श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग १२

Submitted by बेफ़िकीर on 19 July, 2010 - 02:03

दास्ताने वाड्यात असा जल्लोष क्वचितच व्हायचा! इयत्ता तिसरीमधे गट्टू शाळेत पहिला! गेल्या सात वर्षांची रेकॉर्ड्स मोडली!

नुकताच पाचवी पास झालेला अन 'आम्हाला आता इंग्लीश आहे' याचा टेंभा मिरवणारा समीरदादा सगळे जल्लोषात नाहून निघत असताना कित्तीतरी वेळ गट्टूचे प्रगती पुस्तक तपासत होता. चुकून एखाद्या विषयात कमी मार्क्स तर नाहीयेत ना? नाहीतर उगाचच लोक नाचायचे अन हा झालेला असायचा नापास वगैरे!

श्रीला आता दोन्ही हातांना मिळून सात बोटे होती. उजव्या हाताची सर्व आणि डाव्या हाताची करंगळी अन तिच्या शेजारचे बोट म्हणजे मरंगळी की काय म्हणतात ते!

आणि गेल्या दोन वर्षात श्री सातच बोटांनी पोळी कशी लाटावी, साणशी कशी धरावी, अनेक कामे कशी करावीत हे अतिशय नीट शिकलेला होता. त्या दिवशीच्या वेदना आठवल्या की एक प्रौढ व्यक्ती असूनही त्याच्या अंगावर शहारे यायचे! तो अपघात झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी रुग्णालयातून घरी आल्यानंतर श्री कितीतरी वेळा मधेच दचकून जागा व्हायचा. गट्टू श्रीचा हात पाहून खूप रडला होता. पण श्रीने त्याला हसत हसत समजावून सांगीतले होते. मावशी अन सबंध वाड्याने त्या दिवसांमधे गट्टूला व्यवस्थित सांभाळले तर होतेच पण उषाताई आणि ताराही आलेल्या होत्या.

तेही दिवस गेले. सगळे लागीलाग लागले अन कदाचित भाग्याला आजवर जो दुरावा ठेवायचा होता तो ठेवावासा वाटणे आता त्या नकोसे झाले असावे. कारण अचानक श्रीला प्रमोशन मिळाले, ध्यानीमनी नसताना! ज्युनियर ऑफीसरचा सिनियर ऑफीसर झाला आणि आता चिटणीस आणि तो एकाच लेव्हलला आले. स्वाती अजून ज्युनियरच होती आणि कोपरकर डेप्युटी मॅनेजर तर देशमाने मॅनेजर! या प्रमोशनमुळे त्याचा पगार तीनशे बेसिक वाढला. त्यानंतरच्या वर्षातही बर्‍यापैकी इन्क्रीमेंट मिळाल्यामुळे पुर्वीचा नऊशे टेक होम आता पंधराशे टेक होम झालेला होता.

आणि या इन्क्रीमेंटेच पेढे वाड्यासाठी आणल्यावर वाटणार तोच पेढे वाटण्याचे कारणच बदललेले असल्याचे त्याच्या लक्षात आले. कारण श्रीने 'पेढे घ्या पेढे' म्हणत उत्साहात आत पाऊल टाकताच चितळे मास्तरांचे घर दारातच असल्याने त्यांनी तिथल्यातिथेच त्याला 'गट्टू हा अत्यंत हुषार असून आपल्या वाड्यात यापुर्वी अशी गुणवत्ता असलेला विद्यार्थी झालेला नाही' हा इतिहास कथन करून टाकला. त्यामुळे 'हे पेढे मी त्याचसाठी तर आणले आहेत' अशी भूमिका श्रीला घ्यावी लागली अन पेढे या किरकोळ गोष्टीवर आम्ही समाधानी राहणार नाही हे मानेकाकांनी खालीलप्रमाणे सांगून टाकले.

"दास्ताने वाड्यातील एक मुलगा शाळेत पहिला येऊन सर्व विक्रम मोडतो हे कळल्यावर जर त्याच्या बापाने आम्हाला पुरी, श्रीखंड व बटाट्याची भाजी अशी 'लहानशी' डिश दिली नाही तर मी ही गोष्ट माणूसकीहीन व वाड्याच्या इतिहासाला काळिमा फासणारी समजून अख्खा दास्ताने वाडा????"

कोरस - पेटवून देईन...

दिवसातून किमान तीन वेळा माने वाडा पेटवायचे.

आणि त्याच दिवशी संध्याकाळी प्रमिला अन तिच्या समवयस्क गृहिणींनी आपापले स्वयंपाक जितके झाले होते तिथल्यातिथे थांबवून मानेकाकांना आयुष्यात पहिल्यांदाच अनुमोदन दिलेले होते.

आज निगडे काकूंचे काही खरे नव्हते. त्यांचा प्रॉब्लेम वेगळाच होता. त्यांचा एक नातू आठवीत पहिला येण्याचे चान्सेस होते अशी त्यांची कल्पना होती. कारण संपूर्ण आठ यत्तांपैकी आठवीच्या सहामाहीत तो वर्गात नववा आलेला होता. कसा काय नववा आला हे त्याला स्वत:लाच समजत नव्हते. त्याच्या आई बापांना तर तो एक प्रॉब्लेमच वाटत होता. हा असा पहिल्या दहात वगैरे यायला लागला तर उगाच शिक्षणाचा खर्च करत बसावा लागेल असा तो प्रॉब्लेम! आणि एरवी सर्व यत्तांच्या सर्व परिक्षांमधे जेमतेम सत्तर टक्क्याच्या आसपास असणारा हा धटिंगण एकदम नववा आल्यामुळे व नऊमाही परिक्षाच काही कारणांनी रद्द झालेली असल्यामुळे एकदम वार्षिक परिक्षेत हा कदाचित पहिलाही येऊ शकेल असा घोर विश्वास वाड्यातील काही बोलबचन लोकांनी व्यक्त केला होता. आणि 'पहिले आल्यावर अशी पार्टी द्यावी लागत असेल तर मोठा प्रॉब्लेमच आहे' हे निगडे काकूंना लक्षात आले होते. मात्र नातवाचे पेपर देऊन तर दिड महिना झालेला होता आणि रिझल्ट पुढच्या आठवड्यात होता. आता जाऊन मार्कांमधे फेरफार करणे; तेही उलट्या हेतूने, हे शक्यच नव्हते. आणि त्यांनी त्यामुळेच 'श्रीने गट्टूच्या पहिल्या येण्याची पार्टी देणे' हा एक अत्यंत मूर्ख उपक्रम असून वाड्यातील लोक हे फुकटचे गोड खायला चटावलेले आहेत असा गंभीर आरोप जाहीरपणे केला होता.

सर्वांवर एकत्रित आरोप झालेल्या असल्यामुळे पवार मावशींना स्वत:हून त्यात पडण्याची आवश्यकता अजून भासत नव्हती. तसेच, पार्टी ठरल्यामुळे, तीही त्याच दिवशी ठरल्यामुळे अन सर्व गृहिणींनी स्वयंपाक थांबवल्यामुळे मानेकाका निगडे काकूंकडे गांभीर्याने लक्षच देत नव्हते. पण निगडे काकूंना धास्ती होती पुढच्या आठवड्याची! त्या समोर दिसेल त्याला 'ही पार्टी कशी अनावश्यक आहे व श्रीला कसे लुबाडण्यात येत आहे' असे व्यक्तीगत पातळीवर कन्व्हिन्स करू पाहात होत्या. त्यांच्याकडे कुणाचे लक्षच नव्हते. संजय, किरण अन वैशाली केव्हाच प्रसाद गोडबोलेच्या घरी धावले होते. मोठ ऑर्डर द्यायची होती आज. चाळीस पान जिथल्यातिथे! बटाट्याचा रस्सा, एक चटणी, श्रीखंड आणि पुर्‍या! पाच वाजलेले होते आणि साडे आठ वाजता हे सगळे पाहिजे होते. आले धावत परत वाड्यात! 'काका, गोडबोले काकू म्हणतात की श्रीखंड असं तयार नसतं, आधी सांगावं लागतं'!

झालं! निगडे काकूंना आयतंच हत्यार मिळालं!

निगडे काकू - हे पहा, माझ्यामते अशी घिसाडघाईने पार्टी वगैरे ठरवू नका. मुहुर्त बघा, नीट बेत ठरवा! आणि मुख्य म्हणजे गेल्या दोन महिन्यातल्या अन पुढच्या दोन महिन्यातल्या सर्व शुभघटनांच्या पार्ट्या एकत्र याच पार्टीत करा. एकट्या श्रीवर काय म्हणून एवढ्या खर्चाचा बोजा??

चितळे आजोबा - गेल्या दोन महिन्यात काय झालंय?
निगडे - त्या घाटीणबाईच्या शुभीला जुळं झालं..
घाटे बाई - त्याची कसली पार्टी???? आपापली मेहनत घेऊन झालंय जुळं! वाड्याचा संबंधच काय?
चितळे आजोबा - आपापली मेहनत म्हणजे?
निगडे काकू - ओ ब्रह्मचारी, तुम्ही थांबा जरा.. काय गं? आपापली नाही तर काय भलत्यांची मेहनत असते?
घाटे बाई - काय बोलते ही बाई नाही??
चितळे आजोबा - मला हे समजत नाही.. जुळं होण्यात मेहनत ती कसली? जे एकाला करावं लागतं तेच दोघांसाठी ना??

येथे तरुण स्त्रिया तोंडाला पदर लावत एकमेकींकडे बघत हासल्या.

नंदा - ओ आजोबा.. तुम्हाला त्याच्याशी काय करायचंय??
चितळे आजोबा - बाकी काय झालंय गेल्या महिन्यात?
निगडे काकू - या मधूसूदनने पमीला साडी आणली..
मधूसुदन - म्हणजे काय? आता बायकांना साडी आणावी लागणारच की?
निगडे काकू - पण सातशेची? शोभतं का हे? आमच्यावेळी असलं नव्हतं!
मधूसूदन - अहो म्हणजे काय? लग्नासाठी आणली तिच्या सख्ख्या बहिणीच्या?
निगडे काकू - आणि त्या बेरीण बाईलाही दिवस गेलेलेत..
चितळे आजोबा - क्काय???

यात एक गोम होती. 'बेरीण बाईलाही दिवस गेलेलेत' हे विधान निगडे काकूंनी 'आसाम बॉर्डरवरूनही गनीम घुसलाय' या थाटात उच्चारलेले होते. त्यामुळे नुसत्या त्या टोनॅलिटीमुळेच अचानक चितळे आजोबांनी 'आता युद्ध होणार की काय' अशा थाटात 'क्काय???' असे विचारले होते.

घाटे बाई - तुमचा काय संबंध हो आजोबा त्याच्याशी? काही झाले की आपले 'क्काय????'

दिवस जाणे व मूल होणे याच्याही पार्ट्या ठरतायत हे पाहून ज्या बायकांना दिवस जाणे एक्स्पेक्टेड होते किंवा किमान ते जावेत असे वाटत होते त्या तिथून सटकण्याच्या मनस्थितीत आलेल्या होत्या.

बेरीण बाई दोन बायकांच्या मागे लपली होती. बेरीकाका बेरीणबाईंपेक्षा जास्त लाजले होते. 'मी नाही हो, मी असलं कधीच करणार नाही' वगैरे वाक्यही कदाचित ते बोलून गेले असते. मात्र त्यांच्यावरचा तो प्रसंग चितळे आजोबांनी घालवला.

चितळे आजोबा - ते जाऊदेत.. पुढच्या दोन महिन्यात काय होणारे?
निगडे काकू - ..... इश्श!

झालं! आता या 'इश्श'चा अर्थ काय लावायचा यावर काही सेकंद गेले.

चितळे आजोबा - इश्श म्हणजे काय????

यावर कर्व्यांचे दिवटे पाजळले.

समीरदादा - मला माहितीय.. आई बाबा स्वैपाकघरात असताना मी पाणी प्यायला गेलो की आई बाबांना चिडून इश्श म्हणते..

हे ऐकून प्रमिला आत पळाली. मधूसूदन इकडे तिक्डे 'हॅ हॅ' करत बघत बसला. सगळेच खो खो हसत होते.

राजश्री - आई? आपल्याला बाळ होणारे?

यावर किरण ओरडला...

किरण - तुझ्या 'आईला'.. आपल्याला काय?

मानेकाका - अरे पण पार्टीचं काय?
चितळे - मीही तेच म्हणतो..
श्री - पण श्रीखंड नाहीयेना?

प्रमिला बाहेर आली. आता तिचा रोल सुरू होत होता.

प्रमिला - मी काय म्हणते??
निगडे - ए.. कानामागून आली? आम्ही मोठे बोलतोय ना??
चितळे - मला ही एक प्रकारची अंतर्गत मुस्कटदाबी वाटते.. तू बोल ग प्रमिले..
प्रमिले - हे शेवया आणतील.. मी अन सुषमा खीर करतो..
श्री - अन बाकीचे?
नंदा - अहो बाकीचे देतील ना गोडबोलीण बाई..
श्री - बर.. मग.. द्या ऑर्डर..
मधूसूदन - लेका श्रीया.. पैसे काढ शेवयांचे.. पार्टी तुझी..
श्री - हं! हे घे.. किती लागतील?
मधूसूदन - काय गं? किती आणायच्या??
प्रमिला - आणा तीन किलो..
श्री - तीन?? पण.. कंबाईन्ड पार्टीय ना??
मधू - हां! ओ बेरी.. तुमची गूड न्यूज कळली अख्ख्या वाड्याला.. काढा पैसे..
बेरी - मी.. खरच नाही हो माझा काही दोष त्यात..
चितळे - क्क्काय???
सुषमा - दोष नसतोच भावजी.. आपोआप होतात चुका..
निगडे - अन या घाटीण बाईचे?
घाटे - माझी मुलगी सासरी! अन मी इथे पार्टी देऊ होय? ती आल्यावर बघू..
निगडे - वा गं वा.. म्हणे आल्यावर बघू...ती येईल दोन वर्षांनी..
घाटे - तू का 'इश्श' म्हणालीस पण.. ???
निगडे - इश्श!
चितळे - अरे? काय चाललंय काय?
प्रमिला - निगडे काकू... म्हणजे.... तुमच्याकडे ... काही.. आपलं.. विशे...
निगडे काकू - ए.. गप्प?? गप्प बस..
नंदा - बाईगं! या वयात?
चितळे - काय केलं यांनी या वयात? आपली संस्कृती काय? आपण करतो काय? काय केलं काय यांनी नेमकं??
नंदा - आजोबा.. तुम्हाला नाही समजणार..
मानेकाका - या वाड्यात नेमकं काय झालंय ते समजलं नाही तर मी हा दास्ताने वाडा पेटवून देईन..
प्रमिला - आधीच पेटलाय दास्ताने वाडा..
मानेकाका - म्हणजे?
प्रमिला - निगडे काकू आई होणारेत..
चितळे - आई आहेतच की... आजी पण आहेत..
प्रमिला - पुन्हा आई..
निगडे - ए गप्प बसा.. अजून काही नक्की नाहीये..
श्री - मग .. ते ठरल्यावरच.. पार्टी करूयात का??
नंदा - श्री भावजी गप्प बसा हो जरा.. काय हो काकू?? दहाव्यांदा?
चितळे - यामुळेच भारत हा देश..
निगडे - ओ आजोबा.. गप्प बसा.. कुणाला काही त्रास आहे का याचा??
मधूसूदन - हा त्रास कोण घेणार??

सगळेच हसले. अगदी पवार मावशीही!

गट्टू - बाबा.. आजी हसली..

पवार मावशी हसल्या ही एक भिन्न बातमी झाली वाड्यात! आता त्याची पार्टी मागणं सुरू झालं!

मानेकाका - ए चेटकीणी.. तू हसलीस त्याच्याबद्दल खीर पाहिजे..

झालं! नीत बोलायचं ना? आधीच बया कशीबशी हसतीय! अन त्यात चेटकीण म्हणून मोकळे हे मानेकाका!

मावशी - ए मान्या.. मी हशीन नाहीतर बोंब मारीन.. तुझी तिरडी नेली बालगंधर्ववरून.. तुला काय झालं?? आं?? म्हणे चेटकीण.. चेटकीण तुझी आई.. तुझी बहीण हडळ! बाप समंध तुझा! यांना होणार कार्टी अन आम्ही द्यायची पार्टी? पहिला आला गट्टू अन निगडेला दहावा तट्टू? काय पार्टीबिर्टी होऊ देणार नाही मी.. ए श्री.. ते पैसे घे परत.. मध्या.. लाजलज्जा वाटत नाही का पार्टी मागायला?? आं?? ए चितळे.. बाईमाणसाला दिवस गेले यात कसला भारतावर भाषण ठोकतोस?? तुझ्या आईला गेले नसते तर असतास का तू? काय गं ए नंदे? मोठी एकटी राहतेस?? सतराशे साठ लुगडी अन बाई माझी उघडी? तुझी पार्टी दे एकटं राहण्याची.. जीभ सोडतीय.. काय ग प्रमिले? दोन वेण्या घातल्या की झालीस का सायरा बानू? आं?? म्हणे खीर करते? चक्का नाही लावता येत? मोठी सातशेची साडी नेसतीय ती? म्हणे मी हसल्याची पार्टी पाहिजे.. चला.. चल्ला आपापल्या घरात..

मावशींच्या तोफखान्यामुळे अवघ्या बारा सेकंदात पांगापांग झाली.

धाडधाड लाकडी पायर्‍या वाजवत मावशी आपल्या घरात गेल्या अन तितक्याच जोरात त्यांनी स्वतःच्या घराचे दार आतून लावले.

त्यांच्या दृष्टीने त्यांनी त्यांचे काम व्यवस्थित केलेले होते. त्यांना चेटकीण म्हंटल्यामुळे पार्टीच रद्द करण्याचा त्यांचा अधिकार त्यांनी वापरलाही होता व त्याचा प्रभावही पडला होता.

पंधरा मिनिटांनी हळूहळू पुन्हा कुजबूजत सगळे खाली जमले.

चितळे - मी काय म्हणतो माने.. एवढं कशाला बोललात तिला? चेटकीण म्हणून??
माने - अहो.. एक आपलं.. सवयीनं गेलं तोंडातून..
चितळे - हो का? मग तिच्या तोंडातून सवयीनं किती गेलं बघितलंत ना?
प्रमिला - पण काका आज नको होतत बोलायला तुम्ही..
माने - तू गप गं चिमुरडे... गेली पंधरा वर्षं आम्ही असंच बोलतो एकमेकांशी..
मधू - पण.. मग.. पार्टी आहे का नाही??
घाटे - करा करा.. तिला यायचं असलं तर येईल... नाहीतर बसेल..
मधू - तू एक काम कर प्रमिला.. खीर झाली की वर नेऊन दे..
प्रमिला - नको बाई! मारायच्या मला..
श्री - नाही.. तशा प्रेमळ आहेत..
माने - प्रेमळ? ती पवार मावशी प्रेमळ आहे??
निगडे - मी काय म्हणते?? एवढं अशुभ बोलली ती बया.. आज नकोच पार्टी..
नंदा - आपला काय संबंध पण?? त्या बोलल्या तर बोलल्या..
श्री - मला काही प्रॉब्लेम नाही.. पण.. मावशी नसतील तर..
घाटे - गट्टूची पार्टी कशी होईल नाही का? म्हणजे आम्ही कुणी नाहीच गट्टूच्या..
निगडे - मग काय तर? किती केलंय मी एवढासा असल्यापासून..!!

आता घाटे अन निगडे एका पार्टीत आल्या.

माने - मध्या.. जा तू आण खीर.. मी बघतो कोण करू देत नाही पार्टी..

हो नाही म्हणता म्हणता पार्टी ठरली एकदाची! मात्र अजूनही कुजबुजाटच चालू होता. एकदा गोडबोलेंकडून स्वैपाक आला अन प्रमिला अन सुषमाने 'खीर झाल्याचे' सांगीतले की मग पाने घेताना मात्र आवाज भरपूर होणारच होता. आत्ता मात्र प्रत्येक जण वचकूनच होता.

दोन तासांनी, म्हणजे सव्वा आठ वाजता गोडबोलेंकडून सगळं काही आलं! प्रमिलानेही जाहीर केलं! खीर झालेली आहे.

फटाफट्ट पाने घेतली गेली वाड्याच्या चौकात! आता मात्र मुलांचा धिंगाणा चालू झाला.

दोन पंगतीत सगळेच बसू शकणार होते. प्रमिला, सुषमा, बेरीण बाई अन नंदा वाढणार होत्या.

'वदनी कवल घेता' झाले! चितळे आजोबांना समीरदादा, संजयदादा अन गट्टूची मोठी साथ लाभली ते म्हणताना! आता मावशींची काळजी कुणालाच वाटत नव्हती.

वाढून झालेलेच होते. 'वदनी कवल घेता'ही झालेले होते. पण घास काही उचलेना कुणाला स्वतःच्या हातांनी!

हळूच मानेकाका म्हणाले..

माने - प्रमिले.. एकदा वर जाऊन हाक मार गं! बसली असेल चांडाळीण रडत..
मधू - मी जाऊ का?
माने - जा..
प्रमिला - अहो.. तुम्ही नको.. काहीतरी बोलायच्या.. मीच जाते बाई..
निगडे - पण तिला कशाला बोलवायचं? स्वतःच अशुभ बोलून गेलीय ती वर...
चितळे - असं नाही निगडे बाई.. शेवटी गट्टूचं तिनीच केलंय..
निगडे - आम्ही काही कमी नाही केलं.. श्रीला विचारा.. काय रे?? आता का गप्प??
श्री - नाही नाही.. गप्प कुठे? केलंच आहे..
चितळे - श्री? मग.. मावशीला बोलावलं नाही तर चालेल का तुला??
श्री - अं?? न.. नाही.. म्हणजे.. तुम्ही घ्या जेवून.. मी नाही आत्ता जेवणार.. भूकही नाहीये..
नंदा - भूक नसायला काय झालंय?? घास उतरत नाही म्हणून सांगा..
सुषमा - कसा उतरेल?? गट्टू दिवसरात्र त्यांच्याकडेच असतो.. अन त्याच नाहीत जेवायला..
माने - चूक माझीय.. मीच बोलावतो तिला वर जाऊन..

सगळ्यांनाच हे पटलं! माने बिचकत बिचकत वर गेले. मावशींच्या दारावर चार थपडा मारल्या, हाका मारल्या! पण उत्तरच नाही. वरूनच मानेंनी हात हलवून 'काही बोलतच नाही' अशी खूण केली. एक मात्र झालं! जेवायला सुरुवात कुणीच केली नव्हती.

माने - ए मावशी... बाहेर ये.. रुसतेस कसली या वयात? बघ सगळे जेवायला बसलेत.. तुझ्यासाठी थांबलेत.. गट्टूच्या पार्टीला तू रुसल्यावर त्याला आवडेल का??

काही उत्तर नाही.

माने - ए.. दार उघड.. भाव खाऊ नकोस जास्ती! पोरंही थांबलीयत जेवायची तुझ्यासाठी.. गट्टू? ये रे वर? हाका मार आजीला..??

गट्टू काही आला नाही. कारण तो समीरदादाबरोबर बोलत होता. त्याने ते वाक्यच ऐकलं नव्हतं! मात्र, मुलेही जेवत नव्हती हे खरं होतं!

माने - ए टिटवे.. दार उघड.. आता मात्र मी तापायला लागलोय हां! फार भाव देणार नाही.. सरळ जेवायला बसू आम्ही..

थपडा मारण्यात आणखीन दोन मिनिटे गेली. शेवटी हताश झालेले माने काका वरूनच ओरडले..

माने - पमे.. पोरांना जेवूदेत.. बाकीच्यांना.. ज्यांना जेवण जातंय त्यांना जेवूदेत.. ज्यांनी नाही जात त्यांनी घरी जा.. अरे?? हे काय? सगळेच काय उठता?? ए..

खरोखरच सगळे उठले होते. माने वरून ओरडत असतानाच मावशींनी खाडकन दार उघडले. कसलेतरी भले मोठे पातेले हातात घेऊन त्या गॅलरीत आल्या.

मावशी - ए श्री.. हा शिरा ने खाली.. नालायकांनो? पंगती वाढता?? मी नसताना? लाजा वाटत नाहीत?? आज मी कित्येक वर्षांनी हसले म्हणून या भुताने पार्टी मागीतली म्हंटल्यावर द्यायला नको का पार्टी? आं?? हक्काने बोलता येत नाही तुम्हाला?? हा शिरा माझ्या हसण्याचा अन गट्टूच्या पहिले येण्याचा.. आजीने केला शिरा? अन गट्टू आमचा हिरा.. ए निगडीणी.. नऊ बास! मुली तुझ्याआधी बा़ळंत व्हायच्या... भाचे मोठे होतील मुलापेक्षा.. काय?? ए चितळे.. कमी साखरेचा केलाय जरा.. तुला सोसत नाही म्हणून.. चला.. चला जेवायला.. मोठे हाका मारतायत..

मावशी पातेले घेऊन खाली उतरल्या होत्या अन मानेकाका वरच उभे राहिलेले होते खिळून..

मावशी - काय रे ब्रह्मसमंधा? वरनं उडी मारून जीव देतोयस का? एवढी जेवणं होऊदेत.. अन तूही दोन घास खाऊन घे.. भरल्या पोटाने मर.. शिरा आवडतो ना तुला??

एकच जल्लोष झाला. मानेकाका अन चितळे आजोबांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. पोरे नाचू लागली. श्री वेड्यासारखा मावशींकडे बघत होता. सुषमा अन प्रमिला थट्टेने 'आता आमची खीर कोण खाणार' असे म्हणून हसत होत्या.

तेवढ्यात कधी शब्दही तोंडातून न फुटणारे बेरीकाका गरजले..

बेरीकाका - यापुढे जर मानेकाका मावशींना चेटकीण म्हणले तर मी हा अख्खा दास्ताने वाडा???

कोरस - पेटवून देईन...

हसत हसत आणि डोळ्यात पाणी साठवत मानेकाकांनी मावशींच्या डोक्यावरून हात फिरवला. मावशीही गहिवरल्या होत्याच..

चितळे - अरे? पण मी काय विचारतोय?? की.. ऐका ऐका.. ऐका जरा.. हे.. हे जे झाले ते झाले की 'इश्श' म्हणतात का??

प्रमिला - नाआआआआही...

चितळे - मग???

प्रमिला - गट्टू पहिला आला की 'इश्श' म्हणतात...

चितळे - मग तुमच्या स्वैपाकघरात समीर पाणी प्यायला येतो तेव्हा पहिले कोण आलेले असते????

दास्ताने वाड्याच्या भिंती, त्यावरील शेवाळे अन त्यातील लहान लहान किडेही हसत होते.

घाटेबाई - पानशेतच्या पुरातही इतका आवाज नव्हता..
मानेकाका - मग घाटेबाई.. बोलवा बंब...
घाटेबाई - बंबवाले यायला घाबरतात...
मानेकाका - का??
घाटेबाई - निगड्यांच्याकडे किती माणसंयत ते बघून..
निगडे - आमची आमची आहेत... तुला काय नाक खुपसायचं कारण??
सुषमा - शेजारधर्म!
मधू - खीर आटायला हवी होती अजून..
श्री - मधूला..
मानेकाका - बोल बोल.. बोल लेका.. आज तुझा दिवस आहे..
श्री - मधूला दुसरं काही सुचतंच नाही..
प्रमिला - श्शी.. ! काय बोलतात एकेक... !

नेमके प्रमिला खीर वाढायला श्रीसमोर आलेली असताना श्री हे बोलला अन मग प्रमिलाचे लाजणे खुळ्यागत बघतच राहिला. नशीब! हे प्रमिलाशिवाय कुणीच नोटीस केलं नाही. आणि तिने त्यावर नापसंती दाखवणे हे नुकतेच लाजल्यामुळे तिला शक्यही नव्हते व मनातही नव्हते. कारण हा होता दास्ताने वाडा, जेथे कुणीही कुणालाही काहीही बोलताना आढळू शकायचे, अर्थात, उद्धटपणा सोडून!

वैशाली - सुषमा मावशी.. हा बघ साधना कट...
सुषमा - अय्या हो? मला वाटले चुकून असे कापले गेलेयत...
वैशाली - ए काय गं.. !
चितळे - पेशवाईचा कट अधिक स्वादिष्ट असतो..
सुषमा - अहो आजोबा.. तो कट मिसळीचा... हा केसांचा हेअर कट...
वैशाली - ई.. हेअर कट केसांचाच असतो..
सुषमा - गप गं! चार यत्ता झाल्या इंग्रजीच्या की लागले उडायला आभाळात..
चितळे - केसांना कट कशाला लागतो पण??
मावशी - चितळे.. ते तुला नाही समजायचं!

मावशी चितळ्यांना अरे तुरे करायच्या यात कुणालाही अप्रूप वाटायचे नाही, चितळ्यांनाही!

चितळे - का?
मानेकाका - कारण केस असले तर कट करणार ना?
चितळे - टक्कल हे बुद्धीमत्तेचे लक्षण आहे...
मावशी - आणि ब्रह्मचर्य?
चितळे - हा विषय नको तिथे घसरत आहे...
मानेकाका - शिरा मस्त झालाय... तुला येतो की गं चे.. आपलं .. सॉरी..
सुषमा - पेटवा पेटवा.. बेरी काका.. पेटवा वाडा...
मानेकाका - फक्त चे म्हणालोय..
सुषमा - मग फक्त मानेकाकांची खोली पेटवा...
प्रमिला - वहिनी.. खीर घ्या..
बेरीणबाई - बास बास.. अगं काय हे??
नंदा - खा हो.. बाळाचा स्वभाव गोड होईल..
चितळे - यांनी खीर खाण्याचा.. आणि.. बाळा..
प्रमिला - संबंध आआआआआहे..
चितळे - ए.. चुरूचुरू बोलू नकोस.. सून आहेस वाड्याची..
मधू - समीर.. तू पण आता पहिलं यायचंस बर का??
समीर - मी सहाव्वीत गेलोय.. तिसरीत असतो तर आलो असतो..
गट्टू - बाबा? मला भाजी नको...
श्री - हां! टाकायचं नाही आता काहीही.. पुढच्या वर्षी मुंजय तुझी..
प्रमिला - भावजी.. समीर अन याची एकत्रच करायची का??
चितळे - आम्हाला दोन स्वतंत्र जेवणे पाहिजेत..
मानेकाका - आम्हालाही..
चितळे - माझ्या 'आम्हाला' मधे तुम्ही आलातच..

प्रचंड गोंधळात जेवणे पार पडली. मग वाढणार्‍या बायकांचे जेवणे होईपर्यंत सगळे बाहेर गप्पा ठोकत बसले. पांगापांग झाली तसा श्री गट्टूला घेऊन घरी आला. दार लावण्यापुर्वी सहज खाली बघितले तर..

मधू बहुधा पान खाण्यासाठी बाहेर चालला होता. आणि प्रमिला आपले केस मोकळे सोडून हलवत असताना अतिशय आकर्षक दिसत होती. क्षणभरच श्रीची नजर तिच्या खिडकीवर खिळली अन नेमके तेव्हाच...

प्रमिलानेही वर पाहिले.. नजरेचा अर्थ समजायला काय वेळ लागणार बायकांना?

प्रमिलाने श्रीकडे त्याचे गुपीत कळल्यासारखे गालात जीभ घोळवून हसत आपल्या खिडकीचा पडदा अलगद ओढून घेतला.

श्रीला भयंकर अपराधी फीलिंग आले. हे काय झाले आपल्याकडून!

गट्टू झोपायला आलेलाच होता. त्याला थोपटताना श्रीच्या मनात प्रमिलाला पाहिल्यामुळे विचार सुरू झाले होते.

आपण तिच्याकडे असे पाहायला नको होते. काय म्हणेल ती? आणि.. रमा! रमाचे काय? स्वातीच्या वेळेस ठीक होते... आपण.. गट्टूसाठी तिला विचारले होते... पण.. जाऊदेत.. आता पुन्हा असे बघायचे नाही..

आणि त्याचवेळेस झोपता झोपता गट्टू श्रीला विचारत होता..

गट्टू - बाबा? राजेश खन्ना अन शर्मिला टागोर प्रेम करतात म्हणजे... काय करतात हो???

गुलमोहर: 

अगदी यथोचित वर्णन झालंय पार्टीचं....
पुढचा भाग लवकर येऊ दे...

>>>>मानेकाका - शिरा मस्त झालाय... तुला येतो की गं चे.. आपलं .. सॉरी..
>>>>सुषमा - पेटवा पेटवा.. बेरी काका.. पेटवा वाडा...
>>>>मानेकाका - फक्त चे म्हणालोय..
>>>>सुषमा - मग फक्त मानेकाकांची खोली पेटवा...

मस्तच!!!

बापरे..... आता श्री आणि प्रमिलाची लव -स्टोरी कि काय?

मध्या लेका ..... सांभाळ रे बायकोला......

छान झालाय हा भागही. आतापर्यंत तुमचे प्रवाही लेखन वाचत होत्ये पण तुम्ही संवादही उत्तम लिहीता. खुसखुशीत हा शब्द समर्पक वाटेल कदाचित. Happy

बेफिकिर...

चितळे आजोबा - इश्श म्हणजे काय????

यावर कर्व्यांचे दिवटे पाजळले.

समीरदादा - मला माहितीय.. आई बाबा स्वैपाकघरात असताना मी पाणी प्यायला गेलो की आई बाबांना चिडून इश्श म्हणते..

असले संवाद लिहीताना " क्रूपया घरी वाचावे" असे नमूद करत जावे.

बॉस समोर असताना वाचले गेले अन वाट लागली. नोकरी गेल्यास तुमच्यावर खटला करीन

अप्रतिम!!!!

grt!!