मिश्र धान्य क्लब सँडविच

Submitted by तृप्ती आवटी on 15 September, 2008 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पीठ, मसूराचे पीठ, हरबरा डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ, बारीक रवा प्रत्येकी दोन मोठे चमचे
१ मोठा चमचा तेल
३-४ पालकाची पाने बारीक चिरुन
१ मोठा चमचा कोथिंबीर बारीक चिरुन
गाजराचा बोटभर तुकडा बारीक किसुन
मसाल्याच्या डब्यात असतो तो अर्धा चमचा हळद आणि तिखट
चिमुटभर ओवा
चवीनुसार मीठ
१ कोबीचे पान, २ टोमॅटोच्या चकत्या, २ व्हीट अथवा व्हाईट ब्रेड, १ चीझ स्लाइस.

३-४ थेंब तेल नंतर धिरडी घालायला.

क्रमवार पाककृती: 

सर्व पीठे, ओवा, पालक, कोथिंबीर, गाजर, मीठ एकत्र करुन १ चमचा तेल व पाणी घालुन भज्याच्या पीठापेक्षा थोडे पातळ भिजवावे.

३-४ थेंब तेल नॉनस्टिक तव्यावर घालुन तवा गरम करावा. १ मोठा डाव पीठ घालुन फुलक्याच्या आकाराची धिरडी करावीत. तेल फक्त पहिले धिरडे करताना घालावे. नंतर प्रत्येक धिरड्याला फक्त पाणी शिंपडावे.

धिरडे जरा कोमट झाल्यावर चार तुकडे करावेत. ब्रेड आवडीप्रमाणे भाजुन घ्यावा. इलेक्ट्रिक टोस्टर असेल तर तेल्/तुप्/बटर न घालता छान टोस्ट होतो. ब्रेडवर कोबीचे पान, टोमॅटोची चकती लावावी. मग ब्रेडच्या प्रत्येक कडेला एक असे धिरड्याचे चतकोर तुकडे लावावेत म्हणजे खाताना प्रत्येक घासाला सारखीच चव येते. वरुन चीझ स्लाइस आणि दुसरा ब्रेड लावले की सँडवीच तयार.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१० मिनिटात चार जणांचा पौष्टिक नाष्टा तयार होतो. पीठ आधी भिजवुन ठेवायची गरज नाही. भिजवल्याबरोबर धिरडी घातली तरी छान जाळीदार होतात.

ओव्याची छान चव येते आणि दोन्-दोन डाळीची पीठे असली तरी पोटास त्रास नाही (लहान मुलांना). कोबीऐवजी लेट्युस घेतला तरी चालतो. पण कोबीच्या a substance in cabbage inhibits the conversion of sugar and other carbohydrates into fat ह्या गुणधर्मामुळे मी कोबीच घेते.

कुठल्याही फळाच्या एक पेलाभर रसाबरोबर हे खाल्ल्यास चांगलाच पौष्टिक नाष्टा होतो.

sandwich.jpg

माहितीचा स्रोत: 
धिरडी- आई. सँडविचची कल्पना- मी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्म्म्म्म.. तों. पा. सु! सही दिस्तय सँडवीच. ए यात कांदा पण झकास लागतो बरं. कच्चा कांदा कापून टोमॅटोबरोबर सँडवीचमध्ये घालावा.

हो कच्चा कांदा छानच लागतो. पण मला सकाळी-सकाळी कच्चा कांदा खायला आवडत नाही Happy

मस्त दिस्ताहेत धि. सँ!!! नक्की करून बघते.

कधीमधी तुझ्या कॉलोकेशिया लिफ रोलचं पण सँडविच करंत जा! Happy मस्त लागतं!

..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

छान आहेत धिरडी... फोटो एकदम tempting आलाय.. मस्तच

मी ही recipe नवती बघितली. orkut वरच photo बघितला. मस्तच दिसतीए.... मी try करेल आणि तुला अभिनंदन .

मी मिस केली होती हे रेस्पी. आता नक्की करून पहाणार - डब्यात देण्याजोगा पदार्थ दिसतोय .
मसुराचं पीठ इंग्रोमधे मिळतं का ?

नाविन्यपूर्ण रेसिपी आहे..
मसूर सोडून बाकीची पिठं अवेलेबल आहेत.. मस्त टेंप्टिंग आलाय फोटो.. टेंप्टेशन होतंय लगेच करून बघायचं.. Happy

मसुराचं पीठ नव्हतं म्हणून थोडं बाजरीचं पीठ घातलं मी अन पालक नव्हता म्हणून चार्डाची पानं बारीक चिरुन घातली. मस्त हिरवागार रंग आला होता. सँडविच करायच्या अगोदरच धिरडी गट्टम झाली Wink