बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ )

Submitted by अवल on 31 May, 2010 - 09:05

बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) : http://www.maayboli.com/node/16311
बांधवगडचे व्याघ्रदर्शन (२. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16317
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ३. दुसर्‍या दिवशी सकाळीच "कथा सफल-संपूर्ण" ) : http://www.maayboli.com/node/16366
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ४. टायगर शो ! ) : http://www.maayboli.com/node/16543
( फोटोंवर टिचकी मारली तर फोटो मोठे बघता येतील. )

बांधवगडच्या जंगलात प्रवेश करताना आधी एक अगदी छोटीशी नदी लागते. छोटी म्हणजे किती छोटी, तर आपण जीपमधून ती पार करतो रस्त्यावरून ती आपली वाहतेय इतकेच. पावसाळ्यात तिला खुप पाणी असतं म्हणे. तिचं नावही काही तरी फार छान आहे, चरण गंगा ! असं म्हणतात, की जंगला बाहेरची सगळी घाण धुवून मगच ही नदी तुम्हाला आत जंगलात येऊ देते, किती छान कल्पना नाही ?

तर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही जंगलात जायला निघालो. या छोट्या नदी पाशी आलो. अन शेजारच्या झाडावर हा आमचे स्वागत करायला आलेला.

अगदी छोटासा खंड्या ( किंगफिशर ) अगदी त्या छोट्याश्या नदीला शोभेल असा Happy

अन दुसर्‍या झाडावर हा अगदी झाडाच्या पानाच्या आकारा एवढा चिमुकला पक्षी " टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर "

बांधवगडचे सौंदर्य म्हणजे तेथली हरणे. अगदी कळपच्या कळप. संध्याकाळच्या उन्हात गवताच्या रानात ती चमकत होती.

तसेच आम्ही पुढे गेलो. मग थोडी दाट झाडी लागली. पुढे काही जीप्स थांबल्या होत्या. आमचीही जीप थांबली. पुढच्या जीपमध्ये निखिल, माझा लेक होता. त्याने खुणा करून झाडाच्या फांदीवर पंख सुकवत बसलेला गरूड दाखवला. रिसॉर्टवर परत आल्यावर त्याने आधीची "स्टोरी " सांगितली. तिथे हा गरुड आधीपासून होता. ती त्याची "जहागीर" असावी. तेव्हढ्यात तिथे दुसरा गरुड आला. या गरुडाला ते अजिबात खपले नाही. त्या दोघांची टेरीटरी वरून भांडण सुरु झाली. जवळ जवळ १५-२० मिनिटं ही जंग चालू होती. अखेर या गरुडाने त्याला हुसकाऊन लावलच. या मारामारीचा शीण उतरवायला महाराजांनी शेजारच्या नदीत स्नान केले होते, अन आता मस्त उन्हात आपले पंख वाळवत बसले होते. आमची ही जंग बघण्याची संधी हुकली, पण हा राजस पक्षी असा पंख सुकवत निवांत बसलेला तरी बघायला मिळाला, हे ही नसे थोडके !

संध्याकाळी वेळ फार भरभर जातो. तशात संध्याकाळी जंगलात थांबण्याच्या वेळाही कमी आहेत सकाळच्या तुलनेत. आम्ही पुढे निघालो. थोडं अंधारु लागलं. अन जंगलाचे रुप पालटू लागले. झाडांच्या सावल्या खेळ करू लागल्या. संधीप्रकाशात उगाचच कसलीतरी भीती दाटून आली. कोणत्याही नव्या जागेत उजेड असताना आपल्याला काही वाटत नाही. पण अंधार पडू लागला की त्या जागेचे अनोळखीपण अंगावर यायला लागते. तसेच काहीसे वाटू लागले. आमची जीप आता मध्यात असलेल्या तळ्याच्या दिशेने निघाली. शक्यता होती की एखादा वाघ पाणी प्यायला तिथे येईल, किमान काही प्राणी पक्षी दिसतील.

तळ्या काठीतर जत्राच जमली होती. कारणही तसेच होते. जंगलातली दुसरी वाघिण पाण्यात मस्त पाय सोडून बसली होती. खरं तर ती तळ्याच्या त्या बाजूला होती. आमच्यामध्ये बरेच अंतर होते. पण मध्ये कसलाच अडथळा नसल्याने अन सुर्य आमच्या उजव्या बाजुला असल्याने ती छान स्पष्ट दिसत होती.

तळ्याच्या उजवी कडे थोडी लांब हरणे चरत होती. मध्यात एका झाडावर काही पक्षी बसले होते. आपापल्या कामांत असले तरी त्यांची नजर मात्र वाघिण काय करते या कडे होती. हे पक्षीही तिच्या कडेच पहात होते. सर्वांच्या नजराच दाखवत होत्या वाघिण कोठे बसली आहे ते.

थोडावेळ तिने पाण्यात बसून घेतले. वातावरण आता हळूहळू थंडावत होते. म्हणूनच की काय ती आता पाण्यातून उठली. उठून आमच्याकडे पाहत निथळत उभी राहिली.

आता सगळे प्राणी- पक्षी सजग झाले. तेव्हढ्यात आमच्या आवाजाने तिचे आमच्याकडे लक्ष गेले. तिने थोडे गुरकाऊन आमच्या आवाजाबद्द्ल नाराजी दर्शवली. मग तिला आपले अंग सुकवावेसे वाटले, अन शेजारचे गवत तिला उपयोगी वाटले. अन आजपर्यंत अगदी फोटोतही न पाहिलेली पोज तिने दिली. अगदी आपल्यासारखी ती पाठीवर लोळू लागली Happy खरं वाटत नाही ना ? हे घ्या प्रूफ Happy

तिचे पांढरे पोट, भरदार मांड्या, गुबगुबीत पावलं ( सॉरी अ‍ॅडमिन, जरा जास्तच सेक्सी वर्णन होतय ) . ती आपली मस्त एका कुशीवरून पाठीवर मग पुन्हा दुसर्‍या कुशीवर अशी लोळत पडली होती. मला तर वाटलं आता ती एक पाय दुसर्‍यावर टाकून निवांत ताणून देणार. तेव्हढ्यात ती पुन्हा ऊठली. अन आम्हाला समोर ठेऊन पुढे यायला लागली. तिची ही पोज जरी ती तळ्याच्या त्या बाजूला असली तरी आम्हाला जरा धोकादायकच वाटली. समोरून चाल करून येणारी वाघिण ! काय चेष्टा आहे का ?

मग आम्ही निघालो. आमच्या जीपमधले काही अजून तिथे थांबू असे म्हणत होते. आमच्या इतर जीप्सही तिला पहात उभ्या होत्या. पण आमच्या गाईडला काय झाले माहिती नाही, त्याने जीप वळवायला सांगितली. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पुढच्याच वळणावर जीप उजवीकडे वळणार तेव्हढ्यात आमच्या गाईडने डावीकडे हालचाल टिपली. त्याने खुण केली अन चालकाने लगेच अगदी हळू जीप डावीकडे वळवली. अन मग आम्हाला पिवळ्या गवतात लपत छपत येणारे हे महाशय दिसले.

नीट बघितलेत की दिसेल. मध्यात झाडाच्या डावीकडे काळे अस्वल ! दिसले ? नाही तर चित्रावर टिचकी मारा, मग नक्की दिसेल.

ते इकडे तिकडे पहात पहात , अंदाज घेत पाणवठ्याकडे चालले होते.

मुळात अस्वल हा अतिशय लाजाळू प्राणी. त्याला माणसांचे फार वावडे. जरा चाहूल लागली की ते लगेच झाडात दिसेनासे होते. आमच्या मागे अजून एक जीप आली. अन आम्ही का थांबलोय हे पहायला ती जीप जरा जोरातच आवाज करत आली. त्याबरोब्बर ते अस्वल गोंधळले. अन चटकन मागच्या झाडीत नाहीसे झाले. पण तेव्हढ्यात माझ्या कॅमेराने क्लिक क्लिक केले होते Happy

हे म्हणजे अगदी बोनस होते. कान्हालाही आम्ही अस्वल पाहिले होते, पण अगदी अंधूक प्रकाशात. त्याची फक्त काळी आकृती ( सिल्हाउट) दिसली होती. पण आता जंगलातले मोकळे अस्वल पूर्ण प्रकाशात दिसले होते. मागच्या जन्मी आम्ही नक्कीच जंगलचे रहिवासी होतो Happy

आता मात्र जंगलातून बाहेत पडायलाच हवे होते. आता इकडे तिकडे न बघता गाईडने जीप पळवायला सांगितली. पण जंगलच्या राजाचे काही समाधान झाले नव्हते. तो आमच्या जायच्या रस्त्यावर आम्हाला टाटा करायला आला.

जंगलातला हा नुकताच स्वतंत्र झालेला छोटा वाघ होता. आमच्या उजवी कडच्या गवतातून स्वारी फिरायला बाहेर पडली होती. आमच्या बरोबरीने तो चालत होता. अर्थातच आमची अन पुढच्या - मागच्या सर्व जीप्स्ची चाल मंदावली. पुढे हरणांचा कळप निवांत चरत होता. त्यांना या धोक्याची जाणीव झाली नव्हती. एकतर वारा उलट वहात होता, अन गवतात जंगलचा राजा लपून गेला होता.

आता संध्याकाळचे ६.३० वाजले होते. जंगलचे दरवाजे बंद व्हायची वेळ ! आता थांबणे शक्य नव्हते. सगळ्या जीप्स सुसाट निघाल्या. त्यांच्या आवाजाने हरणां लक्ष आता वाघाच्या बरोबर विरुद्ध बाजूला होते. वाघाला हे सगळे अतिशय अनुकुल होते. त्याने दबा धरला....

त्याचा हा अगदी जाता जाता, चालत्या जीपमधून काढलेला फोटोच सांगेल पुढे काय झालं असेल ते. कारण ते पहायला आम्ही थांबलो नव्हतो तेथे !

(पुढे चालू ...)
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679

गुलमोहर: 

मस्त! Happy

लगे रहो आरती. मस्तच वाटतंय आम्हांला वाचायला सुद्धा, तू तर प्रत्यक्ष अनुभवलंयस.

केव्हा जायला मिळणार जंगलात? Smiley

आपले अप्रतिम फोटो, अचूक वर्णन व जंगलाचा निखळ आनंद लुटण्याची वॄत्ती, सार्‍यालाच सलाम ! बांधवगड कान्हाचाच बंधु दिसतोय, जायला हवं.

आत्ताच बांधवगडच्या वाघिणीच्या अकाली निधनावरचा [शिकार ?]मॄत्युलेख या लिंकवर वाचला. खूप वाईट वाटलं व संतापही आला.
http://news.rediff.com/special/2010/may/26/mourning-the-death-of-a-tiger...

आरती, सुरेख लेखमाला Happy हे वाचून नी फोटो बघून एकदा तरी "याची देही याची डोळा" हे बघायलाच हवं लेकीला बरोबर घेऊन असं प्रकर्षाने वाटलं

धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.
भाऊ अगदी खरं. आम्हालाही फारच वाईट वाटलं. या वाघिणीबद्दल पुढे लिहिनच. तिला अन तिच्या कच्च्या-बच्च्यांना पाहता आलं होतं. त्यामुळे अगदी घरचे कोणी गेल्या इतके दु:ख झाले होते तेव्हा Sad
पुढच्या भागांमध्ये टाकते त्यांचे फोटो .

आरती जी ,
धन्यवाद, फोटो दिल्याबद्दल , यातुन तुमचं निसर्ग आणि प्राणीप्रेम नक्कीच दिसुन येतं ....
Happy

मस्त मस्त ! हे सर्व लेख म्हणजे बांधवगडाची प्रत्यक्ष सहलच आहे. माझ्या नजरेतुन सुटले होते. आज सापडले.