वानू - सुरक्षारक्षक - भाग ५

Submitted by bedekarm on 8 April, 2008 - 11:56

३१ डिसेंबरची सुखद थंडीतील मस्त संध्याकाळ. यावर्षी मी मस्त विनापाश आहे. तशीही सगळ्या गुंत्यात पाय मोकळा ठेवते मी. पण यावर्षी खरच काही पाश नाहीत. मागची पिढी आम्हाला सोडून खूपच दूर निघून गेली आहे. पुढची पिढी थोडीशी दूर आहे. यंदाच सिलीब्रेशन खासच करायच ठरवलय. तयारी जोरात सुरु आहे. हा बाजारातून सामान खरेदीसाठी गेला आहे. मी घरात स्वयंपाकाची कच्ची तयारी करून त्याच पॅकिंग करत आहे. वान्यालाही या खास बेताचा सुगावा आहे. आम्ही आउटिंगचा बेत आखला आहे याची साधारण कल्पना त्याला आलेली आहे. तो उगीच मधे मधे लुडबुड करत आहे.

तयारी झाली. सामान गाडीत लोड केल. वान्याला एक छोटी चक्कर मारुन गाडीशी आणल. वान्या टुणकन गाडीत उडी मारुन बसला. इतका वेळ आपल्याला नेतील का नाही याची खात्री त्याला वाटत नव्हती. आता नक्की झाल. वानू मागच्या सीटवर बसला. वाटेत दिसणार्‍या कुत्र्यांवर त्वेषाने भुंकत ल्हा ल्हा करत वानू अस्वस्थ हालचाली करत असतो. जरा स्वस्थता नाही याच्या जीवाला,गप की रे, तुझा काय संबंध? म्हणत हा गाडी चालवत एकीकडे वान्याला शिव्या घालतोय.

इथून २० किलोमीटरवर भोसे गावचा तलाव. हायवेपासून एक दोन फर्लांग अंतरावर. हायवेवर जरा बाजूला गाडी लावून आम्ही खाली उतरलो. सगळ सामान, वानू अनलोड केल. हायवे क्रॉस करेपर्यंत वानूने नाकी नउ आणले. हुश्श. आता ३०० मीटरवर तळ. थोड आत गेल्यावर वानूला मोकळ सोडल. वानू जाम हुंदडतोय. एवढ मोकळ मिळतच नाही कधी वान्याला. थोडस चालत जाउन एक बरीशी प्लेन जागा पाहून आम्ही सामान खाली ठेवल.

हळूहळू संध्याकाळ उतरायला लागली आहे. पश्चिमेकडे आभाळ लाल सोनेरी झाल आहे. तलावाच्या पश्चिमेकडील भिंतीवरून मधूनच, घराकडे जाणार्‍या माणसांच्या डोक्यावर काटक्यांच्या मोळ्या किंवा ओल्या गवताचा भारा घेतलेल्या आकृत्या, आणि त्यांच्यामागून जाणार्‍या शेळ्या किंवा गाइ म्हशी आता हळूहळू काळसर व्हायला लागल्या आहेत. विस्तीर्ण आकाशाचे गडद सोनेरी रंग मावळून आकाश गहिर होतय. त्यावर झाडांचे कटाउटस, तलावाची भिंत, त्यावरुन चालणारी माणसा प्राण्यांची पपेटस, हे सगळ जसच्या तस उलट उतरत चाललय तळ्यात. शे पाचशे पांढरे बगळे, छोट्या छोट्या थव्यामधून हिंडतायत. तळ्याच्या काठाला, तळ्यात, तळ्यापलीकडे, झाडांवर. मधूनच पाण्याला अलगद स्पर्श करून एखादा बगळा मासा गटवतोय. बहुधा ३१ डिसेंबर्च्या पार्टीतील स्नॅक्ससाठी. त्यांचा कलकलाट, एकमेकांना घाइ करण, दिवसाअखेरी सुरक्षित जागा गाठून पंख चोच मिटून झोपी जाण. त्यांच्या विश्वात शिरलेल्या आम्हा दोघांकडे कुणाचही लक्ष नाहीये. वानू मधूनच बगळ्यांनाही आमच्याजवळपास फिरकू न देण्याची खबरदारी घेतोय. इतकी निर्जन जागा. वानूची सुरक्षेची जबाबदारी वाढलेली आहे.

अलगद काळोख सर्वदूर पसरतोय. सभोवताली वर्तुळाकार डोंगर. दोन हाकांच्या अंतरावर हायवे. पण या खोलगट जागेत हायवेच्या दिव्यांचा अधून मधून फक्त प्रकाश दिसतोय. वाहन दिसत नाहीत. डोंगरांमागून पूर्ण चंद्र निघायला लागलाय. सर रखके आसमाँपे परबत भी सो गये. किशोरच ठंडी हवा ये चाँदनी सुहानी गाण बासरीवर वाजवत तो टेण्ट्च्या दाराशी बसलाय. टेण्ट्च्या बाहेर गॅसच्या छोट्या शेगडीवर ग्रेव्हीवाल चिकन मंद शिजतय. शेजारी पातेल्यात मी तांदूळ धुवून ठेवलेयत, चिकन उतरवून लगेच भाताच पातेल वर चढवायच. तळ्याच पाणी सावळ झालय. आत मोठा चंद्र तरंगतोय. दूर तळ्याच्या पाण्यावर धुक्याची हलकी साय धरायला लागली आहे. चार पोळ्या आणि त्यावर नुकत शिजलेल्या चिकनचे तोंडीलावणे, शिवाय थोडी बोन्स अस स्वप्न बघत वानू पुढच्या दोन पायांवर तोंड ठेवून डोळे मिटून कान उघडे ठेवून झोपलाय. एवढ्यात गावातला गावकरी आम्ही कोण आलोय ते बघायला आणि आमच्याशी बोलायला आमच्याकडे येउ लागला. वानूने तडक उठून जोरदार सलामी दिली. वानू असताना काय बिशाद आहे की कुणी आमच्या जवळपास फिरकेल. वानूला जमिनीत ठोकलेल्या खुंटीला बांधून आम्ही गावकर्‍याशी बोललो. वानूची सुरक्षा असल्यान अशी कितीतरी मस्त आउटिंग एन्जॉय केलीयत.

वानूच्या सोबतीन मी एकटीन किती किती दिवस काढले आहेत. रात्री कधी भिती नाही वाटली. वानू कायम अलर्ट असतो. वानू लहान असताना एकदा रात्री खूप भुंकायला लागला. एक दोनदा बाहेर येउन आम्हीही कुणी आहे का ते पाहिल. शेवटी वैतागलो. विचार केला, आता शेजारीपाजारी शिव्या घालतील आपल्याला. रात्रीची झोपमोड होणार सगळ्यांची. वान्याला आत आणून बेडरुममधे कोंडून ठेवले. वानू तरीही अस्वस्थ. काय कडकड करत आहे. झोप की शांत. कायमची धडपड लागलीय याच्या नशीबाला, म्हणून आम्ही वान्याला गप्प बसायला सांगत होतो. वान्याने आम्हाला धड झोपू दिले नाही रात्रभर. सकाळी उठून बघतो तर आजूबाजूच्या दोन व आमच्या घरातून गाड्यांतील टेपरेकॉर्डर चोरीला गेलेले.

पोलिसात रिपोर्ट केला. संध्याकाळी दोघे पोलीस पंचनामा करायला आले. अंगणात खुर्च्या टाकून आम्ही बसलो. वान्याकडे बघून म्हणाले, वकीलसाहेब कुत्र काय शोभेच काय? आमच्यामुळे वान्याला मान खाली घालायला लागली. पण याचा फायदा मात्र एक झाला, की मला वानू चोर आले तर कसे सांगतो हे समजले.

पुढच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या रात्री, म्हणजे पाडव्याच्या पहाटे दोन वाजता वानू अंगणात चोर आले आहेत सांगत उठला. मी घरात कुणीतरी शिरलय म्हणून आरडाओरडा करायला सुरुवात केली. पटापट दिवे लावले. पाडव्याच्या पहाटेला चोर चोरीचा मुहूर्त करतात. पावसाळ्यात चोरांना चांगला सीझन नसतो. आता दिवाळीत थंडीमुळ लोकही छान झोपतात, शिवाय सुगीही होते. लक्ष्मीपूजनाचे दागिनेही घरात असतात, तेंव्हा हा मुहूर्त चोर गाठतातच. लागलेले दिवे, आमचा आरडाओरडा, वानूचा टाहो फोडून भुंकण, चोराला काय करावे समजेना. धावत धावत त्याने गेट गाठले. गेटवरुन चढून आमच्या देखत तो पसार झाला. आम्ही वानूची पाठ थोपटली.

दुसर्‍या दिवशी बागेमधे चोराने धाबरुन पळून जाताना टाकलेली बॅग आम्हाला सापडली. दिवाळीच्या पाडव्याचा आमचाच मुहूर्त मस्त झाला. आम्हाला चोराचीच बॅग मिळाली.

वानूची सगळी करीयर अगदी स्वच्छ झाली. एकदोन चोरी व हिंसेचे प्रकार वगळता सगळी करीयर अगदी ब्लॉट्लेस.
झाल काय. वानू होता अगदी लहान. त्याला घरात कोंडून आम्ही बाहेर गेलो होतो. यायला उशीर झाला. घरात दिवा लावून ठेवला नव्हता. त्या अंधारात चिडून जाउन वानूने लायब्ररीचे रणजित देसाइ यांचे राधेय हे पुस्तक फाडून चिंध्या करुन टाकले. याला दोन कारण संभवतात. एकतर एकटा आहे म्हणून वानू ते वाचत असावा आणि दिवे नसल्याने चिडून जाउन त्याने ते पुस्तक फाडले असावे, किंवा जरा हटके आवड असलेल्या त्याच्या मालकांच्या सहवासात राहलेल्या वानूला ते पुस्तक आवडले नसावे. या प्रकरणी अधिक बोलण्यास वानूने नकार दिल्याने आम्ही तो तपास तिथेच थांबवला. ही एवढी एकच हिंसक घटना. मग बागेतल्या कुंड्या वगैरे फोडण हे किरकोळीतल.

मी नव्यानच मासा करायला शिकले होते. वानूच्या घशात काटा अडकेल म्हणून आम्ही खाउन झाल्यावर काट्यांची पुडी करुन लांब टाकून आलो. दुसर्‍या वेळी मासे आणले. मी ओट्यापासून जरा दूर गेले तर मागे वानू मोठा मासा घेउन कुडुम्कुडुम खात बसला होता. वानूने केलेली ही एकच चोरी. घरात वानू सुटा असे. आणि त्याच्या टप्प्यात खाण्याच्या वस्तूही असत. पण वानूने दिल्याशिवाय कधीही खाल्ले नाही. खायला घातल्यावरही आम्ही बाजूला झालो की मग उठून खातो. खाताना तोंडातली भाकरी काढ्ली तरीही काही करत नाही.

एवढा शूर वानू पण फटाक्यांच्या कडकडाटाला, वीज आणि ढगांच्या गडगडाटाला, आणि गॅस सिलिंडरच्या खडखडाटाला भयानक घाबरतो. असेल तिथून धावत येउन घरात घुसून थेट मागच्या खोलीत दिवाणाखाली तोंड खुपसून थरथरत पडून राहतो.

गुलमोहर: 

खुपच मस्त, न चुकता वाचते. एकुणच कुत्रा हा माझा अतीशय आवडता प्राणी आहे(हे असे प्राणी लिहिताना सुद्धा जीवावर येते कारण माझी कुत्री तीने सुद्धा असाच लळा लावला होता नी ती एक घरातील सदस्य होती. मी प्रत्येक वाक्याला दुजोरा देवु शकते. त्यांच्याएवढे प्रेम ,हुशार नी प्रामाणीकता कुठलाच प्राणी देवु शकत नाही असे 'माझा अनुभव' सांगतो.

बाकी मस्त रंगतेय....

फारच सुरेख लिहिता तुम्ही. अजून येऊदेत. मस्त.

कसला क्यूट आहे तुमचा वानू!! आवडला एकदम!! Happy

मस्तच आहेत सगळे भाग. सलग वाचायला खुप छान वाटले असते. वानूचा एखादा फोटो आहे का ? म्हणजे चित्र कसे परिपूर्ण होईल.

खूपच छान लिहिताय तुम्ही. आवडायला लागलाय तुमचा वानु!!

मीना, जवळ जवळ नाही, .... नक्की ऍडिक्टीव्ह आहे हे तुमचं लिखाण. काय आवडलं ते द्यायचं झालं तर अख्खे पाच भाग कॉपी पेस्ट करावे लागतिल...
और आन दो!

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मला पुढे पुढे लिहित जायला उत्साह येत गेला. हळू हळू त्याची मालिका होत गेली. मी कॉम्प्युटर नेट वगैरे बाबतीत खूपच नवीन आहे. वान्याचे फोटो आहेत. आता मुलाला सांगून ते मालिकेत टाकीन. ते फोटो साइटवर देण मला जमणार नाही म्हणून थोडा वेळ गेला.

पाचही भाग अप्रतिम.. Happy पुढ्चा कधी? फोटो मिळणार पहायला वान्याचा म्हणून आनंद झाला..

जास्त काही लिहित नाही, कारण माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही मात्र थांबु नका. पुढचे भाग नित्यनियमाने टाकत चला.

सहीच लिहीलेत सगळे भाग, तुम्ही टण्याच्या म्हणजे शंतनुच्या आई आहात होय. तुम्ही दोघंही खुप छान शैलीत लिहीता.