काळ्या घोड्याचा उरूस!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

फेब्रुवारी २०४५
'दर वर्षी थंडीच्या मोसमात मुंबईनगरीमधे फोर्ट परिसरात काळ्या घोड्याचा उरूस भरतो. तर्‍हेतर्‍हेचे खाद्यपदार्थ, भिरभिरी, मुखवटे, इतर खेळणी, टिशर्ट, कपडे, दागिने, मातीच्या उपयोगी वस्तू याची भरपूर रेलचेल असते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. विशेषतः शनिवार रविवारच्या दिवशी तर मुंगीला शिरायला जागा उरत नाही एवढी गर्दी होते.

काळा घोडा ही देवता तांत्रिक प्रकारची आहे. चित्रविचित्र प्रकारची, विविध वस्तूंपासून बनलेली शिल्पे वाह्यल्याने ही देवता प्रसन्न होते. त्यामुळे अनेक चित्र व शिल्पकारांना पाचारण करून विचित्र विचित्र वस्तू बनवून काळा घोड्याभोवती मांडल्या जातात.

याच परिसरात छत्रपति शिवाजी वस्तूसंग्रहालय, जहांगीर कला प्रदर्शनी, नवकलेची राष्ट्रीय प्रदर्शनी आणि अश्याच अनेक वास्तू असल्याने या उरूसाला काळा घोडा कला महोत्सव असे म्हणण्याची काही वर्षांपूर्वी पद्धत पडली होती. पण लोटणार्‍या गर्दीने काळा घोडा देवतेला न्याय दिला आणि दाखवून दिले की हा कला महोत्सव नसून उरूस आहे.'

वयाच्या सत्तरीला आलेली मी सकाळी सकाळी पेप्रात वाचत होते. वाचून परत एकदा जुनी चिडचिड वर आली. हल्ली सगळ्या जुन्या चिडचिडी बाहेर यायला लागल्यात. आमच्यावेळी असं नव्हतं ची टेप नाही वाजवायची म्हणली तरी वाजवली जातेय... असो हे असं होतं हल्ली चिडचिडल्यावर सुद्धा जास्त वेळ त्याच ट्रॅकवर रहाता येत नाही.

तर काळ्या घोड्याच्या उरूसाची बातमी वाचली पेप्रात आणि संताप संताप झाला. कला महोत्सवाचं जत्रेत झालेलं रूपांतर बघितलं होतं. कुठल्याही महोत्सवाला देव देवता देवस्की याच्याशी नाहीतर बॉलिवूड, टॉलिवूडशी जोडायचं ही पद्धतच पडून गेली होती. त्या अनुषंगाने खादाडीचे स्टॉल्स आणि विकायच्या फुटकळ वस्तू... नुसतं हस्तकौशल्य असलेल्या. कला मिसिंग इन अ‍ॅक्शन.

एक काळ असा होता की काला घोडा फेस्टिवलमधे सगळ्या 'आव्हा गार्द (Avent Garde)' म्हणता येईल अश्या कलाप्रकारांचं प्रदर्शन असायचं. चित्रकला, शिल्पकला, इन्स्टॉलेशन्स, संगीत, नृत्य, नाटक सगळं सगळं चाकोरीबाहेरचं. नवीन असं काहीतरी. बघणार्‍याला टोचून जाईल, विचारात पाडेल, अस्वस्थ करेल, अनुभव देईल, डोक्याला चालना देईल, किक देईल असं काहीतरी... सगळं फ्रेश वातावरण. सिरीयल्समधल्या गोड, गुलगुलीत, कंटाळवाण्या कौटुंबिक बजबजपुरीला हास्यास्पद बनवेल असं 'आजचं', ताजं काहीतरी तिथे मिळायचं. वातावरण कलाप्रकार, कलाप्रवाह यांनी भारीत असायचं.

अश्याच अपेक्षा घेऊन २०१० च्या फेब्रुवारीमधे मी आणि निलिमा गेलो होतो काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला. नेमका होता शनिवार. प्रचंड गर्दी होती. कला महोत्सवाला अशी दाद मिळतेय बघून आधी छानच वाटलं. पण थोडं त्या गर्दीच्या पोटात घुसलो तेव्हा भ्रमनिरास झाला.

फुटपाथवर 'हॅलो मॅडम, इंडियन इंस्टृमेंट!' म्हणत डमरू-ढोलक्-ढोलकी यांचा संगम असलेलं एक बडववाद्य घेऊन गोर्‍या चमडीच्या मागे लागणारे विक्रेते होते. भिरभिरं, खेळणी, फुगे, डेव्हिलची लाल शिंगे असलेले हेयरबॅण्ड विकणारे अनेक जण होते. खाद्यपदार्थ, सिरॅमिकच्या वस्तू ज्यात बरेचसे विविध आकाराचे फ्लॉवरपॉटस होते, खोटे दागिने, कापडचोपड, टि शर्टस, उलटी येईल इतपत गोड असलेली लॅण्डस्केपस, व्यवस्थित सबमिसिव्ह दिसणार्‍या भारतीय नारीचे वेगवेगळ्या रंगात रंगवलेले चेहरे आणि त्याला लावलेल्या महागड्या फ्रेम्स, झाडे-रोपे-पक्ष्यांची पत्र्याची घरटी-प्लास्टिकच्या कुंड्या, हुबेहुब चित्र काढून देणारे असेच बरेचसे स्टॉल्स होते. 'ये देखो ये काला घोडा फेस्टिव्हलसे लिया!' असं सांगून स्वतःचा कलात्मक दृष्टीकोन सिद्ध करता येईल इतपत आर्टसी दिसेल पण एकुणात गुळचट दिसणार्‍या गृहसजावटीच्या वस्तू चिक्कार होत्या. या सगळ्या स्टॉल्सवर ही झुंबड उडालेली होती. सगळं हस्तकौशल्य उतू चाललं होतं. हुबेहुब आणि आकर्षक ह्याच्यापलिकडे बर्‍याचश्या वस्तूंची उडी नव्हती.

तिथल्या गर्दीमधे 'लूक लूक हा हॉर्सी कसा छान बनवलाय ना ड्राइड ग्रासमधून!' असं काहीतरी अगम्य बोलत मिरवणारे विकेंड अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून मुलांना घेऊन आलेले आईबाप होते. 'काला घोडा फेस्टिव्हल घुमने जायेंगे, खायेंगे, पियेंगे, ऐश करेंगे' म्हणत आलेले कॉलेजियन्सचे ग्रुप होते. 'देखो हमे क्या मिला' म्हणत आपल्या डोक्यावर लाल शिंगांचा हेयरबॅण्ड वागवत चित्कारत फिरणार्‍या मुली होत्या. 'काला घोडा देखनेको जायेंगे फीर वहीपे खाना खाके घर जायेंगे' असं ठरवून आलेले लोक होते. थोडक्यात सगळे जत्रेला आल्यासारखे. सगळे हस्तकौशल्यालाच कला समजणारे.

गेलेल्या सिडीज, जुनी सायकल, पाण्याच्या संपलेल्या बाटल्या अश्या सगळ्या कचर्‍यातून एक इन्स्टॉलेशन केलेलं होतं. पण ते बघायचं तर अगदीच त्याच्या पुढ्यात जावं लागत होतं जिथून त्या इन्स्टॉलेशनचा काही इफेक्ट जाणवत नव्हता. दुरून बघायचं तर पोर्टेबल कमानीचा एक मोठ्ठा पोलादी खांब पुढ्यातच ठेवलेला होता आणि गर्दी तर लोकलच्या तोंडात मारेल अशी होती. दुरून काही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. आणि बिन्डोक लोक त्या इन्स्टॉलेशनला हात बित लावून बघत होते. लहान पोरं टांगलेल्या बाटल्यांना झोका देऊन बघत होती. हात लावू नये च्या सुचनेवर हात टेकवून त्यावर रेलून कोणी गप्पा मारायचा प्रयत्न करत होता. ते एक इन्स्टॉलेशन आहे.. बघण्याची वस्तू आहे. हात लावण्याची नाही. मी मनातल्या मनात त्या लोकांवर फिसकटले आणि मागे वळले.

एक मोठी घंटा टांगल्याचं पेपरमधे आलं होतं ती लांबवरून दिसत होती. तिथपर्यंत पोचणं आणि नंतर तिथून बाहेर येणं हे मुश्किल वाटत होतं.

काही थोडे लोक गर्दीला वैतागलेले, अरे हा कला महोत्सव आहे ना अश्या प्रश्नात पडलेले, गुळचट चित्रं आणि फ्लॉवरपॉटस बघून कंटाळलेले, आमच्यासारखे तिथून लवकरात लवकर बाहेर पडायच्या बेतात होते. बाहेर पडलेही.

हॅण्डलूम एक्स्पो, सिल्क एक्स्पो, हॅण्डिक्राफ्ट एक्स्पो, भीमथडी जत्रा, पूर्वी सारसबागेच्या ग्राउंडवर भरायचं ते डिस्नेलँड या पेक्षा इथे फार वेगळं काय होतं हा प्रश्न सतत घोळत राह्यला डोक्यात. हस्तकौशल्यालाच कला मानून भागवावं लागणार का आता असे प्रश्नही उमटले. एक महोत्सव केवळ दृश्य आणि प्रयोगकलांचा, कलाकार आणि कलारसिक यांच्यापुरताच किंवा त्यांच्या आवडीनिवडीला, अपेक्षांना प्राधान्य देणारा असा असूच शकत नाही का? खूप चिडचिड होत राह्यली.

त्याला होत आली आता ३०-३५ वर्ष. काळा घोडा देवतेने कलेचा शिरच्छेद करून झाला. महोत्सवाचा उरूस झाला. अंगवळणी पडून घ्यायचा प्रयत्न काही कमी केला नाही पण जमलं नाही. म्हणून मग चिडचिड लिहूनच काढली.

-नी

विषय: 
प्रकार: 

मस्त लिहिलं आहेस नीधप. वीकेन्ड्सना अर्थच नसतो गं काळा घोडाला जाण्यात. खरोखरच तु लिहिलं आहेस तशी जत्रा होते. गेल्यावर्षीही असाच बाजार झाला नंतर नंतर पण निदान डेव्हिड ससून आणि बीएनएसएचचे वर्कशॉप्स आणि फिल्म्सतरी चांगल्या होत्या. यावेळी तिथेही आनंदच.
किती छान वाटायचं खरंच तीन चार वर्षांपूर्वीपर्यंत. अगदी वाट बघाविशी वाटायची फेस्टिवलची. मल्लिका साराभाईचं रात्री दहाच्या सुमारास एशियाटिकच्या पायर्‍यांवरचं नृत्य आणि त्यानंतरचा तिथला फॅशनशो कसलं जबरी झालं होतं! बाऊल संगिताचा कार्यक्रमही सुरेख झाला होता मॅक्सम्यूलरच्या समोर. इव्हन ते डबेवाल्यांकडच्या डब्यांच इन्स्टॉलेशनही अजून आठवतं. आता इतकी गर्दी होते की काही मजाच घेता येत नाही कसली. मी तर फिरकलेच नाही यावर्षी.

एक महोत्सव केवळ दृश्य आणि प्रयोगकलांचा, कलाकार आणि कलारसिक यांच्यापुरताच किंवा त्यांच्या आवडीनिवडीला, अपेक्षांना प्राधान्य देणारा असा असूच शकत नाही का? >>>> शंभर टक्के अनुमोदन!

छान लिहिलं आहेस. आणि अगदी मनातलं.

मी प्रथमच गेले होते यंदा... त्यामुळे मला आवडला.
पण तू लिहिलंयस ते ही पटलं. मी ही २-३ ठिकाणी लोकांना 'हात लावू नका' असं तिथल्या पाटीकडे लक्ष वेधून सांगितलं.
त्या इन्स्टॉलेशनप्रमाणेच ३-डी स्ट्रीट आर्टचाही पोपट झाला होता. म्हणजे मुळात ते चित्र होतं छान. पण ते कुठून, कशा अँगलने बघायचं तेच कुणाला कळत नव्हतं आणि लोकं येड्यासारखी त्या चित्राचे उलट्या बाजूनेही फोटो काढत होती.

त्या इन्स्टॉलेशनप्रमाणेच ३-डी स्ट्रीट आर्टचाही पोपट झाला होता. म्हणजे मुळात ते चित्र होतं छान. पण ते कुठून, कशा अँगलने बघायचं तेच कुणाला कळत नव्हतं आणि लोकं येड्यासारखी त्या चित्राचे उलट्या बाजूनेही फोटो काढत होती.<<
मला ३ डी स्ट्रीट आर्ट हा फंडाच झेपलेला नाहीये. आणि ज्या बाजूने बघणं योग्य होतं त्या बाजूला पोचणंच शक्य नव्हतं मला..

मग मी नाही गेले ते एका अर्थी बरंच झालं का?

मेगा ब्लॉक, हाय अॅलर्ट, 14 फेब., शेवटचा दिवस आणि मुख्य म्हणजे सोबत नाही अश्या कारणांमुळे मी माझं जाणं रहीत केलं. आता नीरजाचा लेख वाचून मला अजिबात पश्चात्ताप होत नाहीये Happy

मी शनिवारी गेले होते. गर्दी बघून मनात आलं इथे बॉम्बस्फोट झाला तर काय भयंकर होईल ना.. आणि त्याच वेळेला माझ्या पुण्यात खराच बॉम्बस्फोट होत होता.. Sad

भारी लिवलया. टेरिफिक.

एक महोत्सव केवळ दृश्य आणि प्रयोगकलांचा, कलाकार आणि कलारसिक यांच्यापुरताच किंवा त्यांच्या आवडीनिवडीला, अपेक्षांना प्राधान्य देणारा असा असूच शकत नाही का?>>>> हम्म्म्म्म्म्म्म. जरा अवघड आहे हल्लीच्या काळात. कारण आर्थिक बाबी इतर सर्वच जाणीवांहून वरचढ झाल्यात.

या उरूसाला कधीच गेले नाहीये, आणि आता हे वाचून जाईन असे वाटत नाही.

सवाई गंधर्वमधूनही संगीत हळुहळू भायेर व्हायला लागलंच होतं मध्यंतरी.

मुद्दा पूर्णपणे मान्य, पण... एक पण .... आहे आणि माफी मागुन मांडू इच्छिते. गैरसमज नसावा.
विद्रोहासाठी कलावाल्यांनी उर बडवून आम्हाला कसा लोकाश्रय नाही असं म्हणत गुर्मीत लोकांच्या कलाजाणीवांची कीव करावी, मग त्याच लोकांनी त्यांना विकत घेऊन त्यांचे प्रस्थापित करावेत हेच संक्रमण- हा एक महत्वाचा मुद्दा यातुन बाजूला काढता येत नाही हेही एक अबाधित सत्यच.

मग युरोपातल्या समृद्ध कलाजाणीवांचे कौतुक कशाला फुकाच? गल्लोगल्ली सूर्यफुलाची भ्रष्ट नक्कल उपलब्ध झाली की त्यांची कलाजाणीव तेवढी श्रेष्ठ आणि आपल्याकडे झाली की ...?
वरीजीनल सूर्यफुलाला तारांगणाचे भाव येणार, आणि कोणा ना कोणा अफाट श्रीमंत वल्लीच्या दिवाणखान्यात ते विराजमान होणार. येडा चित्रकार जातो कानानीशी आणि जीवानीशी, फुडचेन मधल्या एखाद्या अनाम जीवासारखा.

विद्रोह करण्याचा मुद्दाच नाही. कश्याविरूद्ध असा आवेशही अपेक्षित नाही. करून बघणे, पुशिंग द आन्व्हालोप.. असं काहीसं अपेक्षित आहे निदान महोत्सवात तरी.. बाकी गॅलरी परवडणारे आर्टीSस्ट ते तिथे करू शकतात इथे इथल्या 'ज्या मिशेल बास्किया' सारख्यांना प्लॅटफॉर्म मिळायला हवा ना...

गल्लोगल्ली सूर्यफुलाची भ्रष्ट नक्कल उपलब्ध झाली की त्यांची कलाजाणीव तेवढी श्रेष्ठ आणि आपल्याकडे झाली की ...? >>>

काहीही झालं तरी कला सामान्यांपर्यंत जायला, पोचायला तर हवीच. खरं तर ज्यांना कला कळते ते कधीच सामान्य नसतात. (बदलापूरला भुगोल आणि नागरिकशास्त्र शिकवणार्‍या एका प्राथमिक शिक्षकांनी त्यांच्या पगारातले पैसे साठवून घेतलेलं चिमुलकरांचं एक वॉटरकलर मला एकदा अभिमानाने दाखवलं होतं. शाळेतल्या मुलांची ट्रीप जहांगिरला गेली असताना त्यांना तिथल्या प्रदर्शनात ते दिसलं होतं आणि त्यातले बारकावे टेक्निकली समजले नाहीत तरी ते त्यातल्या अनोखेपणामुळे भारावून गेले होते. ) फॅशन म्हणून किंवा इन्व्हेस्टमेन्ट म्हणून आर्ट विकत घेणारे कित्येक उच्चभ्रू त्या अर्थाने सामान्यातले सामान्यच असतात. त्यांचंही कार्यक्रमात पहिल्या रांगा अडवून बसणं, उगीचच शेरेबाजी करणं असंच इरिटेट करतं जसं अडाणी लोकांचं इन्स्टॉलेशनला हात लावून पहाणं.
कलेतल्या नवेपणाचे प्रयोग बघायला लोकांनी यावं, कला त्यांच्यापर्यंत पोचावी हा काळा घोडाचा हेतू असेलही आणि गर्दीतल्या हजारजणांपैकी निदान दहांपर्यंत जरी ते पोचू शकले तरी फेस्टीवलचा किंवा अशा तर्‍हेच्या प्रयोगांचा हेतू नक्कीच सफल होतो.
पण खरंच नीधप म्हणतेय तसं एक्स्पोचं स्वरुप आल्यासारखी गर्दी होणं, हात लावून पहाणे, टवाळक्या करणे हे प्रकार घडतात तेव्हा कला कशी पहावी याचं खरं शिक्षण देण्यातच आपण कुठेतरी कमी पडलो हे जाणवतं. दु:ख त्याचं होतं.
विद्रोहासाठी कलावाल्यांनी उर बडवून आम्हाला कसा लोकाश्रय नाही असं म्हणत गुर्मीत लोकांच्या कलाजाणीवांची कीव करावी, मग त्याच लोकांनी त्यांना विकत घेऊन त्यांचे प्रस्थापित करावेत हेच संक्रमण >>> Happy !

फॅशन म्हणून किंवा इन्व्हेस्टमेन्ट म्हणून आर्ट विकत घेणारे कित्येक उच्चभ्रू त्या अर्थाने सामान्यातले सामान्यच असतात. त्यांचंही कार्यक्रमात पहिल्या रांगा अडवून बसणं, उगीचच शेरेबाजी करणं असंच इरिटेट करतं जसं अडाणी लोकांचं इन्स्टॉलेशनला हात लावून पहाणं.<<
शर्मिला सोला आने सच..

पण खरंच नीधप म्हणतेय तसं एक्स्पोचं स्वरुप आल्यासारखी गर्दी होणं, हात लावून पहाणे, टवाळक्या करणे हे प्रकार घडतात तेव्हा कला कशी पहावी याचं खरं शिक्षण देण्यातच आपण कुठेतरी कमी पडलो हे जाणवतं. दु:ख त्याचं होतं.<<
हेही अगदी अगदी.

त्या बरोबरच कला महोत्सवात कला कमी आणि हस्तकौशल्याच्या गुळगुळीत वस्तूंचा भरणा अधिक हे काही फारसं भलं नाही.

फॅशन म्हणून किंवा इन्व्हेस्टमेन्ट म्हणून आर्ट विकत घेणारे कित्येक उच्चभ्रू त्या अर्थाने सामान्यातले सामान्यच असतात>> लाख बोललात.
पुशिंग द आन्व्हालोप>> अगदी खरं.

मी काल पहिल्यांदाच गेले काळा घोडा प्रदर्शन बघायला.. अर्थात गर्दी इतकी प्रचंड होती की फक्त रिदम हाऊससमोर जे काही मांडले होते तेवढेच बघायला मिळाले. आधी बरेच दिवस बरेच कार्यक्रम होते असे वृत्तपत्रात वाचत होते, पण मुंबईच्या दुस-या टोकाला रोज रोज जाणे मला अवघड आहे.

प्रदर्शन म्हटले तर आवडले, म्हटले तर नाही.. आवडले अशासाठी की पहिल्यांदाच पाहिले, हाय फाय दिसणारे/वागणारे लोक आपली कला घेऊन बसले होते, ते पाहुन मजा वाटली. काही काही चित्रे, वस्तु नाविन्यामुळे आवडल्या, पण किंमती अर्थातच झेपणा-या नव्हत्याच (तसेही काही घ्यायचे हे ठरवुन गेलेच नव्हते). पण जे काही पाहिले ते आणि नुकतेच भरलेले सहारा आर्ट, कोकण सरस वगैरेत काही फारसा फरक वाटला नाही. अर्थात माझे हे मत फक्त रिदम हाऊससमोरील प्रदर्शनाला उद्देशुन आहे. इतरत्र झालेले कार्यक्रम मी पाहिले नाहीत आणि याआधी काळा घोडाही पाहिलेले नाही, त्यामुळे काय उंचावले आणि काय खालावले याची तुलना करता येणार नाही.

तरीही पुढच्या वर्षी परत जायचे आणि गर्दीच्या दिवशी न जाता रिकाम्या दिवशी जाऊन एकदा सगळे पाहायचे असे ठरवलेय.

एक वि.सू. - कुणाचा गैरसमज झाला असल्यास एक डिस्क्लेमर... कोणी तिथे जाऊ नये म्हणून हा लेख लिहिलेला नाही. गेल्यावर जे झालं माझं ते उमटलंय इथे. लोकांनी जरूर जावं. कला ही वस्तू समजून घेण्याची सुरूवात म्हणून तर नक्कीच जावं.

मी कधी गेले नाहीये. आता एकदा तरी नक्की जाइन. पुढल्या वर्षी इथे तारखा टाकणार का ?

तुझी लिहिण्याची पद्धत आवडली.

ह्म्म... मी पण कधीच गेले नाहिये.. पण एकदातरी जायची इच्छा आहे.

छान लिहिलयस नीरजा. सत्तरीला पोचलेली, चिडचिड करणारी तू डोळ्यासमोर आलीस. Wink

मी पण पहील्यान्दाच गेले होते मधल्या वारी व चारच्या सुमाराला. त्या मुळे असेल

कदाचित गर्दी कमीहोती. शिवाय सारे मनसोक्त निवान्त्पणे पाहता आले

मी खूपच एन्जोय केले.लहान मुले धीट्पणे स्टेज्वर पेर्फोर्म करत होती

समोर पायर्‍यान्वर बसून सारे टाळ्या वाजवत कौतुक करत होतेबरच लिहिण्यासारखे आहे

हा माझा काळ्या घोड्याचा अनुभव!

मी पण पहील्यान्दाच गेले होते मधल्या वारी व चारच्या सुमाराला. त्या मुळे असेल

कदाचित गर्दी कमीहोती. शिवाय सारे मनसोक्त निवान्त्पणे पाहता आले

मी खूपच एन्जोय केले.लहान मुले धीट्पणे स्टेज्वर पेर्फोर्म करत होती

समोर पायर्‍यान्वर बसून सारे टाळ्या वाजवत कौतुक करत होतेबरच लिहिण्यासारखे आहे

हा माझा काळ्या घोड्याचा अनुभव!

गर्दी होती?
माझ्या अनुभुतीप्रमाणे फक्त गावच्या चावडीवरचा "तमाशा" हा कलाप्रकारच गर्दीत बसुन बघता येतो Wink
बाकी कलाप्रकार बघायला शान्तता, बराचसा एकाकीपणाच हवा अस्तो तद्रुप व्हायला!
असो, मी ऐकुन आहे, गेलो नाहीये कधी!
इत्क्या लाम्ब जाण्यापेक्षा यन्दा मात्र चतुश्रुन्गीच्या जत्रेत जाईनच असे म्हणतो! Proud

मी अजून कधी पाहिला नाही काला घोडा मोहोत्सव...
पण गेल्या वर्षी एक मैत्रिण एक्झॅक्टली हेच म्हणाली होती... की आजकाल तिकडे फक्त मेळा असतो...
तरीपण पुढल्या वर्षी जर भारतात असलो तर नक्की जाणार आहे...

बाकी नी तुझ्या लेखामुळे कितपत अपेक्षा ठेऊन जायचं हे ठरवायला मदत होईल...

विकडे ला जा. कदाचित टोकाचा अपेक्षाभंग होणार नाही. निदान मेळा होण्याच्या आधी काय असू शकेल याची कल्पना येण्याइतके तरी अवशेष दिसतील कला महोत्सवाचे.

माझ्या अनुभुतीप्रमाणे फक्त गावच्या चावडीवरचा "तमाशा" हा कलाप्रकारच गर्दीत बसुन बघता येतो

कैच्या कै....
नाटके, गाण्याच्या मैफली, कविसम्मेलन , ऑर्केस्ट्रा हे कलाप्रकार काय एकेकट्याना पहातात्/ऐकतात काय?

यावेळचा काळा घोडा महोत्सव मी घाईगर्दीत पाहिला ! पण यावेळचा तितका पसंत नाही पडला..
"सेव एनिमल्स" ची संकल्पना होती खरी.. पण तीन चार पुतळेच ठेवले होते.. त्यात पण सगळे (त्यात मी सुद्धा आलो) त्या खोट्या प्राण्यांबरोबर फोटो काढुन घेत होते.. पण तिथेच एक छान मेसेज (when you go global, Respect some boundries..) असलेला पोस्टर मात्र दुर्लक्षित होता.. Sad

बाकी गर्दी म्हणाल तर होणारच.. कारण मुंबईकरांना नेहमीच्या जत्रेपेक्षा इथे वेगळे दिसते.. मग ते फिरंगी लोक्स असो वा चकचकीत स्टॉल्स असो वा ! Proud

बाकी ती घंटा खालुन अशी नजरेस पडत होती..

IMG_1830.JPG

बाकी गर्दी म्हणाल तर होणारच.. कारण मुंबईकरांना नेहमीच्या जत्रेपेक्षा इथे वेगळे दिसते.. <<
वेगळेपण फारसे होते कुठे? आलेली गर्दीही वेगळेपणासाठी आल्यासारखे वाटले नाही. गर्दी व्हायला काहीच हरकत नाही. जत्रेच्याच अपेक्षेने आलेली गर्दी आणि त्यांच्याच केवळ अपेक्षा पूर्ण होणे याबद्दल नाराजी आहे.

असो!

च्येंबाट गर्दी होती हे खरं...कैच्याकैच गर्दी! Sad

हाय-फाय क्राऊडच जास्त! खास "तो" क्राऊड पहायला, डोळे शेकायला येणारेही भरपूर! Happy (शिंचं कबूल कोणी करणार नाही! )

वस्तू परचण्ड महाग! व्हॅलेण्टाईनचा शिजन होता. एका ष्टालात एक लालचुटुक, बरोब्बर मध्यभागी डब्बल बदाम कोरलेली (आंघोळीच्या) साबणाची होममेड वडी दिसली. च्या मारी....साडे तीनशे रुपये???? त्यापेक्षा पारोसं राहू "आम्ही"! Happy

पण यंदा उर्सात फोटोग्राफीचं प्रदर्शन मात्र अप्रतिम होतं. केवळ लाजवाब!!

चिल्ड्रन्स फेस्टिव्हल नावाचा उपक्रमही स्तुत्य होता!

असो!

क.लो.अ.

तुमचाच..
नाथा

खूप छान लिहिलयस. काळा घोडा फेस्ट उद्या सुरू होतो आहे तर मी जाईन म्हणते. प्रथमच जाईन. आम्ही हौशे नवशे गवशे टायपातले. त्यामुळे तिथे किती आणि काय आस्वाद घेता येईल माहित नाही. पण त्यातून काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण फार अपेक्षा ठेवून जाऊ नये हे मात्र लक्षात आले.

बाकी आठवड्याच्या मधल्या दिवसात जमले तर कदाचित शिकण्यात जास्त भर पडेल. तिथे काही कला शिकवणारे किंवा तिथल्या तिथे करून घेणारे काही स्टॉल्स किंवा वर्ग असतात का? तर खूप बरे होईल, रूक्ष आयुष्यात थोडासा कलेच्या आनंदाचा शिडकावा.

Pages