न्यूक्लिअर डिसेप्शन : प्रकरण १ - एक रागाने भडकलेला तरुण

Submitted by sudhirkale42 on 21 July, 2010 - 23:26

न्यूक्लिअर डिसेप्शन : प्रकरण पहिले
एक रागाने भडकलेला तरुण

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तोंच्या कार्यालयात ते पत्र कुठल्याही कंपनीतून आलेले नव्हते तर "७१ ऍमस्टेल स्ट्रीट, त्स्वानेनबुर्ग" या फारशा ’पॉश’ नसलेल्या खासगी पत्त्यावरून आलेले होते. ’शिफॉल’ या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या या घरावरून सतत विमानांची ये-जा असायची व त्यामुळे त्यांच्या आवाजाचा सतत त्रास असायचा. भुत्तो यांच्या मंत्रीमंडळातील ज्या मंत्र्याने ते पत्र सर्वप्रथम पाहिले त्याच्या सांगण्यानुसार भुत्तोंच्या पाकिस्तानातील कार्यालयात ते पत्र १९७४ साली येऊन पोचेपर्यंत त्या पत्राला अनेक घड्या पडल्या होत्या आणि अनेकांनी हाताळलेले असल्यामुळे ते पत्र मळलेही होते. ते पत्र पाकिस्तानच्या ब्रुसेल्स येथील दूतावासामार्फत पाठविले गेले होते व ISI च्या गुप्तहेरांनी तसेच भुत्तोंच्या सुरक्षादलाने ते तपासलेही होते.

भुत्तोंना ते पत्र दाखवावे कीं नाहीं या पेचात त्यांचे मदतनीस पडले होते कारण ते पत्र लिहिणार्‍या डॉ. खान या तरुणाने स्वत:ची ओळख एका युरोपियन परमाणूविषयक संघटनेत काम करणारा एक वैज्ञानिक अशी करून दिली होती. त्या आधी दोनच महिने-१९७४ साली-भारताने पोखरण येथे आपली पहिली अनधिकृत अण्वस्त्र चांचणी केली होती. भारताने जगातील प्रस्थापित अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडून केवळ उर्जानिर्मितीसाठी म्हणून मिळविलेले तंत्रज्ञान वापरून गुप्तपणे आपल्या पहिल्या अण्वस्त्राची संरचना बनविली व त्याचे उत्पादनही केले. एक तर्‍हेने हा त्या राष्ट्रांशी केलेला मित्रद्रोहच होता. आपल्याला एकटे पाडून, बुद्धिचातुर्याने आपल्यावर मात करून आणि आपल्याला शर्मिंदा करून आपला ’मामा’ बनविण्यात आला आहे व त्याद्वारा भारताने स्वत:चे विभागीय श्रेष्ठत्व प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे असे भुत्तोंना वाटले. यापुढे दक्षिण आशियात अण्वस्त्रें मिळविण्याबद्दल शर्यत सुरू होईल या काळजीत संयुक्त राष्ट्र संघटना पडेल व त्या अनुषंगाने अण्वस्त्रांवर देखरेख करणारी त्यांची यंत्रणा (IAEA) आता पाकिस्तानच्या हालचालींवर जास्त कडक लक्ष देईल व जरूर ते निर्बंधही घालेल व त्यामुळे आपली अण्वस्त्रे मिळविण्याची योजना जास्तच अवघड होईल अशी भीतीही पाकिस्तानला वाटू लागली.

त्याआधी १९४७ साली झालेल्या फाळणीत हिंदूंनी मुसलमानांच्या व मुसलमानांनी हिंदूंच्या कत्तली केल्या होत्या व त्यात लाखो कुटुंबे विभक्त व लाखो गावे बेचिराख झाली होती व एके काळी मित्र असलेली व शेजारी रहाणारी माणसे एकमेकांच्या जिवावर उठली होती. लाखो लोक शेकडो आगगाड्यात चढून पूर्वेकडून पश्चिमेला व पश्चिमेकडून पूर्वेला दोन भागांत नव्याने बनलेल्या पूर्व व पश्चिम पाकिस्तान या मुस्लिम गणराज्यात अनिश्चित भविष्याला तोंड देण्यासाठी जाऊ लागले. पूर्व पाकिस्तान व जम्मू-काश्मीर संस्थान यांच्या स्थापनेबद्दल खूप वादविवाद निर्माण झाला कारण पूर्व पाकिस्तानच्या लोकांना तेंव्हापासूनच स्वातंत्र्य हवे होते व जम्मू-काश्मीरचे राजे हरी सिंग यांनी त्या राज्यातील मुस्लिम नागरिकांच्या मनाविरुद्ध भारतात आपल्या संस्थानाचे विलीनीकरण केले. यावरून पाकिस्तान व भारत यांच्यात अनेक युद्धें झाली त्यातल्या १९७१ सालच्या निर्णायक युद्धात इंदिरा गांधींनी आपल्या सैन्यासह पूर्व पाकिस्तानवर चढाई केली होती व केवळ दोन आठवडे चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी सैन्याला डाक्याच्या रेसकोर्सवर अतीशय लाजिरवाणी अशी शरणागती पत्करावी लागली होती.

अमेरिकेकडून राजनैतिक उपाय शोधण्याच्या प्रयत्नात भुत्तोंनी अमेरिकेकडून स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्राविरुद्ध संरक्षक कवचाची (Nuclear Umbrella) मदत मागितली. यासाठी त्यांनी पाकिस्तानचे अमेरिकेतील तेंव्हाचे राजदूत साहबजादा याकूब खानना किसिंजर यांच्याकडे धाडले. जर भारताने पाकिस्तानविरुद्ध अण्वस्त्र वापरले तर अमेरिकेने संरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी होती. पण भुत्तोंना त्यात फारशी आशा वाटत नव्हती. पाकिस्तानने अमेरिकेबरोबर अनेक संरक्षणविषयक करार केले होते व या करारांन्वये पाकिस्तानला आपले सैन्य व त्यांची शस्त्रास्त्रे अद्ययावत ठेवायला मदत झाली होती व भारताबरोबरचे वैरही चालू ठेवता आले होते. असे असले तरी अमेरिकेला पाकिस्तानच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका वाटू लागली होती. पाकिस्तानने टाकलेली कांहीं पावले अमेरिकेच्या हिताविरुद्ध होती अशी तक्रार CIA या संघटनेने पाकिस्तानकडे केली होती. अमेरिकेला अशीही शंका येऊ लागली होती कीं पाकिस्तानने १९६३ व १९६४ साली चीनच्या चाऊ एन-लायबरोबर कांहीं तरी गुप्त करार केला होता.

भुत्तोंची भीती खरी ठरली. किसिंजर यांनी पाकिस्तानच्या तोंडाला पाने पुसली. अशी संरक्षणाची जबाबदारी घ्यायला अमेरिका तयार नव्ह्ती कारण मग असे संरक्षक कवच इतरही राष्ट्रांनी मागितले असते! शेवटी किसिंजर यांनी याकूब खानना सांगितले कीं आता भारताने केलेली अण्वस्त्राची चाचणी पाकिस्तानने "fait accompli" म्हणून स्वीकारावी व त्याप्रमाणे वागावे. अशा तर्‍हेने याकूब खान हात हलवत परत आले व भुत्तोंचा तिळपापड झाला.

भुत्तोंच्या अमेरिकेवरील रागाचे पहिले कारण होते कीं बांगलादेशच्या युद्धात अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला वेळेवर धावून आली नव्हती. अमेरिकेचे सातवे आरमार (Seventh Fleet) बंगालच्या उपसागरात पोचायच्या आधीच बांगलादेशचे युद्ध भारताने संपविले होते. त्याआधी अमेरिकेने भारताविरुद्ध वापरायला बंदी असलेली युद्धसामग्री पाकिस्तानने १९६५ सालच्या युद्धात भारताविरुद्ध वापरल्यामुळे अमेरिकेने त्या देशाला द्यायच्या मदतीवर बंदी घातली होती. रागाचे दुसरे कारण झाले ते यावेळी अमेरिकेने पाकिस्तानला अण्वस्त्रांच्या बाबतीत मदत केली नाहीं, भारताला धारेवर धरले नाहीं हे! म्हणून भुत्तोंना वाटले कीं आता अमेरिकेच्या पलीकडे जाऊन कांहीं नवीन व्युहरचना करायला हवी. पाकिस्तानला वाचविण्यासाठी अण्वस्त्रसज्ज बनणे मग अपरिहार्य होऊन बसले.

त्यावेळी पाकिस्तानचा परमाणुविज्ञान कार्यक्रम फारच डळमळीत परिस्थितीत होता. १९६५ साली भुत्तो परराष्ट्रमंत्री असतांना कॅनडाबरोबर केलेल्या करारान्वये "Karachi Nuclear Power Plant"साठी मिळालेली (KANUPP) व १ ऑगस्ट १९७१ साली कार्यरत झालेली एक अणुभट्टी पाकिस्तानकडे होती. ती अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रकल्पासाठी राबविता येण्यासारखी होती. त्या भट्टीतून वापरून झालेल्या (irradiated) रूपात मिळालेल्या इंधनाच्या कांब्यांमध्ये प्लुटोनियम-२३९ हे मूलद्रव्य भरपूर प्रमाणात असायचे. 'हान' या जर्मन शास्त्रज्ञाने हेच मूलद्रव्य वापरून सुरुवातीचे प्रयोग केले होते व 'फॅट मॅन' या नावाने ओळखला जाणारा व नागासाकी या शहरावर टाकलेला बाँब हेच मूलद्रव्य वापरून बनविला गेला होता. प्लुटोनियम-२३९ पासून अण्वस्त्रक्षम "प्लुटोनियम-२३५" बनविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान पाकिस्तानकडे नव्हते व ते मिळवणेही दुरापास्त होते. अशा परिस्थितीत सुदैवाने एका संतप्त पाकिस्तानी शास्त्रज्ञाकडून भुत्तोंना वर उल्लेखलेले आत्मविश्वासपूर्ण पत्र आले कीं अशुद्ध युरेनियममधून अण्वस्त्रक्षम 'शुद्ध युरेनियम' बनविण्याच्या युरोपमध्ये विकसित होत असलेल्या ’सेंट्रीफ्यूज’ (centrifuge) या एका नव्या क्रांन्तिकारक प्रक्रियेच्या तत्रज्ञानाबद्दल त्यांना माहिती झालेली होती. ती नवी पद्धत तो पाकिस्तानमध्ये यशस्वी करून दाखवू इच्छित होता व या पद्धतीने बाँब बनविण्यासाठी लागणार्‍या शुद्ध युरेनियमचे उत्पादन करता येईल याची त्याला खात्री होती.

हे पत्र वाचले गेले तेंव्हा कौसर नियाज़ी हे पाकिस्तानचे माहिती मंत्री भुत्तोंसमवेत होते. नियाज़ींच्या आठवणीप्रमाणे त्या पत्रातील माहिती वाचल्यावर भुत्तोंच्या शरीरातून जणू वीजच सळसळली. भुत्तोंनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आगाशाही यांना बोलवून घेतले व ते पत्र त्यांना दाखविले. डॉ. अब्दुल कादीर खान हा शास्त्रज्ञ म्हणतोय् कीं ’सेंट्रीफ्यूज’ पद्धतीने तो अण्वस्त्रक्षम मूलद्रव्य वेगळे करू शकेल असे भुत्तो त्यांना म्हणाल्याचे आगाशाहींना आजही आठवते आहे. आगाशाहींना याबद्दल खात्री नव्हती तरीही ते म्हणाले की "त्या शास्त्रज्ञाला एक संधी द्यायला हरकत नाहीं".

खानसाहेबांना धातुशास्त्रातली डॉक्टरेट पदवी असूनही व त्यांनी अनेक लेख व एक जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलेले असूनही कराचीतल्या "पीपल्स स्टील मिल" इथे त्यांना नोकरी दिली गेली नव्हती व त्यांना दुर्लक्षले गेले होते. याचे त्यांना वैषम्य वाटे. म्हणून ते आपली सेवा पाकिस्तानला या नव्या प्रकल्पात देऊ इच्छित होते.

नियाज़ींनी खानसाहेबांची 'केस' हातात घेतली. त्यांनी ISI करवी बारीक चौकशी करवली. प्रयत्नाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा एवढे नक्की होते की १९४५ साली हिरोशिमावर टाकलेल्या 'लिटल बॉय' या बॉम्बमध्ये वापरलेले शुद्ध युरेनियम बनविण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल खानसाहेबांना माहिती मिळू शकली होती. ISI नेही कौल दिला कीं एक संधी द्यायला हरकत नाहीं.

युरेनियमचा शोध १७८९ साली जर्मन शास्त्रज्ञ क्लॅपरॉथ यांनी लावला होता. युरेनियम हे मूलद्रव्य शिसाच्या दुप्पट जड असून जगाच्या पाठीवर सापडणार्‍या सर्वात जड समजल्या जाणार्‍या मूलद्रव्यातील एक मूलद्रव्य समजले जाते. ते प्लुटोनियम या मूलद्रव्याचा एक विकल्प समजले जाते. युरेनियमचे विभाजन करणे जास्त अवघड पण जास्त सुरक्षित समजले जाते. त्यासाठी युरेनियमचे खनिज दळले जाते व त्याची भुकटी पाण्यात मिसळल्यावर या युरेनियम ऑक्साईडला Yellow Cake म्हटले जाते. त्याच्या १००० परमाणूंमध्ये अण्वस्त्रक्षम "युरेनियम-२३५" चे ७ परमाणू असतात. बाकीले ९९३ परमाणू जड व निरुपयोगी युरेनियम-२३८चे असतात. अण्वस्त्रे बनविण्यासाठी या ७ परमाणूंना वेगळे करावे लागते व हे करण्याची पद्धती खर्चिक व खूप गुंतागुंतीची असते. शुद्धीकरणाची प्रक्रिया (enrichment process) वापरून युरेनियम-२३५ची शुद्धता कमीतकमी ९३ टक्क्यापर्यंत वाढवावी लागते. जगातले कित्येक देश या प्रक्रियापद्धतीवर ताबा मिळविण्यासाठी झगडत होते.

खानसाहेब भुत्तोंना म्हणाले कीं ५० सालच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश, जर्मन व डच सरकारांनी एकत्र येऊन 'युरेंको उद्योगसमूहा'ची (URENCO consortiumची) प्रस्थापना केली. या कंपनीने तीन चाचणी प्रयोगशाळा स्वस्त व सुरक्षित युरेनियम व्यापारी तत्वावर शुद्ध करण्यासाठी स्थापल्या. चेशायर मधील 'केपेनहर्स्ट', पूर्व हॉलंडमधील 'आल्मेलो' व पश्चिम जर्मनीतील 'ग्रोनाऊ' येथील या तीन युरेंको प्रयोगशाळांतील शास्त्रज्ञ vertical separation करण्यासाठी centrifugal force वापरून युरेनियम-२३८च्या परमाणूंतून युरेनियम-२३५चे परमाणू विभक्त करण्याचे प्रयोग करत होते. त्यासाठी त्यांनी चिरूट ठेवण्याच्या नळ्यांसारखी दिसणारी अल्युमिनियमच्या नळकांड्यांची प्रचंड सहा-फुटी सेंट्रीफ्यूज यंत्रे उभारली होती. ही नळकांडी स्वत:भोवती मिनिटास ७०,००० वेळा इतक्या प्रचंड वेगाने फिरत असताना त्यांत युरेनियम हेक्झाफ्लुराईड हा 'यलो केक'पासून बनविलेला वायू सोडला जाई. फिरण्याच्या उच्च वेगामुळे जड असलेले युरेनियम-२३८ बाहेरच्या बाजूला फेकले जाई व या नळकांड्यांच्या बाजूने खाली सरकून खाली बसविलेल्या तोंडातून बाहेर फेकले जाई. याच वेळी हलके असलेले व अण्वस्त्रक्षम युरेनियम-२३५ या नळकांड्यांच्या उभ्या आसाकडे खेचले जाई व वरच्या दिशेने शोषले जाई.

इंग्लिश, जर्मन व डच या तीन भाषा अस्खलितपणे येत असल्याने खानसाहेबांना अशी अत्यंत गोपनीय अशा तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकेल अशा जागी भाषांतरकाराची नोकरी मिळाली होती. ही माहिती पाकिस्तानला उपयोगी पडणार हे समजल्यावर भुत्तोंची कळी खुलली व ते या शास्त्रज्ञाचे एका गुप्तहेरात रूपांतर करण्याच्या कल्पनेत रमून गेले.

झुल्फिकार अली भुत्तो हे पाकिस्तानचे निर्माते जिन्ना यांच्या खास मदतनीसांचे सुपुत्र. त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडला झाले. भुत्तोंची १९५८ पासूनच खात्री होती कीं पाकिस्तानला परमाणू तंत्रज्ञान मिळवावेच लागेल. त्यावर्षी भुत्तो इंधनें, वीज व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या (natural resources) खात्याचे मंत्री झाले होते व तेंव्हा त्यांना कळले कीं जन्माला जेमतेम दहाच वर्षें झालेल्या पाकिस्तानात एक मुलकी अणुतंत्रज्ञानाचा कार्यक्रम कार्यरत होता. अमेरिकेच्या पुढाकाराने १९५६ सालापासून प्रायोजलेला "शांततेसाठी परमाणू" हा कार्यक्रम अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी त्यांचे अणुतंत्रातील ज्ञान अप्रगत राष्ट्रांना देण्यासाठी आखलेला होता. पाकिस्तानातील हा प्रकल्प "पाकिस्तान परमाणू संशोधन केंद्र (PAEC)" या भव्य व रुबाबदार नावाने ओळखला जाई व त्याचे प्रमुख होते पूर्वी कापसाच्या उद्योगात काम केलेले शास्त्रज्ञ डॉ. नज़ीर अहमद. पण डॉ. अहमदना शोधायला भुत्तोनाही जरा वेळ लागला. कारण त्याच्या कार्याची व्याप्ती त्यांच्या कराचीतील पोस्टाच्या इमारतीत सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या छोट्याशा कार्यालयापेक्षा जास्त नव्हती. "फक्त एक नाव आहे एवढेच!" भुत्तो म्हणाले.

१९६१ साली लाहोर येथे एक परमाणू संशोधन केंद्र सुरू झाले. १९६५ सालच्या काश्मीर प्रश्नावरून झालेल्या भारत-पाक युद्धानंतर तक्रारीच्या सुरात भुत्तो म्हणाले होते कीं जर भारताने अणूबाँब बनवला तर आम्ही पाकिस्तानी लोक वेळ पडल्यास घास-पत्ती खाऊ, भुकेले राहू, पण आम्हीही आमचा अणूबाँब बनवूच. त्याशिवाय आम्हाला पर्यायच नाहीं....भारताच्या अणूबाँबला उत्तर म्हणून पाकिस्तानचा अणूबाँब!

२० जानेवारी १९७२ला भारताकडून झालेल्या पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर व डाक्याला पत्करलेल्या शरणागतीनंतर भुत्तोंनी पाकिस्तानच्या सर्व ख्यातनाम व उच्चपदस्थ शास्त्रज्ञांची मुलतान येथे नवाब सादीक हुसेन कुरेशी यांच्या घरी गुप्त बैठक बोलावली.

निमंत्रितांत श्री. समर मुबारकमंद नावाचे एक कनिष्ठ शास्त्रज्ञही होते. २६ वर्षांनंतर (१९९८ साली) पाकिस्तानच्या अण्वस्त्रचांचणीत ते एक महत्वाची भूमिका निभावणार होते. पाकिस्तानला पुन्हा गौरव प्राप्त करून देण्याबद्दलच्या पंतप्रधानांचा प्रत्येक शब्द एकाग्रतेने ऐकत बसल्याचे त्यांना आजही आठवते. भुत्तोंनी शास्त्रज्ञांना सांगितले कीं पाकिस्तानला अण्वस्त्रयुगात नेण्याचे व अण्वस्त्रशर्यतीत भाग घेण्याबाबतचे निर्णय घेऊ शकेल अशा पदावर नियतीनेच त्यांना (भुत्तोंना) बसवले होते. "असा अणूबाँब तुम्ही पाकिस्तानला देऊ शकाल कां?" असे त्यांनी सर्व शास्त्रज्ञांना विचारले. त्याबरोबर टांचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता तिथे पसरली अशी आठवण मुबारकमंद यांना आजही आहे. "त्यांच्या या प्रश्नाने आम्ही अगदी पार गोंधळून गेलो". सर्व शास्त्रज्ञांच्या मतें पाकिस्तान भारताच्या कमीतकमी २० वर्षें मागे होता. PAECचे प्रमुख डॉ. इश्रत उस्मानी यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले कीं अणूबाँब बनविण्यासाठी लागणार्‍या मूलभूत वस्तू व मूलभूत सुविधाच (infrastructure) पाकिस्तानात अस्तित्वात नव्हत्या. ते पुढे म्हणाले कीं ते १० किलो प्लुटोनियमबद्दल बोलत नव्हते तर खरोखर लागणार्‍या मूलभूत सुविधांबद्दल बोलत होते. उदा. धातूनिर्मितीचे कारखाने. हे ऐकल्यावर भुत्तोंच्या कपाळावर आठ्या पडल्या. या बैठकीत अमेरिकेत पाच महिन्याचे प्रशिक्षण घेतलेले व "आंतरराष्ट्रीय परमाणू उर्जा संस्था" (IAEA) येथे अनेक वर्षें काम केलेले मुनीर अहमद खानही होते. मुनीर खान यांची लगेच डॉ. इश्रत उस्मानींच्या जागी नेमणूक झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तपासणीबद्दलची माहिती "घरून" मिळण्याची सोय झाली. मुनीर खान हे हाडाचे सनदी नोकर होते, पण त्यांच्या तंत्रज्ञानाची पातळी तशी यथा-तथाच होती.

आपल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांची बोजड उत्तरे ऐकून वैतागलेले काही तरुण शास्त्रज्ञ ताडकन उभे राहिले. बशीरुद्दिन पुटपुटला,"पाचेक वर्षें लागतील". त्यावर लगेच भुत्तोंनी आपली तीन बोटे वर केली व एक स्मित हास्य केले. जरूर ती साधन-सामग्री व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या तर पकिस्तान बाँब बनवू शकेल असं हजर असलेल्या सर्वांचे एकमत झाले. मुबारकमंद यांना आजही आठवतंय् कीं त्या बैठकीनंतर सर्वांनी शपथ घेतली कीं आपण अण्वस्त्रे बनवूच! भुत्तोंनी बैठकीचा समारोप केला.

या बैठकीनंतर काही तासातच भुत्तो ज्या मुसलमान राष्ट्रांशी संधान बांधू इच्छित होते अशा देशांच्या झंजावाती दौर्‍यावर गेले. त्यात इराण, सौदी अरेबिया व लिबिया या राष्ट्रांचाही समावेश होता. भुत्तो पाश्चात्य महासत्तांना "शिकारी महासत्ता" म्हणत. अशा महासत्तांनी आपल्याला (पाकिस्तानला) ’शिकार’ म्हणून खाऊन टाकू नये म्हणून या महासतांपासून त्यांना दूरच रहायचं होतं. म्हणून ते या मुस्लिम राष्ट्रांकडे आर्थिक मदत मागण्यासाठी हातात 'कटोरी' घेऊनच गेले होते असे म्हटले तरी चालेल! सर्वप्रथम ते त्रिपोलीला गेले व कर्नल गद्दाफींना भेटले. गद्दाफींनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी भुत्तोंना जरूर ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ते मध्य-पूर्वेतील इतर देशांत गेले. तिथे त्यांना आणखी कांही प्रायोजक मिळाले. या दौर्‍यात प्रस्थापित झालेली मैत्री पुढे फारच महत्वाची ठरली कारण या मैत्रीवर पाकिस्तानची भावी व्यूहात्मक धोरणें ठरली. आणि याच मैत्रीतून अण्वस्त्रनिर्मितीत पाकिस्तानला प्रयोजकच नव्हेत तर तयार बाजारपेठही मिळाली.

ऑगस्ट १९७४ मध्ये भुत्तोंनी खानसाहेबांना भेटीचे निमंत्रण पाठविले. हे निमंत्रण पाकिस्तानचे हॉलंड येथील राजदूत श्री. खरास यांच्या हस्ते वैयक्तिकरीत्या खानसाहेबांना त्यांच्या ७१ ऍमस्टेल स्ट्रीट, त्स्वानेनबुर्ग या पत्त्यावर देण्यात आले. एकीकडे खानसाहेब प्रवासाच्या तयारीला लागले तर दुसरीकडे ISI अधिकारी त्यांची पार्श्वभूमी तपासून पहाण्यात गढून गेले.
ISI अधिकार्‍यांच्या ल़क्षात आले कीं खानसाहेबांनी अनेक लोकांना स्वत:च्या वंशाबद्दल आगा-पीछा नसलेल्या "स्वरचित कहाण्या" ऐकविल्या होत्या. एक कहाणी होती कीं ते जनरल मलिकच्या वंशात जन्मलेले होते. जनरल मलिक सुलतान घौरी या १२व्या शतकातील अफगाण राजाचा सेनापती होता व त्याच्या सैन्याने पृथ्वीराज चौहानच्या हिंदू सैन्याला पराजित केले होते. हा संदर्भ जरी नामांकित असला तरी ISI अधिकार्‍यांना तो अशक्य वाटला. खानसाहेबांनी आपल्या कुटुंबाचे भोपाळच्या राजघराण्याशी असलेले तथाकथित 'नात्या'ची थाप त्यांच्या जन्माच्या एप्रिल १९३६ पर्यंत हट्टाने चालू ठेवली होती. पण ISI अधिकार्‍यांच्या मते त्यांच्या आई-वडिलांच्या चाळिशीत जन्मलेल्या या सातव्या मुलाचे बालपणी फाजील लाड करण्यात आले असावेत व त्यामुळे ते कधी प्रौढत्वाला पोचलेच नाहींत.

१५ ऑगस्ट १९४७ च्या फाळणीनंतर हिंदू बहुसंख्य असलेल्या व भोपाळच्या आसपास असलेल्या भागांतून मुसलमान लोक मोठ्या संख्येने भोपाळला येऊ लागले. खानसाहेबांचे सर्वात वडील दोन भाऊ सर्वप्रथम कराचीला त्याच वर्षी हिवाळ्यात गेले. आणि तीन वर्षांनंतर जेंव्हा भोपाळच्या नवाबांना सिहासनत्याग करायला भाग पाडले गेले तेंव्हा त्यांचा तिसरा भाऊ व मोठी बहीणही पाकिस्तानला पळाली. खानसाहेबांना ऑगस्ट १९५२ साली पाकिस्तानला जायची संधी मिळाली. खानसाहेब लिहितात, "एका पत्र्याच्या ट्रंकेत कांहीं पुस्तकें व कपडे घालून मी माझा प्रवास अजमेर, लोणी, चित्तूर, बारमेर व शेवटी मोनाबव या मार्गे केला." भारतीय पोलीस व रेल्वे कर्मचारी पळून जाणार्‍या मुस्लिम प्रवाशांकडून सर्व माल चोरत असत. खानसाहेबांचे पेनही चोरीला गेले. आयुष्यात नंतर खानसाहेबांनी "भारतातून गेलेली शेवटची रेलगाडी" असे शीर्षक असलेले एक तैलचित्र पाकिस्तानच्या प्रतिनिधीगृहात लावण्यासाठी बनवून घेतले.

भारत-पाकिस्तान सीमेवर खानसाहेब तसे एकटेच होते. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात डोक्यावर ट्रंक व हातात बूट असे ते अनवाणी चालत गेले. ते त्यांच्या तीन भावांबरोबर व एका बहिणीबरोबर कराचीतल्या एका कोंदट फ्लॅटमध्ये रहात. पण जीवनात प्रगती करण्याचा त्यांचा निश्चय होता.

ते लिहितात की पाकिस्तानात आल्यावर त्यांना पिंजर्‍यातल्या पक्ष्याला मोकळा केल्यावर जसे वाटते तसे वाटले. काही महिन्यांनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती आयसेनहॉवर यांनी शांततेसाठी परमाणू (Atoms for Peace) हे त्यांचे व्याख्यान संयुक्त राष्ट्रात दिले. त्याने प्रोत्साहित होऊन खानसाहेबांनी स्वत:चे नाव डी. जे. सिंध गवर्मेंट सायन्स कॉलेजमध्ये घातले. त्यांना ज्याला छंद म्हणता येईल अशी एकच आवड होती. ते त्यांच्या खिशात एक काळी डायरी ठेवत व त्यात त्यांच्या आवडत्या कविता व कुराणातल्या आवडत्या पंक्ती लिहीत. दुसरी हौस म्हणजे युरोपमध्ये शिक्षणाला जाण्याच्या उद्देशाने ते जर्मन भाषा शिकू लागले. ISI अधिकार्‍यांनी त्यांचा CV अभ्यासला. त्यात त्यांनी कराची विद्यापीठातून १९६० साली शास्त्रशाखेत पदवी घेतल्याचा उल्लेख होता. पण खोलात गेल्यावर ISI अधिकार्‍यांना समजले कीं त्या काळात खानसाहेबांनी कमी पगाराच्या अनेक नोकर्‍या केल्या होत्या त्यातलीच एक होती कराची पोस्टात वजनांचा पर्यवेक्षक म्हणून असलेली नोकरी. पण तिथे पगार इतका कमी होता कीं ते नेहमी कांहीं काम केल्यास बक्षीस उपटत असत.

शेवटी १९६१ साली खानसाहेबांना त्यांना आवडणारी एक गोष्ट मिळाली. ते रेल्वेने लाहोरला गेले व तिथे त्यांनी आयसेनहॉवर यांच्या "शांततेसाठी परमाणू" च्या संदर्भात भरविलेले एक प्रदर्शन बघितले. तिथे त्यांना कळले कीं परमाणू कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी धातुशास्त्राचा अभ्यास फार जरूरीचा आहे. पण पाकिस्तानात धातुशास्त्रावर आधारित कुठलेच कारखाने नव्हते. मग युरोपला जायचा विचार आला. भावांकडून जर्मनीला जायच्या तिकिटासाठी उसनवारी केली व ड्युसेलडॉर्फला प्रयाण केले. त्या आधी त्यांनी आपला हात एका हस्तसामुद्रिकाला दाखविला. (ही त्यांची सवय आयुष्यभर चालू राहिली.) "तुला गोरी बायको मिळेल व पाकिस्तानी लोक तुझा खूप आदर करतील" असे भविष्य त्यांना हस्तसामुद्रिकाने सांगितले.

युरोपला गेल्यावर खानसाहेब बरेच दिवस त्यांच्या दूरच्या भावाकडे (cousin) राहिले. सारखी नकाराची पत्रे येत होती. मग ते एक दिवशी हॉलंडला हेग येथे गेले. तिथे १९६२ सालच्या जानेवारीत एका पोस्टाच्या रांगेत उभे असताना त्यांची हेंद्रीना डॉन्कर्स (हेनी) या दक्षिण आफ्रिकेच्या मुलीशी नजरा-नजर झाली. तिच्या आठवणीप्रमाणे तिचा भावी पती पाकिस्तानला पोस्टकार्ड पाठवायला काय पडते हे विचारत होता. ती माहिती तिला होती व तिने ती खानसाहेबांना पुरवली. हेनीचे बालपण झांबियात गेले होते व ती नुकतीच युरोपला मानसशास्त्राचे शिक्षण घ्यायला आली होती. खानसाहेबांत तिला तिच्यासारखाच एक "हरवलेला आत्मा" सापडला. दोघांनी एकमेकांना पत्रव्यवहार करायचे वचन दिले.

१९६२च्या सप्टेंबरमध्ये शेवटी खानसाहेबांना West Berlin Technische Universitat येथे धातुशास्त्राच्या परिचयस्वरूप व्याख्यानांना हजर रहाण्याची संधी मिळाली. हेनीने त्यांच्याबरोबर जायचे मान्य केले. तिचे आई-वडील तसे उदारमतवादी होते. पुढे १९६३ च्या सप्टेंबरमध्ये खानसाहेब व हेनी तिच्या आई-वडिलांच्याजवळ असावे म्हणून हॉलंडला गेले. डॉ. खान यांनीही त्यांच्या शिक्षणक्रमाची Delft Technological University येथे बदली करून घेतली. मग खानसाहेबांनी हेनीशी विवाह करण्यासाठी तिच्या आई-वडिलांची परवानगी मागितली व १९६४च्या सुरुवातीला २१ वर्षाची हेनी व २७ वर्षाचे खानसाहेब यांचा पाकिस्तानच्या हेग येथील राजदूतावासात विवाह झाला. त्यांचे लग्न लावले First Secretary जमालुद्दिन हसनने व राजदूत कुद्रतुल्ला शाहाब खान हे साक्षीदार झाले. त्या लग्नाला खानसाहेबांचे आई-वडील किंवा त्यांचा लंडनस्थित जवळचा मित्रही येऊ शकला नव्हता. फक्त खानसाहेबांचा Delft Technological University मधील धातुशास्त्राच्या वर्गातील एक मित्र स्लेबॉस आला होता. स्लेबॉसच्या मते खानसाहेब एक गंभीर प्रवृत्तीचा विद्यार्थी होता.

खान दांपत्याचे जीवन तसे नीरसच होते. हेनी म्हणे कीं खानसाहेबांना त्यांच्या कामाशिवाय दुसरा कुठलाही छंदच नव्हता. विद्यार्थी असतांनाची त्यांची जमीनीवर पुस्तकांच्या ढिगार्‍यात बसून दररोज संध्याकाळी खूप विचार करण्याची संवय तशीच होती. त्याकाळच्या त्यांच्या छायाचित्रात डोक्यावरचे बरेचसे केस पांढरे झालेले, नीट कोरलेल्या मिशा, कोटाच्या आतल्या बाजूला खोचलेले पेन अशा अवतारात उभे असलेले खानसाहेब तसे अकाली प्रौढ झाल्यासारखेच वाटत. एक हात आपल्या पत्नीच्या, हेनीच्या, खांद्याभोवती ऐटीत टाकलेला, तिचा चारचौघांसारखा दिसणारा चेहरा जाड फ्रेमच्या मागे दडलेला व अंगावर केवळ कानातल्या लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या कुड्या असायच्या. आपल्या पाश्चात्य मित्रांना लिहिलेल्या पत्रांत ते हेनीचा उल्लेख नेहमी my honey असा करत.

१९६५ मध्ये खानसाहेबांना पहिले यश मिळाले. डेल्फ्टमध्ये त्यांना धातुशास्त्रात मास्टर्स अभ्यासक्रमात त्यांना प्रवेश मिळाला. प्रा. बर्गर्स हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती व आदर प्राप्त परमाणूक्षेत्रातले शास्त्रज्ञ होते व ते खानसाहेबांना ट्यूटर म्हणून मिळाले. त्यांच्या आशिर्वादाने खानसाहेबांनी अनेक छोटे-छोटे प्रकल्प हाती घेतले व यातला प्रत्येक प्रकल्प ISI अधिकार्‍यांनी "खरे खानसाहेब" शोधण्यासाठी सखोलपणे अभ्यासला. ते चमकले नाहींत, पण नापासही झाले नाहींत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ते सगळ्याना मोहून टाकण्यात यशस्वी झाले.

ते नेहमी पाकिस्तानची तरफदारी करायचे. युरोपीय वृत्तपत्रांना पाठविलेली त्यांची अनेक पत्रें ISI अधिकार्‍यांना मिळाली. या पत्रांत त्यांनी या वृत्तपत्रांना पाकिस्तानवर अयोग्य टीका केल्याबद्दल जबाबदार धरले होते. १९६५ साली ते पाकिस्तानात कराचीतल्या पोलाद कारखान्यात नोकरी शोधायला आले. हेनीला त्यांनी त्यांच्या आईकडे सोडले. "माझ्या सासूबाईंचे माझ्याबद्दलचे मत काय होते ते कळले नाहीं पण गोरी सून मिळाल्याच्या आनंदात त्या होत्या" असे हेनी म्हणते.

कराचीतल्या नोकरीबद्दलचा त्यांचा अर्ज नाकारला गेला. मग ते युगुल परत युरोपला आले. १९६८ साली त्यांना लॉयवनच्या (Leuven) कॅथॉलिक विश्वविद्यालयात संशोधक या नात्याने शिष्यवृत्ती मिळाली. इथले विद्यार्थी खूप नामांकित होते. इथे खानसाहेब रमले. त्यात हेनीला दिवस गेले व त्या प्रसूत झाल्या. खानसाहेबांची स्लेबॉस, लर्क, मेबस, मिग्यूल टिनर व गुनेस चिरे अशा कांहीं मित्रांबरोबर गट्टी जमली. या सर्वांची खानसाहेबांना नंतर मदत झाली व त्यातले कांहीं लोक त्यांच्या बेकायदेशीर वर्तणुकीमुळे पुढे तुरुंगातही गेले. ती माहिती नंतरच्या प्रकरणांत येईल.

खानसाहेबांचे सल्लागार प्रा. ब्रेबर्स यांच्या लक्षात आले कीं खानसाहेबांनी कितीही पाश्चात्य दिसण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निष्ठा पाकिस्तानशीच राहिल्या. प्रा. ब्रेबर्सना आठवत होते कीं १९७१ सालच्या युद्धाबद्दल ते खूप अस्वस्थ होते. ते युद्ध त्यांनी चित्रवाणीवरील बातम्यातून नीटपणे ध्यास लागल्यासारखे पाहिले होते.

१९७२च्या मार्चमध्ये त्यांच्या नशीबात सुधारणा झाली. अ‍ॅम्स्टरडॅमस्थित डच इंजिनियरिंग कंपनी FDO ने प्रा. ब्रेबस यांच्याशी संपर्क साधून त्यांना एक धातुशास्त्रज्ञ व भाषांतरकार हवा होता. यावेळी त्यांनी खानसाहेबांचे नाव सुचवले. या कामासाठी वरवरचे तांत्रिक ज्ञान असलेला पण बहुभाषिक असलेला माणूस हवा होता व या कामात खानसाहेब फिट्ट् बसले. हेनीनेही खानसाहेबांना हे काम घेण्याचा आग्रह धरला. खरे तर FDO ने अल्ट्रा सेंट्रीफ्यूज नेदरलॅंड (UCN) या युरेंकोतील डच कंपनीला उपकरणाचे भाग व त्यामागची विद्या असे दोन्ही प्रदान केले होते. जरी BVD या डच गुप्तचर विभागाने त्यांच्याबद्दल बारीक चौकशी केली असली तरी त्यांना हेनीच्या डच नागरिक असल्याच्या दाव्याबाबतची चूक लक्षात BVDच्या आली नव्हती. त्यात FDO ने BVD ला खात्रीलायक सांगितले कीं खानसाहेबांना अ‍ॅम्स्टरडॅमच्या मुख्य कार्यालयात अगदी कमी सुरक्षिततेची अनुमती लागणारे काम दिले जाईल, आल्मेलो येथील अति गोपनीय अशा सेंट्रीफ्यूज प्रकल्पात त्यांना काम दिले जाणार नाहीं. या तत्वावर त्यांना तिथे काम करायला परवानगी मिळाली. मग खान कुटुंब बधुफेडॉर्प या अ‍ॅम्स्टरडॅमच्या नैऋत्य भागातल्या उपनगरात रहायला आले.

खान यांना तेथील शास्त्रज्ञ फारच मुक्त वातावरणात काम करत होते याचे आश्चर्य वाटले.

पण एकाच आठवड्यात FDO ने या अनुमतीबाबत ढिलाई केली व त्यांना आल्मेलोतल्या प्रथांचा (procedures) अभ्यास करण्यासाठी दोन दिवसांच्या भेटीवर पाठविले. तिथला सेंट्रीफ्यूज हॉल व प्रसाधनगृहे तसेच कॉफीशॉप एकाच इमारतीत होती. या दोन दिवसात खान यांनी तिथे काय चालते याची बारीक माहिती चौकशा करून मिळविली.

तोपर्यंत फक्त चारच देश, चीन, रशिया, फ्रान्स व अमेरिका, युरेनियमचे शुद्धीकरण करून त्याची संपन्नता/शुद्धता वाढवू शकत होते. हे शुद्धीकरण ते परमाणूंच्या फैलावाने (diffusion) साध्य करत असत. ही पद्धत फार खर्चिक व गुंतागुंतीची होती. कारण ज्या युरेनियमचे शुद्धीकरण करायचे तो पदार्थ फारच गंजवणारा पदार्थ आहे व शुद्धीकरणाला लागणार्‍या सुविधा/उपकरणे खूप अत्याधुनिक व गुंतागुंतीची असावी लागत. सर्व नळ्या (पाईप) आणि पंप निकेल किंवा अल्युमिनियमच्या मिश्रधातूचे असावे लागत अन् संपूर्ण मांडणी ग्रीज किंवा तेलापासून मुक्त असावी लागे. कारण ग्रीज किंवा तेलामुळे अनिष्ट रासायनिक प्रक्रिया व्हायचा धोका असे. पण जिथे खानसाहेब काम करायचे त्या आल्मेलो कंपनीत शास्त्रज्ञांनी सेंट्रीफ्यूज पद्धतीने युरेनियमच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया शोधून काढली होती. सी.एन.ओ.आर. या नावाने ओळखली जाणारी ही प्रक्रिया युरेनियमचे ३ टक्क्यापर्यंत शुद्धीकरण करू शकत असे व या शुद्धीकृत युरेनियमवर परमाणू उर्जा कारखाना चालवता येऊ शके. हे कानावर पडल्यावर खानसाहेबांचा विश्वासच बसेना. अ‍ॅम्स्टरडॅमला FDO च्या ऑफीसमध्ये आल्यावर खानसाहेबांनी आल्मेलोच्या शास्त्रज्ञांबरोबर पत्रव्यवहार सुरू केला. ही पत्रें ते दर आठवड्याला लिहीत व त्यांचा सूर गप्पा मारल्यासारखा असे व परस्परांना आवडणार्‍या गोष्टींवर भर दिलेला असायचा. लवकरच हे शास्त्रज्ञ त्यांना येणार्‍या अडचणींबाबत खानसाहेबांशी चर्चा करू लागले. सगळ्यात मोठी डोकेदुखी होती कीं सेंट्रीफ्यूजचा वेग वाढताच त्याचा धातूने बनलेला हात (metallic arm) वाकायचा, त्याच्या नळकांडीला भोक पाडायचा व या भोकातून धातूचे अनेक तुकडे इकडे-तिकडे उडत व त्यांच्या मार्गात येणार्‍या सर्व गोष्टींचा नाश करत. खानसाहेब त्यांना म्हणाले की लॉयवन (Leuven ) येथे शिकत असताना हार्डन केलेले पोलाद (hardened steel) किती दबाव शोषू शकते याविषयावर त्यांनी केलेले संशोधन त्यांना ही अडचण दूर करण्यात मदत करेल. त्यांनी असा आव आणला कीं ते करत असलेले सहाय्य/योगदान उच्च मोलाचे होते व परिणामत: लवकरच ते डच प्रतिकृतीवर धातुशास्त्रीय संशोधन करू लागले. खरे तर असे संशोधन करण्यासाठी लागणारी पात्रता/शिक्षणही त्यांच्याकडे नव्हते. आल्मेलोचे शास्त्रज्ञ त्यांना अत्यंत गोपनीय असलेली डिझाइन्स पाठवू लागले व त्यात लागणारी साधनसामग्री पुरविणार्‍या कंपन्यांची नांवेही पाठवू लागले. अशा तर्‍हेने खानसाहेब हळूच या अत्यंत गोपनीय अशा संशोधनक्षेत्रात "पाय न वाजवता" शिरले.

पुढे १९७२ साली त्यांनी पाकिस्तानी सरकारला याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. दोन पाकिस्तानी शास्त्रज्ञ "विंड टनेल" विकत घेण्याच्या मिषाने आले होते त्यांना एकटे गाठून ही माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते शास्त्रज्ञ प्लुटोनियमवाले निघाले. त्यामुळे त्यांना युरेनियममध्ये रस नव्हता. पुन्हा खानसाहेब विचारात पडले. पण त्यांनी माहिती गोळा करायचे आपले काम चालूच ठेवले. पुढे १९७४ साली जेंव्हा भारताने त्याच्या अण्वस्त्राची चांचणी केली त्यावेळी पाश्चात्य राष्ट्रांची पाकिस्तानला मदत करण्याबद्दलची उदासीनता पाहून ते चिडले व त्या तिरमिरीत त्यांनी भुत्तोंना पत्र लिहिले. त्यांना बोलावणे आले तरीही उत्तेजित न होता ते नाताळापर्यंत थांबले व इतरांच्या बरोबरच सुटी घेऊन ते पाकिस्तानला गेले. दरम्यान जर्मन शास्त्रज्ञांनी सेंट्रीफ्यूजची जी-२ या नावाची एक नवीन प्रतिकृती बनविली होती त्यामुळे युरेंकोचे सर्व शास्त्रज्ञ अतीशय उत्साहित झाले होते. जी-२ हे मॉडेल जुन्या CNOR च्या सेंट्रीफ्यूजच्या जागी येणार होते कारण जी-२ ने CNOR च्या सर्व अडचणी सोडवल्या होत्या. खानसाहेबांनी या प्रतिकृतीबद्दल माहिती मिळविण्याचा निश्चय केला.

जर्मन, डच व इंग्लिश भाषांचे एक भाषांतरकार म्हणून खानसाहेबांनी आपणहून ही सेवा अर्पण केली. त्यांना सर्वात कमी महत्वाच्या विभागाचे "G-2 working instructions" चे भाषांतर करण्याचे काम देण्यात आले.

खान यांनी आपल्या बरोबरच्या अधिकार्‍यांचे मन वळविले कीं त्यांना आल्मेलोला पाठवण्यात यावे म्हणजे जे समजणार नाही त्याबद्दल ते लगेच चौकशी करू शकतील. जरी जागेची कमतरता असली तरी त्यांना आल्मेलोच्या अंतिम 'योजना व संरचना' विभागात एक टेबल देण्यात आले. ही जागा सेंट्रीफ्यूज असलेल्या भागापासून वेगळी काढली होती. UCN च्या शास्त्रज्ञांत या विभागाला "brain-box" म्हटले जाई व तिथे काम करणार्‍याला अतीशय गुप्त अनुमती (Top-Secret Clearance) असणारच अशी गैरसमजूत होती. बाहेर जातांना दारे, ड्रॉवर्स वगैरेंना कुलुपे लावली पाहिजेत असे नियम होते पण तिथे एक तर्‍हेचे खुले वातावरण निर्माण झाले होते. शिवाय प्रत्येकाचे काम एकमेकांवर अवलंबून होते. त्यामुळे हे नियम तसे अनावश्यक वाटत. खानसाहेबांच्या शेजारी बसणारा अधिकारी कैक वेळा कागद, ड्रॉइंग्स वगैरे टेबलावर पसरलेल्या अवस्थेत तासंतास गेलेला असायचा त्यामुळे खानसाहेबांना बर्‍याचदा मोकळे रान मिळायचे.

खानसाहेबांनी सर्व गोपनीय माहिती आपल्या छोट्या काळ्या डायरीत कॉपी करायचा सपाटा चालूच ठेवला. पण असे करायची त्यांना गरज नव्हती. कारण खानसाहेबांना अशी माहिती मिळाली कीं आल्मेलो येथील ’ब्रेन-बॉक्स’मध्ये एकच टंकलेखिका होती व तिला हे टंकन करायला वेळ नव्हता म्हणून हे सर्व कागद FDO च्या अ‍ॅम्स्टरडॅम ऑफीसला पाठवायचे ठरले. खानसाहेबांनी अ‍ॅम्स्टरडॅम ऑफीसमधल्या पोरींना आधीच चॉकलेट्स, केक्स व इतर ’च्याव-माव’ देवून खुष करून ठेवले होते. मग खानसाहेब परत अ‍ॅम्स्टरडॅमला गेले व या पोरींना पटवून त्यांनी तो संपूर्ण टंकन केलेला रिपोर्ट त्यांच्याकडून मिळविला व त्याची प्रत बनविली.

१९७४च्या डिसेंबरमध्ये (नाताळ) खानसाहेब, हेनी व त्यांच्या दोन मुली साळसूदपणे FDO इतर अधिकार्‍यांसारखे कराचीला 'सुटी'ला म्हणून गेले. तसे त्यांनी पाकिस्तानी सरकारला सूचितही केले होते. कराचीच्या विमानतळावर उतरताच ब्रिगेडियर इम्तियाज अहमद यांनी त्यांना थेट इस्लामाबादला नेले.

शेवटी खानसाहेबांचे स्वप्न साकार झाले. त्यांना पाकिस्तानात हवी तशी नोकरी मिळाली. त्यांनी भुत्तोंना पटवून दिले कीं सेंट्रीफ्यूज पद्धतीने पाकिस्तानला बाँब अर्ध्या वेळात बनवता येईल व व एका सेंट्रीफ्यूजमधून बाहेर आलेले व अंशत: शुद्धीकृत झालेले (partially enriched) युरेनियम दुसर्‍याta, दुसर्‍यातून आलेले तिसर्‍यात अशा तर्‍हेने ६५ ते ७० सेंट्रीफ्यूजमधून बाहेर काढलेले युरेनियम ९० टक्क्यापेक्षा जास्त शुद्ध असेल व त्याला फक्त १५ दिवस लागतील. UF6 हे वायुरूपातले युरेमियम अशा तर्‍हेने शुद्ध करण्यात जर्मन शास्त्रज्ञ यशस्वी झालेले होते व त्यासाठी वापरलेल्या G-2 प्रकारच्या सेंट्रीफ्यूजची सर्व ड्रॉइंग्ज ते घेऊन आले होते. त्यांनी झटपट हिशेब करून भुत्तोंना सांगितले कीं एक बाँब बनवायला फक्त ६०,००० डॉलर्स खर्च येईल.

सगळ्यात खुषीची गोष्ट ही होती कीं खालिद अस्लाम या भूगर्भशास्त्रज्ञाने आधीच युरेनियम खाणीचा शोध लावला होता. थोडक्यात काय कीं कच्च्या मालाची क्षिती नव्हती. युरेनियम भरपूर प्रमाणात उपलब्ध होते व त्यासाठी IAEA च्या ’पहार्‍या’ची कटकट नव्हती!

भुत्तोंना खानसाहेबांची योजना खूप पसंत पडली. पण तरीही त्यांनी आपल्या तंत्रज्ञानासंबंधातील सल्लागारांना खानसाहेबांच्या दाव्यांची सत्यासत्यता पडताळून पहायला सांगितले. कारण आधीच्या ISI च्या अहवालानुसार खानसाहेबांना अतिशयोक्ती करण्याचे वावडे नव्हते. त्यांनी डॉ. मुनीर अहमद खान यांना खानसाहेबांची मुलाखत घ्यायला सांगितले. खानसाहेबांनी उलट डॉ मुनीर यांनाच परमाणूविद्या कशी मिळवावी यावर 'भाषण' दिले. ही भेट फारच अनिष्टपणे गेली कारण डॉ मुनीर यांना कुणाकडून 'ऐकून घ्यायची' संवय नव्हती व तेही एका शास्त्र विषयात कांहींच पात्रता नसलेल्या व परदेशी राहून आलेल्या ४० वर्षीय माणसाकडून!

खानसाहेबांनी डॉ मुनीर यांना प्रिय असलेली प्लुटोनियम रीप्रोसेसिंगची पद्धत कशी वेळकाढू आहे, कशी खर्चिक आहे व त्यात IAEC कडून कशा सदैव कटकटी होतील हे सांगून या पद्धतीला "सफेत हत्ती" अशी संज्ञा दिली. याउलट सेंट्रीफ्यूज पद्ध्तीतील उपकरणे कशी गुपचुप बसवता येतील, तिचे सर्व घटकभाग कसे खुल्या बाजारात विकत घेता येण्यासारखे असल्यामुळे ती पद्धती कशी कुणाला कळणार नाही हे सांगितले व जाता-जाता मुनीर व त्यांचे लोक कसे थापाडे आहेत व कसे खोट्या गोष्टी सांगताहेत हेही ठासून सांगितले.

भुत्तोंनी मनात ठरविले कीं ते खानसाहेबांच्या महत्वाकांक्षी स्वभाव व आक्रमक स्वभावाला काबूत ठेवू शकतील व शेवटी त्यांनी निर्णय घेतला कीं खानसाहेबच त्यांच्या पाकिस्तानला परमाणूशक्ती बनविण्याच्या स्वप्नाला पूर्णत्वाला नेऊ शकतील!
Nuclear Deception front cover.JPG
(या लेखमालिकेचे भाग दर शनिवारी आणि बुधवारी प्रसिद्ध होतील.)
Sudhir Kale JP-Silver Jubilee.JPG

गुलमोहर: 

इथला 'Help' विभाग चांगला लिहिलेला आहे! त्यामुळे मला माझ्या लेखाखाली दोन चित्रे upload करता आली.
वरच्या दोन्ही प्रतिसादांत मी याबद्दलच विचारणा केली होती. पण 'Help' विभागात जाऊन वाचल्यावर ती समस्या सुटली. धन्यवाद!!

.

दर शनिवारी आणि बुधवारी! २२मधील २० प्रकरणे तयार आहेत. एकादे वेळेस झालीच तर शेवटी थोडी दिरंगाई होईल. पण एरवी एकदम सर्र्र्र्र्रर्र!.....
उद्या वाचा प्रकरण दुसरे: प्रकल्प "लोणी कारखाना"!

तुम्ही छान लिहीताय आणि विषयही मस्त आहे... फक्त
’माझा मध’ (my honey) <<< 'माझी प्रिया' करा.. काहीवेळा शब्दशः भाषांतर त्रासिक होतं...

तुमचं लिखाण उत्तम आहे. शैली छान आहे. सोप्या पद्धतीन क्लिष्ट विषय हाताळला गेला आहे. कदाचित थोड श्रेय मूळ लेखकालाही द्यावं लागेल. मराठीत बाराला दहा कमी नंतर पहिल्यांदाच इतकं छान लिखाण वाचतोय.

पुढचे भागही वाचतो वेळ मिळेल तसे.....

( पुस्तक येणार आहे का ?)