दुर्गप्रेमी आप्पा

Submitted by चिनूक्स on 3 September, 2008 - 00:00

gonida.jpg

एक बहुपेडी व्यक्तित्व म्हणून गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर, म्हणजे गोनीदा, उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. एक विलक्षण, समृद्ध आयुष्य ते जगले.. गांधींच्या हाकेला धावून ते 'एका वर्षात स्वातंत्र्य मिळवायला' घरून निघाले. त्या वेळी भ्रमनिरास झाल्यावर हेलपाटले. मग गाडगेबाबांचे शिष्य होऊन समाजजागरण करत हिंडले. वारकरी शिक्षणसंस्थेत राहिले. सोनोपंत दांडेकर आणि श्रीधरशास्त्री पाठक यांच्या सहवासात आले. ज्ञानेश्वर, तुकाराम अभ्यासले. नंतर गीताभाष्याचा अभ्यास केला, नर्मदापरिक्रमा केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं.
प्रचंड सोसूनही आयुष्यावर, इतिहास, शिवाजी, किल्ले, महाराष्ट्र यांवर भरभरून प्रेम केलं.

'पवनाकाठचा धोंडी', 'पडघवली', 'जैत रे जैत', 'मोगरा फुलला', 'मृण्मयी', 'दास डोंगरी राहतो', 'तुका आकाशाएवढा', 'शितू' या त्यांच्या कादंबर्‍यांनी अनेक पिढ्यांना पुरतं भारावलं आहे. भटकंतीत रमणार्‍या, डोंगरदर्‍या तुडवणार्‍यांना वाट दाखवावी म्हणून लिहिलेली 'दुर्ग दर्शन', 'महाराष्ट्र दर्शन' ही पुस्तक लोकांनी त्यांना प्रेमाने दिलेली 'दुर्गमहर्षी' ही पदवी सार्थ ठरवतात. 'कुणा एकाची भ्रमणगाथा' तर मराठी साहित्यातील एक लखलखतं लेणं आहे.

डॉ. वीणा देव या गोनीदांच्या कन्या. एक समर्थ लेखिका म्हणून त्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचं स्थान आहे. 'आशक मस्त फकीर' हे पुस्तक म्हणजे वीणाताईंनी गोनीदांचे रेखाटलेले ललित व्यक्तिचित्र. वडील, लेखक, दुर्गप्रेमी या विविध भूमिकांतील गोनीदांचा घेतलेला एक शोध. आपल्या 'दुर्गप्रेमी आप्पांच्या' म्हणजे गोनीदांच्या, वीणाताईंनी या काही सांगितलेल्या आठवणी...

------------------------------------------------------------------------------------------

वारकरी ज्या निष्ठेनं आणि श्रद्धेनं पंढरपूरला जातात, त्याच भावनेनं आप्पा किल्ल्यांवर जात. अगदी पंचाहत्तरीतही त्यांना तिथं जावंसं वाटे. वयाच्या सत्तरीपर्यंत तर ते सतत किल्ल्यांवर जात होते. त्यांना गड वेध लावायचे. लहानपणी झालेल्या संस्करांतूनच त्यांचं हे दुर्गप्रेम जन्माला आलं होतं. घरातले स्वराज्यवादी विचार आणि 'उषःकाल', 'सूर्योदय', 'कोरलईचा किल्लेदार', हडपांनी लिहिलेल्या शिवशाहीवरल्या कादंबर्‍या ह्यांतून त्यांचं शिवप्रेम अधिक वाढत गेलं. त्या कादंबर्‍यांमध्ये आलेली किल्ल्यांची वर्णनं, ती भुयारं, त्या खिंडी, ती घनघोर युद्धं, त्यांतला गनिमी कावा ह्या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्या मनावर असल्यानं किल्ल्यांबद्दलचं स्वाभाविक कुतूहल त्यांना होतं. त्यापोटीही ते खूप भटकले. मग 'दुर्ग' हा त्यांचा प्रेमाचा विषय झाला.

लग्नानंतरही नोकरी-व्यवसायात गुरफटवून न घेतल्यानं मुक्त तर ते होतेच. सुट्टीचे मुहूर्तही त्यांना शोधावे लागत नसत. केव्हाही उठावं, आणि पाठीवर पिशवी घेऊन गडावर जावं. पिशवी नेहमी भरलेली असायची. आपल्या आप्तमित्रांना बरोबर घेऊन जावं. पण हीही मर्यादा नव्हती. कोणीही 'गड बघायचा आहे एकदा' असं म्हणावं, आप्पा त्यांच्याबरोबर जायला एका पायावर सज्ज! तर्‍हतर्‍हेच्या आणि ठिकठिकाणच्या शेकडो लोकांना त्यांनी गडयात्रा घडवल्या आणि त्यांसंबंधी ललित लेखन करून अनेकांना गडप्रेमात सहभागी केलं.

आम्ही कुटुंबीय मंडळी बरेचदा त्यांच्याबरोबर जायचा प्रयत्न करीत असू. आई आणि विजय त्यांच्याबरोबर सर्वाधिक हिंडले. त्या तुलनेनं माझी नाजूक तब्येत आणि शाळा-कॉलेज ह्यांमुळं मी कमी हिंडले.

मी अगदी तीन-चार वर्षांची असताना त्यांनी मला रायगडला नेलं होतं. ते मला आठवायचं कारण म्हणजे त्या वेळी समाधीजवळ काढलेला एक फोटो मला अनेकदा दाखवला जाई. त्यात मी आईच्या कडेवर बसलेली आहे. त्यानंतर साधारण दहा-अकरा वर्षांची झाल्यावर कितीदा तरी त्यांच्याबरोबर गेले. ती स्मरणं अमिट आहेत.

किल्ल्यावर जायचं, म्हणजे आमच्या घरी सणासुदीसारखी गडबड. एस्.टीची रिझर्व्हेशन्स करण्याची घाई. ती स्वतः पुण्याला जाऊन किंवा कोणाला पाठवून करवून घ्यायची. नेहमीच पाच-दहा जास्त करायची. कित्येकदा दुप्पटही. एखाद्यानं काही घोटाळा केला, तर?

रिझर्व्हेशन्स झाली, की मोर्चा पिशवीकडे वळायचा. त्यांच्या पाठपिशवीत बॅटरी, चाकू, दोरी, काही जुजबी औषधं कायम असायची. मग निघण्यापूर्वी तांदूळ, डाळ, मसाला, कांदा, तेल, फोडणीचं सामान, पापड अशा वस्तू तीत जमा व्हायच्या. वळचणीची पांढरीची काठी निघायची. आणि मग पुकारा व्हायचा:
"नीरे, राजी, तुमची पायताणं पाहू?"
(माझं 'वीणा' हे नाव त्यांनीच ठेवलं असलं, तरी ते मला म्हणत 'राजी'.)

मग आमची पायताणं स्वतः तपासायची, त्यांची मजबुती पाहायची; आणि मग त्यावर पसंती किंवा नापसंतीचा शिक्का.

एस्. टी. सुटण्याआधी अर्धा तास स्थानकावर हजर राहण्याचा फतवा आधीच निघालेला असायचा. कारण लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून यायचे असायचे. सगळ्यांच्या आधी आप्पा हजर.

एस्. टी. सुटल्यापासून ते आनंदात असायचे. मनानं मुक्त झाल्यासारखे दिसायचे. एरवीचं त्यांचं हरवणं, मग्नपण ह्यांतूनही. उतरायचे, ते एकदम मुक्कामीच. एरवी चहा-पाणी, खाणं-पिणं अशी प्रवासातली मौज ते सहसा कधी करायचे नाहीत.
मुक्कामाला उतरल्यावर सगळे उतरले की नाही, ते पाहून चालायला सुरुवात! दृष्टी लागलेली त्यांच्या गडकोटतीर्थाकडे. मन तिकडे ओढ घेत असलेलं.

सर्वांत पुढे स्वतः आणि मागे त्यांच्या विश्वासातला, चढण्याचा सराव असणारा गडयात्री, अशी योजना. 'काही संकट आलं, तर पुढं मी असेन', म्हणायचे.

त्यांच्या मागे जाणारी पहिली तुकडी झपाट्यानं चालणार्‍यांची आणि गडप्रेमी दाण्डेकरांबरोबर किल्ला पाहायला आलेल्या उमेदवारांची.

आम्हा बायकांचा चालण्याचा दम तितपतच, आणि गप्पिष्टही आमच्यांत सामील! स्वाभाविकच आम्ही दमायचो. रेंगाळायचो. पुढं गेलेले आप्पा आमच्यासाठी टप्प्याटप्प्यावर थांबायचे. तिथपर्यंत पोहोचलो, की आम्हांला धप्पदिशी बसायचं असायचं. कारण पाय बोलायला लागलेले, आणि शरीर घामाघूम. पण आप्पा बसू द्यायचे नाहीत. म्हणायचे, "बसलात, तर आणखी थकाल. उभं राहून दम खा. पाणीही घोटभरच प्या. घटाघट पिऊ नका."

आम्ही शक्य तितकं त्यांचं ऐकायचो. मग आमचा थोडा दम खाऊन झाला, की पुन्हा पुढं.

आप्पा एक तर भल्या पहाटे गड चढायला लावायचे. किंवा संध्याकाळी. त्यामुळं उन्हाचा त्रास टळे.

चढताना वर पाहावं, तर छाताडावर असलेला मोठ्ठा डोंगर आणि खुणावणारे तट-बुरूज. किल्ल्यावर एकदा चढायचं ठरवलं, की वर पोहोचण्याखेरीज पर्याय नसतो. हिंमतच बांधावी लागते. मग आप्पा, ' आता अगदी थोडं राहिलं. हा एवढा वळसा घेतला, की झालं!' असं म्हणत म्हणत आम्हां थकल्या भागलेल्यांना वरपर्यंत न्यायचे. अगदी शेवटच्या टप्प्यावर मात्र ते आपल्या गडमित्रांवर आम्हांला सोपवून पुढं जात. त्या चढाला आमचा शेवटचा मुक्काम असायचा. खरं तर, अगदी दहा-पंधरा मिनिटांची गोष्ट असायची. पण विश्रांतीशिवाय आम्हांला एक पाऊल टाकणे शक्य नसे. मग एखादा छोटासा धोंडा शोधून, किंवा झाडाचं खोड पाहून आम्ही विसावायचो. घामेजलेल्या अंगावर थंडगार वार्‍याचा सुखद झोत घेत उठूच नये वाटायचं. पण किल्ल्याच्या तटावरून आप्पांची हाक यायची.
"उहूहू SS - राजी SS आलेका आलेका आलेका हूSSS?"

ती हाक ऐकली, की खूप बरं वाटायचं. कारण ती किल्ल्याचा माथा अगदी जवळ आल्याची खूण. हाळी देण्याइतका तकवा त्यामुळं यायचा. मग नव्या अवसानानं वर जायचो. बुरूजात आप्पा पाण्याची कळशी घेऊन उभे असायचे. देवदूतासारखे वाटायचे त्या क्षणी ते. थकल्या शरीरांना ते पाणी म्हणजे अमृत वाटायचं. पाणी पिऊन झाल्यावर ओल्या हातांनी डोळ्यांना आणि मानेला दिलेला तो पाण्याचा गारवा आणि त्यावर गडावरच्या मोकळ्या हवेचा झालेला थंडगार स्पर्श. अतिशय सुखद.

मग आप्पा आमच्या ह्या शेवटच्या तुकडीसाठी '...बा आदब बा-मुलाहिजा' अशी ललकारी द्यायचे. आम्ही उशिरा, धापा टाकत का होईना, पण न कुरकुरता वरपर्यंत गेल्याचं ते कौतुक असायचं.

वर गेल्यावर सुरू व्हायचं एक सर्वस्वी निराळं जीवन. टाक्यातल्या थंडगार पाण्यानं हात-पाय धुतल्यावर बराचसा शीण कमी व्हायचा. त्या दिवशीचा स्वयंपाकही आप्पांनीच केलेला असायचा. घरीही आप्पा अनेकदा हौसेनं स्वयंपाक करायचे. मुगाची आमटी, मुगाची खिचडी आणि 'महाद्या' (शेंगदाण्यांच्या कुटाचं पिठलं) फार चविष्ट करायचे. त्यामुळे त्या जेवणाची उत्सुकता असायची. मग त्या रुचकर जेवणानं समाधानी होऊन, आपण किल्ला किती सहजपणे चढलो, असं दमलेल्या सोबत्यांना सांगत झोपी जायचं.

माझं पहिलं किल्ल्याचं स्मरण आहे सिंहगडाचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही किल्ल्यावरच्या टिळकांच्या बंगल्यात राहिलो होतो. पंधरा-वीस दिवस राहिलो असू. आमच्याबरोबर इंदूमावशी (इंदूताई टिळक) आणि दीपक असे दोघेही होते. तो बंगला रिकामाच होता. आम्हां सर्वांच्या पथार्‍या तिथं पडल्या. चुली पेटल्या आणि बंगला गजबजला.

त्या लहान वयात किल्ल्यावर चढण्याचा शीण मुळीच जाणवला नव्हता. आप्पांच्या पहिल्या तुकडीबरोबरच मी किल्ल्यावर पोहोचले होते. रात्र झाली होती.

सिंहगडावरची पहिली सकाळ स्पष्ट आठवते. आप्पांनी पहाटेच हाक मारली होती. उठायचं जिवावर आलंच होतं. पण त्यांनी पर्यायच ठेवलेला नव्हता. ते मला घेऊन पूर्वेच्या तटावर गेले, आणि मी खरोखर मंत्रमुग्ध झाले. ते लांबवर दिसणारं स्वच्छ, हिरवंगार सृष्टीचं रूप, त्यावर सह्याद्रीच्या शिखरांचं दिमाखानं मिरवणं. त्यांच्या तळाशी दिसणारं सूर्यप्रकाशात चकाकणारं नद्यांचं पाणी - एका दृष्टीच्या टप्प्यात हे इतकं सगळं मी कधी पाहिलंच नव्हतं. त्या दिवशी जीव अगदी हरखून गेला होता, एवढंच आठवतं. आप्पा म्हणाले होते, "मग? म्हणूनच तर झोपेतनं उठवलं लवकर!"

किल्ल्यावरच्या पहिल्या सकाळी नेहमीच ते सूर्योदयाला किल्ल्याचा भवताल दाखवायचे; आणि किल्ल्याच्या भोवती दिसणार्‍या प्रदेशाची ओळख करून द्यायचे. आसपासचे किल्ले, नद्या, पठारं असा भूगोल आम्हांला अगदी डोळ्यांसमोर दिसायचा. सिंहगडावर ते सगळं आप्पांकडून ऐकताना त्यांच्या जाणकारीविषयी खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण मी भूगोलाची 'ढ' विद्यार्थिनी.

सिंहगडावर आप्पा पूर्वी अनेकदा आलेले. त्यामुळे त्यांना किल्ला चांगला परिचित. आमच्या त्या दीर्घ मुक्कामात त्यांनी तो सवडीसवडीनं दाखवला. पण तिथं ऐतिहासिक वास्तू फारशा नव्हत्या; आणि मलाही उनाडण्यात अधिक रस असायचा.

सकाळची पहिली चहा-पाण्याची फेरी होऊन आम्ही भटकायला निघायचो. आप्पा हिंडताना सारखं काहितरी शोधत असायचे, आणि त्यांना सापडायचंही काय काय! तोफेच्या गोळ्यांचे तुकडे, शिशाच्या गोळ्या, इतिहासकालीन खापरांचे , रांजणांचे तुकडे, बांगड्या, मणी. मीही मान दुखेपर्यंत शोधायची. पण क्वचित कधी एखादी गोळी मिळाली, तर! तिच्यावर पांढरा साक साठलेला असायचा. त्यामुळं ती भुरकी दिसायची. आकाराची निश्चिती नसे. कारण कधी ती न फुटलेली, कधी फुटलेली, पण ती मिळणं दुर्मीळच. एरवी गोळीसारखी दिसणारी भुरकी लेंडी हातात येऊन फजितवाडाच अधिक व्हायचा.

त्या वेळी खरी मजा वाटली होती. ती मुक्तपणे हिंडायला मिळे, त्याची. तळेगावातले कोणतेच जाच गडावर नव्हते. माणसं नाहीत. घरं नाहीत. वाहनांचा तर प्रश्नच नाही - आणि वेळ पाळण्याचाही. त्यामुळं मजा यायची. आप्पा आमच्यांत सामील व्हायचे.

डोंगरकडेला जाऊन आम्ही जेवण्यासाठी चवेणीची पानं शोधून आणत असू. डोंगरावरची तर्‍हतर्‍हेची फुलं गोळा करीत असू. तिथल्या चार-दोन रहिवाशांना आमच्यासाठी दूध-दही राखायला लावत असू.

रोज संध्याकाळी किल्ल्याच्या एका टोकापर्यंत रपेट मारायचो. कधी पुणे दरवाजा, कधी कल्याण दरवाजा, कधी वार्‍याचं टोक, तर कधी तानाजीकडा.

तानाजीकड्याकडे जायला आम्हां पोरांना जास्त आवडायचं. कारण तिथं माकडपणा करायला मिळायचा. त्या कड्याच्या खालच्या काठाशी पाणी जाण्यासाठी वाटा ठेवलेल्या. चौकोनी. आकार माणूस खाली बसून जेमतेम जाईल, असा. त्यांतून सरपटत खाली कड्यापर्यंत जायचं. पुढं अर्थातच आप्पा. मग आम्ही पोरं, मोठी, लठ्ठ माणसं इथून कशी येऊ शकतात, ह्याचं आश्चर्य दरवेळी वाटायचं. कड्यापाशी उतरल्यावर नीटसं बूड टेकेल, अशी जागा पाहून बसायचं. आणि मग आप्पा बोलायला लागायचे:
"हा त्या लोकविलक्षण राजाचा किल्ला. ज्यानं रानातले मावळे हाताशी धरून स्वराज्य उभं केलं. त्यानं ह्या सगळ्या राहाळावर, तिथल्या साध्यासुध्या माणसांवर प्रेम केलं. आणि त्या माणसांना जिंकलं."
ऐकणारे सगळे त्यांच्या बोलण्यात वाहून जायचे.
"जिवाला जीव देणारी माणसं महाराजांनी कशी जपली, ह्याचं उदाहरण हा तानाजी, " असं म्हणत, ते सिंहगडावरचं युद्धपर्व उभं करायचे. किल्ले हे शिवकालीन स्वराज्याचं दर्शन आहे, असा भाव आम्हां सगळ्या ऐकणार्‍यांच्या मनात जागा व्हायचा, आणि मग त्या परिसराकडे पाहण्याची लहान-थोरांची दृष्टी बदलू लागायची. कळत असलं आणि नसलं, तरीही. घरी येताना त्यामुळं हुरहूर असायची.

सकाळी कधी कधी पोहायला जायचो. गणेश टाक्यात. आप्पा स्वतः अगदी मनसोक्त पोहायचे. पाण्याचा थंडगार स्पर्श हे सर्वांगांनी अनुभवत डुंबत असायचे.

मला आणि आईला पोहायला शिकवण्याचे प्रयत्नही त्यांनी इथेच केले. गणेश टाक्याला चारी बाजूंना आमच्या गोतावळ्याचा वेढा. आम्हांला डालडाचा डबा, नाहीतर दोर बांधून पाण्यात सोडलेलं आणि टाक्याचा कडेनं आमच्या बरोबरीनं हिंडणारे आप्पा. एकीकडे आम्ही घाबरत असल्यानं त्यांना राग यायचा, तर दुसरीकडे त्यांच्यातला शिक्षक जागा व्हायचा. मग माझ्या टुकार पोहण्याचं मुद्दाम केलेलं कौतुक, बरोबरीच्या पोरांना अधिक नावाजून मला चिडवायला पाहणं, किंवा पोहायला आल्यावरची बक्षिसं जाहीर करणं अशा युक्त्या. पण आम्ही दोघींनीही आम्हांला पोहायला शिकवायचा त्यांचा डाव हाणून पाडला. आठवतो, तो टाक्यातल्या पाण्याचा स्पर्श. डबा लावून त्यांच्या बरोबरीनं पाहिलेलं पाणसापाचं वळवळणं, आणि त्यामुळं पाण्यात अंगावर आलेला शहारा.

सिंहगडावरची एक सकाळ. तो दिवस होता महाराष्ट्रदिन. आम्ही सगळे उगवतीच्या खांदकड्यावर गेलो होतो. भोवताली झोंबरा वारा. त्याच्याशी लगट करणारं कोवळं ऊन. आमच्या अंगाला स्पर्श करणारं बुरुजावरचं गवत. दूरवर दिसणारं सूर्यबिंब आणि ह्या सगळ्यासह मनाला चेतवणारी गीतं. आप्पांच्या तोंडून तेव्हाच पहिल्यांदा कुसुमाग्रजांची 'सात' ही कविता ऐकली. त्यानंतर ती कितीदा तरी ऐकली. आप्पा गायक नसले तरी सुरेल म्हणत असत. शब्दफेक नेमकी असायची. आमच्या डोळ्यांसमोर ती प्रतापराव गुजरांची नाट्यपूर्ण कथा उलगडत जायची. आम्हां भोवताली बसलेल्यांच्यांत उभे असलेले आप्पा. त्यांची नजर दूरवर लागलेली, किंवा डोळे मिटलेले. उजवा हात अर्थानुसार हलत असलेला.

"...दगडांवर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्‍यावर गात..
वेडात मराठे वीर दौडले सात..."

आम्ही मंत्रमुग्ध व्हायचो, आणि त्या इतिहासाशी अलगद जोडले जायचो.

कधी एखाद्या कोटावर उभे राहून,"त्या राजानं ह्या प्रदेशाचं असंच दर्शन घेतलं असेल", असं म्हणत, एखादी इतिहासकथा सांगावी. एवढं मोठं कर्तृत्व गाजवलं असूनही, त्या राजाच्या किल्ल्यांकडे कोणाचं लक्ष नाही, असं म्हणत आम्हांला त्या भग्नतेच्या दु:खात सहभागी करून घ्यावं. तो इतिहास झुडुपा-गवताखाली विझून चालल्याची खंत करावी, आणि म्हणावं, "मी किल्ल्यावर तुम्हांला नेतो खरा, पण तुम्ही त्याचा इतिहास ध्यानी घेत नाही, तोपर्यंत हा नुसता भूखंड आहे. इथल्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे. तो जाणायला हवा. मग ही यात्रा सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसतीच पायपीट."

असं भावनिक आवाहन पुरेसं व्हायचं. त्या खांदकड्यावर त्या महाराष्ट्रदिनी आम्ही असेच भारले गेलो होतो. त्या दिवशी तिथं अनेक गीतं म्हटली. मुक्त कंठानं. तो जोम, तो जोश, ते रोमांच पुढच्या काळात क्वचितच अनुभवले.

सिंहगडावरचा आणखी एक दिवस. मेअखेर असावी. आम्ही सगळे संध्याकाळी वार्‍याच्या टोकावर गेलो होतो. तिथला भणाण वारा आम्हांला हैराण करत होता. त्यातून आभाळ भरून आलेलं. आम्ही उडत्या कपड्यांना सावरीत पुढे जात होतो. तेवढ्यात लक्षात आलं, की आमच्यापैकी एका मुलीचे केस डोक्यावर ताठ उभे राहिले आहेत. सगळे खळखळून हसू लागलो. डोक्यावर उंच टाचण्या टोचल्या असाव्या,तसे ते केस दिसत होते. पण हसता हसता लक्षात आलं, की सगळ्यांचेच तसे होताहेत. हसू तर येतच होतं. आश्चर्यही वाटलं. पण आप्पा धास्तावले. निसर्गाचं हे रूप त्यांना नवं होतं. त्यांनी सगळ्यांना पुढं घालून धवडवलं. घरी पोहोचेपर्यंत आप्पांना चैन नव्हती. मग कळलं की त्या भागात नंतर वीज पडली. एवढ्या सगळ्यांना आपल्या जबाबदारीवर किल्ल्यावर घेऊन येणार्‍या आप्पांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. काय घडलं असतं, ह्या विचारानं भयभीतही.

सिंहगडावरचे ते दिवस खूप मजेचे होते. त्या वेळी किल्ल्यावर फारसं कोणी येत नसे. झाडीही खूप होती. स्वच्छंद उनाडण्याजोगा होता तो किल्ला. आम्ही तिथला वारा, पाणी, ऊन मनसोक्त अनुभवलंच, आणि शिवप्रेमाची शिदोरी घेऊन परतलो.
नंतरही काही वर्षं सिंहगडला गेलो. पण तिथं गुलाबाच्या बागांनी किल्ला सुशोभित करायला सुरुवात झालेली, आणि मग आमचं कोणाचंच मन तिथं रमेना.

आप्पांनी महाराष्ट्रातले जवळजवळ दोन-अडीचशे किल्ले पाहिले. पण त्यांना किल्ला म्हणून सगळ्यात अधिक आवडे, तो राजगड. त्याच्या रुपावर त्यांचं प्रेम होतं. शिवाजी राजा पंचवीस वर्ष त्या किल्ल्यावर आपलं कुटुंब घेऊन राहिला, म्हणून त्या जागेविषयी त्यांना आत्मियता होती.

"राजगड म्हणजे गडांचा राजा, आणि राजांचा गड. महाराष्ट्रात राजगडाइतकं सुंदर दृश्य कुठूनही दिसत नाही. उत्ताल बालेकिल्ला. खाली तीन दिशांना असलेल्या सोंडा. त्यावर तीन माच्या. छातीवर आल्यासारखा प्रचंड डोंगर." असं म्हणून ते राजगडाच्या भव्यपणाला पुनःपुन्हा नावाजत.

"उजव्या हाताचं भोर पर्यंत पसरलेलं भाटघरचं धरण. दो बाजूंचा मुलुख चिरीत धरणाचं पाणी इथं तिथं घुसलं आहे. सुवेळा माची सोंड पुढपर्यंत घुसलेली. झुंझार बुरुज आणि पलिकडला हत्ती खडक ह्या सर्व दृष्यावर पहारा करीत ताठ उभे आहेत. अलिकडील बाजूस थेट सुवेळा माचीपासून तळापर्यंत डोंगररांगा उतरलेल्या. मनुष्यनिर्मिती आणि निसर्गाची समॄध्दी यांचा तोल इथं उत्तम साधलाय. आणि ह्या सगळ्या दृष्याला कोंदण आहे बालेकिल्याच्या महाद्वाराचं."
हे त्यांच बोलणं ऐकून राजगडाकडे पाहाण्याची एक दृष्टी लाभली. जिच्यात आप्पांचं इतिहासप्रेम, निसर्गप्रेम मिसळलेलं होतं.

राजांचं पंचवीस वर्षांचं वास्तव्य असल्यानं हा किल्ला खूप घटनांचा साक्षी. इथले दगड जर बोलायला लागले, तर त्यांनी व्यक्त केलेलं सामान्य माणसाला मनात साठवणंही अवघड आहे, असं त्यांचं मत.

सुवेळा माचीची दुहेरी तटबंदी जगात अजोड आहे, असं ते आवर्जून सांगत. देखण्या डोंगरावर अपूर्व अशा तट-बुरुजांची लेणी बांधल्यानं वाढलेला किल्ल्याचा दिमाख त्यांना फार आवडे. ह्या बुरुजांमध्ये साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले जिने आजही तो बुरुजांचा, तटांचा भार सोसत भक्कमपणे उभे आहेत, ह्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे.

राजगडचा बालेकिल्ला तर त्यांच्या दृष्टीने अजोड. त्या अंगावर येणार्‍या प्रचंड खडकावरती पाय रोवीत वरती स्वराज्याचा सगळा डोलारा कसा उभा केला असेल, तिथल्या त्या मानानं मोजक्या जागेत वाड्यांची रचना कशी केली असेल? इथली बाजारपेठ कुठे असेल? खाशांची वस्ती? इथे कोण कोण राहिले असतील? फतेखाँ, अफजलखाँ, शाईस्तेखाँ, दिलेरखाँ ह्या सगळ्यांशी राजांनी इथूनच निघून झुंज दिली. त्यांच्या योजना कुठं ठरल्या असतील? राजारामाच्या जन्माच्या वेळी इथं कसा आनंदोत्सव झाला असेल? सईबाईंच्या मृत्यूनं गडावर कसं खिन्नतेचं सावट पसरलं असेल? अशा विचारांत आप्पा बुडून जायचे. त्यांची दृष्टी सतत काहितरी शोधत असायची. मुरुंबदेवाचा तो प्राचीन डोंगर आप्पांच्या मनात सतत स्वराज्यातले निरनिराळे आकार घेत असायचा.

राजगडावरून अनेक किल्ले स्पष्ट दिसतात. अनेक नद्यांची खोरी. सिंहगडही असा अगदी दोन हातांवर असल्यासारखा. एकदा म्हणाले,"राजी, सिंहगड जेव्हा जिंकला,तेव्हा राजा राजगडावरून लक्ष देऊन असेल. त्याची नजर जैताच्या खुणा शोधत असेल. सिंहगड घेतल्याची खूण म्हणून त्याच्या मावळ्यांनी जी गवताची सुडी पेटवली असेल, ती इथून राजाला लख्ख दिसली असेल. तेव्हा राजांच्या अंगावर कसा थरार उठला असेल, याची कल्पना मी करू शकतो, राजी!"

किल्ला पाहताना त्यांचं मन आपल्या कल्पनेवर स्वार होऊन असं मागं धावत असायचं. पद्मावतीजवळ एक सदर होती. तिचे जुने खांब मलाही आठवतात. त्या सदरेसमोर एक दगडी ओटा आहे. तो राजांचा ओटा. तिथं राजे कसे बसले असतील आणि राजांच्या अनेक मनोSवस्थांचा तो ओटा कसा साक्षी असेल, ह्यावर आप्पांचं चिंतन नेहमी सुरू असायचं. मात्र इतिहासाची संशोधक वृत्तीनं चिकित्सा ते करत नसत. त्यांनी वाचलेलं, त्यांना पटलेलं ते मनश्चक्षूंसमोर आणत.

इतिहासाबरोबरच राजगडाच्या निसर्गरूपाची आप्पांच्या मनावर भुली होती. त्या डोंगरावर त्याच्या सर्व वाटांनी ते अनेकदा गेले. अगदी शेकडो वेळा. सर्व ऋतूंमध्ये त्यांनी तो किल्ला भोगला, आणि आपला आनंद भरभरून वाटला. काही वेळा तिथल्या निसर्गानं त्यांना झटकेही दिले. मधमाश्यांनी एकदा हल्ला केला. एकदा कोसळले. शरीर चांगलं दणकलं. पण हे क्वचित. एरवी किल्ल्याची विविध रूपं त्यांनी मनस्वीपणे पाहिली. आम्हांला दाखवली.

राजगडावर त्यांनी त्यासाठीही आम्हांला अनेकदा नेलं. भाद्रपदात कोट्यवधी फुलांनी सजलेला राजगड पाहायला न्यायचे. ते मुक्त पक्ष्यासारखे गडावर विहरत असत. तर्‍हेतर्‍हेच्या रानफुलांचे गालिचे पसरलेला तो गड डोळ्यांत किती साठवू, असं त्यांना होई. अनेक रंगांची आणि आकारांची ती फुलं, रानफुलं त्यांच्या राजगडाला जणू सजवत असत. या फुलांनी राजगडाचा परिसर गहिरा होई. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहानं आप्पा ती फुलं दाखवायचे. तो नयनोत्सवच. डोळ्यांत साठवता साठवता किल्ल्यावरचा दिवस संपायचा.

तिथंच आप्पांचं बोट धरून दाट मेघांनी गच्च झालेलं आभाळही अनुभवलं. अक्षरशः हात, दोन हातांवरचं दिसत नव्हतं. ढगातच होतो. सर्वांगाला ढगांचा तो ओलसर स्पर्श. जणू आकाशाशी एकरूप झालो आहोत. अन्य कशाची जाणीवच नाही. किंचित कोंदटल्यासारखं. पण तेही सुखकर वाटावं, अशी ती वेळ. शिवाय नि:स्तब्धता. परस्परांना हाकारून तिचा भंग करावासा वाटू नये, इतकी. कधी पद्मावतीच्या देवळासमोरच्या दीपमाळेपाशी आप्पा बसलेले असायचे. अशा वेळी ते एकाकी वाटायचे. हरवल्यासारखे. विरक्त झाल्यासारखेही. पण हे फार वेळ नाही. लगेच भानावर यायचे. 'कुठं लांब जाऊ नका', असा पुकारा व्हायचा. तिथल्या नि:स्तब्धतेला तडा जायचा खरा, पण सुरक्षित वाटायचं.

एकदा राजगडावर रात्री पौर्णिमेच्या चांदण्यातल्या सफरीला जायचं होतं. आम्ही सगळे तयार झालो. आणि आप्पांनी सगळ्यांना सांगितलं,"आज पायात काही न घालता जायचं." हे ऐकल्यावर मी अस्वस्थ झाले. अनवाणी पायांनी गडावर चालायचं ही काय सोपी गोष्ट आहे? पण आप्पांपुढं बोलणार कोण? तिथं सगळ्यांना आप्पांचा धाक. मग मी म्हटलं, "आप्पा, त्रास होईल. पाय सोलवटून निघतील."

आप्पांनी फ़क्त माझ्याकडे पाहिलं; आणि ते पुढं चालायला लागले. ही तर माझं न ऐकल्याची खूणच होती. आम्ही कसेबसे चरफडत निघालो. सगळ्यांच्या चपला काठीत अडकवल्या. (येताना चपला घाला म्हणतील, अशी आशा होती.) पण थोडं चालल्यावर लक्षात आलं, की पाय ह्या जमिनीलाही सरावतात. क्लेष कमी होतात. शरीराची गंमत वाटली. सुखालाही सरावतं, आणि दुःखालाही. आमची ती फ़ेरी चपला न घालताच झाली. पण मातीच्या स्पर्शाचं नवं भान आलं.

राजगड वर आप्पांनी एक छोटी झोपडी बांधली होती. ते त्यांचं घर. गडावर जाण्यापूर्वी बाबुदा भिकुलेला निरोप जाई. तो झोपडी नीटनेटकी करुन ठेवी. किती वेळा तिची डागडुजी झाली. एकदा मोठ्या वादळात ती पडून गेली. मात्र आम्ही तिथे राहाताना आप्पांच्या घरात राहातो आहोत, असं खरंच वाटायचं. तिथं बसून आप्पांनी कितीतरी लिहिलं आहे.

एका पावसाळ्यानंतर 'ज्योतवंती'चं लाकूड तिथंच पाहिलं. रात्री चकाकणारी ती वनस्पती पाहिल्यावर आप्पा केवढे हरखले होते. मध्यरात्री उठवून त्यांनी ती मला दाखवली. आणखी एका अद्भुताचा आनंद देण्यासाठी आप्पांनी एका श्रावणात मला असंच झोपेतून अवेळी उठवलं होतं. त्या नीरव परिसरात गोपिकेची ती दीर्घ, स्वर उंचावत जाणारी शीळ ऐकल्यावर खरोखरच अंगावर रोमांच उभे राहिले. तो नाद पुन्हा क्वचितच ऐकला. पण त्याचं स्मरण लख्ख आहे.

एकदा ऐन उन्हाळ्यात राजगडावर गेलो होतो. आम्ही सकाळी हिंडायला जाण्यासाठी आवरत होतो. आप्पा घाईघाईने आले, म्हणाले, "राजी, बाहेर ये लवकर."
"आले S"
"लगेच ये!"

मी त्यांच्या पुढं जाऊन उभी राहिले. त्यांनी हात मागे धरले होते. मला म्हणाले,
"डोळे मिटून घे."
- आणि त्यांनी माझ्या नाकाशी फ़ुलं धरली. रानचमेलीची. तीव्र मधुर गंधाची.

पंधरा एक वर्षं झाली असतील. राजगडावर त्यांना एक नवा नाद लागला. पहाटे उठून ते अभंग म्हणायला सुरुवात करायचे. मोठमोठ्यानं. आम्ही गाढ झोपेत. त्यांची झोप आणि प्रातर्विधीही उरकलेले. सूर्योदय पाहायला त्यांना आम्हाला उठवायचं असायचं. मग त्यांनी हा उपाय शोधून काढला.

पांगुळ झालो, देवा, मज हात ना पाय
बसलो जयावर, रौराट ते जाय.
आधार नाही कोणी, मज बाप ना माय
दाते हो दीन करा, जाते पंढरपुरा…

हा तुकारामांचा अभंग मी तिथेच ऐकला.

एक तत्त्व नाम दृढ धरी मना
हरिसी करुणा येईल तुझी...

हा ज्ञानेश्वरांचा अभंगही. आणि,

घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा
भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा का -

ही विराणीही सांप्रदायिक चालीत तिथंच ऐकली.

आज हे सगळं आठवतं आहे खरं, पण त्या वेळी सगळे गाढ झोपलेले असताना गात बसलेल्या आप्पांचा खूप राग यायचा. आपल्याला झोप येत नाही, तर सगळ्यांना का उठवतात हे? पांघरूणाच्या उबेत ते अभंग ऐकत पडून राहणं बरंही वाटायचं, पण ते झोपू द्यायचे नाहीत. सूर्योदय पाहायचा नसला तरी सकाळी गडावर ताजंतवानं होऊन वावरणं त्यांना हवं असायचं. मग ह्या नाना युक्त्या.

आम्ही कोणी गाणी ऐकण्यासाठी ट्रांझिस्टर घेऊन किल्ल्यावर गेलो नाही. निसर्ग अनुभवण्याची रीत त्यांनी अनेकांगांनी आम्हाला शिकवली.

मला तरी ते किल्ल्यावर सारखे शिवाजी महाराज आणि इतिहास ह्यासंबंधी बोलत असत असं वाटत नाही. त्या भग्न अवशेषांतून हिंडताना ते खिन्न असत. पाहता पाहता उद्ध्वस्त झालेल्या इमारती त्यांना अस्वस्थ करत. पण ह्यासंबंधीचं चिंतन मनात चाले. बोलले, तरी मोजकंच.

गडाचे सर्व कानेकोपरे त्यांनी तिथल्या रहिवासी मित्रांच्या मदतीने पाहिलेले असत. त्यामुळे तिथला वावर निर्भय पण सावध असे. गडावर आपण नेलेल्या प्रत्येकाला आपण सुखरूप पोहोचवलं पाहिजे, ह्याची जाणीव असे. त्यापोटी सतत सगळ्यांच्या पुढं चालण्याचा आग्रह असे. कधी तो हट्टही वाटे. बरोबरच्या माणसांमध्ये कधी डावंउजवं होई. कोणाची अधिक काळजी घेतली जाई. कोणावर जरूरीपेक्षा जास्त जबाबदारी सोपवली जाई. काही मुलं तिथल्या वातावरणात अधिक भावनाशील होत. कधी कधी त्यांच्याबरोबर आप्पाही. मला, आम्हांला घरच्यांना ते खटके. पण फार मोठा असंतोष त्यातून निर्माण झाला नाही.

गडावरच्या रहिवाशांवर आप्पांचं फार प्रेम. संस्थानं खालसा झाल्यावर, सरकारने पगार बंद केल्यावरही बाबुदा भिकुलेसारख्या किल्लेदाराचं घराणं किल्ला सोडत नाही, ह्याचा आप्पांना अभिमान. त्यानं गड जागता ठेवल्याचं केवढं समाधान! या समाधानामुळं आप्पांनी ह्या सगळ्याच किल्ल्यांवरच्या रहिवाशांवर खूप प्रेम केलं. त्यांची अड-नड पाहिलीच, पण त्याहूनही अधिक म्हणजे त्यांना इतर गडप्रेमींच्या मनात एक स्थान मिळवून दिलं. बाबुदाला त्यांनी 'वाघरू'मध्ये चितारलं. बाबुदाची मुलगी यशोदी. तिला आप्पांनी तान्हेपणापासून पाहिलेलं. ती एकदा मला म्हणाली, "वीनाताई, इतके लोक गडावर येतात, पर आप्पा गडावर असले, म्हंजी गड भरल्यासारखा वाटतो. न्हाईतर लई सुना सुना वाटतो."

त्यांच्या कुटुंबानंही आप्पांचं खूप केलं. बाबुदा-वहिनी तर आप्पांना थोरल्या भावासारखे. आप्पा भेटले की त्यांना किती बोलायचं असायचं. गार्‍हाणी संसारातली, गडावरची. साठवून ठेवलेली. त्यासाठी ते आप्पांची वाट पाहत असायचे. आप्पा आल्यावर वहिनी त्यांना निरसं दूध द्यायची. तांदळाचे घावन अन् दूध-गूळ हे पक्वान्न जेवल्याखेरीज आप्पा कधीच गडाखाली उतरले नाहीत. आप्पांना रोज गरम पाण्यानं पाय शेकायला लावायचा बाबुदा.

माझ्या ह्या नादिष्ट आप्पांना ह्या गडामित्रांनी फार सांभाळलं. त्यांच्या साहसांत साथ केली. त्यांचं दुखणं-खुपणं पाहिलं. त्यांना रानातल्या अनेक गमती सांगितल्या. त्यांच्या जीवावर आम्ही कुटुंबीय आप्पांच्या किल्ल्यांच्या भ्रमंतीच्या संदर्भात निर्धास्त राहिलो.

रायगड, राजगड, राजमाची हे तीन आप्पांचे लाडके गड. तिन्ही ठिकाणी त्यांचे जीवाभावाचे मित्र होते. राजमाचीचे खंडबा उंबरे लोणावळ्याजवळ असल्याने नागर संस्कृतीशी अधिक परिचित. त्यांनी त्यांच्या ओसरीवर चक्क देवांच्या फोटोंच्या ओळीत आप्पांचा फोटो लावून ठेवला आहे.

राजमाचीवर मी आप्पांबरोबर दोनदाच गेले. तीही मोठेपणी आणि घाईगर्दीत. त्यामुळं 'माचीवरला बुधा'च्या खुणा शोधीतच मी किल्ल्यावर पोहोचले; आणि आप्पांच्या सहवासात त्यांच्या कल्पनेतही ती बुधाच्या झोपडीची जागा, त्याची ती कोकणाकडे बघत बसायची खुर्ची, त्याचं एकाकीपण - सगळं अनुभवलं. इतकंच नाही, तर परतताना ओढ्याजवळ त्यांच्या 'बुधा'ला मनोमन निरोपही दिला.

किती वर्षं आप्पा जोमानं किल्ले हिंडत राहिले. पण हरिश्चंद्रगडाला त्यांच्या थकण्याची जाणीव पहिल्यांदा झाली. टोलारखिंडीतूनच त्यांनी आम्हांला चढवलं. आम्ही सगळे घरचेच होतो. वर गेल्यावर मात्र आप्पा कधी नव्हत ते लगेच देवळात आडवे झाले. जरासे. मग त्यांनी कुंडात जाऊन स्नान केलं. (आंघोळ नव्हे, स्नान!) नंतर त्यांना जरा तकवा आला.

संध्याकाळी कोकणकड्यावर गेलो. निसर्गाचं ते विक्राळ रूप मला त्यांना दाखवायचं होतं. तिन्ही अंगांनी मला ते दाखवलं, आणि म्हणाले, "राजी, हरिश्चंद्रगडावर आता पुन्हा येणं होणार नाही."
मी हबकले. त्यावर बोलले मात्र काहीच नाही. त्यांचा थकवा दिसत होताच.

त्यांच्याबरोबर किल्ल्यावर जाणे हा एक समुहाचा अनुभव असायचा. आम्ही दोघे असे कधीच किल्ल्यावर गेलो नाही. सतत कुणी ना कुणी माणसं असायचीच. वेगवेगळ्या वयांची. त्यांची सगळ्यांची आप्पांना काळजी असायची. माझे एकटीचे असे माझ्या वाट्याला खूप कमी क्षण आले. मला पोहता येत नसे. त्यामुळे ते मला हळूच बोलावून बाबुदाकडे, खंडोबाकडे गरम पाण्यानं आंघोळ करायला लावायचे. मला अवघड वाटायचं. कारण माझ्या बरोबरीच्या, लहान-मोठ्या बर्‍याच जणी असायच्या. पण अशा वेळी माझ्याशी बोलताना आप्पांचा स्वर थोडा दबका पण आक्रमक व्ह्यायचा. 'अगं तू ऐक माझं' म्हणत ते मला हट्टानं घेऊन जायचे. गडावर कधी मधाचं पोळ मिळालं, तर मला मुद्दाम बोलवून मध प्यायला लावायचे. पण एरवी त्यांना तिथं सतत दुरुनचं निरखाव लागायचं.

राजगडावरच्या आमच्या बाबुदाचे पाय निकामी झाले, त्याला जाग्यावरुन हालता येईना. मग आप्पा त्याला भेटायला जायचे. राजगड आणि बाबुदा हे समीकरणचं होतं.

आप्पा अमेरिकेहुन आल्यावर अट्टाहासानं राजगडावर गेले. पूर्वीसारखं चढणं तर होणार नव्हतंच. कारण सत्तरी होऊन गेली होती. पण हे गेले. जोडीला जावई असल्याने निर्धास्त होते. वर जाऊन त्यांनी त्यांचा लाडका राजगड डोळा भरुन पाहिला. अवघड असूनही बालेकिल्ल्याच्या खडकाशी झट्या घेतल्या. बुरुजावरचा भणाण वारा अनुभवला. त्याची दुपेडी संजीवनी माची पाहिली; आणि मधल्या झापावर राहिलेल्या बाबुदाला भेटून ते परतले.

आता बाबुदा राहिला नाही. आप्पांच्या साठाव्या वर्षी आप्पांबरोबर साठ किलोमीटर चाललेला राजगडचा बबन दरगिडे अजून तरुण आहे. तो केव्हाही आप्पांची आठवण झाली, की येतो. "सहजच आलो. आप्पांची लई दिसांत भेट न्हाई, म्हणून," असं म्हणत बसतो. हक्कानं राहतो. आप्पांना गडाची हालहवाल सांगतो. कधी आईच्या हातचं जेवतो. माझ्या घरी येतो. येताना कधी नाचणीची भाकरी अन् बोंबलाची चटणी आणतो, आमच्या मधुराला आवडते, म्हणून. घरची नाचणी, तांदूळ, फणसाचे गरे ह्यांच्या छोट्या छोट्या पुरचुंड्या आणतो.

राजमाचीचा खंडबा तळेगावला नेहमी येत असे. रायगडची आप्पांची बहीण साऊ आवकीरकर मात्र आता थकली. तिला दम्याचा त्रास होताच. आता अधिकच होतो. आप्पांची आणि तिची आप्पांच्या पंचाहत्तरीत पुन्हा भेट झाली. आप्पा डोलीतून रायगडावर गेले. किल्ल्यावर डोलीतूनच हिंडले. सगळा गड. डोलीवाली त्यांच्या लहानपणापासून आप्पांना पाहत होते. त्यांनी जपून नेलं सगळीकडे. अगदी वाघ दरवाजा, टकमकावरही.

होळीच्या माळावरून आप्पांची डोली निघाली, आणि बाजारपेठेतनं गुरांना घेऊन येणार्‍या साऊच्या नवर्‍यानं, रावजीनं, आप्पांना पाहिलं. ऐंशीच्या आसपास पोहोचलेला तो टणक म्हातारा हातातली काठी टाकून आप्पांकडे पळत सुटला. त्यानं डोली गाठली.
"आलाव, आप्पा?" म्हणून त्यानं आप्पांची दाढी कुरवाळली आणि आप्पांच्या गालांवर हात फिरवून चक्क आप्पांची पापी घेतली.
आम्ही सगळे खुळ्यासारखे पाहत होतो.

खरं तर आप्पा ह्या वेळी साऊच्या घरी जाणार नव्हते. पण रावजी भेटल्यावर त्यांना राहवलं नाही. ते तिच्या खोपटात गेले. म्हातारी साऊ आता खूपच थकलेली. तिचीही आप्पांना पाहिल्यावर लगबग झाली. पण दोघांनाही बोलणं सुचलं नाही. तीही आप्पांहून वयानं मोठी. आप्पांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला खूप भडभडून आलं. वाटलं असेल, 'किती थकले आप्पा!'

चाळीस वर्षं त्यांना किल्ल्यावर एखाद्या वाघासारखं चालता बोलताना तिनं पाहिलेलं.
दोघं परस्परांचा हात हातात घेऊन मूकपणे बसून राहिले डोळे गाळत!

पण आप्पा किल्लाभर हिंडले. टकमकावरचा वारा प्यायले. समाधीपाशी स्तब्ध बसले. होळीच्या माळावरच्या पुतळ्यासमोर रेंगाळले, आणि तिथं इतकं सगळं हिंडूनही त्या मानानं दमले नाहीत. कंटाळले तर मुळीच नाहीत. पुण्याला जरासेही बाहेर यायला तयार नसलेले आप्पा रायगडला किती वेगळे होते!

प्रवासानंतर पुण्याला पोहोचल्यावर ते म्हणाले, "राजी, फार थकलो. पण तब्येत अशीच असेल, परमेश्वराची कृपा असेल, तर पुन्हा जाऊ या!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलं आहेस चिनूक्स.

चिन्मय, चांगली निवड केली आहेस. लिहिण्याची मेहनत घेतलीस आणि आम्हाला आनंदी केलसं.

कसले सुरेख लिहिले आहेस. गोनिदा समोर आहेत आणि गडावर फिरताहेत असे वाटले.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

चिन्मय, खुप छान.. अप्पांना भेटण्याचा योग आला तेव्हा ते खुप थकले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर गडावर जाणं अशक्य होतं. ती अधुरी मनिषा तुझा लेख वाचल्यावर पूर्ण झाल्यासारखं वाटलं...

अतिशय सुंदर! गो नी दांडेकरांच्या किल्लेप्रेमाबद्दल ऐकले होते, पण हे छान वाटले वाचायला. 'पडघवली' च फक्त वाचले आहे, आता ती इतर ही वाचायला पाहिजेत.

खुपच छान. वीणाताईंचे लिखाण आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.

अहा.. क्या बात है.. आनंद, दु:ख, प्रेम सगळं एकत्र उफाळून आलं वाचताना..
दुर्गभ्रमण गाथा आठवली.. लेखन शैली एकदम अप्पांसारखीच... खूप छान इथे मेहनतीने लिहिलस..

सुरेख. खूप आठवण आली गो. नींची.
वीणाताईनी इतक्या सुंदर आठवणी शब्दबद्ध केल्याबद्दल त्यांना आणि चिनूक्सने त्या आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल त्याला धन्यवाद.

सुरेख, चिनूक्स!

मारुती चितमपल्लींचं चकवाचांदणं वाचलं आहेस का? (तुझा पुस्तकांचा व्यासंग पाहता वाचलं असणारच बहुधा.) त्यात पण गोनीदांबद्दल छान लिहिलंय.

अतिशय सुरेख! माझ्या आईकडून गोनीदांबरोबर गडावर फिरण्याबद्दलचे अनुभव ऐकले आहेत, तिला जरुर दाखवेन!

शतशः धन्यवाद चिनुक्ष,

अपले आवडते लेखक एक व्यक्ति म्हणुन कसे होते हे जाणुन घेणे हा नेहमिच आनंददायक अनुभव असतो. गोनिदांचे निरिक्षण किति अफलातुन होते, तो विजेचा किस्सा मस्तच एकदम.

चिनू, मायबोलीवर इतक्या तर्‍हांचं लिहितो आहेस..... समृद्ध आहे आयुष्य अन ते आमच्याबरोबर वाटणंही चालू आहे..... परत एकदा धन्यवाद!! तुझे प्रयास... किती कौतुक करावं त्यांचं?
वीणाताईंचं कथन तर झक्कासच. गोनिदांचं दूर्गभ्रमणगाथा हे पारायणं करण्याच्या 'पोथ्यां'पैकी एक.

चिनू, तुलाच अनेक अनेक धन्यवाद!!

चिनू... धन्यवाद Happy

गोनीदा! Happy
हे नाव घेतल्याशिवाय अस्सल "दुर्गभ्रमणास" सुरुवातच होऊ शकत नाही! Happy
अन प्रत्यक्ष स्वतः दुर्गभ्रमण केल्याशिवाय, मराठ्यान्चा,जाज्वल्य इतिहासही समजू शकत नाही!
चिनुक्स, या लेखाबद्दल तुला धन्यवाद!

सहज थोडे थोडे आठवले, पन्च्याऐन्शीच्या सुमारास, विहिप ची कॅलेन्डर विकायला मी माझ्या मित्राबरोबर पुण्यापासून तळेगाव पर्यन्त हिन्डत गेलो होतो, राजगडाच्या पायथ्याशीच मूळ गाव असणार्‍या त्या मित्राने तेव्हा गोनीदान्च्या घरी नेले होते! Happy त्यान्च्याकडे आम्ही कॅलेन्डर विकली होती! निघताना पाया पडून निघालो!
मी काहीच बोलत नाही पाहून मित्राने विचारले, अरे तुला कळले का आपण कुणाकडे गेलो होतो???
मी म्हणले, गो नी दान्डेकर ना? माहितीहेत की, भारी माणूस, आपल्याला काही त्यान्च्यासारख जगता येणार नाही! पण हे तळेगावात का रहातात? पुण्यात वगैरे का नाही? (पुण्यामुम्बैच वार खालेल्ल्या मला त्यावेळेस त्यान्च तळेगावात रहाण थोड विचित्र वाटत होत)
मित्र म्हणाला, अरे तुला त्यान्च्याबरोबर फिरायला जायची सन्धी मिळायला हवी, म्हणजे मग कळेल!
आमच्या कपाळकरण्ट्या दुर्दैवाने, तशी सन्धी कधीच आली नाही!

या लेखाद्वारे मनात अनेक गोष्टी जाग्या झाल्या! Happy धन्यवाद!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

चिनूक्स, हे वाचलं पहिल्याच दिवशी, पण प्रतिक्रिया द्यायचं राहून गेलं बघ..
सुंदर लिखाण. काही ठिकाणी तर गोनीदा अक्षरश: डोळ्यांसमोर उभे केलेस..

मस्त आहे... छान सहज लिहिलेय... चिनूक्स हे इथे आमच्यासाठी लिह्लिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    ================
    गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!