शाळेत असल्यापासून साहित्य संमेलनाच एक आकर्षण होत. आणि ह्या वर्षी तर ते पुण्य नगरीत घडत होत, त्यामुळे जायचंच अस ठरवलं होत.
विशेष कोणी उत्सुक नसणार ह्याचा अंदाज होता. बरोबर आहे म्हणा, एवढ उन तळपत असताना कोण कशाला वीकेंड वाया(!) घालवेल.
पण सुदैवाने माझ्यापेक्षा जास्त उत्साही आणि अनुभवी(दुसर संमेलन अटेंड करणारा ) 'अजय' होता सोबतीला!
शनिवारी दुपारी ४ वाजता मंडपात पोचेपर्यंत उन्हामुळे आणि परिसंवादातील वादामुळे वातावरण बरेच तापले होते. मा. मुख्यमंत्री 'इंडीयन टायमिंग' चा शिरस्ता मोडून लवकरच आले होते, पण जरा जास्तच लवकर आले - एक दिवस आधी
आणि त्यांच्या उपस्थितीच्या प्रभावामुळे असेल की साहित्य संमेलनाच्या परंपरेनुसार असेल, सूत्रधार-वक्ते ह्यांच्यात चांगलच रणकंदन झालं
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' आणि 'माध्यम तंत्रज्ञान ' अशा २ विषयांवर एकत्रित परिसंवाद चालू होता. डॉ. जब्बार पटेल, अवधूत गुप्ते, राजीव खांडेकर, निळू दामले, न्या. चपळगांवकर असे नामवंत वक्ते आपापली मते मांडत होते. त्यामध्ये डॉ नी अतिशय चांगला आणि आपल्या सर्वांच्या मनातला विचार मांडला - संमेलनाध्यक्षांची 'निवडणूक' होऊ नये, सन्मानाने निवड व्हावी.
न्या. चपळगांवकरांनी अतिशय मुलभूत गोष्ट सांगितली - मराठी टिकवायची असेल तर व्यवहारात तिचा वापर प्रत्येकाने आवर्जून केला पाहिजे. साहित्य, कला ही सर्व माध्यम आहेत. भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे.
मा. मुख्यमंत्र्यांनी मात्र लोकप्रिय घोषणा करून अनेक चांगल्या मुद्द्यांना बगल दिली, असो.
त्यानंतर पावले वळली ती पुस्तक-प्रदर्शनाकडे. अतिशय सुरेख मांडणी होती आणि गर्दी तर नुसती ओसंडून वाहत होती. साहजिकच काय घेऊ आणि काय नको अस झालं होत. बरीचशी खरेदी केली. मध्येच एका ठिकाणी 'आजरा' भागातील एका उत्पादनांच्या स्टॉलवर कोकम चा आस्वाद घेतला.
अरे हो, तिकडे मकरंद अनासपुरे दिसला पुस्तके चाळताना! ह्या भानगडीत सव्वा आठ कधी वाजले कळलेच नाही, आणि मंगेश पाडगावकरांचा संवाद आम्ही मिस केला. सकाळी पण न आल्यामुळे मेघना पेठे/श्याम मनोहर यांची मुलाखत हुकलीच होती...
आता सुरु झाला होता सर्व रसिक(!) प्रेक्षकांच्या आवडीचा सांस्कृतिक कार्यक्रम. पाय ठेवायला जागा नव्हती. झी मराठी वर सादर होणार असल्यामुळे त्यांच्या साच्यातलाच कार्यक्रम वाटत होता. बरेच चांगले कलाकार होते. संत रचना, नाट्य संगीत, प्रहसन यानंतर गाडी वळली ती मराठमोळ्या लावणी कडे! मीही लावणीचा रसिक आहे, ढोलकीची थाप ऐकल्यावर बेभान होतो. पण अस वाटत होत की 'फाटला गं कोना माझ्या चोळीचा' वर तूफान शिट्ट्या आणि वन्स मोअर ची जागा ही नव्हे. असो...
रविवारी सकाळी लवकरच पोचायचं अस ठरवून देखील (सुदैवाने) ११ वाजता पोचलो. कारण 'निमंत्रितांच कवीसंमेलन' वेळ टळून गेली तरी चालूच होत(आणि ते आटोपण्याची काही चिन्हे न दिसल्याने पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करून भोजनानंतर पुन्हा भरवण्यात आलं). अरे देवा! मला त्या वेळी कळलं की 'कविता वाचन' ह्या विषयावर इतके विनोद का आहेत! अर्ध्या तासातच मी पुरता गारद झालो होतो.
काहींची कविता म्हणजे निबंधवाचन होत तर काहीजण 'सारेगमप' च्या आवेशातच सूर लावत होते.
नंतर लक्षात आलं, की ह्यापेक्षा तिकडे जाता जाता कानावर आलेल्या 'कवी-कट्टा' वरच्या नवोदितांच्या रचना बर्या होत्या
त्या नंतर असलेल्या राजकीय आखाड्या पेक्षा पुस्तक प्रदर्शनात (पुन्हा) जाणं पसंद केल आम्ही. तरी ह्या परिसंवादाच्या शेवटी न्या. धर्माधिकारींच मराठी विषयी खूपच चपखल बोलण ऐकता आलं - त्यांनी एक शेर उद्धृत केला - "एक खता हम उम्रभर करते रहे, धूल तो चेहेरे पें थी; लेकिन हम आईना साफ करते रहे!" मराठीच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करणार्या सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या नेत्यांसमोरच त्यांनी चांगले बोल सुनावले.
दुपारच जेवण 'बापट' मध्येच घेऊन साहित्य संमेलनाचा फील कायम ठेवला
परत आलो तेव्हा कवी-संमेलनाच्या मंडपाकडे जाण्याच धाडस काही केल नाही. पण त्याच वेळी 'NRI मराठी साहित्य' यावरच्या परिसंवादाला जाता जाता हजेरी लावली.
नंतर राजहंस च्या स्टॉलवर अच्युत गोडबोले यांची स्वाक्षरी घेण्याचा योग, ही आमची झालेली साहित्यीकाशी भेट! त्यामुळे संमेलन सार्थकी लागले B-)
संध्याकाळच्या सत्रात बिग-बी साठी होणार्या गर्दीमुळे आम्ही काढता पाय घेतला, त्यापेक्षा टीव्ही वर पाहणे पसंद केल!
ह्या संमेलनातल एकंदरीत नियोजन आवडल. मंडप/आसन व्यवस्था, ध्वनीव्यवस्था, शुद्ध पाणी, स्वच्छतागृह इ. सर्वच गोष्टी.
संयोजकांना धन्यवाद!
अशा रीतीने पूर्ण का नसेना पण थोडासा सहभाग नोंदवून; एक चांगला अनुभव गाठीशी आणि पुस्तकांच गाठोड पाठीशी बांधून आम्ही घरी परतलो!
बघू परत कधी योग येतो! आता वाट बघतोय, कोल्हापूर ला कधी होतंय संमेलन याची!
अमिताभ बच्चन यांना एक
अमिताभ बच्चन यांना एक निमंत्रण का दिले होते याचे कारण कळाले नाही. ते स्वतः साहित्यीक नाहीयेत का केवळ प्रसिध्धी साठी आमंत्रण होते? का चव्हाण येऊ नयेत म्हणून त्यांना बोलावले?
छान वृत्तांत.
छान वृत्तांत.
@रंगासेठ: पूर्णपणे सहमत! काल
@रंगासेठ: पूर्णपणे सहमत! काल डॉ. आनंद यादव सरांनी हेच म्हटल स्टार माझा वर. दभि कुलकर्णी यांच मत अस होत की, नवीन लोक संमेलनाकडे आकर्षित होण्यासाठी अशी तडजोड केली जाते.
@रैना: धन्यवाद.
पहिला दिवस- दभिंचे अध्यक्षीय
पहिला दिवस-
दभिंचे अध्यक्षीय भाषण- छापील भाषण बाजूला ठेवून संवाद साधल्यागत बोलले. (ते बरेच झाले म्हणायचे. नाहीतर जड शब्दांनी भंजाळले असते सारे.
* स्वातंत्र्य समता आणि बंधुता या त्रिसूत्रीत स्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे, नैसर्गिक. बाकीचे दोघे 'संबंधा'संबंधीचे. रिलेशन्शिपबद्दलचे. या स्वातंत्र्यातही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आलेच.
* मराठी साहित्याने कोष फोडला पाहिजे. स्वतःहून इतर भाषांविषयी आणि इतर भाषांत भाषांतर करण्यासंदर्भात उत्सुकता, जागरूकता दाखविली पाहिजे.
* या दृष्टीने विचार केला, तर- मराठी भाषा आणि साहित्य हिंदी माध्यमातून शिकवायला काय हरकत आहे. (मला माहिती आहे या विधानावर गदारोळ होईल.. वगैरे....)
* पुणेरी भाषा आणि बोलीवर संतसाहित्याचा-भाषेचा प्रचंड प्रभाव. पुण्याच्या जवळील खेड्यांमध्येही हा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
दुसर्या सत्रात 'संतसाहित्य आणि २१वे शतक' आणि 'मराठी कविता आणि ग्रामीण वास्तव' असे दोन परिसंवाद एकाच वेळेला होते. त्यातल्या दुसर्याला हजेरी लावली. त्यात एक-दोघे तर राजकीय पुढारी असल्याच्या थाटात आवाजात चढवून, बोटे-हात फिरवून बोलत होते. आणि नेहेमीप्रमाणे संयोजक त्यांना पुन्हा पुन्हा घड्याळ दाखवत होते. एका कांबळे नावाच्या सद्गृहस्थांनी तर 'कांबळे असल्याचं रिझर्वेशन म्हणून वाढीव टाईम द्या की' असा पीजेही केला.
एकूणच, थोडासा फाफटपसारा. थोडी नेतेगिरी. आणि थोडी नेहेमीची व्याकूळता.
कवीकट्टा मात्र अखंड वाहणार्या जलपरीसारखा आवेशात, जोशात, जोरात तिन्हीत्रिकाळ चालू होता. मायबोलीवरचे कवी दिसतात / ऐकू येतात का, म्हणून मध्येच डोकावलो, पण निराशा झाली. एखादे वेळी नावे वेगळी/अनोळखी असतील. लक्षात नाही आले.
(क्रमशः)
(पहिला दिवस) त्यानंतर
(पहिला दिवस)
त्यानंतर साडेपाचला कथाकथन. मिरासदारांच्या अध्यक्षतेखाली. वेळ साडेपाचची असूनही पाच वाजताच मंडप गच्च भरला. आधीच्या परिसंवादवाल्यांना ही गर्दी आपल्यासाठी जमली नसून नंतरच्या कथाकथनासाठी जमली आहे, हे लख्ख कळले. पण आम्हाला ऐकायला झालेली गर्दी नंतरच्या कथाकथनालाही बसून राहिली, असंच आम्ही म्हणतो, असं त्यांनी जाहीरपणे रेटून सांगितले.
खुर्च्या संपल्या, लोक खाली बसले, इतकेच नाही तर नंतर मिरासदारांनी सांगितले म्हणून कॉलेजची पोरे चक्क व्यासपीठावर दोन्ही कोपर्यांत दाटीवाटीने बसली.
सहा कथाकार + सातवे मिरासदार. पहिल्या सहामधल्या प्रतिमा इंगोलेंची 'पॉलिश' ही वर्हाडी कथा आणि बाबा परीटांची 'शिकार' ही ग्रामीण कथा; या कथा फारच भन्नाट झाल्या. बाबा परीटाला तर 'तू शंकर पाटलांची कथा पुढे नेशील', असा आशिर्वादही मिळाला. उरलेले एकदोघे 'बरे' असले, तरी काहींना तर का बोलावले होते, असा प्रश्न पडला.
त्यानंतर दमांनी 'भानाचे भूत' ही व्यंकटेश माडगूळकर आणि स्वतः दमा यांनी मिळून लिहिलेली कथा सांगितली. छोटंसं भाषण आणि कथा मिळून एक तासभर त्यांनी अख्खा मंडप ताब्यात घेतला, आणि अक्षरशः पोट धरून हसवलं. इतके वय होऊनही कथाकथनातला आवेश, देहबोली, आवाज आणि चढ-उतार म्हणजे खरेच 'केवळ' आहे. कवीकट्ट्यावरून आवेशात वाचल्या जाणार्या कविता चक्क कथाकथनाच्या मंडपात ऐकू येत होत्या. (त्या मध्येच येणार्या आरोळ्यासदृष आवाजांमुळे विद्रोही संमेलनवाले येऊन बाहेर घोषणा देताहेत की काय, असं मला वाटलं होतं. :फिदी:) तरूण कथाकार त्या आवाजाला बुजले, अडखळले, थांबले. दमांच्या आवाजासमोर मात्र तो आवाजही फिका पडला.
कथेच्या सुरुवातीला, मिरासदार म्हणाले, ''आदिमानव बोलायला शिकला, तेव्हा नुसत्या भय, भूक, क्रोध, काम याच भावना व्यक्त करायला शिकला असे म्हणतात, ते चूकीचे. मला भिती वाटते, मला भूक लागली, मी तुला मारीन हां, माझे तुझ्यावर प्रेम आहे- या चार वाक्यांसोबतच 'मला एक गोष्ट सांगा ना, प्लीज' हे पण (पाचवे) वाक्य तो बोलला असेल हे नक्कीच!!''
(क्रमशः)
(दुसरा दिवस) श्याम मनोहर
(दुसरा दिवस)
श्याम मनोहर यांची प्रकट मुलाखत
* प्रश्न मांडायला ताकद लागते. पण उत्तरे मिळवण्याचा सोस नको. उत्तरे नाही मिळाली, तर दु:ख होईल एखादे वेळेस. पण हे दु:ख सुंदर असेल. असं गोड्-सुंदर दु:ख आयुष्यात हवंच!!
* लिहिणे हवेच. काहीही लिहा, पण लिहा. अंतर्मनातल्या विचारांना त्यामुळे स्पष्टता येईल. पण हे लिहिणे स्वतःशी प्रामाणिक मात्र हवे. त्यासाठी एकांतातच हे लिहिणे आवश्यक. स्वतःला तपासण्याच्या प्रक्रियेतून लिखाण, आणि लिखाणातून पुन्हा स्वतःकडे बघणे अशी ही दुहेरी प्रक्रिया. कोणताही लेखक यातूनच प्रगल्भ होत जातो.
* एखादा असा खेळ आहे का, की ज्यात दोन्ही संघ जिंकतात? खूप विचार केल्यावर लक्षात आलं, 'प्रणय' हा खेळ आहेच की असा! त्यातूनच जन्मलं येळकोट हे नाटक.
* षड्रिपूंवर अध्यात्मामुळे नक्की विजय मिळवता येतो का? बाकी सर्व ठीक आहे, पण राग, मत्सर, द्वेष, स्पर्धा- यांचं काय करायचं? या तर नैसर्गिक भावना आहेत, आणि या दाबणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं, निसर्गालाच नाकारणं. हे चूकीचं...
मेघना पेठे यांची प्रकट मुलाखत
एकाने लिहिले, 'तुमच्या शिव्या वाचल्या. क्या बात है. पण त्यात ह्या अशा अशा शिव्या घालायच्या राहून गेल्यात. तर त्या पण घाला!' आणि त्या खाली शिव्यांची लिस्ट!!
* श्याम मनोहर म्हटले, तसं- लिखाणातला प्रामाणिकपणा आवश्यक आहे. कधी त्याच्यावर टीका होईल, तर कधी कौतूक होईल. पण हे सारे नंतरचे. बोनस पॉईंट्स. प्रामाणिकपणानं जेव्हा एखादं लिखाण उतरतं, तेव्हाच त्याचा हेतू संपलेला असतो. ते इतर कुणाहीपेक्षा तुमच्या स्वतःसाठीच जास्त आहे, हे एकदा लक्षात ठेवलं, की टीकेचा त्रास होत नाही. माझ्याबद्दल बोलायचे झाले, तर टीकेचे भरपूर प्रसंग आले. जिथे कौतूक वाट्याला आलं, तिथेही लक्षात आलं, की हे चूकीच्या कारणासाठी केलं जातंय. पण तोपर्यंत माझ्या लिखणाचे हेतू पूर्ण झालेले होते, माझ्यासाठी. त्यामुळे फारसे लक्ष द्यायची गरज वाटली नाही.
* लग्नसंस्थेतल्या व्यवहार्यतेची तपासणी करण्याची गरज आणि वेळ आली आहे. संस्कृतीची निर्मिती आणि विकास होण्याच्या काळात पुरुषांना ही सारीच एकंदर व्यवस्था ताब्यात ठेवण्याची गरज भासू लागली, आणि त्यातून सुरु झाले स्त्रीजातीच्या अव्याहत अवहेलना, मुस्कटदाबीचे युगानुयुगे चालणारे सत्र. याचा परिपाक म्हणून पुरुषजातीबद्दल एकूणच चीड, तुच्छता माझ्या लिखाणात येत्र असेल, तर त्याला माझा नाईलाज आहे..
* तेच तेच विषय लिहिता- हा आरोप मूर्खपणाचा आहे. कलाकार, लेखक म्हणजे काय मॉल आहे? की तिथे सारे एकाच ठिकाणी मिळेल? काहीतरी शोधायच्या ध्यासाने लेखक लिहित असतो. तो शोध संपेपर्यंत त्याच्या कलाकृतीत वैविध्य न येणं हे नैसर्गिकच आहे.
* नातिचरामि मधल्या 'मीरा' किंवा 'ती' या दोन्ही नायिका म्हणजे मी स्वतः नाही, हे मी प्रस्तावनेतच स्पष्ट केले आहे. पण मी पूर्ण 'काल्पनिक' लिहू शकतो असा दावा कुणी करत असेल, तर मात्र त्याची मला दया येते. वास्तव ही उलगडत जाणारी गोष्ट आहे. एकाच घटनेचे वेगवेगळ्या व्यक्तींचे पर्सेपशन वेगवेगळे असू शकते. म्हणून त्या घटनेचा 'परिणाम'च अख्खा बदलतो. कुणीतरी म्हटले, की नातिचरामीमधल्या त्या मित्राकडे जीप आहे, तशीच मेघनाच्या एका मित्राकडे पण आहे. म्हणजे ते खरे. म्हणजे त्या जीपमध्ये जे घडले, तेही १००% खरेच असेल. आणि ती देखील मेघनाच असेल- असं लाडकं मत बनवलं गेलं. बरं समजू या, हे सारे खरेच आहे, घडलेलेही आहे. पण त्या घटनेचे परिणाम? कुणासाठी वेगळे तर कुणासाठी वेगळे. एकाच 'वास्तवा'चे वेगवेगळे परिणाम. जगण्याचा आवाकाच ठरवून टाकणारे, बदलणारे. म्हणूनच वास्तव ही उलगडत जाणारी प्रक्रिया आहे...
* अनेकांची पत्रे मला येतात. एकाने लिहिले, 'किती शिवराळ लिहिता तुम्ही? शिव्यांऐवजी फुल्या का नाही टाकत? मी म्हणले, 'समजा, मला पोटतिडकीने हरामखोर ही शिवी द्यायची आहे. आणि तीतून अपेक्षित परिणाम पण साधायचा आहे. मी पाच फुल्या दिल्या, आणि वाचणारा ती वेगळीच कोणती तरी शिवी समजून बसला तर? मला म्हणायचे आहे ते नीट कन्व्हे झालेच नाही तर?'
(क्रमशः)
साजिरा, जबरदस्त. मी फक्त
साजिरा, जबरदस्त.
मी फक्त पुस्तक प्रदर्शन , मंगेश पाडगावकरांची मुलाखात व खाद्यपदार्थांचे स्टॉल यांनाच भेट दिली.
साजिरा, कसल डिट्टेलवारी लिहिल
साजिरा, कसल डिट्टेलवारी लिहिल आहे! खूपच सही.
मला कळतय की मी काय काय मिस केलय.. पण दुधाची तहान ताकावर तरी - अतिशय छान वृत्तांत!
साजि-या मस्त रे एकदम. अत्यंत
साजि-या मस्त रे एकदम. अत्यंत आभारी आहे पुन्हा एकदा.
(No subject)
मला बीग बी च्य हिन्दी कविता
मला बीग बी च्य हिन्दी कविता वाचन, ज्या त्यांच्या लिहिलेल्या देखिल नहित, मराठी साहित्य सम्मेलनात असणे खटकले. त्यांच्या कडुन मराठी लेखकाच्या चांगल्या कविता वदवून घेतल्या असत्या तर बरे वाटले असते.
मेघना पेठे यांची लेखणी एकदम
मेघना पेठे यांची लेखणी एकदम जबराट !
एका कांबळे नावाच्या सद्गृहस्थांनी तर 'कांबळे असल्याचं रिझर्वेशन म्हणून वाढीव टाईम द्या की' असा पीजेही केला.
सही !!!!
साजिर्या मस्त वृत्तांत रे
साजिर्या मस्त वृत्तांत रे !!!!!!!
लई भारी धन्यवाद तुमचे अनुभ्व लिहिल्याबद्दल...
व्वा! फारच छान वृत्तांत
व्वा! फारच छान वृत्तांत दिसतायत... वेळ काढून वाचले पाहिजे... धन्यवाद रे साजिर्या, लय भारी..
साज्या मस्त वृत्तांत रे..
साज्या मस्त वृत्तांत रे.. तुझ्यात बराच पेशन्स आहे.. मंडप क्र.१ च्या एका परिसंवादातच संपलो
वा! साजिर्या मजा आली वाचून.
वा! साजिर्या मजा आली वाचून. जायचा योग नाही आला. असो.