वारी - भाग ५

Submitted by टवणे सर on 28 July, 2008 - 12:20

दादा आणि बाबांना मागे सोडल्यावर मी पंधरा मिनीटातच खेडकर मळ्यावर पोचलो. खेडकर मळा म्हणजे एमआयडीसीमध्ये फॅक्टरी असलेल्या खेडकरांची द्राक्षाची बाग. त्यांच ह्या मळ्यात एक मोठं घर होतं. पंढरपूर रस्त्याला लागून बागेचं भलं मोठं गेट होतं. मळ्यातलं घर रस्त्याच्या बाजुलाच होतं. द्राक्षाचे मांडव घराच्या मागे सुरु होत होते. घर आणि रस्त्याच्या मधे भली थोरली फुलांची बाग होती. आणि मोठं लॉन पण. आमच्या वर्गातल्या अमल्या खाडेच्या घरचे आणि खेडकरांच्या घरचे एकमेकांना ओळखायचे. त्यामुळे अमल्या ह्या मळ्यातल्या घरात कितीदातरी आला होता. अमल्यानं मला सांगितलं होतं की ह्या घरात मागं एक स्विमिंग पूल पण आहे. मी आजवर एकदा पण स्विमिंग पूल मध्ये पोहलो नव्हतो. खरंतर, आमच्या पाचवीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात नगरपालिकेच्या मुख्य जबाबदार्‍यांमध्ये, 'जलतरण तलाव बांधणे व त्याची देखरेख करणे' असे लिहिले होते. पण आमच्या नगरपालिकेनं जलतरण तलावच बांधला नव्हता. मी विहीरीत पोहायला शिकलो होतो लहानपणीच. सगळ्यात वरच्या पायरीवरुन मला गट्ट्या पण मारता यायचा. माझ्या कानात पाणी जाउन रात्री कान दुखतो म्हणुन आई मी पोहायला निघालो की शंख करायची. पण मला पोहायला जाम आवडायचे. वार्षीक परीक्षा संपली की मी दुसर्‍याच दिवशी पोहायला सुरुवात करायचो. भाऊ होते तोपर्यंत ते मग लगेच माझे केस एकदम बारीक कापून आणायचे.

खेडकर मळ्यात दरवर्षी वारीला जाणार्‍यांसाठी नाष्टा असायचा. खेडकरांनी बागेत मोठं जाजम टाकलं होतं आणि एका कडेला कार्यालयात असतात तसलं लांबडं टेबल लावून त्यावर उप्पीटचं पातेलं आणि चहाचं नळ असलेलं पिंप मांडलं होतं. मी पोचलो तोपर्यंत बर्‍याच जणांनी उप्पीट आणि चहा घेवून नाष्ट्याला सुरुवात केली होती. मी उप्पीटवाल्याच्या समोर गेलो तर त्याने मला एव्हडुसं उप्पीट कागदाच्या डिशमध्ये भरून दिलं. मी त्याला सांगितलं की मी वारीला निघालोय, इथंनं माग नाही जाणार आहे, पंढरपूर पर्यंत जाणार आहे. मग कुठे त्यानं मला डिशभरून उप्पीट आणि कपभर चहा दिला. मी काका कुठे दिसताहेत ते बघु लागलो. तर काका, बापू चिवट्यांबरोबर, सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीला रेलून चहा पीत बसले होते. मी काकांच्या शेजारी जाउन बसलो. मला बघुन काका एकदम म्हणाले,
'अरे तू एव्हड्या लांबवर आलास काय ह्यावेळी. बर परत जाताना नीट रस्त्याच्या कडे-कडेनी जा. उगाच रस्त्याच्या मधे चालु नकोस.' आणि मग बापूंकडे वळुन म्हणाले, 'हे ट्रकवाले बेकार गाड्या चालवतात रे'.
पण मी छाती फुगवून काकांना म्हणालो, 'परत नाही जाणार आहे मी. ह्यावेळी तुमच्याबरोबर पंढरपूर पर्यंत येणार आहे. चालत. शेवटपर्यंत.' काकांनी माझ्याकडं एक सेकंद बघितलं आणि बापूकडे वळून बघत जोरजोरात हसायला लागले. मग माझ्या पाठीवर थाप मारुन म्हणाले,
'वारीला येणार? चल.'

मी, काका आणि बापू एकदमच मळ्यातून बाहेर पडलो. मळ्यापर्यंतचा रस्ता मला माहितीचा होता कारण कधी कधी मी आणि भाऊ इथपर्यंत आलो होतो. इथुन पुढे मात्र मी पहिल्यांदाच निघालो होतो. काकांनी मफलर कमरेला गुंडाळला आणि 'जय जय रामकृष्ण हरी' च्या तालावर लांब लांब ढांगा टाकत चालायला सुरुवात केली. बापू काकांपेक्षा चांगलेच बुटके होते. त्यामुळे पाच पावलं चालत, पाच पावलं पळत असं ते काकांच्या बरोबरीने पुढे निघाले. मी मात्र पायातल्या स्लीपर हातात अडकवून, अनवाणी, माझ्या वेगाने चालायला सुरुवात केली. पहिलं वळण ओलांडेपर्यंत मागे टाळ आणि भजनाचे आवाज ऐकु आले. दिंडी मळ्यात पोचली होती.

सकाळची नउची वेळ झाली होती. इथुन पुढं आता कुणी एकटा चाललेला, कुणी तिघा-चौघांच्या घोळक्यात चाललेले दिसत होते. सगळ्यांनी आपला एक वेग पकडला होता. बायका मात्र पाच-सहाच्या घोळक्यात चालत होत्या. मी नेहेमी विचार करायचो की मी वारीला निघाल्यावर मोठी-म्हातारी लोकं माझ्या पाया पडतील. पण मी वारीला जायचं ठरवलं तेच मुळी फाट्याशी आल्यावर. तोपर्यंत वारीला पोचवायला आलेले सगळे मागे निघुन गेले होते. आता उरलेले सगळेच पंढरपूरला निघाले होते त्यामुळे कुणीच वाकून मला नमस्कार केला नव्हता. त्यामुळे मला जरा वाईट वाटलं. पण मग मी खिशातनं बॉल काढून बॉलिंगची ऍक्शन करत पुढे निघालो. सूर्य चांगल्यापैकी वर चढला असला तरी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्ठाली वडाची झाडं असल्यामुळं उन अजिबात लागत नव्हतं. दोन्ही बाजुला शेतात पिक चांगलं तरारलं होतं. बहुतेक करुन सगळ्यांनी उस लावला होता. अधुन मधुन एखादा शाळुचा पट्टा दिसत होता.

पहिल्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाचा मुक्काम भोश्याच्या ओढ्याला असायचा. मिरजेपासून एकोणीस किलोमीटर. म्हणजे अजुन साधारण बारा किलोमीटर उरले होते. मी डोक्यात भाऊंनी सांगितलेले रोजचे जेवणाचे आणि रात्रीचे मुक्काम घोळवत होतो.
पहिला जेवणाचा मुक्काम - भोश्याचा ओढा.
पहिला रात्रीचा मुक्काम - लांडगेवाडी.
दुसरा जेवणाचा मुक्काम - घोरपडी नाला.
दुसरा रात्रीचा मुक्काम - जुनोनी.
तिसरा जेवणाचा मुक्काम - वाटुंबरे.
तिसरा रात्रीचा मुक्काम - सांगोले.
चौथा जेवणाचा मुक्काम काही केल्या लक्षात येत नव्हता. कुठलातरी मळा की वाडी होते. पण चौथ्या दिवशी संध्याकाळी मात्र पंढरपूर गाठायचं आणि विठोबाचं दर्शन घेवून परत. असा विचार करता करता मी कळंबीला पोचलो. कळंबी १० किमी असा मैलाचा दगड तासगाव वेशीच्या मारुतीच्या बाहेर होता. त्यामुळे मिरजेतून बाहेर पडले की पहिले गाव कळंबी हे माझ्या डोक्यात पक्क होतं. पण आजवर मी कळंबी कधी बघितलं नव्हतं. एका कोरड्या ओढ्यावरच्या बारक्या पूलापासून गाव सुरु झालं. पुलाच्या खाली स्मशानाची पत्र्याची शेड आणि कट्टा होता. मग थोडं पुढे डाव्या हाताला एक प्राथमिक शाळा, तिचं छोटसं मैदान, मग थोडी दुकानं, एक डेअरी, ग्रामपंचायतीची इमारत, एसटीच्या थांब्याची शेड आणि पाचच मिनीटात मी कळंबी ओलांडलं. गावाच्या शेवटी एक पाण्याची टाकी होती. पण आमच्या मिरजेतल्या पाण्याच्या टाकीपेक्षा खूपच छोटी. दोन-तीन चहाच्या खोक्यांबाहेर असलेल्या बाकड्यांवर काही वारकरी चहा पीत बसले होते.

पाण्याची टाकी ओलाडल्यावर थोडं पुढे रस्ता डावीकडे वळला आणि एक छोटासा उतार लागला. आता सूर्य बरोबर समोर होता. रस्त्याच्या उजव्या हाताला समांतर अशी दंडोबाची रांग सुरु झाली होती. दूर क्षितीजापर्यंत उजव्या हाताला रांगच दिसत होती. मी होतो तिथे डोंगराची उंची फार नव्हती. पण रांग हळुहळु चढत चढत जात, दूरवर मध्यभागी, सगळ्यात उंचावर एक मनोरा आणि त्यावर अगदी छोटासा झेंडा दिसत होता. भाऊंनी मला दंडोबाच्या डोंगरावरच्या त्या मनोर्‍याबद्दल सांगितलं होतं की तो मनोरा बरोबर दंडोबाच्या गुहेवर आहे. गुहेत आत शंकराची पिंड आहे आणि प्रदक्षिणेचा मार्ग अगदी चिंचोळा आहे आणि त्यात डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एव्हडा अंधार आहे. मी अजुन पर्यंत कधी वर डोंगरावर गेलो नव्हतो. पण आता वारीहून परत आलो की एकदा जायचं मी डोक्यात पक्क केलं.

दंडोबाच्या डोंगरावर जायची कल्पना माझ्या डोक्यात लहानपणापासून भाऊंनी सोडलेली. शाळेत असताना मी आजी-भाउंबरोबर गावातल्या वाड्यातल्या घरात राहायचो. आई, बाबा आणि ताई बंगल्यावर राहायचे. पण बंगला गावाबाहेर असल्याने मला शाळेला यायला-जायला खूप लांब पडायचं. आणि म्हणुन मी गावात आजी-भाऊंबरोबर.

रोज सकाळी पावणेपाच-पाच वाजता भाऊ मला उठवायचे आणि दात घासुन तालमीत पिटाळायचे. तिथं मल्लखांब करुन मी घरी परतेपर्यंत ते फिरुन परत आलेले असायचे. हमखास ओट्याशी उभं राहुन दुध गरम करत, जोर-जोरात हरीपाठ म्हणत असायचे.
'हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी!'
मला खरं तर गरम दुधाची चव अजिबात आवडायची नाही. पण तरीही दुध पिउन, आवरुन, मी सकाळच्या शाळेला पळायचो. एकदा मी तसाच दुध न पीता शाळेला गेलो तर, मधल्या सुट्टीत भाऊ एका पिवळ्या झाकणाच्या काचेच्या बरणीत दुध भरुन घेउन आले. मला अस्सा राग आलेला. पण ते सगळं दूध त्यांनी मला प्यायला लावलं.

संध्याकाळी आजी-भाऊ रमी खेळायचे. काय वाट्टेल तशी रमी चालायची. आजीचा एक-एक सिक्वेन्स सहा-सात पानांचा असायचा. पण भाऊ आपले काही न बोलता, मिश्किल हसत, रमी खेळत बसायचे. मग थोड्यावेळाने दूरदर्शनवर मराठी सिरिअल्स सुरू व्हायच्या. आमच्याकडं असलेला ब्लॅकनव्हाइट टीव्ही हा आत्यानं नवीन कलर टीव्ही घेतला म्हणुन देवून टाकलेला. त्यात मुंग्याच जास्ती दिसायच्या. इतक्या जास्त की कधी क्रिकेटची मॅच असली की बॉल पण दिसायचा नाही त्या मुंग्यांमध्ये. मग अधुन मधुन भाऊ मला शेजारच्या जोश्यांकडे स्कोअर बघायला पिटाळायचे. ह्या त्यांच्या टीव्ही, रमी कार्यक्रमांमध्ये मी कायम त्यांच्या मांडीवर लोळत असायचो. कधीमधी जर आत्या आलेली असेल, तर सारखं मला हाड्-हाड करायची. म्हणायची, 'बघ कसा मांजरासारखा चिकटलेला असतो भाऊंना नेहेमी'.

पण मला त्यांच्या मांडीवर लोळायला आवडायचे. त्यांच्या चेहर्‍यावर एकदम मऊमऊ सुरकुत्या होत्या. आणि ते मला कधी कधी थापटायचे तेव्हा त्यांच्या हातालासुद्धा एक प्रेमळ वास यायचा. खरतरं, त्या वाड्यातल्या प्रत्येक वस्तुलाच एक वेगळा स्वतंत्र वास होता. वरच्या खोलीतल्या शहाबादी फरश्यांचा वास, जिन्याच्या लाकडी कुसं हातात घुसणार्‍या दांडक्याचा वास, मोरीतल्या पितळी तांब्याचा वास, ओट्यावर असलेल्या खिडकीच्या लोखंडी जाळीला येणारा फोडणी आणि घट्ट धुळीचा एकत्र वास. अगदी बाहेरच्या लोखंडी कडीलासुद्धा एक जुना, बळकट वास होता.

सुट्टीच्या दिवशी मी भाऊंबरोबर फिरायला जायचो. पंढरपूर रोडला पोचलो की दूरवर दिसणारी डोंगररांग दाखवून म्हणायचे, 'तो बघ दंडोबाचा डोंगर. एकदा घेऊन जाईन मी तुला दंडोबावर.' मग मी भाऊंना दंडोबाबद्दल खूप काय काय विचारायचो. काय आहे तिथे वरती, कोण राहतं, वाघ आहे का, कसं जायचं तिथपर्यंत. आणि भाऊंकडे सगळ्या प्रश्णांची उत्तरं असायची.

चौथीत जाईपर्यंत हळुहळु करत दंडोबाच्या डोंगरावर कसं जायचं ह्याची योजना माझ्या डोक्यात पक्की झाली होती. पायथ्याच्या गावापर्यंत सायकलने जायचे आणि गावात सायकल लावुन, डोंगराच्या टोकाकडे चढायला सुरुवात करायची. बरोबर खाण्याचा डबा, डब्यात पोळी आणि बटाट्याची सुकी भाजी, वॉटरबॅग, काकांचा मोठा टॉर्च, टोपी, मोठ्ठा रुमाल, दोरी आणि सायकलचा पंप. आता पंप सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत्या. पण कोपर्‍यावरच्या इर्षाद सायकलवाल्याकडे दोन पंप होते. त्यामुळे त्याने एक नक्की दिला असता.

चौथीची परीक्षा संपली होती. एके दिवशी सकाळी क्रिकेटची मॅच खेळून झाल्यावर, महश्या कुलकर्णी, बारका पश्या, काळा पश्या आणि सुन्या खैरमोडेला, माझा प्लॅन सांगितला. महश्या आणि बारका-काळा पश्या, ह्यांच्याकडं वडलांच्या सायकली होत्या. माझ्याकडे एक माझी स्वःताची बारकी सायकल होती. सुन्याला त्याच्या बाबानी सायकल तर दिली नसतीच, वर तंगडं मोडलं असतं. पण सुन्यानं घरातल्या दुकानच्या गल्ल्यातून अधुन मधुन थोडे थोडे पैसे हाणुन थोडेफार जमवले होते. त्या पैशातून दिवसभरासाठी भाड्याची सायकल घेता आली असती. आता काय-काय घ्यायचं आहे ते परत एकदा चौघांना सांगून दुसर्‍या दिवशी सकाळी आमच्या वाड्यासमोर सहा वाजता जमायचे ठरले.

मी दुपारी जेवताना भाऊंना सगळा प्लॅन सांगितला. अगदी इर्षादकडून पंप घेणार आहे हे पण सांगितले. पण ऐकून, भाऊ एकदम विचारात पडले. मला वाटलं हे ऐनवेळी नाही म्हणणार. तेव्हड्यात ते म्हणाले, 'पण तुला रस्ता कसा सापडणार?' मी म्हटलं, 'हात्तीच्या! त्यात काय!! सरळ वाड्यातनं बाहेर पडायचं, मालगांव वेशीतून पटवर्धनांच्या वाड्याच्या बाजुने पुढे जायचं. मग तासगांव वेशीचा मारुती आला की पंढरपूर रोड वरुन सरळ दंडोबाचा पायथा येइपर्यंत सायकल चालवायची. एकदा का पायथा आला की मग चढायला सुरुवात.'

'ते बरोबर आहे रे.', भाऊ म्हणाले. 'पण डोंगरावर दाट जाळ्या आहेत. भरपूर पायवाटा आहेत. त्यातली एकच पायवाट वरपर्यंत जाते. जर का ती चुकली, तर मग माणुस गोल गोल फिरत राहतो तिथल्या तिथेच. आता वर जायची वाट माहिती असल्याशिवाय कसा जाणार तू?'
आता मात्र मी रडवेला झालो. इतके दिवस दंडोबाबद्दल सगळं ऐकत होतो. पण आज जायच्या आदल्या दिवशीच ह्या पायवाटा आणि चोरवाटा कुठुन उपटल्या. पण मग भाऊच म्हणाले, 'वरच्या गल्लीतल्या हरबाकडे, दंडोबाकडच्या एका गावातला दूधवाला येतो. तो आहे का ते बघुन येतो. आला असेल तर सांगतो त्याला, की उद्या ह्या पोरांना घेवून जा दंडोबावर. काय?' आणि चपला पायात सारुन भाऊ घराबाहेर पडले.

आता हरबाच्या घरात एक म्हैस होती खरी. पण त्याच्याकडं कुणी दुधवाला येतो हे काय मी कधी ऐकले नव्हते. पण भाऊ एव्हड्या दुपारचे गेले होते म्हणजे येत असेल बाबा कुणीतरी. थोड्यावेळाने ते परतले. उन्हातुन आल्यामुळे त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता.

'चार दिवस झाले, तो हरबाचा दुधवाला काही आला नाहीये रे. बहुतेक आजारी पडला असावा. एकदा का तो आला की मी लावुन देतो तुम्हाला त्याच्या बरोबर.'

मी भाऊंवर चिडलोच एकदम. एकतर एव्हडा सगळा प्लॅन केलेला. परत उद्या महश्या, दोन्ही पश्या आणि सुन्या येणार सकाळी, सगळ्या तयारीत. आणि माझा पचका. मी भयानक चिडून तालमीच्या ग्राउंडवर गेलो. दुपारच्या रटरटत्या उन्हात, ग्राउंडवर गाढवं सोडून, काळं कुत्रंपण नव्हतं. मी कवठाच्या झाडाखाली जाउन बसलो. खुप चिडल्यामुळे कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. वाटत होतं की आता धूर निघेल कानातून. मग मी खूप वेळ गुढघ्यात डोकं खुपसून रडत बसलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी महश्या, पश्या, सुन्या, कुणीच आले नाहीत.

सुट्टी संपली. शाळा सुरु झाली. ऑगस्टमध्ये भाउ आणि त्यांच्या सकाळच्या फिरण्याच्या ग्रुप मधले, चिवटे अण्णा, बर्वे मास्तर, तात्या काका आणि मी, असे पाच जण आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी पंढरपूरला गेलो. भाउंनी मला वारी, ज्ञानदेव-तुकारामांच्या पालख्या, रिंगण, बाजीरावाची विहीर, विठोबाचं देउळ, असं सगळं दाखवलं. पण मुख्य म्हणजे, येताना आणि जाताना बसमधून दंडोबाचा मनोरा दाखवला. आणि म्हणाले, 'मी तुला एकदा दंडोबावर घेउन येइन नक्की.'

पुढे एक-दोन वर्षे गेली पण भाऊ मला दंडोबावर घेउन काय गेले नाहीत. मागच्या वर्षी दिवाळीची सुट्टी संपून नुकतीच शाळा सुरु झाली होती. सकाळी थंडी असायची. प्रार्थना सुरु व्हायच्या आधी आम्ही काही मुलं थोडा वेळ कबड्डी खेळायचो. त्या दिवशी, सकाळी कबड्डी खेळताना, शिवणीवर चड्डी फाटली. एका हातानं तशीच चड्डी पकडून प्रार्थना आणि जनगणमन संपवलं. वर्गात पोचलो तर वर्गशिक्षक म्हणाले, 'दप्तर आवरुन बाहेर पळ. तुझी आई आली आहे तुला घरी घेउन जायला.'
मला कळेना की आईला कसे कळले की माझी चड्डी फाटली आहे ते. बाहेर गेटपाशी, आई रिक्षामध्ये बसली होती.

वाड्याच्या दारात रिक्षा आल्यावर, एका हाताने चड्डी पकडून मी आत धाव ठोकली. आज सुट्टी, त्यामुळे दिवसभर नुसतं खेळायचं. आत आलो आणि.
खालच्या खोलीत जमिनीवर भाऊ झोपलेले होते. त्यांच्या नाकात कापुस घातला होता. आणि गळ्यात हार. शेजारी आजी रडत होती.

भाऊंना जाउनसुद्धा वर्ष होवून गेलं होतं. भाऊ तेरा तारखेला गेले. ते गेल्यावर मला वाटलं की प्रत्येक तेरा तारखेला मला त्यांची आठवण येउन मी रडेन. पहिले एक-दोन महिने मला तेरा तारीख लक्षात राहिली. पण मग तेरा तारीख ओलांडून गेल्यावर एक-दोन दिवसांनी मला आठवायचे आणि मग वाईट वाटायचे. आतातर मला भाऊंचा चेहरा पण डोळ्यासमोर येत नव्हता. पण एखादा प्रसंग आठवला की चेहरा आठवायचा. नुसता चेहरा आठवायचा प्रयत्न केला तर काहीच डोळ्यासमोर यायचे नाही.

विचारांच्या तंद्रीत मी बराच पल्ला गाठला. आता उजव्या हाताला टेकाडावर सिध्देश्वराच्या दगडाच्या खाणी होत्या. दगडांच्या क्रशरचा आणि पट्ट्याचा मोठा आवाज येत होता. डाव्या बाजूला नुसताच माळ होता. रस्त्यावर झाडी अजिबात नव्हती आणि रस्ता चांगलाच तापला होता. मी हातात अडकवलेल्या स्लीपर काढुन पायात घातल्या. आजुबाजुला वारीला निघालेलं कुणीच दिसत नव्हतं. थोडं पुढे भोशे गावाची सिमेंटची कमान लागली. उन्हानं माझा चेहरा लाल झाला होता आणि घामाच्या धारा लागल्या होत्या. पाय मात्र अजिबात दुखत नव्हते. कमानीच्या थोडं पुढे रस्त्याला लागून एक एसटीच्या थांब्याची शेड होती. त्या शेडच्या भिंतीला टेकून एक चहाचं खोकं होतं. मी पाणी मिळेल म्हणुन रस्ता ओलांडून टपरीकडे गेलो. टपरीत आत, गोरा गोमटा, जरासा जाड असा साधारण तिशीच्या आसपासचा एक जण हुश्श् हुश्श् करत, एका मोठ्या पंचाने वारा घेत बसला होता. त्याच्या गळ्यात कोलगेट-पामोलिव्ह असं मोठ्या अक्षरात लिहिलेली कापडी पिशवी होती. त्यानं मला विचारलं,
'तू पण मिरजेहून निघाला आहेस ना वारीबरोबर?'
मी नुसतीच मान डोलावली.
'अरे बारक्या, आणखी एक कप चहा टाक रे' असं चहावाल्याला म्हणुन तो माझ्याकडे वळला आणि शेकहँड करायला त्यानं हात पुढे केला.
'धनंजय वाटवे. डोंबिवली'.
आजवर पहिल्यांदाच कुणीतरी मला असं शेकहँड करत होतं. मी पण माझा हात पुढे करुन शेकहँड केला आणि पिंपात ग्लास बुडवून एक ग्लास पाणी घटाघटा प्यायलो. मग त्यानच परत विचारलं, 'तुझं नाव काय?'.
मी सांगितलं. कितवीत आहे आणि कुठल्या शाळेत जातो ते पण सांगितलं. तो म्हणाला की तो पण आमच्याच शाळेत दहावीपर्यंत होता. मग पुढे बीकॉम करुन मुंबईला गेला. तो मिरजेत असताना मराठे बोळात राहायचा. आमच्या शाळेचे, नाकात बोलणारे उपमुख्याध्यापक वाटवे सर, त्याचे काका. मी मनात म्हटलं की बरं झालं ह्याला सांगितलं नाही की आम्ही त्यांना काय म्हणतो ते. आता तो कोलगेटमध्ये सेल्समन होता आणि गेली आठ वर्षे डोंबिवलीमध्ये राहत होता. बरेच दिवसांपासून वारीला जायचं, वारीला जायचं असं त्याच्या डोक्यात होतं. मग ह्यावर्षी मात्र जायचंच असं नक्की करुन त्याने रजा टाकली आणि तो आला होता.

मग आम्ही दोघांनी चहा प्यायला. चहा संपवून, डोक्यावर टोपी चढवत तो म्हणाला, 'चलो. आता दोन-तीन किलोमीटरच उरलेत भोश्याच्या ओढ्याला.' आणि आम्ही दोघे निघालो. तो सांगत होता की की मुंबईमध्ये गेल्यावर त्याने पहिली दोन वर्षं कसं इकडे तिकडे नोकरी केली वगैरे वगैरे. मध्येच मी त्याला विचारले की तो मुंबईमध्ये नोकरी करत होता तर डोंबिवलीला का गेला. तर तो म्हणाला, 'शहाणा आहेस. डोंबिवली म्हणजे पण मुंबईच.' तेव्हड्यात रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या घारीने, शेपटीमागचा भाग आणि पंख थोडासा उचलला आणि शू केली. मी आणि धनंजय, दोघांनी एकदमच ते बघितलं. धनंजय म्हणाला,
'आयला. ते बघ. घार कशी, माणुस पादतान एक कुल्ला वर उचलून पादतो, तशी पंख वर करून मुतली.'

खरंतर, मी एखाद्या पक्ष्याला शू करताना पहिल्यांदाच बघत होतो. पण त्यापेक्षाही कुणीतरी मोठा माणुस, माझ्याशी पादणे, मुतणे अश्या भाषेत बोलत होता. त्यामुळे मला एकदम भारी वाटलं. हा धनंजय मोठा असूनदेखील एकदम मित्रांसारखं बोलत होता. मी पण मग मोठ्या माणसारखा, मागे हात बांधून त्याच्या बरोबर चालू लागलो.

गुलमोहर: 

किती गोड, निरागसपणे लिहिलं आहेस, खरंच एखादा १०-१२ वर्षाचा मुलगा जसा लिहील तसंच.. फ्लो सुपर्ब! मागचा भाग लिहून इतके दिवस झाल्यानंतरही कुठेही तुटक झाले नाही! आवडले.
'दंडोबाची सायकलवरून सहल' हा भाग या आधी सुट्टा वाचल्यासारखा वाटतोय..
------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
Proud

टण्या, याची 'लेखमालिका' करता येईल का असे ऍडमिनना विचार ना. तसे झाले की सगळे भाग एकाच ठिकाणी होतील.

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal

    भाग १ ते ४ ला प्रत्येक भागाखाली ऍडमिननी पुढच्या व मागच्या भागाची लिंक दिलेली आहे.. ह्या भागाच्या खाली मीच मागच्या भागाची लिंक टाकली आहे..

    टण्या तुझ्या लेखनशैलीमुळे मागचे सगळे भाग अजुनही लक्षात राहीलेत, त्यामुळे एकदम छान लिंक लागते हा भाग वाचतांना. दंडोबाचा भाग ओळखीचा वाटला.
    पुढचा भाग लवकर टाक. तुला प्रोजेक्ट सारखीच डेड्लाईन द्यायला पाहिजे इथेपण Happy

    शंतनू,
    आज सगळे भाग वाचून काढले.
    खूप मस्त लिहिलं आहेस. एकदम सहीच..

    ह्म्म्म्म.. ती दंडोबाची कथा ही माझी ओड्डल कथा होती Happy

    खुप छान चालली आहे वारी. थोडे लवकर लवकर पुढचे भाग टाका Happy
    .
    वरच्या गल्लीतल्या हरबाकडे, दंडोबाकडच्या एका गावातला दूधवाला येतो. तो आहे का ते बघुन येतो.>> किती लाडका आहे ना आजोबांचा. तुला खरेच इतके लाड पुरवणारे आजोबा होते ?

    टण्या मस्तच रे.भाषेची जादू काय असते ते अशा लेखनातून कळतं.
    >> मी पण मग मोठ्या माणसारखा, मागे हात बांधून त्याच्या बरोबर चालू लागलो.
    काय गोड कार्टं आहे! आणि किती ओळखीचं...
    यातली मोठी माणसंही किती जवळची वाटतायत.आपण लहान असतानाची जी मोठ्या माणसांची इमेज होती अगदी तश्शी.
    लिही लिही..

    ग्रेट लिहितोस रे. हा पिल्लू नायक अगदी अस्सा डोळ्यांसमोर उभा राहतो. वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणे, तुझ्या शैलीमुळे कथेच्या भागांत बर्‍याच दिवसांची गॅप गेल्याचंही कळलं नाही..
    पण याचा अर्थ, एका भागासाठी कितीही दिवस घेण्याचं लायसन तुला मिळालं असा घेऊ नकोस बरं..
    ***
    शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन, शब्दें वाटू धन जनलोकां..

    शंतनु, मस्त चाललिये वारी.. लवकर पुढे सरकु दे आता.. तुझी लेखनशैली भन्नाट आहे आणि व्यक्तिचित्रण ही.. अगदी त्या वयात परत शिरल्यासारखं वाटतं..

    काय सुरेख लिहीतोस रे तू. ते जुन्या काळी किशोर कुमार इ. चे दिवाळी अंक निघायचे ना त्यातली एखादी गोष्ट वाचतेय असच वाटतय.

    छान लिहिलयस रे. आवडलं .......... Happy

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
      चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

      टण्या, अरे काय जबरी लिहितोस.
      सगळे भाग वाचलेयत आधी. हाही मस्त.
      पण लौकर लौकर लिही ना बाबा. Happy
      ~~~~~~~~~~~~~~~~~~~
      'माता' रिटर्न्स.

      शंतनू,
      मस्त लिहीतोयस. पण मधे मधे इतकी गॅप नको रे बाबा. Happy

      जबरदस्त मज्जा येतेय गोष्ट वाचताना....लवकर येऊ देत पुढचे भाग....:)

      (माझा कालचा प्रतिसाद गायबला?).
      शंतनू, सुंदर लिहितोयस. मी परत एकदा सगळे भाग काल वाचले. त्या वयाचं बेअरिंग इतकं सुर्रेख जमलय आणि महत्वाचं म्हणजे कायम राहिलय की बोलून सोय नाही...
      स्वाती म्हणतेय तसं भरभर लिही रे... अगदी एक-टंकी म्हणत नाही पण उत्सुकता ताणून तुटायची वेळ आली Happy

      टण्या छान लिहीतो आहेस. पण मधे खंड पडू देउ नकोस मित्रा. लिहीत रहा.

      सर्वांचे पुनःश्च आभार.. तुमच्या प्रतिक्रियांमुळेही लिहायला हुरुप येतो.. कामातून वेळ मिळेल तसा लिहितोच आहे.. होतं काय, की मी आधी वहीमध्ये लिहितो.. मग टाइपतो.. मग परत त्याच्यात फेरबदल करतो.. त्यामुळे वेळ लागतो.. पण जमेल तितके लवकर लिहीनच..

      भाग ५ मध्ये मी आधी (जुन्या हितगुजवर) लिहिलेली दंडोबा ही कथा जवळपास तशीच्या तशी आली आहे.. काहींना ही फीलर सारखी वाटेल.. म्हणुन थोडीशी पार्श्वभूमी..
      मी वारी लिहायला घेतली होती इंग्रजीमध्ये जवळपास दोन-अडीच वर्षांपूर्वी.. पण मग पालखीला पॅलेंक्वीन, उदबत्तीला इन्सेन्स स्टिक आणि पणतीला अर्दन लॅम्प असे शब्द वापरायला लागल्याने मी तो नाद सोडून दिला.. पण जे काही थोडंफार लिहिलं होतं त्यात दंडोबाच्या कथेचं बीज होतं.. मग पुढे मी दंडोबा ही स्वतंत्र कथा लिहिली पण कथेचे बीज वारीमध्ये असल्याने तशीच्या तशी ती ह्यामध्ये घेतली.. जर स्वतंत्र वाचले तर ही कथा जास्त प्रभावी वाटते असे माझे मत आहे (आणि ही तशीच्या तशी घेवून मी चूक केली आहे असेही माझे मत आहे).. ज्यांनी ती कथा स्वतंत्र वाचली होती आणि ज्यांनी नाही वाचलेली, अश्या दोन्ही बाजूंची मते वाचायला मला आवडेल..

      टण्या,
      तुझी दंडोबा ही कथा मी वाचली आहे पूर्वी. हा भाग वाचताना ते सगळं मधे आल्यावर 'हे काय' असं वाटलं. पण ते ती कथा पूर्वी वाचली होती म्हणून. ती कथा स्वतंत्रपणे प्रभावी होतीच. पण इथेही ती फीलर सारखी वाटत नाही. हा भाग पुन्हा वाचल्यावर ती इथे चपखल बसली आहे असे मला वाटते.
      मला लिहीण्याचा काही अनुभव नाही आणि फार कळतही नाही. पण चांगलं वाचायला मात्र आवडतं.
      आता लवकर पुढचा भाग लिही. आम्ही आधाशासारखी वाट बघतो आहोत.

      दंडोबा ची कथा मी वाचली नव्हती, पण यात वाचताना मला तरी फार खटकली नाही. बाकी मस्त चालू आहे, पुढचा भाग कधी ?

      टण्या, तुझा दंडोबा आधी वाचला होता व खुप आवडला ही होता. आता तो वारीत आला असला तरी तो पॅच वाटत नाहिये उलट मला वाटले तू वारीतला हा भाग वेगळा टाकला होतास Happy मस्तच लिहितोयस तू, इतके की हे सर्व खरेच घडले होते व तू जस्ट आमच्याशी शेअर करतोयस.

      interesting! एकदम. वाचताना एकदम चित्रच उभे रहाते. एक लहान मुलगा जो फक्त त्याच्या विश्वात जगु पहातो. बर्‍यापैकी ढगाळ शर्ट, खाकी चड्डी,डोळ्यात एक वेगळे स्वप्न... असा काहीसा नायक आहे ना हा.
      मला वाटते बहुतेक लहान मुलाना घरापासून लांब जायचे असते. मलाही लहानपणी जरा जरी कोणी ओरडले तर मी हे घर सोडून जाणार असा ताबोडतोब निर्णय घ्यायची. तो सफल व्हायचा नाही ते वेगळे. Happy

      असो, ती दंडोबाची कथा कुठेय?

      मी एका दिवसात सगळे भाग वचले, खूपच मस्त लिहले आहे. फक्त एका दळप शब्दिवरुन कळ्ले कि हा मिरजेकडचा असला पाहिजे. "कळंबीचे वर्नण अगदी हुबेहुब" सही रे.

      वत पाहत आहे पूढच्या भागाची.

      लवकर पूर्ण कर रे वारी - श्रावण सम्पायला आला. किती वाट पहायची?
      आईने नवीन काही ( गद्य ) लिहिलं नाही बरेच दिवसात Sad

      टण्या ....पुढचा भाग केव्हा वाचायला मिळणार आम्हाला...कधी पासुन वाट पाहते...अशी उत्कंठा शिगेला पोहचवुन कुठे निघुन गेलास बाबा...येऊदे लवकर पुढचा भाग...

      Pages