आक्षेप - शेवट सुचवा

Submitted by एस अजित on 25 March, 2010 - 11:10

'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.

तो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.

बी.ए. च्या दुसर्‍या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्‍याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.

पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.

मी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.

तसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.

आईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय ? आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.

त्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे ? आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून ? आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.

दोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.

संपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय? थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो? शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.

माझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्‍या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्‍या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.

आपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या सोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.

मग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का? आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.

मी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात? ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता? मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्‍या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.

माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.

मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'

या कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.

१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.

२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.

३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.

मित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.

गुलमोहर: 

ईतके लिमिटेड तिनच चॉईस का आहेत शेवटासाठी?
हा घ्या माझा शेवट!

"आई हे माझे तुला लिहीलेले पहिलेच पत्र असेल. तुझी कथा तू माझ्यासमोर मांडलीस तेव्हा मला फार मोठा धक्का बसला.
पण मग बराच विचार केल्यावर मला असे वाटले की तु माझ्या पासून आणखी काहीतरी लपवून ठेवते आहेस. तेव्हा मी तुझ्या "त्याला" भेटले. आणि मला कुठेतरी जाणवले की या व्यक्तिला भेटल्यावर मलाही एक छानशी अनुभुती होते आहे. क्षणात माझ्या लक्षात आले की मी तुझी आणि बाबांची मुलगी नसून तुझी आणि याची मुलगी आहे. (यावर "ये झूट है" ई. म्हणू नकोस. मी डीएनए टेस्ट पण करून घेतली आहे!)
तर माझा आता कशावरच आक्षेप नाही. मी तुझ्या पूर्णपणे पाठिशी आहे. आणि आता आपण दोघी मिळून पळून जाउयात. काय म्हणतेस? तर कधी करायचे हे अग्निदिव्य?
कळवशील."

हा अजून एक पर्यायी शेवट :

'प्रिय xx,

तुझे माझ्याकडे येण्याबाबतचे पत्र वाचून मी थक्क झालो आहे. कधीच ओठांवर न आलेली काही गुपिते उघड करावी लागतील असे दिसते आहे.

कॉलेजमधे आपली चांगली मैत्री होती हे खरे आहे, परंतु माझ्या मनात प्रेम किंवा तत्सम भावना तुझ्याबद्दल कधीही आली नाही. माझे प्रेम होते ते तुझ्या आत्ताच्या नवर्‍यावर. (तुला 'निराळीच' अनुभूती येण्याचे हे एक कारण असू शकेल.) परंतु ह्याबद्दल उघड बोलण्याचे धैर्य माझ्यात तेव्हा नव्हते. आणि प्रोफेसरांना कल्पनाही नव्हती.

पण आज मी धीर करतो आहे. आता तूच मन मोठे कर आणि तुमचा संसार झाला असेल तर प्रोफेसरांना माझ्याकडे पाठवून दे.

तुझा मित्र,
yyy'

अजून एक- बाबा मुलीला लिहीत आहेत.

प्रिय मुली,

तू आईच्या निर्णयाला आक्षेप घेतलास हे मला फारसे रुचले नाही. तुला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. तिला धड स्वयंपाक येत नव्हता हे तुला माहीतच आहे. शिक्षणाने आधुनिक खुळे तिच्या डोक्यात भरली होती. काही वर्षांपूर्वी मला एक स्त्री भेटली जिच्याबरोबर मला माझे उरलेले आयुष्य घालवावेसे वाटते. तेव्हा आई निघून गेली तर बरेच आहे. तरी तू तिला होकार आणि शुभेच्छा दे. आणि मलापण शुभेच्छा दे!

बाबा

शेवट काही सुचवत नाही पण तुमच्या गोष्टीतले 'आपले बाबा' त्या मुलीला स्थळ म्हणून घरी जातातच का? हे मला मुळीच कळलेलं नाही.

स्वाती Rofl

हा घ्या माझा शेवट!

"आई हे माझे तुला लिहीलेले पहिलेच पत्र असेल. तुझी कथा तू माझ्यासमोर मांडलीस तेव्हा मला फार मोठा धक्का बसला.
पण मला तुझ्यापसुन काहीच लपवुन ठेवायचे नाही. मी तुझ्या "त्याला" आधीच भेटले आहे. आणि मला कुठेतरी जाणवले की या व्यक्तिला भेटल्यावर मलाही एक छानशी अनुभुती होते आहे. आणि मी त्याच्या प्रेमात पडत गेले. त्याच ही माझ्यावर खुप प्रेम आहे. वयात अंतर असुनही आम्ही आता लग्न करण्याचे ठरवले आहे. तर आता तु ह्या वर आक्षेप घेवु नये. माझ्या पूर्णपणे पाठिशी रहा. आणि आता तु त्याला जावई म्हणुन स्विकार. बाबानाही कळव. "

अजून एक :

'प्रिय xx

तुम्ही आमच्या ह्यांना पाठवलेले पत्र यांनी समजूतदारपणे मला स्वयंपाकघराच्या दाराच्या फटीतून वाचायला दिले. (हो, हे घरी असताना बाहेर येत नाही मी!). मला ब्रह्मांडच आठवले हो!! इतके उपासतापास, हरताळका, वटसावित्र्या पुजून हे काय आलं माझ्या नशिबी?!! पण माझा भारतीय संस्कृतीवरचा विश्वास अभंग आहे. असले काही कराल तर माझी संतोषीमाता तुम्हाला ग्रहणातले अन्न खायची बुद्धी देईल. या मंगळसूत्राची शपथ आहे तुम्हाला. अजून शहाण्या व्हा.

- त्यांची ही.'

अग आई, कसला जबरी योगायोग गं!! तुझा "तो" कोण हे शोधल्यावर एक अजुनच नविन शोध लागला.

तुला माझ्या मोडकळीस आलेल्या संसाराची कल्पना तर आहेच. ह्या माझ्या दु:खावर फुंकर घालणारा माझ्या ऑफिस मधला माझा सखा, माझा सोलमेट नितीन हा तुझ्या त्याचाच मुलगा आहे!!

चल, आपण दोघी पण एकाच घरी जाऊ!! म्हणजे तू माझी आई पण अन स्टेप सासू पण होशील!!!

तुझीच,
xxx

हा माझा:
"तुझ्यासाठी आणि "तुझ्या" बाबासाठी मी सगळे आयुष्य झिजवले. तुमचे इतके खाण्या-पिण्याचे नखरे, मागण्या. सारखं मेलं रांधा-वाढा-उष्टी काढा. मला साधी केस विंचरायची शुद्ध नसायची ह्या कामाच्या रहाटगाड्यात. लग्नाआधी मला नीटनेटके रहायची, दागिने घालायची, नोकरी करायची इतकी हौस होती. तुझ्या बाबांनी साधी बालवाडी शिक्षिकेची नोकरी करु दिली नाही. मांजर ओकल्यासारखे तर रंग असायचे त्यांनी आणलेल्या साड्यांचे. त्याने मात्र बीए झाल्यावर हॉटेल मॅनेजमेंटला अ‍ॅडमिशन घेतली होती. आयुष्यात इतकी प्रगती केली. आता तर मी-टीव्हीवर खा खा खा कार्यक्रमात तो मुख्य होस्ट आहे. त्याला स्वयंपाक करायला खूप आवडते. शिवाय त्या कार्यक्रमात त्याची असिस्टंट म्हणून मला रोल मिळणार आहे. छान छान आवरायचे आणि त्याने रांधलेल्या पदार्थांची चव घ्यायची. ह्या कामाचे पैसे पण मला वेगळे मिळतील. इतकी खुशीत होते मी तर तू हा नवाच हट्ट धरुन बसली आहेस. तुला नाहीतरी लग्न करुन सासरीच जायचे आहे, माहेरी आलीस तरी चार दिवस येशील. मग इथे काय नी तिथे काय. तू हो म्हणशील तर मी शांत मनाने जाईन. नाहीतर मला गेल्यावर हुरहुर लागून राहिल. घास उतरायचे नाहीत घशाखाली. मग हो म्हणते आहेस ना राणी ?"

अशक्य हसलेय मी सजेस्टेड शेवट वाचून!
नमस्कार सगळ्यांना!

आणि अजित भौ काही प्रश्नः
१. तो मुलगा (आता बाप्या) काय वाट पहात बसलाय का इतकी वर्ष ह्या बाईसाठी?
२. प्रा. इतके कशाला त्यागी दाखवलेत? (एकदम 'हम दिल दे चुके सनम' का?)
३. ह्या बाईंना इतक्या वर्षात काहीच नाही वाटायला लागलं इतक्या समजूतदार नवर्‍यासाठी?
(पुन्हा पहा 'ह. दि. दे. चु. स.')
४. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली >> आँSSSS

इतक्या वर्षानंतर फार फार तर सॉफ्ट कॉर्नर राहिल पूर्वी केलेल्या व्यक्तीबद्दल, त्या पेक्षा जास्त शक्यच नाही! असं मला वाटतं.

बाबांच्या 'ती' चे पत्र- ही 'ती' म्हणजे आईच्या 'त्या'ची बायकोच आहे. (योगायोगाने)

प्रिय xx
आपण आता एकत्र येऊ ही आनंदाची गोष्ट आहे. माझा नवराही मला सोडून त्याच्या कॉलेजमधल्या प्रेमाकडे परत जात आहे. सगळ्या गोष्टी कश्या जुळून आल्या नै? सगळेच आनंदात उरलेले आयुष्य काढतील हे सुंदर आहे..

तुमची,
xxx

आई
प्रोफेसर परवा दुसर्‍या प्रोफेसरांबरोबर आमच्या चळवळीच्या प्रोग्रॅम मध्ये भेटलेले. त्यावरुन मी तुला सांगते "तु आता जावु नयेस." काही उपयोग होणार नाही.
मी कॅलिफोर्निया ला निघाले आहे. तुला सांगायच राहुन गेले , आमच्या चळवळीत मला साथिदार मिळाला(ली). आम्ही लग्न करणार आहोत. कॅलिफोर्नियाला लिगल सगळ होवु शकेल त्यामुळ तिकडेच लग्न करायच ठरवल आहे.
तुझी आणि बाबांची मुलगी(?)

<<प्रिय xx
आपण आता एकत्र येऊ ही आनंदाची गोष्ट आहे. माझा नवराही मला सोडून त्याच्या कॉलेजमधल्या प्रेमाकडे परत जात आहे. सगळ्या गोष्टी कश्या जुळून आल्या नै? सगळेच आनंदात उरलेले आयुष्य काढतील हे सुंदर आहे..
>>
हे म्हण्जे कभी कभी स्टाईल झालेय !! Happy

करण जोहर इस्टाइलः
लिव्ह इन रिलेशन ला आत्ताच मान्यता मिळ्याल्यामुळे आता मला धीर आला आहे. आता मी "त्याच्या" बरोबर लिव्ह इन मधे राहू शकते. घटस्फोटाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल.

एकता कपूर इस्टाइलः
मला आता तुझ्या बाबांवर संशय येतोय. ते मला सारखे जा - जा का करतात? मी नाही जात जा !

आईनी हे पत्र मुलीच्या टेबलवर ठेवल त्यावर एक पेपरवेट ठेवलं. आता मुलीच्या उत्तराची वेट करावी असा विचार करुन ती पतिव्रता तिच्या रुम मधुन गेली.
मुलगी अजुन घरी आली नव्हती.
हाय रे... जोरात वार सुटल आणि पेपरवेट त्या पत्रावरुन घरंगळत खाली पडला... हवा के झोंके से ते पत्र उडुन पलंगा खाली गेलं....
सकाळी आई सारखी मुली कडे आशेने बघत होती.... मुलगी गोंधळात... पुढे पुढे दोघींमधे जे काही बोलण व्हायचं ते अगदी गोंधळलेलच... कोण काय बोलतय एकमेकींना काही झेपायच नाही. पण त्या दोघीही समंजस... आई मुख्य विषय सोडून मुलीला क्लू देत बसायची... पण मुलीला काही झेपत नव्हत... तिला वाटत होत की आई "ते" लफड फायनली विसरली.... आणि तिला सावरायला थोडा वेळ हवाय.

आणि एक दिवस मुलगी घरी आली तर घरासमोर पांढरे स्वच्छ कपडे घातलेल्यांची गर्दी. मुलगी वाट काढत घरात आली... तर मुलीच्याच खोलीत आई.... हम्म्म... आई गेली....
मुलगी नमस्कार करायला खाली वाकली आणि तिची नजर पलंगा खालील पत्रावर गेली. तिनी पत्र काढून वाचलं... आणि एक जोरात किंकाळी.... आई......

मजा आली .. काय तरी डॉक्स आहेत तुम्हा लोकांची भारीच.. सगळ्यांना पटकथा लिहायला बसवायला पाहिजे हिंदी पिक्चर च्या हा .. मराठीत हे असला काही चालणारन्हाय..

असा शेवट केला तर :
मुलगी विरोध करत असल्याने आणि त्याची बायको मुले सुद्धा यांच्या संबंधांना विरोधच करतील हे जाणुन आई बाबांबरोबर राहिली. पण आईचे आणि त्याचे एकमेकांवर अतिशय 'प्रेम' असल्याने बाबांच्या समजुतदारपणाचा फायदा घेउन आणि त्याच्या बायकोला अंधारात ठेउन त्यानी एकमेकांबरोबर पुर्वीप्रमाणेच लपुनछ्पुन प्रेमसंबंध ठेवण्यास सुरवात केली.

सुचला सुचला.. शेवट सुचला..
खरतर प्रियकरानं केव्हाच प्रोफेसरचा खून केलाय आणि स्वतः प्रो सारखं दिसण्याची प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.. (हिंदी पिक्चर सारखं)
आता तो फक्त प्रेयसीचं आपल्यावर खरच प्रेम होतं का हे आजमावण्याच्या प्रयत्नात..
पण ती आहे की आई वडील, नवरा, मुलगी असली कारणं काढून त्याच्याकडे जाण्याकरता प्रोफेसराकडे जायलाच तयार नाही.. ह्याचाच अर्थ त्याला वाटतं की तिचं खरं प्रेम प्रो. वरच होतं.. आपल्यावर नाही.. आपल्याबरोबर नुसताच टीपी..
शेवटी फ्रस्ट्रेशन मध्ये तो तिला फडाफडा बोलतो (मराठी नाटकातल्या सारखं)
तिला कळतं की ह्यानच आपल्या नवर्‍याला मारलय.. तिच्यातली सावित्री जागी होते.. ती त्याला गोळ्या घालते.. आणि स्वतः सरेंडर करते.. आता तुरुंगातून तिला हे सगळं आठवतय
(म्हणजे मुऴ् कथा फ्लॅशबॅक होती)

किंवा शेवट क्रमांक दोन मधे, तिचं प्रेम नाही कळल्यावर, प्रो सारखा दिसणारा प्रियकर फ्रस्टेशन मधे तिला मारतो.. आणि स्वतःही गोळ्या झाडून घेतो. ढिशकॅव...
मुलगी.. आईSSSS बाबाSSSS असं ओरडते... आणि पडदा पडतो..

Pages