रायगड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

निलचा अचानक ट्रेकला जायचा बेत ठरला... जोडीला २ योबाबा (योगायोग आणि Yo Rocks) आणि ३ ओबाबा (निल, दिनेश आणि अस्मादिक)

भुईकोट करुया किंवा जलदुर्ग करूया... चढउतार नाही जमायचं... प्रवासाची दगदग... घरची परवानगी... अशी कारणे देत मी टाळाटाळ करत होतो... पण निल काही एकेना... रायगडलाच जाऊया हवं तर रज्जूमार्गे जाऊ... या आश्वसनावर मी आणि नंतर दिनेश गाडीसकट यायला तयार झालो...

सकाळी आरामात ७.३०ला पाचाडला (रायगडच्या पायथ्याचे गाव) पोहचायच होतं, म्हणून रात्री आरामात १२ला ठाणे स्थानकात आम्ही सगळे जमलो... आपले उत्साही घारूअण्णां नेहमीप्रमाणे मोहिमचे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थीत होते... घारूअण्णां तर्फे जबरदस्ती चहा वडापावचा खुराक झाल्यावर आम्ही महाडसाठी रवाना झालो...

पहाटे ३.३०ला निल आणि दिनेशच्या मांणगावला पोहचलो... पाचाडला लवकर जाऊन तरी काय करणार... त्यापेक्षा ST Standवर पथारी पसरू या इराद्याने सगळे स्टेशनात घुसले... मच्छर आणि डास घुसखोरांचा चांगला समाचार घेत असताना योगायोग मात्र घरच्या बिछान्यावर पडल्यासारखा डाराडूर... निलने गदागदा हलवून जागं केल्यावर निरागस बाळासारखे भाव चेहर्‍यावर आणून "मै कहाँ हूं"च्या अविर्भावात बाळराजे जागे झाले...

मच्छरांच्या उपद्व्यापाला कंटाळून आम्ही गाडीकडे परतलो... तत्पुर्वी मी व योगीने सकाळचा गरमागरम नाष्टा उरकला होता... (काय तो टोस्ट सँन्डविच आणि टोस्ट ब्रेड.... वाव्वाSSSS) निलने त्यांच्या आवडत्या लालाभाईकडे चहासोबत त्याच्या जगप्रसिध्द मिठाईची चव चाखली...

७ वाजता माणगांवातून बाहेर पडताच सर्वत्र धुक्याने दाटून टाकले... म्हंटल असेच वातावरण गडावर असेल तर काय मजा... पुढे महाडला सावित्री नदिवर गलबतांचे फोटो काढून पाचाडकडे निघालो... पाचाडला गाडी कुठे पार्क करायची? Ropewayला की देशमुखांच्या हॉटेलवर? लागलीच निलला अनुभवी अण्णांना झोपेतून जागं करण्याची मस्ती सुचली... अण्णां तप्तरतेने आपल्या मावळ्यांच्या मदतीला धावून आले... Ropewayकडे parking free आहे, देशमुखाकडे गाडी park करू नका असा आगाऊ सल्ला द्यायला अण्णा कचरले नाहीत.

Ropewayची तिकिटं घेऊन हवेत तरंगणार्‍या ट्रॉलीची पाहणी करून घेतली. एकदाची खात्री पटल्यावर सगळे जण जीव कॅमेरात धरून ट्रॉलीत बसले... रज्जूमार्गाने जाण्याचा एक वेगळाच थरार अनुभवयला मिळाला (३ तासाची चढाई फक्त ५ मिनिटांत :P) गडावर पोहचे पर्यंत ८ वाजले होते... एव्हढ्या सकाळी गडावर येणारे कोण हे अश्या शोधक नजरेने तेथील श्वान पथक सामोरे आले...

गडावरील प्रवेश शुल्काचा हिशोब चुकवून (संपवून) आम्ही MTDCच्या मागील बाजून वर आलो आणि हा हा म्हणता सगळे मंत्रमुंग्ध झाले... समोर ढगात हरवलेले सह्याद्रिचे कडे पाहून सगळ्यांचे भान हरपले होते. कॅमेर्‍याच्या लेन्स तोकड्या पडत होत्या... मनाच्या रिळावर जमेल तेव्हढी निसर्गाची अदाकारी टिपण्याचा प्रयत्न सुरू होता. स्वर्गातील देवांनाही हेवा वाटावा असं निसर्गाचं कोवळं रुपडं आमच्या डोळ्यासमोर रांगत होतं... दिनेशला त्यावेळी कॅमेरा न आणल्याची खंत प्रकर्षाने जाणवली.

त्या भारवलेल्या अवस्थेत आम्ही मेणा दरवाज्यातून राणीमहालाकडे आगेकूच केली. अंधार कोठडी, दासींची जागा, मुद्पाकखाना, पालखी दरवाजा, होळीचा माळ, अंबरखाना, नगारखाना, मेघडंवरी बघून थकलेल्या मावळ्यांना भुकेची आठवण झाली... मग काय राजदरबारात बसून सोबत आणलेली शिदोरी सोडण्यात आली. हिरकणीच्या नातीने की पणतीने आणलेल्या ताकावर तहान भागवून निलने तृप्तीचा ढेकर दिला...

पुढे शिरकाईमातेचे मंदिर, गंगासागर, हत्ती तलावाकडून टकमक टोकाकडे प्रयाण केले... वाटेत दारू कोठार, पाण्याच टाकं, सोनकीच्या फुलांचा गालीचा पाहिला... टकमक वर अजिबात हवा नसल्याने आम्ही पुढं पर्यंत जाऊ शकलो... छत्रिनिजामपूर, काळनदीचे खोरे पाहून मागे फिरलो ते जगदिश्वराकडे जाण्यासाठी... वर ऊन तापू लागलं होतं... ताकाची तहान आता पाण्यावर भागवली जात होती... डाविकडील सह्याद्री पार धुक्याच्या पडद्याआड गेला होता... तांबडा रस्ता कसा तरी संपवत आम्ही जगदिश्वराच्या मंदिरात पोहचलो... मंदिरात एक वृद्ध काका समर्थांची स्तूतीसुमने आळवत होते. मंदिरातील शितल वातावरण त्यामुळे प्रफुल्लित झाले होते. मंदिरा समोरील छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथिल एका दगडावरील शिलालेख आजही रायगडाच्या गत वैभवाची साक्ष देत आहे.

मागे फिरून बाजारपेठ, कुशावर्त तलाव पाहून हिरकणी बुरूजाकडे जाण्याचा बेत केला. पण दुपारचे उन काही साथ देत नव्हते. योबाबा पुढे पुढे तर ओबाबा नको नको... असे करत शेवटी गड उतरण्याचा निर्णय घेण्यात आला... उजविकडे टकमक तर डाविकडे हिरकणी बुरूज आणि मध्यभागी दिमाखात दोन बुरुजां मधे दडलेला महादरवाजा. समोर रायगडवाडीचे खोरे... अहाहा काय तो देखावा... मग तेथेच बसून उरलेली खादाडी करण्यात आली... भेळवाला भैय्याने तर कमालच केली...

मजल दर मजल करत आम्ही उतरणीला लागलो... खुबलढा बुरूज, नाना दरवाज्याला बगल देत आम्ही थेट पायथा गाठला... दमलेले शिणलेले जिव कसेबसे गाडीत कोंबून परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत परत माणगांवला थांबून श्रमपरिहार केला. लवकरच पुढल्या मोहिमेचा बेत ठरवून सगळ्यांनी निरोप घेतला.

विषय: 

हिरकणीच्या नातीने की पणतीने आणलेल्या ताकावर तहान भागवून निलने तृप्तीचा ढेकर दिला...
Lol हे आवडले रे... Lol
धावपळीत सुद्धा छान लिहीलेस रे..
पुढची मोहिम ठरवा लौकर.. योबाबा तैयार आहेतच.. Happy

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

मस्तच फोटो इंद्रदेवा! छानच लिहिलेस! Happy
>>हिरकणीच्या नातीने की पणतीने आणलेल्या ताकावर तहान भागवून
Lol

हो योगी <अन्य्तिमे>
इन्द्रा मस्तच झालाय, लवकरच पुढची मोहिम ठरवा Happy

सहि रे ! ते ढगांचे फोटो महान !!!

परागकण

दोन्ही वर्णनं आणि फोटो छान!

इंद्रा रेSSSSSS अफाटच ! फोटो म्हणजे भन्नाट ! आता पुन्हा कुणी निघाले रायगडला तर मला विसरु नका रे ! मी आणखी एक रायगडवेडा आहे !
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **