कप, बशी आणि चहा ...

Submitted by देवनिनाद on 22 February, 2010 - 06:57

कप - चला, श्रध्दांजलीची दोन मिनिटं झाली आहेत आता आपण आपली मत मांडायला काही हरकत नाहीत.

चहा (अर्थात वाफाळलेला) - हरामखोर, नीच, नरभक्षक मेले.

कप - हे बघ चहा अशी भाषा वापरूनच राग व्यक्त करायला हवं असं नाही.

चहा - मग काय झाल्याप्रकाराचं कौतुक करू. पेपर आणि चॅनेलवरच्या बातम्या वाचल्यांत ना. हे पाहून सुध्दा शांत रहा असं कप तू कसं म्हणू शकतोस.

कप - बशी तुच आवर ह्याच्या वाफेला

बशी - चहा अरे तुझी चीड कळतेय मला, पण आपण चर्चा करायला जमलोय ना.

चहा - हो चर्चा करायची ... श्रध्दांजली द्यायची ... पुन्हा तेच तेच घडतयं ते निमुटपणे सहन करायचं. खरं तर निरापराध जीव म्हणजे आतंकवाद्याचं खाद्य झालंय हेच खरं.

बशी - तसं नाही चहा मला वाटतं झाल्या प्रकारावर चीड, राग, दोष केवळ आंतकंवादी वृत्तीला देऊन उपयोगाचं नाही. जोपर्यंत आपली जनता जागरूक होत नाही तोपर्यंत हे असं होतचं राहणार.

चहा - काय बडबडतेयस बशी. जनतेने कोणत्या कोणत्या गोष्टीत किती वेळ जागरूक राहायचं. जागरूक रहायला जनते समोर बॉम्बस्फोट हा केवळ एकच विषय नाहीए.महागाई, बेकारी, कामाधंद्यातून होणारी रोजची धावपळ, दगदग, घरचे जेवणा - शिक्षणाचे नित्य व्याप.

कप - हे बघ चहा, हे म्हणतोयस ते खरं आहे, पण तरीही जी यंत्रणा सरकारने राबवली आहे तीची ताकद वाढवणं हे आपल्या जनतेचेचं कर्तव्य आहे ना.

चहा - हे बघा आज इतकी वर्ष झाली ह्या टेबलावरून त्या टेबलावर फिरलो आपण. त्या सरकारी यंत्रणेचे काही गुणगान गाऊ नकोस.

बशी - अरे असं कसं म्हणतोस तू जनतेची सुरक्षा एक टेबल दोन खुर्च्या किती करणार.

चहा - म्हणजे ? नेहमी पसरवून बोलणारी तू उगाच कोड्यात नको बोलूस उगाच.

बशी - ठीक आहे ... पसरवुन सांगते. हल्ली नाही का, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दोन पोलीस येणार्‍या जाणार्‍यांच्या सुरक्षेतेसाठी तैनात असतात. कुणी जरी हातात मोठं बोचकं घेऊन जाताना दिसलं की तो ड्यूटी पोलीस त्यात काय आहे, तू कोण, कुठे राहणारा अशी तपशीलवाल माहीती त्या वहीत लिहून घेतो.

चहा - हो, मग.

बशी - मग काय. काही विपरीत घडू नये म्हणून हजारोंच्या सुरक्षतेसाठी जर चार डोळे जर एवढं अलर्ट राहणार असतील तर जनतेच्या हजार डोळयांनी आजूबाजू लक्ष ठेवून ही नजरेचं कुंपण स्ट्रॉंग करायला नको का.

कप - अगदी बरोबर बशी पटलं मला तुझं.

चहा - म्हणजे राज्यात जो जो बॉम्बस्फोट होतो तो जनतेच्या हलगर्जीपणामुळे असं म्हणायचयं तुला.

कप - थांब थांब असं बोलून चर्चा संपवू नकोस. तुझा दुसरा मद्दा काय ते तरी कळू दे.

बशी - दुसरा मुद्दा मी मांडते. राज्यात वाढणार परप्रांतीय लोंढे, विदेशी लोकांचे वाढते वास्तव्य हे सुध्दा एक कारण आहे.

कप - हो ना. आपल्या सरकारने आपल्या राज्यहितासाठी जर खरचं ह्या राज्याची जनगणना केली ना, तर आज गेल्या चारपाच वर्षात किती वाढत्या संख्येने घुसखोरी होतेय ते कळेल.

बशी - विरोधक सुध्दा हेच सांगतायत. पण सरकार त्यांना गप्प करतयं.

चहा - थोडक्यात, मतांसाठी हपापलेले हे लालची सरकार महाराष्ट्र सगळ्यांचा असं म्हणून खतपाणी घालतयं.

बशी - हूं ... चहा आता कसं जरा वाफ निघुन गेल्यावर शांत डोक्याने अगदी मुदयाचं बोललास.

कप - थोडक्यात काय विरोधक काय आणि सरकार काय ... एका माळेचे मणी म्हणायचं. ह्यांच्या पोकळ आश्वासनाचे चष्मे जनतेच्या डोळ्यावर चढवण्यात सरकार यशस्वी ठरलयं. हेच खरं. ... हुं ..... चला आत आपण थांबू ...

चहा - का ?

बशी - अरे का काय, ते बघ गृहराज्यमंत्री आलेत.

कप - लागली वाट ! आता ह्यांची पकाव प्रेस कॉन्फरन्स ऐकावी लागणार. देवा अरे, मला हा एक कान तरी कशाला दिलास. त्यापेक्षा मला बहीरं ठेवलं असतसं तर फार बरं झालं असतं.

बशी - मी तर आधीच पसरट, तूझं ऐकुन ऐ़कून मन आणि कान भरले कि ते माझ्यात सांडणार.

चहा - मला तर आत्ताच सुस्ती आलेय.

गृहराज्यमंत्री - आज झालेल्या बॉम्बस्फोट ज्या ज्या नागरीकांनी आपलं जवळच माणूस गमावलयं त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.

कप - हो, का. मग एक कॅनभर रॉकेल अंगावर ओतून घ्या आणि दु:ख कायमचं हलकं करून टाका

गृहराज्यमंत्री- बॉम्बस्फोटातील सर्व मृतांच्या नातेवाईकांना मी २५ लाख रुपये जाहीर करतो

बशी - हो, जणू काय ह्याच्या बापाचाच माल ना ! कौतुक सांगतोय.

गृहराज्यमंत्री - मी प्रसार माध्यमांच्या निमित्ताने जनतेला आश्वासन देतो कि लवकरात लवकर संबंधित आरोपींना ताब्यात घेतलं जाईल आणि कठोर कारवाई करण्यात येईल आणि अशाप्रकारची घटना राज्यात होणार नाही ...

चहा - ... अशी पोलीसांच्या वतीने किमान १ ते २ महीन्यांची हमी देतो.

चॅनेलवाले - पण साहेब `२६/११ पासुन ते आता हे जर्मन बेकरी ... हे जे आतंकवादी हल्ले, बॉम्बस्फोट होतायत हे सर्व प्रकार थांबणार कधी.

गृहराज्यमंत्री - त्यासाठी सर्व पोलीसखात्याला आम्ही ... राज्यात एकूण किती बेकायदा दारूगोळा आलाय ... आणि त्या दारूगोळ्यातून अंदाजे किती हल्ले, बॉम्बस्फोट होतील याची एक यादी तयार करायला सांगितली आहे ... ती हाती आली की पुढील हल्ल्याच्या आणि बॉम्बस्फोटांची तारीख गुप्तचर विभागाकडून कळविण्यात येईल. ज्यांना ती अफवा वाटेल ... ते नाहक मरतील ... तेव्हा सतर्क रहा आणि आम्ही राजकरणी आहोत, यमदेवाचं आमच्यासमोर काही चालणार नाही .... कारण त्याला चित्रगुप्ताकडे जो मंथली कोटा दाखवायचा असतो ... तो आम्ही त्याला वेळेतच पुरवत असतो आणि पुरवत राहू.

चॅनेलवाले - सर, पण या वक्तव्याने जनतेला काय वाटेल ..

गृहराज्यमंत्री - आपण चॅनेलवाले आहात ... जनतेला काय वाटतं त्यासाठी संध्या़काळी तुमचे जे आजचा सवाल वगैरे सारखे जे कार्यक्रम आहेत त्यात आमचे प्रतिनिधी असतीलच ते ह्या प्रश्नाचं उत्तर देतीलच. (मोबाईल वाजतो. हो, हो, नाही, नाही करतात).

चॅनेलवाले - सर, सर, सर ...

गृहराज्यमंत्री - हे पहा मला निघायला हवं ठाण्याच्या आदीवासी विभागात ... एका महिलेवर सामुहिक बलात्कार झालाय ... तेव्हा तिकडे बोलण्यासाठी दिलगिरीचे काही शब्द मी शिल्लक ठेवतो. नमस्कार.

कप - चला, आता ठाण्याला

बशी - चला

चहा - मला वाटलं होतं ... आज तरी आराम मिळेल ... पण कसलं काय

कप - आता थंड झालायचं आहेस तर वैतागू नकोस ... जमलचं तर आठवड्यात एखादा विकली ऑफ आम्हाला ही द्या असा विनंती अर्ज आपण मुख्यमंत्र्याना करू, चल.

(शेवटी कप चहाला स्वतःबरोबर घेऊन वरून बशीची झेड सिक्यूरीटी देत ठाण्याला प्रयाण करतो).

गुलमोहर: 

मस्त...
ह्या अशा वस्तुंमध्येपण असे संवाद साधता घडत असतील का? मस्त..