आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.

शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...

गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.

त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.

याच आसपास दुसर्‍या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...

अश्या तर्‍हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.

अजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्‍यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?

या लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर? आणि का?

बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू? ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण?मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.

प्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.

प्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्‍या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.

यानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट न लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्‍याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.

अनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.

आता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.

नाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम परफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.

दुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्‍यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है. --------- अ‍ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- अ‍ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्‍हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू न देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...

- नी

प्रकार: 

अग त्या मेल्सना/लोकांना केकता कपूरचा प्रॉ. कं. चा रस्ता दाखव! तिथे हवेच असणार अ‍ॅक्टिंग न येणारे थोकमध्ये. परत तिथे मेकपचे थरच्या थर थोपल्या जात असल्याने लुक्सची गरज नाहीच Proud

चांगलं लिहिलं आहे.. पण जुने हिरो हिरोईन यांचे अनुभव देखील फार असे वेगळे नाहीत. त्यांनीही अनेकांना आम्हाला अभिनय मिळेल का असे विचारलेले आहे. विचारुन पहाण्यात काय गैर आहे. विचारता विचारता आपल्याला आपला मार्ग गावतो ना. राजेश खन्नांची युटुबवर एक मस्त मुलाखात आहे. त्यात आराधना मधे त्यांना अभिनय कसा मिळाला त्याबद्दल सांगितले आहे.

बी, मला वाटतं नीरजाला कुणी विचारण्याबद्दल काही प्रॉब्लेम नसावा. फक्त समोरच्याला नकारार्थी उत्तर न पचवता आल्याबद्दल तिला वैताग येत असावा. कुणालाही येईल तो.

अरे तसं नाही ! समोरचा ही काय म्हणतेय ते समजून न घेता त्याला रोल न मिळाल्याबद्दल तिलाच दोशी ठरवत असेल तर काय होणार माणसाचं?

अरे देवा!! काय वैताग आहे गं नीरजा.. आधीच काय पाठीमागे बयादी काय कमी नाहीत आणि त्यातून हे असले नमूनेदार अनुभव.. कठीण आहे

मस्त लेख, वशिला,ओळख याशिवाय पुढे जाताच येत नाही ही पक्की रुजलेली समजूत या सर्व प्रकारामागे आहे.'जरा लाउन घ्या' ही रिक्वेस्ट सगळ्याच क्षेत्रात आहे.

जावे त्यांच्या वंशा तेंव्हाच कळे हे माहिती आहे. पण अपवाद म्हणून खूप भेटतात. त्यांच्याकडे पाहूण माझा राग..वैताग क्षीण होतो.

पण अपवाद म्हणून खूप भेटतात. त्यांच्याकडे पाहूण माझा राग..वैताग क्षीण होतो. >>> Happy एखादा गुणवंत असू शकतो. पण त्याचं सोनं करायचं हे योग्य व्यक्तीच्याच हातात असतं ना? जसं नीरजा म्हणतेय तशा अकादमी किंवा मॉडेल कोऑर्डिनेटर. तीने तिच्या बाबतीत "मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही." हे स्पष्ट सांगितलेलं दिसतंय वर. त्यातून तिला जे शक्य असेल ते अशा गुणी व्यक्तीबाबत तिने नक्कीच करावं Happy (ती करत असेलच).

आपापल्य क्षेत्राचं जाऊ दे.. पण ऐकूनचं चांगले बरे वाईट अनुभव.. काळे पांढरे करडे लोक यांची येजा ग्राह्य धरुन जगणारे अनेक पाहिलेत मी.. कुठलीही चिडचिड न करुन घेता जगतात.

ते तर आहेच बी. व्यक्ती तितक्या प्रकृती. कुणीच पूर्ण व्हाईट किंवा पूर्ण ब्लॅक नसतं. तसेच प्रत्येकाची सहनशक्तीही सारखी नसते. आपली स्वतःचीही सहनशक्ती कधीकधी कमीजास्त होतेच.

आगाउ Lol
बी अरे कोणाची किती सहनशक्ती हे आपण नाही ठरवु शकत.
नीरजाला प्रॉब्लेम फक्त ह्याचा आहे की असे लोक तिला व्हिलन ठरवतात.

नी. चान्गले लिहीले आहे. ते याक्टिन्ग चे सोडा. माझ्याकडे एक लै भारी स्क्रिप्ट आहे ते तुम्हास इमेल करू काय?

नीदी! छे छे!! तुला भेटून तुझ्याकडे माझ्या सॉल्लिड अभिनयाबद्दल विषय काढण्याच्या माझ्या मनसुब्यावर पाणीच फिरविलस तू!! Proud

छान. मिहि अशिकाहि यंग मुल पाहिलि आहेत जि दिवसभर ह्या ऑडिशनहुन त्या ऑडिशनला चकरा मारत असतात , आपण स्वतःला न ओळखताच. त्यातलि बरिच वाहवत जातात. हे थांबवण खरच कठिण वाटतय.

अग त्या मेल्सना/लोकांना केकता कपूरचा प्रॉ. कं. चा रस्ता दाखव!>>
तीने ती सोय करुन ठेवलेय तीची वेबसाईट आहे http://www.hoonur.com/ आणि पोर्ट्फोलिओ portfolio@hoonur.com ला पाठवायचा.

मी पण हिरो होणार..... इ. ८ वीत मी 'तो मी नव्हेच' मध्ये कुंकुचंद वेणीचंद मुंदडाचे काम केले होते..... हा फोटो घ्या... Happy

k.jpg

वा, छान लिहीलय! Happy
(आयला, पण मी नव्हती हो मेल पाठवली, मी तर प्रत्यक्षच विचारले होते असे पुसटसे आठवतय Lol )

चांगला लेख....

लोकांची पण चूक नाही.... करीना, मल्लिका, रामपाल, सेलिना असले लोक नट होऊ शकतात तर आपण का नाही असं वाटतं त्यांना.... 'पंधराईस पिक्चरं आली की आपन बी शिकू' असा विचार करतात. आणि मग लागतात तुमच्यामागे..

दिसायचं म्हणाल तर हिरो नाही तर नाही पण 'मार खाणारा व्हिलन' म्हणून घ्या असा विचार असेल...

Happy

मलाही विचारतात काही जण नोकरी मिळेल का युरोपात? अर्थात मीही मग फ्लॅश मारून घेतो चार चौघांसमोर. इतरांना सांगतो कैसे कैसे लोग चले आते हैं. बिचारी. खुळी माणसं सारी. पण शेवटी माणसंच. त्यातला मी एक.

वाचल्याबद्दल धन्स...
लिहायचा उद्देश एवढाच की इच्छा असेलच तर योग्य मार्गाने जा.
शॉर्टकटस चा मार्ग माझ्याकडे नाही.
आणि शॉर्टकटसचा मार्ग पूर्णपणे खड्ड्यांचा, शेवटीही खड्ड्यातच जाणारा असतो हे विसरू नका.

योग्य मार्ग काय असू शकतो हे मी सांगितलंच आहे वरती. आणि सरींडर, मेहनत, बुद्धी, प्रतिभा यांच्यानंतर शेवटी नशीब हाही भाग असतोच.

लोकांची पण चूक नाही.... करीना, मल्लिका, रामपाल, सेलिना असले लोक नट होऊ शकतात तर आपण का नाही

>>
हो ना परदेसाईंचं उ. उ वि. बद्दल ऐकून मलाही , ते ज्या अर्थी करू शकतात त्याअर्थी ,आपणही उ उ वि सहज करू शकू असा प्रचन्ड आत्मविश्वास आल रेडी आलेला आहे. Proud

Pages