व्याकूळ

Submitted by आनंदयात्री on 7 April, 2008 - 06:41

एक एकाकी निशा व्याकूळ आहे
टोचणीचे मस्तकी वारूळ आहे

भोवताली वेदनांचे पूर हृदयी
मध्यभागी वंचनेचा सूळ आहे

ऐकले होते बिछाने पाकळ्यांचे
मंचकी या कोवळे बाभूळ आहे

आठवांचा अंतरी कल्लोळ आहे
शांतता बाहेरची मंजूळ आहे

जागती राधा कुणी, कान्हा कुणी अन्
सर्व बाकी पेंगते गोकूळ आहे

जे तुझे नाही तुला मिळणार कैसे?
हे तुझे कसले अभागी खूळ आहे?

गुलमोहर: 

छान गज़ल ,शेवट्चे दोन शेर आवडले

मस्त आहे. शेवटच्या २ ओळि छान आहेत.

छान!
सूळ आणि खूळ हे शेर आवडले.
बाभूळ - नीटसा कळला नाहिये, पण डोक्यातून जात नाहिये अगदी!!

आनंदयात्री, सुंदर गजल!
एक एकाकी... इथूनच आवडली.
सगळेच शेर अगदी आवडले. बाभूळाचा नीटसा कळला नाही, मलाही.
शेवटचा शेर - 'अभागी खूळ'- आरपार शब्द प्रयोग आहे.

बाभूळाचा आणि शेवटचा शेर मस्त आहे.
निशेचा आणि मस्तकी टोचणी असण्याचा संबंध उमजला नाही.
४ थ्या शेराची गरज वाटत नाहीये.
बाकी छान.

आगदि सुरेख.

मंचका वरिल बभुळ, जागे राधा कॄष्ण वा!वा!!वा!!!

चांगली गझल.
शेवटचा शेर विशेषच छान आहे.

मला पण मतल्यातील दोन्ही मिसर्यांचा परस्परसंबंध लागला नाही

सूळ पण नीटपणे उमजला नाही पण तो मा.बु.दो.स.

बाभूळ च का आणि ते कोवळेच का ह्यात काही विशेष अर्थ दडला आहे का?

बाकी शेवटचे दोन खूप आवडले

visit http://milindchhatre.blogspot.com

चांगली गझल!!! बाभूळ आवडला.

मतल्याच्या बाबतीत मिल्याशी सहमत!!

भोवताली वेदनांचे पूर हृदयी >> हे वाचताना भोवताली की हृदयी असा प्रश्न पडतो. हा मिसरा अजून स्पष्ट करता येईल का?

सर्वांना धन्यवाद...

मुसलसल गझल लिहायला घेतली होती...
"एक व्याकूळ रात्र" असा आशय होता...

मयूर, मिल्या,
रात्रभर डोक्यात कसलीतरी टोचणी आहे, या अर्थी मिसरा आहे...

बाभूळ म्हणताना काटे अभिप्रेत होते. "कोवळे बाभूळ" इथे कोवळे असले तरी आमच्या नशिबी बाभूळ होते असं म्हणायचंय, त्यात कमी पडलोय का?

नचिकेत,
हृदयात भोवताली वेदना आणि मध्यभागी सूळ असा आशय आहे.

मयूर,
चौथा शेर माझ्या मते त्या वातावरणाच्या वर्णनात आणखी भर घालतो..

चु.भू द्या घ्या..