क्षणभंगूर

Submitted by दक्षिणा on 6 October, 2008 - 05:10

सोमवार १ सप्टेंबर, मी रोजच्या प्रमाणे लगबगीने ऊठून डबा केला, स्वतःचे आवरले, बरोब्बर ७.४५ ला चप्पल अडकवून घराबाहेर. मनातल्या मनात रोजचा विचार "अरे, बस स्टॉपला कोणीच दिसत नाही, बस गेली की काय?" पण मग आदिती दिसली आणि जीवात जीव आला. बसने जेमतेम नळ स्टॉप गाठला नाही तोवर माझा सेल् वाजला. फोन माझ्याच बरोबर राहणार्‍या माझ्या मैत्रिणीचा, मी उचलला... पलिकडून सीमा... "दक्षिणा... गौरव गेला." मी एकदम थंडगार.... क्काय? माझ्या चेहर्यावर मोठे प्रश्नचिन्हं. मला एकदम माझ्या अंगात सुक्ष्म थरथर जाणवली.

आणि डोक्यात विचारांची गर्दी झाली. मी एकदम भूतकाळात गेले. हा गौरव म्हणजे आम्ही आधी ज्या सोसायटीत रहात असू तिथला आमचा शेजारी. त्याच्या घरी फक्त तो आणि त्याची आई. त्याचं वय जेमतेम २२ /२३ च्या आसपासचं असेल. माझी मैत्रिण आधीपासूनच तिथे रहात होती एकटी, मग मी गेले. पहील्या पहील्यांदा मला गौरवचं अस्तित्व थोडं अनकम्फर्टेबल वाटायचं. सतत येणारी मित्र-मंडळी, खालून मोठमोठ्याने आईला मारलेल्या हाका. जाता येता बघेल तेव्हा मित्रांचं कोंडाळं करून बिल्डिंगच्या खाली घातलेला अड्डा. विनाकारण असुरक्षित वाटायचं.

असेच बरेच महीने गेले. आणि माझी मैत्रिण ३ महीन्यांकरीता बेंगलोरला कोर्ससाठी निघून गेली. मी एकटीच घरी. एके दिवशी गाण्याची सी डी मागण्याच्या बहाण्याने गौरव दारात आला, दारातूनच मी कपाळाला आठी घालून त्याला हवी असलेली सी डी दिली. दुसर्‍या दिवशी त्याच्याकडच्या काही सी डीज मी मागितलेल्या नसून मला बळंबळंच आणून दिल्या. मी त्या कधी ऐकल्याच नाहीत ही गोष्ट वेगळी. मग त्यांचं घर रंगवायला काढलं. आणि त्यांच्या ऍक्वेरियमसाठी आमचे घर आयतेच रिकामे सापडले. ज्या दिवशी तो आणून ठेवला त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ माशांना खाऊ देण्याच्या निमित्ताने त्याचे येणे सुरू.... एक दिड दिवस पाहून मी त्याला म्हटले, मला सांग कसे खाऊ घालायचे... मी घालीन. ते ही त्याने स्पोर्टींगली घेतले आणि मला मुकाट माशाना खाऊ घालण्याचे धडे मिळाले. अखेर ज्या दिवशी ते ऍक्वेरियम घरातून गेले त्या दिवशी मी सुटकेचा नि:श्वास सोडला. एके दिवशी रात्री दारावर थाप, मी चकित... उघडून पाहीलं तर बाहेर हा.. मी नाराजीने त्याला जाणवेल अशा नजरेने घड्याळ पाहीले.... ९.३० झाले होते. "काय आहे?" मी...
"मी दुर्गात कॉफी प्यायला चाललोय... तुला आणू का? "
"नको, आणि पुन्हा मला विचारू नकोस." इति मी....
मग मला नकोशा अशा बर्‍याच गोष्टी घडल्या, मी एकटी म्हणून, अधूनमधून त्याची आई चौकशी करायला यायची, कधी इडली चटणी, कधी मसालेभाताची डिश घरी यायला लागली.

शेवटी एकदाची कोर्स संपवून माझी मैत्रिण परतली आणि मी जमेल तसं सगळं वर्णन केलं. अर्थात वाईट असं काहीच घडलं नव्हतं तरी ते मला नको होतं. मला कोणाचा संपर्क नको होता. आणि या मायलेकांनी मैत्रिण घरी नसताना, माझी चांगलीच काळजी घेतली होती. मैत्रिण पुण्यात परतण्या आधी आम्ही मोठा फ्लॅट फायनल केला होता, २/३ दिवसात आम्ही तिथे रहायला जाणार होतो. फ्लॅट अगदी मागच्या गल्लीत होता पण आमचं सामान एखाद्या संसाराला लाजवेल असं. फ्रिज, बेड, गॅस.. आणि काय नाही? ऐनवेळी आम्हाला टेंपो वगैरे काही मिळेना. एक मिळाला पण त्याने सामान अनलोड करायला नकार दिला. तेव्हा अगदी अनपेक्षितपणे गौरव मदतीला धावून आला. त्याने आणि त्याच्या एका मित्राने अगदी अथपासून इतिपर्यंत मदत केली, जे आम्हाला दोघींना करणं निव्वळ अशक्य होतं.

आम्ही सोसायटी तर सोडली पण गौरव अधून मधून आमच्या इथल्या नेट कॅफेत दिसायचा. पण बोलणं मात्रं मी त्याच्याशी कटाक्षाने टाळायची. का त्याचं कारण अजूनही माहीत नाही. मला कोणत्याही प्रकारचा वाईट अनुभव आला नसूनही तो मुलगा मला उगिचच टारगट, अगावू वाटायचा.

२९ ऑगस्ट, ०८ मी लगबगिने बस स्टॉपवर निघाले असता, गल्लीच्या कोपर्‍यावर गौरव उभा, "काय म्हणतेस?" 'ठिक' उत्तर देऊन मी सटकले.

३१ ऑगस्ट, मी ब्लड डोनेट करायला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले , गाडी लावताना आमच्याच लेनमधला एक मुलगा भेटला, त्याने माझी चौकशी केली. आणि सांगितलं की गौरव पण इथे ऍडमिट आहे. हॉस्पिटलमध्ये अनपेक्षितपणे भेटल्यावर; बाहेर कधीही न बोलणारा मुलगा माझी चौकशी का करत होता ते कळायला मला फार उशिर लागला. मी ब्लड डोनेट करायला रक्तशाळेत पोचले. जिथे तिथे गौरवच्या रक्तगटाची चर्चा, २५ बाटल्या रक्त लागणार होतं. २३/२४ वर्षाचा धडधाकट गौरव फक्त क्रिकेट खेळताना पडल्याचं निमित्तं होऊन इथे ऍडमिट झाला होता. मार इतका जबरदस्त होता की लिव्हर कडून हृदयाकडे जाणारी प्रमुख रक्तवाहीनी रप्चर झाली होती आणि इंटर्नल ब्लिडींग झाले होते. पण तिथे हजर असलेला सर्व तरूणवर्ग पाहून मनात जराही शंका आली नाही, उलट साधं क्रिकेट खेळताना पडलाय, होईल ठिक असंच वाटलं. इतकंच काय, पण अनायसे आपण इथे आलो आहोत तर त्याला भेटून जाऊ असे ही मला त्यावेळी वाटले नाही.

घरी आले, मैत्रिणीला गौरव ऍडमिट असल्याचं सांगितलं, सोमवारी संध्याकाळी ऑफिसातून परत आल्यावर त्याला पहायला हॉस्पिटलमध्ये जायचं ही ठरलं. इथपर्यंत सगळं ठिक अगदी नॉर्मल. रात्री जेवल्यावर मी खिडकीत विचार करत बसले होते, अचानक मला विचित्रं वाटायला लागलं, आणि मी मैत्रिणीला अचानक बोलुन गेले "मला नाही वाटत, गौरव परत येईल असं" Sad आणि आपण काय बोलुन गेलो याची जाणीव झाल्यावर आपण किती वाईट विचार करतो याची लाज वाटली. पण मैत्रिण म्हणाली अगं तुला त्याच्या अपघाताचा सिरियसनेस कळला म्हणून तु तसं म्हणालीस.... तरिही मी विचार करत होते की जरी सिरियसनेस कळला असला तरिही कुणाचा तरी मृत्यू चिंतणं वाईटच... नाही का?

आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटेच तो गेला. क्रिकेट खेळताना पडलेला २३/२४ वर्षाचा मुलगा, २४ तास ही जिवंत न राहता निघून गेला. २/३ दिवस माझं कुठे लक्षंच लागलं नाही. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊनही त्याला पाहायला गेलो नाही, आणि आपण तो परत येणार नाही असा विचार का केला? हे परत परत आठवून मी माझ्या मनाला ओरबाडत होते. घरात आता त्याची आई एकटी. आमचे तर धाडसच झाले नाही त्यांना भेटायला जायचे. माहीती नाही त्यांनी आपल्या तरूण मुलाचा मृत्यू कसा पचवला असेल? तो लहान, त्यातूनही एकुलता एक, शिवाय त्याच्या लहानपणी पतीचा मृत्यू... हे सगळं पाहीलेल्या बाईनं, तरण्याताठ्या, हातातोंडाशी आलेल्या मुलाच्या जाण्यानंतर जगावं कसं? हाच विचार वारंवार डोक्यात येत होता.

अखेर पंधरा दिवसांनी धाडस करून आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्या खूप सावरलेल्या वाटल्या, अर्थात त्या ही नर्स असल्याने त्यांनी जीवन्-मृत्यू हा खेळ अगदी जवळून पाहीला होता असं मानून चालायला काही हरकत नाही. पण ते इतर पेशंटसच्या बाबतीत पाहणं म्हणजे नोकरीचा भाग, पण स्वतःच्या मुलाचा मृत्यूशी सामना पहाताना त्यांना कसं वाटलं असेल? गौरव जेव्हा त्या दिवशी क्रिकेट खेळायला बाहेर पडला तेव्हा त्याला वाटलं होतं का की आपण उद्याची सकाळ पहाणार नाही? शुक्रवारी सकाळी बस स्टॉपवर मला दिसलेला मुलगा सोमवारी या जगातच नसेल याची मी तरी कल्पना केली होती का?

तेव्हापर्यंत मी फक्त पुस्तकातंच वाचलं होतं की "उद्या कुणी बघितलाय", "आयुष्य हे क्षणभंगूर आहे." पण गौरवच्या मरणाने या दोन्ही वाक्यांची यथार्थता मी अगदी जवळून अनुभवली.

गुलमोहर: 

सिंड्रेला,
>>नुसत्या स्मितहस्यातुनही सोयीस्कर अर्थ काढणारे कमी नसतात. कदाचीत त्यामूळेच नकळत तसे वागणे होत असावे. >> १००% सहमत. आणि बहुतेक वेळेला समोरच्या माणसाने विशेषकरून तरूण मुलांने नुसतं पाहीलं तरी आपण नजरेची धार वापरतो. Sad

आपल्या मनातल अनेक मनात जसच्यातस उतरवण छान जमल आहे .

दक्षिणा स्वतः भोवती घालेली प्रदक्षिणा आहे ही... !!!
प्रभावी लिहिल आहेस...

तुम्हा सर्वांच्या अभिप्रायांबद्दल् धन्यवाद.

दक्षिणा, अस्वस्थ केलंस. वाईट वाटलं वाचून. चौकात लावलेला गौरवचा डिजिटल फ्लेक्सवरचा मोठा फोटो जाता येता बघून मला प्रत्येक क्षणी त्याची आई आठवत राहिली. अज्ञातात आनंद हेच खरं.

छान लिहिलय, मनस्पर्शी...

चांगलं लिहिलयस , मी मिसलो होतो हे ..
~~~~~~~~~~~~~~~~~~~
काम करो या ना करो , काम की फिक्र जरुर करो ;
और फिक्र करो या ना करो पर उसका जिक्र जरुर करो !!

Khupcha touching aahe ga he .... tu mala aadhi sangitla aahes hyabaddal .

Pan tula khara sangu aayushyat aapan khup chuka karto ga ...karan chuklyashiway aapan
kahi shikat nahi .....hya eka anubhawane tu kiti gosti shiklis sang ? Aata parat tu aasa kadhi konabaddal gairsamaj karun ghenar nahis na, nidan to manus , ti wyakti kashi aahe he janun ghyacha prayatana karshil aadhi .... mag mhanunach ajun ek gost karaychi "swatala maph karayala shikaych" he aani hech khup mahatwacha aahe ..

दक्षिणा, छानच लिहीलय ग! आजच वाचल. अगदी अगदी प्रामाणीक वाटल.

हे कसं काय निसटलं माझ्या नजरेतुन. दक्स, छान लिहीलं आहेस. लिहीणं का थांबवलंस मग.
अजुन लिही ना !!
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

एखाद्याकडे बघुन किंवा नुस्ते कुणाचे नांव एकुन मनात एक अढि बसते.त्याला काहिहि कारण नसत.पण अस होत खर.छान लिहिलय.

आत्ता वाचलं.
अत्यंत ह्रदयस्पर्शी आणि अप्रतीम लिहिलं आहेस तू.
सुन्न झालोय त्यामुळे स्मायलीही टाकवत नाहीयेत.

जमल्यास कुठेतरी छापायला दे लोकसत्ता/सकाळ वगैरे मध्ये.

>>एखाद्याकडे बघुन किंवा नुस्ते कुणाचे नांव एकुन मनात एक अढि बसते.त्याला काहिहि कारण नसत.पण अस होत खर.

राजेश खन्नाचा 'आनंद' अनेकांनी पाहिला असेलच.
त्यात या साधारण अर्थाचा एक छान संवाद आहे, "कधी कधी एखाद्याने तुमचं काहीही चांगलं केलेलं नसतं, काहीच संबध नसतो तरीही तुम्हाला ती व्यक्ती आवडते, तर कधी एखाद्याने तुमचं काहीच वाईट केलेलं/वागलेलं नसतानाही तुम्हाला त्या व्यक्तीचा तिटकारा वाटतो". कदाचित ह्यालाच वेव्हलेंग्थ म्हणत असावेत.

दक्षे Sad कदाचित आपण एकटे राहतो आणि उगाच कुणी लाळघोटेपणा करू नये, नसती जवळिक साधू नये म्हणून पण आपल्याकडून to be on the safer side mode on होतो आणि आपण असे वागतो... पण असे अतर्क्य घडले की मनाला टोचणी लागते. Sad तो गौरव आज असता तर तू आजही त्याच्याशी त्याच पद्धतीने वागत राहिली असतीस आणि तुला ते जाणवलं ही नसतं.....

मंदार शी सहमत.....

धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल. तो मुलगा गेल्यावर मी प्रचंड डिप्रेस झाले होते. मला तरी तो अगदी टवाळ वाटायचा. पण जेव्हा आम्ही तो गेल्यावर त्याच्या आईला भेटायला गेलो तेव्हा तर मी अजून डिप्रेस झाले, कारण त्याच्या आईने मला बरंच काही सांगितलं. की मी कुठेही दिसले, भेटले, किंवा अगदी एखादा शब्द बोलले तरी तो आईला सांगायचा की आज दक्षिणा दिसलेली म्हणून. तो कॉफीचा किस्सा जो मी वरती लिहिलाय; त्याबद्दल पण त्याने त्याच्या आईला सांगितलं होतं, आणि वर "ती इतकी का भडकत असेल माझ्यावर?" असं पण म्हणालेला म्हणे. मी आयुष्यभर ही घटना विसरू शकणार नाही. Sad

दक्षिणा, खुप छान लिहीलयस. मनातली अस्वस्थता खुप व्यवस्थित मांडली आहेस.

कधी कधी खरच एखाद्याबद्दल अशी आढी आपल्या मनात बसते, की त्याच्याशी संबंधित काहीही जरी समोर आलं किंवा विचार जरी मनात आला तरी डोकं हालतं.

मला इथे माझ्या best friend च एक वाक्य आठवतं, ती मला नेहमी म्हणते, अमोल, ह्या जगात कोणी माणूस मुळात कधीच वाईट नसतो आणि कोणाबद्दलही काही माहिती नसताना एकदम टोकाचं मत बनवू नये.

दक्षे, कधी कधी साध्या साध्या दिसणार्‍या घटनेमधे, बोललेल्या वाक्यांमधे आपण उगाचच उलटे अर्थ शोधत बसतो. साधं सोप्पं काही पहातच नाही कारण प्रत्येक ठिकाणी चांगलाच अनुभव येईल अशी आपल्याला सवय राहिलेली नसते. तुझ्या ठिकाणी कुठलीही मुलगी असती तरी ती फार वेगळं वागली असती असं मला नाही वाटत.

दक्षिणा, अस काही ऐकल की धक्का बसण साहजिकच आहे,
तुझ्या ठिकाणी कुठलीही मुलगी असती तरी ती फार वेगळं वागली असती असं मला नाही वाटत.
मंजिरी , खरंच आहे तुमचं म्हणण...पण यांनी मुलींच नुकसान मात्र होत

दक्षिणा- अत्यंत प्रामाणिक पणे अन जिव्हाळ्याने लिहिलय .
शैली अन भावना -ओशाळल्याची जाणिव खूप सुन्दर व्यक्त झालीये.
याला साहित्यपर शाबासी द्यायला मी डगमगतोय कारण या मागे कुठेतरी भावना दुखावल्या जातील अस वाटत.
हृदय स्पर्शी म्हणायला हरकत नाही

Pages