***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच!!!!!!!)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुजबुज
३१ मार्च २०१०

नमस्कार वाचकहो,

मा. अ‍ॅडमिन साहेबांनी "उद्योजक व्हा!" चा नारा दिल्यामुळे पुन्हा एकदा कुजबुज प्रकाशीत करण्याचा उद्योग आम्ही चालू करीत आहोत. उत्पादन पुन्हा चालू करण्या आधी "पण विकत कोण घेणार?" असा प्रश्न आम्हालाही पडला आणि यावर सोप्पा उपाय म्हणून ही कुजबुज आम्ही विक्रीला नं ठेवता मोफत वाटत आहोत.

वैधानिक इशारा : ही कुजबुज आम्ही कळकट तोंडाने, फुटलेल्या घामाने आणि खाजर्‍या हाताने लिहीली आहे तेव्हा प्रत्येकाने ती आपल्या जबाबदारीवार वाचावी. यातून विषबाधा झाल्यास कुजबुज प्रकाशक जबाबदार राहणार नाही.
(तरीपण 'मराठी उद्योजकांना प्रोत्साहन' म्हणून अ‍ॅडमीन हा अंक डिलीट करणार नाही ही अपेक्षा आहेच!)

**************************************************

उद्योग वारता -

उद्योजक होण्याच्या चढाओढीत आता गुलमोहराखाली जमणार्‍या कवी आणि लेखकांनी पण भाग घेतला आहे. गुलमोहराच्या पाराखाली आता कोऑपरेटीव मंडई सुरू झाली असून येथे जगाच्या कानाकोपर्यातून तर्‍हेतर्‍हेचा माल विक्रीस ठेवलेला असतो. आपापल्या साहित्याचा खप वाढावा म्हणून लोक अनेक वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवीतांना दिसतात.

कवितांचा खप सध्या कमी असल्या कारणाने काही कविक्रेते आपल्या कवितांची नावे ललित लेखांची शिर्षके वाटतील अशी ठेवत आहेत जेणेकरून गद्य लिखाण आहे असे समजून तरी वाचक वाचायला येतील. "कशी अंकुरावीत आता बियाणे?, लाडका बैल, लागली प्रचंड भूक, पण मी प्रोफेशनल आहे " ही काही वांगी दाखल उदाहरणे. तर मोठमोठ्या कविता वाचायला लोक कंटाळा करतात म्हणून कुणी "लहान कविता" नावाची कवितेची लहान पुडकी विक्रीस ठेवली आहेत.

साहित्याचे शिर्षक देण्यात अनेक जण कल्पकता दाखवत आहेत. काही दुसर्यांनाच शिर्षक सुचवा म्हणून टिआरपी वाढवायच्या प्रयत्नात आहेत तर काही शिर्षकाच्या मागेपुढे वेगवेगळी चिन्हे देऊन सजावट करत आहेत जेणे करून आपले उत्पादन मंडई मधे सर्वाधिक उठून दिसेल. (समजले नसल्यास कुजबुज अंकावरील सजावट पहा.)

काही कढीविक्रेते शिळ्या कढीत पुन्हा पुन्हा पाणी मिसळून रिक्षातून फिरत ग्राहकांना घरपोच फ्री सॅंपल्स वाटत आहेत.
मंडईच्या मधोमध एका नविन उद्योजकांनी फास्ट फूड स्टॉल लावला आहे. येथील उत्पादनाचा वेग इतका फास्ट आहे की तो फक्त पाहूनच लोकांची बोटे तोंडात जाऊ लागली आहेत.

मंडईत दिसलेल्या काही छोट्या जाहिराती :

ऑरगॅनीक गझला मिळतील : आमच्या घरच्या शेतीवर केवळ नैसर्गिक खते वापरून उगवलेल्या हातसडीच्या कविता आणि गझल हव्या तितक्या प्रमाणात हव्या तेव्हा मिळतील. "चिल्लर कवितांचे ठोक विक्रेते" - आजच संपर्क साधा - श्री. गंगाधर मुटे.

**************************************************

M(irchi) Tv

सकाळी ७ वा. शुभारंभ कार्यक्रम : "सुप्रभाऽऽऽऽत मायबोली" : निरामय जिवनासाठी करायच्या व्यायमांची माहिती देतील श्री. श्री. श्री. बीबुवा सिंगापुरकर. यात ते आधी 'विपरीत करणी' करून दाखवतील जेव्हा त्यांच्या आजुबाजुचे मायबोलीकर "कपाल बडवती" हा व्यायाम प्रकार (आपोआप) करून दाखवतील.

सकाळी ८ वा. कार्यक्रम : "हॅलो सखी" आजचा विषय : "फिरतीवर असणार्‍या लोकांनी बाहेर काय खावे?"
माननिय पाहुण्या निधप याबाबत आपले अनुभव सांगतील आणि देश-विदेशातील सख्या फोन करकरून फुकट सल्ले देतील.

सकाळी १० वा. : MPL-2010 : मायबोली प्रिमियर लीग २०१०- थेट प्रक्षेपण, आजचे सामने आहेत
"संयुक्ता सोल्जर्स" वि. "दा एलेव्हन"
"प्रतिसाद बेगर्स" वि. "होपफूल विपुहॉपर्स"
"पुणे गडकर्स" वि. "पुपु वाडकर्स"
"पार्ले लुगडं ब्रिगेड" वि. "बारा बोअरकर्स"

दुपारी २ वा कार्यक्रम : "आपण यांना ओळखले का?" - मायबोलीवरील संशयास्पद आयड्यांचे तोंड, नाक, कान ई अवयव ईतर ओरिजिनल आयड्यांशी जुळवून बघण्याचा टाईमपास गेम शो.

दुपारी ३ वा. : "जागतिक मायबोली साहित्य सम्मेलन कार्यक्रम"
पुस्तक प्रदर्शनाचा आढावा. सहभागी मायबोलीकरांच्या पुस्तकांची नावे आहेत -
वादमग्न पुरुषाची लक्षणे, प्रयोग परत नं आला, पांचट, कहाणी अमेरिकेच्या आजीबाईंची, छा.वा. (उर्फ छान...वा!), चिपर बाय द डझन, पिंगा वेळअवेळ, तु गेलास आहेसी वाया.
(वरिल पुस्तकांचे लेखक कोण हे ओळखून काढणार्‍यास यातीलच एक पुस्तक मिळेल पुर्णपणे मोफत!!)

संध्याकाळी ६ वा : जागतिक मायबोली साहित्य सम्मेलना निमित्त सदाबहार लावणीचा लोककला कार्यक्रम. ** पहिली लावणी सादर करतील आर्चबाई टेनेसीकर आणि अनिलभाई एनजेकर. लावणीचे बोल आहेत

आर्च : नेहमीच भाई तुमची घाई, नका लावू पत्ता मला सांगायला
भाई : येऊ कसा कसा मी जेवायला गं, येऊ कसा कसा मी जेवायला?

जेवायला या हो उद्या सकाळी
केशर घालून पुरणाची पोळी
पानं मी घेते वाढायला हो....

पण येऊ कसा कसा मी जेवायला गं, येऊ कसा कसा मी जेवायला?

गाव हाय तुमचं बारा कोसं
वागनं तुमचं असं हो कसं
बोलावने अगत्याने करायचं खासं
दिली पाने तोंडाला पुसायला का गं?
येऊ कसा कसा मी जेवायला!

**या नंतर सादर होईल रिक्षेवाल्याची लावणी :

मी सोडून सारी लाज
असा बेभान फिरलो आज
की टायर फुटले रे
की टायर फुटले रे

शिरले वारे आज अंगात
खरडून मोठी एक जाहिरात
असा बेभान फिरलो आज
की टायर फुटले रे
की टायर फुटले रे...

** तिसरी शृंगारिक लावणी एका वाग्दत्त वराला त्याची होणारी बायको म्हणते आहे

प्रेमानं मी घास भरवते
भात की हो रांधला साधा
भायेरचं काही खाऊ नका राया
होईल की हो विषबाधा.

गणप्याची ती कळकट्ट टपरी
झुरळं फिरतात किटलीवरी
चहा मी टाकते ताज्या दुधाचा
तुमी कान्हा मी तुमची राधा

द्राक्षासव मी केलंय घरीच
द्राक्ष चुरडली हातानं बरीच
ज्वानीचा जहर त्यात मुरला
त्यानं उतरंल हितगुजची बाधा

रात्री ८ वा. : किलबिल - बडबड गीतांचा कार्यक्रम: सादर करतील हवा_हवाई
(हे केवळ बडबड गीत नसून आपल्या हितगुजवरील आयुष्याचे सार आहे असे त्या म्हणतात.)

लहान माझी भावली
वाचन करून कावली

काळा किबोर्ड बडविते
सरसर माऊस फिरवीते

लेख लिहिला फिक्का झाला
कविता केली कच्ची झाली

एकाला व्याकरण शिकवायला गेली
आपणच चुकली त्यात
दुसर्याचे पाय ओढायला गेली
धुप्पकन पडली स्वतःच!

***मायबोली साहित्य सम्मेलन कार्यक्रम समाप्त***

**************************************************

कुजबुज पोल आणि सर्वे.

हितगुजवर काही जाचक प्रथा रुढ (होत) आहेत. आपण या पैकी कुठली प्रथा पाळता. कृपया योग्य त्या पर्यायावर खूण करून आम्हाला पाठवा.

१. शहाणपणाचे मंगळसुत्र घालून सगळीकडे फिरत दुसर्यांना मुर्ख ठरवायचे
२. दुसर्याला टोचतील अशी जोडवी पायात घालून लाथा हाणत सुटायचे
३. आपणच लिहीलेले पोस्ट एडिट करून तिथे फक्त स्मितहास्याची पिवळी गोल टिकली लावायची

***************************************************

दुरुस्तीची चूक :
"उद्योग वारता" हे शिर्षक "उद्योग वार्ता" असे वाचावे. नजरचुकीने हा अभद्र पणा झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

"ही काही वांगी दाखल उदाहरणे" या वाक्यात "वांगी" ऐवजी "वानगी" असे वाचावे. मंडईची बातमी देण्याच्या ओघात ही चुक घडली त्याबद्दल क्षमस्व.

****************************************************

प्रकार: 

छान हं हं Happy पण पुर्वी सारखे खवचट टक्केटोणपे नाहीत Happy इथे सध्या इतका मसाला असताना तू कुठेतरी कमी पडलीस असे नाही का तुला वाटतं Happy बहुतेक मुद्दाम तू हात आखुडता घेतला असेल.. उगाच कुणी नाटकं करायला नको Happy

बर्‍याच दिवसानी दर्शन. लावण्या मस्तच !!
पण मलाही हात आखडता घेतलाय असे वाटले हो !!!
निदान शेवटी, आगामी ..., पुढे वाचा...., पुढल्या भागात...
असे काहितरी असायला हवे होते ...

खी खी खी.... प्रिमियर लीग आणि लावण्या जबरीच..
पण कुठेतरी कमी नक्कीच जाणवतीये... आधीसारखे प्रत्येक बॉलला षटकार बसलेले नाहीत... काही वेळेस चौकारच बसलेत..
पुढच्या वेळेस प्रत्येक बॉलला षटकारच पाहिजेत...

या नंतर सादर होईल रिक्षेवाल्याची लावणी :

मी सोडून सारी लाज
असा बेभान फिरलो आज
की टायर फुटले रे
की टायर फुटले रे
>>>> Lol मस्त मस्त! उद्योग वार्ताही जबरी! Lol

लई भारी!!!!:हहगलो:

Rofl Rofl Rofl

तुफानी असल तरी कंटेंट बराच कमी आहे.
टॅब्लॉईड चार पानांची कुजबुज आहे ही.
हा २०-२० चा परिणाम म्हणावा काय??????

कंटेट कमी? आणखी लिहायचं म्हणजे मग अगदी २४*७ मायबोलीवर पडिक राहावे लागेल मला Happy

धन्यवाद सर्वांना.

***...कुजबुज...*** (वा वा. एकदा तरी वाचाच!!!!!!!) या लेखाची वांग-मयीन (मला तो शब्द लिहिता येत नाही) समिक्षा:

उपरोक्त लेख हा अभ्यासात्मक दृष्टीने गुलमोहोरातील निवडक साहित्यकृतींचा घेतलेला आढावा आहे असे मला वाटते. Light 1 Wink

अभ्यासकाने आणखी थोडी विवेचना करून प्रस्तुत साहित्यकृतींचे साग्रसंगीत मूल्यमापन केले असते तर हा लेख खचितच जास्त प्रगल्भ झाला असता असे माझे प्रांजळ मत आहे. Light 1

प्रस्तुत लेख हा लेखक-लेखिकांचा / कवी-कवयित्रींचा अनादर करत नसून त्यांची जाणून बुजून फिरकी घेत असावा अशी दाट शंका घेण्यास वाव आहे. Proud

इतर मते कालांतराने सांगणण्यात येतील कारण आता कार्यालयीन वेळ संपत आलेला आहे. Wink

Pages