क्षणभंगूर

Submitted by दक्षिणा on 6 October, 2008 - 05:10

सोमवार १ सप्टेंबर, मी रोजच्या प्रमाणे लगबगीने ऊठून डबा केला, स्वतःचे आवरले, बरोब्बर ७.४५ ला चप्पल अडकवून घराबाहेर. मनातल्या मनात रोजचा विचार "अरे, बस स्टॉपला कोणीच दिसत नाही, बस गेली की काय?" पण मग आदिती दिसली आणि जीवात जीव आला. बसने जेमतेम नळ स्टॉप गाठला नाही तोवर माझा सेल् वाजला. फोन माझ्याच बरोबर राहणार्‍या माझ्या मैत्रिणीचा, मी उचलला... पलिकडून सीमा... "दक्षिणा... गौरव गेला." मी एकदम थंडगार.... क्काय? माझ्या चेहर्यावर मोठे प्रश्नचिन्हं. मला एकदम माझ्या अंगात सुक्ष्म थरथर जाणवली.

आणि डोक्यात विचारांची गर्दी झाली. मी एकदम भूतकाळात गेले. हा गौरव म्हणजे आम्ही आधी ज्या सोसायटीत रहात असू तिथला आमचा शेजारी. त्याच्या घरी फक्त तो आणि त्याची आई. त्याचं वय जेमतेम २२ /२३ च्या आसपासचं असेल. माझी मैत्रिण आधीपासूनच तिथे रहात होती एकटी, मग मी गेले. पहील्या पहील्यांदा मला गौरवचं अस्तित्व थोडं अनकम्फर्टेबल वाटायचं. सतत येणारी मित्र-मंडळी, खालून मोठमोठ्याने आईला मारलेल्या हाका. जाता येता बघेल तेव्हा मित्रांचं कोंडाळं करून बिल्डिंगच्या खाली घातलेला अड्डा. विनाकारण असुरक्षित वाटायचं.

असेच बरेच महीने गेले. आणि माझी मैत्रिण ३ महीन्यांकरीता बेंगलोरला कोर्ससाठी निघून गेली. मी एकटीच घरी. एके दिवशी गाण्याची सी डी मागण्याच्या बहाण्याने गौरव दारात आला, दारातूनच मी कपाळाला आठी घालून त्याला हवी असलेली सी डी दिली. दुसर्‍या दिवशी त्याच्याकडच्या काही सी डीज मी मागितलेल्या नसून मला बळंबळंच आणून दिल्या. मी त्या कधी ऐकल्याच नाहीत ही गोष्ट वेगळी. मग त्यांचं घर रंगवायला काढलं. आणि त्यांच्या ऍक्वेरियमसाठी आमचे घर आयतेच रिकामे सापडले. ज्या दिवशी तो आणून ठेवला त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ माशांना खाऊ देण्याच्या निमित्ताने त्याचे येणे सुरू.... एक दिड दिवस पाहून मी त्याला म्हटले, मला सांग कसे खाऊ घालायचे... मी घालीन. ते ही त्याने स्पोर्टींगली घेतले आणि मला मुकाट माशाना खाऊ घालण्याचे धडे मिळाले. अखेर ज्या दिवशी ते ऍक्वेरियम घरातून गेले त्या दिवशी मी सुटकेचा नि:श्वास सोडला. एके दिवशी रात्री दारावर थाप, मी चकित... उघडून पाहीलं तर बाहेर हा.. मी नाराजीने त्याला जाणवेल अशा नजरेने घड्याळ पाहीले.... ९.३० झाले होते. "काय आहे?" मी...
"मी दुर्गात कॉफी प्यायला चाललोय... तुला आणू का? "
"नको, आणि पुन्हा मला विचारू नकोस." इति मी....
मग मला नकोशा अशा बर्‍याच गोष्टी घडल्या, मी एकटी म्हणून, अधूनमधून त्याची आई चौकशी करायला यायची, कधी इडली चटणी, कधी मसालेभाताची डिश घरी यायला लागली.

शेवटी एकदाची कोर्स संपवून माझी मैत्रिण परतली आणि मी जमेल तसं सगळं वर्णन केलं. अर्थात वाईट असं काहीच घडलं नव्हतं तरी ते मला नको होतं. मला कोणाचा संपर्क नको होता. आणि या मायलेकांनी मैत्रिण घरी नसताना, माझी चांगलीच काळजी घेतली होती. मैत्रिण पुण्यात परतण्या आधी आम्ही मोठा फ्लॅट फायनल केला होता, २/३ दिवसात आम्ही तिथे रहायला जाणार होतो. फ्लॅट अगदी मागच्या गल्लीत होता पण आमचं सामान एखाद्या संसाराला लाजवेल असं. फ्रिज, बेड, गॅस.. आणि काय नाही? ऐनवेळी आम्हाला टेंपो वगैरे काही मिळेना. एक मिळाला पण त्याने सामान अनलोड करायला नकार दिला. तेव्हा अगदी अनपेक्षितपणे गौरव मदतीला धावून आला. त्याने आणि त्याच्या एका मित्राने अगदी अथपासून इतिपर्यंत मदत केली, जे आम्हाला दोघींना करणं निव्वळ अशक्य होतं.

आम्ही सोसायटी तर सोडली पण गौरव अधून मधून आमच्या इथल्या नेट कॅफेत दिसायचा. पण बोलणं मात्रं मी त्याच्याशी कटाक्षाने टाळायची. का त्याचं कारण अजूनही माहीत नाही. मला कोणत्याही प्रकारचा वाईट अनुभव आला नसूनही तो मुलगा मला उगिचच टारगट, अगावू वाटायचा.

२९ ऑगस्ट, ०८ मी लगबगिने बस स्टॉपवर निघाले असता, गल्लीच्या कोपर्‍यावर गौरव उभा, "काय म्हणतेस?" 'ठिक' उत्तर देऊन मी सटकले.

३१ ऑगस्ट, मी ब्लड डोनेट करायला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले , गाडी लावताना आमच्याच लेनमधला एक मुलगा भेटला, त्याने माझी चौकशी केली. आणि सांगितलं की गौरव पण इथे ऍडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यावर; बाहेर कधीही न बोलणारा मुलगा माझी चौकशी का करत होता ते कळायला मला फार उशिर लागला. मी ब्लड डोनेट करायला रक्तशाळेत पोचले. जिथे तिथे गौरवच्या रक्तगटाची चर्चा, २५ बाटल्या रक्त लागणार होतं. २३/२४ वर्षाचा धडधाकट गौरव फक्त क्रिकेट खेळताना पडल्याचं निमित्तं होऊन इथे ऍडमिट झाला होता. मार इतका जबरदस्त होता की लिव्हर कडून हृदयाकडे जाणारी प्रमुख रक्तवाहीनी रप्चर झाली होती आणि इंटर्नल ब्लिडींग झाले होते. पण तिथे हजर असलेला सर्व तरूणवर्ग पाहून मनात जराही शंका आली नाही, उलट साधं क्रिकेट खेळताना पडलाय, होईल ठिक असंच वाटलं. इतकंच काय, पण अनायसे आपण इथे आलो आहोत तर त्याला भेटून जाऊ असे ही मला त्यावेळी वाटले नाही.

घरी आले, मैत्रिणीला गौरव ऍडमिट असल्याचं सांगितलं, सोमवारी संध्याकाळी ऑफिसातून परत आल्यावर त्याला पहायला हॉस्पिटलमध्ये जायचं ही ठरलं. इथपर्यंत सगळं ठिक अगदी नॉर्मल. रात्री जेवल्यावर मी खिडकीत विचार करत बसले होते, अचानक मला विचित्रं वाटायला लागलं, आणि मी मैत्रिणीला अचानक बोलुन गेले "मला नाही वाटत, गौरव परत येईल असं" Sad आणि आपण काय बोलुन गेलो याची जाणीव झाल्यावर आपण किती वाईट विचार करतो याची लाज वाटली. पण मैत्रिण म्हणाली अगं तुला त्याच्या अपघाताचा सिरियसनेस कळला म्हणून तु तसं म्हणालीस.... तरिही मी विचार करत होते की जरी सिरियसनेस कळला असला तरिही कुणाचा तरी मृत्यू चिंतणं वाईटच... नाही का?

आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटेच तो गेला. क्रिकेट खेळताना पडलेला २३/२४ वर्षाचा मुलगा, २४ तास ही जिवंत न राहता निघून गेला. २/३ दिवस माझं कुठे लक्षंच लागलं नाही. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊनही त्याला पाहायला गेलो नाही, आणि आपण तो परत येणार नाही असा विचार का केला? हे परत परत आठवून मी माझ्या मनाला ओरबाडत होते. घरात आता त्याची आई एकटी. आमचे तर धाडसच झाले नाही त्यांना भेटायला जायचे. माहीती नाही त्यांनी आपल्या तरूण मुलाचा मृत्यू कसा पचवला असेल? तो लहान, त्यातूनही एकुलता एक, शिवाय त्याच्या लहानपणी पतीचा मृत्यू... हे सगळं पाहीलेल्या बाईनं, तरण्याताठ्या, हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या जाण्यानंतर जगावं कसं? हाच विचार वारंवार डोक्यात येत होता.

अखेर पंधरा दिवसांनी धाडस करून आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्या खूप सावरलेल्या वाटल्या, अर्थात त्या ही नर्स असल्याने त्यांनी जीवन्-मृत्यू हा खेळ अगदी जवळून पाहीला होता असं मानून चालायला काही हरकत नाही. पण ते इतर पेशंटसच्या बाबतीत पाहणं म्हणजे नोकरीचा भाग, पण स्वतःच्या मुलाचा मृत्यूशी सामना पहाताना त्यांना कसं वाटलं असेल? गौरव जेव्हा त्या दिवशी क्रिकेट खेळायला बाहेर पडला तेव्हा त्याला वाटलं होतं का की आपण उद्याची सकाळ पहाणार नाही? शुक्रवारी सकाळी बस स्टॉपवर मला दिसलेला मुलगा सोमवारी या जगातच नसेल याची मी तरी कल्पना केली होती का?

तेव्हापर्यंत मी फक्त पुस्तकातंच वाचलं होतं की "उद्या कुणी बघितलाय", "आयुष्य हे क्षणभंगूर आहे." पण गौरवच्या मरणाने या दोन्ही वाक्यांची यथार्थता मी अगदी जवळून अनुभवली.

गुलमोहर: 

दक्षिणा भावना छान उतरल्यात.. Happy
असं होतं कधी कधी आपल्याला वेळेवर भेटणं जमत नाही, आणि मग उगाचच मनाला हुरहुर लागून रहाते.
>>"उद्या कुणी बघितलाय", "आयुष्य हे क्षणभंगूर आहे.>> हे तर खरचं आहे.

होय ग.. जीवन अन मृत्यू यातलं क्षणाचं अंतर अस काळजाला भिडतं कधी कधी.. मनाची अवस्था व्यवस्थीत वर्णन केलीयेस..

दक्षिणे,,
छानच उतरवलयस गं--- त्याचं वागणं, त्यावर तुला वाटलेलं, मनात आलेले विचार, आणि त्यानंतर आलेलं गिल्टिफिलींग-- सगळंच.
पण छान म्हटलं तरी ते लिखाणाला-- प्रत्यक्श घटना वेदना दायक होती.
कधीकधी आपण मनात येऊनह काही गोष्टी करत नाहि-- का माहीत नाही, पण नाही करत आपण....
करायला पाहीजे न पण...
पुधच्या लेखासाठी, कथेसाठी शुभेच्छा..
-----------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

दक्षिणा.... छान लिहिलं आहेस...

>>"उद्या कुणी बघितलाय", "आयुष्य हे क्षणभंगूर आहे.>> हे अगदी पटले.

अनुभवकथन एकदम प्रांजळ आहे. स्तुत्य हे आहे की, तुला लागलेली बोचणी लिहिताना तु कोठेही तुझी बाजु योग्य आहे / होती असं मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणुन ती वेदना यथोचित पोहोचते..

शेवटी मृत्यु ... विशेषतः अकाली आलेला चटका लावुन जातोच ना.
**********************
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !

दक्षिणा.. खुप छान लिहिल आहेस.. !!
खरं आहे एक गोष्ट तुझी.. कधी कधी का माहित नसतं पण विनाकारण एखाद्याविषयी आकस मनात येतोच अन त्या व्यक्तीने कितिहि चांगुलपणा दाखवला तरी आपल्या मनातुन त्याचं वाईटपण जात नाहि...

छान लिहिल आहेस.
कारण कळत नाही पण उगाचच एखाद्याशी फटकून वागलं जातं, मागाहून खंत वाटते.

दक्षिणा, चांगलं लिहिलं आहेस...
एखाद्या बरोबर आपण जे नकळत का होईना चुकीचे वागलो त्याची बोच तो माणूस गेल्यावरच जास्त लागते. कारण आता माफीचीच काय पण पश्चात्तापाचीही संधी हुकलेली असते. आयुष्य असताना त्याची म्हणावी तेवढी किंमत आपण करत नाही.. स्वतःच्याही आणि दुसर्‍यांच्याही!
*~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
पारिजातकाचं आयुष्य मिळालं तरी चालेल्..पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

दक्षिणे... खुपच छान... अगदी लेखनातुन त्या घटनेचा सगळ्यांनाच अप्रत्यक्षपणे त्या पातळीवर नेऊन अनुभव दिल्यासारखा Happy
************************

प्रांजळ...
तू छान लिहितेस....
परमेश्वर, गौरवच्या मृतात्म्याला शांती देवो...

दक्षिणा,

अगदी खर आहे. आयुष्य खुपच लहान असते. आपण क्षमा करायला आणि क्षमा मागायला शिकायला हवे.

फार छान लिहिले आहे. साधे सरळ!

दक्षिणा,

छान उतरवलेयस मनातले भाव.

दक्षिणा,साध्या सोप्या शब्दातून मनातील आर्तता कळ्ली.पुढील लेखनास शुभेच्छा.

अगं खरंच असं काही झालं की जाम घाण फिलींग येतं.. आज दिसणारा माणूस उद्या नाहीसा होतो म्हणजे काय???

माझी फक्त ६ वर्षांची भाची(चुलतभावाची मुलगी) अशीच २-३ दिवसात गेली.. असंच खोकला होतोय म्हणून चेकअप केलं, आलोच आहोत तर करूया म्हणून ब्लड टेस्ट केली.. तर हिपेटायटीस निघाला.. ऍडमिट केलं.. रोज काँप्लिकेशन्स वाढत गेली..
मला नेहेमीच वाटायचं लहान मुलं पटकन होतात बरी.. म्हणून मी अतीआशावादी होते.. पण आजुबाजुचं वातावरण पाहून टेन्शन यायला लागलं.. शेवटी हॉस्पिटलातून सरळ माझ्या बहीणीच्या घरी जाऊन झोपले..
तर पहाटे फोन, की गेली ती..

मला तिचा तो मृत्यु पुढे २-३ महीने त्रास देत होता.. तरी मी तिला काचेपलिकडून पाहात होते. तिच्या मृत्युच्या वेळेस माझे आईबाबा तिच्याजवळ होते. काय काय वेदना झाल्या त्या एवढ्याश्या जिवाला! Sad

काही कळत नाही कधी काय होणारे !! क्षणभंगूर खरंच...

दक्षिणा, खूप सरळ आणि मनापासुन लिहिलयंस....

असंच विचित्र feeling माझा मामा अचानक गेला तेव्हा आलं होतं...... त्याचवेळी कधीतरी दासबोधातील खालील दोन ओळी कुठेतरी वाचनात आल्या आणि त्यांची सत्यता मनोमन पटली...

नाही देह्याचा भरवसा | केंव्हा सरेल वयसा | प्रसंग पडेल कैसा | कोण जाणे ||
आपणांस जे जे अनुकुळ | ते ते करावे तत्काळ | होईना त्यास निवळ | विवेक उमजावा||

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल अतिशय आभारी आहे. Happy

कधीकधी छोट्या अन दुर्लक्ष करावं वाटणार्‍या आठवणी नंतर आयूष्यभर चटका जाणवेल इतपत मोठ्या होतात- हे खरं..
--
आठवांच्या पारूंबीला, बांधू एक झुला गं..
माझा झुला तुला घे, तुझा झुला मला!!

दक्षिणा, प्रांजळ पणे लिहिलं आहेस, तुझी बोच पोचली. आता यातून काहीतरी शिक. जसे की कुणाला असे टाळत जाऊ नकोस. कुणाचे उणे चिंतणे तर केंव्हाही वाईतच. मग ते दुश्मानाचे का असेना तरीही वाईट. परखडपणानी आपले भाव व्यक्त केलेले केंव्हाही बरे. काही लोकांना परखडपणेच जास्त लवकर उमगते, त्यांना आपला उपरोध कळतोच असे नाही.

दक्षिणा, खरं आहे गं. लोकं आसपास असताना आपल्याला त्यांच्या असण्याची जाणीव कधी कधी तितक्या तीव्रतेने होत नाही (किंवा आपण त्या जाणीवेला तितकीशी किंमत देत नाही) पण ते नसण्याची जाणीव मात्र दीर्घकाळ बोचते.. लिहित रहा गं...

मस्त लिहिलेस ग दक्षिणा.....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तु माझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंश.....

दक्षिणा, सुर्रेख लिहिलयस. अतिशय साध्या सहज शब्दांत... जसं तुझ्या मनात आलं असेल, तस्सं. त्यामुळेच अधिक पोचतय.
एखाद्याशी आपलं अगदी पहिल्या दर्शनापासूनच जमत नाही.... का ते सांगता येत नाही. केमिस्ट्री म्हणतात ना, तीच असावी ही. म्हणजे जमतय की नाही हे पडताळ्ण्यासाठी काही घडलेलच नस्तं... कारण आपण टाळतोच काहीही "प्रयोग" घडणं.
ह्या गौरव सारखं काही विपरीत घडलं नाही तर पुसून जातात त्या टाळलेल्या, न घडलेल्या गोष्टी. पण असं काही घडलं... की आपलं मन आपल्यालाच जे खातं ते...
.... इतकं सुंदर उतरलय! छानच!
लिही गं, अजून लिही.
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया

दक्षिणा, बरं झालं लिहीलस ते.. अशा अर्थाने की तुला मोकळं वाटेल थोडं..
काही माणसं अचानक येतात आणि जातात.. आणि ते परत भेटणार नाहीत याची एक तीव्र बोचणी आणि काही सुखद क्षण कायम देउन जातात.. मी ही गेलोय यातून.. अगदी सुलेखावर ऍड पाहून आलेला रुममेट जर्सी मधे होतो तेव्हा.. आमचे सूर खूप म्हणजे खूपच छान जुळले.. एक गोड हसरं व्यक्तीमत्त्व.. इन्फोसिस मधे होता.. इथून तो युके मधे गेला.. मी लग्नाचं निमंत्रण पाठवलं तर रीप्लाय नाही.. मी शोधाशोध करायला सुरवात केली तर ओरकूटच्या त्याच्या एका मित्राशी काँटॅक्ट केल्यावर कळलं.. की त्याचा युके मधे अपघात झाला आणि तो तात्काळ गेला.. वय वर्षे २९.. Sad खूप दिवस मी सुन्न होतो हे कळल्यावर.. किती भरभरुन बोलायचो आम्ही आयुष्यातल्या पुढे करायच्या गोष्टींबद्दल.. क्षणार्धात सगळं फोल वाटलं.. जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला ह्याचा फार दारूण प्रत्यय आला.. असो!

दक्षिणा, व्यवस्थित पोचली बोच.... लिहून टाकलंस ते खरंच बरं झालं.
आणि एक, जास्त विचार करू नकोस ह्या घटनेचा.

दाद,
तुमची दाद मिळाली, अजून काय पाहीजे? Happy माझा उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद.

उपास, खूप वाईट वाटलं वाचून Sad

बोच सरली की सारं पावलं.

दक्षिणा, छान लिहलय. माझे पण होते असे बर्‍याचदा, कारण नसताना एखाद्याशी खडुसपणे वागणे. मुंबईत नोकरी करत होते तेव्हा तर अजुनच धार आली होती खडुसपणाला. तेव्हा सोसायटीतल्या एका मुलाने १४ फेब्.ला डेअरी-मिल्क आणि गुलाबाची फुले आणली होती. मी आणि बहिण दोघी होतो घरात. आम्ही त्याच्याशी इतके दुष्टपणे बोललो आणि दारातुनच त्याला जवळ-जवळ हाकलुन दिला. पण आम्ही दोघीच तिथे रहात होतो. नुसत्या स्मितहस्यातुनही सोयीस्कर अर्थ काढणारे कमी नसतात. कदाचीत त्यामूळेच नकळत तसे वागणे होत असावे.

हम्म्म Sad असे काही वाचले की जुने काही तरी आठवत रहात, आपण कोणाशीतरी उगीचच फटकुन वागलेले असतो ते, कोणाला तोडुन बोललो असु ते, बरच काहीबाही. आणि वाटत की थोडेफार वाईट अनुभव आले असतील आधी तरी पण आपण छान वागायला हव. नेहमी ताक फूंकुन पिण्याच्या प्रयत्नात कितीतरी गोष्टी अश्या नकळत घडुन जातात.

Pages