मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) आई होताना...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आई होताना आई नसताना

तिर्थरुप ताईस नलिनीचा शिरसाष्टांग दंडवत.

मी, पिल्लू अगदी मजेत आहोत. तू कशी आहेस?
गेले कित्येक दिवस मी एकटीनेच तुझ्याशी बोलतेय, आज मातृदिनानिमित्त हा पत्र लिहिण्याचा खटाटोप.

शिक्षण संपलं, तुर्तास करीअर बाजूला ठेवून पालकात्वाची जबाबदारी स्विकारायचे ठरले. लवकरच आपण आई होणार ही कल्पनाच किती सुखावह होती. नुसती कल्पनाच एवढे सुख देऊन जाते तर तो आई होण्याचा क्षण कोणत्या परिमाणात मोजणार मी.

झाली, प्रेगनन्सी कन्फर्म झाली. पण ही खुशखबर अजून कोणालाच सांगितली नाही. किमान २-३ महिने होऊ द्यावेत मग सगळे नॉर्मल आहे कळले की सगळ्यांना सांगूयात. तेव्हा जर तुझ्याशी बोलणे झाले असते तर तू न सांगता ओळखले असतेस ना?
व्हिएन्ना सोडून डब्लीनला वास्तव्यास आलो. डब्लीनची मेडिकल सेवा पाहता, तसेच तिथल्या मैत्रिणींचे अनुभव ऐकून भरतात जाणेच योग्य. भारतात मी एकटिने येण्याचा निर्णय ठरला. जरी एकटिने येत होते तरी गणगोतात परतत होते. "अग तू चान्स तर घे तुझे बाळंतपण आम्ही आमच्या घरी करू" असं म्हणणार्‍या गणगोतात.

आले, पण तू घरी नव्हतीस. रितसर डॉ.च्या भेटी सुरू झाल्या. बाळाची वाढ छान आहे. पुढच्या चेकअपला वेळेवर या.. हे सुरू झाले.
भाऊ, वहिनी सगळे तिथेच राहण्याचा आग्रह करत होते. माहेरी तरी किती रहायचे आणि ते पण बाळंतपणाअगोदर.
तुझं बाळंतपण आम्ही करू म्हणणार्‍या गणगोताला मी फक्त बाळाला जन्म देण्यासाठी भारतात परतणार नाही ह्याचीच खात्री असावी, कारण मी परतलेय म्हणून कोणालाच आनंद नव्हता. आम्ही तिला ये म्हटलोच नाही हे पण म्हणून झाले. आता काही परतता येणार नव्हते. तू ईथे माझ्याजवळ राहिली असतिस ना? पण तू घरी होतिसच कुठे?
ह्या शेवटचा महिना संपत आलाय, स्वाती सोबत आहे. पण हल्ली बीपी वाढतोय, सुज वाढतेय. डॉ. ची काळजी पण वाढतेय तसेच दवाखान्याच्या खेपा पण रोजच्याच झाल्यात. खूप एकटं एकटं वाटतय. आज तर डॉने अ‍ॅडमिट करून घेतलय. दोन दिवसांनी बीपी जरा कमी झालाय. घरी जाऊन विश्रांती घे म्हणून सक्त ताकिद मिळालिय. सोबत स्वाती होतीच की, मग आराम तर होणारच ना, पण एकटेपण त्रास देतय.. कारण तू घरी नाहीस.

आज सोनोग्राफी झालीय. नऊ महिने भरुन गेलेत. आज उद्या बाळ ह्या जगात येणार. डॉ. सांगतायेत की आजच अ‍ॅडमीट होऊन घे, नाहितर रात्रीची धावपळ करावी लागेन. तशी सगळी तयारी करुन झालिय, घरी दवाखान्याची बॅगपण भरून तयार आहे, बॅगेत काही कमी जास्त बघायला तू घरी नाहिस.
बरं घरी जाऊन सामान घेऊन येतो, म्हणजे अ‍ॅडमिट होण्याच्या तयारीने येतो म्हणेस्तोवर अचानक खूप रक्तस्राव व्हायला लागला. दवाखान्यात फक्त आम्ही दोघीच, मी आणि स्वाती.
ईमर्जन्सी सिझर करण्याचा निर्णय डॉ. घेतला. स्वातीने गलांडे दादांना बोलावून घेतले. आईच्या मायेने डोक्यावर हात ठेवून त्यांनी सांगितले काळजी करू नकोस. आम्ही आहोतच ईथे. त्या क्षणाला वाटले की तुच आहेस माझ्यासोबत.
सिझर झाले. बाळ अगदी गुटगुटीत पावणेचार किलोचा झाला. माझ्या आधी तोच सगळ्यांना भेटला. मी बाहेर येऊन पहातेय तर रूम खच्चून भरलीय. अनिल भाऊ,ईंद्रनिल, मामा, मामी, चुलत दिर किरण, गलांडे दादा, गलांडे ताई म्हणजे नंदाताई, गलांडे दादांच्या आई. तू मात्र तिथे नव्हतीस.
पाचव्या दिवशी घरी आले. पाचवीची पुजा करायची, सासूबाई पण होत्याच. बाई पण आली. तू आज पण नव्हतीस म्हणून लेकीच्या जागेवर ती पाचवीची पूजा करायला आली होती. शिवाय माझ्याजवळ राहणार होती.
सहाव्या दिवशी सासूबाईंनी खोबर्‍याचे कालवण करते म्हणून सांगितले, म्हटलं त्यात एखादी भाजी पण घाला. नुसतं खोबर्‍याच कालवण नको मला.
मग काय बटाटं खाणार आहेस?
जेवणाच्या ताटात खरोखरी बटाट्याची भाजी होती. तू आजही नव्हतीस.
पाचव्याच दिवशी मी गार पाण्यात हात घातला कारण तू ईथे नव्हतीस. भावजया माझ करतायेत म्हणून मी तरी त्यांच्याकडून किती करून घेणार?
काकू भेटायला आली, एक दिवस मुक्कामाला राहीली, नातू मात्र मांडीवरच. दुसर्‍यादिवशी बाईसोबत त्यांनीच त्याला आंघोळ घातली. आज पहिल्यांदा बाळाला आजीचे लाड मिळत होते.
सव्वा महिन्यांनी घरी माहेरी आले.. तू आजही घरी नव्हतीस.
स्वातीने, रजनीने तुझ्या माघारी माझे बाळंतपण केले. बाई तीन महिने राहून निघुन गेली. तुझी जबाबदारी ती तरी किती दिवस सांभळणार? केवळ तू नव्हतीस म्हणून मी एकटी पडले. किती रडले..कधी कधी तर धाय मोकलून, गळा काढून रडले, पण माझ्या रडण्याने तू थोडीच येणार होतिस.
तू जाते वेळी वाटले होते की तुझ्या नसण्याने मी रडत बसणार नाही, होतेच मी तेवढी धीराची, तुझ्या आठवणींवर जगता येईन असा विश्वास होता पण तो खोटा ठरला.
तू जायची घाई केलिस की मी बाळ होऊ द्यायला ऊशीर केला? की हे दोन्ही व्हायचे त्याच वेळेवर होणार होते आणि मला आई नसतानाच आई व्हायचे होते?

बाळ शांडिल्यकडून आजीला एक गोड पापी.

तुझीच,
नलिनी

विषय: 
प्रकार: 

आईची जागा खरंच दुसरं कोणी घेऊच शकत नाही. आणि स्वतः मातृत्वात शिरताना आपल्या आईचा मायेचा हात आपल्या कपाळावर फिरत नाही ह्यासारखी यातना नाही! खूप भावुक लेख.

आईची जागा खरंच दुसरं कोणी घेऊच शकत नाही. आणि स्वतः मातृत्वात शिरताना आपल्या आईचा मायेचा हात आपल्या कपाळावर फिरत नाही ह्यासारखी यातना नाही >> अगदी मनापासुन हेच वाट्ल.

हे वाचताना अंगावर सरसरुन काटा आला आणि डोळ्यात पाणी...
पण यालाच जीवन ऐसे नाव!!!
हेच आईपण, निर्व्याज प्रेम आता तुम्हाला तुमचा बाळाला द्यायचा आहे...
सर्व मातांना मात्रुदिनाच्या शुभेच्छा!!!

Pages