"न्यूक्लियर डिसेप्शन": रूपांतरकाराचे मनोगत व मूळ लेखकांची प्रस्तावना

Submitted by sudhirkale42 on 17 July, 2010 - 01:21

"न्यूक्लियर डिसेप्शन": by Adrian Levy and Catherine Scott-Clark

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

संक्षिप्तीकरण व अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता

रूपांतरकाराचे दोन शब्द

कांहीं दिवसापूर्वी मी Nuclear Deception हे Adrian Levy व Catherine Scott-Clark या लेखकद्वयीने लिहिलेले पुस्तक वाचले. हे पुस्तक एका बाजूने अमेरिकेच्या ओळीने पाच राष्ट्राध्यक्षांनी (कार्टर, रेगन, बुश-४१, क्लिंटन व बुश-४३) कसेही करून अमेरिकन रक्ताचा एकही थेंब न सांडता मुजाहिदीन लढवय्यांना व लांचखोर पाकिस्तानी राज्यकर्त्यांना परस्पर रशियन सेनेशी लढवून त्या (रशियन) सैन्याला स्वगृही परत पाठविण्यासाठी आपल्याच प्रतिनिधीगृहाच्या सदस्यांची (सिनेटर्स व हाऊस रेप्रेझेंटेटिव्स) कशी मुद्दाम दिशाभूल केली, हे सगळे करतांना पाकिस्तानला अणूबाँब बनविण्यात कशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, एक दिवस हा भस्मासुर आपल्यावरच ही अण्वस्त्रे डागेल ही दूरदृष्टी कशी ठेवली नाहीं याची कहाणी आहे, दुसर्‍या बाजूने पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी "दहशतवादाविरुद्धच्या लढाई"बद्दल अमेरिकेला तोडदेखली आश्वासने देऊन पाठीमागून त्याच दहशतवाद्यांना छुपी मदत कशी चालू ठेवली, अमेरिकेला तिची लष्करी व आर्थिक मदत भारताविरुद्ध वापरणार नाहीं अशी आश्वासने देऊन प्रत्यक्षात त्याच पैशांनी व त्यांच्या सेनाधिकार्‍यांच्या सक्रीय सहभागाने दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे कशी उभी केली (त्यांना ’स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणारा मुशर्रफ सगळ्यात मोठा चोर!) याची कहाणी, तर तिसर्‍या बाजूला ही एक तर्‍हेने डॉ. अब्दुल कादिर खान या "पाकिस्तानच्या अणूबाँबच्या पिताश्रीं"ची कहाणीही आहे!
हे पुस्तक वाचल्यावर माझी खात्री पटली कीं हे पुस्तक प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचलेच पाहिजे. मग डोक्यात आले कीं हे ५०० पानी पुस्तक कुणी वाचेल कां? मग वाटले कीं मी ते ५० टक्क्यांनी संक्षिप्त करावे व त्याचा मराठीत अनुवाद करावा. पण पुस्तक कॉपीराईटच्या कायद्याने संरक्षित होते. मग मी लेव्ही व स्कॉट-क्लार्क यांचा ई-मेल शोधून काढला. पहिल्या निरोपाला प्रतिसाद आला नाहीं, पण दुसर्‍यांदा लिहिल्यावर लेव्हीसाहेबांनी मला एक भारतीय प्रकाशकांचा पत्ता दिला. त्यांना लिहिल्यावर कळले कीं त्यांच्याकडे फक्त इंगजी पुस्तकापुरतेच कॉपीराईटचे हक्क आहेत. पुन्हा लिहिल्यावर शेवटी व्हॅलरी डफ्फ या मॅडमकडून मला हे रूपांतर मालिकेच्या स्वरूपात व मराठीत विनामूल्य लिहिण्याची रीतसर परवानगी मिळाली. पण जर वाचकांचा प्रतिसाद चांगला येऊन पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्याची वेळ आल्यास मात्र मराठी प्रकाशकाला त्यांची परवानगी घेतल्याशिवाय पुस्तकरूपात प्रकाशित करता येणार नाहीं.

प्रत्येक लेख बर्‍यापैकी मोठा असणार आहे (४००० ते ८००० शब्द) व असे २१ लेख होणार आहेत. तरी हा प्रकार मला व वाचकांना जरासा "लंबी रेसका घोडा" ठरणार आहे! एक गोष्ट लक्षात ठेवावी. मी होता होईल तितके हे भाषांतर मूळ लेखनाशी प्रामाणिक ठेवले आहे. थोडक्यात इथे प्रदर्शित केलेली मतें माझी नसून Adrian Levy व Catherine Scott-Clark या लेखकद्वयींची आहेत.

वाचा तर ही मालिका. प्रस्तावनापर प्रकरणात लेखकांचे मनोगत आहे व त्यात लेखकद्वयांनी या पुस्तकात काय आहे याची थोडक्यात चर्चा केली आहे. पाठोपाठ येणारी प्रकरणे ही अज्ञात कथा उलगडत नेतील. ही मालिका वैयक्तिक वाचनासाठी आहे, पुनःप्रसारित करू नये. "कॉपीराईट"चे नियम लक्षात असू द्यात!
हा प्रकल्प आपल्याला वाचनीय वाटेल अशी आशा आहे.
धन्यवाद.
सुधीर काळे
[टीपः बुश-४१=अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज H. W. बुश व बुश-४३=अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष जॉर्ज W. बुश]
========================================================================

फसवणूक: मूळ लेखकांचे मनोगत
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

ही कहाणी आहे एक घोर फसवणूकीची. ही कहाणी आहे अमेरिकेच्या सरकारने त्यांच्याच निर्वाचित (अमेरिकन) लोकप्रतिनिधींची (व सार्‍या जगाचीच) कशी घोर फसवणूक केली त्याची, या फसवणुकीचे गंभीर परिणाम कदाचित कांहीं पिढ्यांनतर आपल्याला कळू लागतील. ही कहाणी आहे अमेरिकन नेत्यांच्या नैतिक अध:पाताची, त्यांच्या कवडीमोलाच्या तारतम्यबुद्धीची, अपुर्‍या पर्यवेक्षणाची, त्यांच्याभोवतीच्या सतत बदलणार्‍या जागतिक स्थितीबद्दलच्या माहितीची निष्काळजीपणाने व आळशीपणाने केलेल्या विश्लेषणांची! या चुकांचा गंभीर परिणाम होणार आहे आपल्या भोवतालचे जग आणखी अस्थिर होण्यात! या चुका करून अमेरिकन व पश्चिम युरोपियन नेतृत्वाने जागतिक धर्मयुद्ध पुकारणार्‍या शक्तींच्या हातात जणू एक नवे कोलीतच दिले आहे.

याची सर्वप्रथम प्रचीती आली ४ फेब्रूवारी २००४ रोजी! या दिवशी पाकिस्तानचे सर्वात आदरणीय व गौरवप्राप्त शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान पाकिस्तान चित्रवाणीवर सार्‍या पाकिस्तानी जनतेला दिसले. तीस वर्षाहून जास्त काळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या "गुपचुप" कार्यक्रमात गुंतलेले डॉ. खान हे नेहमीच रहस्याच्या पडद्याआड असत. उर्दू भाषेतली त्यांची भाषणे सर्वसाधारणपणे सार्‍या पाकिस्तानी जनतेला समजे व सारे पाकिस्तानी त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ती भाषणें ऐकतही. पण आज पाकिस्तानी सरकारने जाहीर केले होते कीं ते त्यांच्या चुकांची कबूली देणार आहेत. कदाचित त्यामुळे असेल. पण आज त्यांचे भाषण त्यांच्या देशबांधवांना सहज समजणार्‍या उर्दू भाषेत न होता सार्‍या जगाला समजणार्‍या इंग्रजी भाषेत झाले.

"माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो" अशी सुरुवात करून त्यांनी स्वत:च्या अनधिकृत अण्वस्त्रप्रसाराबद्दलच्या हालचालींची माहिती दिल्यावर समारोप करतांना ते म्हणाले "अल्ला पाकिस्तानला सुरक्षित ठेवो, पाकिस्तान अमर असो"!

त्यांचे भाषण संपताक्षणी पाकिस्तानी लष्कराने डॉ खान यांनी उत्तर कोरिया, इराण व लिबिया या अशा गिर्‍हाइकांसाठी एकट्याने हा अण्वस्त्रप्रसाराचा काळा बाजार कसा चालवला होता याची माहिती दिली. (या राष्ट्रांना बुश-४३ "अनिष्ट अक्ष" - Axis of Evil म्हणत.) या घटनेनंतर पाकिस्तानला अण्वस्त्रें बनवायला सहाय्य करून अमेरिकेने सार्‍या जगाची कशी फसवणूक केली हे पहिल्यांदाच जगाच्या निदर्शनाला आले.

अण्वस्त्रप्रसारातील त्यांच्या सक्रीय सहभागामुळे "टायफॉइड मेरी(१)" या अपमानास्पद टोपणनावाने ओळखल्या जाणार्‍या डॉ खाननी अशी कबूली का दिली याबाबत सार्‍या जगात तावातावाने तर्क-कुतर्क सुरू झाले. त्यांच्या राजकीय किंवा धार्मिक श्रद्धांमुळे? कीं स्वत:ची इभ्रत वाढविण्यासाठी व स्थान बळकट करण्यासाठी? अनेक वृत्तपत्रांत आलेल्या अग्रलेखांत कुणाच्या फायद्यासाठी त्यांनी हा कबूलीजबाब दिला असावा याबाबतही तर्‍हेतर्‍हेच्या अटकळी प्रसिद्ध झाल्या. कुणा बदमाष राजवटीसाठी? अफगाणिस्तानमधील जिहाद्यांसाठी? ओसामा बिन लादेनसाठी? युरोप-अमेरिकेत अणूबाँब उडवू पहाणार्‍या अतिरेक्यांच्या टोळ्यांसाठी?

बुश-४३ यांनीही या फसवणुकीला जणू संमतीच दिली. कांहीं दिवसांनंतर ते म्हणाले, "खान यांनी त्यांचे सारे गुन्हे मान्य केले आहेत आणि त्यांचे या गुन्ह्यातील सहकारी आता या धंद्यातून बाहेर फेकले गेले आहेत. खान व त्यांचे छोटे टोळके अतीशय धक्कादायक गुन्ह्यांबद्दल दोषी आहेत. पण त्यांच्यावर खटला घालायची गरज दिसत नाहीं. बुश पुढे म्हणाले, "प्रेसिडेंट मुशर्रफ यांनी मला आश्वासन दिले आहे कीं ते खान यांच्या जालाबद्दलची (network) सर्व माहिती अमेरिकन सरकारला देतील व पाकिस्तान अशा अण्वस्त्रप्रसाराच्या मुळाशी असू दिला जाणार नाहीं." पाकिस्तान सरकारचे या घटनेवर इतके पूर्ण नियंत्रण आहे कीं खान व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांना अमेरिकेत खटला घालण्यासाठी अमेरिकेच्या किंवा इतर पाश्चात्य राष्ट्रांच्या स्वाधीन करण्याची गरज नाहीं.

सत्य परिस्थिती तर अशी होती कीं खान यांची कबूली एक दिशाभूल करण्यासाठी दिलेली क्लृप्तीच होती. अण्वस्त्रांची काळी बाजारपेठ खान यांच्या नियंत्रणाखालीच चालली होती, पण जाहीर व खासगी वक्तव्यात फरक असा होता कीं अशा तर्‍हेचा काळा बाजार हे एका व्यक्तीचे काम नव्हते तर हे काम पाकिस्तानच्या परराष्ट्रनीतीचा भाग होता व त्याचे पर्यवेक्षण पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांची टोळी करत होती. वर हे राष्ट्र अमेरिकेच्या अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईतील एक महत्वाचे दोस्त राष्ट्र म्हणून दुटप्पीपणे मिरवत होते. तीसेक वर्षें लागोपाठ सत्तेवर आलेल्या रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकन सरकारांनी तसेच इंग्लंड व इतर पाश्चात्य युरोपियन राष्ट्रांनी पाकिस्तानला अगदी मोजक्या राष्ट्रांना माहीत असलेले अण्वस्त्रांबद्दलचे तंत्रज्ञान दिले होते. एका संकटमय काळात पाकिस्तानने हे निषिद्ध तंत्रज्ञान बदमाष राष्ट्रांना विकण्यात कसा पुढाकार घेतला ही माहिती महत्वाच्या सरकारी साधनंचा दुरुपयोग करून व नियमांमध्ये सोयिस्कर अदलाबदल करून सर्वांपासून लपवून ठेवली. अमेरिकेच्या हेरखात्याला याबद्दलची माहिती मिळविण्याबाबत निरुत्साही करण्यात आले आणि परराष्ट्रखाते व संरक्षणखाते यासारख्या मंत्रालयांना घेरून त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमांना जबरदस्तीने पाठिंबा देण्यास, प्रतिनिधीसभेला जाणून-बुजून डावलण्यास व देशाचे कायदे मोडण्यास भाग पाडण्यात आले. ज्या अधिकार्‍यांनी याला विरोध केला त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली व ज्या नेत्यांनी याच्याविरुद्ध आवाज उठवला त्यांना देशद्रोही असा ठपका ठेवण्यात आला. अमेरिकेची सुरक्षितता धोक्यात घालून एका लष्करशहाला टेकू देण्याचे कारण कुणालाच कळत नव्हते.
खरे तर खान हे सर्व देशाचा मानबिंदू होते व त्यांचे नाव काढताच पाकिस्तानी नागरिकांची छाती गर्वाने फुगायची. पाकिस्तानला शिवणाच्या सुयासुद्धा बनवता येत नाहींत अशी मल्लीनाथी करणार्‍या डॉ खान यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारताच्या कुठल्याही शहरावर हल्ला करू शकणारी अण्वस्त्रे मोठ्या प्रमाणावर बनविण्याची एक "असेंब्ली लाईन"च उभी केली व त्यासाठी "पाकिस्तानी अणूबाँबचे पिताश्री" हा एक किताबच पाकिस्तानी जनतेने दिला होता.

फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की डॉ खान हे या अण्वस्त्र-उत्पादनाच्या प्रकल्पात अपघातानेच शिरले. पाकिस्तानात योग्यशी नोकरी न मिळाल्यामुळे ते चिडून उच्च शिक्षणासाठी युरोपला गेले व एका विश्वविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी रांगेत उभे असताना "हेनी" नावाच्या एका डच मुलीच्या प्रेमात पडले व तिच्याशी विवाहबद्ध झाले. डच, ब्रिटिश व जर्मन शास्त्रज्ञ एक नव्या सेंट्रीफ्यूज प्रक्रियेची चांचणी घेत होते. ही प्रक्रिया क्रांतिकारी असली तरी त्याचे घटकभाग सहजासाहजी मिळू शकत. एका गोर्‍या बाईचे पति म्हणून त्यांना एरवी मिळाली नसती अशी अतीशय संवेदनशील आणि गोपनीय क्षेत्रात भाषांतरकाराची नोकरी मिळाली व अण्वस्त्रांबद्दलची अतीशय गुप्त अशी माहिती त्यांच्या नजरेखालून जाऊ लागली. तिचे महत्व समजल्यामुळे त्यांनी ती सर्व कागदपत्रे व ड्रॉइंग्ज चोरली व त्या कागदपत्रांनी भरलेले तीन पेटारे घेऊन ते पाकिस्तानात परत आले. जुल्फिकार अली भुत्तो यांच्या प्रोत्साहनाने ते अणूबाँब बनवायच्या प्रकल्पाचे प्रमुख झाले व मग त्या क्षेत्रात त्यांची व पाकिस्तानची प्रगती सुरू झाली.

त्यानंतर पुढच्या वर्षापासून पाकिस्तानी अधिकारी व पाकिस्तानी प्रतिनिधींनी युरोप व उत्तर अमेरिकेत त्यांना हव्या असलेल्या यंत्रसामुग्रीची व इतर वस्तूंची जोरदार खरेदी सुरू केली. डॉ. खान हे सूत्रधाराचे व वेगवेगळ्या गटांमधील समन्वय ठेवण्याचे काम पहात होते व अणूबाँब बनविण्याचा कार्यक्रम राबवणार्‍या पश्चिम युरोपीमधील कंपन्यांतील वैज्ञानिक, कारखानदार, इंजिनियर व धातुशास्त्रज्ञ यांच्याबरोबर आणखी जवळची मैत्री करून, अतीशय गोडीगुलाबीने व आपल्या गोड बोलण्याने त्यांना भारून टाकून अशी निषिद्ध सामग्री मिळवण्याच्या वाटेतील अडचणी दूर करत होते.

जेंव्हा १९७७ साली भुत्तोंची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी झाली, तेंव्हा हा अणूप्रकल्प नवे हुकूमशहा ज. झिया उल हक यांच्या अखत्यारीतील सैनिकी विभागाकडे जाईल व खान यांचे जगभरच्या खरेदीमध्ये गुंतलेले गट पाकिस्तानी लष्करशहा व ISI यांच्या अखत्यारीखाली येतील अशी भीती अमेरिकन गुप्तचर संघटना सी.आय.ए.ला होती व तिने अमेरिकन सरकारला ताकीदही दिली होती!

पण तसे असले तरी पाकिस्तानच्या अणूबाँब प्रकल्पाबद्दल जास्त माहिती असणे हे गैरसोयीचे ठरू लागले होते. जिमी कार्टर हे १९७७ साली जगातली अण्वस्त्रें कमी करायची हे ध्येय समोर ठेवूनच ते अधिकारावर आले होते. पण त्यांचे राष्ट्रीय सुऱक्षा सल्लागार झ्बिगन्येव ब्रेझिन्स्की (Zbigniew Brzezinski) यांनी त्यांना त्यांची दिशा बदलायचा सल्ला दिला. पाकिस्तान हे राष्ट्र साम्यवादाविरुद्धच्या लढाईतील एक धक्काप्रतिबंधक (buffer) म्हणून उपयुक्त राष्ट्र असल्याचा कार्टर यांना सल्ला देण्यात आला व पाकिस्तानला या कामात राजी-खुषी सामील करून घेण्यासाठी त्या राष्ट्राचे मन वळविण्याचाही त्यांना सल्ला दिला. रशियाच्या आक्रमणाचा पाकिस्तानने प्रतिकार केल्यास त्यांच्या अण्वस्त्रें बनविण्याच्या प्रकल्पाकडे अमेरिका दुर्ल़क्ष करेल असेही ज. झियांना सांगण्यात आले. पण अमेरिकन जनतेला मात्र अण्वस्त्रप्रसारविरिधाचे धोरण चालू असल्याचे सांगण्यात येई.

१९८१ साली कार्टर यांच्या जागी रेगन आले व त्यांनी कार्टर यांच्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कार्यक्रमाला केरात काढले. राष्ट्रीय सुरक्षा समिती व सल्लागार यांचेही अवमूल्यन करण्यात आले व विल्यम केसी यांच्या नेतृत्वाखाली सी.आय.ए. ही संघटना सर्वेसर्वा झाली आणि गुप्तहेरखाते एक माहितीचे साधनच न रहाता ते रेगन यांच्या धोरणाच्या समर्थनार्थ वापरायचे एक हत्यार बनले.

धोरणात बदल होताच अमेरिकन अधिकारी पैसे घेऊन इस्लामाबादला पोचले व बरोबर हाही निरोप घेऊन आले कीं अमेरिका पाकिस्तानच्या अण्वस्त्रें बनविण्याच्या वाढत्या प्रकल्पाकडे काणाडोळा करेल. पण पुढे जसजसे पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीप्रकल्पाचे रोपटे भराभर वाढू लागले तसतसे तो प्रकल्प गुप्त ठेवणे अवघड जाऊ लागले.

उपयुक्ततेच्या व सोयीच्या तत्वावर जे परराष्ट्र धोरण त्यांनी सुरू केले गेले त्याचे रूपांतर झपाट्याने एका षड्यंत्रात झाले, त्यात अमेरिकेचे परराष्ट्रखातेही सामील झाले व पाकिस्तानच्या अण्वस्त्र-प्रकल्पाबद्दलच्या अण्वस्त्रांबद्दलच्या बातम्या उघड करत त्यांच्या कामात अडथळेही आणू लागले. या सावळ्या गोंधळात पाकिस्तानने १९८३ साली स्फोटकें न वापरता केलेली अण्वस्त्रांची चांचणी (cold-testing), एवढेच नव्हे तर स्फोटकांसह चीनच्या मदतीने १९८४ साली केलेली चांचणीही (hot-testing) गुप्त ठेवण्यात अमेरिकेला यश मिळाले. पाकिस्तान व चीन या देशांमधील अण्वस्त्रसंबंध खोल गाडून गुप्त ठेवण्यातही रेगनच्या अधिकार्‍यांना यश मिळाले. यात चीनकडून मिळालेली बाँबची ड्रॉइंग्स, रेडियो आयसोटोप्स व इतर "हवी ती व हवी तितकी" तांत्रिक मदत यांचाही समावेश होता. याच्या मोबदल्यात अमेरिकन कंपन्यांनी चिनी आण्विक ऊर्जाकेंद्रांची कोट्यावधी डॉलर्सची कंत्राटे मिळविली.

जेंव्हा रेगन यांची कारकीर्द १९८९ साली संपली तेंव्हा पाकिस्तानकडे चांचणी केलेली व वापरता येण्याजोगी अण्वस्त्रे होती. या अण्वस्त्रांच्या निर्मितीचा बहुतांश खर्च अमेरिकेकडून ’मदत’ म्हणून मिळालेल्या पैशातूनच झाला होता कारण ’मदत’ म्हणून मिळालेल्या पुंजीतले अब्जावधी डॉलर्स पाकिस्तानच्या लष्करशहांनी या प्रकल्पाकडे वळविले होते. अमेरिकेचे पेंटॅगॉनमधील अधिकारी पाकिस्तानचे रक्षक ठरले. त्यांनी गुप्तहेरखात्यांचे अहवाल आपल्याला हवे तसे पुन्हा लिहविले व त्यात पाकिस्तानची अण्वस्त्रक्षमता जाणून-बुजून आहे त्यापेक्षा कमी आहे असे दाखविले गेले. तेही अशा वेळी कीं इस्लामाबाद व दिल्ली यांच्यातला संघर्ष अगदी निकरावर आला होता. असे असूनही जेंव्हा अफगाणिस्तानातील युद्ध संपले तेंव्हा बुश-४१ यांनी पाकिस्तानला वार्‍यावर सोडून दिले व १९९० मध्ये त्या देशाला दिली जाणारी मदतही बंद केली. ही मदत म्हणजे अमेरिका व अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान या दोन देशांमधला शेवटचा संपर्क होता. त्यानंतरचा संपर्क घडून आला जेंव्हा अमेरिकेची ’क्रूज’ क्षेपणास्त्रे १९९८ साली ओसामा बिन लादेन यांच्या अफगाणिस्तानमधील प्रशिक्षणकेद्रांवर डागली गेली तेंव्हा. भारत व इस्रायल या देशांच्या गुप्तहेर संघटनांनी पाकिस्तान अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना अण्वस्त्रतंत्रज्ञान चोरून विकत आहे हे आधीच जगाच्या व अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिले होते. या आरोपांना युरोपीय गुप्तहेर संघटनांकडूनही दुजोरा मिळू लागला. तरीही पाकिस्तानकडे कुणाचेच लक्ष नव्हते. त्याच्या पुढच्याच वर्षी पाकिस्तानातल्या लुटपुटीच्या लोकशाहीचा अंत झाला व लष्करशहा परवेज मुशर्रफ लष्करी राज्यक्रांतीद्वारा पाकिस्तानचे पुनश्च सर्वेसर्वा बनले.

२००१ साली बुश-४३ यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून अधिकारग्रहण करेपर्यंतच्या काळात गुप्तहेरखात्याकडून अचूक गुप्त अहवालांची रिमेच्या रिमे आली होती. या अहवालांत पकिस्तानचे वर्णन "जागतिक अस्थिरतेचा केंद्रबिंदू" असे करण्यात आले होते: लष्करी अधिपत्याखालील सनातन मुस्लिम दहशतवादाचा समर्थक व आश्रयदाता या भूमिकेत उभे असलेले पाकिस्तान हे राष्ट्र भांडवल व राजकीय प्रभाव मिळविण्यासाठी आज सामूहिक नरसंहार करू शकणार्‍या शस्त्रास्त्रांचा सर्रास व्यापार करण्यात गुंतले होते व अमेरिका ज्यांना शत्रू समजते अशा राष्ट्रांशी हा व्यापार चालला होता. ११ सप्टेंबर २००१ च्या कांहीं दिवस आधी ’सीआयए’चे संचालक जॉर्ज टेनेट यांनी ज्येष्ठ अधिकार्‍यांचा एक छोटा संघ प्रस्थापित केला (ज्यात परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल, त्यांचे कनिष्ठ मंत्री रिचर्ड आर्मिटाज, राष्ट्रीय सुरक्षा समितीचे उपसल्लागार स्टीफन हेडली, ’सीआयए’चे उपसंचालक जॉन मॅकलाफलिन व राष्ट्रीय सुरक्षा मडळाच्या अण्वस्त्र प्रसारबंदीचे संचालक रॉबर्ट जोसेफ यांचा समावेश होता) व त्यांच्याबरोबर एक ’आणीबाणीची शिखर परिषद’ही घेतली.

आता तर जहाल गटाचे लोकही पाकिस्तानबरोबरच्या संबंधांचे स्वरूप बदलायला तयार असलेले दिसले. वुल्फोवित्स यांनीही वरवर थोडेसे पडते घेऊन "आपण आपली परराष्ट्रनीती पत्त्यांच्या बंगल्यावर उभी करू असे लोकांना वाटत होते. पाकिस्तानी सरकार काय करत आहे हे अमेरिकन प्रतिनिधीगृहाला समजणार नाहीं असेही या लोकांना वाटत होते. माझी तर नेहमीच खात्री होती कीं प्रतिनिधीगृहापासून माहिती लपवून ठेवण्याचे धोरण शेवटी नक्कीच अयशस्वी होईल व प्रतिनिधीगृहाला अशा तर्‍हेची माहिती पूर्णपणे देणे हे कायद्याने आपल्यावर बंधनकारक आहे" असे मान्य केले.

पण ११ सप्टंबरच्या भीषण घटनेनंतर परिस्थिती अचानक बदलली व ते एक नवा पत्त्यांचा बंगला बांधण्यात गढून गेले.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ’अल-कायदा’ या संघटनेला नष्ट करण्याचे, त्यांच्या नेत्यांना अमेरिकेकडे सुपूर्द करण्याचे व अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील दुर्गम व अवघड भागातील लपण्याच्या जागा उखडून टाकण्याचे टाकण्याचे वचन अमेरिकेला दिले होते. बुश-४३च्या सरकारने एक संभाव्य मित्रराष्ट्र असल्याचा फायदा एका बाजूला तर अण्वस्त्रांच्या निर्मितीच्या कार्यक्रमापासून उद्भवणारा धोका दुसर्‍या बाजूला अशा तर्‍हेने पाकिस्तानच्या (व मुशर्रफच्या) उपयुक्ततेचे मूल्यमापन केले. असेच मूल्यमापन कार्टर व रेगन यांनीही केले होते. पाकिस्तानच्या विरुद्ध अतिरेक्यांना अण्वस्त्रनिर्मितीची माहिती गुप्तपणे देणारे व त्याच अतिरेक्यांना लपवून ठेवून अमेरिकेपासून वाचवणारे असे दुटप्पी धोरण राबविणारे राष्ट्र असल्याचा भरपूर पुरावा असूनही अमेरिकेने याबाबत कांहींच केले नाहीं.

कारण अमेरिकेच्या विमानांना मुक्त संचार देऊन, अतिरेक्यांबद्दलच्या गुप्त बातम्या अमेरिकेला पुरवून व जिथे पाश्चात्य सैन्य जाऊही शकणार नाहीं अशा दुर्गम डोंगराळ विभागात स्वत:चे सैन्य पाठवून मुशर्रफ (व पाकिस्तान) अमेरिकेच्या सुरक्षानीतीतील एक अव्वल मोहराच बनला होता. दरम्यान वुल्फोवित्स, चेनी व रम्सफेल्ड या (चांडाळ?) त्रिकुटाने इराक, इराण व उत्तर कोरिया ही राष्ट्रे जास्त धोकादायक आहेत असे पडघम वाजवायला सुरुवात केली. सद्दामकडे सामूहिक नरसंहार करणारी शस्त्रे (WMD) आहेत व त्याला उडवायचे कामही अर्धवट राहिल्याबद्दल अपप्रचार सुरू केला. अशा तर्‍हेने सर्व जगाचे लक्ष पाकिस्तानकडून या दुसर्‍या राष्ट्रांकडे वळविण्यात हे त्रिकुट यशस्वी झाले कारण या सांप्रदायिक प्रवृत्तीच्या नेत्यांना पाकिस्तानच्या या समस्येमुळे इराक व सद्दामविरुद्ध करायच्या कारवाईच्या कार्यक्रमावर परिणाम व्हायला नको होता.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही अमेरिकेचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री कोलिन पॉवेल यांनीही या त्रिकुटाचीच री ओढली. अमेरिकेच्या सर्व गुप्तहेर संघटना पाकिस्तानला अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा स्वैर प्रसार करणारे व अत्यंत विघातक राष्ट्र समजत असताना पॉवेल यांनी इराककडे नरसंहार करणारी रासायनिक शस्त्रे आहेत असा सूर लावला. सनातनी नेत्यांच्या एकंदर ’लीलां’मुळे पॉवेल जरा नाराज होते व ते बुश-४३ने निवडणूक परत जिंकल्यास त्याच्या सरकारात ते भाग घेणार नव्हते. पण तोपर्यंत बुश-४३ सरकारला कसेही करून पॉवेलला आपल्या बाजूला ठेवायचे होते. मग एक नाटक करण्यात आले. प्रे. मुशर्रफ यांनी वचन दिले कीं जर अमेरिकेने त्यांच्या लष्करी क्रांतीद्वारा राज्यावर आलेल्या सरकारला मान्यता दिली तर ते (मुशर्रफ) पाकिस्तान करत असलेला अण्वस्त्रप्रसाराचा काळा बाजार पूर्णपणे बंद करेल!

२००३ च्या मे मध्ये बुश-४३ यांनी "फत्ते झाली"ची (Mission accomplished) दवंडी पिटली. डेविड के यांच्या नेतृत्वाखाली एक पथक महासंहारक अस्त्रांच्या शोधार्थ इराकला रवाना झाले. पण आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेने (IAEA) जमा केलेल्या पुराव्यानुसार पाकिस्तान अद्यापही हा काळाबाजार करतच होता. मग बुश-४३ य़ांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी पाकिस्तान सरकारला दोष न देता कांहीं विश्वासघातकी शास्त्रज्ञांनी आरंभलेला बेकायदेशीर व्यवहार असे नवे तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. जेंव्हा इराकमध्ये महासंहारक अस्त्रे सापडली नाहींत तेंव्हा के यांनी २००४च्या जानेवारीत राजीनामा दिला व अमेरिकन प्रतिनिधीगृहाला तसे सांगितले. एका आठवड्यानंतर डॉ. खान यांना पाकिस्तानी दूरचित्रवाणीवर स्वार्थी कारणासाठी अण्वस्त्र तंत्रज्ञाचा काळाबाजार करणारा खलनायक या रूपात दाखविण्यात आले व पाकिस्तानी सरकारला ’गुणी बाळ’ ठरविण्यात आले, दहशतवादाविरुद्धची मित्रराष्ट्रांची एकजूट अभेद्य राहिली व ही सनातनी मंडळी इराकनंतर इराणकडे डोळे वटारून पाहू लागली. पण दक्षिण आशियातले तज्ञ अमेरिकेला इशारा देतच राहिले कीं पाकिस्तानच सगळ्यात मोठी समस्या असून त्याविरुद्ध कांहीं तरी पावले उचललीच पाहिजेत. कारण पाकिस्तानला आज भेडसावणारे प्रश्न अजूनही गंभीर होतील, पाकिस्तानी सरकार या अतिरेक्याबाबतचे आपले परस्परविरोधी धोरण चालूच ठेवेल, पाकिस्तानी लष्कर या अतिरेकी व जहालमतवादी टोळ्यांबरोबरचे आपले संबध दृढ करेल व शेवटी अण्वस्त्रे नको त्या (व बेजबाबदार) लोकांच्या हाती पडण्याची शक्यता वाढेल! तरी अमेरिकेने याबाबत योग्य कारवाई करावी.

शेवटी झाले तसेच. २००६ साली इराणचे सरकार बदलण्याविषयीचा कल्लोळ खूप वाढला, मुशर्रफने गुपचुप गुप्तहेरसंघटनांकडून चालविलेली डॉ. खान यांच्याविरुद्धची चौकशी थांबवली, पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीवरील वन्यजमातींच्या सीमांवरच्या भागात (नवा) ’पाकिस्तानी’ तालीबान पुन्हा जोर धरून उभा राहिला व तिथून अफगाणिस्तानातील अफगाणी, अमेरिकी व ब्रिटिश सैन्यावर जीवघेणे हल्ले करू लागला, ’अल-कायदा’चे लोक पाकिस्तानी स्थानीय अतिरेक्यांबरोबर एक होऊ लागले व नवी प्रशिक्षणकेंद्रे, नवी रिक्रूटभरती, व नवी ध्येये आकार घेऊ लागली. २००७ साली पाकिस्तानी अण्वस्त्र तंत्रज्ञाचा काळाबाजार पुन्हा तेजीत चालू झाला. जसजसा अतिरेक्यांचा प्रभाव वाढून त्यांची पावले पाकिस्तानी भूमीवर ठामपणे उभी राहू लागली तसतशी पाकिस्तानची अमेरिकेच्या मदतीने व पैशाने बनलेली अण्वस्त्रे नियंत्रणाबाहेर जाऊ लागली.

पाकिस्तानातील वाढता दहशतवाद व वेगात उभरू लागलेली अण्वस्त्रांची बेकायदेशीर निर्यात यांची एकी होऊन प्रलयंकारी घटनांकडे जगाला न्यायला किती वेळ लागेल? आज सारे जग नव्या जागतिक दहशतवादाशी दोन हात करत असताना इराकमध्ये चिखलात अडकलेला पाय, इराणबरोबर दोन हात करायची तयारी व उत्तर कोरियाबरोबर वटारलेल्या डोळ्यांचे युद्ध अशा परिस्थितीत हे पुस्तक या सर्व समस्यांना कारणीभूत पाकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे व पाश्चात्य सरकारांचे निष्काळजी व निकृष्ट धोरणच कसे आहे हे उघडकीसा आणत आहे!

आणि या सर्व प्रकाराची सुरुवात कशी झाली? तर अब्दुल कादीर खान या एका महत्वाकांक्षी तरुणाला पाकिस्तानात नोकरी मिळू शकली नाहीं!

---------------------------------
(१) टायफॉइड मेरी: जिच्यापासून कांहींतरी अनिष्ट किंवा प्राणघातक गोष्टीचा प्रसार होतो अशी व्यक्ती.

गुलमोहर: 

सर्वांनी वाचून विचार करण्यासारख्या पुस्तकाचे हे रूपांतर आहे. सर्व मा.बो.कर वाचतील अशी आशा आहे!
सुधीर काळे

एव्हडा मोठा उपक्रम हाती घेतल्याबद्दल आपले आभार.. आपण केलेले रुपांतरदेखील अतिशय सोपे व सहज आहे मुख्य म्हणजे मराठी कस टिकून आहे. शब्दशः भाषांतर करणार्‍यांच्या शैलीत इंग्रजी वाक्यरचना लगेच कळून येते. आपला भाषांतराचा दर्जा अतिशय उत्तम आहे.

>>सर्वांनी वाचून विचार करण्यासारख्या पुस्तकाचे हे रूपांतर आहे.
नक्कीच वाचू. अतीशय उत्तम! तुमच्या मेहेनतीचे अन हेतूचे कौतुक अन आभार करावेत तितके कमी आहे.
येवूद्या संपूर्ण मालिका. काही मदत लागल्यास कळवणे.

जगाच्या पटावर चाललेल्या बुद्धिबळाच्या चाली सामान्य जनतेला कधीच कळत नाहीत. जगावर नियंत्रण मिळविण्याच्या या नरसंहारी खेळात कोणाचीच जीत होत नाही हे जेव्हा अमेरिकेला लक्षात येईल तेव्हा सगळ्या जगाचे वाळवंट झालेले असेल.
फार छान भाषांतर
बरीच नविन माहिती कळाली....
धन्यवाद
पुढील लेखाची वाट पहात आहे

एव्हडा मोठा उपक्रम हाती घेतल्याबद्दल आपले आभार.. आपण केलेले रुपांतरदेखील अतिशय सोपे व सहज आहे मुख्य म्हणजे मराठी कस टिकून आहे. शब्दशः भाषांतर करणार्‍यांच्या शैलीत इंग्रजी वाक्यरचना लगेच कळून येते. आपला भाषांतराचा दर्जा अतिशय उत्तम आहे >>

अनुमोदन. टण्याने आधिच मांडले त्यालाच मम म्हणतो. नविन भागाच्या प्रतिक्षेत. Happy

टण्याला अनुमोदन. छान रुपांतर.
जरा एकांगी वाटले, तरीही ती लेखकांच्या भूमिकेची मर्यादा वाटली. वाचते आहे.

इ-सकाळवर मी नेहमी शनिवारची वाट पहायचो. 'पैलतीर" या सदरामधे तुमची ही लेखमाला वाचण्यासाठीच. पण मागच्या आठवड्यापासून सकाळवर आलाच नाही लेख. बहुतेक ११ भाग वाचलेत मी ई-सकाळवर. सुधीरजी काही विशेष कारण?

असो, मायबोलीवर आता पूर्ण लेखमालीका वाचायला मिळणार याचा फार फार आनंद झालाय.

(त्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष 'रेगन' विषयी वाचताना तर अगदी रक्त उसळायचं...खोटारडा नं १..)

सर्वप्रथम सर्वांच्या कौतुकपूर्ण प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार!
मी दर शनिवारी एक अशा लयीने प्रकरणे पोस्ट करायची योजना केलेली आहे. मी एकूण २१+प्रस्तावना=२२ पैकी २० पूर्ण केली आहेत, पण प्रत्येक प्रकरण ४००० ते ८००० शब्दांचे असल्यामुळे आठवड्याला एक लेख ही लय वाचकांच्या दृष्टीने सोयीची वाटते.
मूळ इंग्रजी पुस्तक तसे एकांगी वाटत नाहीं, पण त्याचे संपादन (editing) अजून नेटके व्हायला हवे होते....कथानक सारखे १९७५ ते २००४ असे भरकटते! त्यामुळे एकाग्रचित्त होऊन वाचता येत नाहीं. पण मी मूळ लेखनाशी एकनिष्ठ रहायचे ठरविले आहे. खालच्या टिपांमध्ये मात्र बर्‍याचदा माझी मते मी लिहितो.
डॉ खान यांचा उल्लेख मी कायम खानसाहेब असा केलेला आहे कारण या कथेत अनेक 'खान' आहेत!
तसेच जरी आपल्याशी शत्रुत्व असले तरी खानसाहेबांचे व्यक्तित्व खरेच बहारदार आहे. पाकिस्तानातील सर्वोच्च मुलकी सन्मान "नीशाँ-ए-इम्तियाज" दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांकडून दोनदा मिळविणार्‍या या अलौकिक व्यक्तीचे बरेच गुण लक्षात येतात. पण मुशर्रफ यांनी त्यांचा शेवटी केवळ स्वार्थापायी कचरा केल्याने सध्या ते अतीशय नाराज आहेत असे त्यांच्यावरील इतर लेखांवरून स्पष्ट जाणवते.
ही मालिका संपल्यावर झुल्फिकार अली भुत्तो, झिया उल-हक व खानसाहेब अशा तीन व्यक्तींची या पुस्तकावरून जाणवणारी व्यक्तिचित्रेही रंगविण्याचा विचार आहे. बघू कितपत जमते ते.
आपला लोभ असाच असू दे!
सुधीर काळे (गेली कांहीं वर्षें मुक्काम: जकार्ता)

दिनेशदा, मस्तुरे आणि आरती,
धन्यवाद!
मी आधीच लिहिल्याप्रमाणे २२ पैकी २० प्रकरणे लिहून तयार आहेत. आठवड्याला एक प्रकरण असे योजले आहे, पण आठवड्याला दोन सुद्धा पोस्ट करू शकतो. पण एकसंध वाचायला वेळ लागतो म्हणून दर शनिवारी एक प्रकरण अशी योजना मनात आहे.

मास्तुरे-जी,
टंकलेखनातील चुकीबद्दल माफ करावे! चुकून 'मस्तुरे' लिहिल्याचे आताच लक्षात आले!
धन्यवाद.

आताच पाकिस्तानच्या पानात अब्जावधी रुपयांचा मलिदा घालून हिलरीबाई आधी अफगाणिस्तानला व एव्हाना मायदेशी-अमेरिकेला- पोचल्याही असतील!
पाकिस्तानची मजा आहे!!

टण्याला अनुमोदन... भाषांतर ही कलाच असणार....
मोठ्ठा अवाका आहे आणि पहिला लेख वाचता, तो तुम्ही समर्थपणे पेलणारसंच दिसतय.
खूप शुभेच्छा!
आणि अतिशय उत्सुकता, पुढल्या भागांची.

प्रस्तावनेनंतर प्रकरण पहिले (एक संतप्त तरुण) आणि आजच प्रकरण दुसरे (प्रकल्प "लोणी कारखाना) प्रकाशित केले आहे.
कृपया वाचा आणि प्रतिसादही द्या.

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

Marilyn Monroe spoke for women designer shoes all over the world when she said, "I don't know who invented yves saint laurent shoes high heels, but all women owe ysl pumps him a lot!" And, really, ysl booties what's not to love? A pair of high heel pumps can do wonders for your posture, give you that ysl sandals extra boost of confidence, and lengthen your legs like no other shoe.

!!

टायफॉइड मेरी : मेरी नावाची एक बाई ( बहुतेक नर्स) होती, ती टायफॉइडची कॅरियर होती, म्हणजे तिला रोगाचा त्रास नसायचा, पण तिच्या अंगातल्या जंतुंमुळे स्म्पर्कातील इतराना त्याचा ती प्रसाद देत होती.