श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ७

Submitted by बेफ़िकीर on 1 July, 2010 - 05:32

हट्ट हा एक वेगळा भाग असतो. समज येणे किंवा असणे हा एक वेगळा भाग! आणि हट्ट न करूनही आणि समज असूनही मनातील इच्छा व्यक्त करणे व त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून 'आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत' त्यांच्याशी त्या विषयावर बोलत राहणे हा निसर्ग असतो.

प्लेग्रूपमधे एक वर्ष झाले तेव्हा ज्युनियर केजीमधे जायची वेळ आली आणि त्याचबरोबर वेळ आली युनिफॉर्म घ्यायची! जरा रंगीबेरंगी अन मजेशीरच, पण युनिफॉर्म! याच स्टेजपासून 'आपण सगळ्यांप्रमाणेच आहोत' ही भावना रुजवायचा प्रयत्न करण्यासाठी निर्माण झालेली व शिस्त बाणवणारी गोष्ट म्हणजे युनिफॉर्म!

आयुष्याला शिस्त नसते ना पण! किर्लोस्कर ऑइल इंजिनमधे वेतन करारावरून झालेल्या कामगारांच्या संपाचा परिणाम असा झाला की तब्बल साडे तीन महिन्यांपासून कारखाना बंद झालेला होता आणि व्यवस्थापनातील लोकांना संपाच्या दुसर्‍या महिन्यापासून फक्त 'बेसिक पे' मिळेल व कारखाना पुर्ववत झाला की 'डिफरन्स' मिळू 'शकेल' अशी घोषणा झाली. 'मिळू शकेल' हा आणखी एक धक्का होता. त्यात खात्री नव्हती. दिवसच तसे होते. आजवर ज्या नोकरीतून रोजी रोटी मिळाली त्या नोकरीवर निष्ठा दाखवायचे दिवस होते ते! पण अशा वेळेस पक्षी झाडे सोडून जाण्याच्या प्रयत्नात असतात. श्रीनिवासने अगदी अती झाले तेव्हा एक दोन अर्ज केलेही! पण नोकर्‍या सहज मिळण्याच्या त्या दिवसांमधेही त्या इतक्या सहज नसायच्याच! अडीच महिने झाल्यावर तर व्यवस्थापनातील लोकही टायमिंग न पाळता येऊ जाऊ लागले. बरोबर आहे! करायचे काय तिथे जाऊन? सगळी पेंडिंग कामे संपलेली! कॅन्टीन बंद! वरिष्ठ अधिकारी फक्त बैठका घेणार युनियनबरोबर! त्यांच्या गाड्या आलिशान आणि मोठ्या मोठ्या! इथे बसचा पास काढायचा तरी त्रास! शक्यतो पंखे लावू नका, दिवे कमीत कमी लावा वगैरे सूचना सर्वत्र झळकलेल्या!

आपण कामगार असतो तर बरे झाले असते असेही श्रीनिवासला वाटले. त्याला वाटायचे की कामगार हे मशीनवर तांत्रिक काम करत असल्यामुळे त्यांना तत्सम नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध असणार! स्टोअरमधे एक्साईजचे काम करणार्‍याला स्पर्धक हजार बाजारात!

देशमाने, कोपरकर, स्वाती, चिटणीस... सगळेच येऊन बसायचे. एकमेकांना रिझवायचे! देशमाने काही ना काही बातम्या सांगायचे कंपनीच्या! कारण एक युनियनमधील म्होरक्या त्यांच्या ओळखीचा होता. तेवढीच आशा पल्लवीत व्हायची.

आणि बचतीतील सव्वा तीन हजारामधील दिड हजार केव्हाच संपले होते गेल्या दोन महिन्यांत! कारण नऊशे रुपये हा पगार एकदम अडीचशेवर आलेला होता. आणि आज ती पेस्लीप घेऊन घरी आलेल्या श्रीने उद्या म्हणजे शुक्रवारी सरळ रजाच टाकलेली होती. याचे कारण म्हणजे आलेला उबग! ऑफीसमधे जाऊन बसायचे, वेळ कसा घालवायचा ते माहीत नाही आणि पुन्हा जेमतेम पगाराचे टेन्शन! त्यापेक्षा आठवड्यातून सरळ एक दिवस घरीच बसलेले बरे! विचारणार कोण? कारण सप्रे सतत व्यवस्थापनाच्या अन युनियनच्या बैठकांमधे सहभागी व्हायचे कारण ते एक वकील होते. साहेब नसलेल्या अन कामच नसलेल्या स्टोअरमधे आठ आठ तास बसून करणार काय?

आणि गुरुवारी घरी परत आल्यावर गट्टूला कडेवर घेताच गट्टूने विधान केले..

गट्टू - अं... छलकच
श्री - छलकच?? म्हणजे?
गट्टू - छलकच..
श्री - काय म्हणतोय हो हा मावशी?
मावशी - मुलगा बोले बोबडे अन बापाचे ज्ञान तोकडे
श्री - म्हणजे??
मावशी - म्हणजे काय म्हणजे? मला काय दाई समजतोस का? आं? उच्छाद मांडलाय याने मगाचपासून! यांना शाळेत पोचवा, आणा, आणल्यावर गिळायला द्या, झोपवा, खेळवा.. तुम्ही हापिसात घोरणार संपय म्हणून! मी आहेच.. स्वतःचं नाही पोर अन जिवाला माझ्या घोर! तो मध्या गेलाय बायको पोराला घेऊन आपल्याच जातवाल्यांना भेटायला! तिथे या राक्षसाला जायचय! हा गिळ चहा! आमच्याकडे गिळा चहा अन स्वतःच्या घरी रहा! मोलकरीण आहे का मी? उद्यापासून हा माझ्या घरी आला तर बघच! तंगड तोडून हातात देईन तुझंच तुझ्या!

श्रीनिवासने शांतपणे चहा पिऊन विचारले. मांडीवर गट्टू काहीतरी बडबडत होताच!

श्री - झालं काय?
मावशी - तळपट झालंय माझ्या आयुष्याचं! झालं काय म्हणे! हा इथे राहतो अन वाडा याला भेटायला माझ्याकडे रोज! चला चला खेळू बाळा, पवारांची धर्मशाळा! म्हणे झालं काय? तो चितळे श्रीखंडाच्या गोळ्या वाटतो सगळ्यांना! त्याही इथे बसून! माझ्याच घरी चहा गिळतो! मूठ मूठ दाणे अन गूळ तोंडात टाकतो. अन आग्र्याहून सुटका सांगत बसतो तासनतास! एक पालेभाजी तरी आणलीय का आजपर्यंत माझ्यासाठी! मर मर मरायचं अन तुमचं कल्याण करायचं! चल उठ.. ऊऊऊऊऊऊठ!

श्रीनिवास 'काहीच झाले नसल्याच्या थाटात' उठला अन गट्टूला घेऊन उभा राहिला.

श्री - किल्ली द्या!
मावशी - किल्ली द्या? किल्ली द्या म्हणजे? भिंतीवर लटकवलेली काढून घेता येत नाही का स्वतःच्या हातांनी?? आं? पुन्हा किल्ली इथे ठेवायची नाही. चल निघ!

गट्टू मावशींकडे बघतही नव्हता. त्याच्या दृष्टीने हे नित्य घडणारे होते. आवाज, आवाज आणि आवाज! श्रीच्याही दृष्टीने हे बोलणे सर्वसामान्य होते. श्री गट्टूला घेऊन आपल्या घराचे दार उघडून आत आला तेवढ्यात त्याच्या खिशातील पगाराची स्लीप गट्टूने काढून हातात घेतली.

श्री - आं आं! अरे ते नाही घ्यायचं! ते कामाचंय!
गट्टू - काये??
श्री - पगार... बाबांचा पगार..
गट्टू - बघू?
श्री - नाहीच झाला.. बाबांना पगारच नाही... हाहा हाहा!

गट्टूला खाली उतरवून त्याचे दोन्ही हात आपल्या हातांमधे धरून श्री दिलखुलास हसत गट्टूला फिरवत म्हणाला..

श्री - म्हणा बरं! ..बाबांना पगार मिळेना.. गट्टूला खाऊ मिळेना.. बाबांना पगार मिळेना.. गट्टूला खाऊ मिळेना..

गट्टू पण बाबा आल्याचा, बाबांनी हसत हसत फिरवल्याचा असे दोन आनंद एकत्र झाल्याने हसत हसत म्हणू लागला.

गट्टू - बाबांना पगाल मिलेना.. गट्टूला खाऊ मिलेना..
श्री - बाबांना पगार मिळेना.. गट्टूला खाऊ मिळेना
गट्टू - बाबांना..

तेवढ्यात समीर आला अन म्हणाला..

समीर - आम्ही चाललो.. अच्छा...

गट्टू एकदम गंभीर झाला आणि केविलवाणा हसला.

गट्टू - बाबा? मी ज्जाऊ??
श्री - कुठे??
समीर - त्याला सर्कसला यायचंय आमच्याबरोबर.. पण त्याला कसा नेणार आम्ही??
श्री - छे छे.... तो नाही काही येणार.. गट्टू आता बाबांबरोबर??? स्वैपाक करणारे.. हो क्की नाही??
गट्टू - नाई.. छलकच..हत्तोबा आणि वाघोबा बघायचे..
श्री - अरे हत्तोबा अन वाघोबा नाहीच्चेत तिथे.. गेले पळून रानात..

आधीच म्हंटल्याप्रमाणे..... हट्ट हा एक वेगळा भाग असतो, समज येणे हा वेगळा आणि समज येऊनही इच्छा व्यक्त करणे हा तिसरा..

गट्टू - नशुदेत वाघोबा.. ज्जाऊ मी बाबा??
श्री - अरे?? ते सर्कसला नाही चालले काही! गंमत करतोय दादा? हो की नाही रे?

श्री ने समीरकडे डोळा मारून पाहून विचारले खरे ... पण...

समीर - सर्कसलाच चाललोयत.... तुला पुढच्या वेळी घेऊन जाऊ हां! मोठा झालास की..
गट्टू - बाबा.. जातो ना मी..
श्री - अरे आज घरात आहे ना सर्कस आपल्या? क्काय? ती नाही बघायची तुला?
गट्टू - कुठंय??
श्री - ही बघ... सर्कस होगयी शुरू.. पहिल्यांदा दादाला टाटा करा..
गट्टू - टाटा...

समीरने नुसताच हात हलवला अन तो निघून गेला. जाताना त्याची शोधक नजर तपास घेत होती की यांच्या घरात कोणत्या प्रकारची सर्कस असू शकेल?? आणि ते तो त्याच्या बाबाना विचारणारही होता.

आणि तो जाताच दार आतून लावून घेऊन श्रीनिवासने गट्टूकडे पाहिले अन एक जोरदार कोलांटी उडी मारून म्हणाला..

श्री - गट्टू सर्कसमधे आपले स्वागत आहे.. गट्टूचे बाबा जोकर, माकड, हत्ती, घोडा आणि वाघोबा होणार! या रे या.. गट्टू सर्कस सुरू होत आहे.

गट्टू अत्यंत उत्सुक चेहरा करून पाहू लागला. एका कोलांटीनेच त्याच्या चेहर्‍यावर स्मित हास्य आणले होते. त्यातच श्रीने कोणतीतरी एक टोपी डोक्यावर घातली आणि जोकर दिसावे या उद्देशाने चेहरा वेडावाकडा करत तिरका कसातरी चालू लागला. चालता चालता दोन, तीन वेळा मुद्दाम आपटला. कंबर चोळत खोटे रडत उठला. आणि विचित्र आवाज करू लागला.

आत्तापर्यंत गट्टूची हसून हसून मुरकुंडी वळली होती.

आता फर्माईशी सुरू झाल्या. घोला, हत्ती, वाघोबा वगैरे!

श्री हत्ती म्हणून आपलेच दोन्ही हात सोंडेसारखे हलवत चीं चीं उद्गार काढू लागला. वाघोबा म्हणून डरकाळी फोडू लागला. घोडा म्हणून गुडघे टेकून गट्टूला पाठीवर ठेवून रांगू लागला.

गट्टूला आपले बाबा ही काय चीज आहे हे आज पहिल्यांदाच समजले होते. आपले बाबा इतके विलक्षण कलाकार आहेत हे त्याला माहीतच नव्हते.

श्री पुन्हा जोकर झाल्यावर तर गट्टू नुसता हसतच सुटला. श्रीनेही गट्टूला इतके हसताना आजच पाहिले होते. ते हसणे पाहून पगाराच्या स्लीपचे दु:ख केव्हाच विस्मरणात गेलेले होते. कसला पगार? कसली नोकरी?? मै और मेरा बच्चा! दॅट्स इट! नोकरीवर लाथ मारण्याची हिम्मत देणारा तो अविस्मरणीय प्रसंग होता.

श्री - अरे? पडलो पडलो पडलो.. आ... अयायायाया..
गट्टू - माकल
श्री - माकड...

श्रीने एकदम पलंगावर उडी मारली आणि माकडासारखे आविर्भाव केले.

गट्टू - शेपूट?

आता श्रीने एक सुतळी घेतली अन कंबरेला बांधली अन पुन्हा माकड होऊन नाचू लागला.

गट्टू - शेपूट हलते कुठे?

श्रीने हातानेच शेपूट हलवली.

गट्टू - शिम्ह!

श्रीने अक्राळविक्राळ चेहरा करून डरकाळी फोडली. या डरकाळीकडे अन आविर्भावांकडे गट्टू अनिमिष लोचनांनी बघत होता. त्याच्या दृष्टीने समीरदादापेक्षा बाबा कितीतरी भारी होते.

आणि एकदम...

अनेक वर्षांनी प्रचंड जोरात हालचाली केल्यामुळे...

श्रीनिवास पेंढारकर चक्कर येऊन खाली पडले. गट्टूला तोही अभिनय वाटत होता. पण त्याला मिनिटभरातच गांभीर्य समजले अन त्याने आजीला बोलवून आणले. श्रीच्या अंदाजानुसार पंधरा मिनिटाम्नी तो शुद्धीत आला असावा.

मावशी - काय रे मेल्या?? आत्ताच चकरा येतायत? म्हातारपणी काय करणारेस??
श्री - जरा.. चक्कर आली... पित्त! बाकी काही नाही..
मावशी - अन हा म्हणतोय तू उड्या मारत होतास?
श्री - सर्कस चाललवती आमची.. हा हा! असुदेत.. आता बरंय!

मावशी जरा वेळ श्रीचे निरीक्षण करून निघून गेल्या.

गट्टू- बाऊ झाला?
श्री - ह्या! शिम्ह पडलावता खाली ... उठला पुन्हा...
गट्टू - खरा शिम्ह पडतच नाही... शिकार करतो हो ना??

खरा सिंह! क्षणार्धात चेहरा बदलला श्रीचा! वास्तव भिडले मनाला त्याच्या! खरा सिंह! खरा सिंह त्याच्या मुलाला, म्हणजे समीरला घेऊन खरी सर्कस दाखवायला गेला होता. पण अभिनय करणे आवश्यक होते.

श्री - पलतो तर?? हत्त्तोबा अशी सोंड मारतो... अन गरागरा फिरवतो शिम्हाला... की आपटलाच शिम्ह!
गट्टू - मग मरतो???
श्री - अंहं! शिम्हच मारतो हत्तोबाला..
गट्टू - कसा??
श्री - दाखवतो हं! आता बाबा पोल्या करतील.. जेवण करतील.. मग गट्टूला मांडीत बसवून दोघे जेवतील.. मस्तपैकी...
गट्टू - नाही... आधी दाखवा..
श्री - अरे?? आत्ता बाऊ झालावता की नाही मला?? उड्या मारल्यामुळे..
गट्टू - समीरदादाची सर्कस संपली असेल?
श्री - केव्हाच... त्यापेक्षा आपलीच सर्कस मोठी झाली..
गट्टू - तिथे.. खरा शिम्ह असतो ना? ....तो म्हणत होता
श्री - खरा शिम्ह कधी आणता येईल का कुणाला धरून??
गट्टू - खोटा असतो??
श्री - हो मग? .. चला.. बाप्पाला दिवा लावलाय! शुभंकरोती म्हणा... आणि आता बाबां कशा पोळ्या करतात बघायचं बर का?

गट्टूने हातपाय तोंड धुवून शुभंकरोती अर्धवट म्हंटले. त्यानंतर तो ओट्याशेजारी ठेवलेल्या स्टुलावर उभा राहून ओट्याशी उभा राहून पोळ्या लाटत असलेल्या बाबांशी बोलू लागला.

गट्टू - टम्म..
श्री - टम्म फुगली की नाही?? आता?? आता अशी हळूच फोडायची..
गट्टू - मी फोडू??
श्री - अंहं! गरम आहे..
गट्टू - मधूकाकाला पोल्या नाई येत
श्री - हं!
गट्टू - तुम्हाला कशा येतात??
श्री - मला सगळं येतं! गट्टूला छान छान जेवण पाहिजे की नाही? म्हणून सगळं शिकलो मी..
गट्टू - राजेश खन्नाला येतं??
श्री - राजेश खन्ना? तो कुठून आला इथे??
गट्टू - वैशालीताई म्हणत होती की राजेश खन्ना खूप भारीय..
श्री - हो?? मला नाही बाबा माहीत!
गट्टू - किती पोल्या करनार?
श्री - पाच! मला तीन आणि गट्टूला दोन..
गट्टू - मोठा झालो की मी करायच्या पोल्या??
श्री - शिकायला तर सगळंच पाहिजे माणसाने??? पण तू कशाला करशील?? मी आहे की?? हो कीनई?
गट्टू - मी पोल्या करीन अन तुम्हाला जेवायला देईन!

गट्टूच्या या वाक्यावर बेहद्द खुष होत श्रीनिवासने त्याचा एक पापा घेतला.

श्री - उद्या बाबांना सुट्टीय बर का? खूप मजा करायची आपण!
गट्टू - का?
श्री - गट्टूसाठी सुट्टी घेतली!
गट्टू - मी पन नाई जायचे?
श्री - उद्याच्या दिवस नको जाऊस! दोघे मस्त खेळू..
गट्टू - नाईच जायचंय मला..
श्री - अं... असं नाही काही म्हणायचम! आता अभ्यास सुरू होणार आहे पुढच्या वर्षीपासून!
गट्टू - तुम्ही कितवित आहात?
श्री - अं.. बावीसावी!
गट्टू - ब्बाआआ...

गट्टूच्या दृष्टीने ही यत्ता फारच पुढची होती.

श्री - अरे?? हा तर पुणे जिल्हा झाला पोळीचा??

गट्टू खदखदत हसला.

श्री - आणि ही आधी केलीय ती पाकिस्तान..

पुन्हा गट्टू हसला.

अर्ध्या तासाने जेवणे झाली. तोंडलीची भाजी, मावशींनी दिलेला मोरंबा आणि पोळ्या अन भात, वरण! सुगरण असणे शक्यच नव्हते श्री! पण निदान पदार्थ येत तरी होते करता! आणि पलंगावरच्या दोन गाद्या खाली काढून त्यावर रांगत रांगत चादरी घालताना पुन्हा गट्टूने 'घोला, घोला' करत त्याच्या पाठीवर स्वारी केली. त्याला तसाच बसवून श्रीने चादरी घातल्या.

आता थोड्याच वेळात सामसूम करून झोपायचे होते. त्यापुर्वी श्रीने सर्व आवराआवर झालेलि आहे की नाही हे तपासले अन त्याचवेळी दार वाजले. पावणे दहा? आत्ता कोण येणार?

समीर!

समीर - आहे? गट्टू?
श्री - हो?? आहे की! का रे?? झोपायला आलाय..
समीर - गट्टू....

गट्टुला पुन्हा उत्साह आला. त्याचा हिरो याही वेळेला घरात आलेला होता. श्री आवराआवरी करू लागला.

गट्टू - कुठे गेलावतास??
समीर - सर्कस..
गट्टू - झाली?
समीर - हो?? तू काय केलंस?
गट्टू - बाबांनी सर्कस केली.. हे बघ असं ... माकल..

गट्टू जोरजोरात हसत उड्या मारत समीरला ते दाखवायला लागला. आत्ता समीरच्या डोक्यात प्रकाश पडला. तोही आता हसू लागला.

समीर - आणि हत्ती??
गट्टू - अस्सा... हत्ती.. चीं चीं..
समीर - मी पण... हे बघ.. हत्ती.. आमची तर सोंड केवढीय...
गट्टू - आमची पन..
समीर - जोकर??

गट्टूने मगाचची श्रीने घातलेली टोपी घातली अन अभिनय करून दाखवला. दोघेही खूप हसत होते. बर्‍याच वेळाने प्रमिलाने समीरला हाक मारली तेव्हा समीर उठला आणि दारात जाऊन म्हणाला...

समीर - गंमत केली तुझी श्री काकाने.. अशी नसतेच खरी सर्कस.. उद्या सांगेन हां?? टाटा..

एका क्षणात....... केवळ एका क्षणात हिरोचा झिरो झाला होता श्री... श्रीने खाडकन हलत्या दाराकडे पाहिले. समीरचा दोष नाही वाटला त्याला! समीरही लहानच होता. आणि गट्टू?? आपल्या बाबांनी आपल्याला फसवले अन सर्कस जशी नसतेच तशी असते असे सांगीतले या भावनेने उद्ध्वस्त होऊन तो बाबांकडे बघत होता.

श्रीने सगळे सोडून पटकन त्याला जवळ घेतले.

श्री - काय झालं रे गट्टू?
गट्टू - खोटी खोटी छलकच केलीत तुमी?
श्री - नाही रे?? खरच केली.. बघ.. मला चक्कर पण आलीवती की नाई.. आजी पण आलीवती की नाई?

आता गट्टूला पटले. बाबांना 'बाऊ' झाल्याचे त्याने स्वतः बघितले होते. त्याने पटल्यासारखी मान डोलावली.

त्याला उचलूनच श्रीने लाइट बंद केला. फॅन सुरू केला नाही. कंपनीने लावलेली सवय पगाराच्या स्लीपमुळे घरातही चालू ठेवावी लागत होती. फक्त! रमाच्या फोटोवर एक झिरोचा बल्ब तेवढा असायचा...

जवळपास वीस मिनिटे विविध गोष्टी अन गाणी हळू आवाजात ऐकवल्यावर गट्टू महाराजांचा डोळा लागला. त्याला शेजारी अलगद ठेवत श्रीने पाठ टेकली आणि सहज कूस वळली तर...

रमाच्या फोटोच्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसत होता..

आणि मनातल्या मनातच श्री म्हणाला..

श्री - काही नाही गं! कित्येक वर्षांनी उड्या मारल्या ना! त्यामुळे! बाकी काही नाही! आता खूप बरं वाटतंय.. काळजी करू नकोस! आणि गट्टू आहेच की बघायला.. आता पुन्हा इतक्या उड्या नाही मारणार.. साधी चक्करच आली मला.. खरच काळजी करू नकोस... रमा.. एका गोष्टीसाठी माफ करशील?? करशील माफ??

मी.. मी खूप प्रयत्न करतो गं.. पण.. रमा... पण आज मला... आपल्या बाळाला..

.... खरी सर्कस नाही गं दाखवता आली... करशील ना माफ रमा??? अं???

त्या रात्री... पेंढारकरांच्या घरातील एका उशीवर डोके टेकून एक निरागस बालक केव्हाच झोपी गेले होते...

... आणि...

.. दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...

गुलमोहर: 

अप्रतिम...
डोळ्यांत पाणी आणलंत राव,लि़खाण मनाला खुपच भावले.
भावना अनावर झ्याल्याने लिहु शकत नाही.

पु.ले.शु.

श्री - काही नाही गं! कित्येक वर्षांनी उड्या मारल्या ना! त्यामुळे! बाकी काही नाही! आता खूप बरं वाटतंय..
.... खरी सर्कस नाही गं दाखवता आली... करशील ना माफ रमा??? अं???
त्या रात्री... पेंढारकरांच्या घरातील एका उशीवर डोके टेकून एक निरागस बालक केव्हाच झोपी गेले होते...
... आणि...
.. दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...

>>>> बेफीकीरजी , सुंदर !! आपल्या लेखनातली शेवटची ओळ नेहमी खूप काही बोलुन जाते .... अप्रतिम !!!

{ छलकच >>>> आज एक खूप जुनी आठवण जागी केलीत आपण ! }

लिहित रहा ...आम्ही आतुरतेने वाट पहात आहोतच

त्रास झाला आजचा भाग वाचून... बायकोविना श्री, आईविना गट्टू हे दु:ख कमी की काय म्हणून आता पैशाची चणचण आणि बिनभरवशाची नोकरी हेही मागे लागलंय बिचार्‍यांच्या... परिक्षाच आहे श्रीची...एखाद्याच्या मागे दु:ख हात धूऊन लागणे म्हणजे काय, हे अनुभवायला मिळाले आज....
बेफिकीर, तुमच्या लेखणीत कायम दु:खमिश्रित शाई असते. त्यामुळे तुमचं लिखाण वाचलं की डोळ्यातून पाणी येणार हे आता समिकरणच बनून गेलंय....

दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...>>

त्यामुळे तुमचं लिखाण वाचलं की डोळ्यातून पाणी येणार हे आता समिकरणच बनून गेलंय....

अगदी, म्हणुनच हाफिसात रडणे टाळण्यासाठी मी घरी आल्यावर हा भाग वाचला. नाहितर हाफिसातली लोकं रोजच रोडतो म्हणुन वेड्यात काढायची.

बस एक॑च शब्द.... अ-प्र-ति-म... एकिकडे निरागसता आणि दुसरिकडे मुलावर अफाट प्रेम पण परिस्थितीनी हाथ बा॑धलेले..... कितीदाही वाचा प्रत्येक वेळा तेच feeling येत॑......नकळत डोळ्यतन॑ पाणी येत॑.....

मला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. सगळे इतके प्रेमयुक्त प्रतिसाद देतात त्या अर्थी चांगले लिखाण असणार असा अंदाज आहे. आभार मानण्याची क्षमता माझ्यात नाही.

-'बेफिकीर'!

.. दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...>> अप्रतिम बेफिकीर.... तुमच्या सगळ्या कादंबर्‍यांपैकी या कथेत जरा जास्तच गुरफटत गेले, गुंतत गेले समजलेच नाही.... प्रत्येक भागाला रडतेय.. प्रत्येक भागाला ....

Hats Off काय बोलू आणखी?