वारी - भाग ७

Submitted by टवणे सर on 30 March, 2010 - 03:57

आम्ही पोचलो तेव्हा आत्याने तिथे जे कुणी होते त्यांना तिचा पाय नेमका कशाने मुरगळला आणि खरं तर तिला चालायची सवय आहेच पण नेमका बघा पाय मुरगळला वगैरे सांगायला सुरुवात केली होती. मी ऐकले न ऐकले करुन शाळेभोवती हिंडायला सुरुवात केली. शाळा रस्त्याला समांतर होती आणि रस्ता आणि शाळेच्यामध्ये छोटं पटांगण होतं. मधोमध एक झेंडावंदनाचा खांब होता. चार पायर्‍या चढून – ह्या पायर्‍यांवरच आत्या बसलेली होती - शाळेच्या इमारतीचा व्हरांडा होता आणि तीन वर्गांची दारं व्हरांड्यात उघडत होती. एकूण तीनच वर्ग होते. दोन दरवाजांच्या मधल्या भिंतीवरच्या जागेत भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा आणि सांगली जिल्ह्याचा नकाशा असे ओळीने रंगवलेले होते. दारांच्यावरती धूळ बसून मळलेले सुविचार होते. आणि नोटीस वगैरे लिहायला दोन टोकाच्या व्हरांड्यात तोंड करुन असलेल्या समोरासमोरच्या भिंतींवरच मधे काळे चौकोन रंगवून फळे केले होते. दिवाळी असल्यानं बहुतेक शाळेला सुट्टीच होती. वर्ग सगळे कुलुपं लावून बंद होते. ह्या शाळेच्या मानाने आमची शाळा बरीच मोठी होती. मुख्य इमारत दोन मजली होती आणि वरती तिसर्‍या मजल्यावर एक खोली होती. पण ती वरची खोली फारशी मोठी नव्हती आणि तिथे एक कुठलातरी क तुकडीचा वर्गच बसवायचे दर वर्षी. ह्यावर्षी आमचा वर्ग मात्र तळ मजल्यावारच स्टेजच्या मागे होता.

वर्ग बघून मला आमच्या शाळेत ह्यावर्षीच लागलेल्या नवीन इतिहासाच्या बाई आठवल्या.
काका आत्याशी बोलत बसले. अजून फारशे लोक मुक्कामाला पोचले नव्ह्ते. मी परत पायात चपला चढवून रस्त्यावर आलो.

रस्त्यावर आल्यावर उजव्या हाताला पंढरपूर होते. डाव्या हाताला आज दिवसभर पायी तोडलेला रस्ता. उजवीकडे थोडा पुढे एका वळणापर्यंत रस्ता दिसत होता. वळणाशीच वडाची भली थोरली दोन-तीन झाडं असल्यानं तिथून पुढचं नीट दिसत नव्हतं. मी त्या दिशेने पुढे निघालो आणि दोनच मिनिटात त्या झाडांशी पोचलो. एक छोटासा ओढा सिमेंटचा पाईप घालून रस्त्याखालून काढलेला होता. जिथे सिमेंटचा पाईप बाहेर निघतो तिथे रस्त्यालगत एक छोटासा कट्टा बांधलेला होता. मी त्या कट्ट्यावर जाउन बसलो. ट्रक येत जात होते. माझ्या पाठच्या बाजूने गावातल्या बायका विहीरवरुन पाणी भरुन आणि बरोबरच्या लहान पोरी बाभळीचं जळण तोडून ते फरपटवत रस्ता ओलांडून गावाकडे जात होत्या.
माझे पाय त्यामानाने फारशे दुखत नव्हते. आजचा पहिला दिवस चालण्याची काहीही तयारी नसून देखील पार पडल्याने मी स्वत:लाच शाबासकी दिली. खरं तर मी वारी पूर्ण केल्यावर शाळेत सगळ्या शिक्षकांनी माझं नक्की कौतुक केलं असतं. नवीन बाई मात्र माझं कसं कौतुक करतील ते सारखं माझ्या डोक्यात घोळू लागलं. सगळ्या वर्गांना त्या इतिहास शिकवायच्या. पण पाचवीच्या वर्गाला मराठीही शिकवायच्या. खरं तर त्या बरच अशुद्ध बोलायच्या. पाणीला पानी, त्यो वगैरे. पण त्यांच्या तासाला मी त्यांच्याकडेच बघत बसायचो. दिसायला त्या काळ्या-सावळ्याच होत्या तश्या. घामाने कायम त्यांच्या ब्लाउजला काखेत दोन मोठे गोल झालेले असत. पण तरी मला त्यांच्याकडे बघत बसावेसे वाटायचे. त्यांचा काळा रंग, घाम बघून त्यांना विचित्र वास येत असावा असं मला नेहेमी वाटायचं. त्यांच्या तासाला मी पूर्ण वेळ अस्वस्थ असायचो. मी वारी पूर्ण केल्याचे ऐकून त्या माझ्या केसावरुन हात फिरवून मला गोंजारतील असं चित्र डोक्यात येउन मला एकदम विचित्र झालं. दोन्ही मांड्या एकमेकांवर घट्ट दाबून मी थोडावेळ तसाच कट्ट्यावर बसलो.

आजकाल असं वरचेवर होउ लागलं होतं.

मी शाळेशी परतलो तोवर बाबा आणि ताई तिथे पोचलेले होते. मला बघून काका म्हणाले ’हा बघ आला. आज चाललाय मात्र नेटाने हां.’ ताई आत्याला आधार देत गाडीकडे घेउन जात होती. आत्याने थोडा चालायचा प्रयत्न केला पण तिचा पाय चांगलाच मुरगळलेला दिसत होता. तिच्या अगदी डोळ्यातून पाणी यायचेच काय ते बाकी होते बघून काकांनी तिच्या काखेत हात घालून जवळपास उचलूनच तिला गाडीपर्यंत नेले. आणि परत जाताना तिला खरोखरच वाईट वाटत होते.
बाबांनी मला मग आईने भरुन पाठवलेली पिशवी दिली. पांढरे दोन बंद असलेली, फुलाफुलाच्या डिझाइनची ती पिशवी बघून मला कससच झालं. त्यातच तो सुधीर पिशवीकडे बघून मनातल्या मनात हसल्याचं मला नक्की ठाउक होतं. मी काही न बोलता पटकन बाबांच्या हातून पिशवी हिसकावून घेतली आणि शाळेच्या व्हरांड्याशी जिथे काका बसले होते तिथे ठेवून दिली. व्हरांडा आता लोकांनी जवळपास भरलेला होता. नीट जा असं माझ्या खांद्यावर हात टाकून सांगत बाबा गाडीकडे गेले. मी तिथेच मैदानात थांबलो. गाडीचा आवाज आल्यावर मी मागे वळलो तर मगाशी भेटलेला विनोबा भावे शाळेच्या बाजूला जरा वर टेकावर असलेल्या बसस्टॉपच्या शेडमध्ये उभा असलेला दिसला. मी मग तिकडे गेलो.

जेमतेम चार-पाच माणसं उभी राहू शकतील इतपतच ती शेड होती आणि बाजूला एक सिमेंटची पुरुषभर उंचीची पाण्याची टाकी. ही पाण्याची टाकी शाळेची दिसत होती कारण नळाच्या खाली जरा दोन-चार फरश्यांचे तुकडे टाकून मुलांना उभं राहून नळाला तोंड लावून पाणी पिता येईल इतपत व्यवस्था होती. मी शेडपाशी गेलो तेव्हा विनोबा भाव्यांबरोबर किडकिडीत उंच, काळसर, केसात पांढरा पट्टा असलेले एक जण विनोबाशी बोलत सिगरेट ओढत उभे होते. हा कोण असं नुसतं मानेच्या झटक्यातून त्यांनी विनोबाला विचारलं.
’दादाचा पुतण्या. पहिल्यांदाच येतोय.’
मग त्यांच्या बाकी गप्पा सुरु राहिल्या. अधून-मधून विनोबा त्याला ख्याख्याख्या करत टाळी देत होता. त्यांचं नाव डीके. आडणाव बहुतेक कुलकर्णी. कारण मी आजीबरोबर तिची पेंशन आणायला कधीकधी महाराष्ट्र बॅंकेत जायचो तेव्हा काउंटरच्या मागे बसणार्‍या माणसाचे नाव कुलकर्णी होते आणि हे साधारण तसेच दिसत होते. खरं तर वारीला आलेले असताना ते सिगरेट ओढत होते हे मला मुळीच आवडले नाही. बाकी सगळे लोक गंध लावून, माळ घालून निघालेले आणि हे एकटेच सिगरेट ओढणारे. पण विनोबाला त्याचे काही नव्हते बहुतेक. तसे आज दुपारी जेवणानंतर मी वाटेत श्राद्धाच्या काळे भटजींना सिगरेट ओढताना बघितले होते. पण ते गावात सगळीकडेच सिगरेट ओढत. दुपारी मात्र सिगरेट पेटवून पहिलाच झुरका हाणल्यानंतर त्यांना अशी काही खोकल्याची उबळ आली की दोन-पाच मिनिटं ते खोकतच राहिले आणि शेवटी शेवटी त्यांच्या ओठाच्या कडेने एक हिरवा बेडका बाहेर येउन शर्टावर ओघळला. त्या पान टपरीवाल्याने त्यांना तांब्यातनं पाणी दिलं. वारीतलं बाकी कोणी नव्हतं त्यावेळी तिथे म्हणुन ते शांत होईपर्यंत मी थांबलो. त्यानंतर मात्र सिगरेट पिणं वाईट आहे हे माहिती असून सुद्धा त्यांना सिगरेट प्यायची असेल तर मी का त्यांच्या मदतीला थांबायचं म्हणुन मी रस्ता क्रॉस करुन पलीकडून निघून आलो.

इकडे डीके आणि विनोबांचे काहीतरी ख्याख्याख्या चालूच होते. मग मी परत खाली शाळेकडे आलो. आता जवळपास अंधार झाला होता. पण अंधार पडत असताना जर बाहेरच थांबलो तर पहिले पहिले कसे बराच वेळ अंधारातसुद्धा अंधूक दिसत राहते तसे मला अंधूक दिसत होते. पटांगण आता पूर्ण भरले होते. बर्‍याचश्या बायका व्हरांड्यात बसलेल्या होत्या. दिंडी बरोबर जाणारे सगळे धोतरवाले पटांगणाच्या डाव्या बाजूला बसले होते. सामानाचा ट्रक रस्त्याला लागलेला होता आणि लोकं आपलं सामान त्यातून घेण्यासाठी कालवा करत होते. काकांनी त्यातनं बेडिंग आणून व्हरांड्याशी खाली गुंडाळी करुन टाकलेलं होतं. मी व्हरांड्यात ठेवलेली माझी पिशवी घेउन आलो आणि बेडिंगवर काकांशेजारी बसून आईने काय काय भरुन पाठवलं आहे ते बघायला लागलो. आत माझ्या चड्ड्या-बनियन, हाफ पॅंट, मोजे, टॉवेल वगैरे सगळं होतं. प्लास्टिकच्या पिशवीत घालून कॅनव्हासचे शाळेचे पांढरे बूटपण होते. टोपी पण ठेवलेली होती ते बरं झालं कारण तसं दिवसभर डोक्याला बर्‍यापैकी उन बडवलं होतं. पिशवीची शिवण एका बाजूनं निघायला लागली होती ते बघायला मी पिशवी तिरकी केली तर समोरच्या चेनच्या कप्प्यात काहीतरी हाताला लागलं. मी चेन उघडून बघितलं तर आत ओल्या नारळाच्या वड्या. आज सकाळी मी निघालो होतो तेव्हा घरात नारळाच्या वड्या नव्हत्या. कारण वड्या वगैरे असतील तर मला कुठल्या डब्यात आहेत आणि किती शिल्लक आहेत ते नक्की माहिती असायचे. आणि नारळ पण खोवलेला नव्हता कारण बहुतेक वेळी नारळ मीच खोवायचो. म्हणजे आईने आज तापातून उठून, नारळ खवून, गूळ घालून वड्या केलेल्या होत्या.
मी अर्धीच वडी खाउन, उरलेली अर्धी काकांसाठी ठेवून प्लास्टिकच्या पिशवीला परत रबरबॅंड लावलं आणि ती चेनच्या कप्प्यात ठेवून टाकली. घरात जेव्हाजेव्हा डबा भरलेला असे तेव्हा मी अजून फक्त एकच, अजून एकच करत खूप वड्या खायचो. मग दिवस-दोन दिवसातच खूप कमी वड्या उरायच्या. त्यानंतर मग मी अर्धी, पाव, छोटा तुकडा असं थोडं थोडं करत करत तरीसुद्धा भरपूर खायचो. आजी माझ्यावर जाम चिडायची त्यामुळं.

पटांगणात आता जवळपास अंधार पडला होता. रस्त्यावरच्या ट्युबचा प्रकाश थोडाफार येत होता आणि वरनं चंद्राची कोर मंद प्रकाशत होती. आभाळ स्वच्छ असल्याने तसं ठिकठाक दिसत होतं. बायका बसलेल्या बाजूने शिल्पाची आई त्यांचा डबा घेउन आली. शिल्पाचे बाबा बापू चिवटे काकांच्या बरोबर गप्पा मारत बसलेले. मग रात्रीच्या जेवणासाठी मी, काका, बापू चिवटे, शिल्पाची आई, शिल्पा आणि आमच्या वर्गातली शिल्पीची मैत्रिण काळी आरती जोशी असे सगळे एक गोल करुन बसलो. आजूबाजूला पण सगळे लोक आपापले डबे उघडून घोळक्या-घोळक्याने बसले होते. आरती जोशी मला फारशी माहिती नव्हती. शिल्पाशी मी वर्गात अधूनमधून बोलायला जायचो. आरतीशी मात्र मी कधिही बोललेलो नव्हतो. आणि आजकाल मुलींशी बोलायला लागले की लगेच वर्गात गलका सुरु व्हायचा. त्यामुळे कुठलाच मुलगा कुठल्याच मुलीशी बोलायला जात नव्हता. पण आमच्या वर्गातली मुग्धा बर्वे मात्र एकदम खास होती. मी बरेचदा मान समोर फळ्याकडे ठेवून डोळे कोपर्‍यात नेउन मुग्धाला बघायचो. ती आणि शिल्पा एकाच बाकावर बसायच्या आणि शिल्पाला ओळखत असल्याने मी मुलं हुइ-हुइ करत असताना सुद्धा शिल्पाशी उगाचच जाउन काहीतरी बोलायचो. मुग्धाशी बोलायचं मात्र कधी धाडसच होत नव्हतं. ती नेहेमी पुस्तकात डोकं खुपसून बसलेली असायची. वर्गात ती नेहेमी पहिली असायची. शाळा सुटल्यावर मी एकदम जोरात पळत जाउन, ग्राउंडवरुन सायकल काढून एकदम फास्ट मारत तिच्या घराच्या वाटेवर जाउन उभा राहत असे. कुणाला शंका येउ नये म्हणुन मी मुद्दामूनच सायकलची चेन जरा सैल करुन ठेवलेली होती आणि वाटेत हातानेच चेन पाडून ती यायची वाट बघायचो. आणि ती येताना दिसली की चेन लावायची ऍक्टिंग करत मान खाली घालून डोळ्याची बुब्बुळं वर नेउन तिला बघायचो. तिने मात्र थांबून एकदाही चेन पडली का ते विचारणे सोडाच पण माझ्याकडे बघितले पण नव्हते. आता वारीत शिल्पाशी बोलून मुग्धाबद्दल अजून माहिती काढायला पाहिजे असं मी पक्कं केलं.

आम्ही जेवायला बसलोच होतो इतक्यात धनंजय आणि सुधीर आपापले डबे घेउन आमच्या गोलात येउन बसले. बसल्या बसल्याच ढुंगण जमिनीवर घासत मागे मागे होत आम्ही गोल जरा मोठा केला. काकांनी डबा उघडला. बापू चिवट्यांच्या बायकोने कागदाच्या प्लेट आणल्या होत्या. सगळ्यांनी पुन्हा आपापल्या डब्यातल्या बटाट्याच्या भाज्या एकमेकांना देउन जेवायला सुरुवात केली. सुधीरने सगळ्यांचे थोडे थोडे घेतले आणि स्वत: मात्र स्वत:च्या डब्यातले एकटाच खात राहिला. मी जरा निरखून बघितलं तर त्याने बहुतेक रताळ्याच्या पोळ्या आणलेल्या होत्या. मला रताळ्याच्या - खरं तर सगळ्याच गोड पोळ्या गुळाची, सांज्याची वगैरे वगैरे - आवडायच्या. आमची चौथीत असताना सज्जनगड-सातारा-पावस अशी शाळेची सहल गेली होती तेव्हा आजीने मला पहाटेचं उठून रताळ्याच्या पोळ्या करुन दिलेल्या होत्या. सहलीच्या दिवशी मी पहाटे तयार होत असतानाच बाबा मुंबईहून परतले आणि त्यांनी तिकडून माझ्यासाठी बरीच पुस्तके आणली होती. त्यात अंकगणितातील गमतीजमती, कोडी, शेडिंग, टिळक-आंबेडकर-गांधी-सावरकर वगैरेंचं चरित्र अशी बरीच पुस्तके होती. मला एकदम सहलीला जायचे रद्द करुन घरातच पुस्तकं वाचत बसुया असं वाटायला लागलं आणि पोट दाबून, कमरेत वाकून, मी पोट दुखायचं नाटक सुरुच करणार इतक्यात मला सहलीसाठी पन्नास रुपये भरल्याचे लक्षात आले आणि मग मी सहलीलाच गेलो. इकडे सुधीरने मात्र सगळी रताळ्याची पोळी एकट्यानेच संपवली.

आम्ही जेवत असताना काकांनी सुधीरला बेडिंग व्यवस्थित आणलं आहेस ना? आता थंडी चांगलीच पडते आहे म्हणुन विचारलं.
’हो म्हणजे काय? मी एकदम हिमालयात चालेल अशी स्लिपींग बॅग आणली आहे.’
’स्लिपींग बॅग म्हणजे काय?’ मी एकदम बोलून गेलो.
मला स्लिपींग बॅग म्हणजे एक मोठी गोणपाटाची पिशवी ज्यात माणुस झोपलाय आणि ती खुंटीला अडकवली आहे असे चित्र डोळ्यासमोर आले. पण सुधीर मात्र माझ्याकडे काय गावठी आहे असे बघायला लागला. पण मग बापूंनी पण तेच विचारल्यावर त्याने अशी चेन लावलेली आडवी जमिनीवर पसरायची आणि मग त्यात आत शिरायचं अशी एक मउ पिशवी असते असं सांगितलं. त्याचं ऐकून बापू एकदम ’हात्तेच्यायला, म्हणजे होल्डॉलच की. फक्त बंदाऐवजी चेन’ असं म्हणत ख्याख्या हसत हात धुवायला निघून गेले. मला स्लिपिंग बॅग बघायची खूप उत्सुकता लागली. पण सुधीरला दाखव म्हटलं तर अजून भाव खायला लागेल म्हणुन मी आमचा डबा घेउन धुवायला घेउन गेलो.

तिकडे सिमेंटच्या टाकीशी शिल्पा आणि आरती खुसुरफुसुर करत डबे धूत होत्या. मी गेल्यावर त्यांची खुसफुस थांबली. मी डबे-झाकणं पाण्याखाली धरुन नुसताच हात फिरवला पण बटाट्याच्या काचऱ्यांचा तेलाचा तवंग तसाच आत चिकटलेला राहिला. मला प्रचंड झोप येत होती म्हणुन मी तसच सगळं झटकलं आणि डबे-झाकणं लावायला लागलो तर शिल्पीनं माझ्या हातून डबे-झाकणं ओढून घेतली आणि खाली पडलेली माती घेउन खसाखसा घासायला लागली. मी नुसताच चवड्यांवर बसून बघत बसलो. मातीनं नीट घासून मग तिनं ती विसळायला नळाखाली धरली. आता झालच असं माझ्या डोक्यात असताना ’मुग्धीला बघायचं म्हणुन येतोस ना माझ्या बाकाकडं. आणि रोज रोज बरी चेन पडती रे तुझी’ असं म्हणुन एकदम सिक्सरच मारला. आरतीपण तोंडावर हात घेउन दुसरीकडे फिसीफिसी हसायला लागली. हिला माहितीये म्हणजे मुग्धानेच सांगितलेलं असणार आणि तिला माहिती आहे म्हणजे कुणाकुणाला तिनं सांगितलय, आणि शाळेत जर मुख्याधापकांना कळलं तर ते माझी सालडी सोलतील आणि घरी कळलं तर मग - असं सगळं माझ्या डोक्यात कलकल करु लागलं. पण शिल्पाला माहिती आहे म्हणजे मुघ्दानं मला बघितलेलं असणार असं पण मला वाटायला लागलं. मला काहिच कळेनासं झालं. माझी कानशिलं लाल झाली आणि मी तिच्या हातातून डबा खिसकावून घेउन टाकीच्या मागं असलेल्या बसस्टॉपच्या शेडकडे गेलो.

तिथे डिके सिगरेट मारत उभे होते आणि विनोबा तंबाखूचा बार भरत होता. मी काही वेळ तिथेच बसलो. रात्रीच्या मंद प्रकाशात आणि रस्त्यावरच्या ट्युबच्या अर्धवट पडणार्‍या उजेडात पटांगणावरची लोकं फोटोच्या निगेटिव्ह सारखी दिसत होती. त्या निगेटिव्हमधली लोकं आता आपापल्या सतरंज्या-अंघरुणं-पांघरुणाच्या गुंडाळ्या उलगडून पटांगणात रात्रीच्या झोपण्याची तयारी करत होती. पटांगणाच्या दु्सर्‍या टोकाला झोपायची तयारी करणार्‍या बायका तर अगदीच अंधूक दिसत होत्या. शिल्पी आणि आरती पण बहुतेक तिकडे परतल्या होत्या. त्यांनी कुणाकुणाला काय सांगितलय आणि मुग्धीला काय काय ऐकायला आलं आहे ह्यानं परत एकदा माझ्या छातीत धडधडलं.

मी वेगवेगळ्या लोकांच्या पसरलेल्या सतरंज्यांमधून साप-शिडीतल्या सोंगटीसारखे आडवे-तिडवे चालत काकांनी बेडिंग उलगडून चादर-सतरंजी जमिनीवर पसरली होती तिथे आलो. आत्यापण वारीला येणार असल्याने काकांनी दोन वेगवेगळी बेडींग आणली होती. पण आता आत्या परतल्याने दोन्ही बेडिंग एकत्र होउन मस्त जाडजूड गादीच झाली होती. धनंजयने आणि बापू चिवट्यांनी पण आमच्याच बाजूला त्यांच्या सतरंज्या पसरल्या होत्या. दोनपाच मिनिटात सुधीर कुठुनतरी परत आला. त्याने त्याची सॅक उघडली आणि एक हवा भरायची उशी काढून फू-फू करत फुगवली. मग सॅकमधून त्याने भडक केशरी रंगाचा एक लंबगोल काढला. हीच स्लीपिंग बॅग असणार बहुतेक ह्या अंदाजाने मी नीट लक्ष देउन बघायला लागलो. त्या लंबगोलाच्या एका चपट्या बाजूच्या मध्यातून एक काळ्या रंगाचा दोरा लटकत बाहेर आला होता आणि जिथून बाहेर आला होता तिथे एक काळ्या रंगाची गोटी होती. ती गोटी धरुन सुधीरने फर्रकन् ओढली आणि त्या बाजूचे तोंड उघडले. आता आजूबाजूची सगळी लोकं त्याच्याकडे ध्यान देउन बघायला लागली. सुधिरला पण त्याची कल्पना आल्याने तो मुद्दामच संथपणे हात हलवू लागला आणि आपलं लक्षच नाहिये असं दाखवत एका बाजूला सगळे आपल्याकडेच बघताहेत ह्यावर नजर ठेवू लागला. ज्या बाजूचे तोंड उघडले होते त्यातून त्याने एक गुंडाळी बाहेर काढली ती पण भडक केशरी रंगाचीच होती. मग ती गुंडाळी त्याने जमिनीवर उलगडली. उलगडलेल्या त्या आयताकृती मउमउ पिशवीत तो मध्ये शिरला आणि मग त्याने कमरेपासून असलेली चेन ओढत मानेपर्यंत ओढली. आता फक्त त्याची मान त्या पिशवीबाहेर होती आणि डोके हवा भरलेल्या उशीवर ठेवून त्याने डोळे मिटले. इतका वेळ टक लावून स्लिपींग बॅगचे ते प्रात्यक्षिक बघत असलेले सगळेजण दोन क्षण तसेच शांत राहिले आणि मग एकदम शाळा सुटल्यावर व्हावा तसा गजबजाट होउन आपापल्या अंथरुणांवर लवंडले.

काकांनी सगळ्यात खाली जाड सतरंजी घातलेली होती. त्यावर मग आजीच्या जुन्या नउवारीच्या केलेल्या दोन गोधड्या अंथरल्या होत्या. अंगावर घ्यायला सोलापुरी चादर होती. कपड्याची पिशवी काकांनी डोक्याशी उश्यासाठी म्हणुन ठेवलेली होती. मी पण माझ्या कपड्याची पिशवी डोक्याखाली घेतली आणि आडवा झालो. ट्रकमध्ये गुंडाळी करुन ठेवल्यामुळे सतरंजी आणि गोधड्या हलक्याश्या गरम झाल्या होत्या. हवेतल्या गारव्यामुळे आणि जमिनीलगत समांतर वाहणार्‍या हलक्या गार वार्‍यामुळे अंगाखालचं अंथरुण अजूनच उन-उन वाटत होतं. काकांनी ओडोमॉसच्या ट्युबमधून थोडं ओडोमॉस काढून माझ्या हातावर दिलं आणि थोडं स्वत: घेउन तोंडाला आणि कोपरापासून हाताला चोळलं.
’सांगोल्याला डास काय फोडून काढतात न्हाय दादा’, बापू झोपल्या झोपल्या म्हणाले.
’होय, ह्यावर्षी बाहेर शाळेच्या ग्राउंडमध्येच झोपुया, काय बापू. मागच्या वर्षी त्या सांगोल्यात वर्ग उघडून दिले पण आत डासांच्या झुंडीच झुंडी होत्या. बाहेरच झोपुया ह्या वेळी.’
’खरय. पांडुरंग.’ बापू आता कुशीवर लवंडले होते.

’उद्या लवकर पहाटे चारला उठवतो तुला. पटकन तोंड धुउन, संडासला जावून, चहा घ्यायचा आणि निघायचं, काय.’ काका माझे पाय चेपता चेपता म्हणाले. मग काकांनी माझ्या पायाच्या अंगठ्याशी आलेला ब्लिस्टर बघितला आणि म्हणाले ’हा कधी आला आणि?’
’दुपारीच. स्लीपरचा अंगठा घासल्यानं आला बहुतेक.’
’दुखतोय का?’
’नाही. आता तर मुळीच नाही. आणि उद्यापासून तर कॅनव्हासचे बूट आहेतच.’ खरं तर बारीक दुखत होतं पण काका उद्या परत पाठवतील की काय ह्या भितीनं मी दाबून नाही म्हणुन सांगितलं.
’उद्या कुठेतरी बॅंडेजची पट्टी घेउया. मी ह्यावेळी नेमकी आणायची विसरलो बघ. बापू तुझ्याकडे आहे का रे एक पट्टी?’
बापूंनी तोवर घोरण्याची एक पट्टी पकडलेली होती.
’झोपला बघ हा. उद्या घेउया एक सकाळी. बरं तर उद्या लवकर निघायचं आणि उनं पडायच्या आत अर्ध्यापेक्षा जास्त पल्ला मारायचा हां. उद्या दुपारी घोरपडी नाल्याला जेवण असतं. पण घोरपडी नाला आहे इथून २४ किलोमीटर. मग दुपारी जेवण झाल्यावर फक्त आठ किलोमीटर चाललं की जुनोनी. पण घोरपडी नाला येता येत नाही. आणि रस्ता सगळा रखरखीत माळावरुन जातो. उन्हाच्या आत पटापट पाय उचलायचे. झोप आता.’
’काळूबाळूचा डोंगर पण आहे उद्या.' ख्याख्याख्या करत मध्येच घोरण्याची लय सोडून कुशीवर वळत बापू म्हणाले आणि परत घोरायला लागले.

बापूंनी सांगितलेल्या काळूबाळूच्या डोंगराचे नाव मी कधी ऐकले नव्हते. भाउंच्या तोंडून सुद्धा कधी ऐकल्याचे आठवत नव्हते. दंडोबासारखा असेल का वेगळा ते काही माझ्या लक्षात येईना. आणि डोंगर ओलांडायचा असेल तर भाऊ नक्की बोलले असते तसं कारण त्यांच्या बोलण्यातून नेहेमी पंढरपूरपर्यंत रस्ता सरळ आहे, सरळ आहे असच असायचं. काकांना विचारावं म्हणुन मी कुशीवर वळलो तर काका एव्हाना झोपले होते. मग मी काळूबाळूचा डोंगर, तो चढायचा-उतरायचा, उद्या एका लयीत कसं चालायचं, शिल्पी आरतीशी काय खुसफुस करत होती, मुग्धाचा गोरा चेहरा असं काय काय घोळवत झोपी गेलो. वरच्या बाजूला टाकीकडं अजूनही कुणाचातरी डबे घासण्याचा आवाज येत होता.

चिमणीचं घरटं फट्टदिशी दाबून कागदावर चिकटवलेला तो खरबरीत लालबुंद कागद परत माझ्या गालावर घासत होता. पण मधेच ते मउ पीस माझ्या गालाला लागलं आणि एकदम एक शिरशिरी अंगातून गेली. मी त्या पिसाला गालावरुन गोंजारत असताना अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या गालाच्या जागी दुसर्‍याच कुणाचा तरी गालावर ते पीस घासत होतं. तो गाल गोरा असणार ह्याची मला खात्री होती आणि म्हणुन मी जरा डोकं मागे घेउन नीट बघायचा प्रयत्न करायला लागलो. पण डोळ्यावर प्रचंड झोप असल्यानं मला डोळे उघडायला प्रचंड त्रास होत होता. मी खूप प्रयत्नाने डोळे उघडले तर गालाच्या जागी मला एकदम काखेतलं घामाचं वर्तुळच दिसलं आणि मी दचकलो. मग हळुहळु ते वर्तुळ माझ्या चेहर्‍याजवळ यायला लागले. मला घामाचा वास हवासा-नकोसा वाटायला लागला आणि तेव्हड्यात त्या ओल्या वर्तुळाच्या जागी सगळीकडे पाणीच पाणी भरायला सुरुवात झाली. मला अंगाखाली एकदम ओलं ओलं वाटायला लागलं.
तेव्हड्यात मला काकांचा उठ उठ असा आवाज आला आणि मी खाडकन् डोळे उघडले. अंगाखाली ओल लागत होती आणि बाजूनच पाण्याचा एक छोटासा ओहळ वाहत होता.

काकांनी मला एका हाताने खांद्याशी धरुन उभे केले आणि पटकन खालची सतरंजी-गोधडी उचलून घेतली. पटांगणातली वरची टाकी भरण्यासाठी रात्री कुणीतरी नळ सोडून ठेवला होता. टाकी भरल्यावर पाणी उताराने पटांगणात पसरले. आम्ही टाकीच्या बाजूलाच झोपलेलो असल्याने सतरंजी वगैरे खालून ओली झाली होती. मी अर्धवट झोपेतच व्हरांड्याशी जाउन मांडया दाबून, पाय पोटाशी घेउन बसलो. मग लोकांनी जिथे ओलं झालं नव्हतं अश्या कोरड्या भागांवर आपापली अंथरुणं पुन्हा अंथरली. काकांनी पण जरा बाजूला कोरडी जमिन बघून अंथरुण पुन्हा अंथरलं आणि मला व्हरांड्यातून हाताला धरुन आणलं.

मी अंथरुणावर लवंडलो. खालून अंगाला ओल लागत होती.

गुलमोहर: 

किती दिवसांनी आलाय हा भाग. मला हा भाग का कोण जाणे आधी वाचल्यासारखा वाटतोय. यातले काही उल्लेख आधीच्या भागात पण आलेत की काय? मागचे भाग अन हा असं सगळं सलग वाचायला हवं आता.

भाषेला छान ओघ आहे .मस्त .मागच्या भागांच्या लिंक्स दिल्या तर तेही वाचायला आवडतील .

सुक्ष्म बारकावे तर असे आहेत की सरळ चलचित्र डोळ्यासमोर उलगडतं. लंपन जिथे संपतो त्यानंतर डोळ्यासमोर हाच मुलगा येतो.

टण्या - कितीही वर्ष घे, पण हे पूर्ण कर नक्की. छापण्यायोग्य लिहीतो आहेस खरंच. Happy

एक काम करा ना टण्या राव.
तुम्ही सगळे भाग मिळुन एका कादंबरीत पेस्ट करा.
म्हणजे वाचायला मज्जा येइल.
कारण परत परत लिक्न शोधणे आम्हाला कठीण जातय.
धन्स.
वारी वाचायला फार आवडेल आम्हाला पण सलग.

टण्या, मगाशीच वाचलं होतं हे. छान लिहीताय. खरंच खूपच छोट्या बारकाव्यांसकट आलीये तुमची कादंबरी. पण पार्श्वभूमी काहीच माहित नाहीये. तुमच्या पाऊलखुणांवर तब्बल ६-७ व्या पानावर आधीचा भाग सापडलाय. Sad

http://www.maayboli.com/node/9557

झक्कास. स्वैंपाकघरातलं काम साईडिंगला टाकून सगळे भाग वाचून काढले एकदाचे. एकदम भारीच वाटतंय. पण आता प्लीज पुढचे भाग विसरायच्या आत येऊ द्यात. त्याची आजोबांबरोबरची अटॅचमेंट अगदी सगळ्या कथेमध्ये जाणवतेय.

आता प्लीज पुढचे भाग विसरायच्या आत येऊ द्यात>>> ते सोडा हो.. आता किमान सहा महिने विश्रांती घेतात साहेब! Happy

मस्त टण्या! नेहेमीप्रमाणेच. इतकं एकसंध लिहितोस (इतक्या गॅपनंतरही) की वाचता वाचता कथेत इन्व्हॉल्व्ह व्हायला होतंच! Happy

ट्ण्या मी आधीच्या भागांची लिंक दिली तर चालेल ना रे ?
वारी (पुर्वार्ध-भाग १) http://www.maayboli.com/node/1339
वारी (पुर्वार्ध-भाग २) http://www.maayboli.com/node/1349
वारी - भाग ३ (पुर्वार्ध अंतिम) http://www.maayboli.com/node/2356
वारी - भाग ४ - http://www.maayboli.com/node/2363
वारी - भाग ५ http://www.maayboli.com/node/2836
वारी - भाग ६ http://www.maayboli.com/node/9557

टण्या, हा ही भाग सुंदरच आहे पण आधीचा भाग नी हा भाग ह्यात वर्षाचं अंतर पडलंय का? Wink रैना म्हणाली तसं कादंबरीचा विचार नाही का तुझा?
आडो, ह्या वारीतला मुलगा टण्या स्वतःच आहे, हो ना रे?

कार्तिकी वारी असते ना दिवाळीनंतर, बहुतेक सुरवातीच्या कोणत्यातरी भागात (कदाचित पहिल्याच) आहे उल्लेख.

मस्त रे टण्या...

या भागाबरोबरच मागचे भागही परत वाचले.. मजा आली .... :)..

का कोण जाणे एकदम `विहीर' ची आठवण झाली रे सगळे भाग परत वाचताना..

टण्या उशिराने आलाय पण उत्कृष्ट उतरले आहे. मजा आली. रैना म्हणाल्यासारखेच, कितीही वर्षे घे पण पुर्ण करच.

जियो यार.... कुठेही पकड सुटत नाहीये की इतक्या कालांतराने येवून देखील सुत्र तुटत नाहीये. मस्तच Happy

वारी पुर्ण झाली की मगच वाचायच ठरवलय मी.
सुरवातीची तीन चार भाग येतील तसे वाचलेले पण हा टण्या काय पटापट भाग टाकत नाहिये आणि प्रत्येक वेळी मागचे भाग वाचावे लागतात.

Pages