पंचम - माझा एक जिव्हाळ्याचा विषय ....

Submitted by prashant_the_one on 24 May, 2010 - 13:19

पंचम उर्फ राहुल देव बर्मन हा अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा, लिखाणाचा, ऐकण्याचा विषय आहे - खास करून त्याच्या निधनानंतर. मात्र सगळीकडचे लेख वाचताना जाणवलं की फार थोड्या लोकांनी भरपूर पंचम ऐकला आहे आणि नुसताच ऐकलं नाहीये तर तो पचवला, जिरवला आहे डोक्यात ! आणि अभिमानाने सांगू शकतो की त्या काही लोकात (स्वयंघोषित) मी आहे !

लहानपणापासूनच आम्ही मुलं मुली मिळून कॉलनी मधल्या गणेश उत्सवात कार्यक्रम करत असताना नकळत पंचम कडे ओढले गेलो. तेव्हा तो आरडी या नावाने जास्त लोकप्रिय होता. त्याचा लोकांमध्ये "पंचमदा" नव्हता झाला. (आजकाल कोणत्याही वय वाढलेल्या बंगाल्याला "दा" म्हणतात. उदा. सानू-दा, अभिजित-दा असो) साधारण ८ वी ते १० वी च्या सुमारास - म्हणजे १९७७-१९७९ सुमारास - त्याचे संगीत आमच्या डोक्यात घुमायला लागले आणि प्रत्येक कार्यक्रम बसवताना लक्षात यायला लागलं की सगळ्यात जास्त वेळ लागतो ती "आरड्याची " गाणी बसवताना. प्रेमानी त्याला शिव्या पण बसायच्या - काय साल्यानी बनवून ठेवला आहे. डोक्याला खुराक आहे साला.... कल्पना करा की १३-१५ वर्षाची मुलं, चांद मेरा दिल, जीवन के हर मोड पे, लेकर हम दिवाना दिल, दम मारो दम अशी दमछाक करणारी गाणी बसवण्याची जिद्द बाळगत होते आणि सामग्री काय तर एक स्वस्तातला गिटार, हार्मोनियम, बोंगो आणि तबला !!! कसं जमावं ते? पण एकदा डोक्यात ते संगीत घुसलं होते तेव्हा परिस्थिती "कळतंय पण वळत नाहीये" अशीच होती. तसल्या परिस्थितीत सुद्धा आम्ही जमेल तशी ती गाणी केलीच !! मजा होती ती गाणी बसवणे, त्यासाठी १०० वेळा ऐकून पीसेस काढणे, त्यावर वादविवाद, कॉर्डस वरून हमरी-तुमरी यात. कारण या धडपडीत शिकायला एवढे मिळत होते की आयुष्याची पुंजी जमा होत होती. संस्कार होत होते...

ही गाणी ऐकतानाच आम्ही इंग्रजी गाणी पण ऐकू लागलो आणि मग पंचमनी उचललेली इंग्रजी गाणी पण ऐकली, त्याला मनसोक्त शिव्या घातल्या त्याबद्दल - एवढे गुण असताना जरुरी काय वगैरे वगैरे... पण नंतर त्याबद्दल त्याला माफ पण करून टाकला ... २५०० गाण्यांमध्ये २५ एक उचललेली गाणी असावीत पण बाकी जे करून ठेवले आहे ते इतके भारी आहे की म्हटलं जाऊदेत असेल बिचा-याची काही मजबुरी ... पुढे जशी हळू हळू घरामध्ये हाय फाय सिस्टम येऊ लागल्या तशी पंचम ऐकण्याची चैन भलतीच वाढली... त्याची गाणी स्टेरिओ वरती मोठ्यांदा ऐकणे हा एक छंद झाला. कधी प्रयत्न करून बघा अजूनही. १९७०-१९८५ मधली पंचम आणि इतर कोणत्याही संगीतकाराची गाणी एकत्र करून एका सीडी वर टाका आणि एका ठरावीक आवाजावर सिस्टीम लावा. इतर संगीतकरांचे गाणे झाल्यावर पंचमचे गाणे लागले की सिस्टम एकदम ड्रग्स वर असल्यासारखी वाजू लागते !!! मला दरवेळी एक प्रश्न पडायचा (अजूनही पडतो) की त्याच्या वेळच्या इतर कोणत्याही संगीतकाराला असं कसं सुचले नाही की याची गाणी एवढी भन्नाट कशी वाजतात आणि माझी का नाही? फक्त चांगले संगीत देऊन उपयोगी नाही तर ते चांगले रेकॉर्ड पण करावे लागते आणि पुढे चांगले मिक्स पण करावे लागते आणि त्यावर संगीतकाराची चांगली पकड असावीच लागते तेव्हा कुठे ते गाणे "चांगले" वाटते. आजच्या डिजिटल काळात सुद्धा रेहमानची गाणी वेगळी का वाटतात याचे उत्तर हेच आहे !!

पुढे मल्टी ट्रेक रेकॉर्ड करतांना एका ड्रम सेट साठी सहा सहा मायक्रोफोन्स लावून त्याचे मिक्सिंग पंचम करीत असे. फक्त संगीतच नाही तर त्यावेळची अत्याधुनिक तंत्रे वापरून आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचा उपयोग तो करून घेत असे. एकावर एक आवाज रेकॉर्ड करता येत नव्हता ६० च्या दशकात तेव्हा लता आणि उषा यांच्या आवाजातला एका पट्टीतला सारखेपणा लक्षात घेऊन एकावेळीस दोघींच्या आवाजात "क्या जानू साजन " गाणे असे रेकॉर्ड केले की कित्येक वर्षे लोकांना लताने एकावर एका दोन आवाजात कसे गायले असेल आणि पंचम नी त्यात काय केला हे कोडे होते !! त्याचा "हटके" स्वभाव आणि काहीतरी वेगळेच करण्याचा स्वभाव अगदी सुरुवातीच्या संगीतातून पण जाणवतो. पाश्चिमात्य संगीतात चालू असेलेले स्केल बदलणे यात वावगे काहीच नसते. पण पडोसन च्या वेळेस "मै चली मै चली" मध्ये त्यानी पहिल्यांदा एका गाण्यात एकदा नाही तर २ वेळा स्केल बदलून तेव्हा धमाल उडवून दिली होती !! हा मुलगा पुढे काय करू शकतो याची परीक्षा घेणारे वडील पण थोरच.... सदेनी, पंचमनी लहानपणी बनवलेल्या १-२ धून घेऊन तेव्हा त्याची गाणी बनवली होती - ए मेरी टोपी पलट के आ - फंटुश , सर जो तेरा टकाराये - प्यासा. त्यांनी विचारल्यावर सदेनी उत्तर दिले होते की तुझ्या पुढील गाण्याचे सिनेमात कसे स्वागत होईल ते मी आत्ता पासून बघून ठेवतोय !! पण जेव्हा पंचमनी स्वतंत्रपणे संगीत देण्याचा निर्णय घेतला होता असं म्हणतात की तेव्हा काही लोकांनी त्याला विचारले की तू तुझ्या वडिलांसारखेच संगीत आमच्या चित्रपटाला दे तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले की माझे वडील हे जरी माझा आदर्श असले तरी माझे संगीत हे माझेच संगीत असेल !! जरी दंतकथा असली तरी त्याच्या संगीतावरून ते खरं पण असेल असे वाटते....

जसे जसे मी एक एक वाद्य जाणून घ्यायला लागलो त्या प्रत्येक वेळा असा विचार करायचो की हे वाद्य पंचमनी कुठे कुठे कसे कसे वापरले आहे? आणि ते त्या वाद्यामधून काढताना जो अनुभव मिळायचा (अजूनही मिळतो) तो कशातही मोजता येत नाही. पंचमची गाणी बसवताना सगळ्यात धमाल येते ती म्हणजे त्याचे "ऑफ बीट" रचना करणे. "ऑफ बीट" म्हणजे जर आपण १-२-३-४ असा ताल धरला तर गाण्याचे बोल किंवा मुझिक पीस हा दुसऱ्या बीट वर चालू होतो किंवा अख्खा तुकडा एक एक बीट सोडून तयार केलेला असतो! अशी किती गाणी सांगू? - ओ मेरे दिलके चैन मधला पहिले किशोर चे हमिंग, चुरा लिया मध्ये पहिला गिटारपीस संपतो तो भाग, रातकली एक ख्वाब मे आई , गुम है किसीके प्यार मे ... एक ना अनेक ! कधी हे गाणे गाण्याचा प्रयत्न करून बघा - सातो बार बोले बन्सी - दिल एक पडोसी है मधले. सुरुवातीस ठीक वाटते पण "तन की लागे मन की बोली" ओळ आली की ऑफ बीट धमाल सुरु होते. तशी या अख्या गाण्यात त्यांनी धमाल केली आहे. त्याचे ऑफ बीट वाजवताना अनेकांची भंबेरी उडताना बघितली आहे मी ...ऐकताना एकदम सोपे वाटते ...वाजवताना मात्र चेहरा पडतो ... त्यावरून आठवले - एका माणसांनी मला काही वर्षांपूर्वी बोलावले की मे एक प्रोग्राम करत आहे ...त्यात वाजवायला येतोस का? तर म्हटला काय करतोयस काय? तर म्हणाला की आर डी बर्मन वर प्रोग्राम करायचा आहे. माझ्या हातातली प्लेट पडायला आली !! याला स्वत:ला धड हार्मोनियम सुद्धा वाजवता येत नाही ...गाण्यातला ओ की ठो कळत नाही आणि निघाला होता आर डी करायला ..काय वाट्टेल ते... असो. थोडे विषयांतर झाले पण एक एक किस्से असतात. तेव्हा मला शिवधनुष्य उचलणाऱ्या माणसांची गत काय झाली असेल याचे थोडे चित्र डोळ्यासमोर आले.... मनात म्हटल आम्ही लहान असताना करायचो तेव्हा अक्कल नव्हती.. आता आली आहे तेव्हा धीर होत नाही करायचा .. प्रचंड मेहनत केल्यानंतर सुद्धा पंचमची गाणी वाजवताना एक प्रकारचा ताण असतो, भीती असते ... आपल्या हातून या गाण्याचा राडा होऊ नये याची !

पंचमचे मला आवडणारे अजून एक वैशिट्य म्हणजे गायक आधी सुरु करतो आणि मग ताल सुरु होतो - उदा. चुरा लिया है तुमने जो दिल को, तुम आगये हो नूर आ गया है, दम मारो दम, दुक्की पे दुक्की हो... आणि परत एकदा - गुम है किसी के प्यार मे... यातल्या ठळक केलेल्या शब्दांवर किंवा आसपास ताल सुरु होतो...मध्यंतरी मला कुणी विचारले की तुला पंचमच्या संगीतातली किंवा त्याच्या वाद्यावृन्दातील ठळक वैशिट्य कोणती वाटतात? तेव्हा खरं तर मोठा प्रश्नच पडला होता. काय काय आणि कसे सांगायचे? तरी पण त्यातल्या त्यात विचार करताना लक्षात आलेल्या गोष्टी अश्या की सर्वप्रथम जर काही असेल तर त्यांनी चित्रपट संगीताची पद्धतच बदलून टाकली. अनेकविध प्रयोग करून संगीत सतत जिवंत ठेवले. त्यावेळच्या आणि नंतरच्या येणाऱ्या श्रोत्यांच्या आणि संगीतकारांच्या पुढे एक मोठा आदर्श निर्माण केला. चित्रपट संगीताला अनेक नवी वाद्ये आणि ती कशी वापरता येऊ शकतात याची उदाहरणे घालून दिली. कशातूनही संगीत करता येते हे सिद्ध केले (पाठीवर दिलेली थाप, गुळण्या करता करता गुणगुणणे (सत्ते पे सत्ता मधल्या दुसऱ्या अमिताभ चा वेळी दिलेले पार्श्वसंगीत), चमचे, ग्लास, वल्हे, भोंगा ...काय वाट्टेल ते). नवीन बीट्स दिले, इलेक्ट्रिक बास रूळवले (आज त्याशिवाय कोणतेही गाणे पूर्ण होत नाही). गिटार मधले अनेक इफेक्ट्स सर्व प्रथम वापरले (flanger, delay, distortion), सिंथ तुफानी पद्धतीने वापरले... आता बास कारण यादी थांबत नाहीये...

अश्या संपूर्ण संगीतकारावर बीट मास्टर, वेस्टर्न म्युझिकवाला असली काहीतरी लेबलं लावून त्याला शास्त्रीय संगीतातले फारसे कळत नाही असले समज पण पसरलेले होते अगदी शेवट पर्यंत !! मला एक कधीच कळले नाही की "मीठे बोल बोले" , "मेरे नैना सावन भादो", "भोर भये पंछी" , "आयो कहासे घनश्याम" , "रैना बीती जाये", "बीतीना बितायी रैना", "घर आजा घिर आयी (त्याचे पहिले गाणे)" ही गाणी शास्त्रीय नाहीत तर काय? केवळ त्यांनी पाश्चिमात्य संगीत जास्त वापरले म्हणजे शास्त्रीय कळत नाही हे कसे काय ? मला न उलगडलेला हा एक प्रश्न... कारण याच समजातून त्याला सूरसंगम पण मिळाला नव्हता ! त्यात काय गाणी केली असती या कल्पनेनीच कधी कधी मी हैराण होतो...

आणि तरीसुद्धा अश्या संगीतकाराचा शेवटचा काळ १९८५ नंतर अतिशय वाईट होता - तेही संगीतकार म्हणून ! १९८० च्या दशकात त्याचे लागोपाठ वीस एक चित्रपट कोसळले होते. आणि फक्त चित्रपटच नाही तर गाणी सुद्धा ठीक ठाकच होती. एखादं गाणं मधेच झकास होऊन पण जायचे पण एकूण चित्र मात्र विदारकच होते. तसं बघितलं तर साधारण १९८३ पासून ते २००० पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीचाच काळ संगीतदृष्ट्या अतिशय वाईट होता. त्यात पंचम सारखा मनुष्य ढासळल्यावर त्यात भर पडल्यासारखेच झाले तेव्हा. त्याच्या हृदयविकारानंतरच्या काळात नवीन संगीतकारांचे नवीन संगीत येऊ घातले होते. असलेले लक्ष्मी-प्यारे, बप्पी "लोहार" इत्यादी मंडळी केवळ धुमाकूळ घालत होती आणि इकडे रफी नंतर भीषण शब्बीर कुमार आणि किशोर नंतर सुमार सानू यांनी रेकायला सुरुवात केली होती... माझे सगळे तरुण वय या लोकांनी संगीत दृष्ट्या नासवले म्हणून त्यावेळची आमची पिढी गजल कडे वळली !! त्यामुळे त्याकाळात जो येईल तो गजल गात असे. पुढे त्याचे पण घाऊक पीक निघाले आणि ते पण खराब झाले (धन्यवाद पंकज). पण चित्रपट संगीतावर पंचमचा जो परिणाम होता तो मात्र राहिला होता. नवीन संगीतकारांच्या गाण्यात तो डोकावत होता. कुठे तरी एखादा तुकडा त्याची याद देऊन जायचा पण ते सुद्धा क्वचितच. नवी लोकं, हत्ती मेल्यावर जसे जंगलात पुढे कित्येक दिवस त्याच्या मढ्यावर इतर प्राणी जगतात, तसे पंचम गेल्यावर त्याच्या संगीतावर जगले ...आणि मग त्यातून स्वत:ची "स्टाइल" म्हणून मिरवत राहिले.. तो नुसताच त्यांना पुरला नाही तर नंतर "रीमिक्स" वाल्याना पण पुरला, आणि पुरत आहे.

पण आजचे संगीतकार बरेच प्रामाणिक आहेत (प्रीतम चा अपवाद वगळता, आणि अन्नू मलिक हा संगीतकारच नाही त्यामुळे प्रामाणिकपणाचा संबंधच येत नाही तिथे) आणि त्याचे ऋण, त्याचा त्यांच्यावरचा परिणाम जाहीर पणे सांगत असतात. मला एक मात्र खूपच वाईट वाटते- पंचम आजच्या डिजिटल युगात पाहिजे होता... सोनू निगम, श्रेया, शंकर महादेवन, सुखविंदर यांच्या बरोबर काय तुफान गाणी केली असती आणि ते पण आजची डिजिटल तंत्र वापरून... आणि त्यात सुद्धा आघाडीवर राहिला असता, बरेच काही नवीन शिकवून गेला असता...

पण या सगळ्या जर-तरच्याच गोष्टी... आयुष्यभर कोण कुणाला पुरलंय? पण पंचम, तुझे संगीत मात्र अनेक आयुष्यांना पुरून उरेल... कधीतरी एखादा तुकडा जुळवायला बसलो आणि अडकलो की तुझी आठवण येते.. मग तुझे एखादे गाणे घेउन त्याचे विश्लेषण करत बसतो आणि अचानक काहीतरी सुंदर शिकायला मिळते....एखादा चांगला तुकडा जमला तरी आठवण येते की पंचम नि हाच तुकडा घेऊन काय वेगळे केले असते? मग मेंदू वेगळ्या दिशेने काम करतो. तुझ्या बरोबरीचे काम कधीच जमणार नाही पण तशी करण्याची झिंग येते त्यातच मी समाधानी आहे !!

पंचम... जसा आकाशातला स्थिर ध्रुव तारा तसा दोन षडजांमधला स्थिर पंचम... कायम दिशा देणारा, स्फूर्ती देणारा...आधार देणारा...माझा आणि माझ्यासारख्या अनेक एकलव्यांचा गुरु पंचम !

गुलमोहर: 

प्रशांत,खूपच छान लिहिलयस रे.. पंचमच्या संगीताविषयी बोलायला शब्द खुजे ठरतात रे.. पंचमचं संगीत अनुभवायचं असतं..

अगदी मनातलं.
पंचमची व्हरायटी तरी किती -कारवाची गाणी बसून ऐकता येणार नाहीत, तर आंधी -इजाजत गुलझार बरोबरचे हे एकाच माणसाने केले का असे वाटावे.
आशा भोसले सिन्ग्स फॉर आरडी असा एक संग्रह एचेमचीने काढला. त्यात गाण्याचे शब्द न ऐकता नुसते संगीत आणि आशाताइंचा आवाज ऐकावा.
शास्त्रीय संगीताचे बोटही त्याने धरले -बुड्ढा मिल गया मधले आयो कहा से घनश्यम किंवा पहिले ऑफिशियल सॉंग - घर आजा घिर आए..दिल पडोसी मधले जूठे तरे नैन.
आवडता विषय मांडल्याबद्द्ल धन्यवाद.

मस्त लिहीलंय... पंचमला मानवंदना .. दुसरं काय?
वेस्टर्नवाला संगीतकार म्हणावा इतका वेस्टर्न... पण शास्त्रीय गाणी अशी की, काय बोलावं?

सुरेख, फारच छान. मला संगीतातलं काही कळत नाही, पण आरडीच्या गाण्यागाण्यात वेगळेपण जाणवतं एवढं नक्की कळतं. माझ्या सारख्या लोकांसाठी तरी असे बारकावे सांगणारे लेख तू लिहावेत असं मला तरी वाटतं.

आरडीवर त्याकाळी टीकाही भरपूर व्हायची. कारण त्याचं संगीत नवीन होतं.. ते त्या काळच्या ढुढ्ढाचार्यांच्या पचनी पडणं अवघडच होतं. त्याच्या संगीतावर त्या काळी पेपरमधे वाचलेली कॉमेंट आठवली.. आरडीचं संगीत म्हणजे वाद्यं फुटेपर्यंत बडवणे. वाद्य फुटेपर्यंत जो काही ठणाणा होतो ते एका चित्रपटाचं संगीत.. फुटल्यावर जे ऐकू येईल ते दुसर्‍या चित्रपटाचं संगीत.

वाह!! आरडीवर एका वेगळ्याच अँगलनी लिहीलेला लेख आवडला!
ते बीट्स नंतर सुरू होणे, बाबुच्या एन्ट्रीच्यावेळेसचे गुळण्यावाले म्युझिक इत्यादी गोष्टी सांगून फार मजा आणलीत लेखात! मी लगेच ऐकले ते म्युझिक आणि आरडीची तर कमाल वाटलीच, पण तुमचीही वाटली, की त्या गुळण्या करतानाच्या आवाजाचे साधर्म्य तुम्ही सांगितलंत..

मजा आली एकदम!

मस्त लेख, आर डी स्टाईल , वेगळेपण सुरेख पणे शब्दबद्ध केलय
सातो बार बोले बन्सी >>>> माझ मोस्ट फेवरेट गाण आहे, बरेच दिवस mp3 शोधत होते त्याची
मरणप्राय आवडत हे गाणमला ,
अशाच बर्‍याच अप्रतिम गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद Happy

हत्ती मेल्यावर जसे जंगलात पुढे कित्येक दिवस त्याच्या मढ्यावर इतर प्राणी जगतात, तसे पंचम गेल्यावर त्याच्या संगीतावर जगले ...आणि मग त्यातून स्वत:ची "स्टाइल" म्हणून मिरवत राहिले.. तो नुसताच त्यांना पुरला नाही तर नंतर "रीमिक्स" वाल्याना पण पुरला, आणि पुरत आहे.
काय लिहितोस मित्रा ? अतिशय उत्तम उपमा आणि पंचमदांना श्रध्दांजली सुध्दा

एकदा एस. डी. म्हणाले होते सकाळि फिरायला जाताना कोणी म्हणाले " ते पहा आर. डी. चे वडील चालले आहेत. " ही तारिफ त्यांना फारच आवडली. घर आल्यावर ते पंचमदांना जवळ घेऊन म्हणाले की आता तु खराखुरा संगीतकार झाला आहेस.

कटी पतंग मधले 'मेरा नाम है शबनम्-प्यार से लोह मुझे शब्बो कहते है' नुसत्या गद्य संवादाचे गाणे केलेय आणि तेही असे की सलग कितीही वेळा ऐकत रहावे. आशाताईना दर गाण्याला आव्हान असणार आर डी ची गाणी गाताना.

हत्ती मेल्यावर जसे जंगलात पुढे कित्येक दिवस त्याच्या मढ्यावर इतर प्राणी जगतात, तसे पंचम गेल्यावर त्याच्या संगीतावर जगले

Proud Happy

जहापनाह तुसी ग्रेट हो Happy
कालच लताचे 'रिमझिम गिरे सावन' ऐकत होतो. एखादे गाणे लताने आणि तेच गाणे रफी किंवा किशोरने गाईले असेल तर बर्‍याचवेळा लता व्हर्जन त्यापुढे थोडे फिके पडते. पण हे गाणं त्याला अपवाद आहे कारण आरडीने दिलेली जबरदस्त ट्रिटमेंट.प्रत्येक कडव्यातल्या पहिल्या ओळीनंतरची जागा वाद्य वापरुन भरण्याऐवजी लताच गुणगुणते,निव्वळ अदभुत!

मस्त लिहीलाय लेख.. मला फार काही टेक्निकल डीटेल्स नाही कळत संगीतातले पण तरी RD प्रचंssssssड आवडतो..

ही ऑफ बीट ची भानगड पहिल्यांदाच कळली.. धन्यवाद.

वॉव काय सही लिहिलं आहे पंचमवर. खरंच आर्डी म्हणजे बॉस होता. काय रेन्ज!! त्याच्या संगिताच्या स्टाईलचे बारकावे मस्त टिपले आहेत.

पंचम आजच्या डिजिटल युगात पाहिजे होता... सोनू निगम, श्रेया, शंकर महादेवन, सुखविंदर यांच्या बरोबर काय तुफान गाणी केली असती आणि ते पण आजची डिजिटल तंत्र वापरून... >>> शंभर टक्के पटलं.

प्रशांत जबरी लेख Happy पंचम ची सगळी गाणी आवडतात. त्याचे काही पिक्चर पिक्चर म्हणून टपराट होते पण गाणी सॉलीड. त्या पैकी हे एक गोमती के किनारे चं गाणं

मस्त लेख आह प्रशांत.
अरे गंमत म्हणजे लेख कुणी लिहिलाय हे मी सुरूवातीला पाहिलंच नव्हतं.
तुझ्या आर.डी.भक्तीमुळे तुला हा लेख इमेल करणार होतो आणि मग लक्षात आलं की च्यायला मी तुझाच लेख ,"बघ काय मस्त लेख आहे" म्हणून तुलाच वाचायला देणार होतो Happy

खुप सुंदर लिहिलेय. आर्डी वर आमच्या आधीच्या पिढीने खूपच टिका केली होती.
अपयशा च्या मोठ्या कालावधीनंतर त्याने, लव्ह ष्टोरी दिला.
इक लडकी को देखा तो ऐसा लगा, एकेक गाणे म्हणजे रत्न, पण नंतर तो उरलाच नाही.

संदीप ... प्रथम ते वाचून तर मी "LOL"लो ...

अरे ही तर आरडी भक्ती ची सर्वात जबरी पावती आहे !! धन्यवाद तुला आणि सर्व मायबोलीकर "आरडी-भक्तगणांना" पण .. पुढील लेख लिहायला इतके चांगले प्रोत्साहन मायबोली सोडून आणखी कुठे मिळाले असते?

मला हा लेख अतिशय आवडला....

लेखक रेकॉर्डिंग शी संबंधित असावा असे वाटावे इतके बारकावे लेखात दिलेत..

मित्रा काय लिहिलेस !!! एकदम झकास!!
छोटे नवाब -जिथून त्याने पदार्पण केले त्याचा ही उल्लेख व्हायला हवा.
पण काहीही म्हणा खूप सखोल व्यासन्गपूर्ण लेख!!

अत्यंत सुंदर उतरलाय लेख, प्रशांत. आरडीच्या पंख्यांमधली मीही एक. त्याचं वेगळेपण न जाणवणारा बहिराच असायला हवा.
अनेक वाद्यांचा मेळ असूनही प्रत्येक वाद्याला त्याचं स्वतःचं स्थान असायचं. ते काढून घेतल्यास गाणं अपुरं, रिकामं, भोक/भोकं पडल्यासारखं होईल... इतकं.
तरीही त्याची गाणी किमान वाद्यांवरही (गल्ली ऑर्केस्ट्रा) ऐकायला तितकीच छान वाटायची.
अगदी आजच्या एआरच्या बाबतीत मी तितक्या ठामपणे हे म्हणू शकणार नाही.
खूप छान लेख.

आर.डी. म्हणजे झिंग, एक जबरदस्त नशा..

जवानी दिवानी मधलं

जाने जा..ढूण्ढता फिर रहा..

हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही. यांत

ए मेरे हमसफर
या ओळीत किशोरच्या साथीत आशाची खालच्या पट्टीतली आलापी येते...कुणीही डोळे झाकून सांगेल, हे बाळ आरडीशिवाय दुसरं कुणीही असू शकणार नाही.

त्या पिअक्चरमधली सगळीच गाणी झिंगवणारी होती.

ए जवानी - ए दिवानी या गाण्यात

हा मेरी रानी., रूक जाओ रानी...यात हा केव्हढा मोठ्याने ओरडलाय किशोर.. आणि गिली गिली आक्का तर भन्नाटच !!

रणधीर कपूरला स्टार बनवायचं काम आरडीनं केलं..

एसडी कडं पण ही हातोटी होतीच कि..

होठों मे ऐसी बात मै दबा के चली आई
हे गाणं गणपती उत्सवात गणपतीच्या मूर्तीइतकंच म्स्ट झालंय... हे रेकॉर्ड कधीच मोडलं जाऊ शकणार नाही..!!

आरडी ची करामत हिंदी चित्रपटसृष्टीला कळाली ती तिसरी मंझिल चित्रपटाने.

ओ हसीना जुल्फोवाली जाने जहां

जबरदस्त !!!!

Pages