जिप्सी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

साधारणत: साडेसहाचा सुमार असेल. गजबजलेल्या रानडे रोडवरुन 'तो' प्लाझाच्या दिशेने चालत होता.आजूबाजूला लोकांची तुफान गर्दी होती. असंख्य वाहनांचे हॉर्न एकामागून एक वाजतच होते. या प्रचंड तोबा गर्दित जो तो आपआपल्या ठिकाणी भरभर जाऊ पहात होता. संध्याकाळ असूनही उन कायम होतं. उन्हात वाहनांच्या काचा चमचमत होत्या. एक प्रकारचं चैतन्य सगळ्या वातावरणात भरुन राहिलं होतं. त्याची पावलंही त्या गर्दित भराभर पडत होती. पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक त्याच्या ह्रुदयाची धडधड वाढत होती. अखेर एकदाचं जिप्सी आलं. त्याने क्षणभर श्वास घेतला आणि तो आपल्या नेहमीच्या टेबलावर जाऊन बसला. ओळखीच्या वेटरने त्याला पाहून हात वर केला.

त्याला तसा उशीरच झाला होता. त्यामुळे जास्त वाट पहावी लागली नाही. पाच एक मिनीटातच 'ती' आली. तिने पांढरा टॉप आणि करडी जीन्स घातली होती. खांद्यावर नेहमीचाच निळा बॅगपॅक. लोकलच्या कितीही जास्त गर्दितून ती आली असली तरी ती नेहमी त्याला फ्रेशच वाटत असे. तीने नेहमीप्रमाणे खांद्यावरुन बॅगपॅक काढला आणि वेटरने नेहमीप्रमाणे ती येताच पाण्याचे दोन ग्लास आणून ठेवले.
"नेहमीचीच ना?" वेटरने प्रश्न विचारला.
तीने गोड आवाजात हो म्हटलं.
त्याला तशी खाण्याची गरजच उरली नव्हती. ती आल्यावरच त्याचं पोट भरलं होतं. पण तील कंपनी द्यायची म्हणून तो आजही वडे खाणार होता.
किती वाजता अॉफिसमधून निघाले, बॉसच्या हातून आयत्या वेळी कशी सुटका झाली, लेडिज स्पेशल कशी चुकली, दोन वेळा प्लॅटफॉर्म कसा बदलावा लागला हे सांगण्यात आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यात तासभर कसा उलटून गेला हे दोघांनाही कळलंच नाही. वेटरने वाफाळलेले वडे टेबलावर ठेवले तेव्हा वेटरच्या हातातले घड्याळ त्याला दिसलं. वेटरलाही माहित होतं की लवकर वडे आणायचे नाहीत. ते वाफाळलेले वडे पाहून त्याची भूक चाळवली गेली. त्याने वड्यात चमचा घातला आणि तिने प्रश्न केला.
"मग काय ठरवलं आहेस?"
"तुला काय वाटतं?" त्याच्या डोळ्यात मिश्किल भाव होता. जणू काही या प्रश्नाचं एकच उत्तर असू शकतं.
तिने यावर नुकतंच स्मितहास्य केलं.
"आजच बाबांकडे विषय काढतो. आईची परवानगी तर आहेच."
हे ऐकताच 'ती'चा चेहरा चांगलाच खुलला. गालावरची खळी रुंदावली.
त्याचं धडधडणारं ह्रदयही आता शांत झालं होतं. त्याने निर्णय घेतला होता. त्याच्यापुरता फैसला झाला होता. तो हसणारा चेहरा त्याला आयुष्यभर असाच समोर हवा होता. बाबांना कसं सांगायचं याचा काही प्लॅन नव्हता पण निदान स्वत:ची घालमेल तरी मिटली होती. दोन वर्षांच्या भेटींची सांगता कायमच्या गाठीत होणार होती. वडे आज फारच चविष्ट लागत होते त्याला. या वड्यांच्या साक्षीनेच दोघांनीहा आज फैसला केला होता.

दादरहून पुन्हा लोकल पकडून बोरीवलीला पोचायला रात्रीचे नऊ वाजले. दरवाजा उघडताच आईने विचारलं
"जेवणार आहेस ना आज?"
"नको."
"सांगायला काय होतं रे तुला आधी. आणि सारखं सारखं बाहेर काय खातोस?" आईने नेहमीचीच सरबत्ती चालू केली. तो आत आला, घामाने चिंब झालेला चेहरा धुतला आिण त्याने बाबा काय करताहेत याचा अंदाज घेतला. बाबा जेवायला बसले होते. त्याने बाहेर टिव्ही लावला आणि कुठलीतरी टुकार मालिका बाबा येईपर्यंत टाईमपास म्हणून पहायला सुरुवात केली.
"काय रे उशीरसा झाला?" बाबांनी हात पुसत पुसत हॉलमध्ये येता येता प्रश्न केला.
"अॉफिसमध्ये काम होतं जास्त." त्याने सराईतपणे थाप मारली.
बाबांनी रिमोट हातात घेतला आणि ते चॅनल्स चाळू लागले. त्यांना काहीच आवडलेलं दिसलं नाही तसं त्याला बरं वाटलं. आता विषय काढायला हरकत नाही असा त्याने अंदाज बांधला.
"मला तुमच्याशी काही बोलायचंय."
"मला लग्न करायचंय." बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले
"ब्राम्हण आहे ना ती?" तीचं नावही विचारण्याआधी बाबांनी घाव घातला. बाबांना बहुधा कुणकुण लागली असावी.
"नाही." तो म्हणाला.
"मग?"
"न्हावी आहे. पण माझ्याएवढीच शिकलेली आहे. आई वडीलही शिकलेले आहेत. बँकेत काम करतात."
"पण न्हावी ते न्हावीच आणि वर ते मास मच्छी खाणार."
"ती शाकाहारी बनायला तयार आहे."
"मला हे लग्न मान्य नाही."
"पण बाबा आजकालच्या काळात जात पित कोणी मानत नाही."
"मी मानतो. आणि आतापर्यंत आयुष्यभर मास मच्छी खाल्लेली व्यक्ती एवढ्या सहजासहजी ते सोडून देत नाही. मांस खाणारी कुठलीही मुलगी मी घरी येऊ देणार नाही. मला या विषयावर जास्त चर्चा करायची नाहीए."
तो हिरमुसाला. बाबांनी शेवटचं वाक्य ज्या ठामपणे म्हटलं होतं त्याच्यावर आता जास्त काही बोलणं शक्यच नव्हतं.

दिवसामागून दिवस जाऊ लागले. त्याला आशा होती की बाबा आज नाहीतर उद्या ऐकतील. एक दोन वेळा त्याने बाबांकडे विषय काढण्याचा प्रयत्नही केला त्याने. पण बाबांनी त्याला प्रतिसादच दिला नाही. त्यांना या विषयावर खरंच चर्चाही नको होती. त्याने आपल्या भावाला मध्ये घालून पाहिलं, आईला मध्ये घालून पाहिलं, पण बाबांचा त्याच्यावर काहिच परीणाम झाला नाही. 'त्या मुलीशी लग्न करायचं असेल तर हे घर सोडून चालता हो' असंही बाबा त्याला म्हणाले होते. तशी त्याची घर सोडायची तयारी होती पण आपण गेलो तर आईचा एक मोठा आधार तुटेल हेही त्याला माहिती होतं. नुकताच आईचा दम्याचा त्रास वाढला होता. इकडे 'ती'नेही भुणभूण लावली होती काय तो निर्णय घे म्हणून. त्याचा धीर दिवसेंदिवस खचत होता. अन्नावरची वासना उडाली होती. जिप्सीचे वडे नकोसे झाले होते. त्याला कधी वाटायचं, 'सोडून देऊ हे घर, तीच्याशी पळून लग्न करु. कुठेतरी घेऊ भाड्याने फ्लॅट.' पण पुढच्याच क्षणाला तो भानावर यायचा. खोकणारी आई आठवायची. तिची काळजी घेणारं कुणीच नव्हतं घरी. ऑफिसमध्येही लक्ष लागत नव्हतं. हातून चुका होत होत्या. बाबांशी बोलणं तर खुंटलंच होतं.

अखेर त्याने ठरवलं. अजून एक निकराचा प्रयत्न करायचा. एका रविवारी संध्याकाळी बाबा पेपर वाचत असताना त्याने विषय काढला.
"बाबा जग कुठे चाललंय आणि काय हेका धरुन बसलाय तुम्ही हा? मी सांगितलं ना ती नाही खाणार मांस म्हणून?"
"मी तुला सांगितलं ना एकदा नाही म्हणून?"
"मी हे लग्न करणारच"
"मग माझ्या चितेला लवकरच अग्नि द्यावा लागेल. आणि तो तु मोठा असूनही देऊ नयेस ही माझी इच्छा आहे. छान पांग फेडलेस हो. एवढं कष्ट करुन शिकवला त्याची ही फळं मिळताहेत मला."
त्याच्या काळजातून कळ उठली.
"जाऊ द्या हो. किती भांडायचं ते? चांगली आहे ती मुलगी. मी भेटलेय तीला."
"तू मध्ये पडू नकोस. नाहीतर तूही जा निघून त्याच्या बरोबर."
आईच्या डोळ्यात साठलेलं पाणी बाहेर आलं. सगळ वातावरण तंग झालं होतं. मनाला न झेपेल असा ताण त्याला जाणवत होता. त्याला काय बोलायचं तेच कळेना. झोपी गेलेल्या माणसाला जागं करता येतं. पण बाबांनी झोपेचं सोंग घेतलं होत. तिथे कितीही डोकेफोड करुन काहीही साध्य होणार नव्हतं. आता त्याला निवड करावी लागणार होती. आई बाबांना सोडणार नव्हती हे त्याला माहित होतं. म्हणजे त्याला आई आणि तिच्यात कुणीतरी एकाला निवडावं लागणार होतं.

संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. रानडे रोडवर नेहमी प्रमाणेच प्रचंड गर्दी होती. वाहनांचे हॉर्न, फेरीवाल्यांचे कर्कश्श अोरडणे जोरजोरात चालू होते. साडेसहा वाजले असूनही बऱ्यापैकी उन होतं. घामाने थबथबत तो जिप्सीच्या दिशेने चालला होता. गर्दिने तो अगदी कातावून गेला होता. विचार करुन त्याचं डोकं ठणकायला लागलं होतं. आपण करतोय ते बरोबर की चूक हे कुणालाच निश्चितपणे सांगता येणार नव्हतं हे माहित होतं त्याला. अखेर एकदाचं जिप्सी आलं आणि तो क्षणभर श्वास घेऊन नेहमीच्याच टेबलावर जाऊन बसला. वेटरने नेहमीप्रमाणेच हात वर केला. "लवकर आण वडे आज, भूक लागलीय." तो वेटरला म्हणाला. "ओके. साहेब." वेटर म्हणाला. पाच एक मिनीटातच ती आली. आज मात्र तीही गर्दिने कातावलेली दिसत होती त्याला. चेहऱ्यावरचं ते हसु कुठेतरी पळून गेलं होतं. दहा पंधरा मिनीटं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. वेटरने गरमागरम वडे आणून ठेवले आणि त्याच्या तोंडातून मुद्द्याला हात घातला गेला.
"मला नाही जमणार लग्न करायला. मला विसरुन जा."
तिच्या काळजाचा ठोका चुकला. डोळ्यातलं पाणी गालावरुन ओघळून खाली आलं आणि बशीतल्या वड्यांवर पडलं.त्याला पाहवलं नाही तिला असं. हसराच चेहरा बघायची सवय होती त्याला तीची. पंधरा एक मिनीटं तशीच गेली. दोघंही आपआपल्या मनाशी संवाद साधण्यात गुंतली होती. वाफाळलेले वडे कधीच गार झाले होते. वर पंखा चालू असूनही हवेतील उकाडा त्याला असह्य होत होता. त्याला हमसाहमशी रडावसं वाटलं. डोळ्यात साठलेलं पाणी बाहेर येण्याआधीच तो तिथून उठून निघून गेला. आता जिप्सीत फक्त ती उरली होती आणि ते दोन प्लेट वडे.

विषय: 
प्रकार: 

छान जमलीये. साधी सरळ नेहेमीचीच गोष्ट पण मांडणीमुळे वाचनीय झाली आहे. Happy शुभेच्छा.