होता.) खानसाहेबांनी संपर्क साधला त्यावेळी मेबुस हे पश्चिम जर्मनीच्या इस्पितळांत क्ष-किरणाची यंत्रणा बसवत होते. UF6 हा वायू बनविण्याची यंत्रणा व फ्लुओराईट स्फटिकासाठीचा कारखाना बसवून देण्याची तयारी तर त्यांनी दाखविलीच, पण या कारखान्याची सर्व यंत्रसामुग्री पुरविण्यासाठी त्यांनी खानसाहेबांची ओळख फ्रायबुर्ग या शहरात रहाणार्‍या आल्ब्रेक्ट मिग्युले यांच्याशी करून दिली. मिग्युले १९६७ सालापासून पाकिस्तानशी व्यवसाय करत होते. त्यांनीच पूर्वीचे लष्करशहा ज. अयूब खान यांच्या मुलासाठी लोणी व मार्गरीन बनविण्याचा कारखाना उभारून दिला होता.

CES Kalthof GmbH या मिग्युलेंच्या कंपनीबरोबर १९६७ साली झालेल्या करारानंतरच्या काळात त्यांनी फ्लुओराईट स्फटिके पाकिस्तानातील खाणीतून खणून युरोपमधील ग्राहकांना निर्यात करण्याचे कंत्राट मिळविले होते. ही फ्लुओराईट स्फटिके टूथपेस्टपासून मार्गारीन बनविण्यासाठी वापरली जातात. मिग्युलेने खानसाहेबांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
मिग्युले यांच्या लोणी कारखान्याशी असलेल्या संबंधांमुळे कांहीं पाकिस्तानी सेनाधिकारी या प्रकल्पाला गमतीने 'लोणी कारखाना प्रकल्प' म्हणत. खानसाहेब व ISI चे अधिकारी आपापसातल्या पत्रव्यवहारात UF6 ला 'लोणी', तर शुद्धीकृत युरेनियमला 'केक', 'मिठाई' किंवा 'बिस्किट' म्हणत.

१३ नव्हेंबर १९७६ साली मिग्युले अर्शद, अमजद व अबीद लि. या नकली (dummy) कंपनीबरोबर दहा लाख डॉलरचे फ़्लुओराईन कारखाना उभारण्याच्या कंत्राटावर सही करण्यासाठी कराचीला गेले. ही कंपनी ७०६ प्रकल्पाचे नाव लपविण्यासाठी उभी केली गेली होती. त्यानंतरच्या जानेवारीत मिग्युले युरेनियमचे UF6 मध्ये रूपांतर करणारा कारखाना मुलतान या शहराच्या बाहेर उभारण्याच्या कंत्राटावर सही करण्यासाठी पुन्हा परतले.

१९७७ च्या मार्चमध्ये मिग्युले, मेबुस व म्यूनिक येथील रसायनशस्त्रवेत्ता एर्विन वेल्डुंग या तीघांना प्रथम श्रेणीच्या तिकिटाचे पैसे देऊन पाकिस्तानी सरकारने या दोन कारखान्यांच्या संरचनेची चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले. ९ मार्च रोजी गावाबाहेरील सरकारी विश्रामगृहामध्ये त्यांची अर्शद, अमजद व अबीद लि. कंपनीच्या निर्देशकांबरोबर बैठक झाली. खरे तर ते निर्देशक होते ’KRL’च्या आयातविभागाचा प्रमुख महंमद फरूक, शस्त्रसंरचनाविभागाचा तज्ञ जाविद मिर्ज़ा व एक कहूताचा अधिकारी.

खानसाहेबांना इतकी घाई होती कीं ते अनावश्यक धोका पत्करू लागले. एकदा त्यांनी अर्शद-अमजद-अबीद कंपनीच्या इर्शाद अख्तर या अभियंत्याला चांचणीसाठी एक बॅगभर Yello cake घेऊन पाठविले. जर्मनीच्या कस्टम्सच्या अधिकार्‍यांनी त्यांना सामान उघडायचा आग्रह धरला पण मिग्युलेने कस्टमवाल्यांची समजूत घातली. जर्मन कस्टमवाल्यांना युरेनियमचे रूपांतराबद्दल प्रशिक्षणही नव्हते.

मिग्युले आणि मेबुस यांच्याबरोबरचे प्रकल्प-७०६ च्या निमित्त्याने झालेले सहकार्य़ या प्रकल्पाच्याही पलीकडेही चालू राहिले. भविष्यकाळात मेबुस यांनी त्यांची ओळख सीमेन्स या जर्मन अभियांत्रिकी कंपनीशी करून दिली व या कंपनीच्या अधिकार्‍यांपैकी एका आगळ्या व ठसठशीत व्यक्तिमत्वाच्या व सोनेरी, पिंगट केसांच्या गुनेस चिरे नावाच्या तुर्की अभियंत्याची नेमणूक केली. त्यांच्या १९६४ साली झालेल्या लग्नाला उपस्थित राहिलेल्या त्यांच्या एकुलत्या एक कॉलेजमधील मित्राला-हेंक स्लेबोज-लाही खानसाहेबांनी आपल्या कंपूत खेचले. १९७७ सालच्या जानेवारीत तसा तो बेकारच होता व खानसाहेबांना सेंट्रीफ्यूजचे घटकभाग मिळवून देण्यात मदत करायला तो एका पायावर तयार झाला. (त्याच्या ’गोर्‍या चमडी’चा खानसाहेबांना खूप फायदा झाला.) खानसाहेब विनोदाने म्हणायचे कीं तुम्ही हे सामान मला थेट विकायला कां-कूं करीत आहात, पण तेच सामान ’टॉम’ला विकायला तयार आहात. टॉम मला विकेल व स्वत:चे कमीशन घेईल. हा तर एक व्यवसायाचा भाग झाला! ठीक आहे.

स्लोबोजने खूप मेहनतीने खानसाहेबांचे काम केले व खान यांच्या चिरे यांच्यासारख्या इतर सहकार्‍यांच्या बरोबरही चांगले सहकार्य केले. चिरे यांच्या सहकार्याने त्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोटारी, जनित्रें (dynamo) व अल्युमिनियमची ओतकामें (castings) मिळवून दिली. ग्रिफिन यांना चिरे खान यांच्या इस्लामाबाद येथील अतिथीगृहात भेटले होते व त्यांच्याबरोबरही त्यांनी अनेक व्यवहार केले.

ग्रिफिन यानी खूपदा ठासून सांगितले होते कीं या सर्व खरेदीत खानसाहेबांचा खरा मनसुबा काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. पण चिरे नेहमीच म्हणत कीं डॉ. खान यांनी त्यांना बॉम्ब बनवायचा आहे ही गोष्ट कधीच लपवून ठेवली नव्हती.

स्लेबोजच्या मते अण्वस्त्रप्रसारबंदीच्या करारामुळे चार अण्वस्त्रधारी राष्ट्रांचा अण्वस्त्रे बाळगायचा हक्क कायदेशीर झाला असून IAEA च्या तपासणीच्या जाचातून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली आहे. अण्वस्त्रे असलेल्या राष्ट्रांना जशी एक भीमशक्ती मिळते त्याचेच हे प्रदर्शन होते व पाकिस्तानलाही ही भीमशक्ती हवी होती.

स्लेबोज यांनी त्यांचा जुना साहेब झोंडाग यांनाही या प्रकल्पात ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अशी मदत देण्यास साफ नकार दिला व त्यांनी लागलीच URENCO च्या UCN या डच भागीदाराला एक इशारा म्हणून सांगितले कीं स्लेबोज युरेंकोच्या G-2 जातीच्या सेंट्रीफ्यूजच्या प्रतिकृतीबाबत माहिती असलेली एक सूटकेस घेऊन त्याचे सुटे घटकभाग मिळविण्यासाठी भटकत आहे. झोंडाग यांनी डच गुप्तहेरखात्यालाही स्लेबोसच्या मनात काय आहे याबद्दलची सूचना दिली व स्लेबोजच्या पाकिस्तानला जायच्या तारखाही सांगितल्या. पण गुप्तहेरखात्याने पुन्हा इकडे दुर्लक्ष केले.***

युरोपच्या राजदूतावासातील मुत्सद्दी असल्याच्या छत्राचा गैरफायदा घेणार्‍या ISI च्या क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या पर्यवेक्षणाखाली १९७७ मध्ये खानसाहेबांच्या खरेदीबाबतच्या कारवाया युरोपभर जोरात सुरू होत्या.

बॉन या जर्मन राजधानीच्या वाचबर्ग-पेक या उपनगरातील एका रहिवासी क्षेत्रातल्या सदनिकेतून आणखी एक प्रचंड कारवाई चालू होती. इथे खानसाहेबांच्या Special Works Organization चा एक हस्तक इक्रम-उल-हक याने Team Industries या स्टुट्टगार्ट गावच्या अभियांत्रिकी कंपनीवर अनेक वस्तूंच्या मागण्या नोंदवल्या. या कंपनीचा ’मुखवटा’ असलेला निर्देशक अर्न्स्ट पिफ्फ्ल व इक्रम-उल-हक यांनी जवळ-जवळ १ कोटी १० लाख डॉलर्सच्या सुट्या घटकभागांची मागणी १९७७ साली नोंदविली. त्यात इंग्लंडमधील स्विंडनस्थित इमर्सन इंडस्ट्रियल कंट्रोल्स् या कंपनीकडून इन्व्हर्टर्स, पश्चिम जर्मनीतील सिंगनस्थित Aluminum Walzwerker GmbH या कंपनीकडून रोलिंग केलेल्या सळ्या, हॉलंडच्या टिल्बुर्गस्थित Van Doorne Transmissie कडून खास करून टणक करवून घेतलेले (hardened) नळ्या व जर्मनीतील हानाउस्थित Leybold Heraeus या कंपनीच्या गोट्ठार्ड लर्चकडून वायूशुद्धीकरणाच्य यंत्रणेसाठी लागणारी निर्वातीकरणाची यंत्रसामुग्री (vacuum equipment) यांचा समावेश होता.

G-2 किंवा URENCO या प्रक्रिया इतक्या नव्या होत्या कीं त्याच्यात लागणार्‍या सुट्या घटकभागांची माहिती अजून युरोपीय सरकारांच्या प्रतिबंधित वस्तूंच्या यादीत आलीच नव्हती. त्यामुळे त्यांच्या युरोपमधूनच्या निर्यातीला कुठेच आडकाठी आली नाहीं. कोरा इंजिनियरिंगचे प्रमुख रुडॉल्फ वाल्टी यांनी लेखकांना सांगितले "आम्हाला (’कोरा’ला) स्विस सरकारकडून असे सांगण्यात आले आहे कीं हा कारखाना उभा करण्याच्या व्यवहारावर कुठलेही बंधन येणार नाहीं." कोरा इंजिनियरिंगनेच युरेनियम खनिजाचे UF6 मध्ये रूपांतर करण्याची यंत्र सामुग्री पुरविली होती. युरेनियम खनिजाचे UF6 या वायूत रूपांतर करायची व शुद्धीकरणानंतर त्या वायूचे पुन्हा घनपदार्थात रूपांतर करण्याची यंत्रसामुग्री मात्र तीन Hercules C-130 या मालवाहक विमानातून पाकिस्तानात आणली गेली.

खानसाहेबांना या सर्वाचे मोठे श्रेय जाते. ही साधनसामुग्री विकत घेण्यासाठी त्यांना सर्व कंपन्यांची माहिती होती, त्यांना बर्‍याच भाषा येत होत्या व त्यांचा स्वभाव इतका मोहक (charming) होता कीं ते अशा अनेक गोष्टी विकत घेऊ शकले ज्या एरवी इतर पाकिस्तान्यांना विकत घेताच आल्या नसत्या!

पैशाचा लोभ, निर्यातीच्या मालावरील कस्टम्सच्या अधिकार्‍यांच्या तपासणीतील ढिलाई, लाल फितीत अडकलेली IAEA संस्था, प्रत्येक सरकारची स्वत:चे राष्ट्रीय हित सांभाळायची वृत्ती, कालबाह्य कायदे या सर्वांचा निर्दयपणे पुरेपूर फायदा पाकिस्तानने घेतला. पाश्चात्य राष्ट्रें आणि माल पुरविणार्‍या कंपन्या यांनी पाकिस्तानच्या कर्तृत्वाला होते त्यापेक्षा कमी लेखले. या कंपन्या आपापल्या सरकारांना सांगत कीं "हे मूर्ख पाकिस्तानी अब्जावधी डॉलर्स खर्च करू इच्छित आहेत आणि त्यांची सरकारे म्हणत कीं जर या मूर्खांच्याकडे रोकड पैसे असतील तर करू देत त्यांना खर्च व घेऊ दे विकत जे हवे ते"!

जेंव्हा खानसाहेबांना हव्या त्या सर्व गोष्टी मिळाल्या तेंव्हा त्यांनी उघडपणे मान्य केले कीं पाश्चात्य राष्ट्रांना खात्री होती कीं पाकिस्तानसारखा अविकसित देश कधीच अशा तर्‍हेच्या उच्च तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवू शकणार नाहीं. पण त्याच वेळी आम्ही मागितलेले सारे कांहीं आम्हाला विकण्यासाठी त्यांनी केलेल्या आवेशपूर्ण व चिकाटीच्या प्रयत्नांबद्दलही पाश्चात्य जग कधीच बोलणार नाहीं. उदा. खरण येथे खणलेला ३०० फूट खोली असलेला उभा बोगदा व त्याच्या खालच्या बाजूला बनविलेला ७०० फूट लांबीचा आडवा बोगदा. किंवा रास कोह येथे पर्वताच्या बाजूतून खोदलेले पाच आडवे बोगदे. हे सारे बोगदे १९८० साली पूर्ण करण्यात आले होते व पाकिस्तान अणूबॉम्बच्या चांचणीला तयार’ होईपर्यंत सीलबंद करून ठेवले होते.

कहूता व रास कोह येथील हालचाली जोरात चालू असल्या तरी आंतरराष्ट्रीय जगात पाकिस्तानच्या युरेनियम शुद्धीकरणाच्या प्रगतीबद्दल अंध:कारच होता. त्याऐवजी प्लुटोनियमच्या पुन:प्रक्रिया कारखान्याच्या (reprocessing) सौद्याबद्दल फ्रान्सबरोबर चाललेल्या वाटाघाटींना जीव तोडून विरोध केला जात होता कारण असा पुन:प्रक्रिया कारखाना हा प्लुटोनियम बॉम्बच्या निर्मितीचा अग्रदूतच समजला जात असे. अण्वस्त्रांसंबंधीच्या पाकिस्तानच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने रॉबर्ट गलुच्ची या अधिकार्‍याला नेमले. त्याने सर्व माहितीचा अभ्यास करून निर्वाळा दिला कीं पाकिस्तान हे परमाणूशास्त्रात सुरुवातच करत आहे त्यामुळे बॉम्ब बनवू शकेल अशी काळजी नाहीं. भारताच्या अण्वस्त्र चांचणीनंतर पाकिस्तानला अण्वस्त्र बनविण्याची इच्छा नक्कीच होती, पण पाकिस्तानने प्लुटोनियम मार्गाने जायचा निर्णय घेतलेला असल्यामुळे पाकिस्तानला अण्वस्त्रधारी राष्ट्र बनण्यापासून तो खूप दूर होता.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री किसिंजर यांनी भुत्तोंना अण्वस्त्रधारक राष्ट्र बनण्याच्या महत्वाकांक्षेपासून दूर ठेवण्यासाठी न्यू यॉर्क येथील एका बैठकीत एक अजब प्रस्ताव मांडला. जर पाकिस्तानने प्लुटोनियम पुन:प्रक्रियेच्या कारखान्याचा प्रकल्प रद्द केला तर त्या देशाला व या भागातील इतर देशांना लागणारे प्लुटोनियम स्वरूपातले इंधन अमेरिका तिच्या इराणमधील पुन:प्रक्रिया कारखान्यातून पुरवेल. त्यावेळच्या प्रे. फोर्ड यांच्या मदतनिसांचा प्रमुख (Chief of Staff) असलेला डिक चेनी व संरक्षणमंत्री डोनाल्ड रम्सफेल्ड यांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना होती. त्यांचे म्हणणे होते कीं इराणकडे तेल व नैसर्गिक वायू यांचा भरपूर साठा असला तरी इराणच्या भविष्यकाळातील विजेच्या गरजा भागवायला त्या देशाला परमाणू विद्युत् केंद्राची गरज होती.

"प्लुटोनियम पुन:प्रक्रियेच्या कारखान्याबद्दलच्या चर्चेवर लक्ष केंद्रित करून कहूता येथील हालचालींबद्दलची माहिती सार्‍या जगापासून लपवून ठेवणे शक्य होईल" हे धूर्त भुत्तोंचे मत होते असे त्यावेळचे माहिती मंत्री कौसर नियाजी यांनी आठवणीने सागितले. प्रकल्पाच्या खर्चाबद्दलच्या कार्यक्षमतेकडे बारकाईने पहाणार्‍या भुत्तोंना अशीही आशा होती कीं अमेरिकेच्या दबावामुळे प्लुटोनियम पुन:प्रक्रियेच्या कारखान्याची कल्पना सोडून द्यायचा निर्णय घेतल्यास फ्रेंच कंपनीला अशा तर्‍हेने मध्येच तो प्रकल्प बंद केल्यामुळे द्यावी लागणारी नुकसान-भरपाई फ्रान्सला द्यावी लागणार नाहीं.

पण शेवटी फसव्या युक्तिवादापोटीच भुत्तो यांचे पतन झाले. आपली पाकिस्तानातली राजकीय प्रतिमा सुधारण्यासाठी व अमेरिकेबरोबरचा अटळ व अपरिहार्य संघर्ष पुढे ढकलण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यावर्षीच्या मार्चमध्ये सार्वत्रिक निवडणूक घ्यायचे ठरविले. १९७० सालची निवडणुक त्यांच्या पाकिस्तान जनता पक्षाने (PPP-Pakistan Peaople's Party) गरीब जनतेच्या पाठिंब्याने प्रचंड बहुमताने जिंकली होती व त्यांना ते पुन्हा अशी निवडणूक जिंकतील अशी त्यांना खात्री होती. पण बरेच लोक जमात-ए-इस्लामी या मुस्लिम गटाचे नेते मौलाना मौदूदी या सनातनी विचाराच्या धर्मगुरूच्या नेतृत्वाखालील युतीकडे आकर्षित झाले होते. मौदूदी हे पीपीपीच्या मध्यममार्गी व सांप्रदायिक बखेड्यात गुंतलेल्या राजकारणाला एक धर्माधिष्ठित विकल्प देत होते. पण पूर्वीपासूनच्या "पाकिस्तान हे एक धर्माधिष्ठित नियमनिष्ठ राष्ट्र बनावे" या त्यांच्या मतप्रवाहाला मुख्य आधार विद्यार्थी व कामगार संघटनांचाच होता. पण यावेळी मध्यमवर्गीय जनतेला व खेडोपाड्यातील गरीब जनतेलाही त्यांच्या भाषणांनी आकृष्ट केले व आपण खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येवू ही भुत्तोंची अटकळ चुकीची ठरतेय् काय अशी शंका येऊ लागली.

प्रचाराच्या काळात मौदूदी यांनी जेंव्हा "भुत्तो भरपूर प्रमाणावर मदिरापान करतात व पिऊन तर्र झालेल्या अवस्थेत बेभान पार्ट्यांमध्ये भाग घेतात" असे आरोप केले तेंव्हा भुत्तो उपरोधाने उत्तरले होते कीं "ते वाईन पीत असतील, लोकांचे रक्त तरी नाहीं पीत"! मौदुदी यांच्या खुनशी पांथिक स्वभावाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेले हे वक्तव्य होते. हे कार्यकर्ते पाकिस्तानच्या सीमेवरील खेड्यातल्या लोकांच्या जीवनावर अंमल गाजवत असत.

७ मार्च १९७७ रोजी निवडणुकीच्या रात्री भुत्तो काळजीत पडले. त्यांनी त्यांचे मित्र असलेले अमेरिकेचे राजदूत बायरोडे यांना टीव्हीवर निवडणुकीचे निकाल पहायला बोलावले. ते म्हणाले कीं भुत्तो पेशावर, पंजाब इथेच काय पण कराचीतही हरताहेत असे दिसते. पण दुसर्‍या दिवशी भुत्तोंच्या पक्षाने २०० पैकी १५५ जगा जिंकल्याची घोषणा झाली.
भुत्तोंवर निवडणूक 'चोरल्या'चा आरोप करून मौदीदींनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली व हिंसा वाढू लागल्यावर त्यांनी भुत्तोंवर पुन्हा दारुडे असल्याचा व नास्तिक असल्याचा आरोप केला. या सर्व बखेड्यांच्यामध्ये आणखी घोटाळ्यात टाकणारी अफवा उठली कीं कराची येथील एका सत्कार समारंभात भुत्तोंना लष्कराने अटक केलेली आहे. पण त्यांना अटक झालेली नाहीं असे दर्शविणारा परवलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने कराचीमधील कॉन्शुलेटचे प्रमुख रॉबर्ट मूर यांनी इस्लामाबाद येथील अमेरिकेचे पोलिटिकल काऊन्सुल हॉवर्ड शेफर यांना निर्धास्त होऊन फोनवर म्हणाले, "पार्टी संपली". पण हा फोन टॅप केलेला होता व एक वेगळाच निरोप भुत्तोंच्यापर्यंत पोचला.

जशी हिंसाचाराचा डोंब विझण्याची कांहींच चिन्हे दिसेनात तसा भुत्तोंनी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांसंबंधींच्या महत्वाकांक्षा निष्फळ करण्यासाठी पाकिस्तानच्या अंतर्गत बाबतीत अमेरिका ढवळाढवळ करीत आहे असा कांगावा सुरू केला. याआधीच्या ऑगस्टमध्ये अधिकृत सरकारी भेटीसाठी पाकिस्तानला आलेल्या हेन्री किसिंजर यांनी त्यांना लाहोर येथे दिलेल्या शाही भोजनाच्या वेळी जेवणाच्या बशांवरून वाकून "अण्वस्त्रांबाबत तुम्ही अमेरिका सांगते आहे तसे न केल्यास अमेरिका तुमचे एक भयंकर उदाहरण करेल" अशी धमकी दिल्याचा दावा केला. आपला हा मुद्दा लोकाना व्यवस्थित पटावा म्हणून त्यांनी अमेरिकन मुत्सद्दी आपल्या पतनाचा कट कसा शिजवत आहेत या संबंधीचे मुत्सद्द्यांमधील टेलिफोन संभाषणही भुत्तोंनी उघड केले. मूर व शेफर यांच्यातील "पार्टी संपली, पार्टी संपली" या संभाषणाची मिस्कीलपणे नक्कल करीत ते म्हणाले कीं "लोकहो, पार्टी मुळीच संपलेली नाहीं"

मे १९७७ मध्ये भुत्तोंनी आपला अमेरिकेवरचा दबाव वाढविंण्यासाठी CIA संघटना पाकिस्तानचा परमाणू कार्यक्रम बंद पाडण्यासाठी कसा कट करत आहे याबद्दलचे सर्व कागदपत्र असलेली एक फाईल नव्यानेच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री झालेल्या सायरस व्हान्स यांना दिली. पण त्यांनी या प्रकारात लक्ष घालण्यास नकार दिला.

पण भुत्तोंना पाकिस्तानी लष्करातील अस्वस्थपणा लक्षात आला नाहीं. ज. झियांचा "Monkey General" उपहासपूर्ण उल्लेख करूनच भुत्तो थांबले नाहींत, तर "ते शामळू असल्यामुळेच मी त्यांना पदोन्नती दिली" असा शेराही त्यांनी मारला होता. झिया यांच्यावरही लष्करातील अधिकार्‍यांपासून एक तर्‍हेचा दबाव होता कारण त्यांच्याहूनही जास्त ज्येष्ठ व लायक अशा अधिकार्‍यांना डावलून लष्करप्रमुख म्हणून त्यांना भुत्तोंनी नेमले होते. लष्कराच्या आतील व बाहेरील तीव्र मतभेद चिरडून टाकण्यासाठी झियांनी भुत्तोंची उचलबांगडी अचानकपणे करण्यासाठी वैकल्पिक योजना "ऑपरेशन फेअर प्ले" तयार करायला सुरुवात केली.

भुत्तो चार बाजूंना तोंड देत होते: कार्टरद्वारा फ्रेंचांवर दडपण आणणे, कहूता प्रकल्प पाश्चात्यांपासून लपवणे, देशातील असंतोषाला तोंड देणे व लष्करी अधिकार्‍यांना दिवसाआड भेटून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे. शिवाय कहूता प्रकल्पाच्या खरेदीचे कामही तुफान वेगाने चालले होते. "हा एकटा माणूस इतक्या आघाड्यांवर लढत होता" भुत्तोंचे माहिती मंत्री कौसर नियाज़ीं आठवण काढत म्हणाले.

५ जुलै १९७७ पहाटे रोजी झिया यांनी भुत्तोंना अटकेत टाकले. दोघेही अमेरिकन स्वातंत्र्यदिनानिमित्त्य अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत हमेल यांनी दिलेल्या भोजनसमारंभाला हजर राहून घरी गेले होते. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अशा तर्‍हेने लष्कराने सत्ता हस्तगत करण्याची ही तिसरी घटना होती. नंतर त्यांनी भुत्तोंना सोडले व झिया यांनी नव्याने निवडणुका घेण्यासंबंधी घोषणाही केली. पण झियांच्या सल्लागारांनी भुत्तो कसे सूड घेणारे गृहस्थ आहेत हे त्यांच्या मनावर बिंबविल्यामुळे त्यांनी ३ सप्टेंबर १९७७ रोजी भुत्तोंना पुन्हा अटक केली. भुत्तोंची सर्वात मोठी मुलगी बेनझीर भुत्तोंच्या बाजूने लढायला उभी ठाकली. हावर्ड व ऑक्सफर्ड येथे शिक्षण घेतलेली २५ वर्षे वयाची ही तरुण मुलगी निवडणुकीनंतरच्या दंगलींच्यादरम्यान पाकिस्तानला परतली होती व तिने लाहोर येथील भुत्तोंचा तुरुंग आणि सार्वजनिक मंच यांच्यात ये-जा चालू ठेवून भुत्तोंसाठी जनतेचा पाठिंबा उभा करण्याचा प्रयत्न चालविला.

झियांचे सहकारी त्यांना भुत्तोंना फाशी द्यायचा सल्ला देत होते! याला उत्तर म्हणून "भुत्तोंना मारल्यास पाचही नद्यातून रक्त वाहील" असा इशाराही तिने पंजाबमधील ओकरा येथे २९ सप्टेंबरच्या सभेत दिला.

झियांनी भुत्तोंना १९७५ साली झालेल्या खुनाच्या आरोपात अडकवले. या गुन्ह्यांसाठी कोट लखपत येथील तुरुंगात खितपत पडलेल्या भुत्तोंनी लाहोर उच्च न्यायलयात ११ ऑक्टोबरला त्यांचा खटला सुरु झाल्यावर पाकिस्तानच्या परमाणू कार्यक्रमात अमेरिकेच्या हस्तक्षेपाचे भूत पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न केला पण मुख्य न्यायाधीशांवर त्याचा कांहीच परिणाम झाला नाहीं. ज्या माणसाला १९७५ साली गोळ्या घालून मारण्यात आले होते व ज्या गुन्ह्याचा आरोप भुत्तोंवर चिकटवण्यात आला होता त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला कीं भुत्तो हेच या खुनामागचे सूत्रधार होते. पण "हे आरोप निखालस खोटे आहेत, जणू कादंबरीतील कथाच आहे व मुद्दाम केलेला बनाव आहे" असे सडेतोड उत्तर भुत्तोंनी दिले.

पण सेंट्रीफ्यूजेसच्या वापर करून युरेनियम शुद्धीकरणावर आधारलेली परमाणू योजना शेवटपर्यंत भुत्तोंच्या हृदयात राहिली. त्याचे दंतवैद्य नियाझी खानसाहेबांचे चांगले मित्र होते व भुत्तोंचे दात तपासायच्या निमित्तने ते त्यांना तुरुंगात भेट देत असत व त्यावेळी कहूता येथील याबाबतच्या प्रगतीचा अहवाल ते भुत्तोंना देत. CNOR सेंट्रीफ्यूजमधील डोक्याची कटकट ठरलेल्या अनेक संरचनेतील कष्टदायक अडचणींमुळे पाकिस्तानात असली सेंट्रीफ्यूज बनवता येईल कीं नाहीं अशा शंकेपासून सुरुवात झालेल्या व सिहाला येथील प्रकल्पातील प्रायोगिक तत्वावर बनविलेल्या सेंट्रीफ्यूजेस व्यवस्थित चालल्या होत्या व खानसाहेबांची त्या सेंट्रीफ्यूजेसमध्ये UF6 वायू सोडण्याच्या व पाकिस्तानमध्ये पहिल्याच वेळी युरेनियमचे शुद्धीकरण यशस्वी करण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या नशीबाची वाट पहात तुरुंगात खितपत पडलेल्या भुत्तोंना एवढीच बातमी एक दु:खातला विरंगुळाच होता.

(***) डच गुप्तहेर खात्याची ढिलाई जागोजाग दिसते.

Sudhir Kale JP-Silver Jubilee_1.JPG

गुलमोहर: 

छान सुरू आहे मालिका. अनेक धक्कादायक गोष्टी समजतायत. तुमची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे.

मस्त चालू आहे... हाही लेख वाचला. अर्थात पुढील लेख हे निव्वळ खानसाहेबांभोवती घुटमळणार नाहीत अशी आशा आहे.

खरोखरच खुप अवघड काम आहे भाषांतराचे...... ग्रेट....
हो आणि आठवड्यातुन ३, ४ भाग टाकले तरी चालतील (हे आपले माझे मत)

ग्रेट .
एक मुळात शास्त्रज्ञ नसलेला माणुस काय काय करु शकतो. फक्त तो सीमा रेषे च्या पलिकडे असल्याने त्याचे कौतुक न वाटता राग येतोय!

सावली-जी,
माझी ही मालिका ई-सकाळखेरीज इतर २ संस्थळांवरही प्रकाशित होत आहे. अशा सर्व संस्थळांवर आलेल्या प्रतिसादातल्या सर्वोत्तम प्रतिसादांतला आपला प्रतिसाद एक आहे. माझ्या एका नात्यातल्या वाचका ने "शत्रूच्या संशोधकाला 'खानसाहेब' काय म्हणतो आहेस?" असा प्रश्न प्रस्तावना वाचल्यावर मला विचारला होता पण पहिली चार प्रकरणे वाचल्यावर तो म्हणाला की तसे ते पाकिस्तानचे देशभक्तच आहेत व आपल्या गैरसोयीचे काम केले असले तरी त्यांचे कौतुक करायला हवेच! तुमची प्रतिक्रियाही अशीच संवेदनशील आहे!
भोपाळला जन्मलेले खानसाहेब एक "go-getter" गृहस्थ आहेत. चोरी, लांडी-लबाडी, मस्काबाजी, दादागिरी या सर्व शस्त्रांचा त्यांनी उपयोग करून पाकिस्तानचा अणूबाँब बनविला. या पुस्तकातील मजकुरावरून अतीशय अहंकारी व स्वत:पुरते पहाणारे (egoist) अशीच त्यांची प्रतिमा मनात ठसते. त्यांनी जे केले त्यातले किती देशासाठी केले व किती स्वार्थासाठी केले हाही एक उत्तर द्यायला कठीण असाच प्रश्न आहे. फाळणीनंतर कांहीं वर्षांनी ते पाकिस्तानला गेले त्यावेळी सरहद्दीवर त्यांना लुटण्यात आल्याचाही उल्लेख आहे. अशा अनेक कारणांमुळे हिंदूंबद्दल मनापासून तिरस्कार त्यांच्या मनात घर करून होता. केवळ बहुसंख्य हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याबरोबर one-up-manship करण्यासाठीही त्यांनी हा अणूबाँब बनविला असेल! "आता बघू या हे हिंदू bastards काय करतात ते" असेही उल्लेख या पुस्तकात आहेत.
पण शेवटी तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक अतीशय सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा आणि केवळ चार भाषा बोलू शकतो आणि गोरी बायको होती म्हणून 'युरेंको'त नोकरी मिळविलेला हा मनुष्य केवळ आपल्या common sense मुळे, संधीसाधू स्वभावाच्या जोरावर आणि शेवटी "ध्यासा"मुळे (obsession) काय-काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सर्वात शेवटी त्यांच्याच देशाने त्यांची चवाठ्यावर इज्जत काढल्यावर आज त्यांच्या मनात त्यांच्या देशांबद्दल व त्यांच्यासारख्याच एका तेही मुस्लिम शास्त्रज्ञाला राष्ट्रपती बनविलेल्या आपल्या देशांबद्दल काय-काय विचार घोळत असतील हे तपासणे मला खूपच आवडेल. पण कसे करणे शक्य आहे ते?
असो. झकास प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!
('सावली' नावावरून आपण स्त्री आहात कीं पुरुष हे कळले नाहीं.)

सावलीताई,
क्षमस्व!
माझे उत्तर पाठविल्यावर माझी 'ट्यूब' पेटली व मी लगेच आपल्या नावावर क्लिक करून आपल्याबद्दलची माहिती वाचली व आपण जपानस्थित 'मॅडम' आहात हे कळले!
जपानला बर्‍याचदा भेट दिलेल्या मला तुमचे कौतुक वाटते कारण जपानी भाषा जरी तशी सोपी असली तरी जपानी लिपी म्हणजे मानवी हार्डडिस्कचा दुरुपयोग करणारी आहे असे मला वाटते. मला त्यावेळी थोडेफार जपानी यायचे पण आता मात्र 'दाई-ताई ह्याकू परसेंतो वासुरेमाश्ता'! अद्याप फक्त मोजायला येते!
असो कधी जपानला यावयाची संधी पुन्हा मिळाली तर कळवेन.
धन्यवाद!
सुधीर काळे

सुधीरजी,
खरतर तुमचेच आभार मानायला हवेत एवढ कठिण पुस्तक भाषांतरित करण्याबद्दल. मराठि मधुन आहे म्हणुन मी लगेच वाचायला घेतल. एरवि पाकिस्तानबद्दल मुद्दामहुन इंग्रजि पुस्तक वाचायला घेणे होणारच नाहि. आधि लिहिल्याप्रमाणे या खानसाहेबामुळे पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवता आला याचा जरा राग येतोच. पण त्यानी जे जे काहि केल ते अफाटच आहे. कुठेतरि पकडले गेले असते तर आयुष्य, कुटुंब याचि वाट्च लागली असती (शेवटि काय झाल ते मला अद्याप माहित नाहि, तुमच्या पुस्तकातच वाचेन आता)
कदाचित हे मुळ लेखक किन्वा आपणहि खानसाहेबाच्या देशाचे नाहि म्हणुन त्यांनी जे केल ते स्वार्थ कि देशप्रेम असा प्रश्न उपस्थित करतो. एखाद्या आपल्या देशातल्या माणसाने अस काहि केल असत तर नक्किच त्याला सहजपणे देशप्रेमच म्हटल असत. पण जाउ देत तो खरतर विषयच नाहि.
महत्वाच म्हणजे हेच की <<एक अतीशय सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा आणि केवळ चार भाषा बोलू शकतो आणि गोरी बायको होती म्हणून 'युरेंको'त नोकरी मिळविलेला हा मनुष्य केवळ आपल्या common sense मुळे, संधीसाधू स्वभावाच्या जोरावर आणि शेवटी "ध्यासा"मुळे (obsession) काय-काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.>>

अरे वा अजुनहि तुमच जपानि चांगल आहे की Happy
भाषा म्हणुन जपानी मराठिशी खुप जवळचि वाटते मला, म्हणुन मजा येते जरा.
<जपानी लिपी म्हणजे मानवी हार्डडिस्कचा दुरुपयोग > हे मात्र खर. मुलांचि शिकण्याची अर्धी वर्ष लिपि शिकण्यात जातात.
इथे येणार असलात तर नक्किच कळवा.

तुमच्या पुस्तकाच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

ते पाकिस्तानी आहेत म्हणून त्यांच्या देशभक्तीची शंका येते असे मुळीच नाहीं, पण नंतर-नंतर त्यांना बरीच 'ग'ची बाधा झाली. "जिनांनी पाकिस्तानला जन्म दिला, पण मी त्याला वाचवला" असे उद्गारही त्यांनी काढल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. तसेच पदव्या (मागून) मिळवण्याचे त्यांना व्यसन लागले वगैरे भाग पुढे येईल. मग आपलयालाही मी असे कां म्हणतो ते लक्षात येईल.
माझे एक जपानी मित्र एकदा अर्जेंटीनाला सलग एक वर्ष राहिले. परत आल्यावर त्यांनाच 'कांजी' वाचता येईना असे मला गंमत म्हणून सांगत होते! विसरायला झालं होतं!
आता असे गेले तर भरपूर पुस्तकं घेऊन जातात. अर्थात आता इंटरनेटमुळे रोजचे वर्तमानपत्रही वाचता येत असेल म्हणा!