चांदण्या लेऊन झाला.....

Submitted by ह.बा. on 17 July, 2010 - 02:19

अंगणी ये कुंतलांना खेळु दे ना वारियावर
गंध झाले शब्द सारे दरवळू दे या नभावर

एकटा नाही तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र केव्हाचा अनावर

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

होय मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?

मी घडीभर बोललो या आसवांशी सांत्वनाचे
बोल माझे घेतले भलतेच दु:खानी मनावर

-ह. बा. शिंदे

गुलमोहर: 

वा वा हणमंतराव........ गझलियत च्या दिशेने चाललेली सुरेख वाटचाल.......

एकटा नाही तुला मी पाहण्या आतूर झालो
चांदण्या लेऊन झाला चंद्र केव्हाचा अनावर

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

होय मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?

हे तिन्ही शेर सुंदर... अभिनंदन.

डॉ.कैलास

छायाजी, कैलासजी, सुर्याजी, बेफिकीरजी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.

शेवटचा शेर अचानक वेगळ्याच मूडचा आल्याने वाचताना खटकते आहे. वयक्तिक मत.

होय मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?

तुम्ही एवढे चांगले शब्द वापरत असाल तर ती शब्द संपल्यावर काय तुम्ही संपल्यावरही दाद देईल... वा वा काय मेलाय हा!!! क्या बात है!!!

सगळेच शेर देखणे झालेत. गझल आवडली! फारच छान हबा.

बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

हे आवडलेच!

मस्त.

[[बाग होती वेल होती पण बहर नव्हतेच येथे
ही फुले उमलून आली काल तुजला पाहिल्यावर

होय मी गाईन तुजला पाहिजे ते सांजगाणे
दाद तू देशील का पण शब्द सारे संपल्यावर?]]

या दोन द्वीपदी आवडल्या! Happy

तुम्ही एवढे चांगले शब्द वापरत असाल तर ती शब्द संपल्यावर काय तुम्ही संपल्यावरही दाद देईल... वा वा काय मेलाय हा!!! क्या बात है!!!

रुचा... बाळा तुझा विनोद कळला हं मला... प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

ह.बा. गझल आवडली... अगदी ओघवती झाली आहे.

काही काही कल्पना नेहमीच्या आहेत पण एकंदरीत मस्त मूड जमलाय... तुमच्या इतर गझलांमध्ये असतात तशा हटके कल्पना आणि ही सहजता असे मिश्रण पुढच्यावेळी वाचायला आवडेल

मिल्या, माझाही तोच प्रयत्न आहे. सहजता गरजेची आहे हे ल़क्षात आले आहेच. एक दोन महिनेच झालेत गझल व्याकरणाशी ओळख होऊन, लिहीताना व्याकरणाचा विचार डोक्यात राहतो, त्यामुळे गझल चंगली होते पण हवी ती सहजता येत नाही. आपल्या अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करेन. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!