नव्याने लिहू लागलेल्या प्रत्त्येकाला..

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

(October 27, 2006)
सन्दर्भ :
अर्ध्या वाटेवर..
by , अरुणा ढेरे.
प्रकरण १३.
नव्याने लिहू लागलेल्या प्रत्त्येकाला:

महाराष्ट्र कवि परम्परेतल्या कित्त्येकानी कवितेला मोहमयी सुन्दरीच्या किव्वा जादूगार स्त्रीच्या रुपात पाहिले आहे. कवी रेन्दाळकरान्नी तर तिला जादुगारीणच म्हटले आहे. तीची भूल पडलेले वेडे जीव कितीक होवून गेले, कितीक आपल्या अवतिभवती वावरताना दिसत आहेत..
मात्र व्यक्तीगत आयुष्यातली सखी सोबती म्हणून कविता भेटणे वेगळे आणि तिच्यासाठी आयुष्याच्या जाळावर हात धरणे वेगळे. हौशी कवी अन अस्सल कवी या दोन वेगळ्या जाती आहेत. अस्सल कवीचे भागधेय काय असते हे १९०५ साली केशवसुतानी एका नवोदीत कवीला अगदी स्पष्टपणे कळवले होते. आनन्दीरमण या टोपण नावाने कविता करणारे त्या काळचे एक तरूण होतकरू कवी हर्षे यानी केशवसुतान्कडे काही कविता मार्गदर्शनाच्या अपेक्षेने पाठवल्या होत्या. त्या केशवसुतानी नजरेखालून घालाव्या आणि शक्य तर त्या काळच्या सुप्रसिद्ध मासिक "मनोरन्जन" कडे पाठवाव्या अशी हर्षे यान्ची इच्छा होती.
त्याना उत्तरादाखल केशवसुतानी एक विस्तृत पत्र लिहीले आहे. नवोदितान्साठी एव्हडे मार्मिक, दाहक आणि कळकळीचे पत्र दुसरे नसेल. हर्षे यान्च्या प्रसिद्धीच्या अपेक्षेविषयी त्यानी लिहीले आहे -
"नवीन पद्यलेख (कविता) लिहीणारास आपले ते "लेख" फ़ार आवडतात अन ते प्रसिद्ध व्हावे अशी फ़ार उत्सुकता असते. पण त्याने ती प्रथम दाबणे इष्ट असते. काहीतरी आणि कसेतरी लिहीलेले प्रसिद्ध करण्यात काय अर्थ?
चारचौघात जावयाचे तर आपले कपडे स्वच्छ व नीटनेटके असणे जरूर असते, त्याप्रमाणेच आपले पद्यलेखन प्रसिद्धीस आणावयाचे तर जपून शुध्द लिहीले पाहीजे.. पुष्कळ अशुध्द पद्ये लिहीण्यापेक्षा मोजकीच शुध्द पद्ये लिहीणे उत्तम.
उगाच नादी भरून आपले संसारसम्बन्धी सदगुण मात्र गमावून घेणे हा शहाणपणा नाही. कविता म्हणजे आकाशाची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा ९९ आपणास होरपळून मात्र घेतात. मी असा नव्व्याण्णवापैकीच आहे. म्हणून म्हणतो, भ्रमात असाल तर जागे व्हा.
तुमच्या अलिकडील पत्री, चुका मि दुरुस्त कराव्या असे तुम्ही लिहीले आहे. त्यात चुका पुष्कळ आहेत आणि कल्पनाही म्हणण्यासारख्या अभिनव नाहीत. म्हणून तो उद्योग करण्यास मन घेत नाही. स्पष्टोक्तीचा राग मानू नका.
हल्ली महाराष्ट्रात ज्याना गद्याच्या चार ओळीही जपून लिहीता येत नाहीत असे "वृत्तदर्पण्ये" कवी पैशापासरी झाले आहेत. अशात आपली गणना करून घेवू नका. वाणी ही फ़र मोठी देवता आहे. सामान्य देवतान्च्या आराधनास सुध्धा फ़ार जपावे लाग्ते. मग या देवतेच्या आराधनेस किती जपावे लागेल बरे!
तुम्हास जगाच्या अन्धारात आपल्या बुद्धीचा किरण पाडणे आहे काय? असेल तर तुमचे हृदय उकलले आहे काय? फ़ाटले आहे काय? म्हणून मी विचारतो. कारण तो प्रकाश जेव्हा बुद्धी परावृत्त करून जगावर पाडते तेव्हा अन्धारात चाचपडणारास वाट दिसू लागते.
एरवी कागदावर दीव्याची चित्रे रन्गवून "अन्धारातून चालला आहा तर एव्हडा आमचा कन्दील तरी घेत जा" असे म्हणून आग्रहाने आपले ते दिवे, म्हणजे दिव्याची चित्रे लोकान्च्या हाती देणारे स्वयंसेवक उर्फ़ "स्वसेवक" नाक्यानाक्यावर गर्दी करून उभे आहेत. त्यान्च्या त्या दिव्यान्च्या चित्रानी त्याना काय किव्वा कोणाला काय, वाट थोडीच दिसणार आहे?
तुम्हाला स्वानन्द पाहिजे आहे काय? स्वानन्द हे कवीचे उत्तम पारितोषिक होय यात शन्का नाही. पण खाज सुटली असता खाजविल्याने जो आनन्द होत असतो, तसला आनन्द काय कामाचा? सगळे ऐहिक आनन्द याच मसाल्याचे आहेत. त्यान्च्या परिणामी हळहळच राहवयाची.

तर उत्तम पारितोषिक असा टिकाऊ आनन्द कसा मिळवायचा याचा विचार तुम्हीच करा. तो मिळू लागला म्हणजे मजकडे किव्वा कोणाकडेच पद्यलेख पाठवण्याची तुमची आतुरता जिरेल.
मला ह्या बाता सान्गणारा, हा खुद्द चुटकेच खरडीत असतो ते कशाकरिता तर? - असा प्रश्ण तुमच्या मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. त्यास लोकास वाट दाखवू पाहणारा आन्धळा वाटाड्या किव्वा लोकास सान्गे ब्रह्मज्ञान सान्गणारा कोरडा पाषाणच मला समजा. पुढील ठेचा खाणारा मी मागल्या तुम्हास सावधगिरीची सूचना देत आहे. तेव्हडी मनावर घ्या म्हणजे झाले.
कळावे लोभ असावा ही विनन्ती.
आपला
कृ.के.दामले "

ता.क. - "तुम्हाला मोठे होण्याची इच्छा आहे काय? असेल तर ती चान्गले होण्याच्या इच्छेच्या लगामी असली पाहिजे आणि आपण चान्गले आहो की नाही ते आईबापान्च्या व घरातील सर्व माणसान्च्या मुद्रेत प्रथम पाहिले पाहिजे".

पुढे अरुणाजी स्वताः लिहीतात -
नव्याने लिहू लागलेली पिढी शतकानपूर्वीच्या केशवसुतान्चे इशारे ध्यानात घेणार आहे का?
नवा येणारा काळ ज्यान्चा आहे त्यान्च्या साठी प्रसिद्धीमाध्यमान्च्या जल्लोशात न हरवता कवितेचा दिवा सम्भाळून नेणे त्यात पुरेसे तेल असावे याची काळजी घेणे फ़ार गरजेचे आहे.

आरती प्रभून्नी स्वताच्या (म्हणजे त्यान्च्या) कवितेला समजून घ्यायचे असेल, तरीही रसिकाला केव्हडी साधना करावी लागते ते एका कवितेत सान्गितले आहे. खुद्द कवीने काय केले असेल याची थोडीशी कल्पना त्यावरून यावी. आरती प्रभून्चे शब्द असे आहेत -

प्रेम हवय का या कवितेचं?
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला?
खूप काही द्याव लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फ़ुलवता येईल तुम्हाला?
पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेम्बासारखा घ्यावा लागेल.
पण त्यासाठी तुमचे हात
तुम्हाला चान्दण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"अर्ध्या वाटेवर" हे अरूणा ढेरेन्च पुस्तक चाळताना हा लेख वाचला. (पुस्तक हे अरूणाजीन्नी लिहीलेल्या विविध विषय,ललित, कथा, लेखान्चे एक स्वताह त्यानीच केलेले सन्कलन आहे. सर्वानी आवश्य वाचावे असे.)

आहाहा! काय शब्द आहेत, केशव्सुतान्चा एक एक शब्द नसानसातून भिनवण्याइतका तेजस्वी, कणखर अन तितकाच कळकळीचा सन्देश देणारा. स्वताला आन्धळा वाटाड्या म्हणवून घेणारे असे थोर कवी कुठून जन्माला येत असावेत?
आरती प्रभूनी केलेले आवाहन पेलेल आमच्या नवकवीन्च्या पिढीला की त्यातली सत्त्यसाधना सोडून आम्ही फ़क्त (लिहीण्याची) क्रीया अन (लिखाणावरील)प्रतीक्रीयान्च्या भौतीक जाळ्यात स्वताला गुरफ़टून घेणार आहोत?
इथे काही ठिकाणी कविता, दिवाळी अन्क अन प्रतीक्रीया यावरून चाललेले उपदव्याप पाहून वरील उतारा आठवला, इतकच.

यापुढे जमेल तसे असेच काही सन्कलित उतारे,लेख इथे लिहीण्याचा विचार आहे. यातून कुणास उपदेश करावा हा हेतू नाही मात्र त्यातून जो आनन्द मिळाला, अनुभवले, शिकले ते आपल्याही वाट्यास यावे अशी इच्छा.

विषय: 
प्रकार: 

योग, छान केलस,

आत्मपरिक्षण करावेच लागेल.

फारच सुंदर उतारा निवडला आहेस तू आपल्या रंगीबेरंगी लिखाणासाठी.
केशवसुत फारच मोठ्या मनाचे कवी होते म्हणून स्वतःकडे कमीपणा घेऊन परखडपणे दुसर्‍याला मार्गदर्शन करू शकले.
<<ता.क. - "तुम्हाला मोठे होण्याची इच्छा आहे काय? असेल तर ती चान्गले होण्याच्या इच्छेच्या लगामी असली पाहिजे आणि आपण चान्गले आहो की नाही ते आईबापान्च्या व घरातील सर्व माणसान्च्या मुद्रेत प्रथम पाहिले पाहिजे". >>
हे तर परम सत्य!
एक सूचना देऊ का? अनुस्वार देताना . आणी n वापरला तर लेख अजुनही जास्त वाचनीय होईल.
जसे कन्स च्या ऐवजी ka.nsa कंस .म्हणजे वाचताना सोपेही जाते.
चु.भू.द्या.घ्या.

अन्जलि

आभारी अन्जलि... अगदी चांगली सूचना. नविन transliteration chart अजून अंगवळणी पडतोय..:)

योग

फारच छान कलेक्शन आहे, आणि सर्वांसाठी इथे दिलस त्याबद्दल आभारी आहे.

सुधीर

जरा कडक आहे. वाचुन इथले ९९% लेखन खास करुन कविता बंद व्हायची.

अरे हे गेल्या वर्षीचे लिखाण आहे रे फक्त नव्या रंगीबेरंगीवर हलवतोय... असो. तेव्हा खास कुणालाही उद्देशून नाही. Happy

हा लेख शाळेत धडा म्हणून होता.परत वाचायला मिळाल्याबद्दल धन्यवाद.
केवळ कविताच नाही तर कुठल्याही कलेत करिअर करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा लेख मार्गदर्शक आहे.

योग,
अत्यंत योग्य वेळेला आलेलं लिखाण.

अजय,
>>जरा कडक आहे. वाचुन इथले ९९% लेखन खास करुन कविता बंद व्हायची.<<
कचरा बंद झाला तर बरंच आहे ना.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

>>>>> पण खाज सुटली असता खाजविल्याने जो आनन्द होत असतो, तसला आनन्द काय कामाचा?>>>> Lol
तो पण आनन्दच अस्तो, पण मला झाला म्हणून मी दुसर्‍याला पण "घे अनुभवुन" अस म्हणून खाजवायची सक्ती करू लागलो तर कसे चालेल?????

अप्रतिम लेख! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

खूप छान लेख वाचायचा 'योग' आला. Happy
अत्यंत योग्य वेळेला आलेलं लिखाण. >> अगदी अगदी. आगगाडीला डब्याला डबे जोडतात तशा शब्दाला शब्द जोडून कविता 'पाडल्या' जातायत सध्या!
---------------------------------------------------------------------------
The only thing you take with you when you're gone is what you leave behind.

योग ,

खूप खूप धन्यवाद. माझ्यामते हे नवीनच नाही तर लेखन करणा-या कुणालाही , लेखनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे आहे.

>>>>पद्यलेख (कविता) लिहीणारास आपले ते "लेख" फ़ार आवडतात अन ते प्रसिद्ध व्हावे अशी फ़ार उत्सुकता असते. पण त्याने ती प्रथम दाबणे इष्ट असते. काहीतरी आणि कसेतरी लिहीलेले प्रसिद्ध करण्यात काय अर्थ?
चारचौघात जावयाचे तर आपले कपडे स्वच्छ व नीटनेटके असणे जरूर असते, त्याप्रमाणेच आपले पद्यलेखन प्रसिद्धीस आणावयाचे तर जपून शुध्द लिहीले पाहीजे.. पुष्कळ अशुध्द पद्ये लिहीण्यापेक्षा मोजकीच शुध्द पद्ये लिहीणे उत्तम.

वाह !!!

गुरुवर्य सुरेश भट म्हणायचे " कविता सुचायची घाई नको , लिहायची तर नकोच आणि प्रसिध्द करायची तर नकोच नको"

वाचुनही प्रतिक्रिया द्यायचे राहून गेले होते..
अत्यंत चपखल आहे हा उतारा! खरोखर प्रत्येकाला उपयोगी आहे, मग तो त्या प्रांतात नवा असो वा जुना !

हो हा केशवसुतांचा धडा होता शाळेत. तेव्हाही आवडायचा.
>>कविता म्हणजे आकाशाची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा ९९ आपणास होरपळून मात्र घेतात.
हे वाक्य संदर्भासहित स्पष्टीकरणासाठी असायचं..

>>>अत्यंत चपखल आहे हा उतारा! खरोखर प्रत्येकाला उपयोगी आहे, मग तो त्या प्रांतात नवा असो वा जुना !
हेच म्हणते!

प्रसाद, धन्यवाद. हा धागा पुन्हा वर आणल्याबद्दल खरच उपयुक्त अशी माहीती. सेव्ह करून ठेवला आहे Happy

This is only one side........there is another side also......
When somebody publish something ....based on people reaction only he/she can understand that it is gd or not . Or any mistake in it ....
Pl. note that I am only reader.....

स्वानन्द हे कवीचे उत्तम पारितोषिक होय.

या शब्दांना शतकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्रिकाल अबाधित शब्द आहेत हे.
धन्यवाद योगजी.

अतिशय सुंदर पत्र ! व्वा! शिकायला मिळतं अशा पत्रांमधून!

अरुणा ढेरे यांचे मात्र आश्चर्य वाटते. त्यांची स्वत:ची एकही कविता तशी वाटत नाही. असेही वाटते की त्या लवकरच संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडल्या जातीलही!

अप्रतिम लेख. अंतर्मुख होण्यास भाग पाडणारा. सर्व कविश्रेष्ठांना त्याकरता मनापासून धन्यवाद. योग यांनाही मनापासून धन्यवाद.
पण दुसरीही बाजू असू शकेल का - प्रत्येकाला व्यक्त व्हायला काही तरी साधन लागते - ते कुठल्याही कलेच्या स्वरुपात असू शकेल. यात सगळीच तयारीची मंडळी कशी असतील - लताबाई ( आशाबाई / किशोरदा / रफीसाहेब, इ.) एकच आणि बाकीचे बाथरुम सिंगर्स - असेच असणार. बर्‍याच जणांना ही जाणीव असतेच, पण रेघोट्या मारल्या तरी आईने, बाबाने ते पहावे कौतुक करावे असे वाटणे - हे स्वाभाविक वाटते. दुसरे असे की आपण लिहितो ते परिपूर्णच असे कोणालाही वाटत नाही - पण त्यात सुधारणा होण्यासठी अशा व्यासपीठाचा वापरही योग्यच वाटतो.
मला स्वतःला कुठलीही कला हे व्यक्त व्हायचे साधन वाटते - त्यात फार मोठ्या सन्मान / पब्लिसिटीची अपेक्षा नसतेच.
- हे लिहिण्यामागे कोणालाही दुखवायचा हेतू नाही वा या लेखाचा उपमर्द करायची इच्छा नाही. माझे वैयक्तिक मत म्हणूनच कृपया याकडे पहावे.
राजहंसाचे चालणे डौलदार असतेच पण म्हणून इतरांनी काय चालूच नये का - अशा अर्थाची ज्ञानेश्वरीत एक ओवी ही आहे त्याचे स्मरण झाले. धन्यवाद.

बाप रे!!! परखड लेख आहे.
>>>>>तुम्हाला स्वानन्द पाहिजे आहे काय? स्वानन्द हे कवीचे उत्तम पारितोषिक होय यात शन्का नाही. पण खाज सुटली असता खाजविल्याने जो आनन्द होत असतो, तसला आनन्द काय कामाचा?
अर्र्र!!! Sad सत्य आहे.

पण मग वरती पुरंदरे म्हणतात तसेच - राजहंसाचे चालणे डौलदार असतेच पण म्हणून इतरांनी काय चालूच नये का - अशा अर्थाची ज्ञानेश्वरीत एक ओवी ही आहे त्याचे स्मरण झाले.

खरच विचारताहात का च्रप्स? Happy मी शब्दखूण शोधली 'योग', 'ध्यान' वगैरे त्यात नवे नवे लेखकही सापडले. मग तशी शोधत गेले Happy

Pages