सुधागडावरील विषारी थरार

Submitted by आशुचँप on 14 May, 2010 - 14:38

गेल्या महिन्यात सुधागडला जाण्याचा योग आला. सुधागड हा अष्टविनायकायतील पालीजवळ असलेला एक बलदंड किल्ला. असे म्हणतात की शिवप्रभूंची राजधानीसाठी या किल्ल्याचे नाव यादीत होते पण स्थानमहात्म्यामुळे रायगडाने नंबर पटकावला. नंतर हा किल्ला पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. असो.

sudhagad.jpgसुधागड, पाच्छापुर गावातून

मी आणि माझ्या धाकट्या भावाचे काही मित्र असा लवाजमा शनिवारी रात्री दहाच्या सुमारास पुण्यातून निघाला. वाटेत दोन-तिन ठिकाणी चुकत माकत मध्यरात्रीच्या सुमारास पाली गावात दाखल झालो. तिथल्या धर्मशाळेत पथारी पसरली आणि सकाळी गणरायाला एक नमस्कार ठोकून पाच्छापूरच्या दिशेने सुटलो.
माझ्याबरोबरची सगळीच मंडळी कॉलेजवयाची आणि भयंकर उत्साही. त्यामुळे ते टणाटण उड्या मारत गड चढून जायला लागले. त्यांच्या वेगाने मला जाता येईना. त्या ग्रुपमध्ये मी बराच ट्रेकिंग करत असल्याने एकदम भारी असल्याचा गैरसमज होता. आता त्याला बट्टा लागणार असे जाणवले आणि जिवाच्या कराराने किल्ला चढून गेलो.
हातात वेळ भरपूर होता तेव्हा दुपारचे खाणे पिणे उरकून खास पुणेरी वामकुक्षीचा बेत केला आणि तो तडीला न्यायचा या उद्देशाने आडवेही झालो. पण त्या दिवशीची दुपार काहीतरी विलक्षणच घेऊन येणार होती ज्याची कल्पनाही आम्ही केली नव्हती.
मी मस्त सॅक डोक्याशी घेऊन वारा अनुभवत वाड्याच्या बाजूला सावलीत पहुडलो होतो तोच एक दुसरा भटक्यांचा गट बाजून गेला. आणि त्यांच्यातली चर्चा ऐकून एकदम ताडकन उठून बसलो.
त्यांना गडावरच्या शंकराच्या मंदिरात एक कुठलातरी साप दिसला होता म्हणे. तोही शंकराच्या पिंडीपाशी आणि तो दिसणे किती भाग्याचे आहे अशा आशयाचे काहीतरी.
मी तातडीने सगळ्यांना हलवले आणि ही गम्मत सांगितली. आधीच ते उत्साही आणि त्यातून साप पहायला मिळतोय हे कळताच दुपारची विश्रांती घेण्याचा बेत केव्हाच मागे पडला आणि आम्ही त्या मंदिराकडे धावलो. दरम्यान, तिथल्या वाड्याचा व्यवस्थापक कम पुजारी होता त्यालाही कळले. तोही आमच्याबरोबर निघाला.
temple.jpgशंकराचे मंदिर

मंदिराबाहेर बूट काढून अनवाणी पायांनी आत गेलो. बाहेरच्या उजेडातून एकदम आत गेल्यामुळे एकदम अंधारी आल्यासारखे झाले. पण डोळे थोडे सरावल्यानंतर इकडे तिकडे पहायला सुरूवात केली. साप कुठे दिसेना, बर मोठा साप आहे की बारके पिल्लू, विषारी-बिनविषारी काहीच माहिती नव्हते त्यामुळे जरा बिचकत पहात होतो.
तेवढ्यात त्या पुजार्‍यालाच दिसला. पिंडीच्या शेजारी एक शेंदूर फासलेला दगड होता त्याच्या आणि भिंतीमधल्या सांदटीत त्या सापाने स्वतांला कोंबून घेतले होते. मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या उजेडात जवळ जाऊन पाहिले तर एकदम धसकाच बसला. अंगावरच्या गडद हिरव्या आणि पिवळ्या पट्ट्या आणि त्रिकोणी डोके..शंकाच नाही.. हा तर बांबू पीट व्हायपर आहे..मराठी नाव चापडा..अत्यंत जहाल विषारी.
मला अशा ठिकाणी अशा जागी पीट व्हायपर सापडेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. मला वाटले होते जास्तीत जास्त धामण सापडेल पण हे प्रकरण भयानक होते.

IMG_6163.jpgसांदटीमध्ये बसलेला चापडा

मी पटकन सगळ्यांना मागे जायला सांगितले. साप अजिबात हालचाल करत नव्हता त्यामुळे मी जरा जवळ जाऊन निरिक्षण केले. त्या ट्रेकला मी माझ्या भावाचा एसएलआर कॅमेरा घेऊन गेलो होतो त्यामुळे फोटोग्राफीचे वेड संचारले होते. मनात आले एवढ्या दिवसा ढवळ्या इतक्या उघड्यावर इतक्या जवळ पीट व्हायपर दिसतोय तर त्याचा फोटो काढण्याची संधी का बरे दवडावी. धावतपळत बॅगेपाशी जाऊन कॅमेरा घेऊन आलो. सुदैवाने साप आहे त्याच जागी होता. मी दोन तिन फोटो काढले पण त्या सांदटीमुळे त्याचा पुर्ण आकार येत नव्हता. मी तसे त्या पुजार्‍याला सागितले. बाकिचे सगळे माझे ऐकून बाहेर गेले होते पण पुजारी माझ्या शेजारीच उभा होता.
तो म्हणाला "एवढेच ना, थांबा"
असे म्हणत त्या महान माणसाने चक्क हाताने तो शेंदरी दगड सरकावला.एकदम सहजपणे.
मी ओरडलोच, "अहो काय माहितीये का तो विषारी साप आहे. एवढ्या जवळ नका जाऊ."
पण त्या माणसावर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. पण तो साप थोडा हलायला लागला होता. तो दुसर्‍या आडोश्यामागे जाण्यापुर्वी चान्स घ्यावा म्हणून मी कॅमेरा सज्ज करून पुढे गेलो आणि अजून काही फोटो घेतले. तरीही माझ्या मनासारखा काही फोटो येईना. गाभार्‍यात अंधार असल्याने फ्लॅश टाकावा लागत होता आणि त्यामुळे फोटोची गंम्मत जात होती.

_MG_6174.jpg

"हा बाहेर असता तर जास्त मज्जा आली असती." अस्मादिक.
"मग काढूया की त्याला बाहेर,"
मग बाहेर गेलो, दोन मस्त काटक्या तोडून आणल्या आणि त्याला हुसकावून बाहेर काढायला सुरूवात केली. आणि एवढावेळ शांतपणे आमचे औद्धत्य सहन करणाऱया त्या विषधराने एकदम आक्रमक पवित्रा घेतला. त्याने त्याची जागा सोडून एकदम चपळपणे त्या गाभार्‍यात इकडे तिकडे पळायला सुरूवात केली.
आता मात्र माझे धाबे दणाणले. आम्ही दोघेही अनवाणी आणि पायात एक अत्यंत विषारी साप, तोही चवताळलेला अशा अवस्थेत काय वाटते ते एकदा अनुभवावाचे.
तो साप इतक्या जलद हालचाली करत होता की त्याला काटकीने दाबून ठेवणे पण शक्य नव्हते. अपेक्षेप्रमाणे त्या पुजाऱयाला प्रसंगाचे गांभिर्य अजिबात लक्षात आले नव्हते. तो नाग किंवा फुरसे नाहीये एवढे त्याच्या दृष्टीने पुरेसे होते.
"मी असे करतो मी त्याला आतून बाहेर ढकलतो आणि तुम्ही बाहेर थांबून त्याला पकडा. "
मी ......?????
आम्ही जिवंत सापाची विटी-दांडू करून खेळतोय आणि त्याने कोललेल्या सापाला मी पकडतोय असे काहीबाही चित्र माझ्या डोळ्यासमोर सरकले.
अर्थात त्या दाटीवाटीच्या जागेत दोघांनी उभे राहून हालचाल करणेही अवघड होते त्यामुळे मी पटकन बाहेर येऊन सज्ज झालो. पुजारीबुवा खरेच महान होते. त्यांनी सापाची पळापळ शांतपणे पाहीली आणि तो दाराच्या जवळून जाताच पटकन काठीने त्याला बाहेर ढकलला. त्यांचे टायमिंग अफलातून होते.
सापाला काही कळायच्या आत तो एकदम उघड्यावर आला होता आणि काठीने मी त्याला दाबण्यात यशस्वी झालो होतो.
_MG_6182.jpg_MG_6190.jpgसापाची चिडखोर मुद्रा

त्याला या पराभवामुळे भयंकर संताप आला आणि त्याने आणखी आक्रमक होऊन आ वासला. तो आपल्या शत्रूला चावा घेण्यासाठी धडपडत होता आणि त्याचे विषारी दंत पाहून मी थरारलो.
bite.jpg

मनात आले आपण जरा जिवावरचेच धाडस करतोय. जर तो मला किंवा त्या पुजार्‍याला चावला असता तर उपचारासाठी आख्खा गड उतरून पाच्छापूर मग पाली. तिथे लस उपलब्ध नसेल तर थेट खोपोली. तोपर्यंत टिकाव धरला नाही तर???.
एकदम मनावर भितीचा पगडा बसला आणि हात सैल पडला. ती संधी साधून त्या सापाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा धावत जाऊन त्याला दाबला. दरम्यान मी माझा कॅमेरा हर्षवर्धनकडे दिला होता. त्याने त्याच्या परीने फोटो काढण्याचा सपाटा लावला होता. मध्येच माझ्याकडून परत एकदा ढिलाई झाली आणि साप फोटो काढणाऱया हर्षाकडे झेपावला. त्याची एकदम पळता भुई थोडी झाली. पण त्याने माझे समाधान होईना. शेवटी मी त्याच्याकडून कॅमेरा घेतला आणि अगदी ऑस्टीन स्टीव्हनच्या थाटात फोटोग्राफी केली.
एवढे झाल्यानंतर मग मात्र त्या सापाला जास्त त्रास दिला नाही. दोन काठ्यांनी उचलून त्याला झाडीत नेऊन सोडले. सळसळ करत ते हिरवे प्रकरण क्षणार्धात गायब झाले.

going.jpgpujari.jpgपुजारी आणि मंदिर

मग मागे येऊन बूट घालताना लक्षात आले अरे एवढा वेळ आपण अनवाणीच होतो. शांतपणे पाणी प्यायलो, घाम पुसला आणि म्हणालो.. "दुपारची झोप राहून गेली ना राव."

गुलमोहर: 

जीवावरचा खेळ झाला की
>> हो सापाच्या Proud

फोटो चांगले आहेत, पण photography करता कशाला त्रास द्यायचा राव त्याला! Sad

तो ही दुपारचा वळचण/गारवा बघून छान पहुडला असेल ..
मागे मायबोलीवर लेख आलेला ना (मंजुडीचा होता का?) दुपारची झोपमोड करणारे सेल्समन वगैरे वर..
तशी सापाची मायबोली असेल तर तो ही टाकेल तिकडे ही घटना..
समस्त सर्प परिवाराकडून मग ह्याचा विरोध झाला असेल.. सापानं जर विनोदी लेख लिहिला असेल तर 'ह.ह.ग. लो.' वगैरे प्रतिसाद...
त्वेषानं लिहिला असेल तर 'ह्या सगळ्या माणसांना एकदा पकडून पकडून डसलं पाहिजे' असले जहाल काहीतरी..
प्रवासवर्णन म्हणून लिहिलं असेल तर काही लोकांकडून निषेध!
आणि कविता केली असेल तर... जाऊदे..

असो.. तर काय म्हणत होते : झोपू द्यायचं की राव निवांत त्याला!

आणि कविता केली असेल तर... >>> त्यांच्यात एक सापबा असेलच जो नवकवींच्या बाजुने शिंग फुंकेल Proud Light 1

"येताना त्याला खाली घेउन यायला पाहिजे होतं म्हणजे इतर लो़कांना होणारा धोका टळला असता " असा विचार मनात आला. पण त्याचे भाईबंद पोरे बाळे पण असणार ना तिथे...

>>>जर तो मला किंवा त्या पुजार्‍याला चावला असता तर उपचारासाठी आख्खा गड उतरून पाच्छापूर मग पाली. तिथे लस उपलब्ध नसेल तर थेट खोपोली. तोपर्यंत टिकाव धरला नाही तर???.>>>

गडावर लोक वस्तीला रहातात काय? अशा प्रत्येक ठिकाणी ( जिथे दवाखाना जवळ्पास नाही) सर्पदंशावर उपचाराची सोय असायला पाहिजे.

मागे देवगड जवळ शेतात काम करत असताना एका बाईला साप चावला. बाई बेशुद्ध.... मग गाडीत घालुन PHC त नेले.... तेंव्हापासुन मला अशा दवाखान्यापासुन लांब ठिकाणी सापाची जाम भिती वाटते. (सापाला कुठे माहित असत दवाखाना जवळ नाहीय Happy

बाय द वे पनवेल मध्ये मी एकदा साप पकडला होता. पहिल्यांदा फुरसे वाटले. पुर्ण सुंद होउन पडला होता. नंतर कळाले वायपरच होता. उचलुन एका बॉक्स मध्ये ठेवला आणि सोडुन आलो. घरी आजोबा आले होते. म्हणाले " शाळा शिकायला इकडं आलायस का साप पकडायला?" Happy

मला लहानपणी सांगितले गेले होते.. की हिरवा साप विषारी नसतो

एकदा गावा च्या बाहेर च्या तळ्याच्या बाजुला झूडुप आहे तिकडे दिसलेला..
शाळा बूडवून बोंबलत फिरत होतो. त्याला बघितले आणी घरी परत पळत पळ्त कधी येउन पोहचलो ते कळालेच नाही..
आणी रडत रडत सांगितले आजी ला.. तेंव्हा कळाले.. हिरवे शाप विषारी नसतात आणी मनातील थोडी भीती गेली
होती.. आता कळाले.. हे साप पण विषारी असतात.. Sad आजी खोटे बोलली होती.

फोटोस एकदम झकास Happy

मस्त फोटो. मी ही तसच ऐकलं होतं. हिरवे साप विषारी नसतात वगैरे. अब अकल ठिकाने आ गयी. बाकी माझ्या मामा ला एकदा फुरसं चावलं होतं, मरता मरता वाचला.

त्यांच्यात एक सापबा असेलच जो नवकवींच्या बाजुने शिंग फुंकेल
>> Lol
शिंग नाही ग रणशिंग Wink
पण शेवटी रामायण आलच ना म्हणजे त्यांच्यातही.. म्हणून जाऊदे म्हणालेले ग.. Proud

थरारक अनुभव आणि सापाचे फोटोजपण त्याच्यासारखेच सळसळते!! Happy

सिंडरेला, नानबा Biggrin

सिंडरेला, नानबा Lol
सापाचे नुस्ते फोटो पाहून ,आपोआपच पाय खुर्चीवर बसल्याजागी वर गेले.. नॅशनल जॉग्रफी चा कार्यक्रम लागलाय कॉम्पवर असं वाटलं Proud

बापरे!!!! तो हिरवाकंच साप बघुन काटा आला अंगावर.
जिवावर खेळण्यात काहीच अर्थ नाही . वेळ कधी सांगुन येत नाही , पुन्हा असं साहस करु नका.>>>>>अगदी अगदी. खरंच वेळ कधी सांगुन येत नाही.
माझा पहिला ट्रेक सुधागडचा (काहिच माहिती न घेता गेल्याने कशी फजिती होते त्याचा उत्तम अनुभव असलेला हा ट्रेक), त्यावेळी पाहिली होती गडावरची वारुळे, पण हे प्रकरण भलतंच भारी दिसतंय.

पाचव्या फोटोमधली पोज एकदम टिपीकल वायपर वाली आहे. सटकन डोके बाहेर काढेल आणि कडकडून चावेल.
जपून रे बाबांनो ! Happy
निवांत, Happy
एकदा आमच्या शेजार्‍यांच्या घरात असेच धामणीचे पिल्लू म्हणुन पट्टेरी मण्यारशी मी पंगा घेतला होता. थोडक्यात वाचलो होतो. पायात शूज असल्याने!

खरच पुन्हा असं करु नका. आणि इतक्या चिडलेल्या सापाला दोन काठ्यांनी उचलून झाडीत नेऊन सोडले, महान आहात.

नानबा, सिंडी Proud खरच पण किती त्रास दिलात त्या जिवाला त्याच्या पण वामकुक्षीची वाट लावलित ना राव स्वताबरोबर

अरे भावा खरच जिवाशी खेळला आहेस तु !!
असल नसत धाडस नको करत जाउ .

बाकि फोटो ग्रेट !! ग्रेट म्हणजे ग्रेट ग्रेट ग्रेट !!!

अवांतर : माझ्या माहीती प्रमाणे महाराष्ट्रात फक्त ४ प्रकार चे विषारी साप सापडतात . कोब्रा , रसेल्स व्हायपर , (आणि कोणते तरी दोन ) , प्रश्न : पीट व्हायपर आणि रसेल्स व्हायपर एकच का ??

प्रश्न २: ह्या एकट्याचेच विष मेंदुवर परीणाम न करता हृदयावर परिणाम करते ना ? ( तसे असेल तर अँटी वेनम मिळणे अजुन अवघड असेल ना ?? )

जाणकारांनी माहीती द्यावी .

काही फोटोंसाठी कशाला इतका खटाटोप? कोणतंही साहस वेडं साहस असू नये.
पण जंगलात सोडलात ते बरं केलंत, त्याचा धोका इतर लोकांना होताच, तो टळला.
पुढील सेफ ट्रेक्ससाठी शुभेच्छा.

चांगले फोटो हवेत म्हणून त्या बिचा-या सापाला कशाला त्रास दिलात? सांदटीत चांगला थंडाव्याला बसला होता तर उगाच डिवचलंत त्याला... आता हा राग त्याने कोणा स्थानिक गावक-यावर काढला म्हणजे??

अगा बाबौ!!!
कसला डेंजर आहे तो..
हा साप शक्यतो घनदाट जंगलातच सापडतो.
तुम्हाला पहायला मिळाला हेच नशीब आणि हो त्याने तुम्हाला प्रसाद दिला नाही हे ही नशीबच. Happy
दुसरा हिरवा साप असतो तो गवत्या पण तो विषारी नसतो.

बाकी साप दिसल्यावर तो विषारी की बिनविषारी ह्याचा विचार न करता मी तरी लांबच राहतो बॉ.. Happy

नानबा तुमचा प्रतिसाद Rofl
बाय द वे, पुढच्या जन्मी नानकोंडा होण्याच जास्तच मनावर घेतलय वाटत. Happy

Pages