क्षणभंगूर

Submitted by दक्षिणा on 6 October, 2008 - 05:10

सोमवार १ सप्टेंबर, मी रोजच्या प्रमाणे लगबगीने ऊठून डबा केला, स्वतःचे आवरले, बरोब्बर ७.४५ ला चप्पल अडकवून घराबाहेर. मनातल्या मनात रोजचा विचार "अरे, बस स्टॉपला कोणीच दिसत नाही, बस गेली की काय?" पण मग आदिती दिसली आणि जीवात जीव आला. बसने जेमतेम नळ स्टॉप गाठला नाही तोवर माझा सेल् वाजला. फोन माझ्याच बरोबर राहणार्‍या माझ्या मैत्रिणीचा, मी उचलला... पलिकडून सीमा... "दक्षिणा... गौरव गेला." मी एकदम थंडगार.... क्काय? माझ्या चेहर्यावर मोठे प्रश्नचिन्हं. मला एकदम माझ्या अंगात सुक्ष्म थरथर जाणवली.

आणि डोक्यात विचारांची गर्दी झाली. मी एकदम भूतकाळात गेले. हा गौरव म्हणजे आम्ही आधी ज्या सोसायटीत रहात असू तिथला आमचा शेजारी. त्याच्या घरी फक्त तो आणि त्याची आई. त्याचं वय जेमतेम २२ /२३ च्या आसपासचं असेल. माझी मैत्रिण आधीपासूनच तिथे रहात होती एकटी, मग मी गेले. पहील्या पहील्यांदा मला गौरवचं अस्तित्व थोडं अनकम्फर्टेबल वाटायचं. सतत येणारी मित्र-मंडळी, खालून मोठमोठ्याने आईला मारलेल्या हाका. जाता येता बघेल तेव्हा मित्रांचं कोंडाळं करून बिल्डिंगच्या खाली घातलेला अड्डा. विनाकारण असुरक्षित वाटायचं.

असेच बरेच महीने गेले. आणि माझी मैत्रिण ३ महीन्यांकरीता बेंगलोरला कोर्ससाठी निघून गेली. मी एकटीच घरी. एके दिवशी गाण्याची सी डी मागण्याच्या बहाण्याने गौरव दारात आला, दारातूनच मी कपाळाला आठी घालून त्याला हवी असलेली सी डी दिली. दुसर्‍या दिवशी त्याच्याकडच्या काही सी डीज मी मागितलेल्या नसून मला बळंबळंच आणून दिल्या. मी त्या कधी ऐकल्याच नाहीत ही गोष्ट वेगळी. मग त्यांचं घर रंगवायला काढलं. आणि त्यांच्या ऍक्वेरियमसाठी आमचे घर आयतेच रिकामे सापडले. ज्या दिवशी तो आणून ठेवला त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ माशांना खाऊ देण्याच्या निमित्ताने त्याचे येणे सुरू.... एक दिड दिवस पाहून मी त्याला म्हटले, मला सांग कसे खाऊ घालायचे... मी घालीन. ते ही त्याने स्पोर्टींगली घेतले आणि मला मुकाट माशाना खाऊ घालण्याचे धडे मिळाले. अखेर ज्या दिवशी ते ऍक्वेरियम घरातून गेले त्या दिवशी मी सुटकेचा नि:श्वास सोडला. एके दिवशी रात्री दारावर थाप, मी चकित... उघडून पाहीलं तर बाहेर हा.. मी नाराजीने त्याला जाणवेल अशा नजरेने घड्याळ पाहीले.... ९.३० झाले होते. "काय आहे?" मी...
"मी दुर्गात कॉफी प्यायला चाललोय... तुला आणू का? "
"नको, आणि पुन्हा मला विचारू नकोस." इति मी....
मग मला नकोशा अशा बर्‍याच गोष्टी घडल्या, मी एकटी म्हणून, अधूनमधून त्याची आई चौकशी करायला यायची, कधी इडली चटणी, कधी मसालेभाताची डिश घरी यायला लागली.

शेवटी एकदाची कोर्स संपवून माझी मैत्रिण परतली आणि मी जमेल तसं सगळं वर्णन केलं. अर्थात वाईट असं काहीच घडलं नव्हतं तरी ते मला नको होतं. मला कोणाचा संपर्क नको होता. आणि या मायलेकांनी मैत्रिण घरी नसताना, माझी चांगलीच काळजी घेतली होती. मैत्रिण पुण्यात परतण्या आधी आम्ही मोठा फ्लॅट फायनल केला होता, २/३ दिवसात आम्ही तिथे रहायला जाणार होतो. फ्लॅट अगदी मागच्या गल्लीत होता पण आमचं सामान एखाद्या संसाराला लाजवेल असं. फ्रिज, बेड, गॅस.. आणि काय नाही? ऐनवेळी आम्हाला टेंपो वगैरे काही मिळेना. एक मिळाला पण त्याने सामान अनलोड करायला नकार दिला. तेव्हा अगदी अनपेक्षितपणे गौरव मदतीला धावून आला. त्याने आणि त्याच्या एका मित्राने अगदी अथपासून इतिपर्यंत मदत केली, जे आम्हाला दोघींना करणं निव्वळ अशक्य होतं.

आम्ही सोसायटी तर सोडली पण गौरव अधून मधून आमच्या इथल्या नेट कॅफेत दिसायचा. पण बोलणं मात्रं मी त्याच्याशी कटाक्षाने टाळायची. का त्याचं कारण अजूनही माहीत नाही. मला कोणत्याही प्रकारचा वाईट अनुभव आला नसूनही तो मुलगा मला उगिचच टारगट, अगावू वाटायचा.

२९ ऑगस्ट, ०८ मी लगबगिने बस स्टॉपवर निघाले असता, गल्लीच्या कोपर्‍यावर गौरव उभा, "काय म्हणतेस?" 'ठिक' उत्तर देऊन मी सटकले.

३१ ऑगस्ट, मी ब्लड डोनेट करायला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले , गाडी लावताना आमच्याच लेनमधला एक मुलगा भेटला, त्याने माझी चौकशी केली. आणि सांगितलं की गौरव पण इथे ऍडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यावर; बाहेर कधीही न बोलणारा मुलगा माझी चौकशी का करत होता ते कळायला मला फार उशिर लागला. मी ब्लड डोनेट करायला रक्तशाळेत पोचले. जिथे तिथे गौरवच्या रक्तगटाची चर्चा, २५ बाटल्या रक्त लागणार होतं. २३/२४ वर्षाचा धडधाकट गौरव फक्त क्रिकेट खेळताना पडल्याचं निमित्तं होऊन इथे ऍडमिट झाला होता. मार इतका जबरदस्त होता की लिव्हर कडून हृदयाकडे जाणारी प्रमुख रक्तवाहीनी रप्चर झाली होती आणि इंटर्नल ब्लिडींग झाले होते. पण तिथे हजर असलेला सर्व तरूणवर्ग पाहून मनात जराही शंका आली नाही, उलट साधं क्रिकेट खेळताना पडलाय, होईल ठिक असंच वाटलं. इतकंच काय, पण अनायसे आपण इथे आलो आहोत तर त्याला भेटून जाऊ असे ही मला त्यावेळी वाटले नाही.

घरी आले, मैत्रिणीला गौरव ऍडमिट असल्याचं सांगितलं, सोमवारी संध्याकाळी ऑफिसातून परत आल्यावर त्याला पहायला हॉस्पिटलमध्ये जायचं ही ठरलं. इथपर्यंत सगळं ठिक अगदी नॉर्मल. रात्री जेवल्यावर मी खिडकीत विचार करत बसले होते, अचानक मला विचित्रं वाटायला लागलं, आणि मी मैत्रिणीला अचानक बोलुन गेले "मला नाही वाटत, गौरव परत येईल असं" Sad आणि आपण काय बोलुन गेलो याची जाणीव झाल्यावर आपण किती वाईट विचार करतो याची लाज वाटली. पण मैत्रिण म्हणाली अगं तुला त्याच्या अपघाताचा सिरियसनेस कळला म्हणून तु तसं म्हणालीस.... तरिही मी विचार करत होते की जरी सिरियसनेस कळला असला तरिही कुणाचा तरी मृत्यू चिंतणं वाईटच... नाही का?

आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटेच तो गेला. क्रिकेट खेळताना पडलेला २३/२४ वर्षाचा मुलगा, २४ तास ही जिवंत न राहता निघून गेला. २/३ दिवस माझं कुठे लक्षंच लागलं नाही. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊनही त्याला पाहायला गेलो नाही, आणि आपण तो परत येणार नाही असा विचार का केला? हे परत परत आठवून मी माझ्या मनाला ओरबाडत होते. घरात आता त्याची आई एकटी. आमचे तर धाडसच झाले नाही त्यांना भेटायला जायचे. माहीती नाही त्यांनी आपल्या तरूण मुलाचा मृत्यू कसा पचवला असेल? तो लहान, त्यातूनही एकुलता एक, शिवाय त्याच्या लहानपणी पतीचा मृत्यू... हे सगळं पाहीलेल्या बाईनं, तरण्याताठ्या, हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या जाण्यानंतर जगावं कसं? हाच विचार वारंवार डोक्यात येत होता.

अखेर पंधरा दिवसांनी धाडस करून आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्या खूप सावरलेल्या वाटल्या, अर्थात त्या ही नर्स असल्याने त्यांनी जीवन्-मृत्यू हा खेळ अगदी जवळून पाहीला होता असं मानून चालायला काही हरकत नाही. पण ते इतर पेशंटसच्या बाबतीत पाहणं म्हणजे नोकरीचा भाग, पण स्वतःच्या मुलाचा मृत्यूशी सामना पहाताना त्यांना कसं वाटलं असेल? गौरव जेव्हा त्या दिवशी क्रिकेट खेळायला बाहेर पडला तेव्हा त्याला वाटलं होतं का की आपण उद्याची सकाळ पहाणार नाही? शुक्रवारी सकाळी बस स्टॉपवर मला दिसलेला मुलगा सोमवारी या जगातच नसेल याची मी तरी कल्पना केली होती का?

तेव्हापर्यंत मी फक्त पुस्तकातंच वाचलं होतं की "उद्या कुणी बघितलाय", "आयुष्य हे क्षणभंगूर आहे." पण गौरवच्या मरणाने या दोन्ही वाक्यांची यथार्थता मी अगदी जवळून अनुभवली.

गुलमोहर: 

दक्षे, मस्त कसं म्हणु गं तुझ्या लेखाला. लिहिलं छान आहेस, पण वाईट वाटलं ते वाचुन. कधी कधी आपण गैरसमजुतीमुळे ज्या चुका करतो त्यांना आपण क्षमा नाही करु शकत. मनाला टोचत रहातं ना.

'आवर्तन' मधे 'सानिया'ने लिहिलं आहे कि कोणाही बद्द्ल मत बनवताना थोडीशी स्पेस ठेवावी. किती पटलं आता.

दक्षे, छान लिहिल आहेस. सगळ्या भावना अगदी लेखात उतरल्यात.
>>>कधी कधी आपण गैरसमजुतीमुळे ज्या चुका करतो त्यांना आपण क्षमा नाही करु शकत. मनाला टोचत रहातं ना. >>>अनुमोदन.

कधी कधी आपण गैरसमजुतीमुळे ज्या चुका करतो त्यांना आपण क्षमा नाही करु शकत. मनाला टोचत रहातं ना.
अनुमोदन !

दक्षे, हा प्रसंग इथे लिहून तुझं मन फार हलकं झालं असेल ना......? Happy

....."क्षणभंगुर".....अगदी.., अगदी समर्पक शिर्षक दिले आहेस.....

म्हणुन "जियो तो हरपल ऐसे जियो जैसे के आखरी हो"...... Happy

(आता.., याचा अर्थ कुणी सकारात्मक घेईल कुणी नकारात्मक.....व्यक्तिसापेक्ष.)

फारच मनाला लागला लेख.
नुकताच एका जवळच्या नातलगांचा मृत्यू झाला आणि नेमका हा लेख वाचनात आला. Sad
तुझी अवस्था कळतेय काय झाली असेल ते.

छान लिहिलेय दक्षिणा, तू जे अचानक बोलून गेलीस गौरवच्या मृत्यूबद्दल ते नियती तुझ्या तोंडून बोलली. मी घेतला आहे हा अनुभव Sad . आणि असा मृत्यू दिसतो तेव्हाच जीवनाचं क्षणभंगुरत्व कळतं ग.

अरेरे! वाचले नव्हते याबद्दल. पण तुझे मन मोकळे केलेस त्या वेळी हेच खूप होते. काही घटना खरच आपल्या हातात पण नसतात आणी मनात पण नसतात.

Pages