माझी हॉस्पीटल भरती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला.

तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला. ह्या अनपेक्षीत हल्ल्याने घाबरून मी डोळे गच्च मिटून घेतले. त्यामुळे 'पेशंट सिरीयस आहे' अशी समस्त भगिनींची (नर्सीणींची हो) , मावश्यांची (मावश्या म्हणजे हास्पीटलातली एक मावशी त्याचे अनेकवचन मावश्या. उगाच तमाशाची वेगैरे आठवण काढू नका) आणि वॉर्ड बॉयांची समजूत झाली असणार. ह्या हॉस्पीटलच एक बर असत. तिथे आधीपासून आया, मावश्या, सिस्टर असे आपले नातेवाईक हजर असतात. वरच्या मजल्यावर आय सी यु (मराठी अनूवाद : मी तुला बघतो) नामक खोली मध्ये मला भरती करण्यात आल. सौ ला रीसेप्शन ला जाऊन सगळ्या फॉर्म्यालीटीज पूर्ण करण्याची सुचना करण्यात आली. परत एकदा माझी गचांडी धरून मला कॉटवर आदळण्यात आल. कॉटशेजारील रॉडवर एक प्लास्टीकची बाटली (ती सुद्धा उलटी) टांगण्यात आली आणि त्याच एक टोक माझ्या मनगटात खुपसण्यात आल.

" कसली बाटली हो? "
" ग्लुकोज"
" अहे पण ती अशी उलटी का टांगलीये. सरळ टांगा ना. उगाच पडली बीडली तर खात्रड होईल ना"
" अशीच टांगायची असते" (सिस्टरच्या नजरेत " हे कुण्या गावच पाखरू" असा काहीसा भाव दिसला)"
" हे ग्लुकोज कश्या करता असत ?"
" शक्ती येण्या करता"
" मग त्यापेक्षा मी सरळ ग्लुकोज बीस्कीट खाउ का हो? माझ्या कडे २ पुडे नेहेमी असतात. ५ रुपये वाले"
" तुम्हाला झोपेच इंजेकशन देऊ का हो ? "
(हा प्रतिप्रश्न कदाचित माझ्या प्रश्न टाळण्यासाठी असावा.)
मी लगेच त वरून ताक भात ओळखून पांघरूण डोक्या वरून ओढून झोपेच सोंग घेतल.

थोड्यावेळाने जवळपास कुणी नाही ह्याची खातरजमा करून हळूच पांघरुण बाजूला केल. ती सलाईनची सुई खूपसून ठेवल्यामूळे एक तर झोप येत नव्हती आणि दूसर म्हणजे पोटात भुकेचा गोळा उठला होता. काही वेळाने सौ बाजूला येऊन उभी राहीली.
" सगळे सोपस्कार पूर्ण केलेस का?"
" हो. फॉर्म भरून दिला आणि दहा हजार रुपये डीपॉझीट म्हणून दिले"
" किती ??? "
" दहा हजार डीपॉसीट. दिवसाच भाड ४ हजार रुपये"

पेशंटला हास्पीटल मध्ये 'भरती करण' का म्हणतात ते मला आत्ता कळल. पेशंटला हास्पीटलात भरती केल की त्याच्या खिशाला ओहोटी लागते. आणि हा भरती ओहोटीचा खेळ सदैव चालू असतो.

" बर आता तुम्ही झोपा. मी बाहेर थांबलेय. काही लागल तर सांगा "
" लागल तर म्हणजे? लागतच आहे की. ही इतकी मोठी सुई मनगटात खुपसून ठेवलीये. ग्लुकोज म्हणे"
पण माझी फालतू कोटी ऐकायला सौ थांबली नाही. इथे भुकेने पोटात आग पडलेली.

"मला जेवायला मिळेल का हो? " मी मावशीला विचारल
" इथे आय सी यु मध्ये जेवण नाय. पेशंटला फक्त लीक्वीड डायट मिळेल"
"मग जरासा चहा मिळेल का हो? कधी पासून तल्लफ आलीये "
"बर आणते थोड्यावेळाने"
मला गदगदून आल. म्हणून मी पडल्या पडल्याच थोडस गदगदून घेतल. मराठीत "माय मरो पण मावशी जगो" अशी म्हण का आली असावी त्याची मला प्रचिती आली. मावशीने मला 'थोड्यावेळाने" म्हणजे साधारण तासा-भराने 'लपून छपून' चहा आणून दिला. कुणी मावशीला मला लपून छपून चहा आणून देताना पाहील असत तर 'मावशी पेशंटला ताडी-माडी विक्री केंद्रातून काहीतरी जिन्नस किंवा नीरा विक्री केंरातली उरलेली आदल्या दिवशीची नीरा तर आणून देत नाही ना?' अशी शंका त्याला/तीला आली असती. असो. चहा अगदी छान म्हणजेच 'पाणीदार' होता. पण त्या परीस्थीतीत तो तसा 'पाणीदार' चहाही खुप छान लागला.

मला थोडीशी डुलकी लागली असेल नसेल तोच मला कुणीतरी उठवल. बघतो तर माझ्या भोवती दोन डॉक्ट्रर (त्यांना आर एम ओ म्हणतात अस नंतर कुणीस सांगीतल.), दोन सीस्टर्स . मी जागा झालोय बघून एकीने माझ्या खाकेत थर्मामीटर खुपसल,दुसरीने दंडाला कसल तरी कापड चोपडल आणि फुस्स फुस्स करून हवा भरली. एका आर एम ओ ने गळ्यातला स्टेथस्कोप माझ्या छातीवर लावल्या सारखा केला आणि मला जोराने श्वास घेण्याची आज्ञ्या केली. दुसर्‍याने माझी नाडी (हाताची) धरली. कदाचित 'मल्टी टास्कींग मल्टी टास्कींग' म्हणतात ते हेच असावे. ते सर्व आपापसात काहीतरी पुटपुटत होते. मला त्यात 'ब्लड रीपोर्ट' 'ई सी जी' अस काहीस ऐकू आल.मी 'बी पी' असाही काहीतरी शब्द ऐकला आणि थोडासा कावरा बावरा झालो.
"मला नक्की काय झालय डॉक्टर"
"आमची तपासणी चालू आहे. कळेलच लवकर काय ते"
"मला डीस्चार्ज कधी मिळणार मग?"
"लवकरच. डोंट वरी. आल इज वेल"
(आयला हे डॉक्टर लोकही चित्रपट बघतात तर)
मला लगेच उडी मारुन ' जहापना तुसी ग्रेट हो. तोहफा कुबुल करो' अस म्हणावस वाटल. पण ते हाताला सलाईन लाउन ठेवलेल ना. त्यामुळे नाईलाज झाला.
एका सीस्टर ने मला फटकन टोचल आणि चांगल वाडगाभर रक्त काढल. दुसरीने छाती पोटावर कसलासा गोंद डकवला आणि कसले तरी रबराचे बील्ले त्यावर डकवले. बाजुच्या यंत्रावर काही तरी वेड्या वाकड्या रेशा उमटल्या (बहुदा मशीन बीघडल असाव. नायतर सरळ रेशा नसत्या का आल्या )
" हे काय हो?"
"ई सी जी"
"ई सी जी म्हनजे"
"एको कार्डीयो ग्राम"
" अस्स अस्स" मी मला समजल्या सारख दाखवल
तोपर्यंत त्या पहील्या सीस्टरच पूरेस रक्त शोषून झाल होत.
"बर आता पुढची टेस्ट फास्टींग नंतर"
"फास्टींग?" मी जोरात किंचाळलो
"अहो मला इथे भरती केल्या पासून काहीही खायला दिल नाहीये आणि त्यात आता वेगळ फास्टींग काय करायचय?"
त्या दोन्ही सीस्टर्स पुढच ऐकायला थांबल्या नाहीत. आपापसात काहेतरी पुटपुटत नीघून गेल्या. कदाचित 'ह्या पेशंटला एनीमा द्यावा का रेचक पाजाव का दोन्ही एकदमच कराव." हे त्या डीस्कस करत असाव्यात.

रात्री कधीतरी मग मला दमून झोप लागली. झोपेत छान छान स्वप्न पडत होती. मला इंजेक्शन देणारी सीस्टर एंजेक्शन्ची सुई मोडली म्हणून रडत होती. नाडी तपासू पहाणारा एम आर ओ हाताला नाडीच लागत नाही म्हणून कावरा बावरा झाला होता. मला एनीमा द्यायला वॉर्डबॉय आला तेंव्हा मी लब्बाड पणे बाजुच्या खुर्चीवर बसून राहीलो. आणि 'पेशंट कुठाय' अस विचारल्यावर 'काय माहीत नाही बॉ' अशा अर्थाची ओठ मुडपून खुण केली. शेवटी शेवटी तर मी कॉट खाली लपून राहीलो आणि सर्व जण पेशंट कशे शोधताहेत त्याची गम्मत बघत राहीलो. तेंव्हा का कोण जाणे कुठूनस एक मांजर आल आणि मला कॉट खाली येऊन अंग घासायला लागल.चाटायला लागल गुदगुदली होऊन मी अंग झटकल आणि टक्क जागा झालो. जागा होउन बघतो तर काय एक वॉर्डबॉय मला गरम कपड्याने खरवडून काढत होता. काय करताय विचारल तर म्हणला स्पंजींग.
घड्याळात बघीतल तर पहाटेचे ५ वाजले होते. आता पेशंटला झक्कत इतक्या पहाटे उठवून घासून पूसून काढायच काय अडल असत का हो? पण नाही (हे अगदी मोहनदास सुखटणकर स्टाईलीत बर)

शेवटी एकदाची ती शुभ घडी आली. डॉक्टर शहा का डॉक्टर मोदी असे कुणीसे एक डॉक्टर आले. ते आल्यावर एम आर ओ, सीस्टर, वॉर्ड बॉय आणि आमची सौ असा घोळका सभोवताली जमला. ते पाहून कुणीतरी पेशंट अत्यवस्थ आहे अशी तर पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची धारणा झाली असावी.
"तुमची तबेयत आता लय छान दिसते. तुम्हाला डीस्चार्ज द्यायला आता काय बी प्रॉब्लेम दिसत नाय. फकस्त काही टेस्ट वरचेवर करत जा"
माझा चेहरा आनंदाने खुलला. मी लगेच ती दुखणारी सलाईन काढायला लावली. माझ्या नेहेमीच्याच (म्हण्जे गबाळ्या) पेहेरावात आलो आणि लीफ्टने धावत पळत रीसेप्शनला पोहोचलो. तोपर्यंत सौ डीस्चार्ज पेपर्स घेउन आली. बील बघतो तर काय चक्क पंधरा हजार रुपये. मला पुन्हा भोवळ आली पण परत मला भरती करतील म्हणून मी ती थोपवून धरली.चेहेरा हसरा केला. शीळ घातली. ती नेहेमी सारखी न येता इडली लावलेल्या कुकरच्या शीट्टी सारखी आली. बील 'चुक'ते करून तीकडून काढता पाय घेतला. आणिक तीथे थांबलो तर अधिक भाड लावतील. उगाच कशाला.

आजकाल मला अचानकच भोवळ येते कधीतरी. मग मी लगेच जीवन नायतर रामकृष्ण हॉटेलात जाऊन म्हैसूर मसाला डोसा, नायतर इडली-वडा हादडतो आणि हास्पीटलच्या रस्त्यावर चुकून सुद्धा फिरकत नाही.'पंधरा हजार रुपये खर्च करण्यापेक्षा ५० रुपये खर्च केलेले कधीही उत्तम' काय म्हणता?

***************************************************
समाप्त

विषय: 
प्रकार: 

Lol मस्त लिहिलं आहे.
जीवन किंवा रामकॄष्ण ... पार्ल्याचे दिसता तुम्ही. तरीच एका रात्रीत पंधरा हजारांची ओहोटी लागली खिशाला Happy

बील बघतो तर काय चक्क पंधरा हजार रुपये. मला पुन्हा भोवळ आली पण परत मला भरती करतील म्हणून मी ती थोपवून धरली>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मस्तच आहे.:)

रास कोणती रे तुझी? सिन्ह्/कन्या/तुळ या पैकी तर नाहीना?
नाहीऽऽ, म्हणल साडेसातीत असे फटके बस्तातच हो! काळजी घ्या! (म्हणजे भोवळ बाहेर दिसू न देण्याची Proud )

'पेशंट कुठाय' अस विचारल्यावर 'काय माहीत नाही बॉ' अशा अर्थाची ओठ मुडपून खुण केली.>>>मस्त

कुणी मावशीला मला लपत छपत चहा आणून देताना पाहील असत तर 'मावशी पेशंटला ताडी-माडी विक्री केंद्रातून काहीतरी जिन्नस किंवा नीरा विक्री केंरातली उरलेली आदल्या दिवशीची नीरा तर आणून देत नाही ना?' अशी शंका त्याला/तीला आली असती.>>>> हे पण मस्त

ती नेहेमी सारखी न येता इडली लावलेल्या कुकरच्या शीट्टी सारखी आली. >>>>>हे सुद्धा

एका सीस्टर ने मला फटकन टोचल आणि चांगल वाडगाभर रक्त काढल. दुसरीने छाती पोटावर कसलासा गोंद डकवला आणि कसले तरी रबराचे बील्ले त्यावर डकवले. बाजुच्या यंत्रावर काही तरी वेड्या वाकड्या रेशा उमटल्या (बहुदा मशीन बीघडल असाव. नायतर सरळ रेशा नसत्या का आल्या )>>>>> हे तर भरीच.

छान Lol

Pages