बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ३. दुसर्‍या दिवशी सकाळीच "कथा सफल-संपूर्ण" )

Submitted by अवल on 21 May, 2010 - 21:37

बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( १. पूर्वानुभव : आमचे अनोखे बेबीसिटिंग ) : http://www.maayboli.com/node/16311
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( २. बांधवगडची पहिली संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16317
( फोटोंवर टिचकी मारली तर फोटो मोठे बघता येतील. )

जंगलाची अनेक सौंदर्य असतात. जसे तिथले वनस्पती जीवन, पक्षीजीवन आणि प्राणीजीवन. अन प्रत्येक जंगलाचे या तिन्हींबाबत स्वतःचे असे वेगवेगळे व्यक्तिमत्व असते. कान्हा गवताळ रानं आणि मोठी झाडी , अनेक प्रकारचे पक्षी, हरणं, रानडुकरं, कोल्हे, आणि वाघा साठी प्रसिद्ध ! तर बांधवगड दाट झाडी, बांधवगड, गिधाडं, गरुड, हरणं, रानडुकरं, सांबर आणि वाघासाठी प्रसिद्ध !

तर हा बांधवगड !

या डोंगरावर किल्लाही आहे, पण तिथे जाण्यासाठी पूर्व परवानगी लागते. या डोंगराच्या खडकातील कपारी फार महत्वाच्या आहेत कारण इथेच गिधाडांची घरं आहेत. खडकावरचे पांढरे ओघळ त्यांच्या वस्त्यांचे द्योतक आहेत. गिधाडं हे निसर्गाचे साफसफाई कामगार ! त्यांची संख्या जास्त असण, म्हणजे जंगलात शिकार भरपूर होते आहे याचे लक्षण. म्हणजेच निसर्गाची जैवसाखळी तेथे चांगली आहे याचेच हे द्योतक.

या बांधवगडच्या पायथ्याशी जे जंगल वसले आहे तेच आपले डेस्टिनेशन ! आम्ही पहाटे ५.१५ लाच पहिल्या गेटवर पोहोचलो. आमची चौथी जीप होती. म्हणजे आम्ही निम्मी बाजी मारली होती. बरोबर ५.४५ला आतले गेट उघडले. अन आम्ही खर्‍या जंगलात प्रवेश केला. आता तीन मुख्य रस्ते होते. आमच्या गाईडने मधला बी रूट पसंत केला. हा जंगलाच्या मध्यातून जाणारा रस्ता होता.

गाइड्ने बांधवगडची थोडी माहिती सांगितली. तिथली झाडे, प्राणी, पक्षी यांची माहिती सांगितली. आम्ही थोडे पुढे आलाओ. अन जीप चालकाने जीप थांबवली. गाईडने डावीकडे खूण केली. डावीकडे झुडुपांची जाळी होती. छोटे पक्षी उडताना दिसत होते. काही फांद्यांवर बसले होते. तेव्हढ्यात चालकाने जीप थोडी पुढे घेतली. अन आम्ही स्तिमित होऊन बघत राहिलो. त्या झुडूपांच्या जाळी मघून छोटी वाट दिसत होती, अन त्यापुढे एक रमणीय तळे होते. अतिशय सुंदर दॄश्य समोर उभे होते. त्या तळ्याभोवती चार मोर, पाच लांडोरी अन ५-६ हरणं उभी होती. आता लिहितानाही ते दॄश्य डोळ्यासमोर येतय. त्यातही तीन मोर पूर्ण पिसारा फुलवून नाचत होते. प्रियाराधन करताना आपला पिसारा पुढे-मागे करत होते. त्याचा सssssळ सळ्ळ्ळ आवाज अंगावर रोमांच उभे करत होता. माझ्याकडच्या व्हिडिओतही त्याचा आवाज टिपला गेलाय. तळ्याच्या तिन्ही बाजूंना ते तीन मोर नाचत होते. इथे बघू की तिथे की त्या तिथे अशी आमची धावपळ झाली. व्हिडिओ शूटतर अगदी अवघड झाले. बरं ते तीन मोर एकमेकांपासून लांब असल्याने एका फ्रेममध्ये पकडता येत नव्हते. मग जसे जमेल तसे फोटो काढले अन व्हिडिओ शूट केले. माझा लेकही बर्‍यापैकी शूट करतो त्यामुळे दोन्ही शक्य झाले. पण आमचा कॅनन ४० डी अगदीच नवीन होता आम्हाला. त्यामुळे सवय नसल्याने या फोटोत अनेक चुका सापडतील जाणकारांना. पण जंगलचा फिल येईल इतपत बरे काढले असावेत आम्ही फोटो Happy

समोर तळ्याच्या मध्यात हा नाचत होता.

अन डावी कडे हा.


आम्हाला जीपमध्ये बसूनच फोटो काढावे लागत असल्याने फारसे हलता येत नव्हते. पण त्यामुळेच मला वाटतं ही पोज मला पकडता आली, नाही तर फक्त समोरूनच फोटो काढण्याचा मोह झाला असता.

उजवीकडचा मोर नाचत पाठमोरा झाला ( निलाजरा मेला ) अन स्नॅप मारायची संधी मी पकडली, क्षणात तो पुन्हा सामोरा झाला. पण त्या आधीच मी त्याला माझ्या फ्रेममध्ये पकडले होते Happy

तेव्हढ्यात एक हरीण पाणी प्यायला तेथे आले. मग हरीण, मोर अन लांडोर असे तीघं मला फारच भावले.

थोडे पलिकडे एकच हरीण आपली नुकतीच आलेली शिंग न्याहाळत होते, बहुदा माझ्या लेकाच्याच वयाचे असेल, आलेली इवलीशी दाढी शोधणारे Wink

अन उजवी कडे हे तीन मित्र. ये दोसती, हम नही छोडेंगे असंच काही गात ......

कित्ती वेळ आम्ही तेथेच थांबलो. जवळ जवळ २०-२५ मिनिटं. मग आमचा गाईडच म्हणाला, " आगे चलेंगे " आम्ही जणू विसरूनच गेलो होतो की जंगलात अजूनही काही बघण्या सारखे आहे ते.

आम्ही पुढे निघालो. मनातून ते दॄश्य काही हलत नव्हते. आता आम्ही बी रुट्च्या शेवटी आलो. सर्व रस्ते इथे एकत्र येतात. गेटपासून इथपर्यंत आपला रूट बदलता येत नाही पण मग येथून परत कोणत्याही मार्गाने परत फिरता येते. तिथे आम्ही सर्व थांबलो. तिथे काही दुकानं आहेत तेथे बांधून घेतलेली न्याहारी खाल्ली. चहा-पाणी झाले अन परतीच्या वाटेला लागलो. मधल्या काळात गाईडने वाघ कोठे दिसला आहे, कोठे दिसण्याची शक्यता आहे , हे इतर गाईड अन जीप चालकांशी बोलून निश्चित केले. अन आम्ही सी रूटला लागलो.

आता उन जाणवू लागले होते. थोडे पोट भरले असल्याने काहीशी गुंगी चढू लागली होती. तशात पहाटे चारला उठलो होतो ना ! जंगलाची निरव शांतता, वरून पेटलेले ऊन , जीपच्या स्पीडमुळे लागणारे गरम वारे.... आमची विकेट अगदी पडायला आली होती. आता पटकन रिसॉर्टवर पोहचू असे झाले होते अन तो क्षण आला.....

चालकाने जीप रस्त्याच्या कडेला उभी केली. आम्ही आजूबाजूला पाहिले. एक क्षण काहीच वेगळे जाणवेना. अन एकदम समोरच्या झाडीत लक्कन काहीतरी हलले. झाडांच्या मातकट फांद्या, त्यांच्या काळ्या सावल्या अन खालचे पिवळे गवत यांच्यात "तो" अगदी लपून गेला होता. तुम्हाला दिसला वरच्या चित्रात ? नीट बघा. ( फोटोवर टिचकी मारून तो मोठा करून बघा ) आता दिसला ना ?
शिकार करून त्याचाही ब्रेकफास्ट चालला होता. तोड खाली - वर- थोडे तिरके करत लचके तोडणे चालू होते. आमच्या पासून साधारण तीस एक फुटावर असावा. पण एकदम झाडीत असल्याने तो निवांत होता. इतक्यात त्याला आमची चाहूल लागली. अगदी दोन क्षण त्याने आमच्या कडे "पाहून" घेतले, अंदाज घेतला,

अन मग पुन्हा आपल्या खाण्याकडे वळला. मग मात्र आम्ही तिथून निघे पर्यंत काही त्याने आपली खाद्यसमाधी सोडली नाही. पण मला ते दोन क्षण खुप मोठा आनंद देऊन गेले. तुम्हाला ..... ?

(....पुढे चालू )

बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ४. टायगर शो ! ) : http://www.maayboli.com/node/16543
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ५. दुसरी संध्याकाळ ) : http://www.maayboli.com/node/16598
बांधवगडचे व्याघ्रदर्शन ( ६. कल्लू आणि बल्लू ) : http://www.maayboli.com/node/16679

गुलमोहर: 

मोर, हरणे आणि वाघोबासुध्दा..... काय डौल आहे एकेकाचा..... पिसारा फुलवून नाचणारे मोर, त्या मोराकडे दुर्लक्ष करून पाणी पिणारी लांडोर, शिंग न्याहाळणारे हरीण, तीन दोस्त आणि राजेशाही थाटात बसलेले वाघोबा.... सगळेच मस्त! वर्णनपण खुसखुशीत! Happy

आरतीजी, मस्त अनुभव !!
हरीण आणि मोराचा एकत्र फोटो ...खासच !
Happy
आमच्या घराच्या आजुबाजुला शेतीच असल्यामुळे खुप वेळा मोरांना नाचताना,फिरताना पहायला मिळालयं,
पण अलिकडे त्यांची हत्या करणारयांत खुप वाढ झाली आहे ....याच खुप वाईट वाटतं ,राग ही येतो !

मोराचा पाठमोरा पिसारा फुलवलेला फोटो आणि त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब... एकदम अफलातून

आरती... तिन्ही लेख मस्तच... दिल जंगल जंगल हो गया Happy

मस्तच....पण सहज मनात एक प्रश्न आला म्हणुन विचारते >>> तुमची जीप कशी असायची जंगलामध्ये फिरतांना? तो पण एक फोटो टाका कि इथे .. अर्थात शक्य असेल तर...

अगं एकदम ओपन जीप्स होत्या. त्यामुळे मजा यायची. काहींना भीती ही वाटायची.
jeep.jpg
हा फोटो असा टाकताना भारी वाईट वाटलं . का ? अगं क्रॉप करताना खालचा मस्त वाघ कापावा लागला. पण ठिक आहे पुढच्या भागात येईल त्याचा फोटो. Happy

धन्यवाद्....पण कसले भारी वाटत असेल ना! पण खरच काही भिती नव्ह्ती का ग? म्हणजे एखादा वाघ खरच आला असता तर्....बापरे..

>>>कसले भारी वाटत असेल ना!<<< अगं वाटतच भारी म्हणूनतर सारख पुन्हा जावं असं वाटतं Happy
>>>पण खरच काही भिती नव्ह्ती का ग?<<<छे गं अजिबात वाटत नाही भीती. इतकं एक्सायटींग असतं ना ते भीती बीती सगळी पळून जाते.
>>>एखादा वाघ खरच आला असता तर्....बापरे.. <<< अगं वर नाही का म्हटलं >>> क्रॉप करताना खालचा मस्त वाघ कापावा लागला.<<< तो आला म्हणूनच तर जीपमधले सगळे मागे वळून पहाताहेत, फोटो काढताहेत Happy
तुला काय वाटलं ते आमचा फोटो काढताहेत ? Wink