मिश्र धान्यांचा उपमा

Submitted by kalpana_053 on 5 September, 2008 - 03:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येकी पाव किलो हिरवे मूग.....तांदूळ.....बाजरी.....गहू, जीरेपूड १ चमचा, मीठ चवीपुरते, तिखट अर्धा चमचा, दही चार चमचे, हिंग चिमूटभर, हळद पाव चमचा, ढोबळी.....कोबी....दूधी भोपळा.....मेथीची मूठभर पाने..... पालकाची मूठभर पाने..... कोथिंबीर...... मोड आलेली कोणतीही कडधान्ये मूठभर.

क्रमवार पाककृती: 

प्रथम मूग, तांदूळ, गहू, बाजरी वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. नंतर ते सर्व वेगवेगळेच मिक्सरमधून काढून त्याचा रवा काढावा. प्रत्येकाचा टणकपणा वेगवेगळा असल्याने भाजणे व रवा काढणे वेगवेगळेच करावे. नंतर तो सर्व एकत्र मिक्स करावा व बरणीत भरून ठेवावा. भाजलेला असल्याने खूप महिने टिकतो.
नंतर चार वाट्या पाणी जाड बुडाच्या भांड्यात घेऊन उकळण्यास ठेवावे. पाण्यात तिखट, चवीपुरते मीठ, दही, हळद, हिंग, टाकून वर सांगितलेल्या किंवा घरात असतील त्या भाज्या.... कडधान्ये एक्-एक मूठ या प्रमाणाने त्यात टाकावे. तीन मिनिटे चांगले उकळू द्यावे. नंतर त्यात पूर्वी केलेल्या धान्यांचा एकत्रित केलेला रवा अंदाजे एक वाटीभर घेऊन त्यात हळूहळू सोडावा. चांगले उलथन्याने हलवून घेऊन मंद गैसवर ३-५ मिनिटे शिजू द्यावे. हलवत रहावे म्हणजे गुठळी होणार नाही. शिजले की रंगही बदलतो. गरम गरम डिशमध्ये घेऊन त्यावर साजूक तूपाची धार टाकावी व खाण्यास द्यावे. आजारी माणसे, बाळंतीण व वजन कमी करण्यासाठी "भरपूर पोटभर खायला हरकत नाही" असा पोटभरीचा पदार्थ होतो. धान्य भाजलेले असल्याने पचायला पण हलके असते. तेलाचा वापर नसल्याने वजन कमी करणा-यांनाही भरपूर खाल्ले तरी अंगात ताकद वाटून पोटही भरल्याचा आनंद मिळतो. भाज्या-कडधान्येही पोटात जातात. विशेषतः ढोबळी....कोबीची चव ह्यात खूप छान लागते.

वाढणी/प्रमाण: 
तीन जणांसाठी
अधिक टिपा: 

याच प्रमाणामध्ये गोडही करता येते. फक्त पाण्यात भाज्या व तिखट्-मीठ वगैरे न टाकता एक वाटी गूळ घालावा व किंचित मीठाची कणी. गुळामुळे आयर्नही मिळते. मिश्र रवा जास्त प्रमाणात करून ठेवल्यास हा पदार्थ करण्यास फक्त दहा मिनिटे लागतात.

माहितीचा स्रोत: 
--
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे पोस्ट चुकीच्या ठिकाणी टाकले गेले आहे. कृपया गणेशोत्सव स्पर्धेच्या बीबी वर टाकावे.
-अनिता

कल्पनाताई, छाने पाककृती. एकदा रवा करून ठेवला की सोपे पडेल वरचेवर करायला.

कल्पना,
तुमची प्रवेशिका तुम्ही योग्य ठिकाणी पाठवा गणेशोत्सवाच्या पाककला स्पर्धेसाठी.
http://www.maayboli.com/node/3307 या दुव्यावर जावुन तुम्हाला ती प्रवेशिका स्पर्धेसाठी कशी पाठवायची त्याचा दुवा दिसेल. तो वापरुन तुम्ही प्रवेशिका पाठवा.

छानच आहे. फोडणीपण नाही म्हणजे एकदम हेल्दी.

खुपच मस्त !!!! .. खायला मजा आहे... योग्य जागेवर पोस्ट करा...