सुधागडावरील विषारी थरार

Submitted by आशुचँप on 14 May, 2010 - 14:38

गेल्या महिन्यात सुधागडला जाण्याचा योग आला. सुधागड हा अष्टविनायकायतील पालीजवळ असलेला एक बलदंड किल्ला. असे म्हणतात की शिवप्रभूंची राजधानीसाठी या किल्ल्याचे नाव यादीत होते पण स्थानमहात्म्यामुळे रायगडाने नंबर पटकावला. नंतर हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. असो.

sudhagad.jpgसुधागड, पाच्छापुर गावातून

मी आणि माझ्या धाकट्या भावाचे काही मित्र असा लवाजमा शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पुण्यातून निघाला. वाटेत दोन-तिन ठिकाणी चुकत माकत मध्यरात्रीच्या सुमारास पाली गावात दाखल झालो. तिथल्या धर्मशाळेत पथारी पसरली आणि सकाळी गणरायाला एक नमस्कार ठोकून पाच्छापूरच्या दिशेने सुटलो.
माझ्याबरोबरची सगळीच मंडळी कॉलेजवयाची आणि भयंकर उत्साही. त्यामुळे ते टणाटण उड्या मारत गड चढून जायला लागले. त्यांच्या वेगाने मला जाता येईना. त्या ग्रुपमध्ये मी बराच ट्रेकिंग करत असल्याने एकदम भारी असल्याचा गैरसमज होता. आता त्याला बट्टा लागणार असे जाणवले आणि जिवाच्या कराराने किल्ला चढून गेलो.
हातात वेळ भरपूर होता तेव्हा दुपारचे खाणे पिणे उरकून खास पुणेरी वामकुक्षीचा बेत केला आणि तो तडीला न्यायचा या उद्देशाने आडवेही झालो. पण त्या दिवशीची दुपार काहीतरी विलक्षणच घेऊन येणार होती ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती.
मी मस्त सॅक डोक्याशी घेऊन वारा अनुभवत वाड्याच्या बाजूला सावलीत पहुडलो होतो तोच एक दुसरा भटक्यांचा गट बाजून गेला. आणि त्यांच्यातली चर्चा ऐकून एकदम ताडकन उठून बसलो.
त्यांना गडावरच्या शंकराच्या मंदिरात एक कुठलातरी साप दिसला होता म्हणे. तोही शंकराच्या पिंडीपाशी आणि तो दिसणे किती भाग्याचे आहे अशा आशयाचे काहीतरी.
मी तातडीने सगळ्यांना हलवले आणि ही गम्मत सांगितली. आधीच ते उत्साही आणि त्यातून साप पहायला मिळतोय हे कळताच दुपारची विश्रांती घेण्याचा बेत केव्हाच मागे पडला आणि आम्ही त्या मंदिराकडे धावलो. दरम्यान, तिथल्या वाड्याचा व्यवस्थापक कम पुजारी होता त्यालाही कळले. तोही आमच्याबरोबर निघाला.
temple.jpgशंकराचे मंदिर

मंदिराबाहेर बूट काढून अनवाणी पायांनी आत गेलो. बाहेरच्या उजेडातून एकदम आत गेल्यामुळे एकदम अंधारी आल्यासारखे झाले. पण डोळे थोडे सरावल्यानंतर इकडे तिकडे पहायला सुरूवात केली. साप कुठे दिसेना, बर मोठा साप आहे की बारके पिल्लू, विषारी-बिनविषारी काहीच माहिती नव्हते त्यामुळे जरा बिचकत पहात होतो.
तेवढ्यात त्या पुजार्‍यालाच दिसला. पिंडीच्या शेजारी एक शेंदूर फासलेला दगड होता त्याच्या आणि भिंतीमधल्या सांदटीत त्या सापाने स्वतांला कोंबून घेतले होते. मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या उजेडात जवळ जाऊन पाहिले तर एकदम धसकाच बसला. अंगावरच्या गडद हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्या आणि त्रिकोणी डोके..शंकाच नाही.. हा तर बांबू पीट व्हायपर आहे..मराठी नाव चापडा..अत्यंत जहाल विषारी.
मला अशा ठिकाणी अशा जागी पीट व्हायपर सापडेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मला वाटले होते जास्तीत जास्त धामण सापडेल पण हे प्रकरण भयानक होते.

IMG_6163.jpgसांदटीमध्ये बसलेला चापडा

मी पटकन सगळ्यांना मागे जायला सांगितले. साप अजिबात हालचाल करत नव्हता त्यामुळे मी जरा जवळ जाऊन निरिक्षण केले. त्या ट्रेकला मी माझ्या भावाचा एसएलआर कॅमेरा घेऊन गेलो होतो त्यामुळे फोटोग्राफीचे वेड संचारले होते. मनात आले एवढ्या दिवसा ढवळ्या इतक्या उघड्यावर इतक्या जवळ पीट व्हायपर दिसतोय तर त्याचा फोटो काढण्याची संधी का बरे दवडावी. धावतपळत बॅगेपाशी जाऊन कॅमेरा घेऊन आलो. सुदैवाने साप आहे त्याच जागी होता. मी दोन तिन फोटो काढले पण त्या सांदटीमुळे त्याचा पुर्ण आकार येत नव्हता. मी तसे त्या पुजार्‍याला सागितले. बाकिचे सगळे माझे ऐकून बाहेर गेले होते पण पुजारी माझ्या शेजारीच उभा होता.
तो म्हणाला "एवढेच ना, थांबा"
असे म्हणत त्या महान माणसाने चक्क हाताने तो शेंदरी दगड सरकावला.एकदम सहजपणे.
मी ओरडलोच, "अहो काय माहितीये का तो विषारी साप आहे. एवढ्या जवळ नका जाऊ."
पण त्या माणसावर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. पण तो साप थोडा हलायला लागला होता. तो दुसर्‍या आडोश्यामागे जाण्यापुर्वी चान्स घ्यावा म्हणून मी कॅमेरा सज्ज करून पुढे गेलो आणि अजून काही फोटो घेतले. तरीही माझ्या मनासारखा काही फोटो येईना. गाभार्‍यात अंधार असल्याने फ्लॅश टाकावा लागत होता आणि त्यामुळे फोटोची गंम्मत जात होती.

_MG_6174.jpg

"हा बाहेर असता तर जास्त मज्जा आली असती." अस्मादिक.
"मग काढूया की त्याला बाहेर,"
मग बाहेर गेलो, दोन मस्त काटक्या तोडून आणल्या आणि त्याला हुसकावून बाहेर काढायला सुरूवात केली. आणि एवढावेळ शांतपणे आमचे औद्धत्य सहन करणाऱया त्या विषधराने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. त्याने त्याची जागा सोडून एकदम चपळपणे त्या गाभार्‍यात इकडे तिकडे पळायला सुरूवात केली.
आता मात्र माझे धाबे दणाणले. आम्ही दोघेही अनवाणी आणि पायात एक अत्यंत विषारी साप, तोही चवताळलेला अशा अवस्थेत काय वाटते ते एकदा अनुभवावाचे.
तो साप इतक्या जलद हालचाली करत होता की त्याला काटकीने दाबून ठेवणे पण शक्य नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्या पुजाऱयाला प्रसंगाचे गांभिर्य अजिबात लक्षात आले नव्हते. तो नाग किंवा फुरसे नाहीये एवढे त्याच्या दृष्टीने पुरेसे होते.
"मी असे करतो मी त्याला आतून बाहेर ढकलतो आणि तुम्ही बाहेर थांबून त्याला पकडा. "
मी ......?????
आम्ही जिवंत सापाची विटी-दांडू करून खेळतोय आणि त्याने कोललेल्या सापाला मी पकडतोय असे काहीबाही चित्र माझ्या डोळ्यासमोर सरकले.
अर्थात त्या दाटीवाटीच्या जागेत दोघांनी उभे राहून हालचाल करणेही अवघड होते त्यामुळे मी पटकन बाहेर येऊन सज्ज झालो. पुजारीबुवा खरेच महान होते. त्यांनी सापाची पळापळ शांतपणे पाहीली आणि तो दाराच्या जवळून जाताच पटकन काठीने त्याला बाहेर ढकलला. त्यांचे टायमिंग अफलातून होते.
सापाला काही कळायच्या आत तो एकदम उघड्यावर आला होता आणि काठीने मी त्याला दाबण्यात यशस्वी झालो होतो.
_MG_6182.jpg_MG_6190.jpgसापाची चिडखोर मुद्रा

त्याला या पराभवामुळे भयंकर संताप आला आणि त्याने आणखी आक्रमक होऊन आ वासला. तो आपल्या शत्रूला चावा घेण्यासाठी धडपडत होता आणि त्याचे विषारी दंत पाहून मी थरारलो.
bite.jpg

मनात आले आपण जरा जिवावरचेच धाडस करतोय. जर तो मला किंवा त्या पुजार्‍याला चावला असता तर उपचारासाठी आख्खा गड उतरून पाच्छापूर मग पाली. तिथे लस उपलब्ध नसेल तर थेट खोपोली. तोपर्यंत टिकाव धरला नाही तर???.
एकदम मनावर भितीचा पगडा बसला आणि हात सैल पडला. ती संधी साधून त्या सापाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा धावत जाऊन त्याला दाबला. दरम्यान मी माझा कॅमेरा हर्षवर्धनकडे दिला होता. त्याने त्याच्या परीने फोटो काढण्याचा सपाटा लावला होता. मध्येच माझ्याकडून परत एकदा ढिलाई झाली आणि साप फोटो काढणाऱया हर्षाकडे झेपावला. त्याची एकदम पळता भुई थोडी झाली. पण त्याने माझे समाधान होईना. शेवटी मी त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि अगदी ऑस्टीन स्टीव्हनच्या थाटात फोटोग्राफी केली.
एवढे झाल्यानंतर मग मात्र त्या सापाला जास्त त्रास दिला नाही. दोन काठ्यांनी उचलून त्याला झाडीत नेऊन सोडले. सळसळ करत ते हिरवे प्रकरण क्षणार्धात गायब झाले.

going.jpgpujari.jpgपुजारी आणि मंदिर

मग मागे येऊन बूट घालताना लक्षात आले अरे एवढा वेळ आपण अनवाणीच होतो. शांतपणे पाणी प्यायलो, घाम पुसला आणि म्हणालो.. "दुपारची झोप राहून गेली ना राव."

गुलमोहर: 

खतरनाक भाउ. धाडस आहे. माझे इंडीयाना जोन्स सारखे आहे साप आजिबात आवडत नाही. लै भीती वाट्ते.
मी तर टीवी वरील सापचे प्रोग्राम पण नाही बघत.

हरणटोळ किंवा गवत्या साप विषारी नसतो. तो अगदीच बारीक असतो. (आदीवासी तो खातातही. (संदर्भ गोईण) तसे बहुतेक साप खाता येतात. विष फक्त त्याच्या डोक्यात असते. (संदर्भ मॅन व्हर्सेस वाईल्ड) )
तो बहुतेक झाडावर असतो आणि अपघाताने डोक्यावर पडू शकतो. तो मेंदू खातो वगैरे गैरसमज आहेत.
निलमकुमार खैरे यांचे साप नावाचे सचित्र पुस्तक, नाममात्र किंमतीत उपलब्ध आहे. ते प्रत्येक हायकर ने संग्रही ठेवावे. शक्य असल्यास ग्रामीण भागातील लोकाना, ते भेट म्हणून द्यावे.

सर्पदंशावरील उपचारांची उपलब्धता, काळजी करण्यासारखी असली, तरी खुप वेळा, मानसिक धक्क्यानेच माणूस दगावतो.

फोटो मस्तच आले आहेत पण नानबाशी सहमत... आणी हो.. माझेही अश्विनीमामीसारखेच आहे.. म्हणजे सापाच्या बाबतीत मीसुद्धा इंडियाना जोन्सच्या पंगतीतला..:)

माझ्या २००२ च्या भारतवारीत आम्ही कोकणातल्या मार्लेश्वर या स्वर्गिय ठिकाणी ऐन पावसाळ्यात गेलो होतो. तिकडेसुद्धा डोंगरावर गुहेत शंकराचे देउळ आहे. त्या अंधार्‍या ओलसर छोटाश्या गुहेत आम्ही शुज काढुन अनवाणी आत गेलो व शंकराच्या पिंडीचे दर्शन घेउन बाहेर आलो. बाहेर आल्यावर आम्हाला तिथे नेलेल्या आमच्या मित्र मैत्रीणींनी सांगीतले की आत गुहेच्या छतावरच्या कडेकपारीत खुप नाग असतात.. ते ऐकल्यावरच मला दरदरुन घाम फुटला.. ५ मिनीटांपुर्वीच त्याच गुहेत आम्ही बिनधास्त अनवाणी चालत होतो...

आशु, तुमचे साहस खरोखर वेडेपणाचे होते. पुन्हा असे करू नका.

मुकुंद, काळजी करू नका. मार्लेश्वरमधले नाग चावत नाहीत किंवा इतर कसलाही त्रास देत नाहीत. तिथे श्रीशंकराचे वास्तव्य अस्ल्याकारणाने. तिथे पिंडीवर नाग दिसणे अत्यंत भाग्यवान समजले जाते.

कवठीचाफा म्हणून एक मायबोलीकर आहे, तो सर्पमित्र आहे. त्याने जुन्या मायबोलीवर साप पकडण्याचे आणि त्याना जंगलात सोडण्यावर खूप छान लेख लिहिला होता.

अजून एक गंमतः (ज्याचा विश्वास आहे त्यानी वाचावे. इतरानी नाही वाचले तरी चालेल. उगाच इथे वादविवाद नकोत) हातावर जर गरूड रेष असेल तर साप व नाग त्या व्यक्तीला वश असतात. हवा तसा साप ते लोक पकडू शकतात.एल टी किंवा अजून कुणी जाणकार याबद्दल अधिक सांगतील.

मुकुंद, काळजी करू नका. मार्लेश्वरमधले नाग चावत नाहीत किंवा इतर कसलाही त्रास देत नाहीत. तिथे श्रीशंकराचे वास्तव्य अस्ल्याकारणाने.>>>>>>> Lol
म्हणजे सुधागड चे हिरवे चावतात पण मार्लेश्वरांचे नाही ?? सुधागडात शंकराचे वास्तव्य नाहीये वाटतं? त्या पुजार्‍यांना आणि भाविकांना कळलं तर फारच वाइट वाटेल नाही त्यांना?

वैद्य, तुम्ही मार्लेश्वरला गेलेला नाहीत का किंवा त्याबद्दल ऐकले नाहीत का?? तिथे अक्षरशः शेकड्याने नाग फिरत असतात.. मात्र अजून एकदाही नाग चावून काही अपघात घडल्याची घटना झालेली नाही.

खोटं वाटल्यास तुम्ही खात्री करून घेऊ शकता. (प्रत्यक्ष तिथे जाऊन अथवा तिथे गेलेल्या लोकाना विचारून).. कुनाच्या श्रद्धेचा भाग असेल वा नसेल..

मुद्दाम वगैरे सापाला त्रास दिला असे मलातरी हा सचित्र वृत्तांत (एकदा) वाचून वाटले नाही , म्हणुन पुन्हा वाचला. तरीही जरा अतिच झालं हो असं वाटलं. एनीवे आम्हाला फुकटात अति झालं किंवा नाही हे म्हणायला काय जातय. Happy

आणि निषेध नोंदवणार्‍यांचे डिस्कवरी, नॅटजीयो आणि अ‍ॅनिमल प्लॅनेटबद्दल काय मत?

रैना.. मला वाटत नाही की डिस्कवरी, नॅटजीयो आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट वाले फोटो किंवा व्हिडीयो काढण्यासाठी प्राण्यांना डिवचून एका जागून दुसर्‍या जागी वगैरे नेतात.. हे फोटोग्राफर्स अक्षरशः तास-तास, दिवस-दिवस एखादा फोटो किंवा शूटींग मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, एका जागी न हलता बसून रहातात. मागे एकदा डिस्कवरी की अ‍ॅनिमल प्लॅनेट वरच चित्त्यावरची एक फिल्म कशी बनवली हे सांगण्यासाठीच फिल्म बनवावी लागली, कारण धावत्या तसेच स्थिर चित्त्याचे शूटींग करण्यासाठी अफाट कष्ट पडले होते.
तो साप बाहेर येईपर्यंत किंवा मनासारखी फ्रेम मिळेपर्यंत चिकाटाने थांबून फोटो घेतले असते तर ते नक्कीच स्तुत्य आहे. साप चिडलाही नसता कदाचित. ह्या केस मधे जर चिडून त्यासापाने ह्यांच्यापैकी कोणावर, त्या पुजार्‍यावर किंवा आणखी कोणावर हल्ला केला असता तर तए फोटो किती महागात पडले असते ?

बाय द वे, पुढच्या जन्मी नानकोंडा होण्याच जास्तच मनावर घेतलय वाटत
>> हो .. आणि त्यासाठी ह्या जन्मीच प्रॅक्टिस सुरु केली आहे (प्राणी/माणसं गिळण्याची नाही हां.. ह्या जन्मी फक्त झोपण्याची Wink )

म्हणजे सुधागड चे हिरवे चावतात पण मार्लेश्वरांचे नाही ?? सुधागडात शंकराचे वास्तव्य नाहीये वाटतं? त्या पुजार्‍यांना आणि भाविकांना कळलं तर फारच वाइट वाटेल नाही त्यांना?
>> बुवा!! Lol

म्हणजे सुधागड चे हिरवे चावतात पण मार्लेश्वरांचे नाही ?? सुधागडात शंकराचे वास्तव्य नाहीये वाटतं? >>>
मार्लेश्वराला जाणारे लोक गरुड् रेषा की काय ती हातावर गोंदवून मग जात असतील! सापाला रेष दाखवायची की साप सुम्म ! मिळाला क्लियरन्स ! Lol

मार्लेश्वराला जाणारे लोक गरुड् रेषा की काय ती हातावर गोंदवून मग जात असतील! >> Lol
माझ्या हातावर गरूड रेष नक्कीच नाही, तरीपण मी साप पकडलेले आहेत आणि मार्लेश्वरला पाच सहादा जाऊन पण नाग काही मला चावला नाही. . तिथे नाग सुम्म पळत बिळत नाहीत... उलट शंकराच्या गुहेमधे अत्यंत आरामात फिरत असतात. उलट त्याना बघूनच कित्येक भक्त गण पळत असतात. म्हणून म्हटले ना की आधी खात्री करून घ्या. वरती मुकुंद आणि श्री यानी लिहिलेच आहे.

कोकणातल्या वन ऑफ द बेस्ट पर्यटन स्थळापैकी एक मार्लेश्वर आहे. कोकणात आलात तर नक्की भेट द्या. नागाचे फोटो काढायला फारच सोपे पडेल. आणि पावसाळ्यामधे इथे मस्त धबधबा असतो.

मला पण हे गरूड रेषेचे आधी माहित नव्हते परवा इंडिया टीव्हीवर पाहिले.

बाकी, कोकणात राहिल्यामुळे साप व नागाची आता विशेष भिती वाटत नाही. घरात साप निघणे, विंचू निघणे (त्याच्याकडून एकदा प्रसाद घेपण घेतलाय Happy ) हे नित्याचेच झालेय. फेब्रूवारी माहिन्यात शेजारच्याच्या घरात धामण निघाली होती. मागच्या महिन्यात घराजवळच्याच एका शाळेमधे भला मोठा नागोबा फणा काढून बसले होते. पोराची परीक्षा रद्द करायची वेळ आणली होती. सर्पमित्र आले आणि नागोबाला पिशवीत घालून घेऊन गेले. Proud नागासारखा डौलदार प्राणी दुसरा कुठला नसेल.

आम्ही आधी राहत होतो त्या भागापेक्षा या भागात साप अधिक आहेत. आधी हा भाग जंगल असल्यामुळे असेल, मात्र कोकणात सापाला/नागाला "राखणादार" मानतात त्यामुळे मारत नाहीत. त्यामुळे जुने जाणते लोकसुद्धा साप पकडून दूर कुठेतरी नेऊन सोडतात. साप चावल्यानंतर वापरण्यात येणारी "गावठी औषधे" खूप प्रभावी असतात, मात्र हल्ली ताबडतोब सिव्हिलमधे घेऊन जाणेच पसंद करतात. आता पावसाळा आला की सर्पदंशाच्या केसेस मधे वाढ होते. प्राथमिक आरोग्य केंद्रामधे देखील उपचाराची सोय करण्यात आलेली असते.

रैना, अगं सापाला त्रास दिला हा मुद्दा नाहिये गं.... जर साप चावला असता तर ते किती जीवाशी बेतले असते!!! चेष्टेचा अथवा मस्करीचा विषय म्हणून नव्हे.. अनोळखी ठिकाणी जाताना साप विंचू पासून कायम सावध रहावे. शेवटी तो त्याचा "एरिया" आहे आपण तिथे उपरे म्हणून जात अस्तो. त्याच्या नॅचरल वागण्याला आपण बदलायचा अधिकार नाहिये.

साप हा मुळात खूप भित्रा प्राणी आहे. शक्यतो दुसर्‍याच्या वाटेला जात नाही, त्याला जर डिवचले गेले तर मात्र स्वसंरक्षणासाठी तो चावे घेतो. विषारी सापापेक्षा बिन विषारी सापाची संख्या अधिक आहे. आणि तरीही फक्त साप चावला या भितीने कित्येक लोक जीव गमावतात. व्हायपर हा साप विषारी आहे (सुदैवाने इथे तो साप विषारी आहे हे ओळखले होते म्हणून थोडीतरी सावधगिरी बाळगली गेली) त्यामुळे त्यापासून सावध राहणे चांगले. कारन, साप चावल्यानंतर व्यवस्थित उपचार सर्वत्र मिळतात असे नाही. त्यामुळे असे साह्स जीवावर बेतण्याचे चान्सेस जास्त असतात. योग्य प्रशिक्षण घेतलेले सर्पमित्र असे विषारी साप देखील आरामात हाता़ळू शकतात. (हे प्रत्यक्ष पाहणं खूप ग्रेट वाटतं.) जेव्हा तो साप फुत्कारत असतो ना तेव्हा अंगावर काटे उभे राहतात.

मी धामण वगैरे असेल तर पकडू शकते (ती जर खाऊन सुस्तावली असेल तर अन्यथा ती फार चपळ प्राणी आहे.) बाकी साप नाग अजून पकडलेले नाहीत. पकडले तर मी पण इथे फोटू जरूर टाकेन. Happy

मला वाटत नाही की डिस्कवरी, नॅटजीयो आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट वाले फोटो किंवा व्हिडीयो काढण्यासाठी प्राण्यांना डिवचून एका जागून दुसर्‍या जागी वगैरे नेतात.. >>> नाही हां. त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून, कित्येकदा सापाचे तोंड/इतर अवयव (दुसरे चांगले उदाहरण मगरीचे देता येइल) नीट जवळुन दाखवण्यासाठी हे लोक सुद्धा सापाला डिवचून वळचणीतुन बाहेर काढून धरायला बघतात. एकदा जॅग्वार मादीवर काही कार्यक्रम दाखवत होते. ती गर्भार मादा झाडावर बसली असताना ह्या लोकांनी कुठलेसे इंजेक्शन दिल्यावर झाडावरुन खाली पडली होती. ही चूक झाली असे त्यांनीच indirectly सांगितले होते. नंतर तिचं एक पिल्लु अधु जन्माला आलं होतं बहुतेक (नक्की आठवत नाही).

सापांना काठीने डिवचावे ह्याचे हे समर्थन अजिबात नाही पण डिस्कवरी, नॅटजीयो आणि अ‍ॅनिमल प्लॅनेट ह्यांविषयी रैनाने मांडलेल्या मुद्याला अनुमोदन देण्यासाठी हा पोस्टप्रपंच.

अगदी अगदी सिंडे.

हे वरील तिन चॅनल सुद्धा प्राणी राईटस violation / नैतिकता (असे काही असलेच तर) वगैरेच्या सीमारेषा फार काही फॉलो करतात असे नाही. मुळातच मानवी संशोधनाच्या, जनकल्याणाच्या नावाखाली वाट्टेल ते प्रयोग चाललेले असतातच, आणि आपणही ते चवीने पाहुन वरुन सासबहु सिरीयल पाहण्यापेक्षा, कित्ती कित्ती चांगली आपली अभिरुची यात समाधान मानुन घेत असतोच. Happy

ही सर्व एक्सपीडीशनस स्पॉन्सर कोण करतं ?या चॅनेल्सचे अर्थकारण कसं चालतं ? तिन, तिन निसर्गपरायण चॅनेलच्या एकमेकांशी असलेल्या स्पर्धेमधील वातावरण खरंच निकोप असते?
असे कार्यक्रम सादर करताना ते खरंच तिथल्या ecosystem ला काही(ही) अपाय करत नाहीत?

साप चावल्यानंतर वापरण्यात येणारी "गावठी औषधे" खूप प्रभावी असतात, मात्र हल्ली ताबडतोब सिव्हिलमधे घेऊन जाणेच पसंद करतात. >>> Uhoh

ह्या वेळी न चिडता उत्तर दिलत ते बरं केलत, नाहीतर म्हंटलं परत येऊस्तोवर बुवाच्या नावानी फुल्ल टू २-३ प्यॅरे (इंग्रजी) लाखोल्या!!!! Proud श्रद्धा म्हंटली की विश्वास आला. बर्‍याच वेळा तो विश्वास इतका दृढ होतो की आपल्यालाच कळत नाही. आता पर्यंत कुठल्याशा कारणांनी मार्लेश्वरातले साप कोणाला चावले नाही पण ते चावतच नाहीत अशी समजुत करुन घेऊन तिथे बेधडक पणे जाण्यात काहीच अर्थ नाही (तुम्ही सुद्धा). Happy गरुड रेषे विषयी सुद्धा परत हेच मुद्दे लागु होतात. बाकी आपण सुज्ञ आहात. Happy

मार्लेश्वराला जाणारे लोक गरुड् रेषा की काय ती हातावर गोंदवून मग जात असतील! सापाला रेष दाखवायची की साप सुम्म ! मिळाला क्लियरन्स ! >>>>>>>> Lol

मार्लेश्वरच्या गुहेच्या याच आकर्षणामुळे तिथल्या पावसाळ्यातल्या धबधब्याचं व निसर्गाचं खरंखुरं सौंदर्य दुर्लक्षितच होतंय, असं मला तरी वाटतं.
"सापाची चिडखोर मुद्रा " अप्रतिम !

बुवा, आतापर्यंत मी कधी इंग्रजी लाखोल्या वाहिलेल्या नाहीत. पहिल्यापासून मराठीतच वाहिल्या आहेत. Proud

चिडायचा प्रश्नच येत नाही. पहिल्याच पोस्टमधे मी लिहिलं होतं की खरं मानायचे तर माना अथवा गंमत म्हणून सोडून द्या. काही लोकाना ते जमतच नाही मग "काहीही मस्करीपूर्ण" पोस्टी टाकल्या जातात आणि ते मला अपेक्षित होते (अगदी कुठले आयडी येतील ते सुद्धा!!) . एखाद्याच्या अंधश्रद्धेची मस्करी करणे ठिक आहे,खिल्ली उडवणे पण मी समजू शकते. पण वर तुम्हीच लिहिल्यासारखे जेव्हा मुद्दाम एखाद्या ठिकाणाची पण मस्करी (तिथली पूर्ण माहिती न घेताच) करायला लागलात तर अंधश्रद्धाळू कुणाला म्हणायचे हा प्रश्न उभा राहतो. तुम्ही जर मार्लेश्वरला जाऊन आलेले असतात किंवा तिथे सर्पदंश झालेल्या केसेसची काही आकडेवारी तुमच्याकडे असती आणि तुम्ही तुमची पोस्ट टाकली असतीत तर एक वेळ ठिक होते. पण तसे खचितच नाही. दिसली एखादी श्रद्धा-विश्वास अथवा चमत्कार वगैरे अशी काही पोस्ट की लगेच तुमची मस्करी चालू!!! नक्की प्रकार काय आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता देखील तुमच्यामधे नाही!!!! "आसे का होते" हे विचारले असते तर प्रश्नाचे उत्तर मिळाले असते.. पण तुम्हाला लगेच तिथे "सुधागडमधे शंकराचे वास्तव्य नाहीये का? सुधागडचे हिरवे चावतात मग मार्लेश्वरचे का नाही?" अशी पोस्ट टाकावीशी वाटली. मार्लेश्वर कुठे आहे ते देखील माहित नसताना!!!

कृपया एखाद्या स्थळाबद्दल अथवा चमत्काराबद्दल जेव्हा लिहिले जाते तेव्हा पूर्ण माहिती करून घ्या. कदाचित तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टीदेखील या जगात अस्तात आणि त्या गोष्टी असण्याला एक पूर्ण शास्त्रीय, बुद्धीला पटेल असे कारण देखील असते. जर तसे कारण नसेल तर त्याला "अंधश्रद्धा" म्हणून खुशाल हसा. पण कारण जाणून घेण्यासाठी मनाची आणि बुद्धीची कवाडे कायम उघडी ठेवा. खूप गमतीशीर आणि आश्चर्यकारक गोष्टी समजतील. मार्लेश्वर हे तर एक उदाहरण झाले, इथे माझ्याच आजूबाजूला असे कित्येक चमत्कार आहेत..

मार्लेश्वर हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे त्यामुळे मायबोलीवरचेच कित्येक जण तिथे जाऊन आलेले असतील. मुकुंद यानी त्याचा अनुभव लिहिलेलाच आहे, त्यामुळे मी "श्रद्धा अंधश्रद्धा" या विषयामधे शिरत नाही. मला गरज देखील नाही ... तीन फूटावरचा नाग फणा काढून बसलेला असताना मला चावला नाही. मग दूरदूरच्या नागाची आणि व्हायपरची काय भिती?? जोवर मला स्वतःला माहित आहे की विषारी साप आजूबाजूला असताना काय करावे आणि काय करू नये, साप चावला तर काय प्रथमोपचार करावेत तवर मला चिंता नाही. मात्र, दुसर्‍याला ही माहिती नसेल तर ते जीवावर बेतू शकते म्हणून पोस्टप्रपन्च!!

मार्लेश्वरला नाग चावत नाहीत यामागे शंकराचे वास्तव्य हे विश्वासाचे कारण असेल पण शास्त्रीय कारण देखील आहे. आणि मी वरच्या पोस्टमधे ते लिहिलय.
अनोळखी ठिकाणी जाताना साप विंचू पासून कायम सावध रहावे. शेवटी तो त्याचा "एरिया" आहे आपण तिथे उपरे म्हणून जात अस्तो. त्याच्या नॅचरल वागण्याला आपण बदलायचा अधिकार नाहिये.

मार्लेश्वरामधले नाग (साप नव्हे!! किंग कोब्रा) हे खरंच बघण्यालायक आहे, कारण तिथे नाग इतक्या निवांतपणे फिरत असतात तसे अजून फारसे कुठे बघायला मिळत नाहीत. तो त्याचा एरिया आहे आणी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ते तिथे राहत आहेत. मुळात तिथे आपण बेधडक पण जायचेच नसते. ते एक मंदिर आहे आणि नैसर्गिक गुहेमधे अंधार असल्याने सावकाशच जावे लागते नाहीतर कपाळमोक्ष नक्की. तिथल्या नागाना त्रास अथवा हळद कुंकू वाहणे फोटो काढणे वगैरे प्रकार देखील अजिबात नसतात (पुजारी करू देत नाहीत) त्यामुळे त्याना "आपली" सवय झालेली असते म्हणून ते डिवचले जात नाहीत अथवा चवताळत नाहीत. उद्या जर कोणी "शहाणा" कसे चावत नाहीत इथले नाग म्हणून त्याना डिवचायला गेला (भले हातावर गरूड रेष गोंदवून घेतलेली असो) तर तो चावणारच आणि विष सोडणारच. निसर्गाने त्याला स्वसंरक्षणासाठी दिलेले हत्यार आहे. आणि निसर्गात प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे.

निवांत, साप चावल्यावर काहीजण गावठी औषधे वापरतात (कसल्यातरी पाल्याचा रस वगैरे) त्याने साप/विंचू उतरतो.. प्रत्यक्ष पाहिलेले आहे मी. यामधे वेळ खूप लागत असल्याने बर्‍यचदा जीव जाण्याचा धोका असतो तसेच, साप कुठला चावला किती वेळा चावला आणि किती प्रमाणात त्याने विष सोडले याची माहिती साप चावलेला माणूस देऊच शकेल अशी परिस्थिती नसते.

म्हणून हल्ली साप चावल्यावर लगेचच सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जातात कारण अ‍ॅलोपॅथीची औषधी तत्काळ परिणाम करतात.... अजूनही खेडोपाड्यामधे गावठी औषधेच वापरात जास्त करून असतात. तसेच, ज्या भागामधे सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे तिथल्या प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रामधे अ‍ॅलोपॅथीची औषधे साठवून ठेवली जातात. ज्यायोगे कित्येक लोकाचे प्राण वाचलेले आहेत.

कोकणामधे अजूनतरी "दिसला साप की मारून टाक" हा प्रकार नसल्याने (याला अंधश्रद्धाच कारणीभूत आहे सापाला जागेचा राखणदार मानतात.. बुवा, बघा कोकणचे लोक किती मूर्ख!!) साप नाग हे फिरताना दिसतात. मात्र, आता येणार्‍या औष्णीक ऊर्जा प्रकल्प, मायनिंग वगैरे गोष्टीनी सापाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे "जनावर अथवा लांबडे दिसणे" हा आमच्यासाठी कायमचा असलेला अनुभव पुढच्या पिढीसाठी नुसताच ऐकीव ठरणार आहे असे वाटते.

सली एखादी श्रद्धा-विश्वास अथवा चमत्कार वगैरे अशी काही पोस्ट की लगेच तुमची मस्करी चालू!!!नक्की प्रकार काय आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता देखील तुमच्यामधे नाही!!!! "आसे का होते" हे विचारले असते तर प्रश्नाचे उत्तर मिळाले असते.>>>>>>> नक्की प्रकारात "चमत्कार" आहे ना?अहो, चमत्कार म्हंटले की आम्हाला मस्करी सुचतेच. कारण मुळात चमत्कारावरच आमचा विश्वास नाहीये. Proud
ह्यावरच्या पोस्टीनी तर आता मात्र तुम्ही आमच्या मस्करीच्या टायरातली हवा पण काढून टाकलीये! माझ्या वरच्या पोस्टीतले शेवटचे वाक्य मला मागे घ्यावे लागेल आता! Lol __/\__

बुवा, पोस्ट पूर्ण वाचायचे तरी कष्ट घ्या. तेही जमत नसेल आणि मी जे सांगतेय ते समजूनच घ्यायचे नसेल तर मग काय बोलणार?

नक्की प्रकारात "चमत्कार" आहे ना?>>> जाऊन एकदा खात्री करून या. सुरूवातीपासून सांगतेय. नाही पटलं तर इथे येऊन लिहा, मी जाऊन आल्यावर मगच लिहितेय. ऐकीव थापा सांगत नाहिये नक्कीच, अजून काय सांगणार?? चम्त्कारामागचे कारण सुद्धा तुम्हाला दिलेय. तरी तुम्हाला ऐकायचेच नाही.. मग काय लिहिणार??

कारण मुळात चमत्कारावरच आमचा विश्वास नाहीये>>> नसू देत ना!! तुमचा विश्वास नाही म्हणून काही बिघडत नाही. मार्लेश्वर आहे तिथेच राहतो आणि नाग आहेत तिथेच राहतात. तिथल्या धबधब्याचे आणि नैसर्गिक सौंदर्यावर पण काही परिणाम होत नाही. Proud

बाकी विषय सुधागडावरील विषारी सापाचा आहे, मार्लेश्वरच्या चमत्काराचा नव्हे. त्यामुळे हे माझे शेवटचे पोस्ट. (करा किती मस्करी करायची आहे तितकी!!! मला जे सांगाय्चे होते ते सांगून झालं.)

आणि हो, खांद्यापासून करता येत नाही म्हणून तुम्हाला _/\_

माझ्या आजोळचा मार्लेश्वराला दरवर्षी नेवैद्य अस्तो. तिथे जाउनच पुरणाचे जेवण करतात. देवरुखला मावशी असते, तिचा पण असतो. पण मला जायची संधी मिळाली नाही अजून.
पण मला वाटते तिथल्या नागापेक्षा, तिथल्या निसर्गाचे जास्त अप्रुप वाटले पाहिजे. तिथे पावसाळ्यात एकावर एक असे ५ धबधबे दिसतात. त्याचा अप्रतिम फोटो, मिलिंद गुणाजी च्या पुस्तकात आहे. (त्याचेच अश्या चमत्कारीत स्थळांबद्दल एक नवे पुस्तक आले आहे.) तिथे सापाना सुरक्षित वाटायचे काहितरी कारण नक्किच असेल.
बीबीसी च्या एका कार्यक्रमात बघितल्याप्रमाणे, विष निर्माण करायला सापाला जास्त कष्ट करतात. ते विष बहुदा भक्षाला मारण्यासाठी असते. माणूस काहि सापाचे भक्ष नाही, त्यामूळे माणसावर त्याचा वापर करण्यासाठी, भय किंवा बचाव हेच कारण असते.
बीबीसीच्याच गँजेस (गंगा) या सिडीमधे पण असे एक गाव दाखवले आहे. जिथे साप मुक्तपणे फिरत असतात, अगदी मुलांच्या खेळाच्या जागी, घरात, स्वयंपाक घरात सगळीकडे. तान्ह्या बाळाशेजारुन साप जातोय आणि आई शांतपणे वावरतेय, हे दृष्य आपल्या अंगावर काटा आणते. तात्पर्य जर सापाना सुरक्षित वाटत असेल, तिथे असा बचावात्मक पवित्रा ते घेणार नाहीत. मार्लेश्वराच्या ठिकाणी पण नागाना असे सुरक्षित वाटत असेल. अश्या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम, सुधागडाचे फोटो पोस्ट करून जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल ASHUCHAMP चे आभार. तेलबैलाच्या बाजूने उतरणारा सवाष्णी घाट व सभोवतालच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी ह्या दुर्गाची निर्मिती झाली असावी. ह्या दुर्गाचा इतिहास कदाचित अजूनही मागे जाईल याचे कारण सुधागडाच्या परिसरात असलेली ठाणाळे नाडसूर ची लेणी.
इतिहास:-
सुधागड हा किल्ला अतिशय पुरातन आहे. भॄगु ऋषींनी ह्या किल्ल्यावर वास्तव्य केले असे सांगतात. आणि किल्ल्यावरील मुख्य देवता असलेल्या भोराई देवीची स्थापन पण याच ऋषींनी केली असं सांगतात. याच भोराई देवीच्या सभोवती सतींची स्मारके तसेच इतर देवतांच्या मुर्ती आहेत.
या किल्ल्याच्या जवळच ठाणाळे लेणी आहेत. यावरुन किमान हा किल्ला २००० वर्षापुर्वीचा असावा असे अनुमान करता येते.
या किल्ल्याचे भोरपगड हे नाव किल्ल्यावरील मुख्य देवता बोराई देवी वरुन आले आहे. हा किल्ला सन १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकला. हा किल्ला पहाताना महाराजांनी किल्ल्याचे नामकरण सुधागड असे केले.
या किल्ल्याचा विस्तार फ़ारच मोठा आहे. याचा माथा सपाट आणि सलग आहे. या किल्ल्यावर अजुनही प्रचंड बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात. सुधागड किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे सवाष्णिच्या घाटातुन वर येणारी वाट. या घाटामध्ये गोमुखी बांधणीचा महादरावाजा लागतॊ.
"शिवाजी महाराजानी राजधानी रायगड सारखाच सुधागड च विचार केला होता" पण याला ऐतिहासिक पुरावा नाही. त्यामुळे हा दावा खोटा ठरतो.
पेशवाईच्या कालखंडात या किल्ल्याचा ताबा भॊरच्या पंतसचिवांकडे होता.
संदर्भ: http://www.marathiduniya.com/ भटकंती/ विभाग प्रमाणे/ गड किल्ले/ सुधागड.

आता थोडेसे सापाविषयी.

नाव:
वरील लेखात सांगितल्या प्रमाणे ह्या सापाला मराठीत चापडा आणि इंग्लिश मध्ये बांबू पिट व्हायपर म्हणतात. ह्याचे शास्त्रीय नाव आहे Trimeresurus gramineus.

आढळ:
भारतात हा साप गुजरात मधील डांग जिल्हा, महाराष्ट्राची संपूर्ण सह्याद्री रांग, संपूर्ण गोवा तसेच कर्नाटक आणि तामीळनाडूचा किनारपट्टीचा प्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्याचा उत्तरेकडील भाग अशा विस्तृत भागात आढळतो. समुद्रसपाटीपासून साधारण ४५० मीटर उंचीवर हा सापडतो.
वैशिष्ट्ये:
ह्या जातीच्या सापांच खास वैशिष्ट्य म्हणजे नाक आणि डोळ्यांच्या मध्ये असलेली उष्णतासंवेदक खोबण. अशाच प्रकारची खोबण अजगर जातीच्या सापात देखील आढळते. भक्षाच्या शरीरातून उत्सर्जीत होणार्या उष्णतेचा मागोवा घेत हे साप भक्षाचा पाठलाग करतात.
खाद्य आणि राहणीमान:
हा साप निशाचर असून त्याचा डोंगरातील जंगलात वावर असतो. निरीक्षणाअंती असे आढळून आले की उन्हाळ्यात ते एकाच झुडपात साधारण दोन महिन्यांपर्यंत राहतात. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेस ते बेडकांच्या शोधात जमिनीवर हिंडताना देखील आढळले आहेत. ह्या सापांच्या खाद्यामध्ये बेडूक, पाली, छोटे पक्षी तसेच उंदीर इत्यादी बिळात राहणार्या प्राण्यांचा समावेश होतो. जून ते जुलै महिन्यात मादी साधारण ५ ते १५ पिल्लांना जन्म देते (हा साप अंडी घालत नाही).
विष:
वरील लेखात ह्या सापाचा उल्लेख जहाल विषारी असा केला आहे. परंतु माझ्या मते तो तितकासा विषारी नसावा. कारण जंगलात फिरणार्या कातकरी बांधवांकडून ह्याविषयी माहिती गोळा केली असता असे समजले की हा साप चावला असता एक ते दोन दिवस दंशाच्या जागी वेदना होतात आणि तो भाग सुजतो. इंटरनेटवर यासंबंधी अधिक माहिती गोळा करताना असे समजले की हा साप दंश करताना विषाची अत्यंत अल्प मात्र सोडतो. कदाचित म्हणूनच आत्तापर्यंत भारतात ह्या सापाच्या दंशाने झालेल्या एकाही मृत्यूची नोंद सापडत नाही. असे असले तरी वैयक्तिक विषप्रतिकारक क्षमता आणि रुग्णाच्या मनाची कणखरता ह्यावर देखील विषाचा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच सापाला न डिवचता त्याचे फोटो काढणे जास्त उत्तम.
मी माझ्या अल्पमतीप्रमाणे विषयास हात घातला आहे. तरी चूकभूल देणे घेणे. उणीवा सापडल्यास जरूर कान धरावा.

Pages