मनश्री

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 3 June, 2010 - 01:00

मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो.

तिच्या जन्मापासून तर तिच्या “बालश्री” हा पुरस्कार मिळण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासात लेखकाने तिची आई, वडील, तिची बहिण, खुद्द मनश्री ह्यांच्या शब्दातून तिची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचं जिवंत शब्दचित्र चितारलंय. हे वाचताना पदोपदी डोळे भरुन येतात….. कधी देवाच्या विचित्र न्यायानं……तर कधी आईवडीलांच्या अथक परिश्रमानं तर कित्येकदा मनश्रीच्या कौतुकानं….!! जन्मापासूनच जगण्यासाठी झगडणार्‍या मनश्रीची कथा काळजाचा ठाव घेते.

पुस्तक हातात घेतल्यापासून हातातून अगदीच ठेववत नाही. जन्मापासून इतकी complications असूनही तिच्या आईवडीलांनी तिच्यासाठी घेतलेली मेहेनत मनश्रीनं अगदी सार्थ ठरवली. तिच्या अपंगत्वाला तिने तिच्या यशाच्या आड कधीच येऊ दिलं नाही. प्रत्येक वेळी तिचा positive attitude तिच्या यशाची वाट सुकर करत गेला. खूप अनुभवातून तावून सलाखून निघाल्यावर सोनं जसं जास्त झळाळतं…….तसंच मनश्रीचं आयुष्यही उजळून निघालं. ह्यात तिचे आई-वडील, बहिण, आजी, आजोबा ह्यांचा अखंड सहयोग आणि मेहेनत अजिबात नाकारता येणार नाही.

प्रत्येक प्रसंगात तिचा हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी वाखाणण्यालायक आहे. स्वत:च्या अपंगत्वाचा तिने कधीच बाऊ केला नाही किंवा फायदा सुद्धा घेतला नाही. राष्ट्रपतींच्या हातून “बालश्री” सारखा अत्युच्च पुरस्कार मिळवूनही तिच्यातला साधेपणा तसाच राहिला हे विशेष !!

मध्यंतरी झी टिव्ही वर “ह्याला जीवन ऐसे नाव” मधे मनश्रीवर एक खास एपिसोड झाला तेव्हा तिच्याकडे बघून तिचं, तिच्या आईवडिलांचं खरंच खूप कौतुक वाटलं !! हे पुस्तक वाचून जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो….!! निसर्गावर चक्क मात केलीये ह्या मनश्रीनं….!!

मनश्रीला तिच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनश्रीच्या किडनॅपिंग चा प्रसंग वाचुन तर मुलीला रिक्षात कोंबताना आठवतोच आठवतो.
मनश्रीच्या आईला शि. सा. न.

सुमेध वडावाला अलिकडे असं का लिहीतात ते समजत नाय. मध्ये पार्ल्यात लो.सा.संच्या नोटीसबोर्डावर यांची एक नोटिस वाचली. कसंतरीच वाटलं अगदी. तुमच्या आईबद्दल काही आठवणी सांगा आणि खाली ४ अटी.. आणि अटीत बसणारा प्रसंग असेल तर लेखकाशी संपर्क साधा म्हणे. पुढे लिहिलं होतं की नाही नक्की आठवत नाही- पण योग्य तो मोबदला दिला जाईल असा एकुण सुर होता. लेखक लोक एवढे असे घाऊक इंटर्व्ह्यु घेत फिरत असतील रिसर्च साठी असे वाटले नव्हते. असो. हा इथला विषय नाही, पण ती नोटिस पाहुन फार भयानक वाटलं होतं मला. Sad

खुपच सुरेख पुस्तक आहे हे. वाचताना डोळे पाणावत नाहीत असं होतच नाही. मला नव्याने आणि प्रकर्षाने आकलन झालेली गोष्ट म्हणजे "आपण स्वतः जरी अंध पणावरुन बोलत नसलो तरी ट्रेन मधे, रस्त्यावर वगैरे धक्का लागला की बर्‍याचदा ऐकतो "अंधा है क्या?" आणि हे वाक्य कॅज्युअली घेतो. (मुद्दाम खिल्ली उडवायला नव्हे तर व्यंगावर बोट ठेवणारे हे वाक्य आपण त्याची खोली न जाणता बोलतो/ऐकतो) अजूनही बर्‍याच गोष्टी जाणवतात वाचताना, एक सो कॉल्ड धडधाकट व्यक्ती म्हणून, एक आई म्हणून ज्या आपल्याला पुन्हा आपल्या काही गोष्टींबद्दलच्या दॄष्टीकोनाचा पुर्नविचार करायला लावतात. मी लेकीलाही हे पुस्तक सोप्या शब्दात तिला कळेल असं गोष्टीरुपात वाचून नाही म्हणता येणार पण अ‍ॅब्रिज करुन सांगितलं.

पुस्तक वाचायला घेतलं त्याच्या काही महिने आधी मी लेकीच्या लहान वयात लागलेल्या चष्म्यामुळे अस्वस्थ होते. चष्मा लागला म्हणजे फार काही गंभीर झालय असं मानणारी मी नाही की दिसण्या बाबत काही कॉम्प्लेक्स निर्माण होइल अशी भिती मला नाही. तरिही चष्मा लागल्यापासून एका वर्षात नंबर थोडा वाढला (आधीच नंबर कमी नाही आहे त्यात वाढला) आणि डाँ. नी १२-१३ वर्षा पर्यंत नंबर वाढू शकतो नव्हे थोडा वाढतोच हे सांगितल्यावर टेंशन आलेल होतच हे नाकारता येत नाही. म्हणजे चष्म्यावर किती लहान पणापासून डिपेंडंट रहावं लागेल तिला..! तिच्या बाबाने देखील हे अनुभवलय त्यामुळे अजुनच अस्वस्थ झालेलो आम्ही. हे नंबर वाढ प्रकरण किती नंबरापर्यंत जाऊन थांबेल? चष्मा एकवेळ ठिक आहे पण त्याही पुढे जाऊन काही नशिबात नाही ना लिहीलेलं? ह्या धास्तीने जीव अर्धा झालेला. मला माझ्याबाबतीत काही झालं तर चालेल मी नेईन निभावून पण छोट्या जीवाला का त्रास? ह्या विचाराने घेरुन टाकलेलं त्याचवेळी हे पुस्तक हातात आलं नी खुप बळ मिळालं, माणसाला आशावाद रुजायला काही तरी आधार लागतो तसा मला त्यावेळी ह्या पुस्तकाने मिळाला. Happy

मनश्रीच्या किडनॅपिंग चा प्रसंग वाचुन तर मुलीला रिक्षात कोंबताना आठवतोच आठवतो.>>अगदी अगदी रैना

हा एपिसोड मिही बघीतला Happy

मनश्रीला खूप खूप शुभेच्छा Happy !!!!
खरं तर याच्याकडुन जगण्याची प्रेरणा घेतली पाहिजे

मी सुद्धा पाहीला , तो एपिसोड कदाचित राष्ट्रपतीना तीने हे सुद्धा बोलून दाखवले की मी आता थेट पद्मश्री घायलाचं येईल इथे पुन्हा !

सुमेध वडावाला म्हणजे माझ्या मते सुमेध रिसबूड. ते लेखक आहेत पण त्यांची पुस्तक मी वाचली नाहीत आणि लो. से. सं म्हणजे पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ ही संस्था . या संस्थेत तुमची कुठलीही जाहिरात देण्याकरता नोटीस बोर्ड सारखा काचेचा बोर्ड लावला आहे. त्या संस्थेत अतिशय कमी फी मध्ये तुम्ही तुमची जाहिरात देऊ शकता आणि त्याला रिस्पोन्स खूप उदंड मिळतो. न्यूज पेपर मध्ये जाहिरात देण्या पेक्षा टिळक मंदिरचे रेट खूप म्हणजे खूपच कमी आहेत आणि रिस्पोन्स प्रचंड.
हो टिळक मदिर मध्ये त्या वेळी मी पण माझी एक जाहिरात लावली होती आणि माझ्या जाहिरातीचा वाचनीय नमुना ( पाच सहा ओळीतली जाहिरात-पण वाचनीय ? ) बघून सुमेध वडावाला यांचा मला फोन आला होता कि म्याडम तुमच्या जाहिराती संबधात मी फोन केला नाही पण तुमचा जाहिरातीचा वाचनीय मजकूर बघून तुमची लिहिण्याची हातोटी चांगली आहे अस मला जाणवलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी विनंती करतो कि तुमच्या आईबद्दल काही आठवणी लिहून कळवा. योग्य तो मोबदला दिला जाईल. आत्ता बोला Happy