खाक

Submitted by दाद on 21 August, 2008 - 00:55

माझिया हास्यात थोडी वेदनेची झाक आहे
बंद ओठांमागुती व्याकूळलेली हाक आहे

ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे

भेटण्या येशील का तू चांदण्याच्या पावलांनी
विसर सारे मागचे, माझा इरादा पाक आहे

त्या तिथे फुलण्यात अन बहरात येण्या दंग तू
टाकली जी कात येथे, तिज गुलाबी झाक आहे

आसवांची ओल ना कामास ये सरणावरी का?
हा उरी वैशाख सखये, मी कधीचा खाक आहे

(सांग जा, सार्‍या जगाला, ’मी तुझ्या ना लायकीचा,
घेतले हातात जे, ते भस्म नाही राख आहे’

सांग कोणाला जपू मी, तू मला विझवून जा ना
भेटणार्‍या सावल्यांचा कागदी पोशाख आहे)

-- शलाका

गुलमोहर: 

ही गजल म्हणून पहिल्यांदा जुन्या मायबोलीवर लिहिली तेव्हा, अनेकानेक ठिकाणी गुटली खाल्ली होती- वृत्तांत, यमक्-अंत्य यमक इ. गुर्जी आणि बाईंनी समजावलं होतं की कशा कशामुळे गणपतीचा मारूती झालाय Happy
त्यावर परत काम करेन असं मोठ्या तोंडाने तिथे म्हटलं होतं. ते हे!
माझ्याकडच्या मूळ प्रतीवर काम करायला सुरूवात केल्यावर लक्षात आलं की, मूळची ठेवायला हवी होती. शिकणार्‍यांसाठी उत्तम उदाहरण झाली असती - ती कविता गजल का नाही ह्याचं Happy
असो... शेवटचे दोन शेर ठेवलेत. धाक, पाक, झाक, खाक असताना राख अन पोशाख ह्यांचे काफिये चालत नाहीत हे दाखवायला (आणि शिवाय मला बेहद्द आवडलेल्या कल्पना... टाकवत नाहीयेत हो )

दाद, भावना पोहोचल्या. आता थोडा आगाऊपणा....

ज्यांच्यासाठी झिजलो , गर्व ही होता जयांचा
आज त्यानीच माझे, कापलेले नाक आहे
मोडेन मी एकवार, वाकणार नाही कधी
बोललो अन विसरलो, आज पाठी बाक आहे
कोकीळेचा आव आणि बाज ही पोपटाचा
चोच खोलताच कळले, हे सारे काक आहे
चिणले पायात ज्यांनी, इमले ते बांधताना
वदले वाहुनी फुले, हा बळी हकनाक आहे

पटलं तर हो म्हणा नाहीतर 'डिलीट की ' आहेच.

>>ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे

वाह! टाळण्याची ना मुभा मध्ये गझलेची वेदना व्यवस्थित मांडली आहे. पहिले तीन मिसरे सुंदर..

आधी वाचल्याचे आठवतीय ही. वा दाद कल्पना सर्वच खूप छान आहेत नेहमीप्रमाणेच...

शेवटचा शेर मला झेपला नाही Sad
मा.बु.दो.स.

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे

      कौतुक, भावना पोचल्या? छान!
      नक्की काय म्हणायचय ते कळलं नाही. विडंबन करायचा प्रयत्नं असेल तर जरूर विडंबन भागात घाला. चांगलं आहे.
      तेच मिटर आणि यमक वापरून गजल लिहायचा प्रयत्नं असेल, तर स्तुत्य आहे, पण अजून थोडं वृत्तवर काम करावं लागेल.
      पण मला काही सांगायचा प्रयत्नं असेल तर गद्यात सांगितलत तर व्यवस्थित कळेल.
      मला काय पटलं तर मी हो म्हणायचय ते कळलं तर ठरवता येईल - हो की नाही.
      डिलीट करण्यासारखं काही आहे का तुमच्या प्रतिसादात?

      ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
      टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे
      >> जबरी.

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
      क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

      दाद, गजलमधल्या भावना पोहोचल्या. जी काय थोडी फार गजल कळते, त्या हिशोबाने गजलेतील शेर समजुन घेण्याचा प्रयत्न केला. विडंबन मनात नव्ह्ते. काही काफीयांचा तुम्ही उल्लेख केला होता, त्यात हे काफीये सुचले. म्हणुन आगाऊपणे खरडलं. जे खरडलंय ते जर पटलं वा योग्य वाटल तर कळवा व नाही पटलं तर डिलीट करा ही नम्र विनंती होती. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे जर वृत्तात नसेल तर हेच वृत्तात कसे बसेल ते सांगितले तर फार बरे. माझ्या या आगाऊपणामु़ळे झालेल्या त्रासाबद्द्ल क्षमस्व.

      कौतुक, "पटण्या न पटण्यासारखं" काही त्यात नाही त्यामुळे मला कळलं नाही की तुम्ही काही सांगायचा प्रयत्नं करताय की काय. त्रास नाही हो (का रे?).
      असो.

      ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
      टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे

      आसवांची ओल ना कामास ये सरणावरी का?
      हा उरी वैशाख सखये, मी कधीचा खाक आहे >>>>> आवडेश!

      परागकण

      दाद. खुप आवडली गझल. मनातल्या मनात ४ -५ वेळा म्हणत राहिलो लयीमधे आणि आणखीनच भावत गेली प्रत्येक वेळी. प्रत्येक ओळ अप्रतिम. तुमची जुनी कविता नाही वाचली मी पण ही गझल मात्र.. केवळ अप्रतीम!

      शलाका,

      तू म्हणतेस की ग़ज़ल रचण्याचा प्रयत्न करतेय. इथे तर मी एक क्लासिक ग़ज़ल पाहतो आहे.

      <<ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
      टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे

      भेटण्या येशील का तू चांदण्याच्या पावलांनी
      विसर सारे मागचे, माझा इरादा पाक आहे>>

      हे दोन्ही शे'र आवडले आणि मत्लासुद्धा आवडला.

      <<त्या तिथे फुलण्यात अन बहरात येण्या दंग तू
      टाकली जी कात येथे, तिज गुलाबी झाक आहे>>

      पहिल्या ओळीत काहीतरी खटकते.

      तुझ्याप्रमाणेच माझंसुद्धा लय-ताल यांच्याशी काहीतरी नाते असावे असे वाटते. मला सहसा ग़ज़ल रचता रचता चाल सुचते. गंमत म्हणजे कुठलीही कविता लयीतच वाचण्याची सवय असल्याने "दंग तू" लगेच खटकले. कदाचित टायपिंग करताना "तूही" च्या जागी तू झाले असावे.

      शरदचंद्र पाटील (शरद)

      [माना कि इस ज़मीं को न गुलजा़र कर सके
      कुछ खार कम तो कर दिये, गुज़रे जिधर से हम] साहिर लुधियानवी

      मतला खूप आवडला.

      आसवांची ओल ना कामास ये सरणावरी का?
      हा उरी वैशाख सखये, मी कधीचा खाक आहे

      (सांग जा, सार्‍या जगाला, ’मी तुझ्या ना लायकीचा,
      घेतले हातात जे, ते भस्म नाही राख आहे’

      हे दोन शेरही खूप आवडले. तुम्ही म्हणालात तसे राख हा काफिया या गझलेला चालणार नसला तरी ती कल्पना (विशेषतः 'भस्म नाही राख' ही शब्दरचना) भन्नाट आहे.

      दाद ग दाद, तुला किती द्यायची दाद Happy मलाही ही गझल आधी वाचल्याचे आठवते, पण तेव्हा गझलेची ABCD ही माहीत नव्हती.
      ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
      टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे>>.
      सर्वात जास्त आवडला Happy

      *****************
      सुमेधा पुनकर Happy
      *****************