आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.

शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...

गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.

त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.

याच आसपास दुसर्‍या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...

अश्या तर्‍हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.

अजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्‍यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?

या लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर? आणि का?

बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू? ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण?मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.

प्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.

प्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्‍या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.

यानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट न लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्‍याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.

अनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.

आता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.

नाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम परफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.

दुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्‍यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है. --------- अ‍ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- अ‍ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्‍हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू न देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...

- नी

प्रकार: 

चांगली माहिती सांगितलीयेस ग.. स्ट्रगल हा अगदी सगळ्या नावाजलेल्या कलाकारांकडुन एकलेला शब्द आहे.

पण मला जर असली हुक्की कधी आलीच तर मी मात्र तुलाच इमेल करेन Proud

छान लिहिलं आहेस...
काय घडलं असेल तो आख्खा सीन इमॅजिन होतो...

लोकांचे कामाचे आणि प्रशिक्षणाचे अनुभव याबद्दल वाचताना लक बाय चान्स मधली ऑडिशन देणारी लोकं आठवली... "...और इन दो सालोंमे मैने सिर्फ.. एक कमर्शियल किया है..."

चांगली माहिती दिली आहेस नीध. struggle किती करावा लागतो ते कळते.

पण जे लोक तुला थोडयाशा ओळखीवर काम मागतात त्यात काही नवीन नाही Happy .. असे बर्‍याच क्षेत्रात होते, उदा. मला पण अमेरिकेत एक नोकरी मिळवुन दे ना असे म्हणणारे लोक भेटलेत. आता अमेरिकेत नोकरी मिळवणे अवघड नाहीये, पण सोपे पण नाहीये व त्याशिवाय visa वगैरे भानगडी आहेतच. असो, तो विषय वेगळा.
एखाद्या नवीन ठिकाणी शिरायचे तर काय काय करावी लागते ते बर्‍याच जणांना माहीत नसते म्हणुन असे होते. पण त्यांचे काम झाले नाही म्हणुन खलनायक बनवले गेले त्या बद्दल खेद वाटतो. पण तुझ्याकडे इतके छान स्पष्टीकरण आहे ना वर लिहिलेले, तेच का नाही देत?
मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही. >> इथेच उत्तर आले तुझ्याकडुन. Happy

मला पण अमेरिकेत एक नोकरी मिळवुन दे ना असे म्हणणारे लोक भेटलेत.<<
सुनिधी, धन्य गं बाई हे लोक! अमेरिकेत एक नोकरी मिळवून दे... Rofl

नी,

चांगल लिहिलयस... विचारणार होतो काही चांस आहे का ते. पण ह्या भेटीत माझ्या व्यक्टींग स्किल दाखवायच र्हायल... जाउदे पुढच्या येळी Happy

नमस्कार,
मी इयत्ता सातवी (क) मध्ये असताना गॅदरिंग मध्ये 'गड आला पण सिंह गेला' या नाटकात मावळ्याची भूमिका केलेली आहे. आपल्या ओळखीने मला चांस मिळेल का? शक्यतो वामन केंद्रे ( किंवा सत्यदेव दुबे चालतील) यांच्या नाटकात नायकाची भूमिका मिळाल्यास चालेल.

नीधपा, ह्या लेखाच्या खूप प्रिंट आऊट काढून घे.. आणि पुढच्या वेळेस जे भेटायला बोलवतील त्यांना भेटल्या भेटल्या देत जा!
किंवा आधीच ईमेल पाठवून 'भेटण्याआधी वाचून या' म्हणून नोट पाठवत जा.. Wink
बादवे, वरच्या सगळ्यांगत म्या बी कालीजपतूर नाटकात कामं केल्याती.. तुजा लेख भी वाचलाय.. आता द्याल का मला एक डाव चानस?

हे सबबी सांगु नका!

मला जर पिच्चर मधे काम दिले गेले नाही, तर तुमचे चित्रपट अन नाटक महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शीत होउ देणार नाही! Happy

मी पण काम करीन म्हणतो नाटका सिनेमात. Wink
गेला बाजार म्हातारा नायक/खलनायक ,बाप,आजोबा वगैरे वगैरे
नीरजा आपली ओळख आहेच. तेव्हा वशीलाही दांडगा आहेच. कधी येऊ आरशात तोंड दाखवायला..आपलं स्क्रीन टेस्टला? Lol

काम आजवर कधी केलेलं नाहीये...पण रोज उठून तरी आपण काय करतो? नाटकच ना!
कुणीसं म्हटलंय ना...जीवन ही एक रंगभूमी आहे.....वगैरे वगैरे.

हघेहेवेसांनलगे.

नी,
चांगलं लिहिलं आहेस ग.
आम्हि पण काहि वर्शानपुर्वि नाट्क कम्पनि काढली होति तेह्वा मला पण हाच अनुभव आला होता
अचानक कधिहि चौकशि न करणारि माणस आवर्जुन माझा फोन मिळउन शुभेच्या द्यायला लागलि.चौकशि करायला लागलि.अचानक मि कोणि तरि मोठि व्यक्ति आहे अस मला वाटायला लागल.जग हे असच आहे

नानबा म्हणते त्या प्रमाणे ह्या लेखाच्या खूप प्रिंट आऊट काढून घे.. आणि पुढच्या वेळेस जे भेटायला बोलवतील त्यांना भेटल्या भेटल्या देत जा!

सुनिधीचे म्हणणे पटले. तुझ्या अडचणी तर खर्‍याच, पण कदाचित असे ओळ्खीतून काम मिळवणे म्हणजे सोपा शॉर्ट्कट वाटत असावा अश्या स्ट्रगलर्सना. काम मिळवण्यामागील अडचणी थोड्या कमी असे काहीसे, आणि त्या भरात समोरच्याची - म्हणजे तुझी काय अडचण असू शकते ह्याचा विचार होत नसावा. Happy मग, बाकीचे नावे ठेवणे वगैरे ओघाने येत असावे काही जणांकडून.

जो खरंच काही टॅलेन्ट असलेला आणि योग्य प्रशिक्षण घेतलेला असतो, जो मेहनत करत असतो ना त्याला हे असे शॉर्टकटस वापरायची गरज पडत नाही.
ज्याच्याकडे काहीच फारसा बेस नसतो आणि अचानक उठून त्याला साक्षात्कार होतो मीच तो असा तो माणूस शॉर्टकटस शोधायला बघतो. आणि तथाकथित ओळखीच्या शॉर्टकटस मधून काही घडलं नाही की आपल्या अ‍ॅप्रोचमधे, आपल्यातच काय प्रॉब्लेम आहे हे न समजता समोरच्यालाच नावं ठेवायला लागतो.
निदान माझा तरी आजवरचा अनुभव हाच आहे.

नीरजा, तू काही चुकीचं म्हणत आहेस किंवा तथाकथित स्ट्रगलर लोकांचे वागणे बरोबर आहे अश्या अर्थाने नाही लिहिली आहे मी कमेंट. तुझा लेख वाचून डोक्यात एक विचार आला, तो मांडला एवढेच.

रोजच्या आयुष्यात इतकी नाटकं करावी लागतात, मनात एक भाव असताना चेह-यावर दुसरेच भाव ठेवायचे अस्से काही कसब राखावे लागते की मलाही वाटते की संधी मिळाली असती तर मी भल्याभल्या सगळ्यांची अश्शी छुट्टी केली असती......

हे बोलताना मी त्या 'सगळ्यांचा' किती मोठा अपमान करतेय, अभिनय म्हणजे केवळ मी समजतेय तेवढेच नाहीये ह्याचे भान मात्र मला अजिबात नसते. माझी आविष्कारवाली मैत्रिण चेतन दातार ने कसली कसली शिबीरे घेऊन काय काय शिकवले हे जेव्हा मला सांगते तेव्हा मला आश्चर्य वाटते की अभिनय शिकायचे म्हणजे हे सगळे पण शिकावे लागते??

Happy मज्जाय नीरजा तुझी. तुझी कळकळ, वैताग पोचला Happy

तुला सांगू...तू काहीही लिहिलंस ना....... तरी ते इतकं वाचनीय असतं की त्यावर अगदी मनापासून प्रतिक्रिया द्याविशी वाटते. तू दिलेल्या प्रतिक्रिया असोत किंवा तुझा एखादा अनुभव असो ....सगळं एकदम पटूनच जातं.

You are Different Dude Happy

एकबार मिलना पडेंगा बॉस !!

लेख आवडला कसे म्हणायचे. असो. तुम्हाला असे अनुभव कमीतकमी येवोत अश्या शुभेच्छा!

>>मला पण अमेरिकेत एक नोकरी मिळवुन दे ना असे म्हणणारे लोक भेटलेत.
मलाही भेटत असतात. अमेरिकेऐवजी, इंग्लंडात. Happy
फार मनावर न घेता बरं म्हणते मग मी. आणखी काय करणार.

माझा एक मित्र गंमतीत म्हणायचा, ' मला काही डायलॉग नकोत पण फक्त स्टेजवर पाणी घेउन द्यायचे काम तरी द्या'. त्याला विचारले की , 'इतकेसे काम चालेल?'. तर म्हणायचा, ' अरे एकदा स्टेजवर गेलो की विंगेत जातोय कोण परत, शेवटपर्यंत स्टेजवरच राहणार'. Lol ... विषय बदलायचा नाहिये, ओघाओघात आठवले. तर नीघ. सावध!! असे कोणी म्हणणारे कोणी भेटले तर सावध. Happy

मस्त लिहिलं आहेस नीरजा. शॉर्टकटस फार कमीवेळा अचूक ठरत असतील कुठल्याही फिल्डमधे. कठोर परिश्रमांना पर्याय नाही Happy

अगदी कळकळीनं लिहिलंयस , नीरजा. (इच्छुकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वंही आहेतच त्यात.)

नानबाला हजारो मोदक.

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है >>>>>>>>>>>
अरे रे!!
मला अस वाटत नाही म्हणजे मी म्हातारा. Sad
असो मी म्हातार्‍याचा रोल करायलादेखील तयार आहे. Proud

असो हे लिहिलस ते बर झाल. आता ह्यापुढे तुला अशा मेल्स आल्या तरी त्यातील काही लोक तरी तुला नाव ठेवत बसणार नाहीत अशी अपेक्षा.

Pages