स्वरचीत आरत्या

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 20:54

आपण स्वतः रचलेल्या आरत्या इथे लिहाव्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगलमुर्ती मोरया ।
गणपती बाप्पा मोरया ॥
मंगलमुर्ती मोरया ।
गणपती बाप्पा मोरया ॥

शुभ कार्याशी देशी स्फुर्ती
वचनांची होई पूर्ती
काय वर्णवू त्याची कीर्ती
तो देव माझा मंगलमुर्ती ॥१॥

पापांचे करी क्षालन
करी दीनांचे पालन
जेथे शक्ती-भक्तीचे हो मिलन
तो देव माझा गजानन ॥२॥

जेथे क्लेश शमले जाती
जो सुख-दु:खाचा साथी
जो करी दु:खाची माती
तो देव माझा गणपती ॥३॥

रिद्धी सिद्धी चा मालक
जो सर्वांचा पालक
तोच दूरित तिमीर हारक
तो देव माझा विनायक ॥४॥

ज्याच्या चरणी नांदती संत
जो करी उपकार अनंत
न राहे कसली खंत
तो देव माझा एकदंत ॥५॥

जो घालवी बुद्धीचा म्लेश
अरजकतेचा होई नि:शेष
जेथे लोपती सारे क्लेश
तो देव माझा श्री गणेश ॥६॥

फ़ुटे भक्तीचा पाझर
जो ज्ञानाचा सागर
ज्याचा त्रिलोकी आदर
तो देव माझा लंबोदर ॥७॥

ष:डरिपूची करी राख
धाऊनी येई सुख
जेथे वाढे भक्तीची भूक
तो देव माझा गजमुख ॥८॥

निराशेचे होई उच्चाटन
करी अज्ञानाचे मोचन
विश्व करी ज्याला वंदन
तो देव माझा गौरीनंदन ॥९॥

दूर करीशी न्युनगंड
अधर्मा विरुद्ध करिशी बंड
अत्याचारा देसी दंड
तो देव माझा वक्रतुंड ॥१०॥

सदैव घाली प्रेमाची फ़ुंकर
निरंतर करीशी कृपा आम्हावर
अशिक्षीता देई विद्येचा वर
तो देव माझा विद्येश्वर ॥११॥

चला दर्शनासी जाउया
डोळे भरूनी पाहुया
एक मुखाने सारे गाउया
मंगलमुर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ॥१२॥

बप्पा तू करतोस खरच आयडीया किती मस्त
येवढ्या सगळ्यां गोंगाटात बसतोस कसा स्वस्थ?

आम्ही काही मागता टिचर आमच्यावर ओरडतात
वन बाय वन म्हणतं, सगळ्यांना रांगेत उभे करतात

हं... तरीच तुझे सुपा येवढे मोठ्ठे मोठ्ठे कान
एकदम सगळ्यांच एकुन घेतोस देवा तू महान

कशी मस्त आईडिया तुझी, तुला केवढी मोठ्ठी सोंड
कानात गंम्मत सांगायला, न्यायला नको जवळ तोंड

लाल लाल शेला छान, पिवळं धोतर आहेस नेसलस,
अरे वाजेल ना थंडी तुला, तू शर्ट का नाही घातलस?

आजींनी विणलं स्वेटर त्यावर मस्त जॅकेटचा ड्रेस
देतो नविन जिन्स पँट वाटल्यास त्यावर धोतर नेस

किती घातलेस दागिने आणि किती घातलेस हार?
सगळ्यात दुर्वा नी जास्वंद, तुला आवडत ना फार

कुठे मोदकांच ताट, कुठे शि-याचा टोप
काहीच न खाता तुझं वाढलं कसं पोट?

आई सारखंच तुझही मी खाता का पोट भरतं?
आइच म्हणते तुझ्या चरणी सर्वाच दु:ख हरत

बप्पा मला सांग जरा हे दु:ख काय असतं
कान, नाक, गुढगा, पोट नक्की काय दुखतं?

काहीच नको दुखायला, कुणा देउ नकोस दु:ख
शहाणा कर सगळ्यांना, दे चॉकलेट सारखं सुखं

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

-सत्यजित.

सत्या, दोन्ही छान. पण दुसरी जास्त आवडली Happy

सत्यजीत छानच

तु विकास तु मार्ग
तु बळ पावलातले
तु दगड वाटेवरचे
तुच रणाणते उन
आतले बाहेरचे...

तु सावलीचा विसावा
ओलावा पाण्याचा
ओठातल्या, डोळयातल्या
तु विश्रांतीची मिठी
तुच स्वप्नांना पडलेली भीती
जखडणारी, जिद्दवणारी...

तु कर्तुत्वाची नशा
तुच पोखरणारी निराशा
कुठला कोश कुठले फुलपाखरू?
तु प्रष्णाचे गर्भ,
अन उत्तरांचा फोलपणा...

नमस्काराचि भावना तु
नास्तिकाची प्रार्थना
जिथे विरोधाभास जन्मतो
तुच निवळ प्रेरणा...

ओवाळू आरती देवा गणपती
माझी मति राहो दृढ तुझ्याप्रती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||धृ||

बुद्धिचा दाता तू, कलेचा प्रेमी
विघ्नांचा हर्ता, रिद्धि-सिद्धिंचा स्वामी
तुझ्या भक्तिने तुष्ट, शंकर पार्वती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||१||

माझी पूजा रत, तुझे चरणी
तूचि एक नित्य, नामस्मरणी
गोड घे मानुनि सेवा, मंगलमूर्ती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||२||

सर्वा सद्बुद्धी दे, ठेव समाधानी
मन रंगूनी जावो, गोड तुझ्या नामी
निरामय आरोग्य नि राहो सुख शांती..
ओवाळू आरती देवा गणपती.. ||३||

चालः ओवाळू आरती मदनगोपाळा किंवा ओवाळू आरती माता कलावती..

उपास,

फार छान!

तुम्ही प्.पु. आईंच्या मार्गातले का?

धन्यवाद.

हो लाल मेरी पत .. दमा दम मस्त कलंदरच्या चलीवर हे गणेश स्तवन लिहीण्याचा एक प्रयत्न... गणरायाच्या चरणी..

ओ लाल जुडी फुलं
ओ लाल जुडी फुलं वाहतो तुला जगपालणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देवा माझा महोदर, देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

चार चार हात तुझे , वरद दे देवा
हो पामरांचे पालन, करी सदा जगतारणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
हेरंभा तू सुंदर, देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

डमडम तुझे डमरु बाजे
गोजिरे रुप तुझे मनी भावे मनमोहना
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देव माझा मनोहर,देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

तव चरणी लेकरु घेई रे लोळण
उचलुनी कडेवरी घेई मला जगपालणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देव माझा विश्वेश्वर,देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

तुरुतुरु तुझा उंदीर धावे
होउन मुषकारुढ जाशी देवा जगतारण्या
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देव माझा विद्येश्वर,देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

ओ लाल जुडी फुलं
ओ लाल जुडी फुलं वाहतो तुला जगपालणा
शिवबाच्या, गौरीच्या तनया तू सुंदर
देवा माझा महोदर, देव माझा लंबोदर
पहिला हो त्याचा नंबर

Good going Sattyabhaay !

छान लिहित आहात सगळे!

परागकण

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||

सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तु विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||

कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||

त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||

तू कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~
हे अजून एक कडवं .. बप्पांच्या निरोपाचं

आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
काही झाले अनुचित देवा क्षमा असावी
तुझी सतकृपा सदैव आम्हावरी व्हावी || ६||

सुपर! गणपती एकदम खूष झाला असेल आरत्या ऐकून.. Happy