वानू - व्हेरी स्मार्ट - भाग ६

Submitted by bedekarm on 11 April, 2008 - 05:26

वान्या लहानपणापासूनच स्मार्ट. पण वयाबरोबर त्याची वाढत जाणारी समज समजून घेणं हा एक छान अनुभव आहे. त्याची आणि आमची भाषा वेगळी पण काळाबरोबर एकमेकांना समजू लागली. आमच्या भाषेतले दोनच शब्द त्याने समजून घेतले . एक म्हणजे वानू आणि दुसरा चल. तो लहान असताना त्याला बाहेर फिरायला नेताना आम्ही म्हणायचो 'चल'. हा वानूचा फार लाडका शब्द. आम्ही एकमेकात बोलताना जरी चल म्हटले तरी वानू ताडकन उठून उभा राहतो. थेट दाराशी जातो. त्याची लगबग उडते. केंव्हा मला फिरायला नेतात असे होते. खर म्हणजे आम्ही चल हा शब्द एक ऍक्टिव्हिटी संपली आणि आता उठा, अशा अर्थाने वापरत असू. उदाहरणार्थ, T.V.चा कार्यक्रम संपला आता उठूया, किंवा गप्पा बास आता कामाला लागा. पण वानूसाठी त्याचा अर्थ एकच. बाहेर जाउया भटकायला. आम्हाला लक्षात ठेवून चला म्हणणे टाळावे लागते.

दुसरा शब्द म्हणजे वानू किंवा वान्या. वानू आमच्या सगळ्यांच्या मधोमध बसतो. नाचातल्या कृष्णासारखा. किंवा अस म्हणा की आम्ही त्याच्या भोवती बसतो. आम्ही गप्पा मारताना, पाहुणे आलेले असताना त्याला बाहेर हाकलले तर त्याला फार अपमान वाटतो. पायावर डोके टेकून (स्वतःच्या) वानू मधोमध झोपतो. कुठल्याही विषयावर गप्पा भांडणे चाललेली असतात. वानू उगाच मधे बोलत नाही. पण आमच्या तोंडात वानू शब्द आला की डोळे उघडतो. भॉ, किंवा भॉ भॉ भॉ अस म्हणून बहुधा ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणतो. पण आम्ही ऐकतच नाही बोलतच राहीलो तर पुन्हा प्रयत्न करून बघतो आणि मग नाइलाजाने ओव्हर्रुल्ड अस मनातल्या मनात म्हणून डोळे मिटतो.

ताईच्या लग्नाच्या मेंदीचा कार्यक्रम होता. बेडरुममधे, घरात इतरत्र जागा नसल्याप्रमाणे सगळी एकत्र बसलो होतो. गप्पा दंगा याला ऊत आला होता. बोलता बोलता वानूचा विषय निघाला. इतक्या वेळ वानू शहाण्यासारखा बेडरुम बाहेरील झाडाखाली साखळीने बांधला होता तिथे मुकाट्याने बसला होता. पण आपल्या माघारी आपल्याविषयी बोलतात हे त्याला मुळीच आवडले नाही. मग त्याने दंगा करुन त्याला सगळ्यांमधे आत बसायला जागा द्यायला लावली.

मराठीतील बाकीचे म्हणजे उठ, बस, जा, ये, गप वगैरे शब्द त्याला कळत असावेत असा मला संशय आहे. पण या शब्दांना तो जाणून बुजून प्रतिसाद देत नसावा. मग कम, गो, सिट असेही शिकवायचा प्रयत्न झाला. पण या मराठमोळ्या शिलेदाराने परकीय भाषेलाही दाद दिली नाही. त्याला पाहिजे तेंव्हाच तो जाइ येइ बसे किंवा उठे.

वान्याला आमची जुबानी भाषा नाही समजली तरी देहबोली बरोबर समजते. आम्ही कामाला निघालेलो असलो तर तो कधीही मला न्या म्हणून मागे लागत नसे. अर्थात चुकुन गडबडीत दार वगैरे उघडे मिळाले- आणि अशा वेळी ही संधी मिळण्याचा चान्सही असतो-तर मग आम्हाला त्रास न देता स्वतः आपापले बाहेर जाइ. त्याला परत आणून घरात डांबायला आम्हाला त्रास होइ पण त्यात वानूचा काय दोष? तो तर बाहेर आनंदाने रहायला तयार असतो. घरात घालावयाचे कपडे, फॉर्मल शर्ट, टी शर्ट यातील फरक त्याला समजत. शिवाय बूट चपला आणि स्लीपर हे वेगवेगळ्या वेळी वापरतात हे ही त्याला समजत. फॉर्मल शर्ट बूट घातले तर वानू मागे लागत नाही. घरात येऊन लुंगी बनियन वर असल तर ही विश्रांतीची वेळ आहे हे समजून तो शहाण्यासारखा वाट बघत थांबतो. मग आत टी शर्ट घालण्यासाठी जाउ लागला तर वानूची धावपळ सुरु होते. हॉलमधून बेडरुममधे अस आत बाहेर चालू होते. दाराशी जाऊन उतावळेपणाने उभा असतो. कधी कधी वानूची ही पळापळ बघून याला त्याची खोडी काढावी वाटते. टी शर्टची बटण लावत हा पुन्हा कोचावर बसतो. वानू जाम गोंधळतो, पण क्षणभरच. दुसर्‍या क्षणाला अंगावर भुंकुन निषेध व्यक्त करतो.

मी सैपाकात, कामात असले तर वानू गप्प बसून राहतो. त्याला भूक लागलेली असली तरीही. मग दमून मी कोचावर येउन बसते. वानूला मग सात्विक संताप येतो. माझ्यासमोर येउन बसलीस काय, उठ मला वाढ म्हणून सांगतो. मागच्या वर्षी होळीला शेजारच्या रश्मीने पुरणपोळ्या आणून दिल्या. म्हणाली, मामी, गरम आहेत तर खाऊन घ्या. मी दोन घास खाऊन मस्त झाल्या आहेत म्हणून सांगितले. मग रश्मी जाते म्हणून गेली. ती गेटमधून जेमतेम बाहेर गेली आणि वानू माझ्यासमोर येउन माझ्या पायावर पंजाने ओढून भुंकत म्हणाला, मला सोडून खातेस, तुला काही वाटत का? मगाशी बाहेरची माणस होती म्हणून गप्प बसलो. वानूला पुरणपोळी, एकूणच गोड खूप आवडे.

आमची आजी वारली तेंव्हा तिला हॉलमधे ठेवले होते. लोक अंत्यदर्शनाला येत होते. वानूला हॉलच्या जिन्यात बांधले होते. एरवी कुणालाही आत न येउ देणारा वानू चुपचाप बसला होता. एवढ्यात एकदम जोराजोराने भुंकायला लागला. बघितले तर रस्त्यावरून जाणारा दारुडा आत येऊन आजीला नमस्कार करत होता. या दारुड्याने वानूशी दोस्ती करायचा खूप प्रयत्न केला. अगदी वानू लहान असताना त्याच्यासाठी घुंगुर आणून दिले. वानूच्या पट्ट्यात ते घुंगुर कायम आहेत. हा दारुडा अधून मधून साहेबांशी गप्पा मारायला थांबे. त्याची सलगी वानूला आवडत नाही कधीही. शिवाय तो थापा मारुन साहेबांकडे पैसेही मागतो. साहेबही एखादे दिवशी त्याच्या थापा ऐकून त्याला म्हणत, हे बघ, मी तुला इतर कुठल्याही कारणासाठी पैसे देणार नाही. जर तू दारु पिणार असशील तर देतो. अस म्हणून दहा रुपये देत. तो तोबा तोबा अस करुन पैसे खिशात टाकून परत उलट्या दिशेला वळे. तिकडे माळावर हातभट्टीची ताजी मिळते. कुणी आमच्याकडे पैसे मागितलेले वानूला आवडत नाही. म्हणून मग रोज येणार्‍या दूधवाला, पेपरवाला, केबलवाला यांचाही त्याला राग येतो. ते कितीही वेळा आले तरी वानू त्यांना सलगी देत नाही.

समोरच्या घराच्या आणि आमच्या गेटचा आवाज अगदी सारखा आहे. बरेचदा आम्ही फसतो, पण वानू कधीही फसत नाही. त्यांची व आमची स्कूटी सेम आहे. पण वानू दोन्ही आवाजातला फरक बरोबर ओळखतो. वानू कुठल्याही नवीन आवाजाला प्रथम दचकून सावध होतो. दुसर्‍यांदा तोच आवाज झाला तर वळून बधतो. आणि पुन्हा केंव्हाही तसा आवाज झाला आणि निश्चितपणे तो आवाज अपायकारक नसेल तर वानू त्याची दखलही घेत नाही.

आमच्यापैकी कुणाचीही गाडी अर्ध्या किलोमिटरच्या आत घराजवळ आली की वानूला घरात कळते. तो कानोसा घेऊ लागतो. त्यानंतर बरोबर पाच ते सहा मिनिटात आम्ही घरात येतो. आमच्या कामवाल्या भाभी म्हणतात की असला वॉच्मेन कितीबी पगार दिला तर भेटणार नाय. वानू माणसापेक्षा बी लय भारी हाय. असल इमानीकुत्र कुठबी गाव्हनार नाय.

आम्ही घरी आलो की वानूला आनंद होतो. बरेच दिवसांनी गावाहून आलो तर अंगावर उड्या मारुन नको करतो. खास करून शंतनू. खूप खूप दिवसांनी येतो, वान्या पाच मिनिटे नुसता त्याला घोळसवून टाकतो. तीन महिन्यापूर्वी मात्र शंतनू आला तेंव्हा वानू एकदाच जवळ जाऊन आनंद दाखवून लगेच बाजूला जाउन बसला.

वानू आता थोडा शांत झाला आहे. लहानमुलाचा अल्लडपणा राहिला नाही. एका जागेला खूप वेळ बसतो. उठायला नको वाटत त्याला. दुखत असतील त्याचे पाय. क्रमशः

गुलमोहर: 

पुढिल भागाच्या प्रतीक्षेत

मी यडचाप सारखा भाग ७ आधी वाचला Sad
मीनाताई, हे कुठल्यातरी मासिकात, कुठेतरी मोठ्या संख्येने लोक वाचू शकतील अशा ठिकाणी द्याच... अगदी अगदी जमलय.