तीळ

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 7 July, 2010 - 11:45

'' तीळ''

जीव घेणारा तुझ्या ओठांवरी जो तीळ आहे
दोष डोळ्यांचा,फुकाचा काळजाला पीळ आहे.

सप्तरंगी बोलपट तू,वेड तव सर्वत्र आहे
''मी'' ,कुणी बघणार नाही,तो डब्यातील रीळ आहे

मी मुळी चावट न किंतु,दर्शनी तव कोण जाणे,
का निसटते माझिया ओठांतुनी ही शीळ आहे

मी कसा मिळवू तुला? नवकोट श्रीमंती तुझी अन
मी भिकारी सदन माझे,उंदराचे बीळ आहे.

हा गुलाबी प्रेमज्वर की,पीतज्वर मुळचा तुझा हा?
प्रेम झाले की तुला '' कैलास '' ची कावीळ आहे?

डॉ.कैलास गायकवाड.

गुलमोहर: 

छान .

>>वेड तुज सर्वत्र आहे
म्हणजे काय? इथे जर तुम्हाला "तू सर्वांना वेड लावले आहेस" असे म्हणायचे असेल तर, तुज ऐवजी तव हा शब्द पाहिजेल!

धन्यवाद बुमरँग, खरे तर भूषणजींनी आधीच चूक लक्षात आणून दिलि होती..... पण माझेकडून दुरुस स्ती राहीली होती.